शिवरात्रमाहात्म्य - अभंग ४१ ते ४५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४१.
पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरें ॥१॥
भयाभीत झालीं पांचही ते काळीं । वासना गुंतली एकमेकां ॥२॥
वडील कुरंगी येऊनि त्यापाशीं । लागोनी पायांसी काय बोले ॥३॥
नको मारूं पति तृषेनें पीडिला । मारी तूं मजला तया आधीं ॥४॥
आहेवपणानें धाडी स्वर्गलोका । येतुल्यानें सुखा पात्र होऊं ॥५॥
इतुकीयामाजी दुसरीही आली । ती ह्मणे उगली थांब आतां ॥६॥
तृषेनें पीदिलों पाजीं आधीं पाणी । मन जैसें मनीं तैसें करीं ॥७॥
नामा ह्मणे भिल्ल विसरला घात । राहिला निवांत त्यांच्या बोलें ॥८॥

४२.
वडील कुरंगी काय बोले त्यासी । सांगतें धर्मासी पूर्वीलीया ॥१॥
बांधोनी मारितां घडे महादोष । पाजी उदकास सोडोनियां ॥२॥
पुऊनियां जळ येऊं तुजपाशीं । मग सावकासी करीं काज ॥३॥
आमुचा विश्वस नाहीं तुज जरी । मागशीं त्यापरी भाक देऊं ॥४॥
पर उपकारीं पडतसे देह । लोभ आतां काय वांचूनियां ॥५॥
भुकेलिया अन्न तान्हेल्या जीवन । पुण्यासी कारण इतुकेंची ॥६॥
पांचजणीं तुज बोपीयेले देह । यालागीं संदेह न धरावा ॥७॥
नामा ह्मणे ऐसा प्रार्थितां किरात । द्रवला मनांत काय बोले ॥८॥

४३.
होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें । बोलतसां फार धर्मा-धर्म ॥१॥
येणें कांहीं कांहीं द्रव आला मना । तुमची भावना कोण जाणे ॥२॥
सोडिल्या पाण्यासी ठकवूनि आम्हासी । गेलिया तु-ह्मांसी काय कीजे ॥३॥
नामा ह्मणे ऐसें बोलेनि किरात । करावया घात शस्त्र काढी ॥४॥

४४.
देखती तीं दोन्ही पाडसें त्या काळीं । भिल्लापुढें आली लागवेगें ॥१॥
सांभाळोनि हात ऐकावी विनंती । धरीं कृपा चित्तीं आमुचिया ॥२॥
अतितालागोनि चिलिया वोपी देहे । तेणेंचि तो लाहे परमधाम ॥३॥
मातापितरांसी न करावा घात । मारावें आमुतें आधी आतां ॥४॥
कोंवळें शरीर गोड बहु मांस । लागो सार्थ-कास तुझे कांजी ॥५॥
नामा म्हणे सत्त्व मोठें त्या पांचांचें । होती कैलासींचे अधिकारी ॥६॥

४५.
हरणी सांगे कांहीं कर्मविपाकासी । ऐशा ऐशा दोषीं ऐसे होती ॥१॥
ठकवूनियां आह्मीं तुज जाऊं जरी । अंधतमाभि-तरीं वास पावों ॥२॥
गुरु स्वामी द्रोही विश्वासघातकी । तयास तो नरकीं वास सदा ॥३॥
परद्रोही परनिंदेसी रतला । तो होय कावळा जन्मोजन्मीं ॥४॥
पंक्तिभेदकेचीं मरतील पोरें । किंवा पती मरे बाळपणीं ॥५॥
सदासर्वकाळ दुष्ट कमीं रत । शूकरादि होत नीच योनी ॥६॥
अतीत अभ्यागत पूजा नाहीं ज्याला । घूस सर्प बिळामाजी होती ॥७॥
नामा ह्मणे केलें तैसें तें भोगावें । सावधान व्हावें जाणत्यांनीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP