शिवरात्रमाहात्म्य - अभंग २६ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२६.
जोडोनियां हात वंदिला कृतांत । ह्मणे माझा हेत इतुकाची ॥१॥
सर्वसुखाहूनि हेंचि वाटे गोड । संसाराची ओढ मोडवेना ॥२॥
मृग पक्षीयाचें कळावें बोलणें । सर्व कांहीं येणें कार्यसिद्धी ॥३॥
इतुकी आहे हो माझी ही वासना । पुरवूनि स्वस्था - ना जावें तुम्ही ॥४॥
नामा ह्मणे ज्याची जे कांहीं वासना । तेचि पुढें जाणा उभी ठाके ॥५॥

२७.
देऊनियां वर दंडपाणी गेला । ध्यास पारध्याला मृगा-चाची ॥१॥
लाऊनियां चित्त ऐके चळवळ । दृष्टीची तळमळ लक्ष तेथें ॥२॥
उगवला दीन जाहला प्रकश । मृग पक्षीयास दृष्टि झाली ॥३॥
तोचि मृग पाहा आला उदकासी । उडाण गगनासी साधीतसे ॥४॥
तृषाकांत मोठा चालीला नि:संग । प्रारब्धाचा भोग ओढवला ॥५॥
उदकाचिये हांवें दृष्टि झाली दुरी । पाश तो समोरी देखेचिना ॥६॥
येऊनियां पडे जाळिया माझारी । लोळे पृ-थ्वीवरी एकसरा ॥७॥
नामा ह्मणे भिल्लें पाहातां लोचनीं । वोढो-नियां गुणीं बाण लावी ॥८॥

२८.
घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें ॥१॥
परी तें होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥
धाकुटी हरणी पाडसें धाकुटीं । सांडी उठाउठी आली तेथें ॥३॥
पाहों जातां पाशीं गुंतला तो मृग । तेव्हां काय मग केलें तिनें ॥४॥
मुखाप्रती मुख लाऊनि चुंबिलें । ह्लदय फुटलें देख-तांचि ॥५॥
सुख दु:ख बोल बोलती ते वेळें । म्हणती कपाळीं भोग होता ॥६॥
सोडविता कोणी न दिसे ये काळीं । काळाची पडली उडी आतां ॥७॥
नामा ह्मणे खळा कळे त्याची वाणी । ऐकाया लागूनि स्थिर झाला ॥८॥

२९.
धर्मशास्त्री ऐसें बोलताती बोलें । तेणें चोजवलें चित्त त्याचें ॥१॥
आश्चर्याच्या डोहीं बुडाला पारधी । म्हणे कैसी बुद्धि याची पहा ॥२॥
रानींचीं रानवटें तया एवढें ज्ञान । प्रेमाचें जीवन वोसंडत ॥३॥
चाकाटली वृत्ति चित्त केलें स्थिर । दोघांचीं उत्तरें ऐकतसे ॥४॥
नामा ह्मणे हरणीहरणाचा संवाद । ऐकतां भवबंध तुटतसे ॥५॥

३०.
बंधनीं गुंतला देखोनियां पती । उडालीसे वृत्ति हर-णीची ॥१॥
देहाची ते आस सांडोनि लवलाही । पडे रडे कांहीं बोल बोले ॥२॥
ह्मणे तुह्मी आतां नव जावें एकलें । संगें आह्मां नेलें पाहिजे जी ॥३॥
बहुता जन्मांची तुह्मां आम्हां गांठी । आतां कैसी तुटी पाडितसां ॥४॥
भोम जे भोगिले स्वप्रप्राय झाली । नाहीं ते पुरली वासना हे ॥५॥
नामा ह्मणे विषयवासना वोंगळा । तेणें कोण्या काळें सुटिजेना ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP