श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय चौदावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरुभ्योनमः ।

जय जयाजी सदगुरु पूर्णानंदा । भक्तवत्सला स्वानंदकंदा । स्वानंददाता सच्चिदानंदा । सर्वांतरात्मा नमोस्तुते ॥१॥

नमु म्हणता चरण तुझे । पाहू म्हणता मुखांबुज । निजपदी देसी थारा सहज । संजीवनीस जगदगुरुरेवा ॥२॥

चिन्मय तुझी मूर्ती सुंदर । श्रवणी कुंडल मकराकार । गळा वैजयंती सुमनोहर । मनमोहन दयाळा ॥३॥

दयेचा तू होसी सागरु । क्षमेचा तू असशी मेरु । निजभक्ता अपराध थोरु । न पाहता देशी निजपद ॥४॥

तुज सारिखा नसे दयाळू । तुज ऐसा नसे कृपाळू । निरंतर राहून माझे ह्रदय कमळु । पुढे बोलवी चरित्र तुझे ॥५॥

त्रयोदशाध्यायीचे कथन । शिवराम स्वामीस अनुग्रह पूर्ण । पूर्णानंद करिताच जाण । स्तवन केले स्वानंदे ॥६॥

आता पुढील कथेचे अनुसंधान । ते ऐकावे एकाग्र मन । तुमचे अभय होताच जाण । पुढे चालेल ग्रंथ सहज ॥७॥

रुक्मीणी पंताचे घरी । शिवराम प्रभूंचे कवित्व लहरी । उठली तेव्हा पूर्णानंद समुद्री । ते परिसले की स्वानंदे ॥८॥

महाराजांचे अवतारा आधी । ब्रह्मानंदे पूर्णानंदा प्रबोधी । टीका करणे असे त्रिशुध्दी । शंकराचार्यकृत ग्रंथाची ॥९॥

पूर्व अवतार श्रीशंकराचार्य अवतार । भाष्यादी ग्रंथ थोरथोर । श्रीब्रह्मानंद संकल्पिति भाटीक मनोहर । शिवराम हस्ते व्हावे कीं ॥१०॥

ब्रह्मानंद संकल्पीती । शिवराम नाना रचना वर्णिती । लोकोध्दारार्थ प्राकृती । समग्र ग्रंथ यथावत ॥११॥

अनेक पदा माझारी । शिवराम प्रभु शिवअवतारी । ऐसे पूर्वील कवित्वाची कुसरी । ते सर्वत्र भक्तगणी ऐकती सप्रेमे ॥१२॥

यापरी अनेक अवतार । अनेकयुगी घेऊन श्रीशंकर । उध्दरितसे जगत चराचर । ब्रह्मानंद संकल्पनि ॥१३॥

तोच अवतार शिवराम । जो भक्तकाम कल्पद्रुम । याची लीळा उत्तमोत्तम । श्रवणमात्रे लोक तरती ॥१४॥

शंकरोक्ति ग्रंथास । टीका करावी निश्चयेस । यास्तव अवतार प्रभूस । घेणे सत्य या लोकी ॥१५॥

कलियुगाचे जन समस्त । केवळ प्रपंची विषयासक्त । ऐसिया लोका तारणार्थ । वेदांतचि आधार प्रसिध्द ॥१६॥

अनेक वेदांत ग्रंथ । जे वेदाचा तात्पर्यार्थ । श्रीशंकराचार्ये संस्कृत । केले अज्ञान निवारणे ॥१७॥

त्या संस्कृताचे गर्भार्थ । कळेना लोका सद्यःकालात । त्याची करावी टीकाभाषा प्राकृत । यास्तव गुरुकृपे शिवराम वाहति ॥१८॥

त्या ग्रंथासी करावे प्राकृत । आधी न होता अनुग्रहित । मग झाला विज्ञान विदित । अनुग्रहीतार्थी सर्वस्वे ॥१९॥

गायत्री दर्शन न होता आधी । वेदासि अधिकारी नव्हे त्रिशुध्दी । म्हणोनि ब्राह्मणासी आधी । पाहिजे मंत्र गायित्री ॥२०॥

तेवी वेदांत ग्रंथास । टिका करावया विशेष । तरी आधी पाहिजे गुरुविज्ञानोपदेश । यास्तव इच्छित पै साधती ॥२१॥

उपदेशरुपी कवित्व नानापरी वर्णिती स्वतंत्र । हाती पडली त्या वचनी ग्रंथित । ती पूर्णानंद पदकमळी अर्पित । प्रबोधामृत रचनांशी ॥२२॥

जे जे ग्रंथ केले आचार्य चरणे । त्याची टीका सुनिश्चय वर्णने । करिते झाले काव्य ग्रथने । शिवराम स्वामी आपुल्यावाणी ॥२३॥

आचार्यकृत ग्रंथ संस्कृत । ते दुग्धामाजी नवनीत । त्याचे मंथन करुनी प्राकृत । सारार्थ नवनीत उघड बोधिती ॥२४॥

ते नवनीत सेविता वदनी । विज्ञान दृष्टी अनुभव संतसज्जनी । यास्तव भाष्यार्थ मथती अनुदिनी । त्यासी नलगे भवरोग ॥२५॥

एक जरी आहे शंकरोक्ति श्लोक । त्याची टीका सम्यक । करिते जाले श्रीदेशिक । शिवराम स्वामी समर्थ ॥२६॥

आणि भगवदगीतेची टीका । महाराज केली गीताचंद्रिका । तेणे योग्य त्रैलोक्य देखा । प्रकाशमय पै होती ॥२७॥

ती टीकारुप सुधाकर । उदय होता ह्रदयमंदिर । ते स्मृत्यर्थ अमृत रसभार । द्रवती श्रोते चंद्रकांती ॥२८॥

भारत भागवत रामायण । आणि अष्टादश पुराण । त्यातील गर्भार्थ मंथून । निरुपणरुपिती अत्यादरे ॥२९॥

अनेक पुराणोक्त इतिहास । त्याची कथा सुरस । कथिती प्राकृत भाषेत । लोकासी विज्ञानांश प्रभूराये ॥३०॥

अध्यात्म रामायण ब्रह्मोत्तरखंड । याविना वेदांत ग्रंथ उदंड । कामधेनु ऐसा ग्रंथ प्रचंड । करिते जाले महाराज ॥३१॥

कामधेनुचे चारी स्तन । प्रतिस्तनी षाडष अध्याय जाण । एकेक स्तनी चौ अध्याय चारी धारा पूर्ण । यापरी ते ग्रंथ चौसष्ट अध्यायी ॥३२॥

या ग्रंथी हरिहरादिकांची चरित्रे । वर्णिले व्यासोक्ति आधारे । जे श्रवणमात्रे पवित्रे । समस्त विज्ञानसमरसती ॥३३॥

ते ग्रंथ पूर्ण असता घरी । अष्टमहा सिध्दी नवविधी त्याच्या द्वारी । त्याचे घरी राबे निरंतरी । ते प्रत्यक्ष कामधेनू ॥३४॥

लोकोपकारा कारणे । ते ग्रंथ केले निर्माणे । सप्रेम करती पारायणे । इच्छित मनोरथ अज्ञान निवारणी ॥३५॥

ऐसे वरद ग्रंथ । रचना केली समर्थ । श्रवणमात्रे कृतार्थ । असे सकल जनासी ॥३६॥

याविण अनेक ग्रंथ । पूर्विल अष्टवक्रादि प्राकृत । त्यांचीही भाषा टीकाकथीत । अज्ञान नाशिनी महाराजे ॥३७॥

त्यानी जी जी केली ग्रंथरचना । त्याचे प्राकृत अवलोकनही न घडे आताच्या जना । हा ग्रंथरुप सिंधु जाणा । त्याचा पार नसेची ॥३८॥

संस्कृत प्राकृत कानडी । तेलंग वृजभाषेची अतिगोडी । इतुक्या भाषेत कवित्व प्रौढी । करते जाले प्रभूवर्य ॥३९॥

ब्रह्मसाक्षात्कार होण्यास । एकच पद पुरे श्रोत्यास । ते पद्यार्थ भरता निजमनास । उन्मनी होय स्वानुभवी ॥४०॥

इक्षुपोटी साखर । हे तो जाणती चराचर । परि सेविता निर्धार । साखर स्वाद नव्हेचि ॥४१॥

ते ऊसाची करावी साखरु । परि त्यासी पाहिजे यत्न थोरु । प्रयत्ना वाचुन साचारु । साखर कदापि नव्हेचि ॥४२॥

इक्षुरुप ग्रंथ संस्कृत । त्याची साखरेची भाषा प्राकृत । करुनी ठेविले आईत । सामान्य भक्ता कारणे ॥४३॥

गिर्वाणीचे करुनी मंथन । काढून ठेविले चिदरत्न । ते लेऊन श्रोते सज्जन । भूषणपद पै पावती ॥४४॥

जेव्हा महाराज केले गीताचंद्रिका । ते पहावया पातले व्यासादिका । वृत्ती गोचर अगोचरही देखा । पातले तेथ संतवृंदे ॥४५॥

मुकुंदराज ज्ञानदेवादि अनेक संत । भगवंतचि ते मूर्तिमंत । तेही चंद्रिका पाहण्यार्थ । पातले तेव्हा स्वानंदे ॥४६॥

या गोष्टीचा विस्तार । बोलिलो मी चंद्रिकेच्या आधार । सत्यचि ते शंकरावतार । त्याचे नवल काय असे ॥४७॥

त्या ग्रंथास म्हणू नये प्राकृत । परिब्रह्म सदोदीत प्राप्त । म्हणोनि सर्व साधूसंत । अवलोकिती अत्यादरे ॥४८॥

त्या ग्रंथाचे श्रवण घडता चांग ।अर्थभेदिती अंगांग । ते अंग ग्रासुन श्रीरंग । होऊन नाचे सर्वस्वी ॥४९॥

त्या ग्रंथाचे हेच चातुर्य । सदगुरुमुखे निश्चय । श्रवण घडता ब्रह्म होय । ही नवलावो तेथील ॥५०॥

ज्यास नव्हे शास्त्र प्रचिती । आणिक नव्हे तर्क मुद्रेची स्थिती । ऐसीये लोकाप्रती । ब्रह्मसंविती केवी होय ॥५१॥

तरी ते महाराज कृपासिंधु । भक्तवत्सल दीनबंधु । तोडावया निजजनाचा भवबंधु । ग्रंथरचना पै केली असे ॥५२॥

किती म्हणुनी वर्णावे कौतुक । एक एक पद ते अलौकिक । श्रवण घडता देख । स्वरुपप्राप्ती पै असे ॥५३॥

सदभावे करीती श्रवण । श्रवणाचे होता मनन । मनी उदीत अपरोक्षज्ञान । यास्तव अवलोकिती साधुसंत ॥५४॥

ऐसे कवित्व वल्लीचे परिमळ । फाकले संपूर्ण भूमंडळ । मकरंद इच्छिती लोक सकळ । कृतार्थ बुध्दी सर्वस्वे ॥५५॥

उदय होता प्रभूचे कीर्ती सूर्य । तो प्रकाश फाकला लोकत्रय । अज्ञान तम हरेल म्हणूनी निश्चय । लोक धावती दर्शनास्तव ॥५६॥

देशोदेशीचे लोक फार । चुकेल आपुले येरझार । ऐसे मनी धरुनी निर्धार । दर्शना येती प्रभूच्या ॥५७॥

सप्रेम सेवूनी चरणतीर्थ । लोक होती कृतार्थ । म्हणोन ती महाराष्ट्री अवतार यथार्थ । जन तारणी प्रभूचे भूतळी ॥५८॥

गज तुरंगादि संभार । रत्नखचित अलंकार । सदभावे अर्पिती भाविक नर । प्रभूसी आणूनी त्याकाळी ॥५९॥

अष्टमहासिध्दी नवविधी । ज्याचे द्वारी राबती त्रिशुध्दी । परि महाराज आंतरी निस्पृहशुद्धी । कदापि तिकडे पाहेचिना ॥६०॥

महाराज तो सदा वैराग्यसंपन्न । वृत्ती ज्याची सदा उदासीन । न इच्छिती ऐश्वर्य पूर्ण । लोक अर्पिती प्रभूसी ॥६१॥

अनेक देशीचे अनेक लोक । इच्छुनी प्रभूचे हस्तमस्तक । कल्याणास येती देख । कृतार्थ बुध्दी सर्वस्वे ॥६२॥

बहुत लोकास कृतार्थ । करिते जाले समर्थ । तो पतीत पावन दीनानाथ । दीनबंधु दयाळु ॥६३॥

ज्याचे अवलोकना सरिसे । मुमुक्षुत्वी अज्ञान नासे । स्वस्वरुप प्रकाशे । सर्वाभूती ब्रह्मासार ॥६४॥

अनेकास करुनी हस्तमस्तक । देते जाले स्वानंदसुख । ते निजसुख देख । भक्तवत्सल भवहारक जे ॥६५॥

करिता त्यांचे चरणी आश्रय । पळून जाय भवभय । ऐसे जाणूनी निश्चय । शरण येती लोक फार ॥६६॥

त्यांचे पायी अमृत जोडे । जन्ममृत्युची वाट मोडे । स्वानंदधामी राहणे घडे । जाणूनी ऐसे शरण येती ॥६७॥

त्यांचे पायाची करुन नौका । भवसागर पार करिती लोक अनेका । लोकोपकारास्तव देखा । अवतार प्रभूचे भूतळी ॥६८॥

अनेक शिष्य प्रबोधिले । ब्रह्मसुखानुभूती उन्मनी रंगले । शरणांगता थारा दिधले । दीनदयाळु म्हणवुनी ॥६९॥

प्रभुसी शिष्य बहुत जाले । सवेनुसार प्राप्त करुन घेतले । कांहीएक शिष्य ध्वज लाविले । गुरुभक्ति सर्वस्व ॥७०॥

अगाध त्याची गुरुभक्ती । अगाध त्याची वैराग्य स्थिती । धन्य ते या त्रिजगती । भक्तराज शिरोमणी ॥७१॥

तरी ते भक्त कोठील कोण । म्हणा श्रोते दयाळु आपण । त्याचे करितो कथन । ते परिसावे सप्रेमे ॥७२॥

विजापुरीचे ग्रहस्थ एक । त्याचे नाव चंद्रप्पा नायक । मायबाप सहित देख । राहत असती त्या ग्रामी ॥७३॥

ज्याचे घरी अपार लक्ष्मी । लाखाचे उद्दीम करीतसे ग्रामी । विजापुरी असता शिवराम स्वामी । शरणांगत पै जाले ॥७४॥

महाराज केवळ अवतारी । त्यांचे अभय हस्त पडता शिरी । टळेल जन्ममृत्युची वारी । म्हणून शरणांगत पै जाले ॥७५॥

त्याचा भाव पाहुनी निष्कलंक । प्रभू दिले वरदहस्ते कृपांक । हस्तमस्तकी होताची देख । उपरती त्यासी प्राप्त जाली ॥७६॥

चित्ती नावडती विषयसुखे । विषय दिसे विषा सारिखे । प्रभूसेवेसी जाणोनि हरिखे । सेवेमाजी प्रवर्तले ॥७७॥

सेवेमाजी ब्रह्मप्राप्ती । सेवेमाजी परम विश्रांती । सेवाकरिता हरे खंती । जाणुनी सेवा करितसे ॥७८॥

सेवेमाजी स्वात्मसुख । ऐसे वदती अंतर्मुख । यापरी जाणुन सम्यक । सेवेसी प्रवर्तले सर्वस्वे ॥७९॥

त्यानी जी गुरुसेवा केली । त्याजवर जे गुरुकृपा जाली । क्वचित असतील भूमंडळी । समान त्याच्या गुरुभक्ता ॥८०॥

त्याचे गुरुसेवेचे लक्षांश । कदापि नये लिहिण्यास । धन्य असे त्याचे मातेस । असा गुरुभक्त प्रसवली ॥८१॥

त्या गुरुभक्तीचे कौतुक । एक ऐकावे सम्यक । ते ऐकता गुरुभक्तासी सुख । प्रेमासी प्रेम चढे ॥८२॥

एकदा विजापुर ग्रामी । असता शिवराम स्वामी । तो गुरुभक्त ठेऊनी गुरुपादपद्मी । दर्शना जाती स्वानंदे ॥८३॥

वाटेत पाहिली सुमनमाळा । ते घालावे सदगुरुंचे गळा । ऐसे जाणुन तो गुरुभक्त पुतळा । विकत घेतला पुष्पहार ॥८४॥

पुष्पाचा हार आणि गजरे । तुरा करविले अति मनोहरे । ते घेऊनी जात असता निर्धारे । पितयासी पाहिले दुरुनी ॥८५॥

पिता येता सामोरा पाहुनी । विचार करी निज अंतःकरणी । जरी पुसतील मज लागोनी । उत्तर काय करावे ॥८६॥

हे फूल नेतोस कोणास्तव । ऐसे म्हणता काय बोलावे । त्या लोकांची मर्यादा अभिनव । पित्यासी इतुके भीत असे ॥८७॥

ते पुत्र ऐसे म्हणिजेल । जो मायबापाची मर्यादा राखेल । मायबापास दैवतरुप भावेल । तोच सुपुत्र या जगी ॥८८॥

पित्यास न पुसता जाण । मी फुल नेतो की म्हणून । गजबजुन निज अंतःकरणी । ते फूल काय करीतसे ॥८९॥

दूर असता निज पिता । ते पुढी भिरकावली तत्वता । तेथ एक ओस घर असता । त्यात जाऊन पै पडली ॥९०॥

ते भक्तराज शिरोमणी । ज्यांची वृत्ती रंगली गुरुचरणी । त्याचा निष्कलंक भाव पाहोनी । सदगुरु तेव्हा काय बोले ॥९१॥

जेथे भाव तेथेचि देव । ऐसे वदती महानुभाव । सदगुरु तो स्वयंमेव । प्रगटते झाले ओस घरी ॥९२॥

श्रीगुरु नव्हे एकदेशी । श्रीगुरु तो सकळ प्रकाशी । श्रीगुरु तो स्वानंदराशी । स्वानंदकंद जगदात्मा ॥९३॥

ईश्वर आणि सदगुरु । यासी भेद नसे निर्धारु । ऐसी होतसे गजरु । वेदशास्त्री सर्वस्वी ॥९४॥

निजभक्तचे पाहूनी आरव । आरवासरिसे घेई धाव । प्रगटुनी त्याचे मनोभाव । मनोरथ पुरवी सदगुरु ॥९५॥

त्या भक्ताचा भाव पाहुनी निक । ओस घरी प्रगटले श्री देशिक । तो जगदात्मा जगव्यापक । शिवराम स्वामी समर्थु ॥९६॥

त्या भक्ताचे असता अगत्य । लौकिकी करुनी शौच निमित्य । ओस घरी प्रगटुनी सत्य । फुलकंठी झेलीतसे वरचेवरी ॥९७॥

ते फुलाची घेऊनी पुडी । शिष्या हाती देऊनी आवडी । बोले काय सदगुरु प्रौढी । स्वानंदमुक्त ते काळी ॥९८॥

हे सदभक्ताने वाहिली फूले । त्या सुवासी माझे मन गुंतले । तो सदभक्तराज कल्लोळे । जिवलग माझा ज्ञानमूर्ती ॥९९॥

ऐसे बोलोनी मातु । तेथुन निघाले दिनानाथु । जो सदगुरुराज समर्थु । अवतार पुरुष भूतळी ॥१००॥

निज बिर्‍हाडी येऊन । हस्तपाद प्रक्षाळून । ती पुष्पमाला घेऊन । स्वानंदे घाली निजकंठी ॥१०१॥

कंठी घालुनी सुमनमाळा । श्रीगुरु स्वानंद पुतळा । वाट पाहे वेळोवेळा । निजभक्ताची सर्वस्वी ॥१०२॥

इकडे भक्तराज शिरोमणी । बाबा बरोबर जाता सदनी । हळहळ करीतसे निज अंतःकरणी । सुमन हार प्रभूसी नाही वाहिले ॥१०३॥

मी तो केवळ दीनहीन । माझे नव्हे शुध्द अंतःकरण । तरीच प्रभूचरण । सुमन अर्पण नाही जाहले ॥१०४॥

ऐसे करिता अनेक कल्पना । पुनरपी निघाले गुरुदर्शना । सप्रेम येऊनी चरणा । साष्टांग नमन पै केले ॥१०५॥

नमन करिता साष्टांगी । अष्टभाव दाटला अंगी । न्याहाळिता सदगुरु सर्वांतरंगी । वृत्ती रंगली गुरुपायी ॥१०६॥

गुरुपायी रंगली चित्तवृत्ती । तारक स्थिती प्राप्त होती । अबोल पाहता शिष्याप्रती । सदगुरु काय आज्ञापी ॥१०७॥

अरे गृहस्था शिष्य शिखामणी । पूर्ण अधिकारी चिदरत्नखाणी । तुज सारिखा याभुवनी । पाहता न दिसे प्रेमळ ॥१०८॥

पाहता तुझे सप्रेम । ते प्रेम नव्हे विकसित पद्म । त्यामाजी मी शिवराम । गुंतुन सेवितो मकरंद हे ॥१०९॥

तु जे अर्पिलासी सुमनहार । ते सुमन नव्हे नवरत्नहार । नवरत्न ते नव विविध प्रकार । लेऊनी बसलो सर्वांगी ॥११०॥

तुझे सुमनाचे भूषण । झेलूनि वाहिलो भूषण आभूषणा भरण । ब्रह्मानंद सुखासी वाहून । पूर्ण वरे प्रसादिलो ॥१११॥

तुझा भाव तो अर्चिले पूर्ण हा रेख । तुझे भावे तो अतिचोख । तुझे भावचि तुजला देख । स्वसुखासी हेतु पै होसी ॥११२॥

तु जे टाकिलासी सुमनहार । तो हार अति मनोहर । ते झेलूनी मी निजकर । कंठी घालुनी पै बसलो पाही ॥११३॥

ऐसे म्हणता सदगुरुनाथ । शिष्य विचारी निज मनात । म्या टाकिले ज्या फूलात । ते प्रभूसी केवी पोहचले ॥११४॥

यापरी त्यास येता कल्पना । सविस्तर सांगुनी वर्तमाना । संकल्पना निरसिती सदगुरुराणा । चरणी मिठी पै घातली ॥११५॥

चरणी घालिता मिठी । ब्रह्मानंद दाटली सृष्टी । कल्पना गेली उठाउठी । पूर्णानंद लुटितसे ॥११६॥

पूर्णानंद दाटता नयनी । वारंवार आलिंगीत गुरुचरणी । सदगुरुच्या पादुका घेऊनी । सप्रेमे वाहातसे निजमस्तकी ॥११७॥

पादुका लाऊनी भाळी । वंदन करितसे वेळोवेळी । मनी म्हणे या भूमंडळी । धन्य माझा सदगुरु ॥११८॥

या सदगुरुची अगाध महिमा । अगमा अगोचर निरुपमा । स्मरणमात्र निजधामा । देणार ऐसा सदगुरु ॥११९॥

सदगुरु माझा पूर्णब्रह्म । सदगुरु माझा कैवल्यधाम । धन्य सदगुरु शिवराम । प्रभू माझा शिवमूर्ती ॥१२०॥

सदगुरु माझा परात्पर । सदगुरु निर्गुण निराकार । मज दीनास्तव होऊनी साकार । तारिले हेचि नवल असे ॥१२१॥

सदगुरु माझे जीवीचे जीवन । सदगुरु माझा प्राणाचा प्राण । सदगुरु हे सर्वाधिष्ठान । अंतरात्मा जगदगुरु ॥१२२॥

या सदगुरुवरुन । काय टाकावे ओवाळून । तनुचेही करिता निंबलोण । उत्तीर्ण कदापि नव्हेची ॥१२३॥

सदगुरु केवळ निरअवयव । मज दीना करिता सावयव । होऊनी तारिले हे अभिनव । करिणी प्रभूची अगाध ॥१२४॥

म्या टाकिले सुमनपुडी । आपण अंगिकारिले अती आवडी । काय मी वानू प्रभूची प्रौढी । दीन रक्षकु दयाळ ॥१२५॥

मी तो केवळ पामर । पतीतामाजी पतीत दुस्तर । मज देहबुध्दी जडिली आजवर । ही वारावे जी दयाळा ॥१२६॥

मी तापत्रयी बहु तापलो । कामादि वैरिया करी गांजलो । या पदाविण उपशमन नाही देखिलो । या पायातळी गुरुवर्या घेई पदरी ॥१२७॥

माझा वारुन मोह सर्व । पायीच द्यावे मजला ठाव । हाची दासाचा मनोभाव । पूर्ण करावा जी सदगुरुनाथा ॥१२८॥

यापरी अनेक वाक पुष्पांजली । अर्पिता गुरुपाद कमळी । गुरु तो साक्षात चंद्रमौळी । प्रसन्न होतसे शिष्यासी ॥१२९॥

भाव देखताचि होतसे हरिख । अंतरी गुरुभक्ति स्वाभाविक । देहभाव विशेष सेवाधिका । अनन्यता गुणधर्मि ॥१३०॥

ऐसेचि गुरुसेवा करीत असता । वैकुंठवासी झाले मातापिता । मग काय करी ग्रहस्था । ते परिसावे सप्रेमे ॥१३१॥

आधीच संसाराची चिंता । कांहीच नसे त्या गुरुभक्ता । माता पित्याच्या देहा विश्रांती पावता । निर्भय जाले संसारी ॥१३२॥

ज्यासी संसारसुख नावडे । गुरुचरणारविंदी चित्त जडे । गुरुसेवे तया आवडे । त्याविण सुख कांही नसेची ॥१३३॥

घरी जाणून अपार संपत्ती । काय विज्ञापिले श्रीगुरुप्रती । हे अर्पण असे स्वामीस निश्चिती । अंगीकार आता करावे ॥१३४॥

ऐकता शिष्याचे वचन । बोले काय श्रीगुरु आपण । हे उपाधि का रे मज लागुन । सहसा मजला नलगेची ॥१३५॥

द्रव्याचे पाठी जे लागले । सर्वस्वी ते नागवले । स्वसुखासी ते मुकले । द्रव्यसंग्रही परिचा भार ॥१३६॥

तू जे अर्पिले सदभावे धन । तू जे वाहिलासी सुमन । तेणे करुन अंतःकरण पूर्ण । प्रसन्न असे सर्वस्वी ॥१३७॥

तुझे प्रेमाचे भूषण । लेऊन जाली सेवा पूर्ण । पुनरपि तेच देशी आणोन । वृथा भार शिष्यराया ॥१३८॥

श्रीगुरुचे ऐकता उत्तर । मग काय बोले शिष्यवर । भरले वैभवा सहित घर । देतसे दान द्विजालागी ॥१३९॥

द्विजा देऊनी गृहदान । आपण जाले वैराग्यसंपन्न । सदगुरु सन्निध रहावे म्हणून । गृहदान दीधले द्विजासी ॥१४०॥

ज्यासी गुरुसेवेसी गोडी । त्यासी ही संपत्ती काय बापुडी । सकळ विषय तया नावडी । नैराश्यता ज्याशी रोकडे ॥१४१॥

कळल्याचे हेच लक्षण । निशिदिनी सेवीत गुरुचरण । सेवे वाचुन अन्य साधन । नावडे त्यासी सर्वस्वे ॥१४२॥

तेच भवापासोन । वर पावले जाण । त्यालाच प्राप्त असे पूर्ण । पूर्णानंदपद निश्चय ॥१४३॥

असो या शिष्याचा वैराग्य निश्चय । पाहता स्वये श्रीगुरुराय । हर्षायमान होऊनी हस्त अभय । ठेविते जाले मस्तकी ॥१४४॥

मस्तकी ठेऊनी अभयकर । स्वमुखे करितसे स्तोत्र । अगाध की रे तुझे वैराग्य खडतर । वैराग्यसिंधु चिन्मूर्ती ॥१४५॥

अंगी नसता वैराग्य । कदा न मिळे राज्यभोग । काय वर्णावे तुझे भाग्य । परमार्थ सुख तुची वहसी ॥१४६॥

तू सकळ ज्ञानीयामाजी अग्रणी । तुज कळस शिष्याचा शिरोमणी । तुज म्हणावे राजमणी । तू राजा होसी योगियांचा ॥१४७॥

तधी पासूनी नाम राजमणी । प्रसिध्द जाले या जनी । आणखी एक वर दीधले तयालागुनी । ते परिसावे भाविकहो ॥१४८॥

यावचंद्र दिवाकर । तुझ्या आराधनेस निर्धार । जेवतील ब्राह्मण शतसहस्त्र । ऐसा वर दिधले श्रीसदगुरु ॥१४९॥

या संप्रदाया माझारी । तुझी आराधना करतील जे परोपरी । आराधनेचे सुकृत भारी । त्यास प्राप्त असे रे शिष्याराया ॥१५०॥

स्वामीचे वर असता पूर्ण । या काला पर्यंत लक्ष ब्राह्मण । आराधनेचे दिनी जाण । अविस्तिर्ण पै जेविती ॥१५१॥

पौष शुध्द एकादशी पासुन । पौर्णिमा पर्यंत जाण । उत्साव होतो माहान । देशोदेशी निश्चय ॥१५२॥

शिवमौगी नाम ग्रामी । समाधिस्त जाले राजमणी स्वामी । अखंड जडो माझे ह्रदपद्मी । ध्यान त्याचे सर्वस्व ॥१५३॥

अखंड करिता त्याचे ध्यान । जन्ममरण तत्क्षणी लुप्त होती जाण । कल्याणकारक त्याचे ध्यान । ध्यान करिता मुक्त होय ॥१५४॥

त्याचे प्रबोधास्तव बासष्ठी पद । शिवराम स्वामी केले विशुध्द । त्याचे श्रवणमात्रे ब्रह्मानंदपद । प्राप्त असे श्रोतया ॥१५५॥

असे ते गुरुभक्त शिरोमणी । त्याची महिमा कोण वाखाणी । अगाध असे त्याची करणी । कारण क्रिया विरहित ते ॥१५६॥

पुढे राजमणी स्वामी पासुन । सांप्रदाय क्रम पूर्ण । एतत काळ परिर्यंत जाण । चालला असे सर्वस्वे ॥१५७॥

आता पुढील कथेचे अनुसंधान । शिवराम स्वामी केशवस्वामीचे दर्शन । होईल ते स्वानंदी निरुपण । ते परिसावे सप्रेमे ॥१५८॥

हे चरित्र पूर्ण ब्रह्मानंद राजे । पूर्णानंद भरलासे सहजे । श्रवणमात्रे सदा ज्ञान उपजे । प्राप्त असे सर्वासी ॥१५९॥

सहजानंद दिगंबरु । त्याची पादुका होईल निर्धारु । हेची प्रार्थना वारंवारु । श्रोत्यास करितसे हनुमदात्मज ॥१६०॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । चतुर्दशोध्याय गोड हा ॥१६१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP