श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय तेरावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरुभ्योनमः ।

श्रीसहजानंदायेनमः जय जयाजी पूर्णानंद राया । भक्तवत्सला स्वानंद निलया । शरण येता तवपाया । मोह त्याचे पै हरिसी ॥१॥

हरुन त्याचे मोह सर्व । तव पायीचा आनंद देसी नित्यनव । ऐसा तू स्वानंद सागर स्वयंमेव । दीनोध्दारका दयाळा ॥२॥

तू निर्गुण निराकार । भक्तास्तव होवोनि साकार । निजकल्याणी तिष्ठसी निरंतर । भक्ता कल्याण द्यावया ॥३॥

कल्याणकारक तुझे रुप । पूर्णानंददायक नाम सहज । सहज माझे जाळून कर्मबीज । निजपदी थारा तू देयी ॥४॥

समपदीचे घडता दर्शन । चुकेल सहज जन्ममरण । सहजानंदमय चिदघन । पूर्णानंदा सर्वेशा ॥५॥

तू सकळ रंगातीत श्रीरंग । भरुन माझे अंतरंग । तुझे चरित्र अभंग । पुढे बोलवी श्रीसदगुरु ॥६॥

द्वादश अध्यायीचे निरुपण । शिवरामस्वामी विजापुराहून येऊन । सप्रेम वंदिले लक्ष्मीनारायण चरण । ते परिसले की स्वानंदे ॥७॥

पुढे प्रभूसी अनुग्रह पूर्ण । घडावा ऐसी इच्छा धरुन । गोदूबाई पूर्णानंदा कारण । विज्ञापना पै करिती ॥८॥

जय जय सदगुरु श्रीपूर्णानंदा । चिन्मयररुपा स्वानंदकंदा । एक विज्ञापना असे चरणारविंदा । ते मनोरथ पूर्ण करी ॥९॥

आपणा जरी पिता म्हणावे । तरी देहसंबंध आपणा नठावे । आपण साक्षात स्वयंप्रज्ञा आघवे । पूर्णब्रह्म मूर्तिमंत ॥१०॥

आपण सत्यचि आदिनारायण । श्रीलक्ष्मी महालक्ष्मीच पूर्ण । उभयता निराकारचि साकार होऊन । तारिले हेचि नवल असे ॥११॥

श्रवणभक्ति तारिले परिक्षिती । कीर्तनी उध्दरिले शुक महामती । स्मरणमात्रे प्रल्हादाप्रती । काष्टी प्रकटलासी नृसिंहरुपी ॥१२॥

पूजनाचे वियोग । प्रभुराजा तारिले लागवेग । वंदन करिताच सांग । अक्रुरा तारिले कृपाबल ॥१३॥

पाद सेवन करिता लक्ष्मी । अमर जाली तव पादपद्मी । दास्य करिता सप्रेमी । चिरंजीव जाला वायुसूत ॥१४॥

अर्जुनास सख्य म्हणता । तारिलेजी सांगोनि गीता । आत्म निवेदनी बळीद्वारी तत्वता । हा काळ पावेतो पै तिष्ठसी ॥१५॥

जनकादिकासी होवोनि जामात । लक्ष्मणादिकासी बंधु निश्चित । पांडवादिकासी होवोनि आप्त । तारिले नवल नव्हेची ॥१६॥

याविना अनेक पुण्यश्लोक । त्याचे वृत्ती पाहुनी चोख । त्यासी तारिले निःशंक । आश्चर्य कांही नसेची ॥१७॥

त्यांनी जन्मजन्मांतरी । तुज आराधिले की कवण्यापरी । आम्ही केवळ मानव निर्धारी । तारिले होवोनि सगुणत्वी ॥१८॥

आपणास म्हणता जनकू । तरी आपण जगाचे स्वामी निःशंकू । आपल्या दर्शने जन्ममरण क्षणैकू । हरेल सर्व लोकांचे ॥१९॥

तू सर्व लोक प्रकाशक । देह इंद्रियासी चाळक । तू निज जना सुखकारक । सुखस्वरुप अंतरात्मा ॥२०॥

तुज ऐसा न दिसे दयाळू । तुज ऐसा नसे कृपाळू । तुजसवे माझे ह्रदयकमळु । पूर्णानंदा सदगुरुवर्या ॥२१॥

माझे मनीची वासना एक । आपण शिवरामासी आनंद सांप्रदाईक । करावा जी हरिख । सर्वत्रोध्दारार्थ कृपाघन ॥२२॥

आश्रय करुनी आपुले पदरज । विजापुरी विजयध्वज । लाविला ज्याने सहजा सहज । त्यासी अनुग्रह करावा ॥२३॥

रुक्मिणी रमण श्रीविठ्ठल । ज्यास निजकंठीची सुमनमाळ । स्वहस्ते कंठी घातली तो हा बाळ । त्यास अनुग्रह करावा ॥२४॥

लक्ष ठेविता आपुले पादपद्मी । रुक्मीणीपंता पासुन विजयलक्ष्मी । ज्यास प्राप्त असता सुगमी । त्यासी अनुग्रह करावा ॥२५॥

शिवराम माझ्या जीवीचे जीवन । शिवराम माझा प्राणाचा प्राण । तो निजसुखाचा बंधु पूर्ण । त्यास कृपा अनुग्रह करावी ॥२६॥

तो आपुले चरण कमलीचा भ्रमर । पदरेणु रत्नाचा मांदुर । आपण वरदाहस्त साचार । त्याचे शिरी ठेवावे ॥२७॥

ऐसे अनेक वचनी स्तवन । लक्षूनी पुर्णानंद चरण । वाहताच गोदू जाण । पूर्णानंद काय आज्ञापिती ॥२८॥

ऐक गोदू गुणवंती । मी ऐकिली तुझी विनंती । अनुग्रह करावा शिवरामाप्रती । तो तरी अनुग्रहितचि पै असे ॥२९॥

यापरी ऐकता पितृवचन । परतुनी बोलली काय त्यालागुन । त्याची महिमा पूर्ण । आपणचि जाणे गुरुवर्या ॥३०॥

पूर्विल सनकादिक महामुनी । हस्तामलकादि व्युत्पन्न ज्ञानी । त्यासही गुरुचरणा वाचुनी । आश्रय नसेची गुरुराया ॥३१॥

तेही गुरुचरणारविंद । भ्रमर होऊनी सेविती मकरंद । मग हे सच्चिदानंद पद । प्राप्त करुनी पै घेती ॥३२॥

या सदगुरुपदीच्या पादुका । नाही वाहिल्या निजमस्तका । व्युत्पन्न ज्ञानी असताही देखा । कल्पांती सुटका त्या नांही ॥३३॥

जे सदगुरुपद समुद्री नाही बुडाले । चिदरत्नासी ते मुकले । काळमुखी ते सापडले । जन्म मृत्यु माझारी ॥३४॥

गुरुपद पद्मीचे रंग । ज्यास न चढेल सर्वांग । त्याचा नव्हे भवभंग । हे तो प्रसिध्दवेदशास्त्री ॥३५॥

मुख्य श्रीकृष्णदि अवतार । तेही वाढविलेती गुरुचरित्र । सदगुरु वाचुन साचार । अन्य साधन नसेची ॥३६॥

म्हणून गुरुपदपद्मी भ्रमर । होऊन गुंजारव करिती निरंतर । तेची पावती पैलतीर । भवसमुद्रा पासोनी ॥३७॥

बंधु माझा अवतारी । असेना का निर्धारी । परि इच्छितो निजशिरी । अभय हस्त स्वामींचे ॥३८॥

पूर्णानंद आपण पूर्णब्रह्म । आपुला शिशुच तो शिवराम । त्याचे पुरवुनी मनोधर्म । कृतार्थ आता करावे ॥३९॥

आपुले चरणांघ्रिचे तीर्थ सेवावे । तेणे निजपदी चढावे । हीच असे त्याचे मनोमनी वैभवे । हे पूर्ण करणे प्रभूकडे ॥४०॥

ऐकता कन्येचे प्रेमभाषण । पूर्णानंद जाले सुप्रसन्न । पूर्णानंदांची प्रसन्नता देखोन । शिवरामासी चरणी पै घातली ॥४१॥

शिवरामे वाहीली आपले मस्तक । पूर्णानंदे वरप्रसादे मस्तकी हस्ते शांभवीय मुद्रांक । ते हस्तस्पर्श नव्हे स्वरुपर्णव चोख । बोधानंदी तरकमंत्रे संवाहीले ॥४२॥

निमित्तमात्र अनुग्रह घडता । वृत्तीत उदभवली तन्मयता । पूर्णानंदीय रंगी तत्वता । शिवरामरुप रंगले गुरु स्वरुपी ॥४३॥

अंगी नसे देहभ्रांती । निःशेष मुराली चित्तवृत्ती । सर्वेंद्रियद्वारे ब्रह्मानंद संप्रज्ञता स्फुर्ती । स्फुरण होतसे शिवरामाशी ॥४४॥

तेव्हा सहज समाधिसुख । शिवरामे सेवितसे अति हरिख । हे पूर्णानंदी ब्रह्मानंदत्वी भाक । सावध करिती पूर्णांशी स्वानंदे ॥४५॥

सावध होताच क्षणी । गुरुचरणी मिठी घालुनी । स्तवन आरंभिले प्रेमवाणी । ते परिसावे स्वानंदे ॥४६॥

जयजय सदगुरु शिवमूर्ती । अगाध असे तुझी कीर्ती । स्वप्रकाशक तू स्वयंज्योति । दत्तरुपी सर्वेशा ॥४७॥

जय जय सदगुरु सदानंदा । ह्रदयभिरामा आनंदकंदा । अमळरुपा सच्चिदानंदा । गुणगंभीरा जगत्पती ॥४८॥

ब्रह्मानंदा सौख्यसमुद्रा । सहजानंदा कल्याण विहारा । पूर्णानंदा निर्विकारा । नित्यरुपा निरंजना ॥४९॥

ब्रह्मानंदा आनंदकारका । पूर्णानंदा चितद्विशेखा । लक्ष्मीवरा साम्राज्य दायका । अंतरात्मा नमोस्तुते ॥५०॥

कवळिता तुझे चरणारविंद । समूळ ग्रासीले भेदाभेद । का कोण मी कैंचा झालो मी झालो सच्चिदानंद । देही भान मज नसेची ॥५१॥

आपण रंगले पूर्णानंदी । मजही केले पूर्णचिदब्रह्म समुद्री । जे जे दिसती ते पूर्णानंदोदधी । पूर्णानंदमय विश्वंभरत्व दिसे ॥५२॥

जग सर्व दिसेचिच पूर्णानंद । हे ही हारपले या पादारविंदी । बोलण्यामाजी पूर्णानंद । श्रुती अबोल मौनावले ॥५३॥

जेथे बोलचि जाले अबोल । अबोलचि तू सच्चिदानंद केवळ । मजही तेच सच्चिन्मय तरळ । हे काय नवल गुरुवर्या ॥५४॥

तुझे चरणी जे जाले प्राप्त । ते हाती न सापडे ब्रह्मादिकाही अतीगुप्त । ते बोलता नये वाचोनी विज्ञप्त्त्र । वाचे परते ते अगम्यांशी ॥५५॥

ते सुख न ये देता घेता । ते सुख न ये पाहता दाविता । आपुले आपणचि तत्वता । ते सुख सोहळाशी भोगावी ॥५६॥

ते सुख अनुभविता अंगी । आपणचि दिसे संपूर्ण जगी । त्रिजगती आपणचि अणुत्रणांतरंगी । ते अन्वयसुख यापरीचे ॥५७॥

यापरी स्वानंदीय अमृत । पाजविले शरुबोध सम्यक । अजरामर केले चाखऊनी चिदंश । जन्म मृत्यूच्यापरे विरमले ॥५८॥

आता या उपकारा । उत्तीर्ण नव्हेजी दातारा । चुकवीला जीवाच्या येरझारा । सहज शरण येताची ॥५९॥

रंकासी येई रावपण । पाप्यासी इंद्र सिंहासन । तैसे मज बाळास अगम्यपण । ही अगाध करणी तुझी प्रभूराया ॥६०॥

अनेक युगी अनेकास । पाहुनी त्याची कृती विशेष । उध्दरिले त्या जनास । हे आश्चर्य कांही नव्हेची ॥६१॥

आम्ही केवळ प्राकृत । पदरी नाही जी सुकृत । बाप होऊनी तारिले अन्वर्थ । ही अगाध महिमा लक्ष्मीवरा ॥६२॥

लोकाचे जननी जनकू । देहबुध्दी प्रवर्तकु । तैसा नव्हेसी जीवनवाहकू । जन्ममृत्यु ही पूर्णत्वी निवारिले ॥६३॥

जन्ममृत्युचे जे पंथ । ते चुकवूनी यथार्थ । स्मरणमात्रे तत्पद पूर्ण परमार्थ । लावुन देशी निजपंथा ॥६४॥

ऐसा पिता तो दुर्लभ । जे दुर्लभ ते केले सुलभ । सुलभा माजी पद्मनाभ । अपरोक्ष होय सर्वाभूती ॥६५॥

सर्वाभूती श्रीराम भेटी । होता कृपा तत्काळ भवाब्धी आटी । ऐसा तू पूर्णानंद जगजेठी । पित्र चरणत्वी भाग्ये लांधले ॥६६॥

सर्वाभूती भगवतभाव । हा ही बोल केला वाव । एकत्व करुनी स्वयमेव । दाविले माते दातारा ॥६७॥

माय लक्ष्मी बाप नारायण । ऐसा अनुकूल दुर्लभ जन्मलेष । आपुले चरणीचे भूषण । होता कृतार्थ मी जालो ॥६८॥

मी कृतार्थ जालो ऐसे म्हणता । मी माझी भिन्नतानांही निश्चिता । मी तू पणाविण निजरुपी सत्ता । मीठी पडली मी कैचा ॥६९॥

निजरुपी ग्रासिले मी पण । विरालेते ते तू पण । मी तू पणा विण पूर्णानंदघन । परम गुरुचरणत्व दर्शनी ॥७०॥

गुरु म्हणता एकवार । त्याचे चुकविसी येरझार । ऐसा तू दयासागर । पूर्णानंदा अंतरंगा ॥७१॥

आपणास म्हणता पिता । शब्दा आली मूर्खता । आपण जगाचा जनक तत्वता । जगच्चालका सर्वेशा ॥७२॥

आपण वस्तुतीत साकार । आपणास नसे उपाधी विकार । मज करिता येऊनी भुवर । तारिले हेचि नवल असे ॥७३॥

अखंड आपुली चरणा तरणी । उदयली ही विज्ञान गगनी । तेणे भवतम हरणी । सहजा सहजी उदेल ॥७४॥

यापरी अनेक पुष्पांजली । पूर्णानंदाचे चरणकमळी । अर्पिता चित्तवृत्ती आनंदली । श्रीगुरुंची त्याकाळी ॥७५॥

यापरी पाहता गुरुशिष्य सोहळा । पाहती गोदू निजनेत्र कमळा । आनंद न समाये तिचिया वृत्तीला । स्वानंद सागरी बुडाली ॥७६॥

गुरु तो साक्षात नारायण । शिष्य तो प्रत्यक्ष त्रिलोचन । ती उभयताही अवतारी पूर्ण । जग तारणास्तव अवतरले ॥७७॥

तथापि गुरुभक्तीची थोरी । ते उभयता दाविती परोपरी । पूर्वी पूर्णानंदांची गुरुभक्तीची कुसरी । तीही परिसले की स्वानंदे ॥७८॥

तदुपरी एकगुण । विशेष दावितसे आपण । जो अद्वयानंदघन । शिवराम स्वामी समर्थश्री ॥७९॥

पित्याचे अंगी नसे भाव हा पुत्र । पुत्र न मानी हे पिता पवित्र । उभयतांची लीळा विचित्र । अगम्य अगोचर स्मृतीशी ॥८०॥

उभयता निर्गुण निराकार । भक्तास्तव होऊनी साकार । निजकल्याणी राहुनी निरंतर । लीला दाविती परोपरी ॥८१॥

आता पुढील प्रसंगी निरुपण । शिवराम समुद्रिक विद्वतरत्न । निघेल त्याचे प्रशंसापूर्ण । ती परिसावी स्वानंदे ॥८२॥

हे चरित्र पूर्ण सदगुरु । शरण येता श्रवणद्वारु । त्याचे मस्तकी अभयकरु । ठेऊन उध्दरी सहज त्यासी ॥८३॥

सहजानंद दायक श्रोते सहज । मस्तकी असता तुमचे अभयांबुज । पुढे ग्रंथ चालेल म्हणे हनुमदात्मज । वारंवार नमितसे पादपद्मी ॥८४॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । त्रयोदशोध्याय गोड हा ॥८५॥

श्रीपूर्णानंद शिवरामार्पणमस्तु । श्रीरस्तु । सहजानंदार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP