श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय दहावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरु शिवराम देशिकेंद्रायनमः ॥ जय जय पूर्णानंद नारायणी । निज कल्याण वासिनी । परब्रह्मणे सर्व जीवन संजीवनी । संजीवनी जगन्माते ॥१॥

अहं महिषा सुराचे प्राण । तव धाके जाय निघोन । कामक्रोधादि दानव भंजन । होतसे अंबे तव स्मरणी ॥२॥

अष्टभावाचे डोल्हारी । चित्त सभे भितरी । शोभसी तू चिदंबरी । सच्चिदानंदे चिन्मयी ॥३॥

ब्रह्मादिक देव सकळी । नाचती तव छंदे गोंधळी । स्वानंद उदोकारि गर्जती भक्तमेळी । अनुहत भक्तीसी उदो करावळीही ॥४॥

आभासे जीव ज्योती । दहा इंद्रियाचे पोती । नवरंगी दिवटे जे खेळति । पण अज्ञान तम त्या कैचे ॥५॥

तू निर्गुण निराकार रंजनी । परात्परेश्वरी परब्रह्मणी । परंज्योती स्वानंदखाणी । सौख्य दाईनी सर्वस्वे ॥६॥

ऐसी तू पुर्णानंद भवानी । सद्यो मम ह्रदय तळणी । प्रफुल्लउनीषद तरंगिणी । रम्यचरित्र बोलवी स्वलीले ॥७॥

तुझी कृपा होताच पूर्ण । पुढे चालेल चरित्र कथन । यास्तव वाचेत रिघोन । कथन करवी पूर्णानंदे ॥८॥

नवमाध्यायी कथा । प्रबोधन करिती सदगुरुस्वथा । पूर्णानंद गुरुचरणी ठेऊन माथा । विनंती काय केली त्यापायी ॥९॥

पूर्णानंद म्हणे सदगुरुराया । करुणाकरा स्वानंदनिलया । अगाध असे तुझी माया । ब्रह्मादिकासी अगम्य ॥१०॥

जे ब्रह्मादिकालागी अगाध । ते मज केवी होईल साध्य । सर्वस्व मी असे नियम्य । नियंता आपण सदगुरुवर्ये ॥११॥

आपुली आज्ञा प्रमाणे । तेच प्रमाण असे मज जाणे । तेच मज असे भूषणे । लक्षीन सर्वांग गुरुवर्या ॥१२॥

जयजय सदगुरु ब्रह्मानंदा । आपण पूर्णतः स्वानंदसंपदा । स्मरतसेचि आपुल्या पादारविंदा । आपण रहावे मम ह्रदयार विंदाणी ॥१३॥

सदगुरु होऊन सुप्रसन्न । पुर्णानंदासी ह्रदयी कवळून । मस्तकी हस्त ठेऊन । आशिर्वाद पूर्ण पै दिधले ॥१४॥

पूर्णानंद चरित्र लेखनी होवो कल्याण । राही तू निजकल्याण ह्रदयांगण । कल्याण करिसी तू निजजन । हा आशिर्वाद सदैव पै ॥१५॥

सदा कल्याण असो तुजलागी । तुज पाहू जे येतील दर्शनालागी । सहज तुज भजतील पादांगी । कल्याण काम निर्धारे ॥१६॥

सहज जाईन म्हणता कल्याणा । त्याचे हरशील अज्ञाना । तुज चरित्रा पाहता विज्ञाना । होईल त्याला सत्य सत्य ॥१७॥

तुज जे पाहतील भावार्थे । त्यास प्राप्त असे चारी पुरुषार्थे । संपूर्ण पुरतील मनोरथे । हीच वरश्री असे तुजलागी ॥१८॥

ब्रह्मानंद स्वामींचे घेऊन वर । पूर्णानंद पुर्ण अवतार । एतत काळपर्यंत निर्धार । कल्याण पट्टणी विराजिणे ॥१९॥

कल्याणीच करुन ठाणे । पूर्णानंद पूर्ण निधाने । अच्युत मंदिरी शोभे वृंदावने । स्वानंद सिंहासनी विराजशी ॥२०॥

एतत काळपर्यंत । पुर्णानंद मूर्तिमंत । कल्याणी राहिले किमर्थ । याचा विस्तार पुढे कळेल ॥२१॥

असो पूर्णानंद नारायणा । ब्रह्मानंदी दिले वरप्रदाना । साष्टांग प्रणिपात करिती जाणा । ब्रह्मानंद डोले अतिहर्षे ॥२२॥

अरे पूर्णानंदा स्नेहाळा । तू जीविचा जीव्हाळा । तुज पाहता वेळोवेळा । धणी नपुरे सर्वथा ॥२३॥

तुवां एथून करिता प्रयाण । वाचेस पडले मौन । आता बोलावे काय तुज लागुन । जिवलगा तू मम जीवना ॥२४॥

आता तुम्ही येथून । करावे शीघ्र प्रयाण । ऐसे म्हणता सदगुरु जाण । पूर्णानंद काय बोलतसे ॥२५॥

जय महेश्वरा सदगुरु । हे शरीर पडावे तव वचनद्वारु । परी प्राकृत असे दुर्धरु । केवी योग घडेल ॥२६॥

ब्रह्मानंद म्हणे आनंद नौकी । कांहीच भेद नसे तुजमज देखी । तू जे जे देखसी गुरुस्वरुप लेखी । मीच भासेन धणीभरी ॥२७॥

निकट पाहून गुरुआज्ञा । पूर्णानंद पूर्ण प्रज्ञा । मस्तक ठेवून गुरुचरणी निमग्ना । साष्टांग प्रणिपात पै केले ॥२८॥

लक्ष्मीही वंदिली सप्रेम चित्ती । उभयता आज्ञापि गुरुनाथी । प्रयाण करिती निश्चिती । पुनरपि गुरुपद अभिनवहे ॥२९॥

गुरुकृपा पूर्ण रोकडी । पूर्णानंद आज्ञेत सुरवाडी । पुनरपि गुरुचरण वंदी आवडी । नमनी प्रयाण पै केले ॥३०॥

स्थूल देहाने निघे देशाकडे । परि ब्रह्मानंदी चित्त जडे । काय वर्णावे पवाडे । पूर्णानंद रायाचे ॥३१॥

स्वदेशा येता मार्ग क्रमून । वाटेत ऋतुस्थ जाली लक्ष्मी जाण । पूर्णानंद ओळखिले निज अंतःकरण । सदगुरुंनी जे सांगितले ॥३२॥

जे लिहून दिधले पत्र । तिथीवार नक्षत्र । पूर्णानंद पूर्णपात्र । काढुनी पाहलि त्याकाळी ॥३३॥

मनी म्हणे धन्य सदगुरु । त्यांच्या महिमेस नसे पारु । पूर्णब्रह्म ते निर्धारु । सगुण जाले मज करिता ॥३४॥

त्यांचे मुखी जे जे निघेल । सत्यचि असे हे अनुभवी बोल । ते बोल नव्हे विधीवाक्य निश्चळ । सत्यसंकल्पी श्रीगुरु ॥३५॥

यापरि विचारिता मनी । नेत्र भरले प्रेम जीवनी । ठाऊक असे कोणा लागुनी । वर्म त्या सदगुरुंचे ॥३६॥

होता दिवस चतुर्थ । तिकडे ब्रह्मानंदानी केला देह समाप्त । पूर्णानंद निजरुपात । निमग्न सहज पै समरसले ॥३७॥

शके पंधराशे पंचाहत्तरी । विजय नाम संवत्सरी । आषाढ शुध्द दशमी प्रथम प्रहरी । पूर्णानंदी समाधिले ॥३८॥

ते ब्रह्मानंद पूर्ण ब्रह्म । त्यास जन्म मरणाचे काय भ्रम । अजन्मा मुळीच चिदांश अभिराम । परमानंद महौजस ॥३९॥

लोकोध्दारास्तव उदार । अवतरले पुन्हा भूमीवर । सच्चिदान्द महेश्वर । लीला भक्त सूखवर्धिनि ॥४०॥

भूत भविष्य वर्तमान । ज्यास संपूर्ण असे ज्ञान । बोलिल्या सारिखे करुन । दाखविले गुरुनाथे ॥४१॥

असो लक्ष्मी उदरी । प्रवेशिले नरकेसरी । जो अहंमद संहारी । अवतारी पूर्ण शिवशंकर ॥४२॥

गर्भ वाढता दिशसें दिवस । हर्ष न समाये पूर्णानंदास । नित्य पूसतसे कांतेस । गर्भास मास किती जाले ॥४३॥

लक्ष्मीस वाटे आश्चर्य । का पूसताती हे पूर्णानंदराय । न कळे वचनावरुन ठाय । येणे मजला ये स्थळी ॥४४॥

हे माझे गुरुस्थान । हेच माझे काशीपट्टण । सहजानंद उदित भूवरी पूर्ण । म्हणोनि येणे पै जाले ॥४५॥

पुढे जाता याच स्थळी । राहणे असे चिरकाळी । स्थळ पाहून अचळी । राहावे इच्छा संकल्पानी ॥४६॥

योगाभ्यासी आम्ही नूतन । ओळख आंम्हा सांगेल कोण । तुम्ही भेटता सज्जन । दर्शन घेऊ परब्रह्मणी ॥४७॥

नाईक बोले आपण गुरु केवळ । कृतार्थ करावे वहील जीवन निष्कल । माझे संपूर्ण कुलस्थळ । आपुलेच ऐसे जाणावे ॥४८॥

आपण येता माझ्या मंदिरा । सहज जन्म चुकेल माझ्या येरझारा । सनाथ करुनी मज पामरा । घरास आमुच्या पै यावे ॥४९॥

आपण रहावे स्वस्थचित्त । आपुली चिंता करतील भगवंत । कांही अनुमान करु नये मनात । शीघ्र रीघावे माझ्याघरी ॥५०॥

याप्रकारे करुनी विनंती । पूर्णानंदासी आणिले ग्रहाप्रती । ग्रही येताच चित्तवृत्ती । नाईकाची बुडाली सुखसमुद्री ॥५१॥

त्यास ऐसे हर्ष वाटले । पूर्ण ब्रह्मच काय घरा आले । नेणो जन्मांतरीचे सुकृत फळले । महाराजांच्या येण्याने ॥५२॥

दोन चार दिवस निजघरी । राहविले अती आदरी । मग एक घर आपुले शेजारी । योजना केली स्वतंत्रची ॥५३॥

त्याघरी सकळ साहत्यि । भरवून यानिमित्त । कृतार्थ व्हावयाचे अगत्य । समृद्ध गृह सिध्द केले ॥५४॥

नायक येऊन अतिविनये । प्रार्थून पूर्णानंद राये । जे पूर्ण अवतारी निश्चये । प्रवेशिले त्या मंदिरी ॥५५॥

तेव्हा लक्ष्मीचे गर्भास । प्राप्त जाले नवमास । पूर्णानंदांच्या हर्षास । पार नसे त्याकाळी ॥५६॥

वारंवार पूसे कांतेप्रती । प्रसूतीस अवधी किती । प्रसुत होता निश्चिती । सुचवावे मजलागी ॥५७॥

मज असे फार उतावेळ । केव्हा पाहीन दिव्य बाळ । ऐसे बोलता वेळोवेळ । लक्ष्मीस आनंद वाटतसे ॥५८॥

आधीच निज सुंदरी । संभव असे अवतारी । त्यावरी पूसता पती आदरी । लक्ष्मीचे सुखास पार नसे ॥५९॥

वारंवार पूसता पूर्णानंद । लक्ष्मीस न माये आनंदा । सप्रेम वंदुन चरणारविंद । बोलती दिवस समीप आले ॥६०॥

लक्ष्मी निजमनी जाणिले । मागे मी कन्यापुत्र प्रसवले । परी यागर्भी जे आनंद वाटले । हे सुख कांही तेव्हा नसे ॥६१॥

आणि स्वानंदे पुसताहेत महाराज । त्याचेही नकळे काज । कैसी सहजानंदता सहज । की मजला प्राप्त हे जाले ॥६२॥

ऐसे करीत असता विचारा । तिची वृत्ती होय स्वरुपकारा । तेव्हाचं पूर्ण अवतारा । प्रकट झाले शिवराम ॥६३॥

महाराजांचे जन्मकाळी । देहावर नसे माता वेल्हाळी । चित्तवृत्ती स्वानंदी मुराली । निजानंद समुद्री अति हर्षित ॥६४॥

प्रसुत जाली आपण । प्रसुतीचे स्मरण नसे तिजलागुन । एकाएकी पुढे बाळ पाहून । हर्षयमान पै जाली ॥६५॥

पाहताच बाळाकडे । वृत्ती तिची स्वानंदी बुडे । सांगून श्रीसी कळविले । हेही स्मरण नसेची ॥६६॥

पाहता तो स्वानंद पुतळा । तन्मय जाली ते वेल्हाळा । मी पाहीले श्रीनिर्मळा । हे भान तिजला कांहीच नसे ॥६७॥

ऐसी तिची अवस्था । पाहून शेजारीणी विनवि पूर्ता । पूर्णानंदास सांगती तत्वता । लक्ष्मीस पूत्ररत्न पै जालासे ॥६८॥

ही गोष्ट पडता कानी । पूर्णानंद उठे आनंदोनी । बोले काय सकळ स्त्रीयालागोनी । तो बाळ आधी मज दाखवा ॥६९॥

ऐकून ऐसे अमृतवचन । स्त्रिया दाखविती बाळ आणोन । पूर्णानंद पाहती निरखून । दाविले गुरुने सर्वासी ॥७०॥

मनी म्हणे धन्य माझा सदगुरु । पूर्णावतारी श्री शंकरु । निज वचनीवरुनि निर्धारु । प्रकट केली स्वलीळा ॥७१॥

निजखुण पाहता दृष्टी । पूर्णानंदास हर्ष न समाये पोटी । ब्रह्मानंद लुटी । लुटते जाले ते काळी ॥७२॥

मनी म्हणे धन्य सदगुरु । पूर्णब्रह्म पूर्णावतारु । आज्ञा केली ते निर्धारु । सत्य करुनि दाविले ॥७३॥

वारंवार पाहती शिशुकडे । वृत्ती जडली स्वरुपी खुणेरोकडे । ते कुणाचे काय पवाडे । ते ऐकावे सज्जन हो ॥७४॥

सछिद्र असती दोन्ही कर्ण । ह्रदयी श्रीवत्स सुलक्षण । यापरि मंडित चिन्ह । अवतरले श्रीशंकर ॥७५॥

इतकीही खूण सदगुरु आपण । पूर्णानंदालागून । आधीच लिहून पै दिधली असे ॥७६॥

पूर्णानंद आनंदून । लक्ष्मीस बोले काय आपण । सावध होऊन पुत्र वदन । निजखूण पुर्ण अवतारी ॥७७॥

पूर्णानंद वचन पडता कानी । सावध जाली लक्ष्मी जननी । सप्रेमे पाहून बाळा लागुनी । आनंदली चित्ती अपार ॥७८॥

ऐसे शिशुसी पाहता । हर्षायमान जाहली मातापिता । द्वदश दिवस होता तत्वता । नामकरण पै केले ॥७९॥

महाराजांचे नाम । सर्व नामा माजी उत्तम । श्रध्दे उच्चारिती निगम । हरे सर्व लोकांचे ॥८०॥

शिवराम नामाभिधान । जे त्रैलोक्य पावन । पूर्णानंद योजून । ठेविते जाले त्याकाळी ॥८१॥

शिवशब्द मंगलदायक । राम शब्द आरामकारक । इहसुख परमार्थ चोख । नाममात्र प्राप्त असे ॥८२॥

शिवनामी ( राम ) नाम । रामी शिव हे परब्रह्म । उभयोद्वही शिवराम । नाम पावन त्रयलोकी ॥८३॥

वदनी म्हणता शिवराम । किंवा ऐकता सप्रेम । पातकांचे होय भस्म । नामी महत्व यापरि ॥८४॥

नाममात्रे दोष झडे । नाममात्रे सौख्य जोडे । नाममात्रे ज्ञान रोकडे । होय ऐसे प्रसिध्द ॥८५॥

नाममात्रे घडे मुक्ति । नाममात्रे उडे जन्मपंक्ति । नाममात्रे स्वरुप प्राप्ती । सत्य सत्य त्रिवाचा ॥८६॥

नाममात्रे हरे खंती । नाममात्रे संतती संपत्ती । नाममात्रे परम विश्रांती । प्राप्त असे सर्वदा ॥८७॥

नाम घेता उरले । ऐसे पातक कोणी न ऐकिले । यास्तव नाम समंगळ बोलिले । पूर्णानंद उच्चारी शिवराम ॥८८॥

जय शिवराम म्हणता वदनी । जय प्राप्त असे त्यालागुनी । मोक्ष लक्ष्मी अनुदिनी । राबत असे त्याकाळी ॥८९॥

हीच प्रार्थना गुरुचरणी । हे नाम असो माझे वदनी । या नामाचे भजन निशीदिनी । घडो अनन्य सर्वस्वे ॥९०॥

असो ऐसे नाम सहज । ठेविते जाले पूर्णानंद राज । सकळ योगियांचा ह्रदयी उमज । शिवराम ऐसे प्रसिध्द ॥९१॥

शिवरामासह वर्तमान । पूर्णानंद आपण । निजकल्याणी करुनी ठाण । एततकाळा परियंत शोभती ॥९२॥

असो पूर्णानंद कल्याणी घर । करिता पातले तिघेही पुत्र । जे सदभक्त सत्पात्र । विद्यास्तव स्थळो स्थळी राहिले ॥९३॥

गोदूकन्या बापु पंडित । तेही येऊन राहिले तेथ । ऐसे कुटुंबा सहित । पूर्णानंद राहिले कल्याणी ॥९४॥

निजकल्याणी कुटुंब वत्सल । पूर्णानंद जाले स्वासनी निर्मळ । पूर्णावतारी भक्तवत्सल । भक्तानंदकारक ते ॥९५॥

केशव स्वामीनी मूळ गृहद्वार । ब्रह्मानन्दा अर्पिले गुरुचरणी समग्र । त्यानी ब्रह्मानन्दा दिले लोकोद्धार । पूर्णानन्द मठोत्तमी ॥९६॥

जे अज अव्यय अमूर्त । भक्तास्तव होऊनी मूर्तीमंत । दाविते झाले लीला अदभूत । निजकल्याणी मठांतरी ॥९७॥

शिवराम स्वामीची जन्मकथा । आजन्म जे वाचीले यथार्थ । सप्रेम ऐकती ऐकविती तत्वता । सुटतील सहज येरझारा ॥९८॥

येरझारेवर पडेल पाणी । प्राप्त असे स्वानंद चिंतामणि । सहज विराजिले स्वानंद सिंहासनी । सर्व वैभव भोगिती ॥९९॥

सकृत म्हणता शिवराम । प्राप्त होईल निजधाम । ते पूर्णावतारी पूर्ण काम । अवतारी प्रत्यक्ष श्रीशंकर ॥१००॥

हे चरित्र पूर्ण कल्याण । तेथे तिष्ठेल लक्ष्मी नारायण । श्रवण दर्शन घेता चरण । मनोरथ पूर्ण करिताती ॥१०१॥

त्याचे नांव पूर्णानंद । पूर्ण अवतारी सच्चिदानंद । पूर्णानंद देतसे श्रवणार्थी स्वरुपनाद । सप्रेम त्यास पाहूनी ॥१०२॥

महाराज पूर्ण शिवराम । जो भक्तकाम कल्पद्रुम । आपुले चरित्र परम । पूर्णानंद बोलवितसे ॥१०३॥

सूत्रभाव धरिती वाचून । बाहुलेतेच घडेल दर्शन नारायण । अनंत ब्रह्मांड एकसूत्र करुन । दाखविती प्रत्यक्ष भक्तासी ॥१०४॥

वाचेचे वाचकत्व । बुध्दीचे बोधकत्व । पूर्णानंद साक्षी सत्यत्व । त्याविण वदता कोण असे ॥१०५॥

या चरित्राचा वदता वदविता । असे पूर्णानंद समर्थ पूर्तता । श्रोते तुम्ही पूर्णानंदी तत्वता । यास्तव हनुमदात्मज विनवीतसे ॥१०६॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । दशमोध्याय गोडहा ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP