श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय बारावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरु शिवरामायेनमः । जय जयाजी सदगुरुराया । पूर्णानंदा स्वानंद निलया । शरण येता तव पाया । चरणी थारा तू देसी ॥१॥

तू विजयीरुपा विजयध्वजा । विश्वव्यापका विश्वबीजा । विश्वात्मा निज भक्त काजा । आनंदाम्नायी आवतरले ॥२॥

तू वस्तुतः निर्गुण निराकार । भक्तास्तव होऊन साकार । भक्ताचा करिसी उध्दार । भक्तवत्सला दयानिधे ॥३॥

तुज जे पाहती एकपण । चराचरी तूच एक नारायण । जेवी अनेक घटी एक किरण । तेवी दिसशी रमापते ॥४॥

अनेक मति विज्ञानदेशी सम्यक । तेही जर तुज शरण येती भाविक । त्याचेही हरुन संशय अनेक । एकी ऐक्यत्व सुख देशी ॥५॥

ऐसा तू दयासागर । पूर्णानंद श्रीदिगंबर । पुढे वदवी तव चरित्र सुखकर । सहजानंदा परिसेवनी ॥६॥

एकादश अध्यायी निरोपण । रुक्मीणी पंताचे प्रार्थने वरुन । शिवराम स्वामी सिध्द केले प्रयाण । विजापुराकडे बहिणीसह ॥७॥

पुढील कथेचे निरुपण । शिवरामस्वामी आपण । आपुले मौनमुद्रा विसरुन । उभे करतील विजयध्वज ॥८॥

ती कथा सुरस फार । ऐकावी करुन चित्त एकाग्र । मस्तकी आपुले अभयकर । असता चालेल ग्रंथ पुढे ॥९॥

तेव्हा गोदू आणि शिवराम । त्या पंताचे पाहून प्रेम । प्रयाण केले त्या समागम । विजापुराकडे त्याकाळी ॥१०॥

येताच विजापुरी । पंडितालागी ते अवसरी । बोले काय गोदू निर्धारी । बंधुलागी विद्या सांगावी ॥११॥

पंडीत विचार करी निजमनी । मी काय सांगावे या बाळका लागुनी । श्रीपांडुरंग सांगितले जे स्वप्नी । ते विस्मरुनी बाळ भावितसे ॥१२॥

ऐसे कांही एक होता दिवस । त्यानी कांही न सांगितले त्यास । यानीही त्याचे वचनास । वाट पहात पै राहिले ॥१३॥

त्या पंडिताचे नित्यनेम असे । पाच संस्कृत चूर्णिका करीतसे । आधी हे पद करुनी उठतसे । स्नान संध्येसी सर्वदा ॥१४॥

ज्यासी विजय विठ्ठल सुप्रसन्न । त्याचे स्वहस्ते घेतसे नैवेद्यान्न । प्रत्यक्ष करावे त्यासी भाषण । ऐसा ते भक्तराज शिरोमणी ॥१५॥

त्याच्या कवित्वाची पाहून लाघव । महाकवी ऐसे बोलती सर्व । ज्याचे कीर्तनी रमामाधव । डुलतसे स्वानंदे ॥१६॥

पूर्वील कालिदासादिकाशी । महाकवी म्हणती त्यासी । त्यापरी या पंडितासी । लोक बोलती महाकवी ॥१७॥

ऐसे पंडीत शिरोमणी । कवित्व करिता एकेदिनी । एकपद दोन चरण करुनी । पुढे स्फुरण न होता ठेविलेसे ॥१८॥

ते पद तैसेच ठेऊनी । उठते जाले स्नाना लागुनी । भोजन समयी त्याचे स्फुरण । सहज त्यासी स्मृति झाली ॥१९॥

ते पद महाराज सहज पाहिले । पूर्ण न करता तैसेचि ठेविले । त्यानी त्यास पूर्ण केले । अंकित त्याच चरणा घालुनी ॥२०॥

त्याचे ह्रदयी जे उदभवले स्फुरण । यानीही तेच केले लेखन । ते अवतारीच पूर्ण । त्यास अगाध काय असे ॥२१॥

यापरी करुनी पूर्ण । पूर्णानंदे करीतसे भोजन । भोजन होताच जाण । पंडित ते पद पाहिले ॥२२॥

पुढे करावे लेखन । ते आधीच जाले असे पूर्ण । ते पाहताच निज नयन । आश्चर्य फार वाटले ॥२३॥

ह्याचे मनीचे जे स्फुरण । त्याचेच केले येथे लेखन । ऐसे पाहून पुत्रा लागुन । पुसते जाले त्याकाळी ॥२४॥

हे पद कोण पूर्ण केले । त्वा किंवा अन्य कोण लिहिले । त्याचे वास्तवपण वहिले । सांग सत्वर मजलागी ॥२५॥

ऐकता पुत्र वचन । बोले काय प्रति वचन । मज ठाऊक नसे जी जाण । कोण त्यासी पूर्ण केले ॥२६॥

पुत्र असता घनपंडीत । नाव ज्याचे आपणपंत । पुसताच रुक्मीणीपंत । याउपरी उत्तर देतसे ॥२७॥

ते पंडीत विचारी निजमानसी । आणखी विचारिले शिष्यवर्गासी । सर्वही म्हणती आम्हांसी । ठाऊक नसे जी गुरुवर्या ॥२८॥

तेव्हा पंडीत म्हणती माळदावरी । कोण गेले सांग निर्धारी । येरु म्हणती चढता नेत्री । शिवरामासी पाहिले ॥२९॥

ऐसे ऐकता श्रवणी । पंडितास आठवले मनी । जे प्रत्यक्ष सांगितले स्वप्नी । श्रीपांडुरंग पंढरीसी ॥३०॥

मनी म्हणती हा अवतारी । प्रत्यक्ष अवतरले त्रिपुरारी । ऐसे सांगत असता श्रीहरी । म्या त्यास कांही न ओळखिले ॥३१॥

सत्यच हे अवतारी पूर्ण । त्यानीच केले असतील पूर्ण । यावाचून माझे मनीचे स्फुरण । प्राकृत जनासी केवी कळे ॥३२॥

ऐसे विचार करुनी मनी । पुसते जाले महाराजा लागुनी । येरु उगेच राहती त्याक्षणी । ओळखिले त्यांनी ज्ञानदृष्टी ॥३३॥

आपाद अवलोकिता महाराजाकडे । दैदिप्यमान दृष्टीस पडे । पंडित म्हणे हे चंद्रचुडे । मानवी रुपे विराजती ॥३४॥

यास सांगावी म्या विद्या । ऐसे म्हणणेच अविद्या । विद्या अविद्यातीत संवेद्या । ज्याचे दर्शनी प्राप्त होय ॥३५॥

ज्याचे कृपेने होय ज्ञान । ज्याचे कृपेने हरे अज्ञान । ते विज्ञानमय चिदघन । अजन्म पूर्ण जन्मले ॥३६॥

यास मी नेणता बोलिलो बाळा । हे बाळ तो केवळ कर्पूर धवळा । ज्यास प्रसाद सुमनमाळा । स्वहस्ते दिधले कमळावरे ॥३७॥

यापरी विचारुनी ह्रदयमंदिरी । स्तवन करीतसे निज वैखरी । आपण साक्षात अवतारी । ही प्रचिती मजला पै आली ॥३८॥

यापरी वाकपुष्पमाला । अर्पून महाराजांच्या गळा । सप्रेम मिठी घालुनी आगळा । स्वानंदयुक्त बोलति ॥३९॥

आपण अवतारी पूर्ण । तरीच माझे मनीचे स्फुरण । तेच शब्द योजून । केले ही करणी प्रभुची ॥४०॥

आपुले वाचोन जाणे । माझे कवित्वाचे अर्थ होणे । इतरासी नसे त्राण । त्याचे गर्भार्थ कळावया ॥४१॥

आता माझे मनीचे मनोगत । या पदाचा मथितार्थ । ऐकावे आपुले मुखी यथावत । तरी सांगून तृप्त करावे ॥४२॥

माझे श्रवण आर्तचकोर । इच्छितसे तव वचनामृत तुषार । आपण स्वानंद सुधाकर । म्हणोनि प्रार्थना तवपायी ॥४३॥

आपणास म्हणता बाळ । ते बोलची अज्ञान वीहित फोल । आपण चैतन्यघन कल्लोळ । कल्याणकारक कल्पद्रुम ॥४४॥

स्वानंद वटवृक्षातळी । संपूर्ण सनकादि मुनीच्यामेळी । बाळ होऊन चंद्रमौळी । दक्षिणामूर्ति रुप प्रबोधिले ॥४५॥

त्याची मौनमुद्रा न मोडिता । प्रबोध दीधला सर्वास तत्वता । तोच अवतार की आता । पद्यार्थ प्रबोधनी करावे ॥४६॥

किंवा तिसरे प्रहरी । कीर्तनाचे करावे गजरी । तव मुखौचे श्रवण घडता निर्धारी । प्रेमाल्हाद होईल ॥४७॥

ऐकोनि तयाचे प्रेम वचन । महाराज तेव्हा प्रतिवचन । बोलिले काय त्यालागुन । ते ऐकावे स्वानंदे ॥४८॥

ऐका स्वामी गुरुवर्या । मी विद्यार्थी असे प्रभूराया । अधिकार कोठील विद्यार्थिया । आपुल्या समोर बोलेल ॥४९॥

थोरथोराची गती । आपुले समोर कुंठित होती । मज बालकाची कसली मती । कीर्तन करेल स्वामीपुढे ॥५०॥

ऐकता महाराजवाणी । पुनरपि सप्रेम आलिंगोनी । बोलते जाले पंडीत शिरोमणी । महाराजालागी त्याकाळी ॥५१॥

आपणास म्हणेल जो बाळ । तोच केवळ अज्ञ निखळ । आपण सच्चिदानंद कल्लोळ । अवतार पुरुष भूमंडळी ॥५२॥

आपण जरी नसता अवतारी । माझे पदा संपूर्ण करी । ऐसा कोण आहे उर्वीवरी । मम चित्तर्थ रचना करतील ॥५३॥

माझे वचनास देऊन मान । आपण करावे कीर्तन । कांही न करता अनुमान । मनोरथ पूर्ण करावे ॥५४॥

हे अगदी वास्तव्य बहिणी । ऐकोन महाराजा लागुनी । बोलिले काय स्वानंदवाणी । अनुमान का रे करितोसी ॥५५॥

आधीच तिचे स्वप्नी । श्रीरंग वदले वरदवाणी । ते आठऊनी अंतःकरणी । महाराजाप्रती बोलतसे ॥५६॥

तुझे सर्वांगी भूषण । पूर्णानंद कृपेचा असता पूर्ण । तुझे वाणीने पूर्णानंद परिपूर्ण । भरुन पूर्ण बोलविल ॥५७॥

पूर्णानंदांचे अभयकर । तव मस्तकी असता निर्धार । अनुमान कारे कीर्तन गजर । स्वानंदयुक्त करावे ॥५८॥

पंडीत आणि बहिणीचे वचन । मानले महाराजांचे अंतःकरण । पंडीतास म्हणे आपुले आज्ञाप्रमाण । कीर्तन करीन गुरुवर्या ॥५९॥

यापरी बोलत असता तीन प्रहर । होताच मिळाले श्रवणार्थी नर । लोक म्हणती कौतुक थोर । दिसते आजच्या कीर्तनी ॥६०॥

रुक्मीणीपंत आपण । सभा करविले श्रीपांडुरंग संनिधान । तेथेच करावे कीर्तन । ऐसे नेमिले त्याकाळी ॥६१॥

महाराज आधी स्मरुन पूर्णानंद । जे पूर्ण अवतारी सच्चिदानंदकंद । मग वंदून पंडिताचे चरणारविंद । तंबोरा घेत करकमळी ॥६२॥

तंबोरा घेता करकमळी । लक्ष लाविले पूर्णानंद पदकमळी । पूर्णानंदी चित्त रंगता वेळी । समूळ ग्रासिले देहभान ॥६३॥

देहभाव ग्रासिता जाण । आनंदे जाले मंगलाचरण । मंगलाचरणी रंग पूर्ण । पूर्ण भरले दशदिशी ॥६४॥

दशदिशा भरता पूर्णानंदघन । विजय विठ्ठलासी ह्रदयी स्मरुन । करिते जाले स्वानंद स्तवन । सप्रेम वाणी ते काळी ॥६५॥

जय जय पूर्णानंदा पांडूरंगा । भक्तवत्सला सर्वांतरंगा । ब्रह्मांडनायका श्रीरंगा । श्रीनिवासा जगत्पते ॥६६॥

किरीट कुंडल मकराकार । गळा वैजयंती सुमनहार । कटी शोभे पितांबरा । विश्वभंरा दयाळा ॥६७॥

शामसुंदरा पतीत पावना । मनमनोब्जभ्रंगा श्रीनिकेतना । श्रीवत्सलांछना करुणाघना । कारुण्यसिंधु श्रीविठ्ठला ॥६८॥

समपद शोभा पोटी । सूर्याची तेज आटी । सप्रेमे घाली मिठी । निजपदी थारा तू देशी ॥६९॥

तू निजजन मानस चकोर चंद्रा । अज्ञान तम हारक पूर्ण दिवाकर रुद्रा । तरी माझे वदनी राहून निगमेंद्रा । त्व चरित्र कथन तू करवी ॥७०॥

यापरी करुन स्तवन स्वानंदा । पूर्णानंदे म्हणून एक पद । ते पदाचे अर्थ सांगता विशद । वृत्ती मुराली श्रोतियांची ॥७१॥

दशदिशी भरला पूर्णानंद । म्हणूनी एक पद । ह्या पदाचे अर्थ सांगती विशद । वृत्ती मुराली श्रोतियांची ॥७२॥

ते नव्हे पदाचे अर्थ । केवळ वेदाचे गर्भीतार्थ । किंवा महावाक्यार्थ । उपदेश होतसे मुढवत जना ॥७३॥

तेथील श्रोते तरुण बाळवृध्द । श्रवण करिती विशुध्द । संपूर्ण ग्रासून द्वंदाद्वंद । अद्वय सागरी बुडाले ॥७४॥

अद्वय सागरी बुडता चित्तवृत्ती । पालट होती देहस्थिती । ब्रह्मानंदी डोलती । पंडीता सहित त्याकाळी ॥७५॥

ऐसा होता कीर्तनी रंग । प्रेम दाटतसे सर्वांतरंग । म्हणती हे सांब केसरी रंग । अवतार पुरुष कळो आले ॥७६॥

वय म्हणवितसे किशोर । याचे मुखी होतसे भाष्यार्थ गजर । हे देवचि साचार । मानवी वेश विराजे ॥७७॥

म्हणती तेव्हा वृध्द परम । नाही ऐकिले आजन्म । यापरी कीर्तनोत्तम । प्रेम पाझर सुटताती ॥७८॥

या कीर्तनी देहभाव । समूळ जालासे अभाव । संपूर्ण दाटतसे अष्टभाव । स्तंभस्वेदादी सर्वांगी ॥७९॥

नव्हे कीर्तन तरंग । या कीर्तनी नाचतसे श्रीरंग । श्रवणमात्रे सर्वांग । स्वानंद दाटतसे सर्वस्वी ॥८०॥

यापरी बोलत असता एकमेका । सायंकाळ जाली निका । होमादि वो सरती देखा । ब्रह्मुकर्म यथावत ॥८१॥

लोक म्हणती सायंकाळ जाली । पंडीत म्हणती संध्याकाळ कैची उरली । यांनी आम्हास निःसंदेह केली । वर्षा करुनी बोधवचनी ॥८२॥

हे वचन नव्हे अमृत वृष्टी । स्वबोधाची चढली पुष्टी । संदेहाची झाली तुटी । ब्रह्मानंद सृष्टी भरलासे ॥८३॥

ब्रह्मानंदाची मूर्तिमंत । उभा असे या कीर्तनात । याचे प्रबोध अदभूत । वृत्ती बुडाली सुखसागरी ॥८४॥

या काळाची सुखप्राप्ती । जी जाहली आम्हांप्रती । याच्या निर्णयाची गती । आम्हास कांही समजेना ॥८५॥

आमुचे समूळ अहंपण । जिराले ब्रह्मानंदी जाण । प्राप्त असे दशासुलीन । या प्रभूचे बोधबळे ॥८६॥

या बाळाचे बोधबोल । बोलामाजी सुखाचे डोल । हे बाळ काय हो केवळ । कैलासपती शंकर ॥८७॥

यापरी वाक पुष्पांजली । पंडीत अर्पूनी प्रभूचरण कमळी । स्वानंदे उठोनि मिठी सोज्वळी । घातली महाराजासी त्याकाळी ॥८८॥

यापरी एकमेका पडता मिठी । स्वानंदाची होतसे लुटी । संपूर्ण भरला ब्रह्मानंद सृष्टी । सहजानंद दुमदुमी ॥८९॥

सहजानंदे पंडीतराय । प्रभूसी तेव्हा बोले काय । धन्य माझे भाग्य निश्चय । पाय पाहिले प्रभूचे ॥९०॥

आपुलेनी गृह माझे । पवित्र जाहले असे सहजे । सत्यचि आपण वृषभध्वज । अवतार पुरुष भूतळी ॥९१॥

धन्य असे आजीची कथा । ही कथा नव्हे महावाक्यार्थता । स्वरुप प्राप्तीच तत्वता । त्याविना कांही दिसेना ॥९२॥

आपणास आज जाला श्रम । परि लोकांचे हरले सर्व भ्रम । भ्रम भ्रमांतरीच विभ्रम । मावळले सहजानन्दी ॥९३॥

आता करावी आरती । ऐसे करिता पंत विनंती । किर्तनाची करुन समाप्ती । मंगलार्ती पै केली ॥९४॥

आरती होताच जाण । सर्वत्र देती आलिंगन । प्रसाद घेऊन श्रोतेजन । जाती वर्णित गुण प्रभूचे ॥९५॥

तेच कीर्तन नूतन । मंगला चरणादी करुन । कवित्वाची रचना पूर्ण । पूर्णानंद करीतसे शिवराम मुखी ॥९६॥

अंकित झाला पूर्णानंद शिवराम । ज्याचे कवित्वी डुलतसे पुरुषोत्तम । श्रोते संतासी चढतसे प्रेम । प्रेममय ती पद्मरचना ॥९७॥

जालियावरी कीर्तन गजर । पंडीत धरुन प्रभूचे कर । आणिते जाले निर्धार । गोदूबाई पै जवळी ॥९८॥

तिशी वंदिता शिवराये । तिसी आनंद पोटी न समाये । सप्रेम आलिंगोनि निज ह्रदये । स्वानंद मिठी पै घातली ॥९९॥

कुरवाळीत मुखकमळ । पोटी धरितसे वेळोवेळ । पार नसे आल्हादा तये वेळ । स्वानंदसमुद्री बुडाली ॥१००॥

मनी म्हणे धन्य माझा बंधु । हा बंधु नव्हे छेदीत भवबंधू । ज्याचे कीर्तनी करुणासिंधु । डुलतो श्रीरंग सप्रेमे ॥१०१॥

रुक्मीणी पंता सारखे संत । भक्तटिळक महापंडीत । ज्याचे कीर्तनी हरि गुणवृष्टी अनंत । वर्षाव करिती स्तवनी पूर्णे ॥१०२॥

अगदी भविष्यज्ञान । आधी सांगितले रुक्मिणी रमण । आजी प्रचिती आली पूर्ण । हे पूर्णानंद रायाचे कृपाफळ ॥१०३॥

पूर्णानंद रायाचे आंतर वचनी । हेचि निघतसे उदगार अनुदिनी । होता केवळ ज्ञानवाणी । अवतार पुरुष जाणावे ॥१०४॥

ऐश्या आनंदाची उसळणी । तेव्हा पंडीत बोले तिजलागुनी । आता तुमच्या बंधुलागुनी । विद्या काय सांगावे ॥१०५॥

धन्य ते पूर्णानंद नारायण । धन्य ती लक्ष्मी लक्षणसंपन्न । ही उभयता ही अवतारी पूर्ण । म्हणोनि एसा पुत्र अवतरलासे ॥१०६॥

आता याचेनि योगे । उद्दरतील भक्त जगे । याची अपार कीर्ती अभंगे । होईल धरती माझारी ॥१०७॥

आता याचे मनोगत । आधी व्हावे अनुग्रहीत । नंतर आपुली ख्याती अदभूत । प्रगटावी ऐसे वाटते ॥१०८॥

अनुग्रहाची इच्छा धरुन । शिवरामे केले मौन धारण । निमित्यमात्र अनुग्रह पूर्ण । होताच चरित्र प्रगटेल ॥१०९॥

आता यास न्यावे कल्याणा । नेऊन घाली पूर्णानंद चरणा । त्याचा हस्त मस्तकी होता जाणा । सुटेल त्याची मौनमुद्रा ॥११०॥

ऐसे पंडीत म्हणता ते वेळी । परम आनंदली ह्रदयकमळी । बंधूस म्हणे पंतांचे चरणकमळी । मिठी घालीरे बंधूराया ॥१११॥

या पंताचे कृपाफळ । तुजला असे ज्ञान केवळ । हे स्वानंद सुखाचे कल्लोळ । भक्तराज शिरोमणी ॥११२॥

तुझे मस्तकी हे महाराज । ठेविता कृपा हस्तांबुज । तुजला जय प्राप्त सहज । होईल जाण रे शिवराम ॥११३॥

ऐकता बंधु बहीणीचे वचनोक्ति । आनंदले पंत निजचित्ती । म्हणते जाले तुम्ही या जगती । अवतार पुरुष जन्मलेति ॥११४॥

यापरी विजापुरी विजयध्वज । उभा करिती शिवरामराज । त्याचे प्रयाणाची सिध्दता सहज । ते पंडीत केले कवणेपरी ॥११५॥

नूतन करऊन सुखासन । वाहिकाचे मुशारा सहित देऊन । वर्षाचे वेतन स्वहस्ते देऊन । देते जाहले प्रभू कारणे ॥११६॥

दुषालादी पोषाक । देते जाले महाराजा देख । धनही सहस्त्र एक । देते जाले स्वानंदे ॥११७॥

गोदूबाईचेही सन्मान । बडिवारे केले पंताने जाण । वस्त्रा भरणादि देऊन । तोषविले तिजलागी ॥११८॥

विजापुरी विजयलक्ष्मी । घेऊन निघाले शिवरामस्वामी । ही वार्ता कळता ग्रामोग्रामी । दर्शना धावती स्वामींचे ॥११९॥

दर्शने हरती सर्व पाप । दर्शने जोडे सुकृत अमुप । दर्शनीलाभे स्वस्वरुप । होईल म्हणोनि ईच्छिती ॥१२०॥

ग्रामोग्रामीचे लोक । ठेविते जाले टाक । वार्ता येताच देख । समोरे धावती स्वामींच्या ॥१२१॥

चंद्र चकोर न्याये । दर्शन ईच्छिती प्रभूचे पायी । म्हणती हे ग्राम धन्य होयी । तरीच प्रभू येतील ॥१२२॥

ऐसे होऊन उतावीळ । समोर धावती जन मंजलो मंजील । सप्रेम वंदोनि चरणकमळ । मिरवित आणती निजग्रामा ॥१२३॥

यापरी पूजा ग्रामोग्रामी । घेती महाराज शिवरामी । पातले कल्याणग्रामी । पूर्णानंद जेथे विराजे ॥१२४॥

पातले येऊन पूर्णानंद चरणकमळी । द्वादश नमस्कार घातले ते वेळी । प्रेमोदकेने अभिषेकिली । चरण कवळिले निज ह्रदयी ॥१२५॥

घालिता चरणी मिठी । पूर्णानंदास आनंद न माये पोटी । स्वानंद सुखाची लुटी । लुटते जाले स्वानंदे ॥१२६॥

ऐसेचि महालक्ष्मीचे पाय । वंदिते जाले शिवराय । दृढ धरिले निजह्रदय । निज पुत्रासी स्वानंदे ॥१२७॥

पाहता पुत्राचे मुखचंद्र । धणी न पुरे मातेचे नेत्ररविंद । चुंबन घेतसे प्रेमबंध । स्वानंद करी कुरवाळिती ॥१२८॥

धन्य तो पूर्णानंद पिता । धन्य ती लक्ष्मी माता । धन्य ऐसा पुत्र तत्वता । अवतार पुरुष भूतळी ॥१२९॥

लक्ष्मीचे ते नव्हे गर्भोदर । प्रत्यक्षचि कैलास मंदिर । म्हणोनि मूर्तिमंत श्रीशंकर । पुत्ररुपी अवतरले ॥१३०॥

महाराजांची यशकीर्ती । स्वमुखे गोदू वर्णिती । ऐकता मातापित्याचे चित्ती । अपार सुख होतसे ॥१३१॥

रुक्मीणीपंत सांगितलीजी मात । महाराजस घडावा उपदेश निश्चित । ती गोदूबाई पूर्णानंदरायास । कोण्या प्रकारे पै सांगती ॥१३२॥

तो पुढील प्रसंगी कथा सुरस । श्रवण करावे स्वानंद मानस । यास्तव श्रोतयांचे चरण कमलास । नमन करितसे हनुमदात्मज ॥१३३॥

हे चरित्र निजकल्याण । येथ सदा तिष्ठे लक्ष्मीनारायण । श्रवणद्वारे घेता दर्शन । सहजानंद लाभतसे ॥१३४॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । द्वादशोध्याय गोड हा ॥१३५॥ श्रीरस्तु । श्रीसहजानंदार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP