श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सहावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीदक्षिणामूर्तयेनमः । जयजय पुर्णानंदानंद मूर्ती । अगाध असे तुझी कीर्ती । मूढालागी कृपेनी स्फूर्ती । देशी चरित्र वर्णावया ॥१॥

ऐसा तू सदगुरु उदारा । तुझ्या द्वारी पडिलो दातारा । त्यास सत्वरी उभारा । सारुनी मोह सर्वस्वी ॥२॥

त्याचे हरुनि मोह सर्व । निज स्वरुपाची देसी तया ठाव । आठवही ग्रासूनी सर्वस्व । स्वयमेव करिसी तू सहाय्य ॥३॥

सत्य तू सनातन निरंजन । भक्तास्तव अवतार घेऊन । निज कल्याणी तिष्ठसी निशिदिन । निजजना कल्याण द्यावया ॥४॥

कल्याणास जाऊ म्हणता । शब्दाआधी कल्याण करिसी तत्वता । अकल्याण वारुनी त्या भक्ता । निजपदी थारा तू देसी ॥५॥

ऐसा तू कल्याणसिंधु । मी केवळ पामर मतिमंदु । तुझी कीर्ती वर्णावी स्वानंदु । हेही कांही कळेना ॥६॥

तुझ्या कीर्तीच्या ध्वजा खालते । ब्रह्मादिकांचा बाजार भरतसे उदिते । उत्पत्यादि व्येव्हार निसवते । ब्रह्मादिकासी तव सत्ते ॥७॥

ऐसे ब्रह्मादिकासही जाण । न घडे तुझ्या कीर्तिचे वर्णन । तरी मी पापी मतिहीन । वर्णू म्हणजे मती शब्दनवसे ॥८॥

वृक्षासी लागली फळे । इच्छीतो अर्भक लडिवाळे । तेवी वर्णू म्हणे हे शब्द न वळे । अलभ्य अपार सर्वाशी ॥९॥

ऐसिये बाळा लागुन । छंद घेता पिता देती फळ आणून । तू जगाचा जनक पूर्ण । तवकीर्ती फळ चारिती अगाध ते काये ॥१०॥

तव कीर्तीचे फळ चारुन । पुढे करवी चरित्र कथन । तू दयाळू पूर्ण । सदानंदा सदगुरु ॥११॥

पुढील कथेचे अनुसंधान । ते ऐकावे श्रोते आपण । लक्ष्मी येऊनी माते लागुन । बोले काय स्वानंदे ॥१२॥

ऐक माते माझे बोल । बोला माजी सुखाचे डोल । टाकूनी पाहिले सकळ । सप्रेम चित्ती परिसावे ॥१३॥

मी प्रदक्षिणा करतेवेळी । एक ब्राह्मण आला देऊळी । देवच काय या भूतळी । पाहता मजला पै गमले ॥१४॥

जवळी तयाच्या असे तीर्थ कावड । पाहताच मज उमजली अती आवड । तेव्हा मी जाऊन तयापुढं । नमस्कार पै केला ॥१५॥

त्याचे वयगुणादि लक्षण । पूर्वी ऐकिले तुमचे मुखातून । अगदी त्याअंगी देखोन । वर्तमान पुसिले मी त्यासी ॥१६॥

त्यांनी होवोनि कृपावंत । वास्तव्य सांगितले समस्त । माता पित्याचे नामा सहित । सांगता चित्ती सुख वाटे ॥१७॥

नेणो होईल तुमचा जामात । पुरता करावा शोध त्वरित । पाहता दिसे तो अति विरक्त । यास्तव विनवी मी तूते ॥१८॥

ऐकता ऐसे कन्यावचन । माता होवोनि हर्षायमान । पतीलागी हे वर्तमान । सांगतसे तोषली सर्वांगी ॥१९॥

मातेस भेटता चुकला कुमर । जेवी होई हर्ष थोर । तेवी जाहले आनंदी श्वशुर । स्वानंद सागरी बुडाले ॥२०॥

बोलाऊन कारकून । बुध्दिवंत आणि व्युत्पन्न । ऐसी यासी वचन । काय बोले ते राये ॥२१॥

तुम्ही जावे शिवालया । तेथे कोण आले ते पांथीक ठाया । वास्तव्य त्यास पुसोनिया । सत्वर सूचवी मजलागी ॥२२॥

कारकून पाहताच पूर्णानंद । तो पूर्ण अवतार सच्चिदानंदकंद । वंदूनि तयाचे चरणारविंद । वर्तमान संपूर्ण विचारिले ॥२३॥

परिसता सर्व समाचारा । यजमान जामातची हा खरा । ऐसे करुनी निर्धारा । रायाजवळी पै आला ॥२४॥

धन्य धन्य ही लक्ष्मी बाळा । तरीच जोडिला पूर्णानंद पुतळा । याचे गुणरुपावरुनी भू गोळा । ओवाळूनी टाकावे ॥२५॥

आपुले जामात निश्चय । यात नसे कांही संशय । आपण भेटावे तो आनंदनिलय । अविलंबयोगे करोनिया ॥२६॥

सांगता ऐसे कारकून । ग्रहस्थ उठिले तेथोन । समागमे घेवोन सदब्राह्मण । देवालयासी पातले ॥२७॥

पाहताचि पूर्णानंद राय । जे पूर्णज्ञानी स्वानंदनिलय । हर्षायमान जाहला वंदून पाय । तेथील सोहळा काय वर्णू ॥२८॥

पाहताच श्वशुरासी । हा ही संतोषले मानसी । अर्धांगी जन्मली त्याचे कुशी । म्हणोनि वंदिले त्यालागी ॥२९॥

मातापिता वडील सहोदर । पुरोहित आणि श्वशुर । हे गुरुस्थानी शास्त्र निर्धार । जाणूनि त्यास पै वंदिले ॥३०॥

धर्मशास्त्राचे गाडे । भरुनी चालती ज्याचे पुढे । स्वधर्मी निजनिवाडे । अधर्म केवी करतील ॥३१॥

असो पितृव्य लिहिलेले पत्र । पूर्णानंद देताच श्वशुरकर । परिसोनी त्यातील समाचार । स्वानंदभरित पै जाला ॥३२॥

पूर्वी जाले ते अवतार । तेही दाखविले अवतारी थोर । त्वरित पुर्णानंदी निर्धार । दाविते जाले स्वलीळे ॥३३॥

बारा वर्ष होता जाण । विधीयुक्त भेटावे आप्तजन । ऐसे जाणुनी वेदवचन । हवनादि विधी सारीले असे ॥३४॥

वेदशास्त्राचे जे अधिष्ठान । कोण सांगावे त्यास विधान । साहित्य आणुनी वेदांग संन्निधान । हवनादि विधी आरंभिले ॥३५॥

जेव्हा भेटेल लक्ष्मी नारायण । तीच सुवेळा सुलग्न । हरिहर तुष्टोनी जाण । स्वानंद भेटी करविले ॥३६॥

पाहूनी लौकिक विचारी । तेथे बोलाविली ती सुंदरी । नारायणाची अर्धांगी खरी । धन्य धन्य ती आदिमाया ॥३७॥

लक्ष्मी आणि तिची माता । स्वानंदयुक्त पातल्या तत्वता । मग उरकुनी विधी विधानता । हर्षयुक्त भेटले एकमेका ॥३८॥

सिध्द करुनी आणिले सुखासन । त्यमाजी बैसविले पुर्णानंद निधान । वाद्ये वाजविती चतुर्दश गुण । मिरवित आणिले स्वगृही ॥३९॥

घरास पोंचता निर्धार । स्वानंदाचा होतसे गजर । उल्हास यात्रेचे नाद स्तर । भरले तेव्हा दशदिशी ॥४०॥

चौघडे वाजती द्वारी । संतोष न समाये नगरी । पाहु पातले पुरनारी । लक्ष्मीनारायण ऐक्याचे ॥४१॥

ऐसे होता आनंद । याचनार्थी पातले ब्रह्मवृंद । संभावना घेऊन ब्रह्मानंद । आशिर्वादिले पूर्ण दांपत्या ॥४२॥

याप्रकारे पूर्णानंद लुटी । ते जाले तेथील आप्तकोटी । खेद विषादादी उठाउठी । पळोनि गेले त्याकाळ ॥४३॥

नित्य सहस्त्र प्रदक्षिणा । शिवालयी अश्वत्थ नारायणा । पूर्णानंदांची इच्छा धरुनी अंतःकरणा । लक्ष्मी करीत होती सप्रेमे ॥४४॥

तेही मनोरथ होता पूर्ण । त्या अनुष्ठानाचे होम हवन । तदनुसार संतर्पण । करविता जाला पिता तिचा ॥४५॥

तेची देउळी जाण । कुंड मंडप घालून । पुर्णानंदांचे आज्ञा प्रमाण । यथासांग पै केले ॥४६॥

ऐसिये आनंदसमयी । पुनः ऋतु प्राप्त होता लक्ष्मीबाई । गर्भधानाचे करुनी निश्चयी । उत्साह थोर आरंभिले ॥४७॥

लक्ष्मी आणि नारायण । उभयतास करऊनी मंगलस्नान । पुण्याह वचनी आहेर देऊन । फल शोभन पै केले ॥४८॥

आधानयुक्त अग्निहोम सत्र । सिध्द केले ते सदा पवित्र । जे स्वानंदाचे सुखसूत्र । तेचि दिवशी निश्चये ॥४९॥

साधकासी साधन । आपुले अंगी दाविती करुन । संसिध्दीस्तव सत्कर्म जाण । करिते जाले ते काळी ॥५०॥

यापरि लौकिकी चरित्र । करित असता पूर्णानंद पवित्र । स्वरुप समाधितूनी अणुमात्र । वृत्ती ज्यांची ढळे चिदात्मीय ॥५१॥

वृत्तीविना ज्यांचा व्यवहार । सहजासहज करिती निरंतर । संपूर्ण तेथील नारीनर । अनुग्रह त्याचे पै इच्छिती ॥५२॥

श्वशुर आदि करुन । श्रवणार्थ ऐकती पूर्णानंद मुखातून । पूर्वस्थिती आपुली पालटून । सदा संतुष्ट पै असती ॥५३॥

पुनरावृत्तीचे स्मरण । स्मरत असती तेथील जन । प्राप्त होता चरणामृत पूर्ण । अजरामर पै होती ॥५४॥

पूर्णानंदांनी कित्येक लोक । ज्यांना वेष्टिले मोहभय शोक । तेही होती हस्तमस्तक । चुकविले आपुल्या येरझारा ॥५५॥

कित्येका ग्रहसर्पे दंशिले । मोहव्याळी व्यापिले । भेटला पूर्ण गारुडी सबळे । तेही निर्विषय पै होती ॥५६॥

पूर्णानंद पूर्ण निर्विकार । लोकोध्दारणी अवस्थे साकार । प्रगटुनी आपुले अवतार । शरणांगत नरा तारिती ॥५७॥

करिता वेदांत श्रवण । सहज चुकती जन्ममरण । ऐसे जाणुनी शरणांगत जन । स्वानंदे सेविती पाय त्यांचे ॥५८॥

आल्या दिवसा पासोन । होता एक वर्ष पूर्ण । पूर्णानंद बोले काय वचन । लक्ष्मीप्रती ते काळी ॥५९॥

श्रीगुरु ब्रह्मानंद स्वामीसी । मी वचन देऊन आलो या देशासी । जगी रवि उगवेल पश्चिमेसी । तरी निश्चय माझा ढळेना ॥६०॥

दोन वर्ष न भरता जाण । एकदा तेथे येईन । घेऊनी चरणदर्शन । चुकवीन आपुल्या येरझारा ॥६१॥

यापरि महाराजांचे चरणकमळी । वचन माझे गुंतली । वास्तव या काळी । जाणे निश्चय रामेश्वरी ॥६२॥

उदईक भोजनोत्तरे । प्रयाण करतो रामेश्वर । तुझा निश्चय निर्धार । सांगा आता मजलागी ॥६३॥

धन्य धन्य ती लक्ष्मी माय । काय सांगावी तिचा निश्चय । आधी वंदूनि पुर्णानंद पाय । विज्ञापना काय पै केली असे ॥६४॥

जेथे पूर्णानंद नारायण । तेथेच लक्ष्मीचे मस्तक जाण । चरण सोडून एकही क्षण । राहणे नाही स्वामीया ॥६५॥

यावत प्राप्त नव्हते हे चरण । तावत्काळ भोगिले वियोगशिण । आता निमिष वियोग होता जाण । प्राणचि जाईल तात्काळी ॥६६॥

मीनासी करिता जळावेगळे । जेवी जळाकरिता तो तळमळे । तेवी सोडूनी राहता ही चरणकमळे । माझा प्राण तळमळी ॥६७॥

लोहा न होता परिसस्पर्श । आधी लोहपण दिसे त्यास । तेचि स्पर्श होता परिस । लोहपण त्यास मग कैचे ॥६८॥

तेच परिस काढून सुवर्णपण । लोह करु म्हणता न संभवे जाण । तेवी पूर्णानंदी रंगले हे प्राण । पूर्ववत आता केवी घडे ॥६९॥

मी सर्वस्व विकिले प्रभू चरणी । क्षमा करावी माझी धीटवाणी । आपुले चरणीचे पादुका जाणोनी । निश्चय माझा चालवावा ॥७०॥

आपण करिता अव्हेर । प्राण न राहे निर्धार । सोडोनि प्राण प्राणेश्वर । देही कांही राहवेना ॥७१॥

ऐकता ऐसे वचन निश्चय । पूर्णानंद बोले काय । श्रीमंताची कन्या तू होय । शितोष्ण तुजला केवी सोसे ॥७२॥

आमुची वृत्ती सदा उदास । कोणतेही विषयी नाही सायास । अन्न मिळाले किंवा उपवास । दोन्ही सारखे मजलागी ॥७३॥

तुझे शरीर फार सुकुमार । वाट चालणेचे शीण फार । मजला घडला फार । तुजला कदापि सोसवेना ॥७४॥

एकदा मिळते अन्न । एकदा घडते उपोषण । ऐसे प्रवासाचे लक्षण । तुजला नाही ठाऊक ॥७५॥

तू येथे राही मज स्मरोन । मी परतुनी येईन यात्रा करुन । तुझी भेट घेऊनी जाण । जाईन तेव्हा गुरुदर्शना ॥७६॥

ऐकता पूर्णानंद वचना । प्रेमाश्रु भरले लक्ष्मीच्या नयना । तेणे करुनी चरण क्षालन । चरणी मिठी घातली ॥७७॥

पाहता तिचा निश्चय । उठविते जाले पूर्णानंदराय । संतोषून बोले काय । मनोरथा नुसार तुझे करीन मी ॥७८॥

यापरि उभयतांचे संभाषण । होताच एकांत स्थान । दुसरे दिवशी श्रीनारायण । काय करते पै जाले ॥७९॥

उरकून स्नान संध्या अनुष्ठान । तीर्थाची कावड घेवोन । गृहातून निघोन । देऊळी येऊनी पै बैसले ॥८०॥

इकडे लक्ष्मी आपण । मातापित्यासी वास्तव्य सांगून । ते आवरिताही न ऐकोन । प्रयाण आपुले सिध्द केली ॥८१॥

मातापित्याची ममता फार । पाहुनी तिचा निकट निर्धार । मनी करिती विचार । ही आवरिता काही राहीना ॥८२॥

इचि वृत्ती पूर्णानंदी रंगली । पूर्वस्थिती पालटली । देहाहंकृती समूळ गळीली । आमुची ममता इज कैची ॥८३॥

आम्हास मात्र इची ममता । तिने ग्रासून माया ममता । पूर्णानंदी होऊन निमग्नता । स्वानंदे सुखे पै असते ॥८४॥

तीस कांही बोलता बोल । बोल होईल फोल । बोलण्याचे कांही फल । कदाकाळी नोहेचि ॥८५॥

यापरि विचार करुन । आग्रह न केले तिजलागोन । मनीच चिंता करुन । कांही न बोलता राहिले ॥८६॥

जामातमुखे वेदांत । श्रवण घडता होऊनी शांत । शांतीबळे सदा तृप्त । समाधानरुपी पै असती ॥८७॥

संपूर्ण त्याची देहबुध्दि । हरपली पुर्णानंद बोधी । सेविती सहज समाधि । पूर्णानंदांच्या दयेने ॥८८॥

दया करिता पूर्णानंदराया । ग्रासिली त्याची मोहमाया । अविद्या सर्व गेली लया । स्वानंद सुखे पै लुटती ॥८९॥

अधिष्ठानाचे होता ज्ञान । आरोप भ्रांतीचे होय निरसन । तेवि पूर्णानंद मुखे करिता श्रवण । विसरुन गेले देहगेहे ॥९०॥

देहगेहाची चिंता काही । कदा न करिती उभयताही । मग लक्ष्मीची चिंता त्याजला पाही । अर्थाअर्थी दिसेना ॥९१॥

पुर्णानंद प्रयाण केले म्हणोन । काय केली लक्ष्मी आपण । आधी मंगलस्नान करुन । तुलसी पूजा पै केली ॥९२॥

नमस्कार करुन मातापिता । कांहीच समागमे न घेता । निघाली तेथून शीघ्रता । पातली जेथे पूर्णानंद ॥९३॥

वंदून शिव अश्वत्थ नारायण । ज्याचे प्रसादे भेटले नारायण । पाचवार प्रदक्षिणा करुन । पूर्णानंदापासी मग आली ॥९४॥

सप्रेम करुनी नमस्कार । उभी ठाकली जोडोनी कर । नेत्री चालले प्रेमाश्रुधार । पूर्णानंद मुख विलोकिता ॥९५॥

धन्यधन्य ते पूर्णानंदमूर्ती । धन्यधन्य ती लक्ष्मी सती । पूर्णानंदी रंगली चित्ती । भेदत्व उभयता दिसेना ॥९६॥

पुष्प आणि परिमळ । तरंग आणि जळ । तेवि पूर्णानंद लक्ष्मी वेगळे । लोकास पाहता दिसेना ॥९७॥

तिचे मातापिता सहोदर । नगरीचे संपूर्ण नारीनर । पाहुनी उभयतांचे वैराग्य थोर । पाठवाया पातले देऊळी ॥९८॥

पूर्णानंदांचे वैराग्य रोकडे । ज्याची वृत्ती ब्रह्मानंदी बुडे । सप्रेम चित्त लक्ष्मीकडे । पाहुनी बोले काय तेव्हां ॥९९॥

ऐक लक्ष्मी स्वानंद निलये । खचित कळला तुझा निश्चय । परि तुझे अलंकाराचे भय । फार मजला वाटतसे ॥१००॥

आमुचे राहणे नित्य निरंजनी । तू दिसशी वस्त्रभूषणी । तरी निर्वाणीचे सांगातिणी । केवी होसी मजलागी ॥१०१॥

आम्ही फिरतो प्रवासी । अमूल्य वस्तू तुजपाशी । जरी देसी त्याचे त्याशी । तरीच यावे मजसमागमे ॥१०२॥

ऐकताच प्राण नाथांचे वचन । संतोषली ते स्वानंद निधान । मनी म्हणे सकल भूषण । चरण माझे स्वामीचे ॥१०३॥

ते भूषण लेता सर्वांग । कालत्रयी जे अभंग । ते अंगांग ग्रासून अंतरंग । शोभेस मजला उणे काय ॥१०४॥

ज्याचे प्रकाशे शशी सूर्य । प्रकाशमय दिसते निश्चय । ऐसे मंगलदायक पाय । असता माझ्या स्वामींचे ॥१०५॥

नवर्णू शकता किर्ती देखा । शेष जाला ज्याचे तळी कल्पका । दासी होवोनि क्षीराब्धि कन्यका । कदा न सोडिती पाय त्याचे ॥१०६॥

ज्याचे पायीचे निजसुख । सदा इच्छिती ब्रह्मादिक । ऐश्या पादुका कल्याणकारक । सदा असो मम मस्तकी ॥१०७॥

सकळ अलंकाराचे अलंकरण । सकल मंगलाचे मंगल पूर्ण । ऐसे असता पूर्णानंद चरण । माझ्या भाग्यास कोण वाखाणी ॥१०८॥

या अलंकाराचा सौख्य वरपांगी । ते न सुखी करील शोभा अंतरंगी । ती शोभून आली माझ्या अंगांगी । ब्रह्मांडीची अभा -शोभा मीच वाही ॥१०९॥

दिसे न दिसे बोल ऐसे । येथे काहीच उणे नसे । सहजी सहजानंद सौरसे । सहज वस्तु ती माझ्या आंतरीये ॥११०॥

ऐसी वस्तु मजपाशी असता । या वस्तुची काय क्षमता । यापरि जाणूनी चित्ता । लक्ष्मी काय करीतसे ॥१११॥

मातेसी म्हणे हे अलंकार । आपण करावे अंगीकार । काढुनी देतसे निजकर । शीघ्र मातेसी याकाळी ॥११२॥

ऐकता ऐसे वचन । बौंले काय पिता आपण । हे अलंकार आहे पूर्णानंदाचे जाण । आम्हासी काही अधिकार नसे ॥११३॥

ही अलंकाराची राशी । कदा न तुके याचिया चरणाशी । जेवि गुंज सुवर्णाशी । समानता केवी घडेल ॥११४॥

ज्याच्या सत्तेने ब्रह्माडें । माया करिती घडमुडे । तीस ही त्याची कळा तातुडे । ही वस्तु काय बापुडी त्याजलागी ॥११५॥

सहज तू जन्मूनी माझे कुशी । सहज सप्तकुळा उध्दरिली ममभाग्यी । त्या चरणाचा लाभ आम्हाही लाभो अल्पांगीतिशी । तुज निमित्य पै जाला हा लाभ ॥११६॥

आधी प्राप्त होता तूर्यावस्था । कदा न घडे साक्षात्कारता । तू तूर्याचशी कन्या असता । साक्षात्कारी येथे आन नांही ॥११७॥

आता हे सकळही अलंकार । मज दिसती नगमय नश्वर । सत्यरुप सुवर्ण साचार । पाय याचे दिसताहे निरंतरी ॥११८॥

करिता या पायाचा आश्रय । ब्रह्मादि धाम वाटती मायामय । केवळ सच्चिदानंद चिन्मय । भरुन उरला ब्रह्मांडी ॥११९॥

आता नाशिवंत हे अलंकार । मज न लगेजी साचार । यासी सार्थक निर्धार । तुम्हीच करणे स्वीयमती ॥१२०॥

ऐकता श्वशुर वचन । बोलते जाले लक्ष्मीवर जाण । समस्त ब्राह्मडस्त्रियांसी देऊनि दान । वाटून देणे या काळी ॥१२१॥

काढून आपुले वस्त्र देत । वाटिती जाहली स्वहस्ते समस्त स्त्रीयात । त्यातील एक घेऊन नथ । घातली तेव्हा निज नाकी ॥१२२॥

सुवासिनी पणीच्या भूषणी । मंगलसूत्र आणि नथ जाणे । यास्तव वृध्द स्त्रीयासी प्रार्थून आपणे । मागून घेतली त्याकाळी ॥१२३॥

सकळ मंगळाचे मंगळ स्वकरे । घेऊन पूर्णानंद पुतळे । नेसविते जाले हळदी पातळ । लक्ष्मी लागी त्यावेळी ॥१२४॥

तेव्हा ती पातळ घेवोन । लक्ष्मीने केले परिधान । आधी प्राण नाथासी वंदून । मातापित्यासी अभिवंदिले ॥१२५॥

स्वानुभव तोची गजावरी साज । आरुढले पूर्णानंदराज । शांती लक्ष्मी सहज । शोभतसे वामांगी ॥१२६॥

शमदमादि सेवकवृंद । पुढे चालती पूर्णानंद । जे सच्चिदानंद स्वानंद कंद । ब्रह्मानंदी मग्न की ॥१२७॥

भक्तिज्ञान विरक्ति । सलोकतासह चारी मुक्ति । पूर्णानंदांच्या सांगाती । स्वानंद यात्रेसी पै निघती ॥१२८॥

विवेक ते श्वशुर । सुबुध्दी ने सुनिर्धार । जिज्ञासू तेथील नारीनर । मार्ग साकरावया पातले ॥१२९॥

यापरी लोकासी । उभयता पुसून स्वानंदेसी । निघते जाले यात्रेसी । हर्षयमान ते काळी ॥१३०॥

विराग जळी नाहून मनाचिया स्वारी । पूर्णानंद करुन अभेदी । आशा तृष्णा देशांतरी परोपरी । तेही लोटले माघारी ॥१३१॥

लक्ष्मी आणि पूर्णानंद । स्वपदे चालती वैराग्यछंद । निजानंदे नित्य ज्ञानवृद्ध । निजयात्रेसी वाहाताती ॥१३२॥

आधी पावले महाग्राम ठाय । जेथे पूर्णानंदाचे मठाश्रय । भेटून पितृव्यास समग्र वृतोदय । वास्तव्याशी पूर्ण निवेदितो ॥१३३॥

सून पुत्राची ऐक्यता पाहून । त्यांचे चुलत्यास जाले समाधान । फार चित्ती संतोषून । उभयतासी आशिर्वादिले ॥१३४॥

आठ दिवस तेथे राहून । पितृव्याची आज्ञा घेवोन । पुढे केले प्रयाण । सेतुबंध रामेश्वरा ॥१३५॥

मार्ग क्रमित क्रमिता त्वरे । येऊन पोहचले रामेश्वरे । तेथे काय केले लक्ष्मीवरे । ते ऐकावे भाविक हा ॥१३६॥

ब्रह्मनंद समुद्रजळी । आंगेविण बुडी दिधली । सहज सेतूच्या स्नानी घडली । पूर्णानंदी रामवत ॥१३७॥

ब्रह्मादिकांचे जे माहेर । अखंड तेथे रमती योगेश्वर । जेथे सच्चिदानंद निर्विकार । तोची रामेश्वर जाणावे ॥१३८॥

चिदगंगेची कावडी । समागमे आणीली अती आवडी । तेणे तीर्थ पूर्णानंद प्रौढी अभिषेकावली । ते रुद्रसूक्ते प्रौढी रामनाथा ॥१३९॥

सदभावाचे चंदन । निजरंगाची अक्षता जाण । सुमनाचे ते सु -मन । वाहते जाहले रामनाथा ॥१४०॥

अहेतूकीचे घालून धूप । चिदज्योतीचे पाजळले दीप । चौ पुरुषार्थाचा नैवेद्य आपूप । अर्पिते जाहले रामनाथा ॥१४१॥

निष्काम पूगीफल । बावन मात्राका तांबूल । अमन ती दक्षिणा निर्मळ । अर्पिते जाले रामनाथा ॥१४२॥

पंच प्राणांचे निरांजन । करीती दर्शन निरंजन । स्वानुभव पुष्पांजली जाण । सहजी सहज पै अर्पिले ॥१४३॥

यापरी ब्रह्मानंद पूजा । करिती संपूर्णानंद राजा । ग्रासून संपूर्ण भाव दुजा । स्वानंद सुखे केली परिक्रमा ॥१४४॥

पूज्य पूजकाचा भाव । जेथे जाहला अभाव । स्वयंज्योती स्वयमेव । स्वानंदसागरी निमग्न ॥१४५॥

यापरी तेथून करुन यात्रा । निघते जाले ते स्वानंद सूत्रा । अपेक्षा ठेवून महायात्रा । जेथे ब्रह्मानंद वसतसे ॥१४६॥

रामनाथाचे मार्गी असता । गर्भिणी जाली अर्धांगी तत्वता । एकवार ऋतु प्राप्त होता । तिजलागी तेच गर्भ पै राहिला ॥१४७॥

यात्रा करुन उंबळास येता । पुत्र जाला तिजला तत्वता । त्या गोष्टीची आनंदता । सर्वत्रास फार झाले ॥१४८॥

नामकरणादि उत्सव पूर्ण । करविते जाले तिचे पिता जाण । तिम्मणभट्ट नामा निधान । ठेविते जाले त्यालागी ॥१४९॥

मासत्रय होता प्रसूतीस । प्रयाण नेमिले काशीस । श्रीगुरुंच्या भेटीस । पूर्णानंदराय ते काळी ॥१५०॥

ह्रदयी स्मरुन ब्रह्मानंद । निघते जाले पूर्णानंद । लक्ष्मीही निघाली निजानंद । ब्रह्मानंद पहावया कारणे ॥१५१॥

काशीकडे ठेविता पाऊल । पाऊली ब्रह्मानंद भरला । मार्गाचा शीण सर्व हरला । सदगुरुरायासी आठविताचि ॥१५२॥

चुकल्या तान्ह्या बाळाची । इच्छा जेवी माता पान्ह्याची । तेवी पूर्णानंद रायाची । वृत्ती उतावीळ दर्शनार्थी ॥१५३॥

मार्ग क्रमून सत्वरा । येते जाहले काशीपूरा । चित्ती हर्ष अपारा । ब्रह्मानंद चरण पहावया ॥१५४॥

ब्रह्मानंदाचे मठास जाता । मार्गी देऊळ असे विश्वनाथा । जे सच्चिदानंद अनाथनाथा । कैलासपती श्रीशंकर ॥१५५॥

लक्ष्मीसह वर्तमान । देऊळे प्रवेशिले उभयचरण । साष्टांग प्रणिपात करुन । स्वानंद स्तवनी स्तवीतसे ॥१५६॥

काशि विहारा विश्वेश्वरा । निजभक्त रक्षका सोमेश्वरा । ॐकाररुपा अमलेश्वरा । स्वनंदकंदा सर्वसाक्षी ॥१५७॥

योगीमनोभृंगा रामेश्वरा । निजानंदेश भीमाशंकरा । दासा सेवे पावसी घृष्णेश्वरा । स्वानंददाता निजभक्तासी ॥१५८॥

नागभूषणा नागनाथा । विजयरुपा वैजनाथा । त्रिंयंबका त्रैर्लोक्यना पुनिता । अनाथनाथा सर्वेशा ॥१५९॥

महांकाळी प्रिय महंकळा । श्रीशैल्य निवासी करुणा कल्लोळा । बद्रिकेश्वरा भक्तवत्सला । सहजानंदा श्रीदिगंबरा ॥१६०॥

यापरि मुक्त मंडपात । नमून या प्रकारे विश्वनाथ । त्रिगुणाचे बेल वाहात । जाले तेव्हा स्वानंदे ॥१६१॥

सत्कर्माचे निष्काम फल । स्वानंदी अर्पिले कर्पूर धवल । हर हर शब्दाचा करिता आरोळ । तुष्ट मनि वंदि जाला श्रीशंकर ॥१६२॥

एकादशवार प्रदक्षिणा करुनी । आले विंदुमाधव श्रीदर्शनी । ब्रह्मानंदांचे मठास येऊनी । साष्टांग वंदिले महाद्वारी ॥१६३॥

ब्रह्मानंद मठाचे महाद्वार । हे काशी नगरी आनंद विहार । निर्धारे प्राप्त होता ते चिदंबर । स्वानंदे प्रवेशिले त्यामठी ॥१६४॥

उल्लंघून तीन द्वार । प्रवेशिले चौथे मंदीर । तेथे सदगुरु माहेर । स्वानंद सिंहासनी अभिवंदिले ॥१६५॥

पाहता सदगुरु अभंग । प्रणिपात केला साष्टांग । दाटला सात्विक भाव सर्वांग । पूर्णानंद रायासी ॥१६६॥

मस्तक न्यासिता चरणकमळी । ब्रह्मानंदी बुध्दी हरपली । तारकी स्थिती विरोनी गेली । पूर्णानंद रायाते ॥१६७॥

मुखाने बोलावेना बोल । ते स्वये जाहले अबोल । अबोलची ब्रह्म केवळ । ऐसे वदती वेदश्रुती ॥१६८॥

ऐसे अद्वयानंद । योगीया ते पूजीले पूर्णानंदी । स्तवन स्तुतीच्या अनुवादी । सहजानंदी वृत्ती हरपली । स्वानंदेशा अभिवंदिले ॥१६९॥

नेत्री चालिल्या प्रेमाश्रुधारा । सर्वांगी सुटती प्रेमाचे पाझर । इंद्रिये बोल उठून वारंवार । वंदन करीतसे स्वानंदे ॥१७०॥

जयजय सदगुरु शिवराया । दत्तात्रेयरुपा सचिन्मया । सदानंदा योगींद्र निलया । अभिराम कारका तुज नमो ॥१७१॥

अमलरुपा गुण गंभीरा । ब्रह्मानंद सौख्य समुद्रा । सहजानंद कल्याण विहारा । कल्याण कारका सर्वेशा ॥१७२॥

पूर्णानंदा आनंद कारका । ब्रह्मानंदा चित्त चालका । अनाथनाथा ब्रह्मांड व्यापका । ब्रह्मानंद संभूदात्या तुज नमो ॥१७३॥

म्हणता प्रसन्न सहजे । ग्रासीले ते पदांक ऊमजे । सौख्य झरे पदाब्जे । सबाह्य पुष्टी पै चढली ॥१७४॥

सबाह्य चढता पुष्टी । द्वंदमुखी अटली शेवटी । सहजानंदाची या उठाउठी । सहजीसहज कृपांशिले ॥१७५॥

धन्य या दोघांचे दैव । पाहता न पुरे चरणवैभव । सच्चिदानंद निरवयव । सावयव भक्ताकारणे ॥१७६॥

नेणो काय दुष्कर्म । किंवा आचरलो अधर्म । तरीच या चरणाचा वियोग परम । घडला हे मज दिसतसे ॥१७७॥

आपणचि कृपाळू होऊन । पुनरपि दिधले हे चरण दर्शन । आपुले उपकार उत्तीर्ण । कोण्या गुणे मी होऊ ॥१७८॥

ब्रह्मानंद महाराज मूर्ती । पुनरपि वियोगाची खंती । या शरीरा कल्पांती । न घडे ऐसे करावे ॥१७९॥

वियोगाचे वडवानळी । जाळून झाली वृत्तीची धुळी । आता या चरणाद्रि वरांजली । नाहता शीतल पै जाहलो ॥१८०॥

धन्य धन्य कृपा हस्तका । यावरी वाही सर्वहीले कृपांका । अलभ्य जे ब्रह्मादिका । ते सुख मजला सहज प्राप्त ॥१८१॥

मुखे वाहता वाकपुष्पे । नेत्री भरले आनंद बाष्पे । पाहताचि प्रेमोदधी अमूपे । दृढ कवळिले श्रीसदगुरुसी ॥१८२॥

धन्य धन्य ती पूर्णानंदा । काय वर्णू आजिचिया आनंदा । स्वानंदासी वर्षिले सुखदा । जोडले ऐसे वाटतसे ॥१८३॥

अरे पूर्णानंदा स्वानंद पुतळा । स्वानंदी रमतसे स्नेहाळा । तुज न पाहता माझ्या डोळा । उभरोनि येती की हे निज सखया ॥१८४॥

माझ्या नेत्राची तू निजज्योती । माझ्या स्वानंदाची तूं निजस्फूर्ती । अगाध की तुझी गुरुभक्ति । इंद्रादिकासी अलभ्य ॥१८५॥

स्वानंद सिंहासनाची शोभा । तुजसी साजे ज्ञानगर्भा । या लाभापुढे इतर लाभा । विरोनी गेले ठाईच ॥१८६॥

तुझी उपमा तुलाची साजे । इतरासी हे काय उमजे । सहजानंद सहजी सहजे । सहजत्वांशी तू वहसी ॥१८७॥

आता त्रिकर्ण पूर्वक । भक्ति घडली तूजसी देख । जे दुर्लभ ब्रह्मादिकाही अनेक । साधना माजी पडोनी ॥१८८॥

सत्य वचनी वाचा तप । कायिक जी सेवा अनुप । मन रंगले चिद्रुप । हा योग दुर्लभ शिष्याराया ॥१८९॥

पूर्व वयसी ही काया । मार्गाशी झीजविलाशी आतिशया । परतूनि भेटलासी वचनी निश्चया । तेणे मन पूर्ण उभरले ॥१९०॥

यापरी गुरुशिष्याचा सोहळा । लक्ष्मी पाहोनि निजडोळा । तिने वंदिले चरणकमळा । सप्रेम चित्ती श्रीगुरुसी ॥१९१॥

मग तिचिये नेत्री । चाललिया प्रेमांबुधार पवित्री । अति विनय वृत्तीनि धरित्री । उन्मनीच नमनी ओसरले ॥१९२॥

धन्य त्यांची गुरुभक्ति । धन्य ती गुरुची स्थिती । मनी जाणती ते सती । सात्विक भावे तिजांतरी दाटली ॥१९३॥

दाटती भाव सात्विक । पाहुनी श्रीदेशिक । बोले काय अति हरिख । लक्ष्मीलागी ते काळी ॥१९४॥

धन्य धन्य गे तू माये । तुझे तपही अगाध होये । तरीच अर्धांगी होऊनि तूं पूर्णानंद राये । अभेद भावे पै शोभसी ॥१९५॥

अगाध तुझे दैव । अगाध तुझा भाव । तरीच स्वानंद वैभव । सहज तुजला प्राप्त असे ॥१९६॥

तू अनेक जन्मांतरीची सहचारिणी । आराधिले श्रीहरी रायासी मनी । तरी पूर्णानंद स्वामिनी । अधिकार प्राप्त असे तुज कारणे ॥१९७॥

तुझेनी निमित्ये । तुझिया मायबाप सत्ये । तरले सत्य सत्ये । जाण आता पतिव्रते ॥१९८॥

ऐसा वर्षता कृपामेघ । गहिवर दाटला सर्वांग । लक्ष्मी करी प्रणिपात साष्टांग । अंगेविण त्याकाळी ॥१९९॥

जेवी चित्रिची पूतळी । तेवी पडली चरणी वेल्हाळी । निर्विकल्प स्थिती पाहता त्यावेळी । सदगुरु काय बोलतसे ॥२००॥

पूर्णानंदा निजकरी । उठवीरे तिजला झडकरी । तिजला कृतार्थ करी । आण माझ्या सन्मुख ॥२०१॥

आज्ञा होता श्रीदेशिक । उठविते जाले निःशंक । तेव्हाच हस्त मस्तक । पूर्णानंद वरीतसे ॥२०२॥

होताच हस्त मस्तक । चरणी ठेवी निजमस्तक । स्वानंदे उठूनी हरिख । प्रदक्षिणा करी गुरु परमगुरु ॥२०३॥

यापरी कृपा करोन । अनुग्रह करविले तिजकारण । मग हर्षायमान होवोन । पूर्णानंदासी बोले ते वेळा ॥२०४॥

अरे सूवर्णाचे होता कंकण । त्याचे मोलास काय उणे । त्यावरी जडता कोंदण । अधीक की रे मोल त्यासी ॥२०५॥

तू सत्यरुप सुवर्ण । हि चिदाब्धीची दिव्य रत्न । उभयता जाहालात संलग्न । अधिकोत्तम मोल पै दिसते ॥२०६॥

तुझी सहज स्थिती । काय ढळली सांग या निर्गुंथी । तू सहजानंदही संविती । तुलाही संसारबाधा कैची रे ॥२०७॥

तू जे जे करिसी व्यवहार । ते चिदविलासचि निखर सार । म्हणसी करितो संसार । संसाराचे रुप काय ॥२०८॥

मृग जळाचेनि जळ अभंग । तहान जाईल काय सांग । वाहिले किंवा नाही संसार शिवांग । आजीवन कैलासी तो ॥२०९॥

अमावास्या रात्रीचे तिमिरानी । आक्रमिले सूर्यनारायणी । तरीच तुजला जीवनी । संसार बाधक पै होईल ॥२१०॥

कारण क्रिया विरहित । असशी तू सदोदीत । तरी हे काय तुज बाधित । होईल कैसे चिन्मया ॥२११॥

निज स्वरुपी विसर । पडो न देता अणूमात्र । निजानंदी राहसी निरंतर । तुजला कैसी ही बाधा ॥२१२॥

बाधा जेथे तेथेच । बोधे अविरुध्दे करित सद्ये । संपूर्ण ब्रह्मानंद स्वयंबोधे । भरलासे दशदिशी ॥२१३॥

ऐसी ज्याची दशा । तो केवि गुंतेल भवपाशा । तो प्रत्यक्ष विश्वेशा । अवतार पुरुष भूतळी ॥२१४॥

ज्याचेनी स्थान पवित्र । जेथे विराजती सुखसूत्र । उध्दरती कुळगोत्र । सहज त्याचे नियोगे ॥२१५॥

तैजस तू चिन्मयमूर्ती । अगाध असे तुझी किर्ती । तुझी उपमा या जगती । पाहता कांही दिसेना ॥२१६॥

दिसे ना दिसे सदा प्रकाश । तूच की रे निर्दोष । सर्वांचा तू असशी ईश । इषणात्रय तुज कैचे ॥२१७॥

तूज नसे तापत्रय । कदा न बाधी दोषत्रय । भेद त्रयातीत निर्भय । निजानंदी निमग्न ॥२१८॥

निजानंदीचे मिरासदार । होता कैचा माया अपार । माया नियंता निर्विकार । तूच की रे जीवलगा ॥२१९॥

तू असशी संबोधी । बोध होता हरे उपाधी । द्वंद्वे ग्रासिता ब्रह्मानंदी । अद्वय स्वरुप तूच असशी ॥२२०॥

यापरि वचनामृत । वर्षिती श्रीसमर्थ । सर्वांग सुख भरित । पूर्णानंदी लीन जालासे ॥२२१॥

ऐसी तेथील स्थिती । भूकेली जाली वर्णिता तृप्ती । मग इतराची गती । वर्णू कैसे शब्दंशी ॥२२२॥

एक संवत्सर पर्यंत । पूर्णानंद राहती तेथ । आज्ञा केली काय समर्थ । ब्रह्मानंद यतीराये ॥२२३॥

आता तुम्ही प्रयाण । स्वदेशा करावे जाण । पुनरपि याच रीतीने । भेटी लाभ पै घ्यावा ॥२२४॥

तुझे अंगी यावे जावे । हे बोलणेचे अभावे । जे जे होते स्वभावे । सहज त्याचा तू साक्षी ॥२२५॥

ऐसीआज्ञा करिता श्रीगुरु । त्याचा नकरिता अव्हेरु । जे पूर्णानंद अवतारु । निघते जाले तेकाळी ॥२२६॥

रामेश्वराची वाळू जे आणिली । ती जान्हवीत सोडिली । भागीरथीची कावडी भरली । अति आवडे तात्काळी ॥२२७॥

काळवेळातीत अढळ । जे सदगुरुंचे चरण कमळ । पूर्णानंद वंदूनी भावबळ । पुढे प्रयाण करतील ॥२२८॥

हे चरित्र पूर्णकाशी । पूर्ण विश्वनाथ येथील निवासी । श्रवणमात्रे तारक उपदेशी । सहज करीतसे श्रोतया ॥२२९॥

त्या काशीत मरणांती मुक्ति । येथे जीवन वेचिता उभरे मुक्ती । जीवासी घडे जीवन मुक्ती । श्रवणमात्रे ब्रह्म होय ॥२३०॥

इये क्षेत्री पूर्णानंद राये । सदभक्ताची वाट पाहे । श्रवणमात्रे वर मिळे अभये । दर्शनी उध्दरी त्या भक्ता ॥२३१॥

यास्तव हनुमदात्मज । वंदुन श्रोतयांचे चरणांबुज । विनंती करीतसे सहज । वारंवार सदभावे ॥२३२॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । षष्टितमोध्याय गोड हा ॥२३३॥

श्री सदगुरु पूर्णानंद शिवरामार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP