श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सातवा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरु पूर्णानंदायेनमः । जयजय पूर्णानंदा पूर्णब्रह्मा । पूर्णावतारी पूर्णकामा । भक्तकाम कल्पद्रुमा । करुणाकरा सर्वेशा ॥१॥

ॐकार तुझे भुवन । कल्याण तेथील मंडप जाण । बिंदुमाधव सिंहासनी विराजमान । पूर्णानंदा परात्परा ॥२॥

तू असशी पूर्णानंद । लागता तुझा मना छंद । हरुन समूळ द्वंद । अद्वय सुख त्यादेशी ॥३॥

अद्वय सुखाची तू राशी । सुखमय करिसी निज जनासी । निज जनरक्षका अविनाशी । अंतरंगी दयाळा ॥४॥

तू दयाळू कैसा होसी । निजभक्ताचे अपराध न पाहसी । निजक्षेमे त्या पाळीसी । जग पाळका जगदात्मा ॥५॥

तू सच्चिदानंद तरणी । उदय होता ह्रदगगनी । तेणे होईल भवतम हरणी । स्वप्रकाश फाकेल दशदिशी ॥६॥

ते प्रकाशता बाह्यांतर । पुढे चालले चरित्र । सहजानंद तू उदार । स्वचरित्र बोलवी स्वलीळे ॥७॥

सहावे अध्यायी ब्रह्मानंद यती । बोले पूर्णानंदाप्रती । प्रयाण करावे त्वरीत गती । स्वदेशाकडे स्वानंदे ॥८॥

ऐसी होता गुरुआज्ञा । पूर्णानंद पूर्णप्राज्ञा । ज्यास न करिता अवज्ञा । वंदून स्वदेशा निघाले ॥९॥

पूर्ववत प्रकारे । आधी येऊन श्वशुरघरे । मग करुनी यात्रा रामेश्वरे । पुनरपी जातसे गुरुदर्शना ॥१०॥

यापरि सातवार यात्रा । काशी रामेश्वरा । करीतसे निर्धारा । पूर्णानंद महामुनी ॥११॥

यापरि जाता येता मार्गी । गर्भिणी व्हावी अर्धांगी । एकवार ऋतु होत निजलागी । तेच गर्भ राहात ॥१२॥

इतर स्त्रियांचे करमल । वारंवार व्हावे विटाळ । तैसे नव्हे ते वेल्हाळ । स्वानंद सागरीचे चिदरत्न ॥१३॥

म्हणोन तिच्या गर्भोदरी । प्रकटेल भवगज विदारक केशरी । जे पूर्णब्रह्म पूर्णावतारी । त्रैलोक्य पावना कारक ॥१४॥

प्रथम यात्री एक पुत्र । त्यास जाहला निर्धार । तिम्मणभट ऐसे पवित्र । नाम त्याजला पै ठेविले ॥१५॥

दुसरे यात्री कन्यारत्न । कृष्णाबाई नामाभिधान । ठेवूनी तिजलागून । ते अर्पिले काशीकरा ॥१६॥

तिसरा अनंतभट्ट चौथी विवेकम्मा । पाचवेस रामभट्ट ऐसे नाम । पितृव्य जाता निजधामा । तेच ठेविले त्यालागी ॥१७॥

सहावे कन्या गोदू होये । सातवे जे निश्चये । ते पूर्णावतारी शिवराये । शिवराम स्वामी विख्यात ॥१८॥

त्या अवताराचे चरित्र । पुढे ऐकाल सुखसत्र । श्रवणमात्रे पवित्र । जाणा सत्य भाविक हद्यो ॥१९॥

तिम्मणभट्ट पाच वर्ष होता । त्याचे उपनयनाची सिध्दता । पूर्णानंद करीत तत्वता । कोणते रीतीने ते काळी ॥२०॥

शत लोकासी करुन याचना । साहित्य मेळऊन शत ब्राह्मणा । करुन त्याचे उपनयना । पुढे काय करीतसे ॥२१॥

पाच वर्षे पर्यंती । पुत्र ठेवी संगाती । मग पाहून ब्राह्मण समर्थ रीती । त्याचे स्वाधीन करीतसे ॥२२॥

पाहुन कोणी ग्रामथोर । जेथे असतो भूदेव परिवार । ज्याचे मुखी वेदशास्त्र गजर । सदासर्वदा होतसे ॥२३॥

उपनयन मात्र आपण । पूर्ववत याचून । करिता त्यालागून । मग सोपवीतसे द्विजकरी ॥२४॥

याच बोली विप्रासी । हा अधिकारी वेदाशी । तरी कृपा करुनी यासी । विद्यादान पै दीजे ॥२५॥

याचे अन्नवस्त्राची चिंता । स्वये करील श्री अनंता । विश्वकुटुंबी तो असता । तुम्हां आम्हासी चिंतनी सोडवील ॥२६॥

ब्राह्मणाचे स्वधर्म जाण । नित्य सेवावे भिक्षान्न । त्या रीती तो आपण । क्षुधेची शांती करील ॥२७॥

विद्या व्हावी संपूर्ण । हेची ब्राह्मणाचे भूषण । या विरहित जाण । द्विपाद पशु जाणावे ॥२८॥

यास्तव द्विजराया । तुम्हा लागी ही प्रार्थना । या बाळालागी दान । दिजे वेदोदधी विद्येचे ॥२९॥

याच्या आयुष्याची चिंता । तेही नसे तुम्हावरी सर्वथा । जणे निर्मिलेसे विधाता । तदनुसार प्रारब्ध वाहिल तो ॥३०॥

यापरि बोलून विप्रा । स्वाधीन करीतसे तिन्ही पुत्रा । मग कन्येचे कोण्या प्रकारा । विवाह केले ते ऐका ॥३१॥

अश्वत्थ पर्णाचे मंगळसूत्र । आनंदे बांधून निजकरे । योग्य ब्राह्मण पाहून अधिकारे । अर्पण त्याजला करीतसे ॥३२॥

कृष्णा बाईस काशीत जाणा । पाहुनी अधिकारी ब्राह्मण । श्रीगुरुंचे संन्निधाना । कन्यादान पै केले ॥३३॥

दुसरी विवेकम्मा जी होती । तिजला पुरोहितासी अर्पिली । या उभयता कन्येची स्थिती । विवाह पूर्ण पै केले ॥३४॥

ज्याचे वृत्ती उदार पूर्ण । समान ज्यासी खडे आणि पाषाण । सदा निजबोधी निमग्न । त्याच्या प्रपंची ही रीती ॥३५॥

यापरि त्याचे प्रपंचे । लोका दिसती साचे । परी कांहीच न वचे । निजानंदी परिपूर्ण ॥३६॥

ब्रह्मानंदी ज्याची वृत्ती जडे । किंचित स्वरुपी विसर न पडे । तरी त्याचा संसार थोकडे । त्याजला बाधक केवी होय ॥३७॥

जया स्वानुभव रोकडे । चित्त स्वानंदी जडे । आपल्या स्वरुपा वेगळी वृत्ती न सापडे । दृष्टीस ज्याची पाहता ॥३८॥

ऐसीयाची जरी संगत घडे । तत्क्षणी त्याचे पातक झडे । ते प्रत्यक्षचि चंद्रचुडे । अवतार पुरुष निश्चळे ॥३९॥

ऐसिये वैराग्य संपन्ने । पूर्णानंद घने । तयाचा हा संसार वहन । कमळपत्रे उदकापरी राहणे । गुरुस्मरणी निरंतर ॥४०॥

ऐसा स्वानंदी निश्चळे । त्याची संसारी देह निर्मळ । तेथील कांही विटाळे । त्यासी बाधा केवी लागेल ॥४१॥

त्याचा संसार लोकास । जरी दिसला सर्वास । परि तो चिद्विलासी निश्चयेस । लोकाचारा न लक्षित शांभविय वैभवे ॥४२॥

असो पूर्णानंद राज । सहायात्रा करुन सहज । सातवे यात्रेत एक द्विज । पाहिले मार्गी चालता ॥४३॥

तो द्विज कोठील कोण । त्याचे करतो निरोपण । ते ऐकावे चित्त देऊन । स्वनंदघन सज्जन हो ॥४४॥

रामेश्वराची यात्रा करुन । पुढे काशीस जाता जाण । महागावाहून एक योचन । नरावण म्हणून क्षेत्र असे ॥४५॥

त्रेतायुगी रघुनंदन । र्दळिला अहं दशानन । ए ब्रह्मराक्षस होऊन । रामा मागे फिरतसे ॥४६॥

त्या राक्षसाचा करावया भंग । श्रीराम स्थापीति कोटी लिंग । जो परमात्मा सर्वांतरंग । सर्वसाक्षी रघुराज ॥४७॥

ज्या रामाचे नाम । एकवार घेता सप्रेम । हरती सकळ भ्रम । आत्मविषयीचे ॥४८॥

जे ब्रह्मांड अयोध्या निवासी । श्रीराम जो निरंतर अविनाशी । स्मरता ज्याच्या नामासी । काय न होय भूमीवरी ॥४९॥

शांती सीता वामांगी । ज्याची प्रभा शिव अनुरागी । सदा ध्याती ज्यास योगी । तो आत्माराम निष्कलंक ॥५०॥

राम नामाचे कौतुक । एक जाणे त्रिपुरांतक । उपशांती जाणुनी देख । घडी भरही न विसरे नामोत्तमासी ॥५१॥

चरण रेणुची प्रतीती । जाणे गौतमाची सती । सदभावे भजता मुक्ति । राबती चारी त्यापुढे ॥५२॥

रामभूजाचे पराक्रम । त्र्यंबकधनु जाणे परम । अकथ्य जे निगमागम । पूर्णब्रह्म श्रीराम ॥५३॥

बाणवेगाची अवधी । एक तो जाणे अंबुधी । सर्वकर्मासी जो छेदी । अगाध महिमा रघूत्तमी ॥५४॥

भवगज विदारक पंचानन । तापत्रय निवारक रघुनंदघन । सहजानंद दायक निजधकन । सच्चिदानंदात्मा ॥५५॥

ऐसी रामाची प्रौढी । त्यापुढे रावण काय होय बापुडी । राक्षस होऊन आडी । हे काय बोलणे प्रमाद ॥५६॥

मान देऊनी वचन वाल्मिका । भक्तवत्सल भवहारक । आंतरसाक्षी रघुकुलतिलक । अवतार लीला दावितसे ॥५७॥

कोटी लिंगाची स्थापना करुन । स्थापीत चालले जानकी रमण । क्षेत्रपाली झाले उद्धरण । स्थापिता रावण मुक्त जाला येथे ॥५८॥

या क्षेत्री मुक्त जाला रावण । यास्तव क्षेत्राचे नाव नरावण । क्षेत्र नरावण ऐसे जाण । प्रसिध्द असे पुराणी ॥५९॥

वाटेत असता हे क्षेत्र । तेथे पातले हे आनंदसुत । सायंकाळ होता निर्धार । राहते जाले पै तेथे ॥६०॥

पूर्णानंदाचे दृष्टी । भरलिसे ब्रह्मानंद सृष्टी । पाहता क्षेत्र आनंद परिकोटी । अतिहर्ष पै जाला ॥६१॥

अष्टतीर्थ गयापाद । पाहिलेसे पूर्णानंद । स्नान करुनी आनंद । पूजा केली विधीपूर्वक ॥६२॥

क्षेत्रपालेश्वराचीही पूजा । करुनी पूर्णानंद राजा । देवीपूजे जाता पाहिले द्विजा । तप करितो तीर्था माझारी ॥६३॥

उरा इतुक्या उदकात । उभा राहिला तो द्विजनाथ । हे पाहून दीनानाथ । पूर्णानंदे तया उद्धरिले त्यासी ॥६४॥

अरे ब्राह्मणा सुशीला । हे काय तप मांडिले आगळा । संपूर्ण आयुष्य तुवा नासिला । स्वहित कैसारे तू नेणसी ॥६५॥

बहुत जन्म फेरा करीता । नरजन्मी अवचित लागे हाता । पुण्यपाप समतुल्य होता । प्राप्त होय हा योग ॥६६॥

पुण्याचे अधिकपण । नरजन्म होय ब्राह्मण । सुकृत बळ लाधता तेणे । सार्थक कांही करावे ॥६७॥

या नरदेहाचे कौतुक । इच्छिती इंद्रादी लोक । अनायासे प्राप्त होता देख । नरदेह करणी लावावी ॥६८॥

नरदेही नारायण । प्राप्त ऐसे वेदवचन । वाखाणती शास्त्रपुराण । अगाध जाण नरदेह गा ॥६९॥

भगवतप्राप्ती शास्त्री सनिर्धार । हा नरदेह असे रे द्वार । हे जाता आखेर । भगवतप्राप्ती मग कैची ॥७०॥

इतर योनीची गती । जाणतोसी निगुती । तसे स्वदेहाची स्मृती । परमार्थाची काय वार्ता ॥७१॥

हा देह प्राप्त होता निर्धार । स्वधर्मे ओळखावा ईश्वर । जो आंतरसाक्षी सर्वेश्वर । सर्व कुक्षी साक्षी जो पूर्णात्मा ॥७२॥

साक्षित्वी प्रतिती आंगी बाणिता । समूळ ग्रासे देहा अहंता । अहंत्यागे स्वये अर्पिता अनंता । आंग असता पै होणे ॥७३॥

तरीच नरजन्माची सार्थकता । त्यावेगळे साधनी हिंडता । वय नासणेचि तत्वता । प्राप्त कांही नव्हेचि ॥७४॥

ऐसी पडता बोधवाणी । त्या ब्राह्मणाचे कर्णी । मौन आपुले विसर्जुनी । पूर्णानंदासी काय बोले ॥७५॥

ब्राह्मणाचे मनी अभिमान । मीच श्रेष्ठ शास्त्रज्ञ जाण । यानी आता मज लागुन । प्रबोध काय करतील ॥७६॥

ऐसा अभिमान पडला । आले ब्राह्मणाचे डोळा । तरीच महाराजांनी प्रबोध बोला । विषम त्यासी पै भासले ॥७७॥

न ओळखता पूर्णानंद राज । बोले काय ती कृती द्विज । कांही दूषण तपासी मज । किं निमित्य लाविता ॥७८॥

ऐकूनि ब्राह्मणे उपासनी रता । तपाची पाहुनि अवस्था । उपासनेशी दूषिणे किमर्था । कारण त्याचे काय असे ॥७९॥

ब्राह्मणाचा श्रेष्ठधर्म । सदा करावे सतकर्म । ऐसे जाणोनि परम । तपासी प्रवर्तक मी जालो ॥८०॥

तपेनी दैवत सिध्दी । बोलती अनेक विबुधी । शास्त्रही जाणोन विशुध्दी । तपासी आजवरी प्रवर्तलो ॥८१॥

ऐसे अनेक कोरडी युक्ती । शास्त्रबळे प्रतिपादिती । ज्यात नसता भगवतप्राप्ती । ते सर्व निरर्थकची जाणावे ॥८२॥

पूर्णानंद पूर्ण दयाळू । दिन जनाचा कृपाळू । कर्मठास पाहूनि कळवळू । चित्तासि अनुभूती दावितसे ॥८३॥

मेघ करी आधीसिंचन । जलधारा भूमी भिजऊन । सकळास अन्न उपजाऊन । सुखमय पै करिती की ॥८४॥

तेवी साधुसंत । ईश्वरचि मूर्तीमंत । वावरती जे या जगात । लोकोध्दारा कारणे ॥८५॥

अरे ब्राह्मणा शास्त्रज्ञा । तू दिसशी फार सूज्ञा । बोलणे तुझे शुध्द प्रतिज्ञा । हे अभिमान काय कामाचे ॥८६॥

जो पडेल अभिमान राना । क्रोधादि वनचर मुखी जाणा । पाहुनी चुकती निजठिकाणा । सौख्य त्यासी मग कैचे ॥८७॥

श्वपचे पचविले पक्वान्न । त्यागूनि कदान्न स्वीकरिती ब्राह्मण । तेवी अभिमानयुक्त जे तपाचरण । ईश्वर अर्पण न होती ॥८८॥

जे पावती सायुज्य मुक्ति । तेहि धरिती अभिमान चित्ती । त्यासही न सुटे जन्मभ्रांती । हे तू जाणगा सूजाणा ॥८९॥

पार करावया भवसागर । हा नरदेहचि शुद्ध निकरे । सप्रेम न भजता देशिका । अहं व्याघ्रमुखी का द्यावे ॥९०॥

तू म्हणशी की करितो तप । जाण काय तयाचे स्वरुप । सुख संभूत फलाशी प्राप्त । स्वहितास तो अभिमानची नडणे असे ॥९१॥

मृगजळाचे जीवन । केवि निवेल तहान । स्वप्नी वसता भद्रासन । जाग्रती संभ्रम केवी जाय ॥९२॥

देहाची सार्थकता । म्हणसी तपेचि साध्य करिता । देही विज्ञाना दवडिता । त्याचा विसर आंतरी वाहे ॥९३॥

शुक्ल शोणिताच मेळा । घडलासे हा पुतळा । ऐसी अमंगळी मंगळा । राम माझा केवी भेटे ॥९४॥

देह तो भरले षडविकार । गुणनु भूताचा विकार । ऐसा विकारी तो निर्विकार । प्राप्त तुजला नव्हेचि ॥९५॥

पाहता इंद्रिय मुळी जडे । या इंद्रियतपी निजसुख केवी आतुडे । अंतःकरण पंचकद्वारे न उघडे । प्रत्यक्षा जड पराधिन ॥९६॥

हा देह इंद्रियवृंद । जे आचरति सावधपणी स्वछंद । त्यासी प्राप्ती ब्रह्मानंद । मनोरथाची पुर्ण मात्रा ॥९७॥

जेथे नसे मनाचा प्रवेश । शब्द नसे सरस स्पष्ट वाचेस । या इंद्रिय दमनी काय सोस । हे तुवा अनुभवी शोध ॥९८॥

आता तुझे वय गेलेरे अर्धे । ग्रासला असे काळ सुबध्दे । आता तरी होय सावधे । स्वहित कांही विचरी ॥९९॥

यापरि वचनामृती वर्षाव । करिताच पूर्णानंद राव । द्विजा उपरती होऊन सदभाव । चरणी लोटांगण घातिले ॥१००॥

घडता परिसाचे संघर्षण । लोहत्वाची फिटे काळिमा जाण । तेवी पूर्णानंद बोधे ब्राह्मण । पूर्णस्थितीसी पालटली ॥१०१॥

ओहळ मिळाली जाऊनी गंगा । पूर्वनामासी सांडून जाली तीर्थ संयोगा उत्तुंगा । तेवी टाकूनी हठयोगा । ब्राह्मण रंगला पूर्णानंदी ॥१०२॥

साष्टांग करुनी नमन । उभा ठाकिला करजोडून । अष्टही भाव दाटता जाण । स्वानंदे स्तवना आरंभीले ॥१०३॥

जय पूर्णानंद मूर्ती । अगाध असे तुझी कीर्ती । न ओळखता आपुली स्थिती । मी उध्दट भाषणपै केले ॥१०४॥

जळोद्या माझे अहंपण । आभिमानी वायेगेले अर्धे जीवन । आपण वर्षून कृपाघन । शीतल सर्वांग पै केले ॥१०५॥

मज लागलासे छंद । तपी रमलो स्वछंद । तेणे व्यर्थ वय घालविलो मतिमंद । आसधरुनी आंतरी ॥१०६॥

आपण गारुडी सबळ । अहं विष उतरविले कृपाळ । निर्विषय केला अनाथ बाळ । ही अगाध महिमा प्रभूराया ॥१०७॥

अहो दारुणतप । वेष्टिलो मी सर्वांगी कोप । विसरलो आपुले स्वस्वरुप । भ्रांत जालो होतो मी ॥१०८॥

अहं बेडी पायी जडली । स्वस्वरुपाची वाट खुंटली । तया तोडिले आपण कृपाबळी । हा उपकार आता केवि विसरो ॥१०९॥

मज पंचभूते आकर्षिले । अहंकारा शासूनि छेदिली । पडता तव वचनी आगळी । मुक्त झालो त्यापासुनी ॥११०॥

ऐसे नानापरीसी बोलून । पूर्णानंदासी केले प्रसन्न । हे दयाळू पूर्णानंद चरण । तोषिले ऐकता द्विजवचना ॥१११॥

पूर्णानंद विचार करी । तपोनिष्ठ विप्र निर्धारी । संयमी आजीवन साध्य करि । वहन केले गुरुआज्ञे ॥११२॥

ब्राह्मण पाहून अधिकारी । पुर्णानंद निजमनी विचारी । यास कन्या देता निर्धारी । योग्य असे ब्राह्मण ॥११३॥

वय पाहता पन्नास । जालासे ब्राह्मणास । परंतु पाहुन पुढील भविष्यास । निश्चय केला निजमनी ॥११४॥

वय अधिक असे म्हणून । विचार केला भार्यालागुन । गोदूलागी वर पाहिला जाण । तुझे मनीची सांग गोष्ट ॥११५॥

येरी म्हणे प्राणनाथा । आपुले चरणी जडली माझी माथा । मी दासी स्वामीची तत्वतः । मजला विचारणे कायसे ॥११६॥

आपण जो केला निश्चय । तोच दासीचा निश्चय । या वाचोन मनोदय । दुसरा नसे स्वामीया ॥११७॥

आपुली जी निश्चयता । अन्यथा करु नये विधाता । भविष्य जाणून तत्वता । आपण मनी योजलासे ॥११८॥

ऐकून तिचे वचन । वर दाखवितो आपण । तिजला देऊळी आणून । द्विजासी दाखविते पै जाले ॥११९॥

पाहता लक्ष्मी सती । मनी न करता खंती । कांते ज्ञानकळा निश्चिती । बोले काय पतीसी ॥१२०॥

आता या ब्राह्मणा लागुन । करुन द्यावे कन्यादान । हीच आवडी माझे मन । दुसरे कांही असेना ॥१२१॥

पुढील प्रसंगी निरोपण । क्षेत्रपालाचे आज्ञेवरुन । बापु पंडीत करतील प्रकाशण । पूर्णानंद समागमे काशीस ॥१२२॥

काशीत कन्यादान । पूर्णानंद देतील करुन । ते परिसावे स्वानंद कथन । सप्रेम चित्त करोनिया ॥१२३॥

सहजानंदाचे तुम्ही सहज । यास्तव तुमचे पादांबुज । विनवितसे हनुमदात्मज । वारंवार सप्रेमे ॥१२४॥

ऐकता पूर्णानंद चरित्र । पूर्णानंद असे ब्रह्मोत्तर । ते परिसावे अत्यादरे । सहजानंद करोनिया ॥१२५॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णनंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । सप्तमोध्याय गोड हा ॥१२६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP