मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३|
प्रसंगानें यतीचे धर्म.

धर्मसिंधु - प्रसंगानें यतीचे धर्म.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.


प्रातःकालीं उठून '' ब्रह्मणस्पते० '' या मंत्राचा जप केल्यावर दंडादिक व मृत्तिका घेऊन मूत्रपुरीषनिमिक्तक शुद्धि गृहस्थाच्या चौपट करावी. नंतर आचमन करुन पर्व व द्वादशी वर्ज्य करुन प्रणवानें दंतधावन करावें. मृत्तिकेनें बाहेरील कटिप्रदेश प्रक्षालन करुन जलतर्पण वर्ज्य करुन स्नान करावें व पुनः जंघा प्रक्षालन करावी. नंतर वस्त्रादि ग्रहण करुन प्रणव मंत्रानें प्राणायाम, मार्जन इत्यादि करुन केशवादि नमोंत नाममंत्रानी तर्पण केल्यावर '' भूस्तर्पयामि '' इत्यादि व्यस्तसमस्त व्याहतिमंत्नांनीं '' महर्जनस्तर्पयामि '' याप्रमाणें तर्पण करावें. याविषयी विशेष प्रकार माधवादिक व विश्वेश्वर्यादिक ग्रंथांत पहावा. सूर्योपस्थानादिक व त्रिकाल विष्णुपूजा इत्यादि निर्णयसिंधूंत पहावें. धूर झाल्यावर, मुसलाचे आघात ( सडणें ) बंद झाल्यावर, अग्नि विझाल्यावर व लोकांचें भोजन झाल्यावर मोठ्या अपराह्णकालीं यतीनें नित्य भिक्षा मागावी. भिक्षेचे भेद दुसर्‍या ग्रंथांत पहावेत. त्यांत विविदिषु संन्याशास माधुकरी भिक्षा मुख्य होय. दंडवस्त्रादिकांचा स्वीकार न करणार्‍या संन्याशास करपात्रभिक्षा मुख्य होय. इतर भिक्षेचे पक्ष अशक्तविषयक आहेत. त्यांत माधुकरी पक्ष असतां दंडादिक घेऊन पांच किंवा सात घरी भिक्षा मागून त्या अन्नाचें प्रोक्षण करावें व '' भूःस्वधानमः '' इत्यादि व्यस्तसमस्त व्याहतिमंत्रांनीं सूर्यादि देवतांना व भूतांना भूमीचे ठायीं अन्न देऊन शेष अन्न विष्णूस निवेदित केलेलें असें भक्षण करावें. चंडी व विनायक इत्यादि देवतांचा नैवेद्य भक्षण करुं नये. भोजन करुन आचमन केल्यावर सोळा प्राणायाम करावेंत. याप्रमाणें संक्षेप जाणावा.

यतीचे हातावर उदक घालून भिक्षा द्यावी व पुन्हा उदक घालावें. तें भिक्षान्न पर्वततुल्य व तें उदक सागरोपम होतें. वर्षाकालाखेरीज इतर कालीं यतीनें गांवांत एकरात्र, व नगरांत पांच रात्रि रहावें. वर्षाकालीं म्हणजे पावसाळ्यांत चार महिने रहावें. मनाचें नियमन करणार्‍या यतीनीं आठ महिने भ्रमण करावें. महाक्षेत्रांत राहणार्‍यांनीं भ्रमण करुं नये. भिक्षाटन, जपस्नान, ध्यान, शुचिभूर्तपणा व देवपूजन हीं सहा राजदंडाप्रमाणें अवश्य करावींत. मंचक, श्वेत, वस्त्र, स्त्रियांच्या गोष्टी, चंचलता, दिवसास निद्रा व वाहन हीं सहा यतींस पतन करणारी आहेत. वृथा भाषण, पात्रलोभ, संचय, शिष्यसंग्रह, हव्य, कव्य व तसेंच अन्न हीं यतीनें वर्ज्य करावीत. यतीची पात्नें मृत्तिका, वेणु, काष्ठ व भोंपळा यांचीं होत. संन्याशानें नित्य तीर्थवासी तसेंच उपवासतत्पर असूं नये. संन्याशानें अध्ययन करुं नये व व्याख्यानपर होऊं नये. म्हणजे वेदार्थाहून भिन्न विषयांचें अध्ययन करुं नये व वेदार्थाहून भिन्न विषयांवर व्याख्यान देऊं नये. असे हे यतिधर्म संक्षेपानें सांगितले. दुसरेही यतिधर्म माधव व मिताक्षरा इत्यादि ग्रंथांत पहावेत.

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP