मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३|
सपिंडीकरणाचा विचार.

धर्मसिंधु - सपिंडीकरणाचा विचार.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


सपिंडीचा काल

साग्निक पुत्रानें सपिंडी केल्यावांचून पितृयज्ञ करुं नये, असें वचन आहे म्हणून पित्रादिक त्रयी व मात्रादिक त्रयी या त्रयींतून कोणीही मृत असतां साग्निकानें बाराव्या दिवशीं सपिंडी करुन पुढें येणार्‍या अमावस्येस पिंडपितृयज्ञादिक करावें. त्यांत साग्निक स्मार्तान्निमानही घ्यावा असें वाटतें. त्यासही पिंडपितृयज्ञ अवश्य आहे. साग्निक मृताची सपिंडी तर तिसर्‍या पक्षाचे ठायींच करावी. कारण मृत झालेला साग्निक असून कर्ता अनग्निक असेल तर त्याची सपिंडी तिसर्‍या पक्षाचे ठायीं करावीं असें वचन आहे. येथें साग्निक म्हणजे श्रौताग्निमानच समजावा. मृत हे दोघेही साग्निक असतील तेव्हां पित्याची सपिंडी १२ व्या दिवशींच करावी, असें वचन आहे. दोघेही अनग्निक असतील तर अनेक काल सांगितले आहेत. अनग्निमान कर्त्यानें अनाहिताग्नि मृताची सपिंडी पूर्ण वर्षाती ११ व्या मासीं ६ व्या मासीं, तिसर्‍या मासीं, ३ र्‍या पक्षीं, मासांतीं, १२ व्या दिवशीं, ११ व्या दिवशीं किंवा ज्या दिवशीं वृद्धि ( नांदीश्राद्ध ) प्राप्त होईल त्या दिवशीं करावी, असें निश्चित समजावें. येथें नांदीश्राद्ध निमित्तक अपकर्ष निरग्निकांसच सांगितला तथापि साग्निकांसही संभव असल्यास योजावा. या वचनांत ' वृद्धि ' असें जें पद आहे तें च्यूडा, उपनयन व विवाह एतद्विषयकच आहे. सीमंतादि संस्कारांचे ठायीं वृद्धिश्राद्धाचा लोपच करावा. त्यासाठीं सपिंडीचा अपकर्ष करुं नये, असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. उलट दुसरे ग्रंथकार गर्भाधान, पुंसवन इत्यादि अन्नप्राशनापर्यत संस्कार न केल्यास दोषोक्ति आहे म्हणून आवश्यक संस्काराचे ठायी वृद्धिश्राद्धासही अवश्यकत्व असल्यानें सपिंडीचा अपकर्ष करावाच. तसेंच सपिंडीकरण न झाल्यास चतुःपुरुष सपिंडांत गर्भाधानादिकही करुं नये, असें म्हणतात. यावरुन पितामह मृत असतां पौत्रांस वृद्धिश्राद्ध प्राप्त होतांच सपिंडीकरण, अनुमासिक इत्यादिकांचाही अपकर्ष सिद्ध होतो. याप्रमाणें आवश्यक असें वृद्धिश्राद्धयुत कर्म प्राप्त झाल्यास कनिष्ठ पुत्र किंवा भ्राता किंवा भ्रातृपुत्र किंवा अन्य सपिंड अथवा शिष्य अशा गौण कर्त्यानेंही कुलांत प्राप्त झालेल्या वृद्धिश्राद्धाची सिद्धि होण्यासाठीं सपिंडी इत्यादिकांचा अपकर्ष करावा. तो केल्यास पुत्रादि मुख्य कर्त्यानें पुनः करण्याचा अभाव आहे. जे स्वधा शब्दांनी मंगल दूषित करितात, असें या मंत्रांत दोष श्रवण आहे. वृद्धिश्राद्धावांचून गौण अधिकार्‍यानें सपिंडी केली तर पुत्रादि मुख्याधिकार्‍यांनीं पुनः करावी. ११ व्या दिवसापर्यतच्या कर्माची पुनरावृत्ति करुं नये. त्यांत आवश्यक पदानें अनन्यगतिक असें वृद्धिकर्म घ्यावें. यावरुन सगतिक असे इष्टापूर्तादिक व सगतिक उपनयनविंवाहादिक असतां अपकर्ष करुं नये व अगतिक असे विवाहादिक असतील तर अपकर्ष करावा. अशीं व्यवस्था योजावी. '' कुलधर्म, अनंत असल्यानें व पुरुषाचे आयुष्याचा क्षय असल्यानें व शरीरास अस्थीरत्व असल्यानें १२ वा दिवस प्रशस्त होय. '' या वाक्यांत कुलधर्म या पदानें वृद्धिश्राद्धयुक्त कर्म घ्यावें. पंचमहायज्ञ, देवपूजा, श्राद्ध इत्यादिक घेऊं नये. कारण वर्णधर्मत्वानें या कर्मास नित्यत्व आहे. म्हणून सपिंडीनिमित्तक प्रतिबंधाचा योग नाहीं. कारण सपिंडी करण्यापूर्वी पंचमहायज्ञादिक धर्म करुं नये, असें स्मृतिवचनांत कोठेंही आढळत नाहीं. यावरुन सपिंडीकरण न झाल्यास सपिंडांत देवपूजा व श्राद्धादिक या धर्मीचा लोप करावा असें जे म्हणतात त्यांच्या म्हणण्यास मुळांत आधार नसल्यानें तिकडे लक्ष देण्याचें कारण नाहीं. या वचनांतील ' द्वादशाह ' या पदानें ज्या दिवशीं अशौचप्राप्ति होईल त्याच्या पुढचा दिवस घ्यावा. यावरुन ३ दिवस अशौच असल्यास ५ व्या दिवशीं सपिंडी करावी. प्रमादानें १२ वा दिवस इत्यादि कालीं सपिंडी करण्याची राहिल्यास पुढें येणार्‍या कालीं करावी. हें उत्तरकालाचें विधान साग्निक व निरग्निक यांस साधारण आहे. सपिंडीश्राद्ध उक्तकालीं न केल्यास हस्त, आर्द्रा, रोहिणी किंवा अनुराधा या नक्षत्रीं तें करावें, हेंही साधारण आहे. वर्षाती सपिंडी करण्याचा पक्ष असल्यास वर्षाचे शेवटले दिवशीं अद्वपूर्ती श्राद्ध करुन व सपिंडी करुन दुसरे दिवशीं, मृतदिवशीं वार्षिक श्राद्ध करावें, असें स्मृत्यर्थसारग्रंथांत म्हटलें आहे. याप्रमाणें सपिंडीकालाचा विचार सांगितला.

पुत्र देशांतरस्थ असतांही दुसर्‍यानें सपिंडी करुं नये; याप्रमाणें ज्येष्ठ देशांतरस्थ असतांही कनिष्ठानें करुं नये. पण ज्येष्ठ समीप नसतां कनिष्ठानें षोडश श्राद्धें करावींत, तीं ज्येष्ठानें पुनः करुं नयेत. आहिताग्नि कनिष्ठानेंही सपिंडी करावीच. वृद्धि निमित्त असल्यास कनिष्ठादिकांनींही सपिंडी करावी. असें सांगितलें. वृद्धीशिवाय कनिष्ठ पुत्रानें सपिंडी केल्यास ज्येष्ठानें पुनः करावी. आहिताग्नि कनिष्ठानें पिंडपितृयज्ञासाठीं सपिंडी केली तरी ज्येष्ठानें पुनः करावी, असें वाटतें. त्या पुनः सपिंडी करण्यात प्रेत शब्द उच्चारुं नये. देशांतरीं राहणार्‍या पुत्रांनी श्रवण केल्यावर वपन करावें व दहा दिवस अशौच धरुन अशौचांतीं सपिंडी करावी.

N/A

References : N/A
Last Updated : March 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP