मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३|
बाराव्या दिवशीं नारायणबलि

धर्मसिंधु - बाराव्या दिवशीं नारायणबलि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.


देशकालांचें स्मरण करुन '' सिद्धिं गतस्य भिक्षोः संभावित सर्वपापक्षयपूर्वकं विष्णुलोकावाप्तिद्वारा श्रीनारायणप्रीत्यर्थ नारायणबलिं करिष्ये '' असा संकल्प करुन तेरा संन्यासी किंवा तेरा ब्राह्मण यांना निमंत्रण करुन शुक्लपक्षांत '' केशवरुपिगुर्वर्थेत्वया क्षणः कर्तव्यः '' याप्रमाणें दामोदर नांवापर्यंत केशवादि द्वादश नांवांनी क्षण द्यावा. पण कृष्णपक्षांत संकर्षणादि द्वादश नांवांनीं क्षण द्यावा. तेराव्या ब्राह्मणास '' विष्णवर्थे त्वया क्षणः कर्तव्यः '' असें निमंत्रण करुन पादप्रक्षालन करुन ब्राह्मणांस पूर्वाभिमुख बसवावें. ब्राह्मणाच्या पुढें स्थंडिलावर अग्निस्थापनादिक करावें. अन्वाधानांत '' चक्षुषी आज्येनेत्यंतेग्नि वायुं सूर्य प्रजापतिं च व्यस्तसमस्त व्याहतिभिरेकैकपायसाहुत्या विष्णुमतोदेवा इति षडभिः प्रत्यृचमेकैकपायसाहुत्या नारायणं पुरुषसूक्तेन प्रत्यृचमेकैक पायसाहुत्या शुक्ले केशवादि द्वादशा देवताः कृष्णे संकर्षणादि द्वादश देवताः एकैकपायसाहुत्या शेषेणेत्यादि० '' असें अन्वाधान करुन एकशें बावन्न मुष्टि निर्वाप करावा व बलीची पूर्तता होईल इतके तांदूळ घेऊन अडतीस आहुति होतील इतका व पुरुषाहार परिमित विष्णुनैवेद्य पर्यास होईल इतका चरु दुधांत शिजवून आज्यभागांत कर्म झाल्यावर अग्नीच्या पूर्वेस शालग्रामावर विष्णूची पुरुषसूक्तानें व अष्टाक्षरमंत्रांनी षोडशोपचारांनी पूजा केल्यावर स्त्रुचीनें किंवा हातानें धन्वाधानांत सांगितलें आहे त्यास अनुसरुन होम व त्याग करावे. याप्रमाणे शुक्लकृष्णभेदानें केशवादि बारा किंवा संकर्षणादि बारा अशा अडतीस आहुतींनीं होम करावा. नंतर स्विष्टकृदादि होमशेष संपवून पुनः शालग्रामाची पूजा करावी. विष्णु गायत्रीनें विष्णूस अर्घ्य देऊन होम करुन शेष राहिलेल्या पायसानें विष्णूस बलि द्यावा. निमंत्रित ब्राह्मणांस केशवादिक्रमानें '' केशवरुपिगुरवेनम इदमासनं '' इत्यादि वाक्यानें आसन, गंध, पुष्प, धूप, दीप, आच्छादन हे उपचार देऊन तेराव्या ब्राह्मणाचे ठायीं पुरुषसूक्ताच्या प्रत्येक ऋचेच्या अंतीं '' विष्णवेनमः '' इत्यादि प्रकारानें दीपापर्यत उपचारांनी विष्णूची पूजा करावी. चतुष्कोण मंडलें करुन त्यावर तेरा भोजनपात्रें मांडून त्यांस घृत लावून त्यावर अन्न वाढावें व '' पृथिवीते पात्रं० इत्यादि वाक्यांनी केशवादि द्वादश देवतांस उद्देशून व विष्णूस उद्देशून अन्नाचा त्याग करावा. नंतर '' अतोदेवा, ॐतद्ब्रह्म, ॐतद्वायुः, ब्रह्मार्पणं० '' इत्यादि वाक्यांनीं आपोशनापासून प्राणाहुतीपर्यंत कर्म झाल्यावर नारायणादिक उपनिषद्भागांचें पठण करावें. तृप्तिप्रश्नापर्यत करुन ब्राह्मणांचें आंचवणें झाल्यावर पूर्वेस अग्रें होतील असे दर्भ पसरुन अष्टाक्षर मंत्रानें अक्षता उदक देऊन '' केशवरुपिणे गुरवेऽयं पिंडःस्वाहानमम '' असे बारा पिंड द्यावे. कृष्णपक्षांत संकर्षणादि नांवानें पिंड द्यावे, असें सर्वत्र जाणावें. पिंडाचे ठायीं विष्णूची पूजा करुन पुरुषसूक्तानें स्तुति करुन विसर्जन करावें. ब्राह्मणांस तांबूल, दक्षिणा इत्यादिक देऊन तेराव्या ब्राह्मणास '' नाभ्या आसी० '' या तीन ऋचांनीं फळ, तांबूल व दक्षिणा देऊन नमस्कार करावा व ती शालग्राममूर्ति आचार्यास द्यावी. याप्रमाणें नारायणबलि सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP