मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
कलियुगात निषेध

धर्मसिंधु - कलियुगात निषेध

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


समुद्रपर्यटन करणाराचा स्वीकार करणे, उदकयुक्त कमंडलूचे धारण करणे, असवर्ण (स्वजातिभिन्न) कन्यांशी द्विजांनी विवाह करणे, दीर इत्यादिकांपासून पुत्र उत्पन्न करणे, मधुपर्कात पशुचा वध करणे, श्राद्धात मांस देणे, वानप्रस्थाश्रम स्वीकारणे, एकदा दान केलल्या अक्षता कन्येचे पुन्हा दुसर्‍यास दान करणे, दीर्घकाल ब्रह्मचर्य, नरमेध, अश्वमेध, महाप्रस्थान गमन म्हणजे उत्तर दिशेची यात्रा करणे, गोमेध यज्ञ, हे धर्म कलियुगात ब्राह्मणांनी वर्ज करावेत, असे शहाण्यांचे मत आहे. मद्यभक्षणादि वाम मार्गादिकांची शास्त्रे मानू नयेत; कारण पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा या दोनही शास्त्रात मद्याचा निषेध केला आहे. मद्यपान वर्ज करावे. महापातकास मरणांत प्रायश्चित्त. सौत्रामण्यादि यज्ञातही सुरापात्रांचे ग्रहण वर्ज करावे. कलियुगात औरस व दत्तक दोन पुत्र उक्त आहेत. इतर म्हणजे क्रीतादिक दहा प्रकारचे पुत्र कलीमध्ये वर्ज करावेत. कौस्तुभग्रंथात स्वयंदत्त पुत्रही कलीमध्ये विहित आहे असे सांगून नऊच प्रकारचे पुत्र निषिद्ध सांगितले आहेत. कलियुगात ब्रह्महत्या करणारास अव्यवहार्यन्वादि रूप पातित्य आहे. ब्रह्महत्या करणाबरोबर संसर्ग करणारास नरकास कारण असलेला दोष लागतो, पण त्यास पातित्य नाही. पापात संसर्गदोष नाही असे कलिवर्ज्यात वचन आहे. कृतयुगात पाप्याशी संभाषण केले असता पातित्य येते, त्रेतायुगात पाप्याला स्पर्श केल्याने, द्वापार युगात पाप्याचे अन्न ग्रहण केल्याने व कलियुगात साक्षात कर्म केल्याने पातित्य येते, असेही वचन आहे, ब्रह्महत्यादि कर्मानेच पातित्य येते, संसर्गाने तसे होत नाही, असा या वचनांचा अर्थ आहे. म्हणून लोकांत बहिष्कृत नसून ज्या पातकी लोकांचे संसर्गाचा परिहार करणे लोकविद्रिष्टत्वामुळे अशक्य आहे अशा संसर्गाविषयीच हे वचन आहे असे जाणावे. लोकात बहिष्कृत नाहीत पण जे गुप्तपणाने अभक्ष्यभक्षण, अपेयपान, अगम्यगमन इत्यादि पातके करितात असे माहीत असणाराने त्यांच्याशी संभाषणादि संसर्ग करणे नरकास कारण असले तरी त्याचा परिहार करणे शक्य नाही. कारण तसे केल्याने लोकांत द्वेष उत्पन्न होतो, लोकांनी बहिष्कृत केलेल्या पाप्यांचा संसर्ग पातित्याला कारण आहे व शिष्टाचारही असाच आहे असे मला वाटते. यासाठी कृतयुगात देशाचा, त्रेतायुगात ग्रामाचा, द्वापारयुगात कुळाचा व कलियुगात पातककर्त्याचा त्याग करावा असे जे वाक्य आहे त्यात कर्त्याचा त्याग करावा असा विधि प्राप्त होतो. त्याग म्हणजे संसर्गाचा परिहार समजावा या वाक्यावरून ब्रह्महत्यादि पातके करणारा पापी कुलात उत्पन्न झाल्यास ते कुल द्वापारयुगात्च बहिष्कृत करावे. कलियुगात कुलास बहिष्कार नाही. प्रत्यक्ष पापकर्त्यासच बहिष्कार आहे असे प्रतिपादक होते. पतिताचे सगोत्र सपिंडांनी कोणतेही कर्म करू नये व लोकांशी कसलाही व्यवहार ठेवू नये असे प्रतिपादणारे व वरील वाक्याशी विरोध असणारे दुसरे वचन कोणत्याही ग्रंथात आढळत नाही. निर्णयसिंधूत घटस्फोटप्रकरणी "गृहामध्ये स्वेच्छेने यावे" हे वसिष्ठवचन प्रबल मानून पात्रनिनयनाच्यापूर्वी पतिताच्या ज्ञातीला धर्मकार्यास अधिकार नाही असा अपरार्कग्रंथाचे व्याख्यानाचा उपन्यास केला आहे. तो सर्व पतितविषयक नाही तर घटस्फोटास योग्य असून प्रायश्चित्ताची इच्छा न करणारा जो पतित तद्वविषयक आहे. तसे नसते तर "पात्रनिनयाच्या पूर्वी" असे न सांगता "प्रायश्चित्ताच्या पूर्वी" असेच सांगितले असते. कलियुगात कर्त्याचा त्याग करावा इत्यादि प्रत्यक्ष वचनाशी विरोध असता अर्थापत्तिमूलक सर्व पतितविषयक कुलबहिष्कारवर्णन पुरुषव्याख्यानरूप जे ते अप्रमाण होईल असे वाटते. याप्रमाणे हे संक्षेपतः सांगितले.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP