मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
गृहलिङ्गपूजन

धर्मसिंधु - गृहलिङ्गपूजन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


"घरात दोन लिंगे पूजू नयेत. त्याचप्रमाणे दोन शालग्राम, दोन द्वारकाचक्रे (चक्रांक), दोन सूर्यकांत, तीन देवी, तीन गणपती व दोन शंख शहाण्याने पुजू नयेत." "दोन चक्रांक पूजावेत, एक चक्रांक पूजू नये" असे दुसर्‍या ग्रंथात सांगितले आहे. त्यावरून दोन चक्रांक पुजण्याविषयी विकल्प आहे असे सिद्ध होते. "तसेच मत्स्य, कूर्म इत्यादि दशावतार मूर्ति घरात पूजू नयेत. अग्नीने दग्ध झालेल्या व मोडक्या फुटक्या मूर्ति घरात पुजू नयेत. शालग्रामशिला भग्न असो किंवा फुटलेली असो तो ती पूजेला शुभकारक आहे. सम (४, ६, ८, इ०) शालग्रामांची पूजा करावी पण समांमध्ये दोन पुजू नयेत. विषम शालग्रामांची पूजा करू नये. पण एक शालग्राम पुजावा. सुवर्णासह शालग्रामदान केले असता पृथ्वीदानाचे फल मिळते. शंभर शालग्रामांच्या पूजेने अनंत फल मिळते. बंधु अविभक्त असले तरि त्यांनी देवपूजा, अग्निहोत्र, संध्या, ब्रह्मयज्ञ ही कर्मे निरनिराळी करावीत. स्त्रिया अथवा शूद्र यांनी शालग्राम, चक्रांक व बाणलिंग यांस स्पर्श करून पूजा करू नये. कारण "शूद्र, मौजी न झालेला, सौभाग्यवती स्त्री व विधवा स्त्री यांनी स्पर्श न करिता दुरून शिव व विष्णु यांची पूजा करावी," असे वचन आहे. शालग्राम व बाणलिंग यांच्याच स्पर्शाविषयी निषेध आहे. मूर्ति इत्यादिकांच्या स्पर्शाविषयी निषेध नाही. कारण "सर्व वर्णांनी सर्व देवांच्या मूर्ति पूजाव्यात व मणिमय केलेली लिंगेसुद्धा पूजावीत" असे वचन आहे. "विकत घेतलेली शालग्रामशिला मध्यम व याचना करून संपादिलेली अधम होय. उक्त लक्षणांनी युक्त असलेली व परंपरेने प्राप्त झालेली शालग्रामशिला ही उत्तम समजावी. आपल्या गुरूने दिलेली शालग्रामशिलाही उत्तम समजावी. त्यात आवळ्याएवढी लहान असलेली शालग्रामशिलाच पूज्य होय. यापेक्षाहि जितकी जितकी लहान शिला असेल तिच्या पूजेपासून महत्फल मिळते. ज्या शालग्रामात एका यवाएवढा खळगा असून यवार्धाएवढे लिंग असते अशा शालग्रामाला शिवनाभि असे म्हणतात. तो स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तीनही लोकात दुर्लभ आहे. शालग्रामशिलेची अर्चा करू नये. पूर्वी महापूजा करून नंतर तिची पूजा करावी. हे राजेंद्रा, बाणलिंगे त्रिभुवनात प्रसिद्ध आहेत. त्या बाणलिंगाचा अर्चासंस्कार व आवाहन ही करू नयेत." वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध यांची विप्रादिकांनी क्रमाने पूजा करावी. म्हणजे ब्राह्मणाने वासुदेवाची, क्षत्रियाने, संकर्षणाची, वैश्याने प्रद्युम्नाची व शूद्राने अनिरुद्धाची पूजा करावी. त्यांची लक्षणे अशी- पाच चक्रे असलेली शालग्रामशिला वासुदेवमूर्ति, सहा चक्रे असलेली प्रद्युम्नमूर्ति, सात चक्रे असलेली संकर्षणमूर्ति, आणि अकरा चक्रे असलेली अनिरुद्ध मूर्ति समजावी. "प्रणवाचा उच्चार, शालग्रामशिलेची पूजा व ब्राह्मणस्त्रीचे ठायी गमन, ही केल्याने शूद्र चांडालत्वाप्रत जातो. मद्यपानाने विरहित व विष्णूदीक्षेने युक्त असलेल्या शूद्रांनी ब्राह्मणांकडून शालग्रामशिलेची पूजा करवावी. हे नारदा, विष्णूला नित्य संतुष्त करणारे तुलसी काष्ठाचे चंदन, कार्तिक मासी केतकीपुष्पे व दीपदान ही कलियुगात ज्याने हरीला अर्पण केली, त्याने आपल्या कुलाचे तारण केले असे होते." शालग्रामसंबंधी तीर्थाप्रमाणे चक्रांकित तीर्थाचेही प्राशन करावे असा विधि आहे. यासाठी शालग्रामशिलेच्या सन्निध चक्राकिताचीही पूजा करावी. शिवाचा निर्माल्य झालेली पत्रे, पुष्पे, फले व जल ही अग्राह्य आहेत. पण शालग्रामाच्या स्पर्शाने सर्व शिवनिर्माल्य पवित्र होतो. मधले बोट व अनामिका यांच्या मध्ये पुष्प घेऊन देवास वाहावे. अंगुष्ठ व तर्जनी यांच्या अग्रांनी देवावरील निर्माल्य काढावा. भस्माचा त्रिपुंड्र लाविल्यावाचून व रुद्राक्षाची माला घातल्यावाचून महदेवाची पूजा केली तर ती त्याला फलदायक होत नाही. या पृथ्वीवर मनुष्याने मंत्राशिवाय रुद्राक्ष धारण करू नयेत. रुद्राक्षाच्या स्नानाच्या वेळी पंचामृत व पंचगव्य यांचा उपयोग करावा. रुद्राक्षाची प्रतिष्ठा करताना ('नमः शिवाय' हा) पंचाक्षर मंत्र व त्र्यंबकादि मंत्र हे योजावेत. एकशे आठ, चौपन्न किंवा सत्तावीस रुद्राक्षांची माला करावी. यापेक्षा कमी रुद्राक्षांची माला करू नये. सत्तावीस रुद्राक्षांची माला गळ्यात घालून जो मनुष्य जप इत्यादि पुण्यकर्म करितो त्याचे ते सर्व कर्म कोटिगुणीत होईल.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP