मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
भोजनविधि २

धर्मसिंधु - भोजनविधि २

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


"रविवार, पौर्णिमा व अमावस्या या दिवशीं रात्रीं भोजन करुं नये, चतुर्दशी व अष्टमी या दिवशीं दिवसा भोजन करुं नये, एकादशीचे दिवशीं अहोरात्र भोजन करुं नये. कारण या दिवशीं असें केलें असतां चांद्रायण करावें असें सांगितलें आहे. जो कोणी हातावर अन्न घेऊन भोजन करितो, जो कोणी उष्ण अन्न फुंकर घालून सेवितो व जो पसरलेल्या अंगुलींनीं भोजन करितो त्याचें तेम भोजन गोमांसभक्षण केल्यासारखें होतें. अजीर्ण झालें असतां किंवा अतिशय भूक लागली असतां तत्काल भोजन करुं नये. ओलें वस्त्र नेसून, मस्तक ओलें ठेवून अथवा पायांवर हात ठेवून भोजन करुं नये. भक्षण करुन राहिलेला शेष ग्रास भक्षूं नये व पाणी पिऊन झाल्यावर भांडयांत राहिलेलें शेष पाणी पिऊं नये. शाक, मूल व फलें इत्यादि पदार्थ दांतांनीं तोडून खाऊं नये. उच्छिष्ट असतां तूप घेऊं नये. पायानें भांडयाला स्पर्श करुं नये. पाणी पीत असतां जर तोंडांतून पात्रांत पाणी पडेल तर तें पात्रांतील अन्न भक्षूं नये. असें अन्न भक्षण केल्यास चांद्रायण प्रायश्चित्त करावें. हाताच्या नखाचा स्पर्श झालेलें व डाव्या हातानें उचललेलें उदक प्राशन केलें असतां सुरापानासारखें आहे. एका पंक्तींत बसून ब्राह्मण भोजन करीत असतां पंक्तींतून जर एखादा उठेल किंवा उतरापोशन घेईल तर इतरांनीं शेष राहिलेलें अन्न भक्षूं नये. या प्रकरणीं उठणारा व भोजन करणारा या दोघांसही दोष आहे. गुरु असेल तर त्याला दोष नाहीं. लवण, (खारट) व्यंजन (चटण्या वगैरे), धृत, तेल (तेलकट), लेह्य (चाटून खाण्याचे), पेय (पिण्याचे), इत्यादि नाना प्रकारचे पदार्थ हातानें दिलेले भक्षण करुं नयेत. तांब्याच्या भांडयांत गाईचें दूध, कांस्याच्या भांडयांत नारळाचें पाणी व उंसाचा रस, गुळ मिसळलेलें दहीं व गुडयुक्त आलें हीं मद्यासारखीं आहेत. सैंधव व समुद्रांत उत्पन्न झालेल्या मिठाशिवाय दुसरें प्रत्यक्ष लवण भक्षण करणें व मृत्तिका भक्षण करणें गोमांसासारखें आहे. भोजन करीत असतां रजस्वला, चांडाल, कुत्रा व कोंबडा हे दृष्टीस पडतील तर तें अन्न टाकावें. भोजन करणाराचा गुदस्त्राव होईल तर त्यानें उपोषण करुन पंचगव्य घ्यावें. आपोशन घेतल्यावर प्राणाहुती घेण्यापूर्वी गुद्स्त्राव झाला तर स्नान करुन सहा प्राणायाम करावेत. भोजन करीत असतां अशौच प्राप्‍त होईल तर तोंडांतील घांस टाकून देऊन स्नान करावें. तोंडातील घांस भक्षिल्यास स्नान करुन उपवास करावा. सर्व अन्न भक्षण केल्यास त्रिरात्र उपोषण करावें. भोजन करित असतां विष्ठा इत्यादिकांचा स्पर्श झाल्यास स्नान करुन तीन प्राणायम करावे. चांडाल, पतित व रजस्वला यांचा शब्द ऐकून भोजन केलें असतां एक उपवास करावा किंवा स्नान करुन शंभर गायत्रीजप करावा. कलह, घरट, उखळ व मुसळ यांचा शब्द होत आहे तोंपर्यंत भोजन करुं नये. "आपल्या आप्‍त जनांच्या बरोबर सुद्धां एका पंक्तीला बसून ब्राह्मणांनीं भोजन करुं नये. कारण कोणाचें काय गुप्‍त पातक असेल तें कोणाला माहीत असणार ? म्हणून शहाण्या पुरुषानें अग्नि, भस्म, स्तंभ, उदक, दरवाजा किंवा मार्ग यांतून कोणत्या तरी एका मार्गानें पंक्तिभेद करावा." केस, मुंग्या व माशा यासहित शिजलेले अन्न टाकूनच द्यावे. पाक झाल्यावर जर केस, मुंग्या, माशा व इतर किडे यांचा स्पर्श अन्नाला होईल अथवा अन्न जर गाय हुंगील तर ते शुद्ध करण्यासाठी उदक, भस्म अथवा मृत्तिका त्यावर टाकावी असे विज्ञानेश्वर म्हणतो. शूद्रान्न, शूद्राने दिलेले ब्राह्मणाकडील अन्न, रात्रीचे शिळे अन्न, रजस्वला, चांडाल व पतित इत्यादिकांनी पाहिलेले अन्न, व कावळे इत्यादि पक्ष्यांचे उच्छिष्ट अन्न भोजन करण्यास अयोग्य आहे. पण तूप व तेल यात तळलेले मांडे, घीवर इत्यादि पदार्थ शिळे असले तरी ग्रहण करावेत. वासरू नसलेली गाय, व्याल्यास दहा दिवस झाले नसलेल्या गाई, म्हशी व शेळी, गर्भिणी, एकांत्रा आड दूध देणारी, जुळे विणारी, स्तनांतून नित्य दूध स्त्रवणारी, बकरी शिवाय द्विस्तनी, उंटीण, घोडी, रानातील हरिणी इत्यादि आणि एडकी यांचे दूध वर्ज्य आहे. शेवगा व हिंग खेरीज करून झाडाचा तांबडा चीक, विष्ठेच्या जागी उगवलेले माठ, तांदुळजा इत्यादि व देवादिकांच्या उद्देशावाचून केलेले मोहनभोग, पायस, अपूप, करंज्या व खिचडी आणि तिलमिश्र ओदन हे पदार्थ वर्ज्य करावे. ताग, कर्डई, दुध्या भोपळा, वांगे, कोरळ, वट इत्यादि फले व माहळुंगे भक्षण करू नयेत. कांदा, लसूण आणि गाजरे भक्षिली असता चांद्रायण करावे. भोजन करीत असता एकमेकांस स्पर्श झाला असता त्या अन्नाचा त्याग करावा. तसे न करिता पात्रातील अन्न भक्षिल्यास स्नान करून एकशे आठ गायत्रीजप करावा. पात्रातील अन्न भक्षून आणखी अन्न भक्षिल्यास स्नान करून हजार गायत्रीजप करावा. भोजन करीत असता अशुचि ब्राह्मणाचा स्पर्श झाल्यास अन्न टाकून द्यावे. भोजनोत्तर उच्छिष्टावस्थेत स्पर्श झाल्यास स्पर्श करणारा आपल्या वर्णातला असेल तर स्नान किंवा जप करावा; पण तो आपल्या वर्णातला नसेल तर उपवास करावा. भोजनोत्तर उच्छिष्टावस्थेत कुत्रा, शूद्र इत्यादिकांचा स्पर्श झाला तर उपोषण करून पंचगव्य प्राशन करावे. रजक (धोबी) इत्यादिकांचा स्पर्श झाल्यास त्रिरात्र व्रत करावे. पात्रावर पदार्थ वाढीत असता उच्छिष्टाचा स्पर्श झाला तर दूध, दही, घृत इत्यादि हलके पदार्थ टाकू नयेत. हातपाय धुवून आचमन केल्याने शुद्ध होतो. भक्ष्य व भोज्य अन्नाचा त्यागच करावा. वस्त्राविषयी विकल्प असे म्हणजे ते टाकावे किंवा टाकू नये. पात्र वाढीत असता स्त्री रजस्वला झाली तर तिचा स्पर्श झालेले अन्न टाकून द्यावे.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP