मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
संक्षेपाने पूजेचा प्रयोग

धर्मसिंधु - संक्षेपाने पूजेचा प्रयोग

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


या ठिकाणी पूजेचा प्रयोग संक्षेपाने सांगतो. विशेष विचार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे प्रसंगी सांगेन. सूर्योदयापूर्वी देवावरील निर्माल्य काढून यथाकाली पूजेचा आरंभ करावा. "येभ्यो माता० एवापित्रे०" हे मंत्र म्हणत घंटानाद करावा. नंतर आचमन व प्राणायाम करून देशकालादिकांचा उच्चार केल्यानंतर "श्रीमहाविष्णुपूजां करिष्ये" असा संकल्प करावा. पंचायतनाची पूजा करणे असेल तर

"श्रीरुद्रविनायक सुर्यशक्तिपरिवृतश्रीमहाविष्णुपूजां करिष्ये"

असा संकल्प करून आसन इत्यादि केल्यावर

"सहस्त्रशीर्षेति षोडशर्चस्य सूक्तस्य नारायणः पुरुषोनुष्टुप्‌अन्त्यात्रिष्टुपन्यासे पूजायां च विनियोगः"

याप्रमाणे न्यास करावा. पहिली ऋचा म्हणून डाव्या हातावर, दुसर्‍या ऋचेने उजव्या हातावर, तिसर्‍या ऋचेने डाव्या पायावर, चवथ्या ऋचेने उजव्या पायावर, पाचव्या ऋचेने डाव्या गुडघ्यावर, सहाव्या ऋचेने उजव्या गुडघ्यावर, सातव्या ऋचेने डाव्या कटीवर, आठव्या ऋचेने उजव्या कटीवर, नवव्या ऋचेने नाभीवर, दहाव्या ऋचेने ह्रदयावर, अकराव्या ऋचेने कंठावर, बाराव्या ऋचेने डाव्या बाहूवर, तेराव्या ऋचेने उजव्या बाहुवर, चवदाव्या ऋचेने मुखावर, पंधराव्या ऋचेने दोन्ही डोळ्यांवर आणि सोळाव्या ऋचेने मस्तकावर याप्रमाणे न्यास करावा. हा न्यास स्वतःच्या देहावर व तसाच देवाच्या मूर्तीवर करावा. पुन्हा शेवटच्या पाच ऋचांनी ह्रदय, मस्तक, शिखा, कवचरूप व अस्त्ररूप न्यास करावा. कलश, शंख व घंटा यांना पाद्य, अर्घ्य, आचमनीय ही अर्पण करावी. नंतर शंखोदकाने आपल्या अंगावर व पूजेच्या पदार्थांवर प्रोक्षण करावे. आपणास इष्ट अशा विष्णुमूर्तीचे ध्यान करून पूजा करावी. पुरुषसूक्ताच्या पहिल्या ऋचेने आवाहन करावे. शालिग्राम इत्यादि देवांचे ठिकाणी आवाहन नसल्यामुळे मंत्रपुष्प अर्पण करावे. प्रत्येक ऋचेचे अंती "श्रीमहाविष्णवे श्रीकृष्णाय" इत्यादि इष्ट मूर्तीच्या नावाचा चतुर्थ्यन्त उद्देश करून सर्व उपचार अर्पण करावे. पंचायतन असेल तर

"श्रीविष्णवे शिवविनायकसूर्यशक्तिभ्यश्च" याप्रमाणे जसे उपास्य दैवत असेल त्याचे नाव आरंभी म्हणून अर्पण करावा. प्रत्येक देवतेला निरनिराळा नैवेद्य नसेल तर एकच नैवेद्य "यथांशतः" असे म्हणून अर्पण करावा. दुसर्‍या ऋचेने आसन द्यावे. तिसर्‍या ऋचेने पाद्य द्यावे. चवथ्या ऋचेने अर्घ्य, पाचव्या ऋचेने आचमन, सहाव्या ऋचेने स्नान ही अर्पण करावी, संभव असेल तर पंचामृतस्नाने "आप्यायस्व०" इत्यादि मंत्रांनी द्यावी. चंदन, वाळा, कापूर, केशर, कृष्णागरु, यांनी सुवासित केलेल्या उदकाने सुवर्णघर्मानुवाक (सुवर्ण घर्म परिवेदवेनं०) महापुरुषविद्या (जितं ते पुण्डरीकाक्ष०, नमस्ते विश्वभावन०), पुरुषसूक्त आणि राजनस (इंद्र नरो नेमधिता हवन्ते०) या मंत्रांनी अभिषेक करावा. सातव्या ऋचेने वस्त्र, आठव्या ऋचेने यज्ञोपवीत, नवव्या ऋचेने गंध, दहाव्या ऋचेने पुष्पे, अकराव्या ऋचेने धूप, बाराव्या ऋचेने दीप ही अर्पण करावी. स्नान, धूप व दीप यांचे ठिकाणी घंटा इत्यादिकांचा नाद करावा. तेराव्या ऋचेने नैवेद्य द्यावा. संभव असेल तर तांबूल, फल, दक्षिना, नीरांजन ही अर्पण करावी. चवदाव्या ऋचेने नमस्कार करावा. पंधराव्या ऋचेने प्रदक्षिणा करून सोळाव्या ऋचेने विसर्जन करावे अथवा पुष्पांजलि वहावी. स्नान, वस्त्र व नैवेद्य ही दिल्यावर आचमनाकरिता उदक द्यावे. नंतर सोळा रुचांनी अन्नाच्या सोळा आहुति हवन करून प्रत्येक ऋचेला एकेक याप्रमाणे सर्व पुरुषसूक्त म्हणून पुष्पे वहावी व पुन्हा पुरुषसूक्ताने स्तुति करावी. नंतर पुराणमंत्रांनी व प्राकृत मंत्रांनी स्तवन करून देवाच्या चरणांवर मस्तक ठेवून दोन्ही हातांनी देवाचे दोन्ही पाय धरावे आणि 'प्रपन्नं पाहिमामीश भीतं मृत्युग्रहार्णवात" अशी प्रार्थना करून नमस्कार करावा. निर्माल्य देवाने दिला अशी भावना करून मस्तकावर धारण करावा. विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले पुष्प मनुष्याने आपल्या मस्तकावर धारण करू नये. शंखोदक शिरावर धारण करून पूजा झाल्यानंतर अथवा वैश्वदेव झाल्यानंतर देवाचे तीर्थ मस्तकावर धारण करावे, व नंतर प्राशन करावे. त्याचा क्रम-ब्राह्मणाचे पादोपक प्राशन केल्यानंतर विष्णुपादोदक प्राशन करावे. शालिग्रामशिलेचे तीर्थ प्राशन केल्यावाचून जो मस्तकी प्रक्षेपण करतो त्याला ब्रह्महत्या केल्याचा दोष लागतो असे म्हणतात. हे तीर्थ दुसर्‍या पात्राने घ्यावे, हाताने कदापि घेऊ नये, असे कमलाकराचे वचन आहे. एकच वस्त्र प्रति दिवशी धुतल्यावर देवाला देण्यास हरकत नाही. सुवर्णादिकांच्या अलंकारासंबंधानेही असेच जाणावे. सुवर्णमय यज्ञोपवीतासंबंधानेही असाच आचार आहे. स्कंदपुराणामध्ये पूजेचे फल याप्रमाणे सांगितले आहे. "काम, क्रोध, इत्यादिकांनी युक्त असताही शालिग्रामशिलेचे अर्चन भक्तीने अथवा अभक्तीनेही कलियुगामध्ये केले असता मुक्ती मिळते. शालिग्रामशिलेचे अग्रभागी जो विष्णूचे स्तवन करतो त्याला यमाचे भय नाही व कलिकालाचेही भय नाही. कलियुगामध्ये हरीचे पादोदक हे सर्व पापांना प्रायश्चित्त आहे. मस्तकी धारण केल्याने अथवा प्राशन केल्याने सर्व देवता संतुष्ट होतात." बौधायनाने सांगितलेला विष्णु व शिव यांचे पूजेचा विधि पराशरमाधवात पहावा. मी शिवपूजेचा विधि दुसर्‍या परिच्छेदामध्ये शिवरात्रीप्रकरणात सांगितला आहे म्हणून या ठिकाणी सांगितला नाही. कूर्मपुराणामध्ये सांगितले आहे-"मोहाने अथवा आलस्याने जो देवतार्चन केल्यावाचून भोजन करतो तो नरकाला जातो व शूकर होतो." याप्रमाणे देवाची पूजा करून मातापितृप्रमुख अशा गुरुजनांचे पूजन करावे. "देवाच्या ठिकाणी जशी दृढ भक्ति असावी तशीच गुरूचे ठिकाणीही असावी" अशी श्रुति आहे असे माधवात सांगितले आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP