श्री दत्तप्रबोध - अध्याय बाविसावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीसद्गुरु दत्तात्रेयाय नमः ॥

अहो जी ज्ञानोदयप्रकाशवंता । हे विभो सद्‌गुरु समर्था । अज्ञान अंधत्व होसी निरसिता । भवभयवारिता होसी तूं ॥१॥

तूं उदार आणि सर्वज्ञ । प्रबोधकर्ता होसी प्राज्ञ । गुणनियंता गुणज्ञ । सुप्रसन्न सुज्ञ वरदाता ॥२॥

वेदांताचा ज्ञान आगरु । सिद्धांतज्ञानें सुफळ सुतरु । अध्यात्मविद्येचा सागरु । परात्परपरु तूं गुरुवर्या ॥३॥

अनन्यभावें तुझिया चरणीं । भाळ अर्पोनी करी विनवणी । मां पाहि तूं कृपालोचनीं । भय निरसोनी अभयं दे ॥४॥

मी अज्ञान तुझें लडिवाळ । तूं सद्‌गुरु माउली स्नेहाळ । अंतरींचे जाणोनि हेतु सकळ । पुरवी आळ साह्यत्वें ॥५॥

कृपेचेनि करोनिया वाणी । तव कथामृतरस वदविजे वाणीं । भरवी आर्थिकाचे निर्वाणीं । गुह्य गीर्वाणीं प्रगटविते ॥६॥

ही नदी न सांभडे पामर । त्यासी तें जाणावया नसे अधिकार । यासाठीं प्रार्थी जोडोनि कर । वदविजे प्रखर प्राकृतीं ॥७॥

या प्रार्थनेसी देऊन मान । अंगीकारिलें बाळभाषण । मूळ आरंभापासून । प्राकृत निरोपण चालविसी ॥८॥

ऐसा तूं दत्त कृपावंत । पुरविसी अनन्याचे मनोरथ । अध्यात्मिक ज्ञान अद्‌भुत । जाणोनि भावार्थ निरोपिसी ॥९॥

गत कथाध्याय अंतीं । पंचभूतांची उत्पत्ति । अवधूत अनसूयेप्रति । भावें निवेदिती यथा क्रमें ॥१०॥

तेथोनि तत्त्वें पंचवीस । पृथकें विस्तारुं विशेष । ऐसें वदतांचि अविनाश । करी प्रश्नास अनसूया ॥११॥

या पंचवीस तत्त्वांचें विंदान । कवण जालें कवणापासून । किती तत्त्वसंख्या प्रमाण । सांगे निवडोन राजसा ॥१२॥

प्रश्न देखोनि नागर । आनंद पावला योगेश्वर । माते तुज निरोपितों विस्तार । साधी आवर ये ठायीं ॥१३॥

माते तुझा प्रश्न हा बरवंटा । योगी साधकां साधवी वाटा । हा तुझा उपकार जनासि मोठा । पाववी पेठा ज्ञानाचिया ॥१४॥

जे आध्यात्मिक ज्ञानाचे आर्थिक । त्यांसी लाभ झाला आवश्यक । त्वां हा मुमुक्षूलागीं देख । ज्ञानदीपक उजळिला ॥१५॥

या प्रकाशें विचारोनि चालती । ते मोक्षधामीं सत्य पावती । तयां नाहींच अधोगती । वाचे किती वदूं आतां ॥१६॥

माते त्वां जो प्रश्न केला । तो भाग निवेदितों तुजला । पंचभूतां पासाव तत्त्वाला । प्रसव जाला कैसा पहा ॥१७॥

एक एकापासोनि जाण । जाले असती पांच गुण । पांच पांचातें पांचीं विस्तारुन । पंचवीस प्रमाण मूळ पांच ॥१८॥

पंचभुतात्म करविला हा पिंड । पुढतीं रचिलेंसे ब्रह्मांड । आतां करुं तत्त्व निवाड । तुझी आवड पुरवावया ॥१९॥

अस्थि आणी मांस । नाडी त्वचा वरी केश । हे पृथ्वीपासाव जाणिजे अंश । गुण विशेष पांच हे ॥२०॥

वीर्य आणि हें रक्त । लाळ मूत्र स्वेद निश्चित । हे पांच गुण यथार्थ । आपीं निभ्रांत जन्मले ॥२१॥

निद्रा आणी मैथुन । क्षुधा तृषा आळस पूर्ण । हे तेजतत्त्वाचे गुण । जाले निर्माण पांच पैं ॥२२॥

चलन वलन आकुंचन । प्रसरण आणी निरोधन । एवं हे पांची उत्पन्न । वायुपासोन असती ॥२३॥

द्वेष आणी भय । क्रोध चौथा लोभ होय । मोहो पांचवा निश्चय । आकाशीं उद या तत्त्वां ॥२४॥

माते तुजलागीं भलें । तत्त्वें पंचवीस निवेदिलें । पांचांचे पृथक भाग दाखविले । वाटे राहिले गर्भींचे ॥२५॥

ते तुंज सांगतो विवरोन । तुवा ऐकिजे सावधान । तत्त्वगर्भींचे तत्त्वज्ञान । ठेवी सांठवोन सांगतो ॥२६॥

पृथ्वीपासोनि पांच जाले । ते भाग कोणाचे कोण वहिले । निवडोनि देतों पाहिजे आकळिले । वांया गेलें न कीजे हें ॥२७॥

रोमभाग आकाशाचा । नाडीभाग तो वायुचा । त्वचा भाग तेजाचा । असे आपाचा मांसभाग ॥२८॥

अस्थिभाग त्या पृथ्वीचा । एवं पर्याय अवनीतत्त्वाचा । आतां सांगतों विस्तार आपाचा । जीवीं साचा वोळखिजे ॥२९॥

वीर्य पाहतां आकाशींचें । लाल अंश त्या वायूचे । रक्त असे तेजाचें । वर्म आपाचें लघवीते ॥३०॥

स्वेद भाव या मेदिनीचा । एवं विस्तारु आपतत्त्वींचा । आतां निवेदितों भाग तेजतत्त्वीचा । घेईं जयाचा उमज देहीं ॥३१॥

आकाशाची निद्रा जाण । वायुस्वभावीं मैथुन । क्षुधातेजीं दैदीप्यमान । तृषाशोषण आपाचें ॥३२॥

पृथ्वी अंगींचा आळस । एवं तेजतत्त्वीं गुणविशेष । आतां निवेदितों वायुतत्त्वास । चंचळ मानस होउं नेदी ॥३३॥

आकाशाचें प्रसरण । वायूचा स्वभाव चंचळपण । तेजाचा स्वभाव गमन । भ्रमलपण आपाचें ॥३४॥

पृथ्वीभाग आकुंचन । एवं पंचभागीं वायुलक्षण । आतां आकाशाचें विंदान । तेंहि निरोपण ऐकिजे ॥३५॥

भयभाग आकाशीं । द्वेषभाग वायूसी । क्रोधभाग हा तेजासी । लोभ आपासी भाग होय ॥३६॥

मोहभाग हा पृथ्वीतें । एवं ओळखी आकाशातें । तत्त्वी तत्त्वें वर्तती मिश्रितें । आपुले स्वभाग ते जाणोनिया ॥३७॥

मूळीं जीं का पंच पृथक भूतें । तीं व्यालीं पंचविसातें । एवं तीस जालीं निरुतें । आणीक सहा त्यांतें मिश्रित ॥३८॥

सहा कोण तूं जरी म्हणसी । तेंहि सांगतों निश्चयेंसी । पूर्वाध्यायीं कथिले आणीं मानसीं । पंच तन्मत्रेसी वोळखिजे ॥३९॥

राजस अहंकारापासून । पंच ज्ञानेंद्रिय जालें निर्माण । पंच कर्मेंद्रिय सुलक्षण । तन्मात्रा जाण तेच ठायीं ॥४०॥

शब्द स्पर्श रुप रस गंध । ह्या पंच मात्रा प्रसिद्ध । एक एक तत्त्वीं नेमिल्या विविध । तयांचे भेद ऐकीजे ॥४१॥

शब्द आकाशीं योजिला । स्पर्श वायुतत्त्वीं भला । तेजीं नेमिले रुपाला । संयोजिला रस आपीं तो ॥४२॥

गंध पृथ्वीचे ठायीं । ऐशीं पांचीं पांच नेमिले पाहीं । यातें वोळखोनि घेइजे देहीं । जाणिजे नवलाई विवेकें ॥४३॥

अवधूत वदे अनसूयेस । पांच व्यालीं पंचवीस । एवं जालीते असती तीस । मात्रा सहांस मेळविले ॥४४॥

पांच मात्रा ह्या मेळवितां । पस्तीस जाले पाहे गणितां । या पस्तिसातें जो प्रसवता । ते तत्त्वतां पाहतां वेगळें ॥४५॥

तें प्रेमतत्त्व आगळें । असे सर्वां होवोनि निराळें । एका सद्‌गुरुवांचोनि न कळे । त्यावांचोनि पांगुळे सर्व तत्त्वे ॥४६॥

तें मूळ जाणिजे सर्वांचें । केवळ गुज आगम निगमाचें । जें निज योगीजनांचें । तें हें साचें सर्वात्मक ॥४७॥

या छ्त्तीस तत्त्वाचा झाडा । करोनि निवेदिला निवाडा । एवं रचिला हा देहो चोखडा । पाहे धडफुडा औट हात ॥४८॥

याचि देहाचे भीतरीं । तत्त्वें नांदती परस्परीं । दश पवन देहामाझारी । आपुले व्यापारीं वर्तर्ती ॥४९॥

तव अनूसया काय बोले । त्वां मज तत्त्वें निवेदिले । तें परिसोनि आनंदलें । चित्त निवाल योगिया ॥५०॥

परि दश पवन जे तूं बोलसी । त्यांचे नाम कार्यं निवेदी मजसी । अवश्य म्हणोनी अविनाशी । निरोपी मातेसी आदरें ॥५१॥

प्राण अपान व्यान । उदान आणि पांचवा समान । हे मुख्य पंच प्राण । याहोनि भिन्न ऐक ते ॥५२॥

नाग कूर्म कृकटासी । जाणिजे देवदत्त धनंजयासी । एवं दशनामें वायूसी । आतां कार्यासी निवेदितों ॥५३॥

प्राण तो हृदयामाजीं वसे । अन्नोदक सांवरीतसें । व्यान स्वाधिष्ठानीं असे । रसशोषें करितसे धातुपुष्टी ॥५४॥

अपान वसे तो गुदस्थळीं । करी मळमूत्राची निर्वाळी । उदान वसे कंठनाळीं । अंतःकाळीं प्रगटे तो ॥५५॥

आतां पांचवा नामें तो समान । तयाचें वसतें नासिकस्थान । तो सकळ नाडींतें व्यापून । समसमान चालवी ॥५६॥

आतां पांच पवन जे राहिले । त्यांचें स्थळकार्य कोण बोलिलें । सांगतों पाहिजे स्वीकारिलें । श्रवणीं चांगलें सांठवी ॥५७॥

नाग वसे तालुकेसी । कूर्म राहे तो नेत्रासी । कृकट असे कर्णासी । विलसे मुखासी देवदत्त ॥५८॥

नासिकीं वसे धनंजय । स्थानयुक्त दाविली सोय । आतां कवणाचें कवण कार्य । तोही निश्चय अवधारीं ॥५९॥

देवदत्ताची ते जांमई । शिंक ते धनंजयाची पाही । कूर्म अवलोकीं नेत्रठायीं । कुकुट तो ऐकवी शब्द श्रवणीं ॥६०॥

तालुके नाग स्वासी । राहोनि लुब्ध तो सुवासीं । सरळत्व साधी जो अभ्यासीं । लाभ तयासी नेटका ॥६१॥

हें वर्म पाहिजे जया नरा । तेणें सद्‌गुरु जोडावा सोयरा । सेवेनें तोषवोंनि दातारा । मग या विचारा वर्मासी ॥६२॥

त्यांसी कृपा उपजतां पोंटीं । मग ते दावितील हातवटी । उल्लंघवोनि या त्रिपुटी । दावितील दृष्टी गुह्य गुज ॥६३॥

अविनाश म्हणे आईक । आणीक सांगतों माते कौतुक । उचकी ढेंकर अंगमोडा अचुक । निरोपणीं निःशंक राहिले ॥६४॥

यास्तव करोनी स्मरण । तुज मी करितों निरोपण । हास्य आणि रुदन । यांचेहि स्थान ऐकिजे ॥६५॥

उदानलिंगापासोन । गुचकी जाली असे निर्माण । उचलोनि प्रगटे स्वाधिष्ठान । जाणिजे खूण विचारणीं ॥६६॥

व्यानलिंगाचे ठायीं । अंगमोडा जन्मला पाहीं । तो उचंबळे सर्वदेहीं । खूण घेईअ वोळखोनि ॥६७॥

प्राणवायोपासाव । या ढेकराचा उद्भव । तृप्ति क्षुधेचा जाणवी भाव । अजीर्ण ठाव स्वाद दावी ॥६८॥

नाभीस्थानीं असे समान । तेथोनि प्रगटे हास्यरुदन । हें सुखदुःखी लाघवपूर्ण । पहां विचारुन विवेकीं ॥६९॥

आणिक एक असे प्रकार । उपप्राणाचा उद्भवविचार । कवणापासोनि कवण निर्धार । तोही सादर परियेसा ॥७०॥

आकाशापासाव कृकट जाला । वायोमाजीं नाग प्रगटला । तेजी कूर्म उद्भवला । आपीं उदेला देवदत्त ॥७१॥

धनंजय पृथ्वीपासोन । ऐसे हे पांचांचे पांच जण । आतां मुख्य प्राणाचें विवरण । तेहि सावधान श्रवण करीं ॥७२॥

वायोपासून वायो जाले । पृथक नामें प्रतिपादले । तत्त्व आश्रयें निवासले । तेहि विवरिल उपवायो ॥७३॥

उपवायों निवेदिले तूतें । आतां निरोपितों मुख्यातें । व्यान योजिला आकाशातें । समानवायोंत नेमिला ॥७४॥

उदान तेजातें योजिला । प्राण जळतत्त्वीं स्थापिला । अपान पृथ्वीतत्त्वीं भला । एवं नेम जाला मुळींचा हा ॥७५॥

मागुतीं बोधिष्णु अत्रिभार्या । सरसावलीसे प्रश्नकार्या । म्हणे अवधूता गुणवर्या । सांगे चातुर्या पुसेन जें ॥७६॥

प्राणतत्त्वाचा विचार । निरोपिला त्वां सविस्तर । आणिक एक भावितें अंतर । ऐके पुरस्कर हेतु माझा ॥७७॥

अवधूत वदे तैं माते । काय म्यां विवंचिलें तूतें । करिसील ज्या ज्या प्रश्नातें निवेदीन मी ते अर्थ तुज ॥७८॥

तुझें श्रोतेपण विशेष । मीही कांहीं नुरवीच लेश । प्रश्नाऐसें उत्तर सुरस । करोनि तव मानस तोषवीन ॥७९॥

निर्भय मनें करी प्रश्नासी । मीही उत्तरें सादर सेवेसीं । हें ऐकोनि अनसूयेसी । सुख मानसीं अपार ॥८०॥

म्हणे पंचतत्वांचें केलें निरुपण । परी नाहीं सांगीतलें आहारवर्ण । घर मुख स्वाद कोण । शस्त्रधारण काय कवणा ॥८१॥

हे श्रवणार्थीं मज गोडी । तरी तूं सांगे करोनि निवडी । तत्त्वें विवरतीं कवणियाप वडीं । नुरवीं आवडी उगवोनि ॥८२॥

तंव अवधुत जोडोनि कर । मातेसी निवेदी प्रश्‍नोत्तर । हा श्रोतियांसी लाभ थोर । तत्वविचार फावला ॥८३॥

आतां तत्वाचा पृथकभाव । निवडोनि दावितों समुदाव । जेणें कल्पने नुरे ठाव । नलगे उगव करावया ॥८४॥

माते पृथ्वीचा पीतवर्ण । काळीज तयाचें वास्तव्यस्थान । मुख तयाचें जिव्हा जाण । आहारसेवन षड्रस ॥८५॥

स्वाद तयाचा गोड मधुर । शस्त्र पाहतां फरश सुंदर । गती षोडश अंगुळें निर्धांर । जाणे प्रकार भूतत्त्वीं ॥८६॥

आपतत्त्वीं वर्ण श्वेत । तळघरीं वास त्या निश्चित । मुख इंद्रिय शोभत । आहारीं रत काममाने ॥८७॥

स्वादपाहतां जेवीं क्षीरीं । वाणी शस्त्र पाहतां सुरी । गती तया अंगुळें चारी । बावरे बाहेरी जीवनतत्त्व ॥८८॥

तेज रक्तवर्ण तें असे । हृदयीं पितृगृहींच वसे । नयन त्याचें मुख विलसे । देखणें भासे भक्ष्य त्या ॥८९॥

स्वाद तयाचा असे तीक्ष्ण । भाला शस्त्र विराजमान । प्रवाह अष्ट अंगुळें पूर्ण । जाणिजे प्रमाण तेजतत्त्वीं ॥९०॥

वायो नीलवर्ण सुंदर । फुफ्फुस तयाचें जाणिजे घर । मुख नासिक मनोहर । परिमळ आहार सेवनीं ॥९१॥

स्वाद तयाचा आंबट । खड्‌ग शस्त्र तया सुभट । द्वादश अंगुळ बरवंट । वावरे चोखट वायुतत्त्व ॥९२॥

कृष्णवर्ण आकाशाचा । चुनाळु ठाव त्या वस्तीचा । श्रवण मुखीं आहार शब्दाचा । स्वाद तयाचा कडवट ॥९३॥

शस्त्र तयाचें सतेज बाण । वीस अंगुळें गति प्रमाण । ऐसी आकशतत्त्वाची खूण । घ्यावी वोळखून बरवी हे ॥९४॥

हें तत्वज्ञान धन योगियाचें । लाधतील ते पुरुष दैवाचे । जे दास सत्य सद्‌गुरुचे । ते वर्म साचें जाणती ॥९५॥

ज्याचीं साधनें शुद्ध नेटकी । गुरुकृपा संपादी निकी । तया लोभे पवन वोळखी । होय सुखी तत्वज्ञानें ॥९६॥

हा ज्ञान जयां नाहीं । तो पशूच जन्मला नरदेहीं । लाभ न लाभेचि कांहीं । बुडतो भवडोहीं व्यर्थची ॥९७॥

काय म्हणावें तया खरा । केला नरजन्माचा मातेरा । विषयीं लुब्धोनि सैरा । जाय निगुरा नरकवासा ॥९८॥

विषयसुखातें भुलती । अहं मदें रेडे माजती । भेद अभेद उरीं वाहती । निंदा करती द्वेष बहु ॥९९॥

संत साधु गुरु देव । या सेवनीं ज्या अभाव । भोगी संपत्ति विषय वैभव । तया महोत्सव यमलोकीं ॥१००॥

तो या ज्ञानाचा न सेवी भागी । केलें कर्म तैसेंचि भोगी । नरककिडा नरकसंगीं । सुरसरंगीं रंगेना ॥१०१॥

मुक्ताफळ नावडे वायसा । तयाची प्रीति राजहंसा । भ्रमर न सेविती कुश्चळ रसा । आमोद फारसा आवडेना ॥२॥

जे सभाग्य ज्ञानी चतुर । ते अध्यात्मविद्येचें जाणती सार । नित्य ध्यानीं आणिती विचार । वस्तुपरात्पर धुंडिती ॥३॥

माते तुझी धन्य आवडी । घेसी आध्यात्मिकाची गोडी । येणें पावसी परात्पर थडी । जन्म सांकडी कैंची तुज ॥४॥

नरदहो हा दुर्लभ जाण । येथेंचि छेदितां छेदे अज्ञान । अध्यात्मविचारीं साधिजे साधन । घेइजे विचारुन गुरुमुखें ॥५॥

अध्यात्मज्ञान म्हणती कासया । पढिजे तत्त्वज्ञान व्हावया । तत्त्वाचे मूळतत्त्वीं पावावया । साधिजे उपाया आधीं आधीं ॥६॥

मूळ तत्त्व साधितां करोनि उपाय । मग ते टळती सर्व अपाय । यासाठीं धरिजे सद्‌गुरुपाय । वारील भय तो स्वामी ॥७॥

शरण जातां सद्‌गुरुसी । भय वारोनि देईल अभयासी । पद भेटवील अविनाशी । मीतूंपणासी हारपवी ॥८॥

हरपतांची मीतूंपण । अवघेंचि होईल चैतन्यघन । ब्रह्मानंदीं होय निमग्न । द्वैतपण मावळे पैं ॥९॥

सरतां द्वैताची काहाणी । अद्वय ठासावेल पूर्णपणीं । मग स्वानंद भोगिजे आत्मभुवनीं । सर्वात्मक धणी पावेल ॥१०॥

तंव अनसूया म्हणे सज्ञाना । निंबलोण करुं तुझीया गुणा । चळविलें माझिया चंचळ मना । जडविली भावना श्रवणार्थीं ॥११॥

तुझें निरुपण ऐकतां । जीवीं पावली सुख समता । मायिक सांडविसी वार्ता । सावध भ्रांता त्वां केलें ॥१२॥

मोहो माया दुर्धर दरी । निबिड अज्ञानदशेचे अंधारीम । पहुडोनि लोभशय्येवरी । भ्रमित अघोरी गर्त निद्रे ॥१३॥

तंव तेथें सहा तस्कर । फोडित होते माझें घर । हें पाहती आप्तवर्ग दावेदार । मिळाले समग्र चोराकड ॥१४॥

सर्व मिळोनी एकवटले । घर फोडोनि आंत शिरले । येवोनि माते पूर्ण वेढिलें । मोहोनि केलें जडरुप ॥१५॥

ती अष्टशक्तीची मोहिनी । तिनें व्यापिलें मजलागोनी । जागृतीं नये लोचनीं । होय हानी दिसेना ॥१६॥

स्वकर्मसूत्रें पावलें बंधन । सर्वापरी होतसे हान । हें सत्पुत्रा त्वां विलोकोन । आलासि धांवोन सदयत्वें ॥१७॥

ज्ञानशस्त्र घेवोनि करीं । विवेके पिटविले शत्‍रु दूरी । बोध ठसवोनि अंतरीं । सावध सत्वरीं केलें मज ॥१८॥

अनुताप बाणाविला साच । लेवविलें वैराग्यकवच । तोडोनि मायिक विषयकाच । फेडिलें अशौच भ्रांतीचें ॥१९॥

आध्यात्मिक हा दिव्य रस । नेमिला व्हावया मज निर्दोष । तो प्रेमपात्रीं लावोनि सुखास । पाजुनी दुःखास निवटिसी ॥१२०॥

दुःख निवटूनि सुख द्यावें । जन्मरणापासोनि सोडवावें । अविनाशपदीं मिळवावें । इच्छिलें जीवें तुझिया ॥२१॥

सदय उदार तूं ब्रह्मवासी । कळवळा बहु तव मानसीं । दीनें करावीं आपणाऐसीं । सकळ जगतासी उद्धरावें ॥२२॥

तूं निरालंब निर्विकार । निष्कलंक निरहंकार । तूं चिद्धनवस्तु सर्वेश्वर । निर्विकल्प निराधार निरंजन ॥२३॥

तो तूं गा साकार होसी । त्रिगुणात्मक अवतार दाविसी । हा जगदोद्धार करावयासी । प्रगट होसी पुत्रत्वें ॥२४॥

म्यां तूंतें गा वोळखिलें । ज्ञानरहणीवरोनि जाणितलें । कर्तृत्वशक्तीतें पाहिलें । बोधीं पावलें आनंद मन ॥२५॥

तुजलागीं पुत्र म्हणतां । लाज उद्भवे माझिया चित्ता । तूं भवतारक होसी दाता । निमित्त योग्यता मज देंसी ॥२६॥

तंव अवधूत म्हणे माउली । ऐसी काय बोलसी बोली । अद्‌भुत तव कृपेची नव्हाळी । देहीं प्रज्वाळिली ज्ञानज्योति ॥२७॥

तुझिया कृपाबळें करुन । मज प्राप्त जालें सर्व ज्ञान । तें तूं बाळमुखें करुन । करिसी श्रवण प्रीतीनें ॥२८॥

ज्याचें त्यासी निवेदितां । कोण अधिक ते योग्यता । अहंता मानी हे अर्भकता । तेवीं माता नोव्हे मी गे ॥२९॥

माता पिताची मज गुरु । मज त्या कृपेचा आधारु । तुम्ही दाविला जो ज्ञानसागरु । केला अंगीकारु सांठविला ॥१३०॥

सांठविला या हृदयसंधीं । त्यातें रक्षी जीवीं सद्‌बुद्धी । विविकें लागू नेदी उपाधी । आधिव्याधि छेदक हे ॥३१॥

तुमचें ठेविक आहे हें धन । रक्षी या प्रासादिक म्हणोन । तुम्ही मागतां मजलागोन । संकट कोण तुम्हां देतां ॥३२॥

इतर धन घेतां देतां । सरोनि रिक्त उभयतां । हें तैसें नोव्हे पाहतां । न सरे वेचितां कल्पांतीं ॥३३॥

ठेविल्या ठायींचें जाईना । उणें वेंचितां होईना । घेत्याचेंही सरेना । आवरितां आवरेना विस्तारें ॥३४॥

विटेना मळेना सतेज । अंगीकारितां पावे गुज । पुरवी आवडीचें चोज । भेटवी निज नेटकेंची ॥३५॥

परिसोनि अविनाशवाणी । अनसूया अंतरीं संतोष मानी । उद्गार उदेला प्रश्न मनीं । वदे वचनीं ऐक म्हणे ॥३६॥

उदयो सांगितला तत्त्वाचा । विस्तारु निवेदिला त्याचा । ऐक्यव्यवहार सर्वांचा । वर्णादि वाचा निवेदिली ॥३७॥

परी आणिक कांहीं पुसावें । ऐसें इच्छिलें माझिया जीवें । तें आदरोनि निवेदावें । पूर्ण करावे हेतु माझे ॥३८॥

हें तत्त्वरुपें साकारलें । हें कोण गुणापासाव काय जालें । तें पाहिजे मज कळविलें । अवश्य बोले अवधूत ॥३९॥

मुख्य जो का तमोगुण । तेथोनि पंचमहातत्त्वें निर्माण । पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । हें नामाभिधान तयांचे ॥१४०॥

आतां रजोगुणाचा प्रकार । तोही ऐकें विस्तार । शब्द स्पर्श रुप मनोहर । रस गंध निर्धार विषय पंच ॥४१॥

सत्त्वगुणापासाव शुद्ध । बाहु पाणी आणी पाद । उपस्थ पांचवें गुद । निवेदिलें विविध करोनिया ॥४२॥

आतां समष्टीचे कोण । ते तूं ऐकें सावधान । श्रोत्र त्वक्‌ आणि नयन । जिव्हा घ्राण पांचवें ॥४३॥

अत्यंत निखिल जें सत्त्व । सर्वां वरिष्ठ या महत्त्व । जया अंगीं असे शुद्धत्व । त्रिमात्रत्व प्रणवोक्त ॥४४॥

तयापासोनि अंतःकरण । मनबुद्धि चित्त जाण । पांचवा अहंकार निर्माण । जाणिजे खूण ऐसी हे ॥४५॥

हे पिंडब्रह्मांडी वार्ता । समत्वें निवेदिली आतां । देखुनी तुझी अर्थता । जालों पुरविता हेतु तैसे ॥४६॥

तंव ती पतिव्रता शिरोमणी । बोलती जाली मधुर वचनी । बा रे योगिया चूडामणी । पुरविसी अयनी इच्छिली जे ॥४७॥

सहज तूं बोलसी बोल । तेणें येती सुखाची डोल । वाढतांचि होय प्रश्नवेल । उत्तर सुफळ तुझेनी ॥४८॥

पिंडब्रह्मांडींची वार्ता एक । ऐकोनि संशय उद्भवला देख । तो संदेह फिटावया आवश्यक । प्रश्न चोख अवधारीं ॥४९॥

पिंडी वृद्धी कैसी कोठून । केवीं होय ब्रह्मांडसमान । कैसें आणिलें ऐक्यपण । आचंबित मन होतसे ॥१५०॥

केव्हडा ब्रह्मांडाचा विस्तार । पिंड पाहतां औटकर । मुंगी पोटीं साठवे सागर । नवल थोर मज वाटे ॥५१॥

ऐकोनि मातेच्या वचनासी । गद्गदा हांसे अविनाशी । केव्हडें आश्चर्य माते तुजसी । मन संशयासी पावलें ॥५२॥

तया संशयाचें निरसन । श्रीगुरुकृपें सत्य करीन । त्वांही वृत्ति राखिजे सावधान । श्रवणीं मन ठेविजे ॥५३॥

गुरु दत्तदया सागर । सिद्ध साधु योग्यांचे माहेर । सर्वेंद्र हा होय उदार । घीर गंभीर मोक्षदानी ॥५४॥

अवधूत योगियांचा राणा । होय संतांची उपासना । दत्त विश्रांतीचा ठिकाणा । संतसज्जनांवांचोनि नसे ॥५५॥

जया दत्तभेटीची आस । शरण जावें या संतांस । नित्य सेवोनि त्या चरणांस । म्हणवोनि दास पडावें ॥५६॥

संतकृपा होताचि जाण । घडविती दत्ताचें दर्शन । हें वर्म हृदयीं धरोन । अनन्य शरण अनंतसुत ॥५७॥

सप्रेम सुताचा देखोनि भाव । कृपें साहित्य पुरविती अपूर्व । आध्यात्मिक बोल अभिनव । दत्तलाघव प्रबोधपर ॥५८॥

पुढील प्रसंगीं रसभरित । प्रश्नोत्तर वदेल अवधूत । तें तुम्ही स्वीकारा गोड बहुत । गर्भस्थित गुह्य गोष्टी ॥५९॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । नारदपद्मपुराणींचें संमत । श्रोते परिसोत संतमहंत । अध्याय अद्‌भुत बाविसावा ॥१६०॥

॥ इति द्वाविंशतितमोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP