श्री दत्तप्रबोध - अध्याय आठवा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


श्रीसद्‌गुरुदत्तात्रेयाय नमः ॥

ॐ नमो अविनाश निर्गुणा । विमळरूपा सनातना । मायातीता निरंजना । शुद्ध चिद्धना नमो तुज ॥१॥

तू निखिल ब्रह्म निराकार । अहं ब्रह्मास्मि उद्गार । मायानियंता प्रभाकर । सगुणांकुर तेथे तू ॥२॥

सगुणस्वरूपत्व जे माया । ते तू होसी गा निरामया । कल्पनी आड प्रसवोनिया । गुणत्रया उभारिसी ॥३॥

सशक्तीक निर्मोन । ऐक्यभावा युक्त करून । पृथके कार्य आज्ञापून । द्विभागी आपण मिश्रित ॥४॥

तीन दोन मिश्री ते पाच । हे कौत्क दावावया साच । एक एकाचे पुनरा पाच । एवं संच पंचविसा ॥५॥

पुनरा पांचा करोनि मंथन । विषभाग काढिला निवडोन । भाग पांचा नामाभिधान । वेगळे लक्षण ठेविले ॥६॥

पंचवीस पा केले तीस । स्वभागे मिळवी एकास । एकूण केली छत्तीस । खेळ विशेष रचिला हा ॥७॥

एवं उभारिले ऐसे भूत । दहा संस्थापिले त्यांत । दशद्वारे जे नेमित । रुद्र वस्तीत वेगळे ॥८॥

दश नाद दश भेद । एकादशावे पृथक प्रसिद्ध । हे भेदातीत अभेद । साधु सिद्ध जाणती त्या ॥९॥

ते तू सकळंचे जीवन । व्यापक साक्षीरूपे पूर्ण । तुज जाणावया आंगवण । न बाणे खुण आगमनिगमा ॥१०॥

त्वांचि हे भूत उभारिले । भूत भूतातेचि प्रसवविले । अनेकत्वे विस्तारिले । एवं रचिले ब्रह्मांडे ॥११॥

अनंत ब्रह्माडांची माळा । याचा सुत्रधारी तू वेगळ । खेळ खेळवोनि निराळा । न कळे कळा कवणासी ॥१२॥

तू सकळांसी अगोचर । तुझा न कळे कोणा पार । शिणले श्रुतीचे जिव्हार । थकित फणीवर सहस्त्रमुखी ॥१३॥

तेथे अल्पमती मी हीन । केउते वर्णूं मी तुझे गुण । म्हणोनिया विनय होऊन । करी नमन पायांसी ॥१४॥

वर्णनीय करावी सेवा । हासी वसा लागला जीवा । तरि कृपा करोनि देवाधिदेवा । हेतु पुरावा दीनाचा ॥१५॥

एवढा उपक्रम करितां । आळस न करिसी सद्गुरुनाथा । सुताचा हेतु केउता । पूर्ण करितां तुम्हांस ॥१६॥

पूर्ण कृपेचे देता दान । मग ते न पडे कदा न्यून । यासाठी प्रीति करून । वंदी चरण विनयत्वे ॥१७॥

मागे तुजे त्वांच बोलविले । निरूपण रसाळ चालविले । पुढेहि पाहिजे सांभाळिले । कृपाबळे आपुल्या ॥१८॥

गतकथाध्यायी वरदान । देवोनि देव पावले स्वर्गभुवन । कैलासी करोनिया शिवार्चन । विधि स्थापन सत्यलोकी ॥१९॥

तेथे विष्णूने शिवासी । विचारिले जातो वैकुंठासी । आपण जावे स्वस्थळासी । लोभ मानसी असू द्या ॥२०॥

शिव म्हणे एकटे जावे । हे काय तुम्हासी बरवे । हरि म्हणे तुम्हां शीण द्यावे । काय करावे ऐसे पैं ॥२१॥

मागुती बोले उमावर । काय असे तो क्षीरसागर । म्हणोनि रहावे उगेचि दूर । हे तो वैकुंठपुर असे की ॥२२॥

हे मागिले अध्यायी संपले । ते श्रोतेजनी अवधारिले । पुढे सद्गुरुकृपे जे चाले । ते श्रवण केले पाहिजे ॥२३॥

शिवदेवाची आवडी देखोन । विनोदे बोले नारायण । ते चमत्कारिक वचन । करा श्रवण सकळही ॥२४॥

अहो या भूलोकाचे ठायी । नाना आचरणे करिती पाही । जैसी ज्याची कमाई । तैसेचि ठाई ते पावती ॥२५॥

अहो जी शिवा चंद्रमौळी । हे माझिया बोलाची नव्हाळी । तुम्ही साठविजे ह्रदयकमळी । इतर सकळ ऐकिजे ॥२६॥

कोण्ही भाविक भक्त जाण । प्रेमे करिती लिंगार्चन । कोणी राजोपचारे करोन । कोण्ही साधारण पंचोपचारी ॥२७॥

कोणी करिती प्रदोषव्रत । कोणी सोमवाराते आचरत । कोणी शिवरात्री नेमयुक्त । कोणी व्रतस्थ निराहारी ॥२८॥

कोणी उपासना अनुष्ठानी । कोणी बैसले जपध्यानी । कोणी आहारविहाराते करोनी । कोणी भजनी निवटले ॥२९॥

कोणी शिवा तुजसाठी । भोगिती नाना दुःख कचाटी । कोणी द्विज भोजनाच्या पाठी । कोणी हठी दिगंबर ॥३०॥

ऐसे बहुविधा करिती आचरण । हेही त्रिगुणात्मके पृथक पूर्ण । परि उभय भाग पडती निवडोन । सकाम लक्षण निष्काम ॥३१॥

सकामिका प्रसन्न होसी । गुणाऐसी फळे देसी । देता काही न विचारिसी । भोळा होसी शंकर ॥३२॥

जये निष्कामे दयाळा । तुज अर्चिले जाश्वनीळा । तयाचा करिसी बहुत सोहळा । अमृतफळा अर्पिसी ॥३३॥

कोणा करिसी कैलासवास । कोणासु दिसी कंठमाळिकेस । कोणा देसी स्वरूपतेस । इच्छित आस पुरविसी ॥३४॥

तेवीच ब्रह्मार्चनी जे जन । तया सत्यलोकीचे सन्मान । जे करिती यज्ञदान । संतर्पण बहुसाल ॥३५॥

षोडशोपचारे द्विजा अर्चिती । उत्तम उपभोगादि अर्पिती । घाट देवालये बांधिती । देव पुजिती सोपस्कार ॥३६॥

धर्मशाळा अन्नसत्रे । गोभूरत्ने दाने विचित्रे । नानारसादि तिलपात्रे । वहने छत्रे शिबिरे ॥३७॥

नाना अलंकार धातू । अग्र आहार द्विजा देतू । वस्त्रे भूषणे विख्यात । प्रीती अर्पितू ग्रामक्षेत्रे ॥३८॥

सदावर्ते ऋतुसेवने । आसने वसने शय्यासने । नाना धान्य आणि धनें । उपायने सुंदर ॥३९॥

कूप बारवा विहिरी । छाया शाळा नानापरी । विद्याग्रंथ कळा कुसरी । दाने करी विविध ते ॥४०॥

ऐसिया अनंतदाना । देवोनि तोषवी द्विजगणा । काही लौकिकसंबंधी अर्चना । तीर्थ क्षेत्रे उपासना यात्रा करी ॥४१॥

ऐसे पुण्य आचरता । मग येतसे तो स्वर्गपंथा । अमर होय सत्कारिता । सुख संतोषता दे तया ॥४२॥

भागाऐसे भोग देती । किर्ति तोवरीच राखिती । ते सरता लाटोनि देती । जन्म पावती भूलोकी ॥४३॥

त्रिगुणात्मके पुण्यराशी । फळेहि भोगविती तयाऐसी । राज्यवैभव संपत्तीसी दारा कलत्रासी कर्माऐसे ॥४४॥

तेवीच सूर्यउपासक । तयासी प्राप्त भानुलोक । पुण्य सरता आवश्यक जन्मा अचूक घालिती ॥४५॥

ऐसेची ते शाक्त जाणा । करिती शक्तीची उपासना । भक्ष-अभक्ष नाना । मदिरापाना करिताती ॥४६॥

पात्रापुढे ठेवोनि पात्र । रजनी पूजा करिती विचित्र । मांस मदिरा अपवित्र । प्रसाद पवित्र म्हणती त्या ॥४७॥

शक्तिमंत्रे करिती हवन । उत्तम वाममार्ग ऐसे म्हणोन । आवडीने करिती सेवन । म्हणती पावन आम्ही झालो ॥४८॥

प्रसंगी येऊ न देती कोणासी । आलिया बलात्कार करिती त्यासी । कुश्चळ कर्म करोनि वेगेसी । शेखी परासी पै भीती ॥४९॥

मांस मदिरे भरिती पोट । कदा कोठे न करिती बोभाट । म्हणती जगामाजी श्रेष्ठ । भाग्य वरिष्ठ आमुचे ॥५०॥

अनाचारी पाप समूळ । आचरती ऐसे ते चांडाळ । तयांचे पहाता मुखकमळ । करावे तत्काळ सचैलाते ॥५१॥

ऐसिया नरा जेथे वस्ती । तेथे पापाचे पर्वत निश्चिती । त्यासी नाही स्वर्गप्राप्ती । जन्मपंक्ती अघोर ॥५२॥

शाक्त नोव्हेत हे गधडे । अभिमानेंचि माजले रेडे । मांस भक्षणाच्या सुरवाडे । वाम निवाडे आचरती ॥५३॥

कोण वाम कैसा प्रकार । कोण फळ काय चमत्कार । हा तो नेणतीच विचार । जगी अनाचार भ्रष्टविती ॥५४॥

तया न चुके गर्भवास । अंती जाती अघोरास । सुटका नोव्हेचि तयांस । तुमचिया पदास यावया ॥५५॥

ज्या ज्या दैवता भजावे । त्या त्या लोकाप्रती जावे । पुण्य सरता फिरोनी यावे । जन्म भोगावे जीवांनी ॥५६॥

पुण्ये करोनि स्वर्गा येती । तुमचे पदी सुख भोगिती । पुण्य सरता जन्मा जाती । न सुटे पंक्ति त्यांच्या ॥५७॥

जे का अधर्मीपापीजन । तेही न राहती भूलोकी पुर्ण । तयालागी स्वर्गभूवन । प्राप्त मान होतसे ॥५८॥

स्वर्गाचे पैल हा यमलोक । येथे जीव येती आवश्यक । अंशावाचोनि तोही देख । न मिळे दुःख तेथीचे ॥५९॥

तया अंशाचा प्रकार । अल्पचि कथितो निर्धार । सांगू जाता विस्तार । होईल उशीर आपणाते ॥६०॥

स्वकर्माते निंदिती । परधर्माते आचरती । दुष्ट कर्मी पापमती । निंदा करिती परांचि ॥६१॥

गुरुद्रोह करी जार । पितृदोह करी पामर । कपटी घातक थोर । अनाचार दाहक ॥६२॥

वृत्ति भूमि उच्छेद । रिक्त वाढविणे उगेची द्वंद्व । भोजनी करणे प्रपंच भेद । रिक्त अपवाद असत्यता ॥६३॥

देवागार मंदिरभंग । कथापुराण विघडी रंग । नाच भोरपी होणे दंग । ह्रदयभाग दयाहीन ॥६४॥

जारण-मारण उच्चाटण । यंत्र मंत्र मोहनस्तभन । घात पात विलक्षण । दिवा मैथुन आवश्यके ॥६६॥

कन्याविक्रय रसविक्रय । भाबड्यासी दाखवी भय । स्त्री बाळ गुरुहत्यारा होय । अभक्ष खाय चांडाळ जो ॥६७॥

अविश्वासी विश्वासघातक । प्रसाद लिंगभंग करी देख । मार्गघ्न विपटपाडक । पीडक धाडक मारक जो ॥६८॥

सत्कर्मी करी विक्षेप । साधुसंतांसी दे ताप । जीवजंतूंचे कोंडी आप । दे संताप वडिलवृद्धां ॥६९॥

ऐसे जया गाठी असे धन । तो जाय यमपुरीलागोन । तेथील संस्कार भोग भोगून । भूलोकी पतन तया घडे ॥७०॥

जैसे जया धन गाठी । तैसीच तया जन्मराहाटी । न सुटे कर्म लागले पाठी । घोटाघोटी घोटवी ॥७१॥

पुण्य करोनि सुख भोगावे । पापे करोनि दुःखी फिरावे । परी जीवन्मुक्त व्हावे । ऐसे ठावे न पडेची ॥७२॥

ऐशीच लोकलोकांची गती । पुण्यपापे सर्व भोगिती । परी चुकवावया पुनरावृत्ती । उभयप्रती न दिसे ॥७३॥

हे सर्व लोकांचे कारण । तुम्हा सर्वा केले निरूपण । आता आमुचे प्रकरण । तेही निवडून सांगतो ॥७४॥

जे माझिया उदेसी । चटक लागली जयांसी । तयांची आचरणे कैसी । सांगतो तुम्हांसी ऐकिजे ॥७५॥

निस्पृह निःसंग निर्द्वंद । नैराश्ययोगे माझे वृंद । वृत्तिशुद्ध भूती अभेद । करिती अनुवाद ज्ञानचर्चा ॥७६॥

कोणी भोळे भाविक असती । कोणी वीतरागयोगे फिरती । जे जे कर्म करिती । मज यजिती सर्व भावे ॥७७॥

करिती आवडी कथाकीर्तने । अर्चने वंदने पादसेवने । मत्कथामृतांची श्रवणे । आत्मनिवेदने साधिती ॥७८॥

कोणी राहिले करोनि भजन । कोणी सख्यत्वयोगे विनटले पूर्ण । कोणी दास्यत्व राहिले करून । मनन ध्यान वेगळेची ॥७९॥

दिंड्या पताका उभविती । ढोल दमामे लाविती । टाळ विणे मृदंग वाजविती । छंदे नाचती गाती गीत ॥८०॥

परम आल्हादे करून । टाळिया चुटक्याते वाजवून । मद्रूपी होवोनि तल्लीन । देहभान विसरती ॥८१॥

आत्मत्वाचा करिती विचार । जाणोनि घेती सारासार । काम क्रोध मद मत्सर । दंभ अहंकार दवडिती ॥८२॥

ज्ञानचर्चे भरविती गुजरी । कैची तेथे पापा उरी । दिवानिशी नामगजरी । उठती लहरी प्रेमाच्या ॥८३॥

कित्येक करिती जप अनुष्ठान । आवडी आरंभिती स्तोत्रपठण । मदर्थी उपावसघन । करिती आचरण सप्रेमे ॥८४॥

सर्वां भूती धरोनि भाव । पूजोनि म्हणती हा देव । निष्ठा भक्ती अनन्य द्रव । सतले वैष्णव परम प्रीती ॥८५॥

जागृती स्वप्न सुषुप्ती । मजची भावे ते भजती । सगुणमूर्ति उपासिती । निर्गुणी निरखिती कित्येक ॥८६॥

सर्वस्व माते अर्पिले । आपण लडिवाळपणे राहिले । मातेचि तेणे बोभाइले । तैसेचि आले होणे मज ॥८७॥

त्याचे सर्व मजचि जाणणे । नाना रूपे अवतार धरणे । संकट तयाचे निवारणे । छाया करणे स्वआंगे ॥८८॥

तेणे प्रेमसूत्रे बांधिले मजसी । नाचविल्या ऐसे नाचणे निश्चयेसी । भुललो तयाच्या भक्तिसी । न सांगता आम्हासी जाणाणे ॥८९॥

सकळांमाजी थोर । मम वैष्णवाचा अधिकार । तो मुखे वर्णी मी मुरार । तुम्हासमोर परिसा ते ॥९०॥

हे जगतीची तीर्थे सकळ । पातके भरित होती विपुल । ते वंदिती संतचरणकमळ । तै निर्मळ होती ते ॥९१॥

जीव आचरे अनंत दोषराशी । प्रायश्चित्ते नेमिली त्यासी । तो सहज भेटला वैष्णवासी । ठाव दोषासी नुरे मग ॥९२॥

कृपे तयाते अंगिकारिता । नतची होणे आले प्रायश्चिता । राहिली त्याची योग्यता । वैष्णव सत्ता आअळी ॥९३॥

यम तयाचा होवोनि किंकर । जोडोनि राहे सदा कर । म्हणे वैष्णव हे अनिवार । आमुचा व्यवहार खुंटविला ॥९४॥

देखोनि तयाची योग्यता । दूतासी होय आज्ञापिता । तुम्ही न कीजे यथे सत्ता । जेथे हरिकथा नामघोष ॥९५॥

वैष्णव राहती जये स्थळासी । नका जाऊ तये सीवेसी । मृत्यूसी म्हणे कीर्तनरसी । तुवा जीवासी नाणिजे ॥९६॥

आणिक एक नवलाव । तोही निवेदितो अपूर्व । श्रवण करा तुम्ही सर्व । अघटित वैभव संतांचे ॥९७॥

प्राणी आचरे पाप अपार । मर्यादेहूनि अतिथोर । न करवे प्रायश्चित्तासी अंगीकार । परम दुर्धर म्हणवोनी ॥९८॥

तीर्थी जो निवडोनी सांडिला । देवक्षेत्रांणी मोकलिल । महातपोधनी दवडिला । पहा तयाला दूरी हो ॥९९॥

ऐसा जो पाप्यांचा शिरोमणी । जया ठाव नेदीच मेदिनी । तो लागतांचि संतचरणी । होय धुनी पापाची ॥१००॥

संती करिता अंगीकार । तो मज मान्य होय निर्धार । हे वैष्णव मजहोनि थोर । प्राणप्रियकर मी मानी ॥१॥

हरि म्हणे उमापती । ऐसी मद्भक्ताची हे ख्याती । मी प्रसन्न तया होवोनी श्रीपती । देतो प्रीती बहुएक ॥२॥

संतति संपत्ति धन । भोग वैभव ऐश्वर्य पूर्ण । परी ते वैराग्यसंपन्न । देती लोटून परतेची ॥३॥

सिद्धी ऋद्धी देता त्यासी । आणि तया भुक्तिमुक्तीसी । ते अनिवार नेघे तयासी । हाणोनि लातेसी दवडिती ॥४॥

मेदिनिचे राज्य देता । ते नयेचि तयांच्या चित्ता । नामभजनी सप्रेमता । न इच्छिती परता लाभ दुजा ॥५॥

ऐसे तया देखोनि उदास । सदय मी तया जगन्निवास । विमाने पाठवोनि वैकुंठास । आणवि तयांस प्रीतीने ॥६॥

देवोनि तयांसी आलिंगन । सलोक समीप स्वरूप सायुज्यपण । हे तयाते करोनि अर्पण । वैकुंठभुवन वसविले ॥७॥

चारी मुक्ति नावडे ज्यासी । ह्रदयी साठवी मी तयास । परी मागुती जन्मासी । भूलोकांसी न धाडी ॥८॥

माझे चरण सुखे सुखावले । ते मजमाजीच समावले । न करी तया आपणावेगळे । जळी विराले सैंधव जैसे ॥९॥

चारी मुक्तीस झाले पावन । ते हीन जाती मज सांडोन । मी न दवडी तयालागून । पतितपावन यासाठी ॥११०॥

शिवा जे वैकुंठासी आले । कोणीच नाही परतले । मीच होवोनि जरी धाडिले । पुन्हा आणिले म्या स्वपदासी ॥११॥

पुण्यराशी आचरोन । पावती तुमच्या पदा येवोन । परी न चुके त्यांचे जन्ममरण । वैकुंठस्थान ऐसे नोव्हे ॥१२॥

आपण येऊ म्हणता वैकुंठासी । आणि आम्हीन्यावे तुम्हांसी । आश्चर्य वाटे मम चित्तासी । शिवा मानसी विचारिजे ॥१३॥

तेथे येवोनि परतता । दुःख वाटे माझिया चित्ता । तव शिव झाला हास्य करिता । बरवा अनंता तू होसी ॥१४॥

हे लोकालोक कासया वसविले । पदे का विभक्त स्थापिले । वैकुंठची का नाडी केले । आम्हा चांगले सर्वांशी ॥१५॥

ही सर्व तुझीच गा सत्ता । अनेक लीला तुझीच अनंता । आम्हा बोल कासया देता । कर्ता करविता तूचि पै ॥१६॥

केशवा तुवांचि आज्ञापून । हा औट हात पिंड केला निर्माण । तेथे इंद्रियांचे अधिष्ठान । केले निर्माण दशविधा ॥१७॥

तेथे तरी तूचि सूत्रधारी । कळसूत्रा ऐसी हालविसी दोरी । वर्तवितोसी पृथक परी । समत्व सरी का ते नसे ॥१८॥

तया विभक्तची अधिकार । स्थापिले असती साचार । येरयेरांचे काज कर । का गा निर्धार न होती ॥१९॥

नेत्र अवलोकनची करावे । ते नसता नाकेचि पहावे । मुखीचे काज श्रवणे सारावे । होईल बरवे वाईट तरी ॥१२०॥

श्रवणीचे काज सांगता करा । गुद न जेववी निर्धारा । शिस्नेच लवेचि धरा । नेत्रद्वारा मकरंदू ॥२१॥

येर येरांचे न येती काजा । नेमिल्या मार्गा न सोडिती वोजा । करुणाघना अधोक्षजा । गरुडध्वजा लीला तुझी ॥२२॥

नेत्रे करोनी पहावे । श्रवणे करोनि ऐकावे । मुखे करोनि बोलावे । नासिके घ्यावे मकरंद ॥२३॥

कर योजिले बहुप्रसंगी ॥ गुद नमिले मळत्यागी । शिस्न गुंतविले भोगी । गमनप्रसंगी चरणची ॥२४॥

ऐसे नेमोनि व्यापार । चालवी पृथकाकार । सेखी वेगळा तू सूत्रधार । पाहे विचार तुझा तू ॥२५॥

तेवीच हे लोकालोक आज्ञेऐसे वर्तती देख । अधिकारपरत्वे अलोलिक । तुझे कामुक वागती ॥२६॥

सकळ पदांहोनि श्रेष्ठ निवडिले येथे औटपीठ । सत्य कैलास वैकुंठ । अर्धपीठ वेगळे ॥२७॥

तीन पीठींचे विचार । वेगळेचि दाविले चमत्कार । लीलालाघवी तू सर्वेश्वर । सर्व अधिकार तुझेची ॥२८॥

अर्धपीठ सर्वांचे मूळ । तो तूचि होसी तामाळनीळ । येर हे रचिले माइक ढिसाळ । तुझे खेळ खेळी तू ॥२९॥

विराट हाचि तू ब्रह्मांड । ब्रह्मांडगर्भीच पिंड । ऐसेचि दाविले तेथे वाड । केला निवाड औटची ॥१३०॥

लोकलोका दिवसणे । आम्हा तुम्हाही तेथे असणे । पाहता एकही नसे उणे । समसमाने अर्ध पीठ ॥३१॥

जोवरी नेमिली मर्यादा । तोवरीच मान या पदा । ते सरतांचि गा परमानंदा । आनंदकंदा तुजमाजी ॥३२॥

ऐसे बोलता श्री शंकर । आनंदे निर्भरे रमावर । आलिंगनी मिसळले सुरवर । जयजयकार करिताती ॥३३॥

दुंदुभी वाद्ये नाना वाजती । आपुलाले वहनी आरूढती । परम महोत्सव सकळांप्रती । उंचावती विमाने ॥३४॥

पाहावया वैकुंठपुर । देवाप्रती आनंद थोर । मार्ग क्रमिती अतिसत्वर । हरिपद सुंदर लक्षिती ॥३५॥

देव निरखिती दुरोन । कळस देखिला दैदीप्यमान । पाहता झाकोळति नयन । वाद्ये सघन वाजती ॥३६॥

त्या वाद्यध्वनीसी ऐकता । तो नाद झाला सकलांसी वेधिता । गंधर्व विसरले गाता । अप्सरा नाचता राहिल्या ॥३७॥

जैसे नादध्वनी करून । कुरंग विसरले देहभान । की उरग डोलवोनि फण । अतितल्लीन होय जेवी ॥३८॥

तेचि गति झाली देवांसी । त्या नादे मोहीत झाले मानसी । देह गेह नाठवे कोणासी । मुख्य आपणासी विसरले ॥३९॥

देखोनि सकळांचे अवसान । गदगदा हासे जगज्जीवन । तो समीप देखिले वैकुंठभुवन । प्रकाश गहन रविकोटी ॥१४०॥

प्रकाश नेत्रे झाकोळले । वाद्यनादे मन मोहिले । शिवभूषणे डोलो लागले । ध्यानी गुंतले विलक्षण ॥४१॥

मनी विचारी सर्वोत्तम । पाहू आलेति वैकुंठधाम । प्रथम नादप्रभे पावले भ्रम । पुढील क्रम कैसा तो ॥४२॥

मग शिवाते सावध करोनी । वदता झाला चक्रपाणी । आवलोकाया देवांलागुनी । लक्ष भूषणी ठेवावे ॥४३॥

शिव सावधाने पाहत । तव सकळांच्या वृत्ती झाल्या गलित । नुघडे कोणाचे नेत्रपात । आश्चर्यवत पै झाला ॥४४॥

शिव जाणोनि त्या वर्मासी । काय बोले सर्वोत्तमासी । कृपा करोनि आता यांसी । दिव्यदृष्टीसी देइजे ॥४५॥

तू न करिसी या कृपादान । तरी केवी पाहतील वैकुंठभुवन । हे अनाथ असती दीन । कैची आंगवण पाहावया ॥४६॥

शिववचने हरि संतोषला । दिव्य चक्षू देता झाला । कृपाकटाक्षे सकळा । सतेज कळा दिधली ॥४७॥

सावधाने पाहती सुर । तव विमाने दाटली दिसती अपार । चतुर्भुज अवघे नर । श्यामसुंदर दिसती ॥४८॥

नाना रूपे दिव्य आकृती । मुगुट पीतांबर झळकती । शंख चक्र गदा मिरविती । पद्म हाती सतेज ॥४९॥

सतेज अलंकारमंडित । कर्णी कुंडलप्रभा फाकत । रत्नमुद्रिका करी मिरवत । विमाने झळकत तेजाकार ॥१५०॥

तव विंतत घन सुस्वर । वाद्ये वाजती अपार । घंटानाद रव होती मधुर । गायने तनदर होताती ॥५१॥

ध्वज पताका तळपती । गुढिया तोरणे डोलती । छत्रे चामरे मिरवती । भाटीव करिती बंदिजन ॥५२॥

ऐसे वैष्णववीर अनंत । श्रीअनंतासी सामोरे येत । ते देखोनी देव समस्त । आश्चर्यवत मानसी ॥५३॥

वैष्णवी आलिंगनी मिसळले । रमाधवाचे पायी लागले । मुंडपघसणी तये वेळे । रत्न विखुरले भूतळी ॥५४॥

वैष्णव भेटती सुरांसी । म्हणती माधवची भेटला आम्हांसी । ठक पडिले सकळांसी । मुख्य हरिसी नोळखती ॥५५॥

जिकडे तिकडे पाहती देव । तो अवघाची दिसे वासुदेव । रिता नसे कोठे ठाव । रमाधव व्यापला ॥५६॥

असो ऐशा सारोनी भेटी । पुढे चालिले उठाउठी । पाहता वने उपवने गोमटी । पडती दृष्टी कल्पतरूंची ॥५७॥

कामधेनू चरती वनी । गणती नसे पाहता नयनी । उत्तम पक्षियांचे ध्वनी । ऐकता कानी सुरवर ॥५८॥

पाहती ऐकती करिती गमन । पुरद्वार देखिले विशाल गहन । तेथे नारी उभ्या कलश घेवोन । आरत्या उजळोन सिद्ध पै ॥५९॥

घनःश्याम सुंदर ओवाळिला । पुढे देवसुरांचा भार चालिला । वैकुंठ विलोकिता डोळा । अनुपम्य लीला तेथीची ॥१६०॥

हाट चहोटे सुदर । मणिमय रत्नखचित गोपुरे । चिंतामणीची विशाल धवलारे । सहज शृंगारे शृंगारली ॥६१॥

चतुर्भुज तेथे नरनारी । मंगल गीत गाती घरोघरी । दिव्य रूप कनकांबरी । सालंकारी शोभती ॥६२॥

मुख्य मंदिराजवळी येता । हरी उतरे विमानाखालता । करि धरोनी उमाकांता । सवे विधाता वामभागी ॥६३॥

गरुड सन्मुख जोडोनी पाणी । जय विजय गर्जती वाणी । देवभारासह चक्रपाणी । सभारंगणी पावले ॥६४॥

मुख्य सिंहासनावरी । माधवे बैसविला त्रिपुरारी । सकळा बैसका देवोनि सत्वरी । आदर स्तकारी सकळांते ॥६५॥

तव लक्ष्मी आली सदनांतून । दिव्य अलंकारमंडित पूर्ण । पंचारती करी घेऊन । करी अक्षवण शिवाते ॥६६॥

मग आणोनि पूजासंभार । भावे षोडशोपचारे पूजिला हर । देवा देवोनि आमोद माल्यहार । वांटी चीर अधोक्षज ॥६७॥

सकळा पाववोनी सन्मान । वंदी उमावराचे चरण । अत्यादरे करोनि स्तवन । तोषवी नारायण सकळांते ॥६८॥

छत्रे चामरे उभविली । शिवमस्तकी स्वकरे ढाळी । तव करी घेवोनि चंद्रमौळी । एकमेळी बैसले ॥६९॥

शिव म्हणे कमळावरा । तू माझा परात्पर सोयरा । येरू म्हणे जी दातारा । काय उत्तरा बोलता ॥१७०॥

तव बोलतसे शेषशयन । तुम्हा जो जीवीचे जीवन । म्या करावे चरणसेवन । हे उचित जाण आम्हांसी ॥७१॥

तूची माझा सद्गुरु । सकळ नियंता ईश्वरू । कोणा न कळे तुझा पारू । महिमा अपारू तुझा की ॥७२॥

शिव म्हणे देवाधिदेवा । ऐसे काय वदसी केशवा । मी जाणतो तुझिया अनुभवा । ह्रदयी माधवा जपे तुज ॥७३॥

ऐसे आनंदे करिता भाषण । दोघे समरस झाले पूर्ण । हरिहररूपे प्रगटोन । दिल्हे दर्शन सकळांसी ॥७४॥

सुर पाहती चमत्कार । सिंहासनी देखिले हरिहर । विधाता धावोनी सत्वर । पदी शिर वोपित ॥७५॥

पुनरा लक्ष्मी येऊन । करिती झाली तेव्हा पूजन । जयजयकारे सुरगण । पुष्पे सघन वर्षती ॥७६॥

नृत्यकळा देवांगना । नारद तुंबर करिती गायना । वैष्णव करिती कीर्तना । विद्याधर स्तवना आरंभिती ॥७७॥

सभेमाजी ब्रह्मानंद । देखोनि अमरसुरा आनंद । झाल्या वृत्ती अभेद । ह्रदयी सद्गद पाहता ॥७८॥

तेथील पाहता अद्‍भुतलीला । आला स्वपदाचा कंटाळा । म्हणती सर्वेशा सुंदरा घननीळा । ठाव चरणकमळापासी दे ॥७९॥

नको आम्हांसी तो पदभार । येथेचि ठेवी गा निरंतर । गोडी नित्य नवी अपार । वैष्णववीर असती येथे ॥१८०॥

आम्हांसी देवा त्वा ठकविले । सुख वैष्णवां दिसे आगळे । आम्हा सोडविले पाहिजे ॥८१॥

जावे आपुलिया स्वपदासी । ऐसे न वाटेची मानसी । कमळावरी ह्रषीकेशी । पावन आम्हासी करा वेगी ॥८२॥

ऐशा आनंदसंवादी । विराल्या वृत्ती जडली समाधी । जावे आपुल्या स्वपदी । हे तो बुद्धी न वाटे ॥८३॥

ऐसे देखोनी सर्वेश्वर । पृथक रूपे धरिली सत्वर । रमावर आणि उमावर । करिती विचार मानसी ॥८४॥

शिव म्हणे श्यामांगा । बरवे दाविले आजिच्या प्रसंगा । येणे खेळचि हा उगा । रमारंगा राहिला की ॥८५॥

सुर होवोनि आनंदघन । स्वरुपी जालेती निमग्न । देह गेहाचि आठवण । गेले विसरून तव कृपे ॥८६॥

याते सावधान करावे । स्वपदा वेगी पाठवावे । हे परिसोनी केशवे । लीलालाघवे काय करी ॥८७॥

मायातीत जाले सुरगण । त्यासी घाली माया आवरण । त्वरित करी सावधान । लावी व्यवधान पाठीसी ॥८८॥

हे देखोनी उमावर । म्हणे द्यावी आज्ञा जी सत्वर । अवश्य म्हणे तेव्हा शारंगधर । कृपा अपार असावी ॥८९॥

सकळ वंदोनी हरिचरणा । म्हणती दया करी मनमोहना । तात्काळ चढोनी विमाना । वैकुंठरचना पाहिली ॥१९०॥

शिवासहित सुरांसी । बोलाविता झाला ह्रषीकेशी । आपुलिया स्वस्थळासी । अति वेगेसी पावले ॥९१॥

सिंहावलोकने करून । श्रोते परिसिजे मागील कथन । तिन्ही देव देवोनी वरदान । आपुले स्वस्थान पावले ॥९२॥

यानंतरे अनसूयासती । जाली नित्य कर्मासी आचरती । पतिचरणी ठेवोनी प्रीती । सेवे निश्चती सादर ॥९३॥

ऐसे लोटता काहीएक दिन । तव अनसूया जाली गर्भीण । दिवस मास लोटता जाण । तेज गहन दिसो लागे ॥९४॥

अघटित लीला विश्वंभरी । मायामय गर्भ दावी झडकरी । कोण्हा न कळे ती परी । बाज्यागरी खेळ जेवी ॥॥९५॥॥

भरत आले सप्त मास । जाली संसारी उदास । करावा वाटे तापस । तम विशेष अंगी चढे ॥९६॥

जव जव अनसूयेचा गर्भ वाढत । तव तव अत्री आनंदभरित । मनी म्हणे कृपावंत । हरि समर्थ झाला की ॥९७॥

असो नवमास पूर्ण जाले । प्रसूतकळेने व्यापिले । ऋषिपत्न्या येवोनि ते वेळे । झांकिती डोळे तियेचे ॥९८॥

तव तो भाग्याचा सुदिन । प्रसव न कळे कवणालागून । अनसूयाही जाली उन्मन । प्रगटले सगुण बाळ पुढे ॥९९॥

पाहता सतेज शुद्ध देखिला राजस । वेगी न्हाणिले घेवोनी बाळास । स्नेहे माखोनी सुरस । सवेंचि अनसूयेस न्हाणिले ॥२००॥

वेगी आणोनी मधुबोळा । देती प्रौढा तया बाळा । वोसंगा देवोनी सोहळा । सेजे सुढाळा पहुडविती ॥१॥

जाणत्या चतुरा कामिनी । अनसूयेसी देती औषधपाणी । पथ्य घालती जपोनी । दिनरजनी सांभाळिती ॥२॥

ऐसे लोटता चार दिवस । करिती पूजन पांचवीस । ऋषि आरंभिती रात्रिवर्गासी । करिती विलास जागरणी ॥३॥

जननसुतक दश दिन । एकादशेसी शुद्ध स्नान । स्वधर्मादि आचरण । पंचमहायज्ञ देवपूजा ॥४॥

बाराव्यासी बारा बळी । पूजोनिया यथा काळी । सकळ पाचोरोनि ऋषिमंडळी । भोजने सारिली आनंदे ॥५॥

बारावीची बारसे । करोनिया अति उल्हासे । संतोषवूनी सकळांची मानसे । सुखसंतोषे बैसती ॥६॥

मग जन्मकुंडली काढोनी । ऋषी बैसले जातकवर्णनी । म्हणती हा बाळ तमोगुणी । तपाचरणी दक्ष पै ॥७॥

श्रेष्ठत्वे हा होईल थोर । सवे वागवील ऋषींचे भार । आपुले तपतेजे अनिवार । छळ दुर्धर करील हा ॥८॥

जिकडे तिकडे सन्मान । भूप होतील अनन्यशरण । हे ऐकोनी सुखसंपन्न । ब्रह्मनंदन होय पै ॥९॥

ऐशापरी निशी संपता । तो उदय पावला अवचिता । नित्यक्रम सारोनि अतौता । ऋषिकांता मिळाल्या ॥२१०॥

पाहोनिया सुवेळ । पालख लाविला तात्काळ । अळंकार वस्त्री सजविला बाळ । तेवीच वेल्हाळ श्रृंगारिली ॥११॥

चौक भरोनी वेगेसी । वरी बैसविले अनसूयेसी । आडवे देवोनिया बाळासी । अक्षवणासी आरंभिले ॥१२॥

अक्षवणाची परवडी । सारिली करोनिया तातडी । जीवी नामाभिधानाचि गोडी । मुहूर्तघडी साधिती ॥१३॥

चांदवे डोल्हारा खेळणी । पालखावरी दिव्य लावोनी । बाळ पालखा निजवोनी । गीत गावोनी हलविती ॥१४॥

काय नाम ठेवावे यासी । विचार पडिला सकळांसी । तव आठव झाला अनसूयेसी । शंकरे मजसी निवेदिले ॥१५॥

म्हणे बाया हो न करा चावटी । माझी ऐका तुम्ही गोष्टी । हा अवतरलासे धूर्जटी । महा हाटी तामस ॥१६॥

याचे नाव ठेवा दुर्वास । हेची इच्छी माझे मानस । गोष्ट मानली सकळांस । तेची तयास बोभाती ॥१७॥

अगा दुर्वासा सुकुमारा । जो जो म्हणुनी हालवी सुंदरा । गीत गावोनिया लेकुरा । हारकुरा करिताती ॥१८॥

गावोनि नाना परीचे गीत । नाम दुर्वास ठेविले विख्यात । मागुती उचलोनी त्वरित । वोसंगा घालित अनसूयेच्या ॥१९॥

आनंदे करिती जयजयकार । हळदीकुंकुमे वाटिती सुंदर । तांबूल शर्करा देवोनी सत्वर । खिरापती अपार देताती ॥२२०॥

ऐसा करोनि आनंदसोहळा । नरनारी बोळविल्या सकळा । अनसूयेशी मोह जिव्हाळा । पाजी बाळा प्रीतीने ॥२१॥

नित्यानित्य आनंद । अत्रि अनसूयेसी आल्हाद । पुढे अवतरेल परमानंद । आनंदकंद जगद्गुरु ॥२२॥

तोचि मम ह्रदयी राहोन । आपुले आपण वदवी गुण । सकळासी करावया पावन । चरित्र गहन दावितो ॥२३॥

मी कोण येथे करिता । दत्तची असे बोलविता । त्यावीण न चले काही सत्ता । मज निमित्ता केले पुढे ॥२४॥

सकळ दीनांहोनी मी दीन । अनंतसुत नामाभिधान । आश्रय करोनी संतांचे चरण । राहिलो धरोन प्रेमभावे ॥२५॥

तुम्ही संत कृपासागर । अनंतसुत तुमचा किंकर । करोनि याचा अंगीकार । कृपाकर देइजे ॥२६॥

अष्टाध्यायीचे कथन । तुम्ही करविले कृपा करोन । तेवीच पुढे अनुसंधान । गोड करून घेइजे ॥२७॥

तुम्हा संतावाचोन । मज परतटा नेईल कोण । सर्व भावे मी संता शरण । माझा अभिमान तुम्हांसी ॥२८॥

इति श्रीदत्तप्रबोध ग्रंथ । यासी नारदपुराणीचे संमत । श्रोते परिसोत संतमहंत । अष्टमोध्यायार्थ गोड हा ॥२२९॥

॥ इति अष्टमोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP