श्री दत्तप्रबोध - अध्याय एकोणीसावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ।

ॐ नमो सद्‌गुरु सर्वात्मका । गुणसिंधो कर्ममोचका । ज्ञानबोधा तिमिरछेदका । दीनपालका पावना ॥१॥

जय भवाब्धितारका करुणाकरा । जय निर्विकल्पा दुरितसंहारा । जय अनादिव्यापका जगदोद्धारा । जय परात्परा नमो तुज ॥२॥

जय सदय उदारा सच्चिद्धना । जय षड्‌गुणऐश्वर्यसंपन्ना । जय मायातीता निरंजना । जयजय सुखघना नमो तुज ॥३॥

ज्ञानबुद्धिविवेकदाता । तूंचि होसी गा सत्य समर्था । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । कृपावंता शरणागते ॥४॥

मी हीन दीन मतिमंद अज्ञान । परी तव पदीं अनन्य शरण । मम अंतरींचें वर्म लक्षोन । कीजे पावन स्वामिया ॥५॥

गत कथाध्यायीं अनसूयेसी । गुरुगुणग्राह्य तूं निवेदिसी । ते परिसोनि श्रोतियांसी । उल्हास मानसीं श्रवणार्थीं ॥६॥

उरले तेरा गुरुंचें लक्षण । तें करावया आदरें श्रवण । वेधलें श्रोते सज्जनांचें मन । तोषवा वदवून गुरुराया ॥७॥

धन्य गुरुगुणाची ख्याति । श्रवणेंचि दिव्य होय मति । विवेकें आकळितां नुरवी भ्रांति । पावे शांति तव कृपें ॥८॥

हे सद्‌गुरु दत्त दयानिधी । अज्ञानतिमिर बोधें छेदी । कल्पविकल्पाची नुरवी उपाधी । ज्ञान प्रबोधी आपुलें ॥९॥

श्रवणीं वाट पाहे माउली । तेवींच श्रोतियांची मंडळी । चंद्रचकोर न्याय वेधली । याची आळी पुरविजे ॥१०॥

अनाथ दीनांचा कैवारी । होसी हीन पामरांचा साहाय्यकारी । पुरवी हेतू असती जे अंतरीं । आळस न करीं दयानिधे ॥११॥

तूंचि होवोनि कृपावंत । वदविलें अष्टदशाध्यायपर्यंत । येथोनि वदविता कथामृत । तूंची समर्थ दातारा ॥१२॥

परिसोनि बाळकाची आळ । पुरवी माऊली स्नेहाळ । तेवीं दत्त तूं होसी कृपाळ । कथा रसाळ चालवी ॥१३॥

अविनाश विनवी अनसूयेसी । तुज निरोपितों शेष कथेसी । सावध होवोनिया मानसीं । भूषण श्रवणासी वाणवी ॥१४॥

म्यां गुरु केला मधुकर । त्याचे सांगतों गुणप्रकार । वनोपवनीं करोनि संचार । तुरंबी सार पुष्परसा ॥१५॥

नाना परी पुष्पजाती । भ्रमर मकरंदा तुरंबिती । कुचंबूं अणुमात्र न देती । स्वच्छंदें भ्रमती ठाव नाना ॥१६॥

रसस्वादातें सेवोन । गुंजार घालती प्रेमें करुन । न राहती एके ठायीं भ्रमोन । असक्तपण वावरता ॥१७॥

हा उत्तम पुष्पकल्हार । वायांचि पुष्पीं नटले येर । हे न जाणोनि विचार । मकरंदें सार सेविती ॥१८॥

न जाणेचि तो वृक्षयाती । तया मकरंदींच लोभप्रीती । स्वाद आशा धरोनि चित्तीं । आनंदें क्रीडती अभेदत्वें ॥१९॥

या भ्रमराचे सेवोनि गुण । मीही माते करितों भ्रमण । एक ठाव नावडे मजलागोन । भिक्षाटन अवलंबी ॥२०॥।

नाना पुष्पांचे जेवीं मकरंद । तेवींच मज भिक्षेचे स्वाद । तया प्रेम मज अल्हाद । वर्ततों अभेद या जगीं ॥२१॥

आतां मक्षिकेचा गुण अनुवादूं । तयाचाही असे द्विधा भेदू । वन ग्रामवासी प्रसिद्धू । एक संबंधू असेना ॥२२॥

पृथग्भागें तयाचा गुण । तो तुज मी करितो निरोपण । मधुमक्षिकेचें लक्षण । सावधान परिसिजे ॥२३॥

नाना तरुवर सानथोर । याति वर्णभेदं असती अपार । तेथें मक्षिका करोनि संचार । रससार सेवीतसे ॥२४॥

मुखीं रस सांठवोनी । स्वमंदिरीं ठेवी नेवोनी । असंख्य मक्षिका एका स्थानीं । जमविती राहोनि मोहोळातें ॥२५।

अति विशाळ करिती मोहोळ । वंशवृद्धिस्तव केलें स्थळ । त्यामाजी भरिती रस रसाळ । मधु निर्मळ त्या म्हणती ॥२६॥

करिती त्याचे दृढ रक्षण । उपसर्ग लागतां वेंचिती प्राण । दंश तडतडा तोंडोन । भंवर घालोन झडपिति ॥२७॥

आशा लोभें गुंतोन । कित्येक पावती घातें मरण । सदयत्वें न करितीं दान । वृत्ति अकिंचन तयांची ॥२८॥

परी एक तयांचें दृढ व्रत । अन्य पदार्थालागीं नातळत । वृक्षरसातें प्रीतीं सेवीत। संग्रह करीत सहजत्वें ॥२९॥

प्रयत्‍नें आणिला तो रस । सकळही मानिती त्या सुरस । सेवितां करी तो पुष्टीस । आणी औषधीस कामा ये ॥३०॥

तया मक्षिकेचा मळ जाण । तें सौभाग्यतळवटीचें लेण । अन्य युक्ती नाना कारण । चतुर विचक्षण योजिती ॥३१॥

आतां ग्रामवासी मक्षिका । याचे गुण तेही ऐका । अभेदत्वें विचरे देखा । पाकाअपाका नेणेती ॥३२॥

पक्व अपक्व दिव्य अन्न । कीं नाना परी जालें वमन । कीं गलिच्छ नर्क दुर्गंधी दारुण । सेवी समान सारखें ॥३३॥

हें दिव्य पाटव्य सोवळें । कीं हें अमंगळ असें ओंवळें । हें नेणेंचि कदा काळे । सदा रुळें सर्वांवरी ॥३४॥

हें वंद्य म्हणोनी वंदावें । कीं हें निंद्य म्हणोनी त्यजावें । हें मक्षिकेच्या समुदावें । कदा ओळखावें घडेना ॥३५॥

नर्क आणि शर्करेसी । स्वादिष्ट आणी कटूसी । रसी नेणेचि विरसी । समान सरिसी सेवनीं ॥३६॥

नाहीं आश्रमाची चाड । प्राप्त रस जाला तोचि गोड । नाही संग्रहाची कदा आवड । झाडोनी पंखाड मोकळी ॥३७॥

इच्छें ऐसें दिवा फिरावें चंचलपणेंची बावरावें । भलत्या आश्रयें रजनीं बसावें । काळ सोसावें प्रासंगिक ॥३८॥

माते हे गुण योगियांसी । असत्य पाहिजे निश्चयेसीं । म्हणोनी ग्राह्य करोनिया गुणासी । असक्त मानसीं वर्ततों ॥३९॥

त्वांही प्रपंची राहून । वर्तावें अंगीकारोनि हे गुण । लोभ आशेचें व्यवधान । तोडी बंधन मोहपाश ॥४०॥

निर्मोह निरहंकार । निर्लोभ आणि निर्विकार । निर्द्वंद्व अभेद निर्मत्सर । नैराश्य प्रकार योगियांचा ॥४१॥

येच पदीं करितां वास । मग तूं सहज होसी निर्दोष । जंव जंव अंगीकारीसील गुणास । तंव तंव गुणास पावसी ॥४२॥

म्हणसलि हे गुण लाधतां । देहीं पावेल सत्य समता । परी जनउपाधीची वार्ता । तेणें क्षोभता उपजवी ॥४३॥

त्याक्षोभें क्षोभेल मन । संग्रहिलें जाय विटाळोन । यदर्थीं मातें म्यां विवेकें करुन । करी पाहून गुरु केला ॥४४॥

त्याचिया गुणाचा विचार । तो तुज मी सांगतों सविस्तर । उन्मत्तता अंगीं दुर्धर । सान थोर न मनीं तो ॥४५॥

सदा पाहे तो खालतीं । चालण्याची चपळ गती । सरळ पंथें पवनाकृति । वारण म्हणती त्या नांव ॥४६॥

नीट मार्गीं चालतां । न जायची वांकुडया पंथा । श्वानें नाना परी भुंकतां । नाणी चित्ता खेद कांहीं ॥४७॥

सहस्त्रावधी भुंकती श्वान । परी आपुलें विटाळों नेदी मन । धीर उन्मतमदें करुन । राहे झुलोन उभ्या ठायीं ॥४८॥

चरणींचे उचलोनि रज । शुंडेनें मस्तकीं टाकी सहज । वर्म दाखवीतसे गुज । येणें काज सर्व घडे ॥४९॥

श्वानापरिचे उपसर्ग । लावितील पिसून आप्तवर्ग । यालागीं शोधोनि केला संग । गुणी हा नग घेतला ॥५०॥

आणीक बुद्धि या गजाची । खूण दाविली या रजाची । निरभिमान वंदनें सर्वांची । कवचें अहंतेचीं गळती येणें ॥५१॥

आपुले स्वात्महितीं जो बोध । निज स्वरुपींचा जो ऐक्य छंद । सर्व भूतींचा विरतां भद । मग ब्रह्मानंद योगिया ॥५२॥

ब्रहमैवाहं सर्व देहीं । द्वैत कोठेंचि उरलें नाहीं । त्या मदोन्मत्तें झुलावें ठायीं । हें वर्म पाही गोमटें ॥५३॥

परिसिजे अनसूये माते । मृगगुण आतां निवेदितों तूतें । परम भीति त्या जीवातें । मारकातें लक्षीत ॥५४॥

जीवलोभाची धुकधुक । भोंवतें पाहे सदा टकमक । किंचित दिसतां झकमक । मारी फेंक उड्डाणीं ॥५५॥

एका जीवाचिया भेणें । एकामागें एक पळणें । उडया मारितां दिशा अटणें । देहीं चमकणें क्षणक्षणां ॥५६॥

व्याधकाळ हा त्वरें येईल । केधवां फांसा घालोनि मारील । मागुता जन्म हा न पावेल । म्हणोनि पळ काढिती ॥५७॥

तेवींच काळाची भीती । जीवामागें आहे निश्चिती । यालागी जागोनि दिनरातीं । नं पावे हातीं ऐसें कीजे ॥५८॥

ऐसीं हीं मगें सावधान । परी वाद्यनादा गेलिं भुलोन । शिकार्‍या हरितवर्ण देखोन । मानोनि तृण ठेलीं उभीं ॥५९॥

मृगें भुलतां तये काळीं । व्याधें गुंतविलें पाशजाळीं । कोण सोडविता तये वेळीं । जीव आरंबळी दैन्यवाणा ॥६०॥

आणिक एक ऐंकिजे वार्ता । वनीं मृगांचे भार फिरतां । तृषा लागे चरतां चरतां । शोष पडतां होय कंठीं ॥६१॥

शोषें करिती अवलोकन । तंव दूरी देखिलें विस्तीर्ण जीवन। मग उड्डाणावरी उड्डाण । घेती संपूर्ण त्यामार्गें ॥६२॥

धांवतां बहु मृगें शिणती । परि तें जीवन नलगेचि हातीं । ठायीं ठायीं सरोवरें दिसती । सरिता वाहती सोज्वळ ॥६३॥

फिरतां पाही श्रम पावले । तीर कोठेंचि नाढळे । धांवतां पुढेंचि ते गेले । तृषें वेधले न फिरती ॥६४॥

हें मृगजळ न कळे त्यांसी । तेवींच भ्रम झाला या जीवासी । भुलोनि मायामृग जळासी । सावध मानसीं न होती ॥६५॥

माते त्वां तरी सावध व्हावें । मायामृगजळीं न बुडावें । स्वहित आपुलें ओळखावें । शरण जावें गुरुवर्या ॥६६॥

ते करिती मायातीत । उडवितील अवघी भवभ्रांत । तळमळ वारोनि करितील शांत । अवघे आघात चुकवोनी ॥६७॥

सद्‌गुरुचरणीं होतां दासी । मग नेतील ते आत्मपदासी । कधीं न ठेवितील तुज उदासी । भावें त्यापदासी विनट तूं ॥६८॥

सद्‌गुरुपदा व्हावें लीन । म्हणोनि गुरु केला म्यां मीन । तो न सोडी जेवीं जीवन । सांडितां प्राण जाऊं पाहे ॥६९॥

मीनाचें जीवन उदक । तैसा सद्‌गुरु जीवा तारक । अनन्य जीवनीं मत्स्य देख । जडतां सुख पदीं तैसें ॥७०॥

पडतां पदासी अंतरता । मीनाऐसा होय घाबरता । तरीच त्यातें श्लाघ्यता । पावे सकृपता गुरुची तो ॥७१॥

आणिक एक कारण । सांगतो मीनाचें लक्षण । आमिषीं लुब्धतांची मन । पावे मरण गळयोगें ॥७२॥

धीवरें आमिष लावोनि गळा । उदकीं फेंकोनिया दिला । मीन ग्रासी तया डंडिला । गिळितां वेढिला त्या नष्टें ॥७३॥

गिळितां कांटा झोंबला जिव्हारीं । आसंडोनी फेंकिला तेणें वरी । मीन आदळला जीवनाबाहेरी । जाळ्यांतरी टाकिला ॥७४॥

एवं धीवरें घेतला प्राण । तेवीच व्यथा जीवालागोन । कनक आणि कामिन । लोभ दारुण पीडक ॥७५॥

हे माया मोह दुस्तर जीवन । जीव यांतील असती मीन । यांसी टपतसे रात्रंदिन । धीवर पूर्ण काळ हा ॥७६॥

पसरलें मायेचें जाळ विषयलोभाचा सिद्ध गळ । धनकामिनीचें आमिष प्रबळ । स्वीकारितां वेळ न टळे ती ॥७७॥

जीवा जिव्हारीं झोंबतां गळ । करुं लागले तेव्हां तळमळ । सोडवीना कोण्ही बहु व्याकुळ । धीवर खळ काळ ओढी ॥७८॥

जीवा जीवनाबाहेर काढिलें । ग्रंथी बांधोनि स्वपदा नेलें । कायाविटंबनीं मसाले । घालोनि पचविलें नाना रीतीं ॥७९॥

या दुःखातें भिऊन । माते मी झालों सावधान । प्रथम अन्वयाचा घेवोनि गुण । तूतें निरोपण स्वहितार्थ ॥८०॥

मुख्य धनकामादि विषय । लोभमोहो करी अपाय । या निवारणाचा उपाय । कोण होय धुंडिला ॥८१॥

मातें मी अवनीं फिरतां । विदेहनगरा गेलों अवचितां । तेथें चमत्कार देखिला पाहतां । तो तुज आतां निवेदितों ॥८२॥

पिंगळानामें वेश्या जाण । सदा विषयव्यवहारीं तिचें कारण । भ्रतार पाहतां जिला धन । पुरुष भोगून संग्रही ॥८३॥

नित्य नूतन शृंगार । नूतनचि परिधान करी अंबर । नाना दीप्ति लागोनि अलंकार । उभी समोर मार्ग लक्षी ॥८४॥

दासी भोवत्या परिचारिका । मध्यें सुंदर चंपककळिका । क्षणक्षणां देती तांबूल निका । पात्रपिका सरसाविती ॥८५॥

प्रीतीं धनवंतातेच पालवी । विनोदें करोनि त्यातें बोलवी । संकेतें नेत्रातें हालवी । पुरुषा भुलवी क्षणमात्रें ॥८६॥

तयालागीं तोषवोन । करी द्रव्यमदाचें हरण । ऐसे लोटले बहुत दिन । अमित धन मेळविले ॥८७॥

परी आशालोभें ती चेवली । तृप्ति नोव्हेचि कदा काळीं । कधीं नोव्हेचि नेम टाळी । पुरवी आळी भलवेळे ॥८८॥

ऐसें असतां एके दिवसीं । श्रृंगारयुक्त बैसली ओटीसी । खुणावा पालवी बहुतांसी । तंव कोण्ही तिसी बोलेचिना ॥८९॥

दिवस गेला चार प्रहर । पुरुषीं विनोद न घडे अणुमात्र । क्षीण झालीं सर्व गात्र । म्लान वक्‍त्र पैं झालें ॥९०॥

मागुतीं धरुनिया धीर । सांवरिती झाली श्रृंगार । अद्यापि जाणें दोन प्रहर । प्राणेश्वर येतील ॥९१॥

परिचारिकेस बोले गुज । जा गे त्वरें करा सेज । नित्याहोनी अधिक आज । दिव्य सतेज मनोहर ॥९२॥

आज्ञेसरिस्या दासी जाती । रमणीक मंदिर दिव्य सजविती । छतें झालरा काच लाविती । सेज रचिती सुमनांची ॥९३॥

सुगंधिक दीप सरसाविले । दीप मणी छतीं योजिले । परिमळादि द्रव्य ठेविलें । हार गुंफिले सुमनांचे ॥९४॥

तांबूल ठेविलें त्रयोदशगुणी । फळें मेवापात्रीं भरोनी । गंगोदक झारीं ठेवी आणोनी । पीकपात्र धुवोनी ठेविती ॥९५॥

नाना परिंचे श्रृंगार । वस्त्रें भूषणे अलंकार । तबकीं भरोनी सुंदर । काच समोर पहावया ॥९६॥

चौपाळा सजविला पर्यंक । कौतुक खेळ ठेविले अनेंक । विषयीजना उपजे सुख । ऐसे अलोलिक सिद्ध केलें ॥९७॥

तळवटीं मांडिले चौरंग । द्यावया सन्मानीक उपभोग । बारीमाजी बैठका चांग । पाहतां दंग होय विषयी ॥९८॥

यापरी सर्व सेज सिद्ध केली । पिंगळेलागीं कळविली । येरी पाहतां सांजवेळ टळली । कोण्ही न पावली विषयमूर्ति ॥९९॥

मग उठोनी गोपुरीं जाये । सेजसमारंभ सर्व पाहे । प्रथम लेणें त्यजोनि लवलाहें । नूतन होये स्वीकारिती ॥१००॥

नेसोनिया कनकांबर । जडित घातले अलंकार । चंदन चर्चोंनी अंतर । स्वीकारी हार पुष्पांचे ॥१॥

नेत्रीं सूदले अंजन । काची मुख करी अवलोकन । कुरळ बरवे सांवरोन । तांबूलचर्वण पैं केलें ॥२॥

अत्यंत शोभवोनि रुपासी । पाहतां काम भरला मानसीं । बारीं बैसोनि पुरुषांसी । न्याहाळोनि त्यासी पाचारी ॥३॥

पिंगळेसी लागलें विषयवेडें । कोण्ही पुरुष न पाहे तिजकडे । रजनीं घडिघडीं त्वरें वाडें । कोण्ही न भिडे तियेसी ॥४॥

ताल वाद्य सुरसंगीत । पिंगळा आरंभी रागगीत । कंठ कोयळस्वरकंपित । रसयुक्त आलाफ करी ॥५॥

पिंगळेचे ऐकतां गायन । मृग उरग जाले तल्लीन । मोहो पावलें गंधर्वमन । अप्सराहीन सलज्ज ॥६॥

पिंगळच्या अर्थ मनी । कामुक येईल गायना भुलोनी । विचित्र प्रारब्धाची करणी । पुरुष कोण्ही नयेची ॥७॥

तंव किंचित वाद्यें राहवितां । गजर जाली कानीं ऐकता । सखेद होवोनि परम चित्ता । मुखीं ग्लानता पावली ॥८॥

विषयज्वर चढला अंगीं । जावोनि पहुडली पलंगीं । परी ती सेज जैसी आगी । चित्त भोगीं वीटलें ॥९॥

तोडोनि टाकिले कंठिंचे हार । फेंकोनि दिधले अलंकार । फरफरां फेडोनिया चीर । टाकीं दूर क्रोधभरें ॥११०॥

गडबडा लोळे धरणीवरी । शोक करीतसे आक्रोश वरी । सखी धांवोनि तिसी आंबरी । परी ते दुरी झिडकावी ॥११॥

श्वास उश्वास टाकोन । परम धिःकारी आपणा आपण । म्हणे हें केवढें मूर्खपण । विषयीं भुलून गेलें मी ॥१२॥

किंचित विषयसुखासाठी । सोसिली दिनरजनीं आटाटी । काय उपयोगा येई शेवटीं । माया खोटी कळली मज ॥१३॥

नको नको हा दुष्ट विषय । येथें लोभ अशा तोचि अपाय । भुलवोनि हरपाविती सोय । नागवण होय सत्य येणें ॥१४॥

जळो जळो हा विषय काम । महा दुरत्यय घातक घाली भ्रमाविष ते सुखवत मानी उत्तम । घडवी अधर्म पापाचळ ॥१५॥

मूळ विटाळाचें शरीर । मळमूत्रें भरित संभार । त्यामाजी पावलें पापघर । कर्म अघोर विषयार्थीं ॥१६॥

नित्त विषयीं ठेवोनिया भान । कायाविक्रयें मेळविलें धन । जोड जोडिली पापाचरण । अविचार पूर्ण घडला कीं ॥१७॥

विषयभरें मी उन्मादलें । भक्ष्य अभक्ष्यादि भक्षिलें । गमन अगमनादि घडलें । नाहीं विचारिलें पात्रापात्र ॥१८॥

ऐसी मी हे दुष्ट मलिन । विषयभोग राहिलें भोगोन । परी न विचारिला परिणाम कोण । व्यर्थ जन्मोन नाडलें ॥१९॥

अहा हे देखोनि पापाचळ । अंतीं येईल यमराजाचें मूळ । शिक्षा करितील तीव्र प्रबळ । प्राण व्याकूळ होतील कीं ॥१२०॥

नानापरी शासतील कठिण । अघोर नरकीं बुडवितील नेवोन । तिरस्कारें घाबरतां प्राण । सोडवील कोण तें ठायीं ॥२१॥

आयुष्य विषयामाजी आटिलें । स्वहित कांहींच नाहीं केलें । वायांचि व्यर्थ वय गेलें । उपेगा न आलें या कुसंगे ॥२२॥

नाहीं केलें देवार्चन । नाहीं पूजिले म्यां सज्जन । नाहीं केलें धर्म दान । पाप दारुण आचरलें ॥२३॥

भोगोनि देहीं पाप विपत्ती । बळें जोडिली धनसंपत्ती । काय कामा येईल अंतीं । बरवी गति न दिसे मज ॥२४॥

आग लागो या संपत्तिधना । जळो जळो ही विषयवासना । होऊं पातली विटंबना । कोण कारणा योजूं यातें ॥२५॥

अवधूत म्हणे अनुसूयेतें । पिंगळा विटली विषयातें । मग पावोनि विरक्तीतें । उबगली चित्तें धनविषया ॥२६॥

सोडोनि लोभमोहो आशेसी । लुटविलें सर्व संपत्तीसी । निराश होवोनि मानसीं । बाणवी जीवासी विवेक ॥२७॥

विवेकें करितसे विचार । नश्वर देहो हा साचार । नाशिवंत अवघा प्रकार । कायसा बडिवार याचा आतां ॥२८॥

मिथ्या जाणोनि केला कोप । जीवीं विटोनी वरिला संताप । संताप नोव्हे अनुताप । होता पाप जळालें ॥२९॥

कर्म अकर्मा जाळिलें । तें भस्म अंगी चर्चिलें । वैराग्य चित्तीं बाणलें । मूळ शोधिलें तरावया ॥१३०॥

विवेके करोनी मंथन । नवनीत काढिलें शोधोन । म्हणे सकळांतर व्यापक नारायण । त्यासी शरण जातां भलें ॥३१॥

मग पिंगळा श्रीहरीसी । शरण गेली अनन्येंसी । तिची भक्ति देखोनि हृषिकेशी । नेली स्वपदासी उद्धरोनी ॥३२॥

ते म्यां गुरुगुणार्थ मानिली । विषयत्यागार्थ स्वीकारिली । नैराश्य पाहोनि विरक्ती बाणली । म्हणोनि संग्रहिली पिंगळागुणी ॥३३॥

जीवीं केथ लोभ वाढे । लोभयोगें अभिमान जोडे । अभिमानार्थ कल्पना चढे । कल्पनीं घडे जन्मपंक्ति ॥३४॥

याचें करावया निरसन । टिटवा गुरु केला जाण । त्याचे तुज सांगतो कथन । करी श्रवण माये तूं ॥३५॥

कोणी एका वनांतरी । टिटवे भ्रमती गगनोदरी । नाना शब्द करिती कुसरी । घालिती भंवरी आहारार्थ ॥३६॥

तंव एक टिटवा भ्रमण करितां । मांसकवळ देखिला अवचितां । तों चंचुबळें जाला उचलिता । सवेंचि उडता पैं होय ॥३७॥

मांसीं जडलीं त्याची प्रीति । घेवोनि जाय गगनपंथी । ते देखोनिया स्वजाति । मागें धांवती मांसलोभें ॥३८॥

बहुत टिटवे मिळोन । झडपिते झाले चहूंकडोन । परी तो न सांडी तयालागून । लोभें रक्षण करी जीवें ॥३९॥

लोभ हा परम अनिवार । उभय पक्षीं केला संचार । टिटवे करिती टिटव्यासी मार । अभिमान थोर माजला ॥१४०॥

सकळ टिटवे मिळोन । घेऊं पाहती त्या टिटव्याचा प्राण । दंशिती चंचुपटे करुन । पादें विदारण करिती काया ॥४१॥

सर्वापुढें तो एकला । काय करी न चले बळा । लोभें न टाकवें अभिमानगोळा । न कळे कळा कोण हे ॥४२॥

म्हणे ही सर्व माझी याती । कां हो लागलीसे मजभोंवती । काय अपराध केले असती । म्हणोनी छळती मज सर्व ॥४३॥

विवेकें टिटवा करी विचार । कां हो बांधिला यातिनें वैर । पाहतां दोष नसे अणुमात्र । मांस हार माझा हा ॥४४॥

म्यांच पराक्रमें करुन । मांसकवळ आणिला उचलोन । तेथें वाद करावया हे कोण भोगविती शीण भोगिती ॥४५॥

तंव तडतडा टिटवे तोडिती । छेदोनि काया विटंबिती । टाकी आमिष हें वदती । तैं तो चित्तीं समजला ॥४६॥

या आमिषलोभासाठीं । रिपुत्वें लागले माझे पाठीं । भोगविती दुःख कचाटी । प्राण शेवटीं घेतील ॥४७॥

प्राण कायचा करणें नाश । यास निमित्त लोभ आमिष । टाकोनि द्यावें मानोनि त्रास । तरीच सुखास पावेन ॥४८॥

ऐसे विवेकाचेनि बळें । सांडिलें अमिषाचें कवळें । तें पाहोनि फांकले पाळे । जावोनि कोसळले मांसावरी ॥४९॥

आशा लोभ सोडोनि देतां । टिटवा पावला मुक्तता । सुखसंतोषें आसनीं बैसतां । जाला पाहतां चमत्कांर ॥१५०॥

टिटवे पडले मांसावरी । लोभें पेटले महामारी । येरयेरांचे होवोनि वैरी । मरती झुंजारी विषयार्थी ॥५१॥

ज्या टिटव्यानें आमिष त्यागिलें । लोभ आशेतें समूळ सोडिलें । सुखी तो साक्षभूत जालें । हेंचि पावलें गुरुत्व आम्हां ॥५२॥

एवं आशालोभविषय दंडी । कधीं न धरावी हे तोंडी । जीवें भावें करावी सांडी । असक्त परवडीं वर्तावें ॥५३॥

आणिक एक योगासि मारक । मान अपमान असे देख । जगीं थोर हा लौलिक । अत्यंत सुख मानती ॥५४॥

जगीं पावतांचि मान । तेणेंचि राहे महत्व मानोन । चढों लागे अभिमान । म्हणे मी धन्य जगीं या ॥५५॥

त्या मानासी व्यत्यय येतां । सहज आली अवमानता । शाहाणाच देहीं पावे खिन्नता । अंगीं रोषता चढे बहु ॥५६॥

त्या रोषें बोले वर्म । काढी उकरोनी गंजीत कर्म । प्रत्युत्तरीं न धरिती शर्म । घडे अधर्म उभयतां ॥५७॥

अधर्में उपजे संताप । संताप तेथें महापाप । पाप तेथें ज्ञानलोप । आला विक्षेप सत्पदा ॥५८॥

यासाठीं अर्भक । पाहोनी गुरु केलें देख । अंगीकारिले गुण चोख । ते आवश्यक सांगतों ॥५९॥

अर्भक म्हणजे अज्ञानबाळ । क्षुधादुःखेंच करी कोल्हाळ । येर्‍हवीं आनंदे खेळे खेळ । अतिनिश्चळ निजछंदें ॥१६०॥

नाहीं पदार्थाची चाड । न सांगे रुचीचा निवाड । अग्नि दीपावरी घाली झड । आणील फोड कळेना ॥६१॥

सर्प विंचू उंदीर । कुतरे किंवा मांजर । दिसे भलता जो प्रकार । खेळीं कर वोढवी ॥६२॥

धरितां आपणालागीं पीडी । कांहीं कल्पना नुपजेच कुडी । सांपडे पदार्थ घाली तोंडीं । धरितां ओढी भल कांहीं ॥६३॥

कोणी पालखीं घातलें । कोणी भूमीच पहुडविलें । कोणीं अश्वीं बैसविलें । नाहीं विटलें मानसीं ॥६४॥

कोणीं रथावरी घातलें । कोणी शिबिकेमाजी मिरविलें । कोणी गजस्कंधीं वाहिल । नाहीं विटलें मानसीं ॥६५॥

कोणी बिदीमाजी ठेविलें । कोणी उकरडां लोळविलें । कोणीं चौरंगीं लोळविलें । नाहीं विटलें मानसीं ॥६६॥

कोणी आनंदें खेळविती । कोणी झिडकारोनि बोलती । कोणी त्राहाटोनि धमकाविती । परी खेद चित्तीं नये त्या ॥६७॥

कोणी बैसविती अंकावरी । कोणी नेवोनि ठेविती दुरी । कोणी ओढी चरण धरी । खेद अंतरीं नुपजे त्या ॥६८॥

कोणी म्हणती सखया बा रे। एक म्हणती मूर्खा कां रे । एक म्हणती झुडता रे । वेडाविती पोरें हांसे तें ॥६९॥

नाना परी जल्पती त्यासी । परी तें नेणे मानापमानासी । पाहोनि घेतलें त्या वृत्तीसी । निजकार्यासी साधावया ॥१७०॥

निजकार्यातें साधावे । म्हणोनिया गुणा अंगीकरावें । स्वात्मसुख प्राप्त व्हावें । याविषयीं धुंडावे वर्म कांहीं ॥७१॥

तें वर्म पुढीले प्रसंगीं । अवधूत सांगेल अनूसयेलागीं । तया सुखाचा उद्धव विभागी । तो कृष्णरंगीं रंगला ॥७२॥

कृष्ण तोचि दिगंबर । उभा पुंडलिकाचे समोर । क्षेत्रनामें पंढरपुर । वाहे सुंदर चंद्रभागा ॥७३॥

तेथें अविनाश नेमें करोन । नित्य करी तिलकधारण । भाविक अर्थिल्या दरुषण । कृपाधन प्रगट देतो ॥७४॥

प्रगट म्हणतां गुप्तपणा । लागूं पाहे या दूषणा । म्हणोनि करितों प्रार्थना । श्रोतेजनां पूढतीं ॥७५॥

जगदोद्धारास्तव अवतार । अविनाश हा दत्त प्रखर । गुप्त प्रगटाचा विचार । नसे अणुमात्र ते ठायीं ॥७६॥

प्रगटरुपीं तो विलसे । चर्या बालोन्मत्त पिशाच्च असे । रमतो जगीं अनंत वेषें । अज्ञाना दिसे हिरा गार ॥७७॥

पृथ्वीगर्भीं धन असे । अभागी पाहतां कोळसे । भाग्यवंता मांदुसें । अवलोकितां दिसे सहजची ॥७८॥

दर्शनधनाचे भाग्यवंत । ते हे तुम्ही साधुसंत । भक्तिभावा देखोनि दत्त । भेटे साक्षात सकृपें ॥७९॥

दत्त तोचि अनंत । अनंत घटीं व्यापला सत्य । निवासला राहे सर्वात । ओळखा महंत तुम्ही तो ॥१८०॥

तुम्हां असें सलगी त्याची । तुम्हीं पात्रें त्या कृपेचीं । करुणा येऊं द्या अनंतसुताची । सेवा पदाची मागतो ॥८१॥

आपले चरणींचें सेवन । निरंतर द्यावे मजलागून । कधींही न घडावे खंडण । व्हावे उन्मन त्या ठायीं ॥८२॥

सेवेमाजी मज उल्हास । समर्थे पुरवावी हेचि आस । म्हणविजे संती आपुला दास । न्यून सेवेस नाणिजे ॥८३॥

इति श्री दत्तप्रबोदह । श्रवणेचि पुरती मनोरथ । सदा परिसोत श्रोतेसंत । नवदशोध्यायार्थं गोड हा ॥१८४॥

॥ इति नवदशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP