श्री दत्तप्रबोध - अध्याय विसावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॥

श्रीसद्‌गुरु जगन्निवासा । मायातीता अविनाशा । हे दिगंबरा अनंतवेषा । पुराणपुरुषा तुज नमो ॥१॥

जय मायापुरनिवासिया । विज्ञानरुपा दत्त सदया । हे सर्वसाक्षी गुणालया । तुझिया पायां प्रणम्य ॥२॥

कर्मातीता कर्ममोचका । महामूर्ते तिमिरनाशका । पापदहना मोक्षदायका । भवतारका भाळ पायीं ॥३॥

मागां आपुले कृपें करुन । वदविलें तुझें त्वां गुणकथन । तैसेंचि चालवी निरोपण । जेणें श्रोतेजन संतोषती ॥४॥

श्रोते आर्थिक आणि चतुर । ज्ञाते विचक्षण धुरंधर । सप्रेम भक्तीं रंगले वीर । संधान सुंदर दृढासनीं ॥५॥

हें ग्रंथसरोवरींचे राजहंस । सेऊं इच्छिती अर्थमुक्तांस । निरोपणीं पुरविजे हेतूस । तेणेंचि उल्हास भाविकां ॥६॥

कुटिल भाविकां नावडे ग्रंथ । तयां वायसां नरकींच प्रीत । अमृतफळ होतां प्राप्त । रोग उद्भवत कंठमुखीं ॥७॥

शुंकेंचि सेवावें चूतरसा । तेचि स्वाद जाणती या सुरसा । अगस्ती पुष्पदेठीं झोंबे फारसा । तोही मधुरसा रस सेवी ॥८॥

हे दयानिधे करुणाकरा । तूं जाणसी सर्वांतरा । घालोनि कृपेच्या पांखरा । अंगीकारा शरणागता ॥९॥

श्रोतियां तुझें गोड चरित्र । तेंचि वदवी आतां पवित्र । भुकेलेति त्यांचे श्रवणीं श्रोत्र । लागले नेत्र मुखाकडे ॥१०॥

देखोनि आवडीचा प्रेमा । कृपा उपजली सर्वोत्तमा । आठव देवोनि चालवी क्रमा । माते भ्रमा टाकी म्हणे ॥११॥

गंत कथाध्यायाशेवटीं । म्यां निवेदिली अर्भकराहाटी । ते त्वां साठविली पोटीं । आणिक गोष्टी सांगेन ॥१२॥

अनसूया म्हणे रे कुमारा । अवतार घेतलासी जगदोद्धारा । जो जो सांगसी सुंदरा । तो तो खरा हितार्थ ॥१३॥

बोधप्रद करिसी निरोपण । तें मी ऐकतें सावधान। गोड लागे अमृताहुन । करितें श्रवण सांगे तूं ॥१४॥

पांचा गुरुंचे गुण उरले । कवणे कार्या कैसे घेतले । तें मज पाहिजे त्वां कथिलें । मन अर्थिलें श्रवणार्थी ॥१५॥

परिसोनि मातेच्या उत्तरप्रश्ना । अविनाश म्हणे ही सप्रेम तृष्णा । निरोपणीं पुरवूं कामना । जडली भावना धारणेची ॥१६॥

माते चोविसांतील एकोणीस । गुरुगुण सांगितलें म्यां तुम्हांस । मानोनि घेतले देहबुद्धीस । उपयोगी योगास म्हणोनी ॥१७॥

हें विवेकें घ्यावें बाणवून । करावा योग परिपक्व पूर्ण । परी अनेक दृश्य व्यवधान । न घडे कारण या गुणें ॥१८॥

गुरु धुंडिता म्यां यासाठीं । तंव कुमारी पाहिली एक दृष्टीं । तिचीं देखोनि म्यां राहाटीं । गुण पोटीं सांठविले ॥१९॥

त्या कुमारीचें लक्षण । तुज मी सांगतो सावधान । द्विजयाति परम पावन । कुळनिधान कुमारी ते ॥२०॥

अत्यंत उपवर ती कन्या । चतुर गुणे रुपलावण्या । एका उणें ती अमान्या । संकल्प अन्य न पाहे ॥२१॥

तीतें ठेवोनिया सदनीं । मातापिता गेले दूर स्थानीं । जातां सांगती कुमारीलागुनी । आतिथ्य जनीं करावें ॥२२॥

निवेदोनि गेले कार्यासीं । तंव अकस्मात एकेदिवशीं । पाहुणे पातल आश्रमासी । आसन तयांसी दीधलें ॥२३॥

आपण असे उपवर । लाजे हिंडावया समोर । मनीं ओळखोनी क्षुधातुर । साळी सत्वर काढिल्या ॥२४॥

यांचे करोनिया कंडण । करावया द्यावें भोजन । यासाठीं लगबगें करुन । उखळ झाडून बैसली ॥२५॥

न पडतां कवणाचे दृष्टीं । कार्य मांडिलें उठाउठीं । पाहतील म्हणोनि द्वार लोटीं । लाज पोटीं उपवराची ॥२६॥

मुसळ घेवोनिया करीं । घाव घाली साळीवरी । तव कंकणाचे गजरीं । खोंचला अंतरीं लज्जाशर ॥२७॥

हें थोंर कामिनींचें कंकण । नाद कळेल बाह्यालागून । वधूपणा येईल दूषण । लज्जा गहन उद्भवली ॥२८॥

मग विचारें काय केलें । स्वयुक्तीं कंकणे उतरिलें । दोन दोन करीं ठेविलें । पुढती मांडिलें कांडण ॥२९॥

घाव मुसळाचे घालिता । दोहींमाजी शब्द झाला निघता । म्हणे हें प्रर्वतलें लज्जाघाता । काय आतां करावें ॥३०॥

लोक अपवादालागून । सर्वापरी बैसलें झांकोन । तेथें हे नाद करिती कंकण । जाणतील खूण बाह्यार्थी ॥३१॥

म्हणतील हे वधू कैसी । धांगडी कळेल लोकांसी । युक्त योजावी कांहीं ऐसी । जेणें बाह्यांसी न कळे वर्म ॥३२॥

मग एक एक काढी कंकण । दोहीं करीं ठेविलीं दोन । सेखीं आरंभिलें कांडण । नाद संपूर्ण निमाला ॥३३॥

साळी कांडोनि तांदुळ केले । इंधनासहित बाहेर दिले । पाहुणे जेवोनि मार्गी गेले । कार्य साधिले कुमारीनें ॥३४॥

हा गुण घेतला साधनी । एकाकी राहिलों होवोनी । द्वैत टाकिलें नासोनी । अद्वयपणीं मिरवलों ॥३५॥

हा कुमारीचा गुण उत्तम । गुप्त आच्छादिलें आपुलें वर्म । एकाकीं साधिजे आपुला धर्म । लौकिकीं संभ्रम नसावा ॥३६॥

परी हें अनिवार मन । देखिलें तिकडे बहकें जाण । कैसे सिद्ध कारण । करवी भ्रमण ओढाळ हें ॥३७॥

मन चंचल हें अनिवार । कोण करावा या प्रकार । ऐसा जंव होतों चिंतातुर । तंव शरकार भेटला ॥३८॥

तो शरकार कोण म्हणसी । शरकर्ता होय निश्चयेंसी । त्याचें वर्म सांगतों तुजसी । सांठवी मानसीं गुण त्याचा ॥३९॥

तो शरकार दुकानीं बैसला । बरुभारा निवडिता जाला । दृढ कठिण निवडोनि काढिला । तोचि योजिला शरासी ॥४०॥

बेत प्रमाण तया खांडी । सहस्त्रावधि करोनि काडी । बैसवी तयांसित कोंडी । पराते जोडी वेष्टुनीं ॥४१॥

फळें नानापरीं घडित । तयां बाणमुखें ऐसें म्हणत । सतेज तीव्र धारा करोनि लखलखित । जोडोनि देत कुशलत्वें ॥४२॥

एकाग्र करोनी मन । पुच्छा पाहोनि मुखा योजून । साधी त्याचें सरळ संधान । वक्र गमन मोडीं त्याचें ॥४३॥

नाना परिंचें रोगणें रंग । देवोनि करीतसे सांगोपांग । तया मार्गे अनेक प्रसंग । वागती जग भूप दिसेना ॥४४॥

तों अकस्मात एक दूत आला । तो शरकर्त्यांसी पुसता जाला । राव येणेंचि मार्गें गेला । नाहीं देखिला येरु बोले ॥४५॥

दूत पेटोनि बोले क्रोधमाना । भूपासवें गेली अद्‌भुतसेना । काय न दिसे तुझिया नयना । गर्जना काना न कळेची ॥४६॥

इतर म्हणती सत्य गेला । तूं म्हणसी देखिला न ऐकिला । काय म्हणावें आतां तुजला । भ्रमी पडला कोणत्या तूं ॥४७॥

येरु म्हणे करितां हे शर । चित्त असतें एकाग्र । वृत्ति होतां तदाकार । पडे विसर देहाचा ॥४८॥

जेथें देहाचा होय विसर । तेथें कोण कैंचे आपपर । नाही साचि वाटे अन्य वेव्हार । एकाग्र विचार ऐसा हा ॥४९॥

एकाग्रते वांचोनिया । नयेचि कार्य कदा घडोनिया । स्वकार्यीं विनटलों ठायां । म्हणोनि वायां रे जाये ॥५०॥

हेचि एकाग्रतेची खूण । इंद्रियव्यापार जाती हारपोन । नाठवे कदा भूक तहान । गेले गुंतोन मन तेथें ॥५१॥

हा गुण माते म्यां घेतला । तेणेंचि मनोजय मज घडला । हितार्थ गुण हा फावला । म्हणोनि वंदिला शरकार ॥५२॥

साधन साधावया एकाग्र । मठ गुंफा पाहिजे मंदिर । आणि कांहीं संगविचार । ऐसें अंतर करुं इच्छी ॥५३॥

तंव पुढें म्यां सर्प देखिला । तो एकाकी फिरे एकला । निःसंग वावरों लागला । गुण घेतला तोचि म्यां ॥५४॥

मंदिर पाहतां तयासी । करणेंचि नाहीं निश्चयेंसी । कांहीं न करी संग्रहासी । आयत्या ठायासी राहतो ॥५५॥

प्रथम पिपीलिका करिती घर । मृत्तिका काढिती बाहेर । गर्भीं ठायीं ठायीं विस्तार । करिती प्रकार स्थळाचे ॥५६॥

तेथें मुंगळे रीघ करिती । मुंगिया समूळ पळोनि जाती । मुंगळे तेथें बहु प्रसवती । मृत्तिका काढिती करिती घरें ॥५७॥

खडे माती काढोन । स्थळें करिती विस्तीर्ण । वर्षाकाळीं निघती तेथून । उदकें भिजून स्थळें जातीं ॥५८॥

तेथें वाळव्या करिती संचार । ओली मृत्तिका काढिती बाहेर । आपुलाले जमवोनि स्थळप्रकार । बांधिती घर वेगळालें ॥५९॥

जंव जंव मृत्तिका काढिती । तंव तंव वरी वारुळे वाढती । ठायीं ठायीं द्वारें राखिती । माजी संतती तयांची ॥६०॥

वस्ती करितां बहुवस । वारुळें पावती वृद्धीस । नित्य भक्षिती गोमयास । नेवोनि विशेष सांचविती ॥६१॥

गोमय बाळव्याचे गद्‌बदे करोन । तेथें अळिका होती निर्माण । तेहि तेथें पावताती मरण । प्रारब्धें चुकोन क्वचित राहे ॥६२॥

ते बहु दिवस राहतां । तो कीटक पावे स्थूळता । सकुमार शुभ्र निर्मळता । होय भक्षिता वाळव्यातें ॥६३॥

तया कीटकासि म्हणती राजा । तो धातुक्षीणाचिया पडे काजा । अंजनींत या योजा । वदलो सहजा गोष्टी हे ॥६४॥

असो किडयाकीटकांचे जें स्थळ । तें उंचावतां म्हणती वारुळ । अंतरीं ठायीं ठायीं पोकळ । वरी सबळ कठिणत्वें ॥६५॥

तया आयते मंदिरांत । येवोनि सर्प राहे तो निवांत । श्रम न करितांची प्राप्तः । सुखें विचरत स्वानंदे ॥६६॥

स्वारस्य येथें हेंचि कारण । तेणें काय श्रम केलें गृहालागुन । भलतें बिळीं राहोन । काळ क्रमण करीतसे ॥६७॥

सर्प बैसे फिरे डोले । परी कोणासि कांहीं न बोले । मौनचि राहे सर्व काळे । हें वर्म आगळे उपेगी ॥६८॥

क्वचित भेटे स्वजातीचा । तो प्रश्न करी जरी आनंदाचा । तैंच उत्तर निघे वाचा । येर्‍हवीं त्याचा शब्द नाहीं ॥६९॥

एवं सर्पापासोनि गुण चार । गुरु मानोनि केला अंगीकार । येणें योगधारणा बाणे सुंदर । निःस्पृह निरंतर वागावें ॥७०॥

मातें या संसारी कैसें वर्तावें । काय आधार धरोनि वागावें । संदेह घेतला जीवें । न पडे ठावे जाला भ्रम ॥७१॥

याचिया शोधासाठीं । म्यां शोधिली सकळ सृष्टी । तंव कातणी पडिली दृष्टी । अगाध गोष्टी पाहिली ॥७२॥

तीचिये नाभीपासून । तंतु होतसे निर्माण । त्याची तंतु आधारे वावरें पूर्ण । जाय चढोन उतरे फिरे ॥७३॥

नाना मंडपांचे आकारे । त्या तंतूची बांधी घरें । पाहतां दिसती चमत्कारें । आपण वावरें तयांवरी ॥७४॥

तंतु उंच स्थानीं गुंतवोनी । आपण पावे तळवट भुवनीं । सवेंची तंतु घे आंवरोनी । जाय चढोनी पूर्वस्थळा ॥७५॥

अनंतावधि घरें केलीं । परी तंतु न सरे कदाकाळीं । खेळखेळोनि राहे निराळी । गुंतोनि एक स्थळीं न बैसे ॥७६॥

न धरी मागिल्याची आस । क्षणाक्षणां रचि पुढें विशेष । पाहतां औडंबर दावी सोस । होतां नाश न दुखवे ॥७७॥

उपसर्गे गृहें मोडती । परी देहीं न मानीच ते खंती । दृढ तंतु धरोनि चित्ती । होय रचिती अनेक ॥७८॥

सर्व ठायीं भ्रमे आपण । क्षण एक बैसे स्थिर होवोन । मागुतीं तोच वेव्हार तिजलागोन । अनुसंधान तंतूचें ॥७९॥

एवं कातणीचा उपदेश । म्यां गुण घेतला विशेष । सोहंतंतु व्यापक सर्वांस । नाहीं नाश तयातें ॥८०॥

त्या तंतूचेनि आधारें । वावरति मणिवत शरीरें । वेव्हारती सोपस्कारें । भरोनि उरे आकळ तो ॥८१॥

आणिक एक व्यवस्था । तुज कल्पनीय सांगतो आतां । कातणी हे माया पाहतां । पुरुष सांठविता होय पोटीं ॥८२॥

ब्रह्मरुप पुरुष जाणा । तंतुरुपे नाभिस्थाना । त्या कातणीस उद्भवे कल्पना । प्रसव त्रिगुणा ऐंक्यत्वें ॥८३॥

ते त्रिगुण म्हणसी कैसे । कातणी कल्पना तंतु असे । त्या तंतूचेनि सौरसे । खेळ विलसें रची नाना ॥८४॥

धरोनि आधार तंतूचा । खेळ विस्तारला मायेचा । घटमठादि भाव त्या पटाचा । रची एकाचा अनेक ॥८५॥

अनेक पाहतां असे एक । अनेक दाविलें ते मायिक । मनीं करोनि पाहतां विवेक । अवघे ठक एक खरें ॥८६॥

पैल कापसापासोन । तंतु होतसे निर्माण । तयाचे पट नानाविध करोन । रंगें श्रृंगारोन विविध केलें ॥८७॥

नामें अनंतची प्रकार । धारणीं शयनीं प्रावरनीं अंबर । तयाचें घर आवार । छ्त्र चामर ध्वजादि ॥८८॥

पोतें भोत आणी गोणी । मूठवळी अनेक वहनीं । नाना वस्तु विस्तारोनी । प्रत्यक्ष जनीं पाहा हे ॥८९॥

रुचीं उपभोगें रमले । अंगीकारोनि त्यातें भ्रमले । हें प्रत्यक्ष तूंते दाविलें । त्वांही पाहिलें बहुतेक ॥९०॥

विवेकें याचा शोध करी । वरील रंगातें अव्हेरी । अंतर पटातें शोधी बरी । काय अंतरीं दिसे तुज ॥९१॥

अनसूया म्हणे रे दत्ता । रंग सरतां उरे पटता । पटामाजी निरखोनि पाहतां । तंतूची व्यापकता दिसतसे ॥९२॥

अविनाश म्हणे जननिये । सर्व कारण तंतू होये । अनेकत्वें होय जाये । सेखीं राहे कर्पासीं ॥९३॥

जैसी कापसाची मोट । तेवींच कातणीचें पोट । नाभिछिद्रीं निघें चोखट । सूत नीट वोढितां ॥९४॥

तो कापूस बीजां जाला । बीज असें वृक्षफळा । वृक्षबीजीं उद्भवला । उद्भवोनी राहिला बीजांत ॥९५॥

ते बीज प्रकार अनेक । अनेकांचे प्रकार एक । तें तुज कळावें आवश्यक । तरी उपाय एक सांगतों ॥९६॥

तें बीज वृक्षीं आहे । वृक्ष तरी तूंचि होसी पाहे । परी त्या बीजाची दावितां सोये । सद्‌गुरु होये निजदाता ॥९७॥

त्या बीजाचेंही गुज । एक जाणेअ सद्‌गुरुराज । तोचि साधविता होय काज । महाराज जगत्राता ॥९८॥

त्या शरण जाय सांडोनि लाज । त्यापाशीं असती सर्व इलाज । त्याची कृपा होतां सहज । पुरवील चोज अंतरीचें ॥९९॥

सद्‌गुरु कैसें काय करिती । ऐसी मज होती सबळ भ्रांती । या भ्रांतीची व्हावी निवृत्ती । फिरलो यदर्थी भूमी बहु ॥१००॥

तंव एका कानानाभीतरीं । रम्य स्थळीं बैसलों विश्रांतीवरी । दृष्टीं निरखितां ते अवसरीं । नवल परी देखिली ॥१॥

भ्रमण करीत पेष्कार । अळिका धरोनि पावला सुंदर । एका वृक्षी होतें घर । करवी संचार आळिकेसी ॥२॥

मंदिरी अळिकेतें ठेविलें । द्वार बुजवोनी त्यानें घेतलें । तें म्यां प्रत्यक्ष दृष्टीं पाहिलें । आश्चर्य वाटलें निरखितां ॥३॥

काय कैसें होईल याजला । हा छंद मातें दृढ लागला । मी नित्य अवलोकीं त्याला । नवलावो देखिला विशेष ॥४॥

तो भृंग नित्य येवोन । स्वकाटा टोंची त्यालागोन । ऐसे लोटतां कित्येक दिन । निघे आंतोन भृंगची ॥५॥

विवेकें मनीं विचारिलें । कीं अळिके प्रत्यक्ष घातलें । भृंगसंसर्गें भृंगत्व पावले । उडोन गेले भृंगांत ॥६॥

एकांत गुंफे अळिकेसी । पेष्कार भंग करी त्यासी । संस्कारें पाववी स्वस्वरुपासी । पूर्वता त्यासी नुरवीच ॥७॥

केवढी त्याची पहा नवलाई आपणाऐसेचि करी पाहीं । अणुमात्र तया भेद नाहीं । पेष्कार होई पेषस्कारा ॥८॥

तो गुण अंगीकारोन । मी सद्‌गुरुसी गेलों शरण । तेणें माझें हरो मीपण । केलें आपण तद्रूप ॥९॥

मी अनन्यभावें शरण जातां दयां उपजली कृपावंता । परीक्षोनि जाणीतली व्यथा । म्हणे न करा चिंता वत्सा तूं ॥११०॥

उदारतेंचे ऐकोनि उत्तर । सदृढ चरणीं ठेविलें शिर । तेणें देवोनि अभयकर । बीजमंत्र दीधला ॥११॥

कर्णद्वारें तें रसायन । देवोनि केलें पावन । बोधोनिया दिव्यज्ञान । समूळ अज्ञान नासिलें ॥१२॥

जें रचिलें असें ब्रह्मांडीं । तेंचि दाविलें मज पिंडी । तत्त्वज्ञानाची परवडी । अति चोखडी बोधिली ॥१३॥

जीवशिवाचा जो प्रकार । पंचभूतांचा वेव्हार । पंच प्राणांचा प्रसार । तो सविस्तर बाणवी ॥१४॥

हें हितार्थ आत्मज्ञान । तो सद्‌गुरु दे मजलागून । विकार त्यगवोनि संपूर्ण । निर्विकारण बिंबवी ॥१५॥

नाशिवंतातें नाथिलें । अविनाशवस्तूतें भेटविलें । तें सुख अत्यंत आगळें । योगिया कळे योगमार्गें ॥१६॥

तो योग साधावा शुद्ध । तेथें उपजे सत्य आनंद । अनेक आनंदाचा कंद । तो ब्रह्मानंद हातीं ये ॥१७॥

ब्रह्मानंद आलिया हाता । नुरे जन्ममरणाची व्यथा । वारे जीवींची तळमळता । निर्विकल्पता प्राप्त होय ॥१८॥

यासाठीं विनय होवोनी । माते लागें तुझिया चरणीं । प्रार्थीतसें जोडोनि पाणी । स्वहितसाधनीं सावध हो ॥१९॥

शाश्वत नाहीं या देहाचें । त्यांत नाहीं हें उपेगाचें । सर्व देहांमाजी नीचें । खादें काळाचें शेवटीं ॥१२०॥

अनेक देह नाना असती । मेलियाही त्यांचे उपयोग होती । किती म्हणोनी तुजप्रती । सांगूं ख्याति निवडोनी ॥२१॥

पशु जीतां करिती कामें । कोणी राहूं नेदे रिकामें । मेलिया उपयोगा येती चर्मे । मांससंभ्रमें भक्षिती ॥२२॥

अस्थि दंत गजाचे । सर्वही असती कामाचे । पुच्छें वारिती वनगायीचें । पक्षी पक्षाचे वस्तु नाना ॥२३॥

सर्वामाजी नीच सूकर । तोही भक्षिती कित्येक नर । मेलिया दंत सुंदर । कुंचे अपार केशांचे ॥२४॥

नाडी पशूंच्या कामा येती । तयांपासोनि तांती होती । जलचरेंही त्याच रीतीं । सांगू किती वनचरें ॥२५॥

सकळांहोनि हीन नरदेहे । याचें कांहींच कामा नये । त्वचा मांस मेद शिरा नासोनि जाये । अस्थि अकय उपयोगी ॥२६॥

देहो अग्नीनें जाळिला । दशांग तो पुत्रें वेंचिला । शुद्ध करोनि ठेविला । सेखीं टाकिला तीर्थांत ॥२७॥

परी उपयोगा न मागें उरले । वायांचि तें व्यर्थ गेलें । जन्मोनिया काय केलें । शीण भोगिले प्रपंची ॥२८॥

जें देहाचें आयुष्यप्रमाण । त्यांत निद्रार्णवीं अर्ध जाण । निम्में उरलें त्याचें कारण । सांगतो निवडून पृथकची ॥२९॥

चतुर्थांश तें बाळपण । दोन भाग तें तारुण्य । उरल्या शेषीं वृद्धापमान । होय विटंबन शरिराचें ॥१३०॥

बाळपण गेलें खेळतां । तारुण्य विषयलोभ चिंता । आशा द्वैत वाढे अहंता । कोण स्वहिता उपजे जेथें ॥३१॥

स्वहित सुकृत न घडे तया । अंतीं जाणें यमालया । विषयभोगें विटंबिती काया । तेथें सुटावया ठाव नाहीं ॥३२॥

जैसे विषय भोगिले । स्वार्था परां पीडिलें । अहंतालोभे बहुतां त्रासिलें । सुख न दिधलें कवणातें ॥३३॥

मोहो ममतें होवोनि वेष्टित । प्रपंचहिता केले घात । कामलोभींच ठेविलें चित्त । मानिलें आप्त स्वजनासी ॥३४॥

गण गोत पुत्र मित्र । भ्रतार कांता कन्या कलत्र । श्यालाक मामे भाचे अन्यत्र । उभय गोत्र पोसिले ॥३५॥

जोंवरि भाग्याची दैवगती । तोंवरी हां जी हां जी म्हणती । मोहो ममतें फोलोनि खाती । सुख भोगिती सर्व गुणें ॥३६॥

जैं भाग्यओघ सरे । तैं यात्रा अवघी वोसरे । कितेक धरोनि बैसती आसरे । देती घसरे तोडिती ॥३७॥

अंतीं येतां हीनपण । मग सर्वही देती लोटोन । कामा येती आप्तजन । वांछिती मरण कधीं ये ॥३८॥

लोभ मोहीं गुंतोनि प्राणी मेला । लौकिकमोहें रडे पाळा । स्मशानीं बोळवीत आला । पुनरा गेला आश्रमा ॥३९॥

देह गेला जळोन । प्राणी दूतें नेला बांधोन । भोगा ऐसें शासन । देह देवोन करिताती ॥१४०॥

नाना परी तेथें जाचिती । असिपत्रीं लोळविती । कुंभीपाकीं पचविती । डोळे फोडिती कागमुखें ॥४१॥

तप्त स्तंभाते बांधोन । वरी नग्न शस्त्रें करिती छेदन। घायीं तीक्ष्ण रस ओतोन । शिस्त्र तोडोनि मुखीं देतीं ॥४२॥

प्राणी होतसे कासावीस । जीवीं मानीं बहु त्रास । सोडविण्याची पाहे वास । कोण्ही न तयास मुक्त करी ॥४३॥

जे का पोसले पाळिले । प्राणें आप्त ऐसें मानिलें । सोडवावया कोण्ही न आले । व्यर्थ पोसिले तैं कळे ॥४४॥

असो प्राणी स्तंभींचा सोडिला । पुनरा विखार झोंबवितां देहाला । लहरा वेग ना सोसिता जाला । सोडविता त्याला कोण्ही नसे ॥४५॥

सेखीं सांडसें तोडिती मास । सळ्या खोचिती कर्णास । सवेंचि ओतिती तीक्ष्ण रस । प्राणी कासावीस बहु होय ॥४६॥

जीवीं बहु त्रास मानी । म्हणे दुष्ट घडली मजपासोनि करणी । आतां किती सोसूं ही जाचणी । न दिसे निर्वाणीं कोण्ही मज ॥४७॥

विटंबनीं ये काकुळती । परी दया न ये कोण्हाप्रती । मस्तकावरी टोले देती । ग्रीवा पिळिती पाडोनी ॥४८॥

अंतर्माळाचे काढिती भार । पाषाण घालिती दंतांवर । भगद्वारीं तप्त पहार । खोंचोनि सदर फोडी माथा ॥४९॥

परी न जाती तेथें प्राण । यातना भोगविती दारुण । घाणीं घालती नेऊन । काढिती पिळोन तिळापरी ॥१५०॥

अट्टाहासें मारी जीव हांका । कोण्ही सोडवावया नाहीं सखा । केलें कर्म भोगणें देखा । कदा चुका न पडे तो ॥५१॥

अतिदुःखातें भोगविती । रवरवनरकामाजी लोटिती । मर्यादा तोंवरी राखिती । लोटोनि देती प्राणिया ॥५२॥

जैसें असें कर्माचरण । तैशाच योनीस पावे जनन । तेथें नाना दुःखें भोगोन । सेखी मरण गांठीसी ॥५३॥

एक एक योनी कोटि फेरे । ऐशीं लक्ष चौर्‍याशींचीं घरें । तैं हे आवघे वोसरे । लागे वारें मानवी मग ॥५४॥

त्या मानवदेहीं चुकतां । पुनरा मागुती भोगणे गोता । पापपुण्य समान होतां । लाभे अवचितां नरदेहो ॥५५॥

जेवीं कीटक काष्ठ उकरी । नेणतां तो पडे अधरीं । कीं काग सांपडे जेवीं करीं । भानवसिवरी ससा जेवीं ॥५६॥

तेवीं हा अलभ्य नरदेह लाभे । सर्वां वरिष्ठ दिव्य शोभे । जो मान्य केला रमावल्लभें । ज्याचेनि लोभें लोभावला ॥५७॥

उत्तम हा मानुषदेहा । ऐसें बोलिला रमानाहो । तो वृथा गमवितां कां हो । करावा लाहो आत्महिता ।५८॥

उत्तम नरदेहो निर्धार । परी हा असे क्षणभुंगर । त्यांत दुर्लभ लाभविचार । या सर्वेश्वरप्राप्तीचा ॥५९॥

माते दुर्लभ नरदेह पावलीस खरा । याचा लोभमोहें न करी मातेरा । जोडोनि परब्रह्म सोयरा । परात्परतीरा पाव वेगीं ॥६०॥

हा नरदेह जातां हातिंचा । मग लाभ तरी जोडेल कैचा । यासाठीं कळवळे जीव साचा । विनवी वाचा माते तुज ॥६१॥

पावलीस तूं हें उत्तम क्षेत्र । स्वहित कारणा अतिपवित्र । आत्मज्ञान साधावया पात्र । यावीण अन्यत्र सत्य नाहीं ॥६२॥

क्षणक्षणा आयुष्य जाये । विचारोनि माते सत्य पाहे । देहीं वेगीं सावध होये । धरि पाये सद्‌गुरुचे ॥६३॥

मोह मायिकातें त्यागी । आत्मज्ञानपदार्था उमगी । तत्त्वज्ञानाचेनि संयोगी । सुख भोगीं चिद्रूपीं ॥६४॥

तंव अनसूया म्हणे रे बाळा । मजविषीं उपजला तुज कळवळा । ज्ञानसागरा परम सुशीळा । तारक सोहोळा बोधिसी ॥६५॥

भवभीतीचें करोनि विवरण । उपाव सांगसी व्हावया शमन । तो सत्य बाणला मजलागोन । जाईन शरण गुरुवर्या ॥६६॥

गुरुगुणाचे प्रकार । त्वां निरोपिले सविस्तर । तोही बाणला मजसी विचार । रहणी सुंदर योगासी ॥६७॥

ऐकोनि तुझें निरोपण । मज आठवलेति कांहीं प्रश्न । ते तूं करोनिया श्रवण । करी समाधान पैं माझें ॥६८॥

अवाढव्य रचिळें हें ब्रह्मांड । तेवींच म्हणसी असे पिंड । लघुमाजी हें प्रचंड । ऐकतां बंड दिसे मज ॥६९॥

तत्त्वज्ञान म्हणजे काय । कोनापासोनि कोण होय । त्रिगुणव्याप्तीची सोय । कैसा विलय तो सांग ॥१७०॥

हें म्यां तूतें विचारिलें । तें पाहिजे पुरविले । अवधूत बोले तये वेळे । उत्तम केलें प्रश्न मज ॥७१॥

मातें विनंती परीयेसि । मज भ्रमणें नित्य या जगतीसी । अस्तमानीं घ्यावया दर्शनासी । येणें तुजपाशीं जननीये ॥७२॥

नित्य रजनी माझारी । तुज तोषवीन प्रश्नोत्तरीं । सुचित होवोनि अंतरी । श्रवण करी साक्षेपें ॥७३॥

पुढलिये प्रसंगीं योगिराणा । माते निरोपील आत्मज्ञाना । योगी जाणती तेथिंच्या खुणा । अद्‌भुत रचना गुह्यार्थ ॥७४॥

आगमनिगमाचें गुह्यगुज । तें तुम्हां संतांचें असे निज । विरळाचि जाणे त्याची वोज । कृपेवीण काज घडेना ॥७५॥

प्राप्त व्हावया कृपादान । संत सज्जनांचे लक्षोनि चरण । अनंतसुत हा बंदीजन । कर जोडोन विनवीतसे ॥७६॥

तुमचा म्हणवीतसे किंकर । माझा तुम्हांवरी असे भार । आपुला म्हणवोनि कृपाकर । देवोनि अंतर तोषवा ॥७७॥

आपुला लडिवाळ जाणोनी । कृपा कीजे संतजनीं । मज पामरालागोनी । नसे कोण्ही तुम्हांविण ॥७८॥

तुम्ही संत साधु ज्ञानी महंत । उदार सर्वज्ञ पंडित । केवळ ईश्वरमूर्ती साक्षात । मायबाप सत्य तुम्ही माझे ॥७९॥

माझी बोबडी आर्षवाणी । तुम्ही स्वकृपें गोविली निरोपणीं । ते शब्द घेतां गोड करोनी । लेतां श्रवणीं अर्थमुक्ता ॥८०॥

सेवा घ्यवी दासा हातीं । ऐसें वागलें तुमचे चित्तीं । म्हणोनि ग्रंथीं देवोनि मती । कथा वदविती अद्‌भूत ॥८१॥

भृगुनारदाचें संमत । कांहीं दत्तमुखींचा इत्यर्थ । शोधोनियानिया नाना ग्रंथ । निवडोनि भावार्थ जाणविला ॥८२॥

प्रश्नादर हा सुरस निका । बोधप्रद लाभ सकळिकां । दत्तची वदवी नेटका । मज बाळका करोनि पुढें ॥८३॥

पुढें त्याचा तोचि वदेल । आपलें ज्ञान निरोपील । मातेचे मनोरथ पूर्ण करील । श्रवणीं तोषवील संतजनां ॥८४॥

कथा रसाळ हे पावन । गोड अधिकाधिक करितां श्रवण । निरसोनि जाय सकळ अज्ञान । होय ज्ञान दत्तकृपें ॥८५॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । यासी नारदपुराणींचें संमत । श्रोते परिसोत भाविकभक्त । विंशतितोध्यायार्थ गोड हा ॥१८६॥

 

॥ इति विंशतितमोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP