श्री दत्तप्रबोध - अध्याय सतरावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॥

ॐ नमो सद्‌गुरु अभयकारा । सदय उदारा ज्ञानसागरा । अविनाशरुपा परात्परा । जगदोद्धारा जगत्पते ॥१॥

जय जगन्निवासा भयनिवारणा । जय अनाथनाथा भवभंजना । करुणाकर विश्वरंजना । रिपुकंदना नमो तुज ॥२॥

जय त्रिविधतापशमना शांता । जय त्रिगुणातीता भेदरहिता । अनंत कल्याणा अनंता । दत्त समर्था नमो तुज ॥३॥

तव कृपाकटाक्षें करुन । ग्रंथ वदविसी आपुला आपण । वाढविसी आपुलें महिमान । दासा पावन करोनिया ॥४॥

अद्‌भुत जे तुझी लीला कीर्ति । ते वर्णावया देवोनि मति । उदार चित्त लाविजे ग्रंथीं । हृदयीं प्रीती उद्‌भवोनी ॥५॥

गत कथाध्याय शेवटीं । मातेसि सांगे गुज गोष्टी । अत्रीसी शरण जाय उठाउठीं । करी साठी ज्ञान गुह्य ॥६॥

मायामोहो अनिवार । हा तुजसी बाधक थोर । हा तुटावया साचार । तुज विचार सांगितला ॥७॥

आशा लोभ हा कठिण । येणेंचि प्राणी पावले बंधन । सर्वस्वीं गेलेत भ्रमोन । नाश दारुण यायोगें ॥८॥

अनिवार ही ईश्वरी माया । हेंचि कारण उद्‍भव लया । जीव टाकिला भ्रमोनिया । क्रयविक्रया विषयार्थी ॥९॥

काम क्रोध मद मत्सर । दंभ आणि अहंकार । यांसंगें नाना विकार । घडती अनिवार नावरती ॥१०॥

लोभ मोहो आणि आशा । हेचि गुंतवी नेवोनि पाशा । मूळ होय जीवित्वनाशा । वाढवी दुराशा आगळीच ॥११॥

जैसा कोसला घर करी आपणासी । स्वकरें गुंतोनि पडे पाशीं । द्वार न ठेवी निघावयासी । शेवटीं घातासी पावला ॥१२॥

तेवीं विषयलोभीं जीव गुंतले । जन्ममरणाचें आवतणें घेतलें । फेरी फिरतां बहु कष्टले । परी न उबगले सर्वथा ॥१३॥

जया झोंबला विखार । तया निंब गोड फार । लवण तीक्ष्ण साखर । कटु निर्धार गूळ म्हणे ॥१४॥

शीत पदार्थ उष्ण लागती । उष्ण तेचि शीत बोलती । भ्रम निद्रा दाटती । मुंगिया चढती चरण जड ॥१५॥

कीं करी जो मदिरापान । तो अत्यंत जाय भ्रमोन । चिखलीं लोळे आनंदघन । बडबडी भाषण भलतैसें ॥१६॥

विटंबन व्यथा न कळे तयासी । सुख आनंद मानी मानसीं । हें दुःख न कळे निश्चयेंसी । उन्मादयोगेंसी तल्लीन ॥१७॥

त्या विरहित जे कोणी । याचें दुःख ओळखिले त्यांनीं । देऊं जातां शिकवणी । भ्रमित मनीं नावडे ॥१८॥

परी सावधानाचें तळमळे मानस । योजोनि सांगती उपायास । मानी ते पावती सुखास । न घडे नाश कल्पांतीं ॥१९॥

याचविषयीं विनंती । अंबे करितों तुजप्रती । उतार्‍यावीण निश्चिती । विष कल्पांतीं उतरेना ॥२०॥

रोग होतां शरिरासी । जाणेंचि लागे वैद्यापाशीं । औषध देवोनि वेगेंसीं । रोगा नाशी निश्चयें तो ॥२१॥

नाना परिचे विखार डसती । जीवीं व्याकुळ चरफडती । ते उतार्‍यावांचूनि न हरती । उतारे उतरती क्षणमात्रे ॥२२॥

तेवींच मार्गीं चालतां । पर्जन्यकाळीं अडवी सरिता । ते उतार्‍यावांचोन सर्वथा । पैल जातां नये कीं ॥२३॥

याचि प्रकारें करुन । जीव भवभ्रमें गेला गुंतोन । येथोनि काढवया समर्थ कोण । एका सद्‌गुरुविण दिसेना ॥२४॥

तो हा भवसागरीचा तारु । महा समर्थ सदयगुरु । भ्रांति छेदोनि पैलपारु । नेईल निर्धारु शरणागता ॥२५॥

भवभयातें सत्य वारी । भ्रांति कल्पनेसी निवारी । अभय देवोनिया तारी । समान करी आपुलिया ॥२६॥

आणिक अनसूये परियेसी । म्यांही उपाय केले भय हरावयासी । शरण जावोनि बहुत गुरुंसी । सकळ भ्रांतीसी वारिलें ॥२७॥

बहु उपदेश अंगीकारिले । त्या शस्त्रेंचि अज्ञान छेदिलें । विवेकज्ञान प्राप्त झालें । अविनाश पावलें पद मातें ॥२८॥

देहींचा गेला द्वैतभेद । चिंता निरसला गेला खेद । चित्त झालें निर्द्वंद्व । झाला बोध अनुपम्य ॥२९॥

बहु गुरुंचेनि मति । मज देहीं पावली शांति । वैराग्य आणि विरक्ति । सबळ अनुरक्ति बाणली ॥३०॥

बहुगुरुंची पावलों कृपा । तेणें पलविलें त्रिविधतापा । देहीं उजळिलें ज्ञानदीपा । जन्ममरणखेपा चुकविल्या ॥३१॥

देहींचें हरपविले विकार । मज केले अजरामर । वृत्ति झाली ब्रह्माकार । दुजें अणुमात्र दिसेना ॥३२॥

आब्रह्मस्तंबपर्यंत । मीच झालोंसे निभ्रांत । त्वांही व्हावें ऐसा हेत । म्हणोनि विनवीत तव पदा ॥३३॥

तंव अनसूया म्हणे बा दत्ता । तूं बोलिलासि जें जें हिता । ते ऐकोनि संतोष चित्ता । धन्य लाभता करवीसी ॥३४॥

परी एक परिसी माझा प्रश्न । बहु गुरुयोगें पावलासी ज्ञान । ते गुरु कितीक कोण । सांगें निवडून राजसा ॥३५॥

तुझे बोलाचें वाटतें नवल । बहु गुरु हे बोलिलास बोल । येणें कल्पना वाढली प्रबळ । तें तूं निर्मूळ करी आतां ॥३६॥

सद्‌गुरु तरी असे एक । तूं म्हणसी केले अनेक । मज न माने आवश्यक । बोलसी वितर्क बोल कैसे ॥३७॥

येथें मन माझे झालें चंचळ । कल्पनायोगें झाला मळ । तें उगवोनि सांगे निश्चळ । जेणें विमल चित्त होय ॥३८॥

ऐकोनि मातेच्या प्रश्नोत्तरा । परम सुख वाटले दिगंबरा । मागुतीं जोडोनिया करा । म्हणे अंगीकारा जी उत्तरें ॥३९॥

मी स्वइच्छें करितां गमन । अद्वय निःसंगें आनंदघन । तंव त्या मार्गें करुन । यदु येऊन भेटला ॥४०॥

तेणे माझी स्थिति पाहतां । नाना योगें झाला स्तविता । अनन्य भावें चरणीं माथा । झाला ठेविता सप्रेमें ॥४१॥

तया स्तुतिभावातें देखोन । अनन्य मुमुक्षू निरखोन । तया होवोनि सुप्रसन्न । अधिकार पाहुन बैसलों ॥४२॥

स्तुतिगौरवीं प्रश्न केले । ते म्यां त्याचे आदरिले । ज्यायोगें मज फळ पावलें । तें म्यां कथिलें बोधपर ॥४३॥

तेथेंहि बहु गुरुतें स्थापितां । संशय वाटला त्याच्या चित्ता । मग विवरोनि म्यां प्रतिपादितां । झालों निरसिता कल्पना ॥४४॥

तंव अनसूया म्हणे दत्तासी । यदु कोण कवणाचा कवण वंशी । तें सांगे मज निश्चयेंसी । म्हणे परिसी अविनाश ॥४५॥

सोमवंशी परम सुशीळ । नहुषनामें होता नृपाळ । तयाचा पुत्र ययाति प्रबळ । पराक्रमी सबळ धार्मिक ॥४६॥

तया ययातीपासून । यदुराव झाला निर्माण । परम तेजस्वी रुपें लावण्य । सुरस ज्ञान विवेकी ॥४७॥

तो शरण आला अनन्येंसी । तुजऐसाचि प्रश्न केला मजसी । तैं निवेदोनि बोधिलें तयासी । समसाम्यतेसी पावविला ॥४८॥

तेंचि तुज करुं निरोपण । तूंहि ऐके होवोनि सावधान। सोडोनि अवघे प्रपंचभान । करी श्रवण आदरें ॥४९॥

सत्यची असती गुरु बहुत । किती वदावे ते अगणित । दावितील जे सुपंथ । तेचि गुरुनाथ म्हणावे ॥५०॥

सुकर्म कुकर्मालागीं । गुरु असती सर्व प्रसंगीं । गुरुवांचोनि अणुमात्र जगीं । कार्य उमगीं पडेना ॥५१॥

पिंड ब्रह्मांड व्याप्ति । गुरुरुप असे निश्चिति । कोणतेही कारणाची गति । गुरुविण स्थिति न बाणे ॥५२॥

गुरु व्यापला अपरंपार । कार्यकारणकर्तृत्वाचा आधार । गुरु असे सर्वांतर । सकळ व्यवहार गुरुयोगें ॥५३॥

जाणावया गुरुमहिमान । वेदश्रुति शास्त्रा नाहीं आंगवण । भाटीव करिती पुराण । जेवी बंदिजन रायाचे ॥५४॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर । तयां न कळे गुरुचा पार । कोण वर्णूं शकेल पामर । शिणला फणिवर सहस्त्रमुखें ॥५५॥

हाट परिपूर्ण भरला वस्तुकारें । परिधनाऐसें घेईजे घेणारें । उदकें भरलीं सिंधुसरोवरें । प्यावें पिणारें तृषेऐसें ॥५६॥

तैसें माते म्यां अर्थपर । गुरुगुणसंग्रह केला साचार । तोचि निवडोनिया प्रकार । तुजसविस्तर सांगतों ॥५७॥

ते म्यां गुरु कोण केले । म्हणसी तरी ऐके वहिले । जे यदुपाशीं निवडोनि दाविले । तेचि बोले परियेसी ॥५८॥

पृथ्वी वायु आकाश । जळ अग्नि शीतांश । गभस्ती कपोता अजगरास । सिंधु पतंगास गुरु केलें ॥५९॥

मधुकर मक्षिका करी । मृग मीन वेश्या सुंदरी । टिटवा अर्भक कुमारी । एक विसावा निर्धारी शरत्कार ॥६०॥

सर्प आणि कातणी । पेष्कारही घेतला गुणी । एवं चोवीस संख्या नेमोनी । गुणालागोनी गुरु केलें ॥६१॥

नरदेह पंचविसावा । जेणें या गुरुचा लाभ बरवा । आणिक मानीक गुरुच्या समुदाया । त्याही भावा सांगतो ॥६२॥

मातागुरु पितागुरु । ज्येष्ठ बंधु जाणाही तो गुरु । गायत्रीउपदेशक कुलगुरु । मोक्षगुरु श्रेष्ठ सर्वा ॥६३॥

अनसूया म्हणे गा सुज्ञा । धन्य तुझी विशेष प्रज्ञा । तरी न मोडी माझी आज्ञा । सांगे गुणज्ञा गुण त्यांचे ॥६४॥

कोणापासोनि कोण गुण । कोण त्याग अंगीकार पूर्ण । तयांचें निवडोनि लक्षण । मजलागून सांग आतां ॥६५॥

मातेची देखोनि लालसा । संतोष वाटला अविनाशा । म्हणे माते स्वस्थ मानसा । करोनि विलासा श्रवण कीजे ॥६६॥

आतां एकएकाचे प्रकार । कैसा काय केला अंगीकार । ग्राह्याग्राह्य विचार । तेही प्रखर सदरें तीन ॥६७॥

सूप चाळणी रांधणें। येचि गुणें घेणें सांडणें । हें जाणिजे विचक्षणें । चतुर सज्ञानें निवडोनि ॥६८॥

सूप सत्त्वातें संग्रहवी । रजोगुणाचा त्याग करवी । अडसणीं खडेचि दावी । वेंचवितां उखवीख्यातें ॥६९॥

पैल पाहा ते चाळणी । अनेक भगें जयेलागुनी । सत्त्व देतसे त्यागोनी । रज धरोनि राहे पोटीं ॥७०॥

तिसरें नेमिलें रांधणें । तें उपेगी अनुतापपणें । स्वसंगें पक्व करणें । तृप्त्यर्थ यजणें अंशपर ॥७१॥

या त्रिगुणातें लक्षोनी । ग्राह्य अग्राह्य आणिजे मनीं । आतां निवेदितों येथोनि । सांठवीं श्रवणी गुरुक्रिया ॥७२॥

उभय ऋतूंचे समयकाळीं । पितृबीज जठरकमळीं । तृतीय वायूच्या समेळीं । संभव नव्हाळी गर्भाची ॥७३॥

दिवसमासें वाढला । जठरांतरीं उकडला । नरकमूत्रीं गद्‌बदिला । बहु उबगला ते ठायीं ॥७४॥

परिसी माते मूळिंचें कथन । विधींसी आज्ञापी नारायण । सृष्टिउद्भवाचें कारण । करावें पूर्ण साक्षेपें ॥७५॥

तुवां सृष्टीतें रचावें । म्यां विष्णुरुपें प्रतिपाळावें । रुद्रशक्तीनें संहारावें । एवं प्रतिपाळावें आज्ञेतें ॥७६॥

अवश्य म्हणोनि विधाता । जांली सृष्टि तेव्हां रचिता । चौर्‍याशीं लक्ष योनींची सिद्धता । करोनि दाविता पैं होय ॥७७॥

एकपदी आणि द्विपदी । त्रिपदी कोणी चतुष्पदी । पंचपदी केले षट्‌पदी । अष्टपदी नवपदी अपार ॥७८॥

बहुपदी केले अगणित । निष्पदी केले अखंख्यात । नाना जीव रचना समस्त । पाहे अनंत सर्वांतें ॥७९॥

तंव बोले नारायण । जीव निर्मिलें थोरसान । अवघे शिस्नोदरपरायण । न दिसे यावीण कोण्हीही ॥८०॥

मीं निरखिलें या जीवांतें । परी आनंद नुपजे कांहीं मातें । माझिया विश्रांतीतें । स्थान येथें दिसेना ॥८१॥

मजलागीं जाणती । सर्व रसांतें वोळखिती । यातें नोव्हे ही शक्ती । मूढमती हे जीव ॥८२॥

येणें कोण करावें कारण । यांचें रुप कैसेनि पूर्ण । केवी वोळखिती माझे मन । सकळ अज्ञान निर्मिलें ॥८३॥

तुवा निर्मिलेति बहुवस । येणें नोव्हेचि मज उल्लास । ऐसे बोलतां श्रीरमेश । चिंता विधीस वाढली ॥८४॥

मग विनवी जोडोनि कर । करुं स्वामी कोण विचार । आज्ञेऐसेंचि सत्वर । करोनि प्रकार दावितों ॥८५॥

दीनदयाळा पुरुषोत्तमा । मम अपराधाची करोनि क्षमा । आज्ञा करावी मेघःश्यामा । हे सर्वोत्तमा सर्वेशा ॥८६॥

मागुती बोले सर्वेश्वर । मजऐसेंच निर्मी द्विकर । अथवा निर्मी अधिकोत्तर । परी चतुःकर न करी त्यां ॥८७॥

तयां देईं सर्व ज्ञान । सकळां वरिष्ठ करी पूर्ण । हे निर्मित तयां आधीन । देई करुन कमलोद्भवा ॥८८॥

वर्णाश्रम नेमी त्यांसी । वेदमर्यादा बोधी निश्चयेंसी । अधिकारपरत्वें धर्मासी । लावी आचरणासी तयांतें ॥८९॥

याग यज्ञादि क्रिया । लावोनि सुख भोगवी तयां । तयां खेळवील माझी माया । केलें वांया नवजें तुझें ॥९०॥

ते वेदआज्ञें आघवे । मज यजतील सर्व भावें । त्या गुणें मी तयां पावें । कर्म प्रसवें तेंचि त्यांचें ॥९१॥

संकटीं करतील धांवा । तैं मज धांवणें केशवा । प्रसंग जाणोनी बरवा । करणें कुडावा मज लागें ॥९२॥

मद्भक्त ध्यातां निके । मज प्रगटणें त्यांचे हांके । त्यांतें पाळीन कौतुकें । देतां न चुके सर्वस्वा ॥९३॥

माझें नाम गा पुरुषोत्तम । तूंही पुरुषोद्भव उत्तम । जेणें तोषेन मी सर्वोत्तम । तोचि क्रम अवलंबी ॥९४॥

चौर्‍याशीं लक्षाहोनि वरिष्ठ । नरजन्मवी उत्तम श्रेष्ठ । हे माझी विश्रांति उत्कृष्ट । आज्ञापिलें स्पष्ट तुज आतां ॥९५॥

ते मज जाणावयासी । योग्य होतील सद्भावेसी । आणि पात्र उपभोगासी । सर्व कर्मांसी कारक ते ॥९६॥

हें मानिजे माझें वचन । न करोनि कांहीं अनमान । रची वेगीं त्वरें करुन । सांगे नारायण विधिसी ॥९७॥

पाणी जोडोनि विधाता । विनविता जाला त्या अनंता । म्हणे जी स्वामी कृपावंता । आज्ञा माथां वंदिली ॥९८॥

म्यां नेणोनि विचार । केला बहुतापरी विस्तार । न जाणें मी सारासार । अपराध थोर पैं जाला ॥९९॥

दैवताविण विशाळ मंदिर । नृपाहीन सेनाभार । प्राणाविण कलेवर । ऐवं विचार धडलासे ॥१००॥

अपराधाची क्षमा करोनी । मज सांभाळिजे मोक्षदानी । बोधिलें मातें कृपावचनी । सावध करोनि आज्ञापिलें ॥१॥

आतां आज्ञेऐसें वर्ततों । उत्तम नरदेह उभारितों । वेदमर्यादा बोधवितों । मान्य करवितों सकळांतें ॥२॥

अवधूत म्हणे अनसूयेसी । विधि उभारी या नरदेहासी । सृष्टिव्यवहार अनुक्रमेंसी । देखोनि हरीसी आनंद ॥३॥

जैं विधि आरंभी नरदेहासी । तैंच आज्ञापी जीवासी । भुलोनि न जावें सुखासी । पारमात्मयासी भजावें ॥४॥

जीवा राहे सावधान । तूं नरदेहीं पावसी जनन । तेथें मायामोहाचें आवरण । पडेल दारुण तुजवरी ॥५॥

काम क्रोध मद मत्सर । दंभ आणि अहंकार । हे षड्रिपु अनिवार । करितील जर्जर तुज तेथें ॥६॥

आशा मनीषा तृष्णा कल्पना । भ्रांति भूली इच्छा वासना । लोभ मोहोसंगे जाणा । होईल विटंबना पुढतीं ॥७॥

कैक कल्पना उठती । नाना द्वंद वाढविती । मोहो लोभें घात होती । फेरी पडती जीव तेणें ॥८॥

तेथें सुपंथ आणि कुपंथ । दोन्ही असती कर्मयुक्त । जें आचरशील तेंचि प्राप्त । कल्याण घात सम दोघे ॥९॥

सुख भोगितां संसारीं । कर्में करिसीं नाना परी । काळ उभाची लक्षित मापरी । फांसा आखरीं तयाचा ॥११०॥

कुकर्मातें अवलंबिसी । सुख मानोनि विख घेसी । तेणें गुंतोनि यमपाशीं । नरक भोगिसी अनिवार ॥११॥

यम प्रवर्तेल जैं घाता । तेथें कोण गा सोडविता । देखोनि आचारलिया दुरिता । योनी भोगविता होय तैसी ॥१२॥

एक एक योनीआंत । कोटि कोटि फेरे होत । पुण्य पाप समत्वा येत । तैंच पावत नरदेहो ॥१३॥

जंव जंव करी पापाचरण । तंव तंव प्राणी पावे बंधन । सुटका नोव्हे तयालागुन । दुःख दारुण भोगील ॥१४॥

यासांठीं सावधान वागे । वर्तूं नको या विकारसंगें । सुमार्ग सोडोनि कुमार्गें । कदा न रंगे लोभमोहीं ॥१५॥

ऐकोनि विधीचें वचन । भय पावला जीव दारुण । म्हणे नको मज तें जनन । सांगसी बंधन बहु घाता ॥१६॥

मायामोहो अनिवार । लोभें पावेन भ्रम थोर । जाचील म्हणतां षड्‌विकार । कैंचा धीर मज धरवे ॥१७॥

न घाली न घाली तये ठायीं । म्हणोनि लागे जीव पायीं । मी नवजेची त्या अपायीं । सुख तेंही पुरे नको ॥१८॥

जीवाचें देखोनि ग्लानोत्तर । विधि वदे गा धरीं धीर । तुज सांगतों मी विचार । करी अंगीकार तयाचा ॥१९॥

तूं तेथें सुपंथें चालतां । धर्ममार्गें आचरतां । मग नसे कांहीं भयचिंता । सुख पावता होसील ॥१२०॥

मोहो लोभा ना तळावें । विकाररहित वावरावें । पापकर्मा सत्य त्यजावें । मग भोगावें सर्व सुख ॥२१॥

जीव म्हणे कमलोद्भवा । तूं सांगसी योग बहु बरवा । कर्म नसतां केंवीं व्हावा । धर्म आचरावा कोठोनी ॥२२॥

मुळींच स्थापिला निवाडा । कर्मधर्माचा असे जोडा । एकाविण एक बिघडा । कोण चाडा काय कीजे ॥२३॥

कर्में करोनि धर्म करावे । धर्मेंचि कर्म तें भोगावें । भोग भोगितां लोभीं पडावें । मोहीं गुंतावें सहजची ॥२४॥

मोहो तेचि ममता माया । गुंतवोनि घाली अपाया । केंवीं घडविते उपाया । योनी फिरावया कारण ती ॥२५॥

ती सर्वस्वी भुलवील । जीवें जीता दीन करील । मुद्दल अवघें वेंचवील । बळें घालील जीव फांसा ॥२६॥

तेथें भय वाटे मजसी । म्हणोन न घाली त्या जन्मासी । हें ऐकोनि विधातियासी । विचार मानसीं पडियेला ॥२७॥

तेणें स्तविलें नारायणा । बहुतापरी केली प्रार्थना । उपाय जीवाच्या निरंतर । वसतों साचार सत्यत्वें ॥२९॥

मग प्रगटोनि अनंत । जीवात्म्याशी गुज बोलत । तुझियासंगे मी निश्चित । राहेन रक्षित सर्वदा ॥१३०॥

तुजसी आणि मजसी । बा संगम असे दोघांसी । तूं मातें जरी न विसरसी । तरी न भोगिसी दुःख कांहीं ॥३१॥

जें जें होईल कारण । तें तूं करी गा मदर्पण । तें माझें मी अंगीकारीन । वारीन शीण तुमचा ॥३२॥

नरदेहातें उत्तम अंगीकारी । मी असें तुझे बरोबरी । निर्भय वागोनि पाहे अंतरीं । न ये तुजवरी आळ मग ॥३३॥

जें जें कांहीं होत आहे । तें तें मम सूत्रेंचि पाहें । ऐकोनि उगलाचि तूं राहे । करीन साहे तव निष्ठें ॥३४॥

तूं मातें जरी स्मरोनि राहसी । तरी दुःख कधीं न पावसी । सुख भोगोनि मीच होसी । सांगूं तुजसी किती आतां ॥३५॥

जन्मोनि विसरसी मातें । भुलसील मायिक पदातें । ते दोष नाहीं आम्हांवरुते । तुझें तूतें भोगणें ॥३६॥

विषयीं सक्त म्हणोनि जीव । सर्वासक्त म्हणोनि शिव । तुज जें आवडेल वैभव । तोचि ठाव सांभाळी ॥३७॥

जीवात्मा आणि शिवात्मा । दोन्ही परी तो परमात्मा । उपासिलिया योगें जाणे क्रमा । सुशील उत्तमा प्राणप्रिया ॥३८॥

शब्दें जीव पावला गोडी । निमाली अंतरींचीं सांकडीं । परम उल्हासे लवडसवडीं । म्हणे जोडी झाली मज ॥३९॥

मागुतीं जगदीश वदे कमलासना । जीवा म्यां निवेदिली उपासना । तारकमंत्र झाला सांगे काना । करी प्रेरणा आतां या ॥१४०॥

वचन ऐकोनि विधाता । प्रभुआज्ञा वंदिली माथा । सोहंमंत्र झाला देता । म्हणे या सर्वथा न सोडी ॥४१॥

ऐसें बोधोनि जीवासी । गर्भागारीं संभवी त्यासी । दत्त विनवी अनसूयेसी । मागील कथेसी आठवीं ॥४२॥

तेथें अन्नोदकाचे मेळीं । जठराग्नीचेनि ज्वाळीं । परिपक्व तये स्थळीं । पिंड उकळीं उकडत ॥४३॥

दिवसमासे पक्व झाला । नरकमूत्रीं घाबरला । करपद ग्रीवेंसी बांधिला । मोटें आवळिला सबळ तो ॥४४॥

तेव्हां अंतर्दृष्टी करुन । शिवात्म्यासी करी अवलोकन । करुणा भाकी कर जोडोन । म्हणे मज येथून सोडवी ॥४५॥

देवाधिदेवा हृषिकेशी । येथोनि जरी मज सोडविसी । तरी मी न विसंबे तुजसी । पाव वेगेसी सदया तूं ॥४६॥

शंख, चक्र, गदा घेवोन । केलें त्वां आजवरी रक्षण । आतां मातें मुक्त करोन । करी पोषण पतिताचें ॥४७॥

ऐकोनिया करुणा उत्तर । काय बोले जगदोद्धार । माझा पडो नेदी विसर । असें बरोबर तुझिया मी ॥४८॥

तैं जीव अवश्य म्हणतां । कृपा उपजली त्या अनंता । करोनि त्याची मुक्तता । झाला लोटिता बाहेरी ॥४९॥

भरतां नवमास नवदिन । प्रसूतिवायो दाटला पूर्ण । माता झाली कंपायमान । दुःख साहोन कुसमुसी ॥१५०॥

महत्पुण्यें जन्म झाला । बंधना पासोनि जीव सुटला । वारा मायेचा लागला । कोहं बोलिला भ्रमयोगें ॥५१॥

माया लावी तै स्नेहासी । उष्णोदकें न्हाणी वेगेंसी । द्वारें फुंकोनि मधूसी । पाजी दुग्धासी आरंबळतां ॥५२॥

मुळीं जार वराचें प्रस्थान । त्याचें सुतक पाळीती दहा दिन । अक्राव्यासी शुद्ध होवोन । बारावा नेमून बारसें ॥५३॥

नामकर्म जातकर्म । तेराव्यासी केला बहुसंभ्रम । आदि अंतीं नेमिले सम । उत्तम अनुत्तम सारिखे ॥५४॥

दिवसमासाने वांढलें । मायामोहें वेष्टित केलें । पूर्वकर्म विसरलें । बहु भ्रमविलें आप्तलोर्कीं ॥५५॥

किंचित स्फूर्ती होतां जाण । होय स्वरुपाची आठवण । न भेटवे तयालागून । करी रुदन आक्रोशें ॥५६॥

माता बंधु आणि भगिनी । वेष्टुनी घेती बहु कामिनी । क्षुधानळें म्हणोनी । बळें स्तनीं लाविती ॥५७॥

हारकुर्रवा दे करिती । टाळ्या चुटक्या वाजविती । नाना नामें करोनि बाहाती । नादें लुब्धविती लक्ष त्याचें ॥५८॥

आवडी घेती जंव चुंबन । तंव बाळा दिसे तें वदन । विपरीत मनीं लक्षोन हांसे गद्गदोन बाळक तो ॥५९॥

माझें कोणीकडे गेलें । नानाविध हे कोण आले । तें आठवतां दुःख जालें । रडों लागलें मागुतीं ॥१६०॥

मासावरी चढतां मास । मूळ विसरलें दिवसेंदिवस । पुढिलियांचा लागे ध्यास । खेळीं मानस गुंतलें ॥६१॥

पांच मास पूर्ण भरतां । निखळ विसरला तो अच्युता । मग सर्वभावे आवडे माता । स्वजात गोता न्याहाळी ॥६२॥

दिवसेंदिवस कळों लागे । पडे झडे कांहीं रांगे । भिंती धरोनि स्वअंगे । चालविती वेगें बोटनेटे ॥६३॥

परम प्रीती करुन । बाळा करविती अन्नपान । लेववोनि अलंकारभूषण । शिकविती भाषण शब्द नाना ॥६४॥

रसना गुंतविली रसीं । अलंकार जडविले चित्तासी । खेळ रुचविती मानसीं । संग बाळासी योजविती ॥६५॥

सप्त वरुषें होतां कुमारा । मौंजीबंधन द्विजवरा । विद्याभ्यास करविती बरा । होइजे पुरा तोंवरी ॥६६॥

विद्येमाजी झाला प्रवीण । जगीं वर्णिले शहाणपण । सुख मातापितयांलागुन । म्हणती लग्न करावें ॥६७॥

जो तो म्हणे तुमचे घरीं । देतों आम्ही आपुली कुमरी । विधिनेमा ऐसी परी । घडोनि निर्धारीं येतसे ॥६८॥

लोक म्हणती झालें लग्न । लग्न नोव्हे तें आलें विघ्न । शृंखळा जडली पदीं येऊन । दृढ बंधन पावला ॥६९॥

माता निरवी सुनेसी । संसार करी तूं मजाऐसी । सर्वस्व सोंपिलें तुजसी । शीतळ कुसी प्रसवे तूं ॥१७०॥

वाढतां वाढली कांता । फळशोभनीं योग्य एकांता । जळूऐसी झोंबोनि स्वकांता । नग नसतां आकांता पाववी ॥७१॥

बाह्य द्रव्यातें सर्व आटी । शरीरद्रव्यातें तैसीच घोटी । निःशक्त होतां पदें लोटी । उपाधी मोठी वाढवी ॥७२॥

न पुरतां तिची आस । भ्रतार उपजवी परम त्रास । लोभमोहाचा पुरुषा पाश । पडे भ्रंश स्वहितातें ॥७३॥

जरा अवस्थें कासाविस प्राण । परी प्रपंचीं गुंतलेंसे मन । व्याधि रोगें गेला वेढोन । तरी वेध पूर्ण प्रपंचीं ॥७४॥

लाळ शेंबूड बरबरा वाहे । शौच मूत्र अंथरुणीं होये । मुरकुंडी वळोनी ठायीं राहे । तरी प्रपंच सोये न सांडी ॥७५॥

घरिंचे दारिंचे त्रासती । निष्ठुरपणें बहु गांजिती । सर्व भावें कंटाळती । कोण्ही न येती उपेगा ॥७६॥

चहुंकडोनी दुःख अनिवार । परी म्हणे मी वांचलों जर । करोनि दावीन संसार । केंवि पामर निंदी मज ॥७७॥

जवळी पावलें मरण । परी न सांडी आंगवण । प्रपंचीं मोहित जालें मन । पडिला दारुण भवपाशीं ॥७८॥

करितां कल्पना प्रपंचविषयीं । प्राण गेला ठायिंचा ठायीं । पाशें बांधोनि यम नेई । भोग विदेहीं विटंबना ॥७९॥

जे आचरणाची स्थिती । तैसेच भोग भोगविती जन्मागारीं फिरविती । नेवोनि टाकिती नरकवासा ॥१८०॥

हें जन्ममरणाचें बहु दुःख । येणें कैंचे प्राणिया सुख । हेंचि वर्म जाणोनि देख । जालों आवश्यक सावध मी ॥८१॥

सर्वांमाजी उत्तम खरा । नरदेह हा सुंदर हिरा । पावोनि करी जो मातेरा । काय गव्हारा म्हणूं त्या ॥८२॥

या जन्मासी मार्ग दोन । ते तूं म्हणसील जरी कोण । तेही तुजप्रती सांगेन । सावधान परिसीजे ॥८३॥

एक पाववी बद्धतेसी । एक मुक्तमार्ग निश्चयेंसी । हें वर्म विवेकें मानसीं । उभय पक्षांसी वोळखिजे ॥८४॥

मुक्त होय तो गोमटा । बद्ध तो परम असे खोटा । लावी नरकाचिया वाटा । भरवी हाटा यमाच्या ॥८५॥

मुक्तपणाच्या साधनें योग । तया पाहिजे सदृढ वैराग्य । भोगाचा करणें सर्व त्याग । विवेकसंग सर्वदा ॥८६॥

अनसूयेसी म्हणे अवधूत । तुज विस्तार जाणविला नेमस्त । जयायोगें घडे घात । ते यथार्थ निवेदिलें ॥८७॥

परी याचा म्यां घेतला गुण । तो निरपितों तुजलागुन । लक्ष चौर्‍यांशी योनीसि जाण । गुरु पावन नरदेहो ॥८८॥

सर्व गुणांतें जाणता । रसज्ञपणें जाणे रसता । विवेकें निवडी बा कसता । सर्वांत ज्ञाता गुरु हा ॥८९॥

बीज गुरु पिता जाण । माता वाढवी प्रीतीकरुन । आवडीं लालन करी पालन । गुरुपित्याहून आगळी ॥१९०॥

शिक्षा करोनि विद्या होती । मान्य सकळांमाजी करविती । तया विद्यागुरु म्हणती । शरण त्याप्रती मी जालों ॥९१॥

ब्रह्मत्व दिधलें मजलागोनी । गायत्री उपदेश केला कानीं । वेदशास्त्रीं प्रवीण करवोनी । अर्थ बोधवोनी देती जे ॥९२॥

तो कुळगुरु म्यां वंदिला । वेदार्थबोध गुण घेतला । वेदमतें ज्येष्ठबंधु बोलिला । तो म्यां नमिला दुर्वास ॥९३॥

एवं वडिलांसि वंदावें । कनिष्ठांसि आशीर्वाद द्यावे । हें विचारें जंव पाहावें । गुंतोनि पडाव दोहींकडे ॥९४॥

पाहतां त्या वेदमतासी । वृद्धत्व नेमिलें बहुतांसी । त्यामानें नमनासी । विकल्प चित्तासी वाटतो ॥९५॥

म्हणोन विवेकगुरु केला । वैराग्य अनुताप बाणविला । वडीलां वडील जंव शोधिला । तंव तो व्यापिला सर्वांत ॥९६॥

वडिलपण तुजमाजी । तेवींच असे मजमाजी । व्यापलें सर्व समाजीं । प्रणिपात काजीं कोण उरे ॥९७॥

म्हणोनि न करावें जरी नमन । तरी वेदवृद्धाचारीं लागे दूषण । यालागीं त्यजोनि थोरपण । करावें नमन सर्वा भूतीं ॥९८॥

नारी नर थोर बाळ । पशुपक्ष्यादि जीव सकळ । स्थावर जंगम लघु स्थूळ । होवोनि प्रेमळ नमावें ॥९९॥

त्या विवेकें ऐसें केलें । थोरपणाचें ओझें टाळिलें । भेदाभेद अवघे उडविले । एकत्व भासविलें अनेकीं ॥२००॥

जीवशिवाचें द्वैतभाव न । निरसोनि पावलें एकपण । कोणें करावें कोणासि नमन । मन अमन होवोनि ठेलें ॥१॥

तथापि राखावया श्रेष्ठाचार । आठवला विवेकें विचार । अविनाश व्यापक सर्वांतर । पावनत्वें थोर हाचि पैं ॥२॥

नाशिवंत नरदेहो पतित । हा सर्वांत कनिष्ठ नेमस्त । येणें करावा प्रणिपात । व्हावया पुनीत अधिकार हा ॥३॥

आणि जें का स्वात्मस्वहित । तें जाणावया नरदेहोच समर्थ । सर्व ज्ञान येथेंचि प्राप्त । नाहीं इतरांत निश्चयें ॥४॥

यासाठीं नरदेहो गुरु । पाहिला सर्व गुणांचा आगरु । अलभ्य लाभला भवी थोरु । जाणोनि विचारु मानिला म्यां ॥५॥

सकळ योनींमाजी नरदेह श्रेष्ठ । परी ज्ञानहीन अति कनिष्ठ । अज्ञानभरित मतिभ्रष्ट । नाना अरिष्ट भोगवी ॥६॥

षड्रिपूंचे संगें मन । पंचविषयीं मोहिलें पूर्ण । आशा लोभ मोहें भ्रमोन । पाववी पतन नरकवासीं ॥७॥

हे वेदविद्या गुरुचें प्रसादें । हे चिन्हें वोळखिले त्याचि बोधें । कीं हे घातक उभारिलीं द्वंद्वे । अति विरुद्धें माजविती ॥८॥

याचें करावया निवारण । नाहीं कोण्हासी आंगवण । जें जें कर्म आचरावें जाण । अहंतागुण वाढवी तें ॥९॥

इत्यादि योगें अपायीं । बुडवी नेवोनिया भवडोहीं । जन्ममरणाच्या पंक्ती पाहीं । भोगवी नाहीं सुख जीवा ॥२१०॥

या दुःखापासोनि सोडविता । कोण्ही नाहीं गा तत्त्वता । हें जाणोनि अनुतापता । पावली चित्ता चिंता बहु ॥११॥

मग विवेके केला विचार । सर्वांहोनि सद्‌गुरु थोर । तोचि भवभय वारील निर्धार । निर्विकार करील मज ॥१२॥

हे सद्‌बुद्धीचेनि योगें । अनुतापाचेनि प्रसंगे । विवेकाचेनि अनुसंगें । उपाव वेगें सांपडला ॥१३॥

सरितेमाजी बुडतां । जेवीं तुंबणीफळ आलें हाता । दारिद्रयग्रस्त हाता । सांपदला अवचिता द्रव्यघट ॥१४॥

रोगी पाहे जंव मरण । तंव अकस्मात जालें अमृतपान । विखार बाधी देहा डंखोन । तों पडिला चरण मोहोर्‍यावरी ॥१५॥

तस्कर घाता प्रवर्तले । तंव उठोनि व्याघ्रे त्यां मारिलें । वनीं वणव्यानें वेढिलें । तंव पावलें मेघोदक ॥१६॥

तेवीं अनसूये मजसी । बुडतां तारुं सांपडले निश्चयेसी । आनंद उल्हासे दाटलों मानसीं । शरण सद्‌गुरुसी रिघालों ॥१७॥

श्रीसद्‌गुरु अत्रिलागोन । अनन्य अष्टभावें जालों शरण । दृढ प्रेमें धरितां चरण । केलें पावन गुरुरायें ॥१८॥

देखोनि आर्द्र अंतर । तेणें केला अंगीकार । तारकमंत्र उपदेश थोर । दिधला अभयकर मस्तकीं ॥१९॥

सद्‌गुरु ऐसा दयाळ । धुंडिता न दिसे ब्रह्मांड सकळ । उपमेरहित हें स्थळ । केलें तात्काळ आपणची ॥२२०॥

त्रिविधतापातें निरसिलें । समूळ अज्ञान छेदिलें । ज्ञानदीपातें उजळिलें । घटीं प्रकाशविलें निजतेज ॥२१॥

तयाचे कृपे करुन । मीच विश्वभरी जालों पूर्ण । अद्वय उन्मन केलें मन । मीतूंपण मावळले ॥२२॥

निर्भय केलें अंतर । नाथोनि टाकिले सर्व विकार । काय आठवूं उपकार । सद्‌गुरु दातार धन्य हा ॥२३॥

अविनाश वदे मातेसी । तूंही शरण होय सद्‌गुरुसी । तो दया करित पावसी । पूर्ण सुखासी अंतरी ॥२४॥

जे सद्‌गुरु चरणीं झालें शरण । त्यांचे चुकलें जन्ममरण । तयां नाहीं भवबंधन । मुक्त मान सर्वदा ॥२५॥

सद्‌गुरु अनंत दयासागर । त्या पदकमळीं सुतभ्रमर । मकरंद सेवी निरंतर । घाली गुंजार ग्रंथी या ॥२६॥

संत साधु जे सज्जन । त्यांचे लक्षोनिया चरण । ग्रंथीं मागतसें कृपादान । करा पावन म्हणोनी ॥२७॥

पुढील कथा वदवा अलोकिक । जे सकळांसि होय सुखदायक । अनंतसुत संतांचा पाइक । म्हणवी सेवक सांभाळीजे ॥२८॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ । परिसोत भाविक श्रोतेसंत । सप्तदशोध्यायार्थ गोड हा ॥२२९॥

॥ इति सप्तदशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP