श्री दत्तप्रबोध - अध्याय पहिला

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वतयै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।

ॐ नमोजी गजवदना । मंगलाधीशा मंगलकारणा । अमंगलादि विघ्नहरणा । दयाघना हेरंबा ॥१॥

जयजयाजी वक्रतुंडा । कुबुद्धिछेदका प्रचंडा । सिद्धिदायका अखंडा । दीर्घशुंडा नमो तुज ॥२॥

जय फरशअंकुशधारणा । जय सिंदूरासुरसंहारणा । भक्तवत्सला भयहरणा । दीनतारणा गजमुखा ॥३॥

जयजयाजी लंबोदरा । गणाधिपती तूं सुंदरा । सकलाधिष्ठा उदारा । गुणगंभीरा एकदंता ॥४॥

नमो तूतें जी विनायका । भालचंद्रा सुखदायका । प्रीती करिसी गुणगायका । अष्टनायकांसमवेत ॥५॥

जयजयाजी चिंतामणी । पावसी भक्ताच्या कामनीं । हेतु नुरवीसी त्या मनीं । सकळ भ्रामणी चुकविसी ॥६॥

जयजयाजी मोरया । तुजविण ग्रंथा नयेची रया । काय करील चतुर या । तुझा वर या पाहिजे ॥७॥

पर्जन्यावांचोनी नुगवे कण । विशाळ कूप जीवनेवीण । धातुहीन पुरुषपण । नसतां प्राण काय जैसा ॥८॥

तैसी तुझी कृपा नसता । केवीं रसयुक्त होय कविता । श्रेयालागीं एकदंता । हृदयीं चिंता झोंबली ॥९॥

आतां तुझ्या कृपेसाठीं । कोण करुं आटाआटी । पडिलों बहुतची संकटीं । कृपादृष्टी पाहे तूं ॥१०॥

तुझें नाम विघ्नहरु । सिद्धिबुद्धीचा दातारु । महिमा तुझी गा अपारु । नकळे पारु श्रुतिशास्त्रा ॥११॥

एकाक्षरमंत्र जपून । कितेकीं केलें अनुष्ठान । त्यावर प्रसाद तोषवून । वदविसीगुण अनुपम्य ॥१२॥

मी तव हीनदीन पामर । न घडे कांहीं तो विचार । ग्रंथहेतु मनीं थोर । केवीं पार पावेल हा ॥१३॥

मज तों नकळे साधन । म्हणोनी करी नामस्मरण । तूं अनाथनाथ मूषकवाहन । करी पावन दीनातें ॥१४॥

तूतें अनन्य शरणागत । झालों गजवदना निश्चित । करी आपुलें ब्रीद सत्य । कृपावंत होउनी ॥१५॥

मागें कवीच्या हृदयी । राहोनि वदविसी पाही । आतां या हृदय मुळीं । नाहीं ऐसें काई म्हणावें ॥१६॥

गजवदना तुझें अधिष्ठान । सर्वां घटीं आहे पूर्ण । मजविशीं कैसा शून्य । राहसी होऊन हेरंबा ॥१७॥

हें तो तुम्हां नोव्हे उचित । येणें ब्रीदा होईल घात । मी तव अन्यायी पतित । पादाक्रांत पैं झालों ॥१८॥

तुमचिया नामापुढें । पापविघ्न काय बापुडें । वेदशास्त्री पवाडे । अगाध गाढें वर्णिलें ॥१९॥

गणगंधर्वयक्ष स्तविती । देवमानव गुण गाती । स्तुतिस्तोत्र मुनी जपती । नामख्याति अगाध ॥२०॥

त्याची नामें करुनी । प्रवर्तलों तुझिया स्तवनीं । तरी अपराध क्षमा करुनी । अभयदानीं तोषवा ॥२१॥

आतां करोनी अति त्वरा । मज दीनातें अंगीकारा । पापविघ्नें निवारा । फरशधरा गणपति ॥२२॥

या ग्रंथाची रचना । सिद्धीस न्यावी गजवदना । सर्वपरि विज्ञापना । केली चरणा तुझिया ॥२३॥

ऐसी प्रार्थना करितां । तों हृदयीं आविर्भवला मंगळदाता । पायीं ठेवितांचि माथा । दे अभयता ग्रंथासी ॥२४॥

मग जयजय शब्दें करुन । गर्जतां आनंदलें मन । पाहोनि सगुणत्वाचें ध्यान । तेंचि वर्णन आरंभिलें ॥२५॥

जेथें ठेविला प्रेमें भाळ । तें सुकुमार चरण कोमळ । सुरंग तळवे रातोत्पळ । घोटी सुनीळ द्वयभागीं ॥२६॥

पदांगुली विराजित । पंचद्वय सुशोभित । नखचंद्रिका सतेज युक्त । तेचि वंदित पुढतीं ॥२७॥

पावलावरी साजरिया । गुंजारवती घागरिया । तोरड आणि वांकिया । ब्रीदावळी या गर्जती ॥२८॥

जानुजंघानागर । अटस मांडया प्रबळ थोर । कटीं वेष्टिला पीतांबर । बंदी फणीवर डोलती ॥२९॥

क्षुद्रघंटा कटीं वाजती । उदर विशाळ नामी वरुती । हृदयीं स्तनें डोल देती । दिव्य आकृती तेथीची ॥३०॥

चतुर्भुज बाहुदंड । पाहतां दिसती प्रचंड । मेखळा अंगीं अखंड । नसे खंड तियेतें ॥३१॥

बाहुवटीं बाहुभूषणें । जडित मणिमय करीं कंकणें । पृथक् मुद्रिकांचें लेणें । शोभले तेणें पाणी ते ॥३२॥

आरक्त करतळ आणि रेखा । रेखिल्या अती त्या सुरेखा । कराग्री तो चंद्र देखा । दशधा निका प्रगटला ॥३३॥

द्वय करीं ते फरशांकुश । दुष्ट विघ्न कर्ते नाश । एक वरद पाणीविशेष । निजभक्तास द्यावया ॥३४॥

उरला जो का चतुर्थ कर । सर्व काजीं अतितत्पर । केवी वदूं तो विस्तार । सारासार जाणता ॥३५॥

भुजदंड दंडीं शोभती । नाना बिरुदें चमकती । कृपाकर शरणागती । द्यावया प्रीति वरद तो ॥३६॥

कंठस्थूल निकट जाणा । मुक्ताहार जडित नाना । एकावळीचा सलंबपणा । नाभीस्थाना पावला ॥३७॥

रत्‍नमिश्रित मुक्ताहार । पदकीं हिरा सतेज थोर । तेणें शोभलें हृदयोदर । तेज अपार नगाचें ॥३८॥

शुंडामंडित भव्य वदन । तया शोभती शूर्पकर्ण । एकदंत शुभ्रवर्ण । नेत्र सान चमकती ॥३९॥

भोंवया आणि भाळ । शोभा देती विशाळ । द्वयभागी गंडस्थळ । केश कुरळ सलंब ॥४०॥

भाळीं शोभे अंबुधर । चर्चित मृगमदकेशर । वरी सतेज थोर । मुकुट सुंदर लखलखित ॥४१॥

तयावरी दिव्य मणि । मण्यावरी शोभे फणी । कर्णी कुंडलें पाहुनी । होय तरणी सलज्ज ॥४२॥

मुक्ता घोषाची झल्लाळी । शोभते दोही कुंतली । कोटीसूर्यप्रभा फांकली । ऐसी नव्हाळी रुपाची ॥४३॥

अतिपुष्ट तो उंदीर । वहन तयाचें प्रियकर । ऋद्धिसिद्धि जोडोनि कर । ढाळिती चामर तयावरी ॥४४॥

ऐसा मंगळकारक हेरंब । वदे करी ग्रंथारंभ । नमोनि करी प्रारंभ । समारंभ स्तवनाचा ॥४५॥

जयजय गणपती गुणालया । धुंडीराजा तूं मोरया । जय जय दूर्वांकूरप्रिया । महाकाया तुज नमो ॥४६॥

जयजयाजी कमळभूषणा । मंदारप्रिया शमीधारणा । जयजय विमळा विघ्ननाशना । हे गजानना तुज नमो ॥४७॥

जय चतुर्दशविद्यासागरा । ऐश्वर्यसंपन्ना उदारा । सिंदूरचर्चिका सर्वेश्वरा । ज्ञानागरा नमो तूंतें ॥४८॥

जयजय सुरवररक्षका । प्रचंड दैत्त्यसंहारका । विष्णुरुपा अज्ञाननाशका । कवि पोषका नमो तुज ॥४९॥

जयजयाजी गौरीनंदना । बलपराक्रमा शिवकंदना । सकळनियंता कार्यकारणा । जाणसी खुणा अंतरीच्या ॥५०॥

स्तवनीं तोषोनि मोरेश्वर । अभयप्रसाद दे सत्वर । म्हणे वदे निरंतर । चित्ता स्थिर करोनिया ॥५१॥

जे इच्छा धरिली मानसीं । तैं निर्विघ्न जाईल सिद्धीसी । नमितां तैं अतिवेगेसीं । हृदयनिवासीं राहिला ॥५२॥

ऐसा श्रीगणेश स्तविला । स्तवितांची प्रसाद लाधला । आतां नमूं सरस्वतीला । वाक्‌शब्द भक्ता जिचेनी ॥५३॥

नमो ब्रम्हनंदिनी कुमारी । जगदंबिके वागीश्वरी । प्रणवरुपिणी जगदांतरी । तुज नमस्कारी आदरें ॥५४॥

जयजय जगन्माते । रसना वदे तव सत्तें । तुझें ठाण असतां वरुतें । होय सरते बोल मग ॥५५॥

तुझे कृपेचें महिमान । अगाध जाणती कविजन । तुझें नीरसयुक्त भाषण । ग्रंथीपूर्ण पावलें ॥५६॥

तुझिया कृपेची खेळ । मुके तोचि होती वाचाळ । नवजे वाणीते बरळ । सरळ सुंदर वर्णिते ॥५७॥

जेथे तुझें ठाण नाहीं । त्या वाणीचा फजिता पाहि । मुके बोबडे तोतरे राही । गुंते ठायी बोलता ॥५८॥

जरी वाचाळ करी बडबड । त्या बोला नुपजे आवड । कांटाळोनी म्हणती द्वाड । कपाळफोड मांडिली ॥५९॥

तया वाणी नाहीं रस । म्हणे हा बोलतो फिके निकस । ऐकणारा उपजे त्रास । म्हणती यास पीटारे ॥६०॥

म्हणती वात्रटा जाय उठोन । पुरे पुरे तुझें भाषण । हें तव अवकृपेचें लक्षण । कळलें पूर्ण जगन्माते ॥६१॥

हें वर्म जाणोनि चित्तीं । तुज नमितो जी सरस्वती । स्तवितसे मी अनन्योक्ती । कृपा चित्तीं येउं दे ॥६२॥

तूं आदिशक्ति गुणमाया । नत जालों तुझिया पायां । वत्सावरी किजे दया । करोनी छाया कृपेची ॥६३॥

जयजय वो जगदंबे । विश्वंभरिते तूं अंबे । रससारज्ञे प्रलंबे । वत्सा अविलंबे सांभाळी ॥६४॥

तूं माता माझी स्नेहाळ । अर्भकाची पुरवी आळ । जाणसी अंतरीचें सकळ । ये उतावेळ धांवोनी ॥६५॥

अज्ञान बोलाचे भाषणीं । तुज पाचारी प्राकृत वचनीं। स्तुतिस्तोत्र गीर्वाणीं । मजलागोनि न येतें ॥६६॥

जे जे महाकवि जाले । जपानुष्ठानें तूतें यजिलें । स्तुतिस्तोत्रें कवचें भले । तुज वश केले यंत्रतंत्रे ॥६७॥

नाना साधनें साधितां पूर्ण । होसी तयां तूं सुप्रसन्न । जाणोनि या कार्याकारण । छाया सघन त्या करिसी ॥६८॥

तो अधिकार नाहीं मज । कैसेनि घडे माझे काज । येई माते म्हणोनि तुज । नामें सहज उच्चारी ॥६९॥

सरस्वती ये म्हणउन । तुज करितो पाचारण । बाळशब्दा देशी मान । तरी भूषण थोर तुझें ॥७०॥

समर्थासी समर्थ सांभाळी । याची कोण तरी नव्हाळी । हीनदीनांतें प्रेमें कवळी । त्याची ब्रीदावळी सत्य पै ॥७१॥

जे का थोर योग्य असती । ते दीनावरी करिती प्रितीं । त्याचेच चराचरीं वाखाणिती । गुण गातीं आदरें ॥७२॥

माते तूं सर्वांहूनि थोर । सदयपणें तुझा बडिवार । ते ऐकोनी साचार । जोडोनी कर प्रार्थितो ॥७३॥

करुणाघने आदिजननी । तुज विनवितो दीनवचनीं । मज तोषवी मंगळजननी । कृपा करोनी येधवां ॥७४॥

ऐसी करुणा भाकतां हृदयीं । ध्यानीं प्रगटली लवलाहीं । प्रभा फांकली सर्वां ठायीं । वर्णूं काईं रुपातें ॥७५॥

निरखोनी पाहतां डोळेभरी । ठाण दिसे हंसावरी । ब्रह्मवीणा शोभला करीं । शुभ्रांबरीं मिरवत ॥७६॥

सुहास्य वदन अतिसुंदर । मुक्तालेणी अतिनागर । कुंदपुष्पी शुभ्रहार । शुभ्रचीर तेजाळ ॥७७॥

शुभ्रकंचुकी कुचमंडळीं । मृगदळ रेखिला दिव्यभाळीं । करकंकणें मुद्रिकावळी । दशांगुळीं विराजे ॥७८॥

कंठीं साजरें कंठाभरण । कर्णी डोलती कर्णभूषण । अंगीं मुक्तावळी सघन । सुवर्णसुमन नग नाना ॥७९॥

चंद्रहारजडित पदक । हृदयीं शोभतें अलोलिक । बाजुबंद वाक्या देख । अतिसुरेख रत्‍नचुडे ॥८०॥

सिंहकटिबंद साजिरा । जाळिपेटया रुळे करा । शोभा तेणें पातली चिरा । मुक्तकिनारा रत्‍नावळी ॥८१॥

पदीं रुळ तोडे पैंजण । अंगुळीया शोभती भूषण । झणत्कारती रुणझुण । आरक्तवर्ण पदतळें ॥८२॥

साजिरें मातेचें मुखकमळ । नाकीं सुपानी मुक्ताफळ । बोलतां दंतांचा झळाळ । कंठ मंजूळ गायनी ॥८३॥

इचें स्वरुपाची तुलना । न येचि भुवनत्रयीं कोणा । लावण्यवती हीना । सलज्ज मना पाहतां ॥८४॥

आदिमाया हे ब्रह्मकुमारी । बैसली दिसे हंसावरी । ते पाहतां नेत्रचकोरी । आनंद अंतरी न समाये ॥८५॥

अतिशुभ्र अंगकांती । कांहीं कनकवर्णदीप्ती । पक्ष सलंब विराजती । नयन दिसती आरक्त ॥८६॥

चंचुपुटे विशाळ । सुरंगरंगे तेजाळ । घोस मुखीं मुक्ताफळ । चरणकमळ आरक्त ॥८७॥

यापरी ध्यानीं शारदा । पाहतां वंदिलें त्या पदा । पार नसेची आल्हादा । शीणखेदा विसरलों ॥८८॥

सप्रेमें माता निरखोन । करुं वाटे जीवा स्तवन । अल्पज्ञ आणि बळहीन । कवळू गगन चालिला ॥८९॥

तैसें वाटलें मम जीवा । स्तवनें करुं कांहीं सेवा । अतिथोर नपवे भावा । कोण केवा दीनाचा ॥९०॥

परि दशी जेविं चंद्रासी । कीं काडवाती सुभानूसी । तेवींच आतां मातेसी । स्तवूं प्रेमेसीं बोबडें ॥९१॥

जयजय शारदे भवानी । जगन्माते विश्वस्वामिनी । त्रैलोक्यपाळके ब्रह्मनंदिनी । जगदोद्धारिणी जगदंबे ॥९२॥

जयजय दुर्गे सरस्वती । प्रणवरुपिणी आदिशक्ति । निगमागम तुज स्तविती । प्रसादप्राप्ती इच्छोनी ॥९३॥

चहूं वाचेसी सौरस । माते तुझाची कृपारस । सर्व सत्ताविशेष । चाले निवास असतां ॥९४॥

जयजय ज्ञानशक्ति उद्‌बोधे । गुणवंते तूं अगाधे । चराचरव्यापके अभेदे । चित्सुधे चिन्मात्रे ॥९५॥

जयजय मूळ पीठवासिनी । सर्वात्मके मंगलदायिनी । जय भुवनत्रयगामिनी । हंसासनी कमळाक्षे ॥९६॥

जयजय उदारे सर्वज्ञे । निजानंदे गुणप्रज्ञे । कृपा करी वो सर्वज्ञे । कविवरज्ञे सदय तूं ॥९७॥

मी दीन अनाथ शरणागत । धरोनी प्रार्थी काव्यहेत । जीवींचें जाणोनि वृत्त । करी साह्यार्थ प्रीतीनें ॥९८॥

परिसोनी बोबडिया बोला । आनंदे माय चोजवी बाळा । पोटीं धरोनी वेल्हाळा । पुरवी लळा तान्ह्याचा ॥९९॥

तेची माय सरस्वती । शरणागता बोले प्रीति । ना भी वत्सा तुजप्रति । साह्य निश्चिती मी असें ॥१००॥

हृदयीं तुझ्या विघ्नेश । तो सकळ विघ्ना करी नाश । सिद्धिदाता सर्वेश । सिद्धि काव्यास पूर्ण करी ॥१॥

माझें ठाण रसनाग्रीं । वसोनी वदवीन रसभरी । आतां निर्भय असोनी अंतरीं । ग्रंथ करी सुरस हा ॥२॥

ऐसी वदे वाग्वल्ली । वदोनिया अदृश्य जाली । रसनेस्थळीं राहिली । भावे नमिली आदरें ॥३॥

आतां नसूं तो सद्‌गुरुनाथ । जो सदैव उदार भाग्यवंत । सर्वज्ञपणें विराजित । सर्व गुह्यार्थ जाणता ॥४॥

जो अज्ञानाचा नाश करी । जो ज्ञानदीप उजळीं अभ्यंतरीं । जो ने भवाचिया पैलपारीं । शरण्या तारी निजकृपें ॥५॥

जो अविनाश निर्मळ । जो अचळ आणी अढळ । जो निवटी देहाची तळमळ । हरी तत्काळ अहंता ॥६॥

जो दीन जनातें तारी । अघोर पापियां उद्धरी । जो या त्रिविध तापातें हरी । निर्मळ करी क्षणमात्रें ॥७॥

जो तल्लीन ब्रह्मानंदी । सेवका बैसवी निजपदीं । जो तोडिता आधिव्याधी । उपाधीस नुरवोनी ॥८॥

तो आनादि सद्‌गुरु अनंत । जो व्यापकपणें विख्यात । त्याचे चरणी अनन्ययुक्त । होवोनि नत प्रार्थितों ॥९॥

जयजयाजी सद्‌गुरुराया । ज्ञानसिंधुगुणालया । विज्ञानरुपा सदया । शरण पायां दीन हा ॥१०॥

सद्‌गुरु दयाळा समर्था । विकाररहिता कृपावंता । तमशोषणा प्रकाशभरिता । तव पदिं माथा अर्पिला ॥११॥

जयजय सद्‌गुरु दिगंबरा । सर्वव्यापका सर्वेश्वरा । ब्रह्मानंदा निर्विकारा । तव पदिं थारा दीनाचा ॥१२॥

जय सद्‌गुरु चैतन्यघना । मोहच्छेदका दुःखभंजना । तत्त्वावबोधा सर्वशून्या । दीनपावना सुखमूर्ति ॥१३॥

जय सद्‌गुरु स्वानंदराशी । अभेदभेदा उन्मनिवासी । ब्रह्मावबोधा चित्सुखासी । कृपें भेटविसी आपुल्या ॥१४॥

तूं दीनबंधु दीनानाथ । इहीं परत्रीं तारक समर्थ । जाणसी अंतरीचें आर्त । कृतकृतार्थ करवीसी ॥१५॥

तुजवीण कोण्ही थोर । भुवनयत्रीं न देखों साचार । शोधोनि पाहतां ग्रंथांतर । महिमा अपार सद्‌गुरुचा ॥१६॥

सद्‌गुरुदैवताहोनी । आगळा नसेचि त्रिभुवनीं । उपमा देतां गुरुलागुनी । पदार्थ कोण्ही नसेची ॥१७॥

जरी म्हणवी ती मातापिता । तरी करविती माईक गुंता । सद्‌गुरु तूं मायानाशिता । त्रिविधतापता नुरविसी ॥१८॥

यालागीं तूं निरुपम । शरणागताचा विश्राम । दूर करोनि भवभ्रम । देसी आराम स्वात्मत्व ॥१९॥

सद्‌गुरु अनंता कृपाघना । कोण जाणे तुझिया महिमाना । म्हणोनि अनन्यभावें चरणा । जालों शरण दातारा ॥२०॥

हीनदीन मी शरणागत । तव पदाचा अंकित । असें क्षीण नेमस्त । थोर पतित अपराधी ॥२१॥

मूढ मलिन अज्ञान । अर्भक नेणता पूर्ण । अनधिकारी जाण । कुश्चळमलीन पापराशी ॥२२॥

अगणित अन्यायी दोषी । परी शरण आलों पायापासीं । आतां क्षमा करोनि कृपाराशी । मज दीनासी अंगीकारा ॥२३॥

तुम्ही कृपेचे सागर । मी शरणागत पामर । अंगीकारोनी कृपाकर । मस्तकावर ठेविजे ॥२४॥

तूं गुरुराज आमुची माउली । दीनादुर्बळाची साउली । अनाथ वत्साची गाउली । पाखर घाली कृपेचा ॥२५॥

शरणागतासी तारावें । खळदळ दुष्ट मारावें । अहंबुद्धीतें हारावें । पूर्ण करावे मनोरथ ॥२६॥

गुरुमाय तूं होसी स्नेहाळ । मी अज्ञान तुझें लडिवाळ । मम मनींची जाणोनि आळ । होवोनि कृपाळ पुरवी जे ॥२७॥

तुजवीण कोणा छळावें । इतरें काय तें पुरवावें । त्वा माउली धावोनि यावें । वोसंगा घ्यावें बाळका ॥२८॥

तंव तो कृपाळू सद्‌गुरुराणा । आनंदे प्रगटोनि बोले वचना । बाळका बहु विज्ञापना । काय कारणा मांडिली ॥२९॥

कां गा पडिलासी संकटीं । कोण पडिली तुज अटी । कोण अर्थ धरोनि पोटीं । स्तवन निकटीं आरंभिलें ॥३०॥

शब्द कृपेचे ऐकतां । तात्काळ चरणीं ठेविला माथा । मागुती जालों विनविता । अंतरार्था पुरवावया ॥३१॥

जयजय सद्‌गुरु परात्परा । आदिअनादि विश्वोद्धारा । माझी विनंती अवधारा । सदयउदारा निर्विकल्पा ॥३२॥

आपुलेनी कृपाबळें । मज दीना पावन केलें । हेतु सकळ पुरविले । गुज दाविलें एकांती ॥३३॥

मोक्ष पदाचिया वाटा । मज दाविला ज्ञानचोहटा । पुरविलें तुम्ही बाळहट्टा । दाविला साठा ऐक्यत्वें ॥३४॥

न करवितां साधन । दाविलें मज तें गुप्तधन। आतां कांहीं व्हावें उत्तीर्ण । हें तो कारण असेचि ना ॥३५॥

परी एक असे विनंती । विनवितां रोष न यावा चित्तीं । कृपा करोनी सत्वरगती । अभयप्रीती देईजे ॥३६॥

तव बोले गुरुराज । कवण अर्थ तो सांगे मज । आतां न धरी संकोच लाज । करीन काज परिसोनी ॥३७॥

मग जयजयकारें टाळी । पीटिली आनंदहृदयकमळीं । पुढतीं भाळ चरणकमळीं । ठेवुनी आरंभिली प्रार्थना ॥३८॥

जयजय स्वामी गुरुनाथा । हा काळ जातो वृथा । कांहीं वदावें ग्रंथा । ऐसें चित्ता वाटतसे ॥३९॥

म्हणाल बहु कवि जाले । त्यांनीं अनेक ग्रंथ केले । वरदी अत्यंत भले । जेणें तरले जड मूढ ॥४०॥

तेथें तुझा पाड किती । त्यापुढें कायसी मती । ऐसें म्हणाल निगुती । तरी विनंती अवधारा ॥४१॥

जरी गरुडें घेतलें गगन । तरी चिमणीनें रहावें गृह धरुन । श्रीमंतें केलें देवार्चन । दीनें पूजन न करावें ॥४२॥

समर्थें संपदा जोडिली । दीनासि चिंता केवीं जाली । त्याची प्रपंचता खुंटली । कळोनि आली स्वामीबोले ॥४३॥

या बोलातें ऐकून । सद्‌गुरु करिती हास्यवदन । बारे आपुली शक्ति पाहून । सर्व कारन करावें ॥४४॥

तुझिया मनीचा हेत । मी जाणतो गा समस्त । चालवी आतां रसाळ ग्रंथ । गुह्य कथार्थ नानाविध ॥४५॥

एकाग्र करोनी मन । आठवुनी सद्‌गुरुध्यान । करी ग्रंथाचें लेखन । न्यून तें पूर्ण करीन मी ॥४६॥

कृपा उपजोनी सद्‌गुरुनाथा । म्हणे बा न करी कांहीं चिंता । मीच ग्रंथ वदविता तूं निमित्ता । मात्र राहे ॥४७॥

या परी श्रीगुरु अनंत । आनंदें वरप्रदान देत । धावूनी चरणीं जडला सुत । प्रेम हृदयांत न समाये ॥४८॥

भावें धरितां दृढ चरण । सद्‌गुरु देतसे अभयदान । निर्विकल्पें करी लेखन । जयकल्याण सर्वदा ॥४९॥

श्रीगुरुप्रसादा संपादिलें । भाग्य विशेषची लाधलें । मन संतोषातें पावलें । आनंदमेळे डुल्लत ॥५०॥

आतां नसूं मातृदेवता । तेवीं आदरें नमूं पिता । मज जे का उभयता । जन्मदाता असती ॥५१॥

उभय संयोगमेळीं । संभव माते उदरकमळीं । नवमास ओझें पाळीं । अनेक आंदोळी सोसोनी ॥५२॥

कामें उदंड करी देखा । गर्भासी लागों नेदी धका । रसनेच्या रससुखा । विसरवी बाळका दुःख न हो ॥५३॥

हळूहळू पाउलें टाकी । जपोनी गर्भातें राखी । गर्भव्यथा सोसी निकी । धन्य ते की माउली ॥५४॥

जोंवरी गर्भाचा वास । तोंवरी दुःख भोगी विशेष । प्रसूतिव्यथा प्राणनाश । सोसी जीवास बहुतची ॥५५॥

ऐसिया दुःखातें भोगून । साहिलें बाळाचें जनन । मधु मुखातें लाउन । दिधलें स्तन कृपेनें ॥५६॥

न्हाणोनि केलें निर्मळ । स्नेहें भरिलें सीरताळ । रात्रंदिवस जपे स्नेहाळ । दुःखी तळमळ होतसे ॥५७॥

बहुतची मळमूत्र साहिलें । सोंवळें बाळका वाहिलें । रस नाना संकोचिले । मज वाढविलें बहुप्रीतीं ॥५८॥

निर्गुणी अनामी असतां । त्यासी नाम ठेवी माता । सुखसोहाळे भोगवितां । नाणी चित्ता कंटाळा ॥५९॥

हागी ओकीं सांभाळी । भरली न टाके पत्रावळी । रोदनीं धावे लावी खेळीं । पुरवी आळी सांडी काज ॥६०॥

लागेल बाळा दृष्टी । म्हणोनी घे इठीमीठी । गळां वाघनखें रीठी । घाली पेटी दृष्टमणी ॥६१॥

चालतां रांगतां पडे झडे । पोटीं धरोनी माता रडे । सांडी ओंवाळोनी एकीकडे । वाडेकोडें वस्तु नाना ॥६२॥

उभयतां पाळिती कौतुकें । भातुकें देती अलोलिकें । अळंकार घालिती निके । आनंदें सुखें खेळविती ॥६३॥

केलें लहानाचें थोर । बाळकाचा झाला कुमर । विद्यारंभ मौंजीप्रकार । विवाह सत्वर करविला ॥६४॥

सुखसंतोषें वाढविलें । सकळ संस्कार घडविले । प्रपंच परमार्था दाखविलें । प्रौढ केलें उभयतें ॥६५॥

धन्यधन्य ते मातापितर । तयां माझा नमस्कार । फेडावया उपकार । मज तो प्रकार दिसेना ॥६६॥

ग्रंथ धुंडाळोनी पाहतां । सर्वांत श्रेष्ठ मातापिता । पुत्रासी देव यापरता । नाहीं सर्वथा वेद बोले ॥६७॥

हें जणोनि करावें सेवन । तरी मी मशककीटक हीन । कैंचें मातें अंगवण । सेवाधन वेंचावया ॥६८॥

न घे मातें त्यांची सेवा । मुखरोग्यासी कैंचा मेवा । काय करुं हतभाग्य दैवा । लाभ बरवा घेववेना ॥६९॥

मी तों पामर पापराशी । न घडेची सेवा कांहीं मजसी । तेचि कृपाळू निश्चयेसी । जडमूढासी पाळिलें ॥७०॥

लौकिकसंबंधें करुन । उभयतांचे वंदिले चरण । परी मागतों कृपादान । प्रीतीकरुन ते देती ॥७१॥

धन्य तेची भूमीवर । जयां देव मातापितर । सेवा करिती जे निरंतर । तयां नमस्कार पैं माझा ॥७२॥

त्यांचे जे कां चरणरेण । ते मम मस्तकीं जाण । त्यांच्या पादुका वाहीन । सेवक म्हणवीन तयांचा ॥७३॥

असो राधिका माझी माता । अनंत नामें माझा पिता । तोची सद्‌गुरु उपदेशिता । चरणीं माया तयाच्या ॥७४॥

अनन्यभावें जालों शरण । तेणें दिधलें अभयदान । न पाहतां गुणावगुण। केलें पावन अनाथा ॥७५॥

अनंतची माझा सद्‌गुरु । अनंतची होय विघ्नहरु । या ग्रंथाचा दातारु । नेता पैलपारु अनंत ॥७६॥

अनंतशक्ति राधिका । तेची वागीश्वरी अंबिका । तिच्या कृपाबळें देखा । ग्रंथ नेटकां चालेल ॥७७॥

त्यांनींच बोधिलें वर्म मजसी । आदरें शरण जाय संतांसी । लक्ष ठेवी त्यांचे सेवेसी । स्तुतिस्तवनेंसी गौरवी ॥७८॥

तोषवोंनी करी प्रसन्न । विनटे प्रीतिभाव धरुन । मग सहजची कल्याण । सुखसंपन्न होसी तूं ॥७९॥

ते साह्य असतां । कायसी या ग्रंथाची चिंता । न वर्णवे त्याची योग्यता । करिती सत्ता देवावरी ॥८०॥

हे आज्ञा शिरीं वंदोनी । शरण आलों संतांलागोनी । अतिविनयें कर जोडोनी । मस्तक चरणीं वोपिला ॥८१॥

महाराज तुम्ही संतमूर्ती । अवताररुपें प्रगटला क्षितीं । उद्धरावया दीनांप्रती । अज्ञान निवृति करावया ॥८२॥

व्यास वाल्मीक शुक । उद्धव अक्रूर मारुती देख । ब्रह्मा विष्णु शिवादिक । अवतार निःशंक संत तुम्ही ॥८३॥

जी तुम्ही धर्मस्थापना । तारावया या पतितजना । करावया भक्तिनिरुपणा । अवतारधारणा तूमची ॥८४॥

तुम्ही केवळ ईश्वर । करावया जगदुद्धार । प्रगटलां सगुणत्वें साचार । कलिमल दुस्तर नाशावया ॥८५॥

अहो जी तुम्ही योगिराज । सदय ज्ञाते सतेज । तुम्हा पुढें दीन आज । चरणरज इच्छितों ॥८६॥

संत तुम्ही शांत दांत । मूर्तिमंतची वेदांत । करोनि सर्व सिद्धांत । महिमा अद्‌भुत दावितां ॥८७॥

तुम्हां संतांची स्थिती गती । न लभे कवणाचिया हातीं । जरि चातुर्य करी युक्ती । तया कल्पांतीं सांपडेना ॥८८॥

जरी जाला वेदपाठक । किंवा तपोधन अधिक । कीं यागादिकर्ता मख । तया साम्यक नसे संतीं ॥८९॥

तुमच्या कीर्तीचे पवाडे । लिहितां भूपत्र असे थोडें । विष्णु होवुनिया वेडे । मागेंपुढें उभेची ॥९०॥

अगाध तुमचें थोरीव । दासची केला रमाधव । पाहोनी तुमचें वैभव । घोटिती देव लाळ कीं ॥९१॥

तुम्ही ब्रह्मांनंदसागरीं । सदा भोगितां प्रेमलहरी । वास तुमचा चिदंबरीं । शांत अंतरीं दयाभूत ॥९२॥

तुम्ही संत अद्वय निःसंग । पर ब्रह्मीं तुमचा भोग । सदाचरणीं भक्तियोग । साधोनि चांग विचरतां ॥९३॥

साधु तुम्ही दिनदयाळ । अंतर तुमचें अतिकोमळ । शरणागतांचें प्रतिपाळ । होवोनी कृपाळ करितसां ॥९४॥

ऐसिया कीर्तीतें ऐकोन । मी याचक आलोंसे धावोन । अनन्यप्रेमें वंदूनि चरण । अभयदान मागतसें ॥९५॥

परिसोनि बाळकाचे बोल । जेवीं आनंदति स्नेहाळ । तेवीं संतमाउलीचा मेळ । देती डोल आनंदें ॥९६॥

म्हणती बा रे अनंतसुता । बहु श्रमलासी स्तुति करतां । बैस अंतरीच्या अर्था । सांग आतां आम्हासी ॥९७॥

संकोच न धरी कांहीं । सांगे पुरेल हेतु पाही । अभय ऐकतां लवलाही । भाळ पायीं ठेविला ॥९८॥

द्वय करांतें जोडोनी । विनवितां झालों ततक्षणीं । लक्ष ठेविजे प्रार्थुनी । संतजनीं आदरें ॥९९॥

सर्व साधूंनीं काव्य केलें । कोण्ही अभंग पदें बोलिले । कित्येकी ग्रंथ रचिले । श्लोक आर्या कितीकांच्या ॥२००॥

कित्येकीं दोहोरे चौपाई । कटीबंद आणि सवाई । गड्‌डाळिका ठाई ठाई । चूर्णिका त्याही बोलिले ॥१॥

केकावळी छंदबंद । कोण्ही रचिले आख्यानप्रबंध । ऐसें कवींनीं नानाविध । अनुभवसिद्ध गाइलें ॥२॥

प्राकृत आणि संस्कृती । जैसी जया असे गती । ईश्वरें दिधली मती । तैशा रिती वाखाणिलें ॥३॥

ते तो प्रासादिक सिद्ध जाले । जगीं मान्यतेसी आले । देवसंती अंगीकारिले । कीर्ती भरलें त्रिभुवन ॥४॥

समर्थाचें भाग्य देखोन। रंक अंतरीं उदासीन । मज कां न पवे नारायण । तेवीं मनीं इच्छितें ॥५॥

संत चातुर्यज्ञानखाणी । अंतरार्थ वोळखिला मनीं । म्हणे बापा अजिचे रजनी । निजे प्रार्थुनि देवापुढें ॥६॥

तो दीनवत्सल श्रीअनंत । पुरविल तुझे मनोरथ । जो स्वप्नी देईल दृष्टांत । तो आम्हातें निरोपी ॥७॥

संतआज्ञा वंदोनी प्रीतीं । हृदयीं ध्याइला कमळापति । हेतु ऐसी करोनि स्तुति । केली एकांती निद्रा पुढें ॥८॥

तो उत्तरशेष उरली रजनी द्विजें तांबूल घातला वदनीं । जिव्हेसी केश सलंबपणीं । निबिडदाटणी उगवले ॥९॥

दंतांतुनी निघाला मांसतंतु । तो ओढितां असंभाव्य निधतु । किती काय न कळे अंतु । श्रमतां तोडितु करी बळें ॥१०॥

तंव उदया पातला तमारी । जागृत जालों झडकरी । जावोनि संतमांदीभीतरी । भावें नमस्कारी तयांतें ॥११॥

मम वृत्ति देखोनि आनंदघन । संत म्हणती दिसतें सुलक्षण । आतां वृतांत पुसायालागुन । प्रसादचिन्ह वाटतें ॥१२॥

जगद्‌गुरु संतराजेंद्र । वैराग्यशीळ ज्ञानसमुद्र । हृदयीं होवोनि कृपें आर्द्र । म्हणती सुभद्र तुज असे ॥१३॥

सांगे वृत्तांत रजनीचा । जो तुज जाला असेल साचा । पल्लव न फोडी कल्पनेचा । मिथ्या वाचा न बोलें ॥१४॥

मग जोडुनी द्वयपाणी । करी संतांपुढें विनवणी । जे अस्वस्थ घडली रजनीं । सत्य निरुपणीं निवेदिले ॥१५॥

तो परिसोनि वृत्तांत । आनंदमय जाले साधुसंत । म्हणती प्रसाद लाधला निश्चित । अति अद्‌भुत सदयत्वें ॥१६॥

या दृष्टांताचा नवलाव । आम्हां दिसतो अति अपूर्व । तूतें तुष्टोनि रमाधव । करी गौरव प्रासादिक ॥१७॥

देखिला द्विज तो अनंत । मुख्य प्रसाद तांबूल प्राप्त । कवित्व बुद्धीचा हेत । पृथक्‌ दावीत रसनेसी ॥१८॥

कवित्वबुद्धीचा प्रसार । अतिसधन होय विस्तार । आतां तंतूचा प्रकार । अतिसुंदर असे तो ॥१९॥

कवित्वासी नव्हे खंडण । करिसी तितकें चाले पूर्ण । आतां न धरी अनुमान । दृष्टांतलक्षण जाणविलें ॥२०॥

हेचि संतांची अभयता । न घडो कवितेसी न्यूनता । तया असो सुरसरसता । सर्वी मान्यता आगळी ॥२१॥

संत साधु सिद्ध मुनी । वर देतां अभयवचनीं । हर्षयुक्त होविनि मनीं । लोटांगण घातलें ॥२२॥

यापरी संतांतें स्तविलें । त्यांनीं बाळातें अपंगिलें । आवडीचें भातुकें दिल्हें । मज तोषविलें दीनातें ॥२३॥

यावरी जे श्रोते सज्जन । त्या पदीं माझें साष्टांगनमन । जे सज्ञान चतुर विचक्षण । ग्रंथश्रवणकर्ते त्यां ॥२४॥

अहो तुम्ही रसज्ञ पंडित । महासुशील आणि शांत । अर्थज्ञ गुणज्ञ विख्यात । तुम्हां प्रणिपात आदरें ॥२५॥

तुम्ही सर्वज्ञ निपुण । जाणते भाविक विराजमान । प्रेमळ सदैव संपन्न । आनंदघन महामूर्ति ॥२६॥

तुम्ही ग्रंथरसाचीं पात्रें । धन्यधन्य तुमचीं श्रोत्रें । अहो तुम्ही ग्रंथाचीं सूत्रें । बैसला सत्पात्रें सभेस ॥२७॥

तुम्ही ज्ञानपेठेचे जोहारी सुरेख । ग्रंथरत्‍नांचे परीक्षक । सारवस्तूचे ग्राहक । संग्रहकारक अतियोग्य ॥२८॥

जी तुम्ही विवेकसागर । ग्रंथसरोवरीचे हंस थोर । अर्थमुक्तांचे वेंचनर । धन्य निवडणार दूध पाणी ॥२९॥

तुमचेनि ग्रंथविलास । वाढतां होय अधिक रस । वक्तिया पोटीं उल्हास । दिवसेदिवस वाढतसे ॥३०॥

म्हणवोनि करितों विनंती । अवधान द्यावें या ग्रंथीं । चुकलें सांभाळा निगुतीं । हीनमती मी असें ॥३१॥

मी पामर अत्यंत दीन । नसतां अधिकार मजलागुन । तुम्हां सलगी इच्छी मन । मन निरुपण कांहीं इच्छी ॥३२॥

जरी तुम्ही कृपा कराल । तरी वदेल हा लडिवाळ । न स्वीकारितां फोल । होतील बोल निर्धारें ॥३३॥

यास्तव जोडोनि पाणी । भाळ ठेवितों पुढतीं चरणीं । तुमचेनि साह्यपणीं । वाचा निरुपणीं वदेल ॥३४॥

ऐकोन वक्त्याचे वाग्वाद । श्रोते मानिती बहुत आनंद । म्हणती स्तुति अगाध । होवोनि सद्‌गद कासया ॥३५॥

आम्ही श्रवणार्थी क्षुधित । कीर्तनरसीं अत्यद्‌भुत । पान करवा निश्चित । कोण काव्यार्थ असे तो ॥३६॥

तुम्हा वदविता श्रीअनंत । येथें ही तोची श्रवण करित । उभय पक्षीं सांभाळित । भेदरहित जगदात्मा ॥३७॥

कर्णपात्र वोढवलें । मनही एकाग्र समर्पिलें । तरी आतां उतावेळें । पाहिजे वाढिलें परिपूर्ण ॥३८॥

आजी दैव आलें उदयास । उद्गार आज्ञा ईश्वरी तुम्हांस । तरि तृप्त करावें श्रोतियांस । अति उल्हास सकळातें ॥३९॥

आम्ही अन्यथा न बोलों वचन । नाहीं वदलों कुचेष्टपण । करा जी आतां निरुपण । करुं श्रवण आवडीं ॥४०॥

श्रोते वक्ता समरस । उभय अंतरी उल्हास । येथोनि आरंभ विशेष । ग्रंथरस वाढता ॥४१॥

आतां नमूं ऋषि भारद्वाज । जो तपोनिधी तेजःपुंज । ज्याचें दर्शन होता सहज । पूरवी काज अंतरीचें ॥४२॥

सकळ तीर्थे असती चांग । त्यांत उत्तम तो प्रयाग । तयाचा तो उत्तम भाग । वेष्टित संग गंगेचा ॥४३॥

तेथेंचि असे तो उत्तम । मुख्य भारद्वाजाचा आश्रम । करितां यात्रेचा क्रम । असे विश्राम ते ठायीं ॥४४॥

आश्वलायनशाखा ऋग्वेद । भारद्वाजगोत्री प्रसिद्ध । वेलविस्तार विविध । जाला भेद उपनांवें ॥४५॥

असो भारद्वाजगोत्रीं जाण । जन्म जाला मजलागुन । म्हणोनिया प्रेमें करुन । त्याचे चरण वंदिले ॥४६॥

आतां नमूं ते कुळदेवता । श्रीमत्सद्‌गुरु अनंता । देवची नाहीं या परता । सर्वात्मकता येथेंची ॥४७॥

याविरहित जें दैवत । तयाचेचि असती अंगभूत । अनंतरुपें नटला निश्चित । म्हणोनी प्रणिपात त्या पदा ॥४८॥

जैसे एका देहासी । इंद्रियें शोभती जैसीं । नामें वेगळाली तैसीं । विभक्तपणासी दैवतें ॥४९॥

यालागीं दैवतेंद्र । होय सद्‌गुरु कृपासमुद्र । या पदीं माझा नमस्कार । भाळ निरंतर त्या पाई ॥५०॥

धरोनी सप्रेम आवडी । साधिली नमनाची परवडी । स्तवितां अत्यंत गोडी । जाली जोडी ग्रंथमिषें ॥५१॥

प्रथम नमिला तो गजवदन । जो सिद्धिबुद्धिदाता मंगलभूषण । पुढें सरस्वतीतें नमितां जाण । झाली प्रसन्न वागीश्वरी ॥५२॥

मग त्या सद्‌गुरु अनंता । स्तवितां तोषोनि वारी चिंता । तयानंतर मातापिता । जन्मदाता स्तवियेलें ॥५३॥

तदुत्तर संतमहंत । तया जालों शरणागत । ते होवोनि कृपावंत । प्रसाद प्राप्त करविला ॥५४॥

ग्रंथरसाचे जाणते । ते मग स्तवी आदरें श्रोते । नमस्कारितां तयांतें । जाले श्रवणातें सादर ॥५५॥

प्रीती नमिला तो भारद्वाज । ज्या गोत्रीं जन्म जाला मज । जो हृदयीं ध्यातां महाराज । घडे काज इच्छिलें ॥५६॥

आदिअनादि कुळदैवता । भावें नमिलें त्या अनंता । जो अनंतब्रह्मांडें नियंता । त्या कृपावंता स्तवियेलें ॥५७॥

जेथोनि कथेचा रस । वाढविता श्रीजगदीश । कर्ता नोहे मी निःशेष । ज्याचा विलास तोचि कथी ॥५८॥

चित्तचालक चैतन्यघन । हृदयनिवासी नारायण । ज्याचे सत्तामात्रें करुन । इंद्रियें संपूर्ण वागती ॥५९॥

तोचि या ग्रंथाचा कर्ता । रसनेलागीं बोलविता । कर्णेंद्रियासी ऐकविता । श्रोतावक्ता तोचि येथें ॥६०॥

येर्‍हवीं मुक्यानें काय बोलावें । पांगुळें तरी काय चालावें । बधिरें केविं ऐकावें । शक्ति निर्जीव केविं कीजे ॥६१॥

परि या ईश्वराचे अगाध खेळ । जयावरी हा होय कृपाळ । अचाट करणी करवी चपळ । वाढवी प्रबळ भलतेंची ॥६२॥

शहाणेच करवी वेडे । वेडेची शहाणे रोकडे । कृपें अवकृपें जोडे । करणें निवाडे काय ते ॥६३॥

यास्तव दीनाची विनवणी । असे सज्जनाचे चरणीं । कर्तेंपणाची करणी । संतजनीं जाणिजे ॥६४॥

मी अत्यंत पामर । जेविं काष्ठयंत्रप्रकार । परि तो दाविता चमत्कार । विरक्त निर्धार असे कीं ॥६५॥

तोचि श्रीस्वामी अनंत । पिता सद्‌गुरु तोचि समर्थ । म्हणोनी ग्रंथीं नाम अनंतसुत । दास अंकित संतांचा ॥६६॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । श्रवणेंची पुरती मनोरथ । सदा परिसोत संतमहंत । प्रथमाध्याय गोड हा ॥२६७॥

॥ इति प्रथमोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP