मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची|
राका कुंभार

राका कुंभार

संत नामदेवांच्या काळातील संत राका कुंभार पंढरीनगरीत राहात होते. नामदेवांचा कौटुंबिक स्नेह राकांच्या कुटुंबाशी होता.

संत राका कुंभार यांच्या जन्म-मृत्युची तारीख, समाधी काळ कोठेही उपलब्ध नाही. संत नामदेवांच्या काळातील संत राका कुंभार पंढरीनगरीत राहात होते. नामदेवांचा कौटुंबिक स्नेह राकांच्या कुटुंबाशी होता. संत महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या ‘भक्तविजय’ पद्य ग्रंथावरून राका हे मूळचे गुजरातचे होते, अशी माहिती मिळते, परंतु नंतर विठ्ठलाच्या ओढीमुळे ते पंढरपूरात आले व तेथेच स्थिर होऊन विठ्ठलभक्त झाले. त्यांची विठ्ठलावर अनन्यसाधारण भक्ती होती. त्यामुळेच संत नामदेवांच्या परिवारात ते कायमचे विठ्ठलभक्तीत स्थिर झाले होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी बाका व मुलगी बंका होती. त्या दोघीही विठ्ठलभक्त होत्या. त्या कुटुंबीयांचे प्राणिमात्रांवर अतोनात प्रेम होते. एकूणच राका कुंभार जरी नामदेवांच्या समकालीन असले तरी, वारकरी संप्रदायात सर्वांच्या संगत सोबत होते. त्यांच्या एकूणच संत सहवासाचा त्यांचे चरित्र व अभंग यांच्या संदर्भात सर्वांचेच दुर्लक्ष झालेले दिसते. त्यांचा कोठेही उल्लेख नाही. संत गोरोबा आणि राका कुंभार हे दोघे समकालीन संत होते. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ असे विठ्ठलमय झालेले राका कायम अद्वैती अवस्थेत असत. समकालीन संतांचा एक थोर वैराग्यमूर्ती असल्याची प्रचीती येत असे.
राकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकही अभंग उपलब्ध नाही, संत नामदेवांनी अभंगांमधून राका यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांच्याविषयी चमत्कारकथा संत नामदेवांनी लिहिल्या आहेत. (श्रीसकलसंतगाथा -आवटे प्रत)
राकांच्या जीवनचरित्रात दोन चमत्कार कथा घडलेल्या आहेत. या संदर्भात संत नामदेवांनी हे राका कुंभारांचे चरित्र अभंगातून अतिशय प्रवाही, सत्त्वसंपन्न शब्दांमधून मांडले आहे. संतांचे चरित्र म्हणले की, अनेकदा अद्भुततेचे, अलौकिकतेचे वलय असते. अशा व्यक्ती अनेकदा संतसज्जन, ईश्वरावतार किवा अवतारी पुरुष असतात. चरित्रलेखकही त्याच पद्धतीची मांडणी करीत असतात.
येथे संतांच्या अनन्य भक्तीप्रेमामुळे त्यांच्या जीवनात ईश्वराने काही चमत्कार घडविलेले असतात.
अतिशय प्रेमळ अशा वैराग्यमूर्ती समजलेल्या राकांच्या जीवनात एक घटना घडली की,
“करिती आपुला स्वकर्म व्यवहार। वाचे निरंतर रामनाम॥”
एकदा राकांची मुलगी बंका भीमातीरी एकटीच आंघोळ करून नदीच्या काठावर अंग वाळवत होती. तिच्याजवळ संत नामदेवांची कन्या वस्त्र धुवत होती. धुताना कपडे आपटताना पाण्याचे शिंतोडे बंकाच्या अंगावर उडाले. बंका रागाने नामदेवकन्येला म्हणाली, “मी आंघोळ करून मानसपूजा करीत आहे, तुला दिसत नाही का ? नामदेवकन्या दुखावली, ती रागाने म्हणाली, “जातीची कुंभार अन् सोवळे करते, तूच बाजूल हो” बंका काही बोलली नाही. नामदेवकन्येला तिचा राग आला, तिने बंकाचे उणे काढायला सुरूवात केली, म्हणाली, “इतकं सोवळं असताना सुखाचा संसार सोडून रानावनात दारोदार हिंडला असता का ? तुझे वडील भक्त म्हणवून घेतात. कामिक भक्त, स्वार्थासाठी भक्ती करायची, संकट टाळण्यासाठी देवाला साकडे घालायचे, स्वार्थ साधायचा ही तर तुमच्या भक्तीची रीत आहे.”
बंका अस्वस्थ झाली, पहिल्यांदा जातीवरून हिणवले. आता वडिलांच्या भक्तीचे उणे काढले. ती नामदेवकन्येला म्हणाली, “तुझे वडील किती निःस्पृह भक्त आहेत ? नेहमी देवापुढे जाऊन ढसाढसा रडण्यापलीकडे येतच काय त्यांना, देवापुढे बसून आक्रस्ताळी भक्ती करतात. तेव्हा नामदेवकन्या घरी निघून गेली.
नामदेवकन्या घरी आल्यावर तिने राका कुंभारांच्या मुलीचे नामदेवांना शब्द ऐकवले. “तुझे वडील रडका भक्त आहेत.” बौद्धरूप धारण करून बसलेल्या विठ्ठलापुढे आपले डोके आपटून बोलायला लावले. माझे बाबा विठ्ठलाचे विरक्त भक्त आहेत. नामदेव म्हणाले, “विठ्ठलालाच विचारू खरा विरक्त भक्त कोण?” नामदेव मंदिरात गेले, विठ्ठलाला विचारले, “अनेक भक्तांमध्ये राका कुंभारही भक्त आहेत, ‘तो विरक्त आहे की सकाम भक्त? नामदेव विठ्ठलाचे श्रेष्ठ भक्त, पण नामदेवांच्या मर्यादा विठ्ठलाला माहीत होत्या. नामदेवसमकालीन संताच्या पारमार्थिक योग्यतेची जाणीव विठ्ठलाला होती. नामदेवांच्या ठिकाणी अहंकार असे, अहंकारातून मुक्त करण्याची संधी परमेश्वर कधी सोडत नसत.
नामदेवांना ईश्वर म्हणू लागले, “तू श्रेष्ठ भक्त आहेस; पण राका कुंभारासारखा वैराग्यसंपन्न भक्त या पृथ्वीवर भेटणार नाही.” नामदेवांना विठ्ठलाच्या वाक्याने वाईट वाटले. पण नामदेव म्हणाले. “मला त्याची प्रचीती द्या, विरक्त भक्त म्हणून
सिद्ध करून दाखवा.” निश्चित दाखवतो, असे म्हणून ते नामदेवांना व रूक्मिणीला घेऊन रानावनात गेले की जेथे राका, बाका व मुलगी बंका हे तिघे जण वाळलेली लाकडे वेचित होते. ती विकून ते उदरनिर्वाह चालवीत. ते कोणत्याही झाडाची फांदी तोड़त नव्हते. ते तिघेही एकमेकांना प्रेमभावाने जिवापलीकडे जपत असत. ते दोघे (पती-पत्नी) एकमेकांच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मतत्त्वावर प्रेम करीत. प्रत्येक प्राणिमात्रात परमात्मा निर्गुण निराकार रूपाने स्थित आहे. अशी त्या तिघांची दृढप्रद्धा होती. त्याप्रमाणे ते आचरण करीत.
विठ्ठलाने नामदेवांना दुरून दाखविले, “पाहा नामदेवा खरा विरक्त भक्त असा असतो की, ज्याच्या अंतःकरणातील विकास-वासना जळून पूर्ण खाक झाल्या आहेत. त्याची निष्काम भक्ती आहे. तरीही नामदेवांच्या जवळ अहंकार होता. त्यांचा विश्वास बसेना, मग रुक्मिणीमातेस नामदेव म्हणाले, “माते एवढ्या दारिद्र्यात पिडलेल्यास कशाचाही लोभ नसावा, तुम्ही त्याची परीक्षा पहा” रूक्मिणी मातेस नामदेव अहंकारमुक्त झाला पाहिजे, म्हणून आपल्या हातातील ‘सुवर्णकंकण’ काढले व ज्या रस्त्याने रांका, बाका व बंका येत आहेत. तेथील लाकडाच्या ढिगाजवळ कंकण ठेवले व दुरून पाहू लागले. ते कुटुंबीय लाकडाच्या ढिगाजवळ आले. लाकडे उचलू लागले, त्याच्या खाली सुवर्णकंकण दिसले, आपली सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी कोणीतरी ठेवले असावे, त्यांनी कंकणाशेजारची लाकडेही उचलली नाही. ते पाहून विठ्ठलाचे नामस्मरण करीत तिघेही पुढे चालू लागले.
नामदेव रूक्मिणीला म्हणाले, ‘माते खरंच धन्य आहे तो राका, खरा विरक्त भक्त शोभतो. देव म्हणाले हे पांडुरंगा तुम्ही एकदा तरी राकाला दर्शन द्या. हे नामदेवांनी ऐकल्यानंतर
“नामा म्हणे देवा वंदि मी चरण। घरा अलिंगुनी तिघा जणा।”

इतकी थोर विठ्ठलभक्ती नामदेवांनी अनुभवली. नामदेवराय म्हणाले, “मी त्यांना वंदन करून त्यांचा दास होतो.”

“नामदेव बोले त्यांचा मी दास। शरण तयास वारंवार।”

वरील संपूर्ण चरित्र ‘श्रीसकलसंतगाथा’ नामदेव लिखित संतचरित्रामध्ये अभंगबद्ध झालेले आहे. राका कुंभाराला विठ्ठलभक्तीतून मिळालेले प्रेम, नामदेवाचा अहंकार, नामदेवास राका एक विरक्त भक्त, त्याची आलेली प्रचीती, सत्त्वपरीक्षा, वैराग्यसंपन्न भक्त, राका कुटुंबीय याचे अतिशय सोप्या शब्दांमध्ये उत्कट- भक्तिभावात प्रवाही व सहजसुंदर असे राका चरित्र नामदेव समकालीन असल्याने हुबेहूब रेखाटले आहे.
ह्या लेखाचा संदर्भ नामदेवरायांची प्रभावळ ह्या पुस्तकातून घेतला आहे. ह्या पुस्तकाचे लेखक डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते आहे.

N/A

References : N/A
Last Updated : September 04, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP