मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची|

सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे.


सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर यांचा जन्म शके१७६७ अश्विन कृष्ण सप्तमी इ.स.१८४५ मध्ये झाला. सद्गुरु वीरनाथ महाराज आणि पूज्य रखुमादेवी यांच्या पोटी सद्गुरु मल्लनाथ महाराजांचा जन्म होताच सर्वत्र दिव्य असा प्रकाश पसरला. मल्लनाथांचा जन्म झाला तेव्हां ते खूप रडू लागले. बाळाचे रडणे काही केल्या थांबेना. तेव्हा विठ्ठल नामाचा गजर स.वीरनाथांनी सुरू केला. विठ्ठल नामाचा गजर केला की बाळ रडण्याचे थांबत असे.म्हणून पिता सद्गुरु वीरनाथांनी विठ्ठल नामाचा अखंड विणाच नाथ मंदिरात औसा येथे उभा केला. स.मल्लनाथ महाराजांच्या जन्मानंतर त्यांची माता पूज्य रखुमादेवी एक महिन्यातच निवर्तल्या.

मल्लनाथांचा सांभाळ पूज्य महादाबाई यांनी केला. सद्गुरु वीरनाथ महाराज म्हणजे आपल्या पित्याकडूनच सद्गुरु मल्लनाथ महाराजांना इ.स.१८५५ मध्ये गुरु उपदेश प्राप्त झाला. अवसेकर घराण्यातील चक्रीभजनाची व नाथषष्ठी उत्सवाची परंपरागत सेवा सद्गुरु वीरनाथ महाराजांनी सद्गुरु मल्लनाथ महाराजांकडे सोपविली. मल्लनाथांचे वय यावेळी अवघे दहा वर्षाचे होते. मल्लनाथांकडून सांप्रदायाची सेवा करून घेण्याची जबाबदारी त्यांच्या धाकट्या आई पूज्य महादेवी बाईंनी सांभाळली. मल्लनाथ महाराज पूज्य महादेवीआईंन सोबत पंढरपूरची पाई वारी करू लागले. सद्गुरु मल्लनाथ महाराज व रत्‍नाबाई यांच्या पोटी थोरले गुरुबाबा, गुंडानाथ आणि दासवीरनाथ यांचा जन्म झाला . सद्गुरु मल्लनाथ महाराज व त्रिवेणी बाईंच्या पोटी एकनाथ व मुक्ताबाई यांचा जन्म झाला.

सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी आई महादाबाई व शिष्य मंडळींसोबत पायी तीर्थयात्रा केली. यात्रेदरम्यान तुळजापूर, पंढरपूर, आळंदी, देहू ,नाशिक त्र्यंबकेश्वर ,गंगाखेड असा पायी प्रवास करत देवदर्शन व तीर्थांचे स्नान करत सर्व मंडळी औसा गावी आल्यानंतर सद्गुरु मल्लनाथांनी यात्रेनिमित्त मावंदे घातले. सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे औसेकर घराण्याचा कृपाप्रसादिक नाथषष्ठी उत्सव इ. स. १८८६ मध्ये केला. महादेवाच्या नगरीत विठ्ठल भक्तांनी जंगमवाडी मठात केलेला हा सोहळा म्हणजे शैव वैष्णव सांप्रदायाचा गंगामाई काठी झालेला संगमच होता. जंगमवाडी मठात सद्गुरु मल्लनाथांनी आदिनाथाचे आसन स्थापन केले .शिवपिंडीवर साळुंका जेथे स्थापन करतात त्या जागी पादुकांची स्थापना केलेले हे आदिनाथाचे विशेष आसन आजही जंगमवाडी मठ काशी येथे आहे. सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी प्रतिवर्षी विविध गावांमध्ये अवसेकर घराण्याचा फिरता नाथषष्ठी उत्सव केला.

तेथे विठ्ठल रुक्मिणी व आदिनाथाचे मंदिर त्यांनी स्थापन केले. आज या प्रत्येक ठिकाणी नाथषष्ठी उत्सव तेथील ग्रामस्थ मंडळी करत आहेत.सोलापूर व हैदराबाद शहरात त्यांनी भव्य स्वरूपात नाथषष्ठी उत्सव साजरा केला. हैद्राबाद येथील उत्सवासाठी निजाम सरकारने त्यांना आमंत्रण दिले होते. ते फर्मान आजही अवसेकरांच्या घराण्यातील वंशज्यांकडे आहे.इ.स. १८८९ व १८९३ मध्ये हैदराबाद येथे नाथषष्ठी उत्सव संपन्न झाले. वैष्णव मंडळी यज्ञोपवीत म्हणजेच जाणवे घालतात व माथ्यावर मध्यभागी शिखा म्हणजे शेंडी ठेवतात. वैष्णव मंडळी प्रमाणे सद्गुरु वीरनाथ महाराज व सद्गुरु मल्लनाथ महाराज हे यज्ञोपवित धारण करीत व शिखा ठेवीत असत. यावरून लिंगायत व वैष्णव सांप्रदाय मंडळीत जेव्हा वाद उत्पन्न झाला तेव्हा सद्गुरु मल्लनाथांनी त्यावर शास्त्रोक्त चर्चा घडवून आणली. यावरील चर्चा व निर्णयाचे कन्नड भाषेतील हस्तलिखित अवसा येथे कुमार स्वामी मठात आहे.

सद्गुरु मल्लनाथांचे चिरंजीव गुंडानाथ व एकनाथ यांचा विवाह राजेशाही वैभवात औसा येथे संपन्न झाला. शाहीर गोपीनाथ चव्हाण यांनी या दिमाखदार स्वयंवराचे वर्णन आपल्या पोवाड्यामधून केले आहे. उत्सवा दरम्यान घडलेले अनेक अद्भुत प्रसंग सद्गुरु मल्लनाथाच्या चरित्रातून वाचावयास मिळतात.सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी त्यांचे थोरले चिरंजीव ज्यांना “थोरले गुरुबाबा” असे म्हणतात. त्यांचा उत्सव निलंगा येथे सुरू केला. आजही हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो. हिंदू मुस्लिम धर्मियांचे ऐक्य या उत्सवामध्ये पहावयास मिळते.सद्गुरु मल्लनाथांनी कर्नाटक येथील मन्नाळी या गावापासून मन्नाळी ते पंढरपूर अशी कार्तिक एकादशी निमित्ताने पायी वारी सुरू केली. आजही ही पायीवारी सुरू आहे.सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी ३५८ अभंगांची रचना केली आहे.

गुरुभक्ती विठ्ठल भक्ती पर हे अभंग रसाळ भावपुर्ण शब्दातील आहेत. सद्गुरु वीरनाथ महाराज चरित्र ,राखाबांकावंका चरित्र, कान्होपात्रा चरित्र असे दीर्घ अभंग त्यांनी रचले आहेत. सद्गुरु मल्लनाथांनी कन्नड व हिंदी भाषेतही अभंग रचना केली आहे .सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी शके १८२९ श्रावण कृष्ण अष्टमी रोजी आपण केव्हा समाधी घेणार ते सहा वर्षे आधीच सांगून ठेवले होते. त्यानुसार त्यांनी शके १८३६ इ.स. १९१४ मध्ये ज्येष्ठ पौर्णिमेस समाधि घेतली .सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर सद्गुरु वीरनाथ महाराज यांनी सद्गुरु मल्लनाथ महाराजांची समाधी नाथ मंदिर औसा येथे स्थापन केली. प्रतिवर्षी ज्येष्ठ महिन्यात नाथ मंदिर अवसा येथे सद्गुरु मल्लनाथ महाराजांचा समाधी उत्सव संपन्न होतो.

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP