मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

नामपाठमार्ग - गीताज्ञानेश्वरीपाठ

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




नामपाठें गीता ज्ञानेश्वरी होय । स्मरे तूं निर्भय ज्ञानदेवी ॥१॥
नामपाठें सोपी अक्षरें ती उच्चार । ज्ञानेश्वरी उच्चार करी वाचे ॥२॥
जनार्दनाचा एका ज्ञानेश्वरी ध्याय । तेणें मुक्त होय युगायुगीं ॥३॥

भावार्थ

भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे नामपाठाचे मार्ग आहेत. ज्ञानेश्वरी वाचायला आणि समजण्यास सोपी असून ती ज्ञानदेवी या नावाने ओळखली जाते. नि:शंक, निर्भय होऊन ज्ञानेश्वरीचे वाचन आणि स्मरण करावे. असे सांगून जनार्दनाचा एका म्हणतात, ज्ञानेश्वरीचे नित्य पठण करणारे साधक संसार बंधनातून कायमचे मुक्त होतात.



नामपाठे वर्म वेदांचे तें कळे । नामपाठबळे शास्त्रबोध ॥१॥
या दोहीचे वर्म ज्ञानदेवी जाणा । जपें कां रे जना हृदयी सदा ॥२॥
जनार्दनाचा एका विनीत होउनी । आठवितो मनीं ज्ञानदेवा ॥३॥

भावार्थ

नामपाठाने वेदांचे रहस्य उलगडते आणि शास्त्रांचा बोध समजतो. वेद आणि शास्त्रे यांचे समग्र ज्ञान ज्ञानदेवी पठनाने जाणता येते. एका जनार्दनीं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हृदयांत धारण करावा असे अत्यंत विनयाने सुचवतात.



नामपाठें संदेह सर्व हा जाईल । नामपाठ गाईल प्रेमभावें ॥१॥
नामपाठ सोपा नामपाठ सोपा । अहर्निशीं बापा जप करी ॥२॥
जनार्दनाचा एका ठेउनी विश्वास । नामपाठ निजध्यास करीं सदा ॥३॥

भावार्थ

जो भक्त प्रेम भावाने नामपाठ गाईल त्याच्या मनातील सर्व संशय निरसून जातील. नामपाठ साधना अतिशय सोपी असून रात्रंदिवस तिचा जप करावा. एका जनार्दनीं या साधनेवर विश्वास ठेवून नामपाठाचा अखंड ध्यास घेतात.



नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेणें स्वर्गवास ॥१॥
जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ॥२॥
जनार्दनाचा एका बोलतसे वाणी । नामपाठें जनीं जनार्दन ॥३॥

भावार्थ

नामपाठा पेक्षां श्रेष्ठ असे काहिही नाही. स्वर्ग मिळावा अशी अपेक्षा करणे निरर्थक आहे. त्यापेक्षा परत परत जन्म घेऊन नामपाठ साधना करण्याचे भाग्य देवाने आपल्याला द्यावे असे जनार्दनाचा एका देवाला विनवतात.



नामपाठ युक्ति भाविकां प्रतिती । लोभिया विरक्ती नामपाठे ॥१॥
नामपाठे योग नामपाठे याग । नामपाठे भोग सरे आधी ॥२॥
जनार्दनाचा एका भोगातीत झाला । म्हणोनि वोळला जनार्दन ॥३॥

भावार्थ

नामपाठ साधना मोक्षमुक्ती मिळवण्याची सोपी युक्ति आहे अशी भाविकांना प्रचिती येते तर ऐहिक लाभासाठी नामपाठ साधना करणार्यांना विरक्ति येते. योगयागाचे सर्व फल नामपाठ साधनेने मिळतातच शिवाय नामपाठाने संसारिक भोग सरतात. असे मत व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, नामपाठाने जनार्दनाचा एका भोगातीत झाले म्हणुनच सद्गुरु जनार्दनस्वामींच्या कृपेस पात्र ठरले.



नामपाठें मोक्ष पाविजे तत्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं ॥१॥
नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरें नाचताहे संतापुढें ॥३॥

भावार्थ

नामपाठाने मोक्ष प्राप्ती होते या शिवाय आणखी साधन नाही. नामपाठ हे सर्व साधनांचे सार आहे. यापेक्षा वेगळा विचार करू नये असे स्वानुभवातून जनार्दनाचा एका स्पष्ट करतात.



नामपाठे युक्ती साधन समाप्ती । नोहे दुजी प्रीती नामपाठें ॥१॥
आणिक खटपट कासया बोभाट । नामपाठ वाट वैकुंठाची ॥२॥
जनार्दनाचा एका, नामपाठें रंगला । आनंदे वहिला नाचतसे ॥३॥

भावार्थ

नामपाठाची युक्ती साध्य झाली कीं, सर्व साधनांची समाप्ती होते. दुसरे काही मिळवण्याचे बाकी राहतच नाही. नामपाठ हाच वैकुंठ पदाचा मार्ग आहे. एका जनार्दनीं नामपाठांत रंगून आनंदाने संताच्या मेळाव्यांत नाचतात.



नामपाठ करितां आनंद मानसीं । योगयाग राशीं पायां लागे ॥१॥
आनंदें आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्य जना ॥२॥
जनार्दनाचा एका सांगे जगाप्रती । नामपाठें विश्रांती होईल जना ॥३॥

भावार्थ

नामपाठ करतांना मनाला आनंद होतो. योगयागाचे पुण्य अनायासे प्राप्त होते. मनापासून आनंदाने नामपाठ गाणारा भक्त अनेकांना तारून नेतात. जनार्दनाचा एका सांगतात, नामपाठाने जगातिल सर्वांना विश्रांतीचा लाभ होईल.



नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ॥१॥
नाम तें सोपें नाम तें सोपें । नाम तें सोपें विठ्ठलाचें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ वाणी । कीर्ति त्रिभुवनीं नामपाठें ॥३॥

भावार्थ

कळिकाळाची बाधा टाळायची असेल तर मुखाने सदासर्वदा नामपाठ गावा. विठ्ठलाचे नाम वाचेसी अतिशय सोपे आहे. जनार्दनाचा एका नामपाठाचा महिमा सतत सांगतात, नामपाठाची किर्ति त्रिभुवनांत गाजत आहे.

१०

नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तो चि झाला सुखीं इहीं जनीं ।
नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कलीमाजीं ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठें मिरविला । श्रीरंग वरला नामपाठें ॥३॥

भावार्थ

नामपाठ हे कलियुगातील सहजसोपे, साधन आहे. अखंड नामपाठ गाणारा भक्त सर्वदा सुखी होतो. कलीयुगांत धन्य होतो. नामपाठ साधना करून जनार्दनाचा एका लोकादरास पात्र झाले. श्रीरंगाची कृपा प्राप्त झाली.

११

नामपाठें ज्ञान नामपाठें ध्यान । नामपाठें मन स्थिर होय ॥१॥
जगांत हें सार नामपाठ भक्ती । आणिक विश्रांती नाहीं नाहीं ॥२॥
जनार्दनाचा एका अखंड नाम गाय । हर्षे नाचताहे प्रेमे रंगीं ॥३॥

भावार्थ

नामपाठ साधना ही ज्ञानमार्ग आणि ध्यानमार्ग यांचा संगम आहे. नामपाठ भक्ती हे साधकांचे विश्रांती स्थान आहे. जनार्दनाचा एका अखंड नाम गातात आणि भक्ति प्रेमांत आनंदाने नाचतात.

१२

नामपाठ नित्य एक नेमें गायें । हरिकृपा होय तयावरी ॥१॥
अंतरीं बाहेरी रक्षी नारायण ।आलिया विघ्न निवारी साचे ॥२॥
जनार्दनाचा एका प्रचित घेउनी ।गात असे वाणी नामपाठ ॥३॥

भावार्थ

नित्यनेमाने हरिपाठ गायन करणारा भक्त हरिकृपा प्राप्त करतो. प्रत्यक्ष नारायण या भक्ताचे अंतर्बाह्य रक्षण करतो. विघ्नांचे निवारण करतो. या सत्य वचनाची प्रचिती आल्यानें जनार्दन शिष्य एका आवडीने नामपाठ गातात.

१३

नामपाठ गंगा नामपाठ गंगा । दोष जाती भंगा नामपाठें ॥१॥
नामपाठ सरिता सागर संगम । देवभक्त नाम तिन्ही बोध ॥२॥
जनार्दनाचा एका करितो मार्जन । त्रिवेणीचे स्नान पुण्य जोडे ॥३॥

भावार्थ

देहमनाच्या सगळ्या दोषांचे भंजन करणारी नामपाठ साधना म्हणजे गंगेचा पवित्र प्रवाह आहे. नामपाठ सरिता आणि सागर यांचा संगम आहे. असे वर्णन करुन जनार्दनाचा एका म्हणतात, देव, भक्त आणि नाम यांचा बोध देणार्या त्रिवेणी संगमांत स्नान करून पुण्य फल प्राप्त होते.

१४

नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे तें तीर्थ । वदे तूं चिंतारहित सर्वकाळ ॥१॥
काळाचे तें काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥
जनार्दनाचा एका काळा वंदीं चरणी । म्हणोनि जनार्दनी विनटला ॥३॥

भावार्थ

नामपाठ हे सर्वश्रेष्ठ तीर्थाचे तीर्थ असून नामपाठाचा पाठ नि:शंक मनाने सतत करावा. काळावर ज्यांची सत्ता चालते ते शिवशंकर सदासर्वदा नामपाठ गातात. काळ त्यांना नमस्कार करतात. जनार्दनाचा एका काळाचे चरण वंदन करून सद्गुरूची कृपा प्राप्त करतात.

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP