मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

मंगलाचरण

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




ॐ नमो सद्गुरूनिर्गुणा । पार नाही तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवी ॥१॥
हरिगुण विशाल पावन । वदवीं तूं कृपा करून । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सद्गुरू आदरें ॥३॥

भावार्थ

मंगलाचरणाच्या आरंभी संत एकनाथ आपले सद्गुरू जनार्दन स्वामी जे अपरंपार गुणांनी युक्त असून निर्गुण(सत्व, रज, तम) या गुणांच्या अतीत आहेत त्यांची करुणा भाकित आहेत. आपण मूढमती असून श्रीहरिचे अगणित, पावन गुण वर्णन करण्यास असमर्थ आहोत असे विनयाने सांगून सद्गुरूंच्या चरणांना वंदन करून त्यांचा कृपा प्रसाद मागत आहेत. सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली की हरिगुण वर्णन करणे शक्य होईल असा विश्वास ते प्रकट करतात.



नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचे ॥१॥
करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्वतां चालतसे ॥२॥
एका जनार्दनी तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥

भावार्थ

सद्गुरू चरणांचे दास असलेले एका जनार्दनी आपली मागणी सद्गुरूंनी पूर्ण करावी अशी विनंती करतात आणि व्यासादिक कवी जे पारमार्थिक धनाचे भांडार असून ज्यांच्या उपदेशाने अनेक साधक तरून गेले आहेत अशा ज्ञान वंतांनी आपणास उपदेश करून उपकृत करावें अशी ईच्छा व्यक्त करतात.



परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया॥१॥
वसोनिया जिव्हे वदावें कवित्व ।हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥
आणि संकल्प नाहीं माझे मनीं । एकाजनार्दनी वंदितसे॥३॥

भावार्थ

परा पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारी वाणींची देवता आदिशक्ती आदिमाया असून तिला वंदन करुन एका जनार्दनी या आदिमायेने आपल्या जिव्हाग्री वसून कवित्व वदवावे अशी प्रार्थना करतात. हरिनामाशी आपलें चित्त निरंतर जडून राहावे या शिवाय वेगळा कोणताही संकल्प आपल्या मनांत नाही अशी मागणी एका जनार्दनी आपल्या सद्गुरूकडे करतात.



श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवणी करीतसों ॥१॥
मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादर वदवावें ॥२॥
न कळेचि महिमा उंच नीचपणें । कृपेचे पोसणें तुमचे जाहलो ॥३॥
एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥

भावार्थ

सद्गुरूंचे अगणित गुण आठवून त्या गुणांचे स्तवन करुन विनवणी करतांना एका जनार्दनी म्हणतात, हरिनामाचा आदर करुन आपण हरिचे गुण काव्यात रचण्याचा संकल्प केला असून सादरी करणासाठी सद्गुरुंची कृपा प्राप्त व्हावी अशी मनोमन प्रार्थना करीत आहेत. यासाठी लागणारी काव्यप्रतिभा अंगी नसतांना हा (मालाविण दुकान घालण्याचा उद्योग) काव्य-रचनेचा घाट घातला आहे. आतां कृपावंत होऊन सद्गुरूंनी सहाय्य करावें.



असतां बंदीशाळे । देवकी डोहळे । गर्भ घननिळे आथियेला॥१॥
गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥
मेळवुनि लेंकुरें । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळिया घरी ॥३॥
वर्षता शिळाधारीं । उचलला महागिरीं । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥
जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥
कंसादिक वीर । त्यांचा करावा संहार । कीजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥
एका यश द्यावे । त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर वसवावें । सिंधूमाजीं ॥७॥
एका जनार्दनी । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायण । वासनेचे ॥८॥

भावार्थ

कंसाच्या बंदीशाळेंत असलेली देवकी आपले डोहाळे वासुदेवाला सांगत आहे. गोकुळांत गवळ्या-घरी अवतार घेऊन सवंगडी जमवून खेळ खेळणारा, हातांत वेणू घेऊन पावा वाजवणारा, शिळंधार पावसांत गोवर्धन पर्वत करांगुली वर उचलून धरणारा, यमुनेच्या जळांत शिरून कालिया सर्पाला घालवून लोकांना भय-मुक्त करणारा, कंसा सारख्या दुष्टांचा संहार करणारा, उग्रसेनाला राजपद मिळवून देणारा, त्रैलोक्य जिंकून समुद्रात सोन्याची द्वारका वसवणारा, असा घननीळ जन्माला यावा असे वाटते. हे आपल्या मनीचे डोहाळे नारायणाने पूर्ण करावेत असे देवकी आपल्या पतीदेवाला कारागृहांत सांगत आहे.



देवकी निज उदरीं । गर्भाची पाहे थोरी । तंव सबाह्य अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥

अगे हा स्वत: सिध्द हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारीं । गर्भ वाढे ॥२॥

आतां नवल कैसे परी । आठवा गर्भ धरी । त्याहि गर्भा माझारीं । मज मी देखे ॥३॥

दाहीं ईद्रिया माझारीं । गर्भाची वाढे थोडी । कर्म तदाकारी । इंद्रिय वृत्ति ॥४॥

चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंदकल्लोळे गर्भ वाढे ॥५॥

तेथें स्वस्वरूपस्थिती ।सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण॥६॥

एकाजनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रूप चराचर । निखळ नांदू ॥७॥

भावार्थ

आपल्या उदरांत वाढणार्‍या गर्भाचे देवकी माता कौतुकाने निरिक्षण करीत असतांना देहाच्या आंतबाहेर व्यापकपणे श्रीकृष्ण रुप भरुन राहिले आहे,  हे रुप स्वयंसिद्ध असून स्वयंप्रकाशी आहे असा अनुभव येऊ लागला. विशेष नवलाची गोष्ट अशी कीं,  या आठव्या गर्भाच्या अंतरी देवकी मातेला आपले रुप दिसत आहे, पांच कर्मेंद्रिये आणि पांच ज्ञानेंद्रियें यांच्या सर्व वृत्ति हरिरुपाशी तदाकार झाल्या आहेत असा अनोखा अनुभव येऊ लागला. सद्चिदानंद स्वरुपांत देवकी तल्लीन झाली. स्वस्वरुपस्थिची अखंड जाणीव चित्त व्यापून राहिली , त्रैलोक्य निरामय आनंदाने पूर्ण भरून गेले. सारी चराचर सृष्टी श्रीकृष्ण रुपाशी एकरुप झाली. निखळ आनंदात सुखरुप प्रसुती झाली. असे एका जनार्दनी म्हणतात.



देवकी करी चिंता । केवी आठवा वाचे आता । ऐसी \ भावना भाविता । जिवी तळमळ ॥१॥

तंव न दुखताच पोट । वेण न लगता उध्दट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥

हरि सुनीळ सांवळे । बाळ निजतेजे तेजाळे । देखोनि वेल्हाळ । स्वयें विस्मीत ॥३॥

ऐसे देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादु जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेसी कैसा वरेना ॥४॥

वेगी वासुदेवाते म्हणे । तुम्ही गोकुळासी न्या तान्हे । एका जनार्दने कृपा केली ॥५॥

भावार्थ

देवकीच्या मन हे आठवे अपत्य कसे वाचेल या भयाने चिंताग्रस्त झाले, या भावनेने जीव तळमळु लागला. बाळाचे आकाशासारखे निळेसावळे रुप स्वतेजाने झळाळत होते, ते पाहून ती विस्मयचकित झाली. प्रसुतिच्या कोणत्याही कळा (वेदना) न येता कृष्ण प्रगट झाला. त्या कृष्णरुपाने देवकीला मोहिनी घातली. हे अवर्णनीय कृष्णरुप कोणाला दिसु नये म्हणून ती त्याला पांघरूणाने झाकण्याचा प्रयत्न करु लागली. परंतु ते झळाळणारे स्वयंतेज देवकीला आवरणे शक्य नव्हते. एका जनार्दनी म्हणतात, देवकी आवेगाने वसुदेवाला सांगते की बाळाला त्वरेने गोकुळाला घेऊन जावे.



देवकी म्हणे वासुदेवासी । वेगी बाळक न्यावे गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥

पूर्ण प्रकाश निजतेजे । पाहता न दिसे दुजे । तेथ कैचे माझे तुझे । लपणे छपणे ॥२॥

सरसर अरजे दुरी । परब्रह्म आम्हा करी । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ॥३॥

सर्वेचि पाहे लीळा । मुगुट कुंडले वनमाळा । कंठी कौस्तुभ तेजाळा । कटी तटी सूत्र ॥४॥

क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणे भूषणी । चिद्रत्ने महामणी । वीर कंकणे ॥५॥

कमलवदन हरी । कमल नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ॥६॥

करकमळी कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळा । दिव्य मूर्ति ॥७॥

लक्ष्मी डावलुनिया जाण । हृदयी श्रीवत्सलांछन । द्वीजपदाचे महिमान । देखे दक्षिणभागी ॥८॥

शंख चक्रादि आयुधे चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ॥९॥

ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाची न रिघे रेखा । कृष्णपर्णीं ॥१०॥

एका जनार्दन खरे । निजरूप निर्धारे । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ॥११॥

भावार्थ

घवघवीत तेजोराशीसारखा दिसणार्‍या या बाल्काला वेगाने गोकुळात न्यावे असे देवकी वासुदेवाला सांगते. श्रीकृष्णाच्या स्वयं तेजासमोर दुसरे काही दिसेनासे झाले असता तेथे तुझेमाझ ही द्वैतभावनाच लोपून जाते, लपणे छपणे संभवत नाही. प्रत्यक्ष परब्रह्म जवळ असतांना कंसाचे भय बाधू शकत नाही असे सांगून वासुदेव कृष्णरुपाचे वर्णन करतात. कमलासारखे वदन असलेल्या श्रीहरीचे नेत्र कमलदलासारखे आहेत. हातामध्ये धारण केलेले कमळ हरीच्या चरण-कमळाला स्पर्श करीतआहे मस्तकावर मुकुट, कानांत कुंडले, गळ्यात वनमाळा, कंठाशी तेजस्वी कौस्तुभमणी, हातामध्ये छोटया घंट्या असलेली बाहुभुषणे, रत्नजडित मणी असलेली वीर-कंकणे अशी दिव्यमूर्ति वासुदेवानी डोळ्यांनी अवलोकन केली. छातीवर उजव्या बाजूला द्विज-पदाचे चिन्ह धारण करणार्या चतुर्भुज श्रीहरीने हातात शंख, चक्र ही आयुधे धारण करून पीतांबर परिधान केलेला दिसत होता. निर्गुण परब्रह्ममाचे हे सगुण साकार रुप निरखित असतांना वसुदेवाला मनातील कंसाचे भय मिथ्या आहे याची खात्री पटली, असे एका जनार्दनी सांगतात.



देवकी वसुदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावून धरी पाये । उगे रहा ॥१॥

जळो जळो ही तुमची बुध्दी । सरली संसारशुध्दी । कृष्ण लपवा त्रिशुध्दी । जग प्रगट न करावा ॥२॥

आतां मी करूं कैसे । भ्रतारा लागलें पिसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी॥३॥

मज मायेची बुध्दी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णासी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥

येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णे प्रकाशिलें । त्वां केवीं आच्छादिलें कृष्णरुप ॥५॥

सरसर अरजे मूढें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥

येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी गोकुळासी उठाउठी बाळ न्यावें माझें ॥७॥

अवो कृष्णीं चिंतिसी जन्ममरण ।हेंचि तुझें मूर्खपण कृष्णनामे जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥

सरो बहू बोलाचा बडिवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लागीं लेंकरूं । गोकुळा न्यावें ॥९॥

तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृष्णनाथु ॥१०॥

आतां मी काय करूं वो । वसुदेव म्हणे नवलावो । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुजची न कळे॥११॥

चोज कैसेविण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समूळ वावो ॥१२॥

जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसे । हें अंगीचें निजरुप पिसें । न कळे तुम्हां ॥१३॥

कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥

आतां काय मी बोलूं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥

प्रकृति पुरुष दोन्ही । मीनली एकपणीं । एका जनार्दनी बंदी मोक्ष ॥१६॥

भावार्थ

श्री कृष्ण दर्शनाने हर्षभरित होऊन गर्जना करणार्‍या वसुदेवाला पाहून देवकी हतबुद्ध होते. स्त्री सुलभ ममतेने तिने कृष्णाला अच्छादिलें पण पुरुष स्नेहाच्या बंधनांत बांधला जात नाही असे असतांना बाळाच्या संरक्षणाचा विचार न करतां वसुदेव मोहबंधनात अडकत आहे हे पाहून त्याला शांत करून , वेगाने बाळाला गोकुळी न्यावें अशी विनंती करते. श्री कृष्ण स्वयंप्रकाशी असून त्यानेच हे विश्व प्रकाशित केले आहे, त्याला अच्छादिलें असे म्हणणे मूर्खपणा आहे, ज्याच्या केवळ नामस्मरणाने जन्म मरणाचे बंधन तुटून पडते, जो जन्म मरणाच्या अतित आहे त्याला कोणी मारील असे म्हणणे अज्ञानाचे लक्षण आहे असे तत्वज्ञान सांगणार्‍या वसुदेवाला सावध करण्यासाठी श्रीकृष्ण स्वयंमसिध्द असूनही तो बाळरुपांत असल्याने प्राण पणाला लावून त्याचे कंसापासून रक्षण करा असे कळकळीने सांगून देवकी स्तब्ध होते. देवकीचा भावार्थ लक्षांत येताच पती-पत्नीच्या विचारांचे मीलन होऊन संकटापासून मोक्ष (सुटका) मिळतो. असे एका जनार्दनी सांगतात.
१०

श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोह  ममतेच्या ॥१॥

कृष्णीं धरितां आवडी । स्वये विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वार परवडी । नाही अर्गळा शृंखळा ॥ २॥

कृष्ण जंव नये हातां । तंवचि बंधनकथा । पावलिया कृष्णनाथा । बंदी मोक्ष ॥३॥

ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥

श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥

अंधारामाजी सूर्य जातू । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावे असे सांगतु । कृष्ण कडिये पडियेला ॥६॥

अंध ते बंधन गेले । राखतो राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें । नित्य मुक्त ॥७॥

भावार्थ

श्री कृष्णाला गोकुणाला न्यावे पण पायांत स्नेहाच्या साखळ्या , देहाच्या तिजोरीला ममतेची कडी आणि मोहाचे बंधन! कृष्णाचा ध्यास लागताच स्नेह-ममतेची बेडी आपोआप गळून पडते, मोक्षाची पर्वणी येते, जो पर्यंत कृष्ण सखा आपलासा होत नाही तोपर्यंत सर्व बंधन बांधून ठेवतात. कृष्ण-कृपा होताच मोक्षच बंदी बनतो. बाळाचे रक्षण करु पाहणारी देवकी, रक्षण करण्याचे विसरून दूर जाणार्‍या कृष्णाकडे एकटक बघत राहते. कृष्णाच्या निळसर, सावळ्या अंगकांतीघ्या शोभेत आकाशाची निळसर शोभा लोपून जाते. दिशांची प्रभा निस्तेज बनते. मावळता सूर्य अंधारांत अलगद बुडत जातो तसा मोह-बंधनाचे, अज्ञानाचे पटल दूर सारून वसुदेव कृष्णाला घेऊन यमुनेच्या दिशेने निघतो, वसुदेव नित्यमुक्त होतो असे एका जनार्दनी म्हणतात.

११

तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पूर्ण । चढे स्वानंद जीवन । चरण वंदनार्थ॥१॥

वसुदेव म्हणे कटकटा यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहे मार्ग न दिसे ॥२॥

कृष्ण असतां हातीं । मोहें पडली भ्रांती । मोहाचिये जाती । देव नाठवे बा ॥३॥

मेळी मुकी वेताळ ।मारको मेसको वेताळ । आजी कृष्ण राखा सकळ । तुम्ही कुळदेवतांनो ॥४॥

अगा वनींच्या वाघोबा । पावटेकीच्या नागोबा । तुम्ही माझिया कान्होबा । जीवें जतन करा ॥५॥

हातीचा कृष्ण विसरुन । देव देवता होतों दीन । मोहममतेचे महिमान । देवा ऐसें आहे ॥६॥

मोहे कृष्माची आवडी ।तेथें न पडे शोक सांकडीं । एका जनार्दनी पावले परथडी । यमुनेच्या ॥७॥

भावार्थ

वसुदेव श्री कृष्णासह यमुनेच्या तीरावर पोचलें. हर्षभरित झालेल्या यमुनेला स्वानंदाचा पूर आला. श्री हरिच्या चरण-वंदना साठी यमुनेच्या पाण्याला भरती आलेली पाहून वसुदेव संभ्रमात पडलें, परमात्मा श्रीकृष्ण जवळ असूनही मार्ग दिसेनासा झाला. मोहानें चित्त भ्रांत झाले. काकुळतीला येऊन कुळदेवतेची,  वन्य प्राणी वाघोबा, नागोबा यांना कान्होबाचे रक्षण करण्यासाठी विनवू लागले. मोह ममतेची झापड आल्याने हाती असलेले कृष्ण रुपी भाग्य विसरून देव-देवतांपुढे दीन झालें. परंतू जेथें कृष्ण प्रेमाची आवड तेथील दु:ख, संकटे आपोआप दूर पळतात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, वसुदेव कृष्णासह यमुनेच्या पैलतीरावर सुखरूप पोचले.

१२

गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदीशाळे ॥१॥

तंव तुटली जडली बेडी ।कपाटा पडली कडी । भव भयाच्या काडी । अहं कंस पावे ॥२॥

श्रीकृष्ण सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी मरण भये ॥३॥

कंस पुसे लवलाह्या । काय प्रसवली तुझी जाया । म्हणोनी आणिली योगमाया । वसुदेवें ॥४॥

वेगें देवकी म्हणे । कंस पुसेल जेव्हां तान्हें । तेव्हां तुवां देणें । हे तया हातीं ॥५॥

ते देतां देवकीजवळी । गर्जे ब्रह्मांड किंकाळी । टाहो फुटली आरोळी । दैत्यनिधीची ॥६॥

तेणें दचकलें दुर्धर । कामक्रोधादि असुर । कंस पावला सत्वर । . धरावयासी ॥७॥

वेगीं आठवा आणवी । तंव हातां आली आठवी । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें जालेंचि विपरीत ॥८॥

आठवा न दिसे डोळां । आठवी पडली गळां । कर्म न सोडी कपाळा । आलें मरण मज ॥९॥

परासि मारितां जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे आपण । कृष्ण भय करी ॥१०॥

आठवी उपडितां तांतडी । तंव तें ब्रह्मांड कडाडी । हातांतून निष्टली हडबडी । कंस भयाभीतु ॥११॥

तंव ती गर्जलीं अंबरी । पैल गोकुळी वाढे हरी । तुज सकट बोहरी । करील दैत्यकुळाची॥१२॥

वधितां देवकीची बाळें । माझे पाप मज फळलें । माझे निजकर्म बळें । आलें मरण मज ॥१३॥

भय संचलें गाढे । तेणें पाऊल न चले पुढें । पाहतां गोकुळाकडे । मूर्चिछित कंस बा ॥१४॥

आसनीं भोजनीं शयनीं । भये कृष्ण देखे नयनीं । थोर भेदरा मनीं । जनीं वनीं हरी देखे ॥१५॥

कृष्ण भयाचे मथित । कंसपणा विसरे चित्त । एका जनार्दनी भक्त । भयें जीवन्मुक्त ॥१६॥

भावार्थ

कृष्णरुपी  परमात्मा गोकुळीं पोचतांच वसुदेवानें  कृष्णाला यशोदेच्या पुढे ठेवले आणि यशोदेने प्रसवलेली योगमाया घेऊन वेगानें मथुरेला पोचले. कंस येतांच त्याच्या हातीं ही योगमाया द्यावी असे सांगून योगमायेला देवकीच्या स्वाधीन केली.  मरण भयाने गांजलेला, कामक्रोधाने पेटलेला कंस त्वरेने देवकीच्या काराग्रुही आला असतां आठव्या कृष्णा ऐवजी आठवी माया त्याच्या गळ्यांत पडली. दुष्कर्माची फळे कपाळावरील कर्म रेषांना पुसता येत नाही म्हणून पश्चातापाने पोळलेला कंस योगमायेला हतांत घेऊन शिळेवर आपटणार तोच हातांतून निसटून कडाडत वरचेवर आकाशाकडे झेपावतांना गरजली , संपूर्ण दैत्यकुळाचा विनाश करणारा श्रीहरी गोकुळांत नांदत आहे , असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, देवकीच्या बाळांचा वध करणारा कंस आपल्याच पाप कर्माचे फळ काळरुपाने समोर उभे राहिले असे पाहून मृत्यु भयाने मूर्चिछित झाला. कृष्ण भयाने कंसाचे चित्त व्यापून टाकले. आसनी,  भोजनीं,  शयनीं ( आसनावर बसला असता, जेवण घेत असतांना, झोपला असतांना ) नगरात किंवा वनांत सर्वत्र कंसाला मृत्यु-रूपांत कृष्ण दिसू लागला . कृष्ण-भयाने कंस आपला कंसपणा (दुष्टपणा) विसरून गेला. एका जनार्दनी म्हणतात,  कृष्ण भयाने कंस जीवनमुक्त झाला.

१३

गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला ।नंदाच्या दैवाला । दैव आले अकस्मात ॥१॥

श्रावण वद्य अष्टमीसी । रोहिणी नक्षत्र ते दिवशीं । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटली ॥२॥

आनंद न समाये त्रिभुवनीं । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती॥३॥

एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें लाघव सकळ । तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥

भावार्थ

श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर बुधवारी नंदाच्या घरीं बलराम व श्रीकृष्णमूर्ति प्रगट झाली. नंदाचे भाग्य उजळले. गोकुळीचा आनंद त्रिभुवनांत मावेनासा झाला. बाळासाठी वाण घेऊन गौळणी नंदाराणीच्या सदनाकडे झेपावू लागल्या. ज्याचे लिलालाघव अगम्य आहे अशा सर्वसाक्षी परब्रह्माला जो जो बाळा म्हणून पाळणा हलवणार्या गोपींच्या भावना अकलना पलिकडच्या आहेत असे एका जनार्दनी म्हणतात.  

१४

एक धांवूनी सांगती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ती । मूख पहा चला ॥१॥

सवें घेऊनि ब्राह्मणा । पहावया पुत्रवदन । धांवूनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥

बाळ सुंदर राजीवनयन । सुहास्यवदन घनश्यामवर्ण । पाहूनियां धालें मन सकळिकांचे तटस्थ ॥३॥

पाहूनि परब्रह्म सांवळा । वेधलें मन तमालनीळा । एका जनार्दनी पाहतां डोळा । वेधें वेधिलें सकळ ॥४॥

भावार्थ

पुत्रप्राप्तीची आनंददायक बातमी कुणीतरी घाईघाईने नंद रायाला सांगते आणि पुत्रमुख पहावयास चला असे सुचवतो. ब्राह्मणाला बरोबर घेऊन सर्वजण उत्सुकतेने पुत्रवदन पहाण्यासाठीं निघतात. कमलनयन,  मेघश्याम, हसतमुख, सुंदर  कृष्णवदन पाहून सगळे कौतुकाने स्तब्ध होतात. निळेसावळे परब्रह्मरुप सर्वांचे मन वेधून घेते. मनाला कृष्णरुपाचे वेध लागतात असे एका जनार्दनी म्हणतात.

१५

वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचे ध्यान  ॥१॥

नाठवे दुजें मनीं कांहीं । कृष्णावांचुनी आन नाहीं । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥

करितां संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधें वेधल्या कृष्णछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥

एका जनार्दनी छंद । हृदयीं तया गोविंद । नाही विधि आणि निषेध । कृष्णावांचुनी दुसरा ॥४॥

भावार्थ

सर्व गोप, गोपिका आणि गुराखी तसेच गाई म्हशी सारखे मुके प्राणी यांना श्रीहरिचे ध्यान लागलें. कृष्णावांचून दुसरे कांहीं सुचेनासे झाले. सर्व वस्तुमात्रांत कृष्णरुप दिसू लागले.  गोपिका संसाराची कामे करतांना गोविंदाला आठवूं लागल्या. मनाला कृष्णाचा छंद जडला. काळाचे भान , बाह्य जगाचे नियम आणि बंधने विसरून गोविंदाशी एकरुप झाल्या .
१६
गोकुळीच्या जनां ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥

ध्यानीं ध्यातीं कृष्ण ।आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥

घेतां देतां वदनीं कृष्ण । आन नाहीं कांहीं मन । वाच्य वाच्य वाचक कृष्ण । जीवेभावे सर्वदा ॥३॥

कृष्णरुपी वेधली वृत्ती । नाही देहाची पालट स्थिती । एका जनार्दनी देखती । जागृति स्वप्नीं कृष्णाते ॥४॥

भावार्थ

गोकुळीच्या लोकांना कृष्णाचे ध्यान लागले. त्यांना सर्व जग कृष्णमय दिसू लागले. जेवताना, उठतां बसतां ते कृष्णाचे नामस्मरण करु लागले. इंद्रिय विषयांचे ध्यान विसरून , सर्व ईच्छा आकांक्षांचा त्याग करून , मन कृष्णाला अर्पण करून त्या सर्व गोप-गोपिका जीवे -भावे कृष्ण चरणी लीन झाल्या. गाढ झोपेत, स्वप्नावस्थेंत, जागृत असतांना, त्यांच्या  सर्व वृत्ती कृष्णरुपानें वेधून घेतल्या. काया, वाचा मनाने ते कृष्णरुप झाले, आपल्या देहाचा विसर पडला. असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP