मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

नामपाठ

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




नामपाठा गाये संताचे संगती ।नाहीं पुनरावृत्ती तया मग ॥१॥
नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आमची गर्भवास ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दन पाहे जनीं वनीं ॥३॥

भावार्थ

संतांच्या संगतीने जो साधक नामपाठ गातो त्याला परत जन्म-मरणाची फेरी नाही. भक्तीभावाने गायलेला हरिपाठ गर्भवास चुकवतो. एका जनार्दनीं नामपाठ गातो आणि जनीं वनीं सद्गुरू जनार्दनस्वामींचे दर्शनाचा लाभ घेतो असा स्वअनुभव कथन करतात.



नामपाठ सार सर्वांमाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥
चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनी ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ भावें । आदरें गात आहे सदोदित ॥३॥

भावार्थ

नामपाठ सर्वश्रेष्ठ असून नामपाठ गाणारा साधक या कलियुगात वरिष्ठ समजला जातो. त्याच्या जन्म-मरणाच्या यातना संपून जातात. मन भय आणि त्रास यातून मुक्त होते. एका जनार्दनीं आदराने, भक्तीभावाने नामपाठ गायनाचा आनंद घेतात.



नामपाठ सार वेदाचे तें मूळ । शास्त्रांचे तें फळ नामपाठ ॥१॥
योगयाग विधी न लगे खटपट । नामपाठे स्पष्ट सर्व कार्य ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढी तिहीं लोकी उभारिली ॥३॥

भावार्थ

नामपाठ वेदांचे मूळ असून शास्त्रांचे फळ आहे. योगयाग विधींची कोणतिही खटपट न करता नामपाठाने सर्व कार्य सिध्दीस जातात. जनार्दन स्वामींचा दास एका जनार्दनीं सदोदित नामपाठ गाऊन स्वर्ग, पृथ्वी, पाताळ तिन्हीं लोकी आनंदाची गुढी उभारतो.



नामपाठ किर्ति सर्वांत वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं ॥१॥
नामपाठमाला हृदयीं ध्याईं भावें ।उगेचि जपावें मौन्यरूप ॥२॥
जनार्दनाचा एका नाम गाय फुका । साधन तिहीं लोकां वरिष्ठ ॥३॥

भावार्थ

नामपाठ किर्ति तिन्हीं लोकांत वरिष्ठ समजली जाते. नामपाठमाला भक्तिभावाने हृदयांत धारण करून मुकपणे जपावी. नामपाठ साधनेसाठी कोणतेही सायास करावे लागत नाही. असे एका जनार्दनीं सुचवतात.



नामपाठ ब्रह्म उघड बोले वाचा । वेदांती तो साचा ।
निर्णय असे नामपाठ भावभक्ति तें कारण ।
आणिक साधन नाहीं दुजे ॥२॥
जनार्दनाचा एका गाये तो आवडी ।
तोडियेली बेडी संसाराची ॥३॥

भावार्थ

नामपाठ हे वाचे द्वारे प्रगट होणारे साक्षात परब्रह्म आहे असा वेदांचा निर्णय आहे. नामपाठ हे भावभक्तीचे कारण असून त्यासारखे दुसरे साधन नाही. एका जनार्दनीं नामपाठ आ रेवडीने गातात आणि संसाराची बेडी तोडून मुक्त होतात.



नामपाठ अंडज जारज स्वेदज । उदभिज देख चार योनी ॥१॥
नामपाठ प्रेमें गाय तूं आवडीं । तुटेल सांकडीं कर्म धर्म ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठीं निका । तोडियेली शाखा द्वैताची तें ॥३॥

भावार्थ

अंड्यातून, वीर्यातून, घामातून आणि पाण्यातून या चारी योनीतून जन्मलेले सर्व प्राणी नामपाठाचे आधिकारी आहेत. प्रेमाने परमेश्वराचा नामपाठ गायल्यास कर्म धर्मातिल सर्व संकटे दूर होतात. एका जनार्दनीं नामपाठधारी असल्याने ते द्वैताची बंधने तोडून अद्वैत भावाने हरिरुपाशी एकरूप झाले आहेत असे मानतात.



नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चिंती नारायणा नामपाठें ॥१॥
अष्टांग योग साधनें वरिष्ट । नामपाठेविण कष्ट होती जनां ॥२॥
जनार्दनाचा एका करी विनवणी । नामपाठ निर्वाणीं शस्त्र आहे ॥३॥

भावार्थ

पतंजलींनी सांगितलेली अष्टांग योगाची साधना श्रेष्ठ आहे हे सर्वमान्य असुनही नामापाठा इतकी सोपी नसल्याने नामपाठा शिवाय भक्तजनांना कष्ट होतात. नामपाठ ही सहजसाध्य साधना असून नामपाठाने नारायणाचे चिंतन करावे. नामपाठ हे निर्वाण साधण्याचे साधन आहे असे एका जनार्दनीं विनवून सांगतात.



नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनीं ॥१॥
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ कीर्ति मुखीं गातां ॥२॥
एका जनार्दनीं साराचे हें सार । नामपाठ निर्धार केला जगीं ॥३॥

भावार्थ

नामपाठ गाणार्या साधकाला ब्रह्मादी देव वंदन करतात आणि शिवशंकर त्या साधकाचे ध्यान लावतात. नामपाठ गायकाची माता त्रिभुवनीं धन्य होय. नामपाठ सर्व साधनांचे सार असून नामपाठ गायनाचा नित्य परिपाठ ठेवण्याचा निर्धार करावा असे एका जनार्दनीं सुचवतात.



नामपाठ जगीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥
आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावें ॥२॥
जनार्दनाचा एका भुलला नामापाठीं । म्हणोनि वैकुंठीं घर केलें ॥३॥

भावार्थ

नामपाठ हे भक्तीचे सोपे साधन आहे असे वर्णन वैष्णव करतात. आनंदाने टाळी वाजवून नाचत नामपाठ गातात. एका जनार्दनीं नामपाठी तल्लीन होऊन वैकुंठपदीं विराजमान होतात.

१०

नामपाठ करितां काळवेळ नाहीं । उच्चारूनी पाहीं सर्वकाळ ॥१ ।
सर्वभावें नामपाठ तूं गाये । आणिक न करी काय साधन तें ॥२॥
जनार्दनाचा एका भुलला नामपाठीं । आणिक नाहीं करी गोष्टी नामाविण ॥३॥

भावार्थ

नामपाठ साधनेला काळवेळाचे बंधन नाही. कोणत्याही वेळेला भक्तिभावाने नामपाठ गायन करावे. नामपाठाशिवाय कोणतिही साधना करण्याची गरज नाही. एका जनार्दनीं नामपाठ साधनेंत इतके रममाण होतात कीं, नामपाठा शिवाय कोणतिही गोष्ट करीत नाही.

११

नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मतवादीयांसी न रूचे नाम ॥१॥
नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेचि ॥२॥
जनार्दनाचा एका सांगे प्रेमभावें । आदरे तें गावें नामपाठ ॥३॥

भावार्थ

वेगवेगळी मते मांडून वादविवाद आणि मतखंडन करण्याची आवड असणार्‍यांसाठी नामपाठ नसून भोळ्या भाविकांसाठी नामपाठ साधना सहजसोपी आहे. न्ऊ दिवस मुदतीचा तापाचा विकार (न्युमोनिया )झालेल्या रोग्यास दूध अपथ्य कारक असते. त्याचप्रमाणे श्रध्दाहीन अभाविकास नामपाठ साधना अहितकारक आहे. यासाठी एका जनार्दनीं आदरयुक्त प्रेमाने साधकांना नामपाठ साधना करण्याचा उपदेश करतात.

१२

नामपाठ करितां जाईल पैं चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई ॥१॥
म्हणोनि सोपें वर्म सांगते तुज । नामपाठ गुज जपें सदा ॥२॥
जनार्दनाचा एका कुर्वंडी करूनी । लोळत चरणी संताचिया ॥३॥

भावार्थ

नामपाठ साधनेने मनाच्या सगळ्या चिंता मिटून जातात. साधक सायुज्यता मुक्तीचा अधिकारी होतो. यासाठी नामपाठ करणे हे सोपे साधन आहे हे रहस्य एका जनार्दनीं साधकांना सांगतात. देहाची कुर्वंडी करून संताच्या चरणी लोळण घेतात.

१३

नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥
विष तें अमृत नामपाठें झालें । दैन्य दु:ख गेले नाम जपतां ॥२॥
जनार्दनाचा एका उभारूनी बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥

भावार्थ

देवाधिदेव ज्याला आदराने वंदन करतात ते शिवशंकर भोळ्याभाबड्या भक्तांप्रमाणे नामपाठ जप करतात. समुद्रमंथनातून निघालेले विष महादेवाने प्राशन केले रामनाम पाठाने त्या हलाहलाचे अमृत झाले. नामपाठ जपतांच साधकाचे सारे दैन्य, दु:ख लयास जाते असे एका जनार्दनीं दोन्ही हात उभारून भक्तांना सांगतात.

१४

शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ ॥१॥
पुराणे वदतीं नाम पाठ कीर्ति । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे गुज । नामपाठ निज जपे जना ॥३॥

भावार्थ

नामपाठाचा महिमा पुराणांत सांगितला आहे. भागवत पुराणाचे रचनाकार महर्षि व्यासमुनींनी नामपाठ गायनाचा नित्यनेम केला होता. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, शास्त्र जाणणारे ज्ञानीजन मनाच्या विश्रांती साठी सदोदित नामपाठ करतात.
नामपाठ प्राप्त झालेले भक्त



नामपाठें भक्ति हनुमंतें केली । सेवा रुजू झाली देवा तेणें ॥१॥
नामपाठें शक्ति अद्भुत ये अंगीं । धन्य झाला जगीं कपीनाथ ॥२॥
जनार्दनाचा एका सेवोनि आदरें । नामपाठ स्मरे सर्व काळ ॥३॥

भावार्थ

हनुमंताने नामपाठ भक्ति करून आपली सेवा श्रीराम चरणीं रुजू केली. या भक्तिने हनुमंताच्या देहीं अद्भुत शक्तिचा संचार झाला. वानरराज धन्य झाला. जनार्दन स्वामींचा शिष्य एका स्वानुभवे नामपाठ जपावे असे सांगतात.



नामपाठें तारिले पतित उध्दरिले । धांवणें तें केले पांडवांचे ॥१॥
पडतां संकटीं नामपाठ गाय । द्रौपदी ती माय तारियेली ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे लोकां । नामपाठ फुका जपा आधीं ॥३॥

भावार्थ

संकटांत सापडलेल्या द्रौपदीसाठी श्रीहरी धावत पांडवांच्या घरीं गेले आणि संकटातून तारून नेले. नामपाठाने अनेक पतितांचा उध्दार होतो असे सांगून एका जनार्दनीं नामपाठ सदासर्वदा जपावा कारण हे साधन विनासायास घडते असे आवर्जून परत परत सांगतात.



नामपाठें सर्व मुक्तत्व साधिती । नामपाठे विरक्ती हातां येत ॥१॥
नामपाठें उध्दव तरला तरला । नामपाठें झाला शापमुक्त ॥२॥
जनार्दनाचा एका बोले लडिवाळ । नामपाठ काळ काळाचाही ॥३॥

भावार्थ

नामपाठ करणारे सर्व साधक मोक्षप्राप्ती करून घेतात. मुक्त होतात. नामपाठाने संसारातून विरक्त व्हावे अशी भावना मनांत निर्माण होते. नामपाठाने उध्दव शापमुक्त झाला. जनार्दन शिष्य एकनाथ साधकांशी सलगी करून लडिवाळपणे सांगतात, नामपाठाचे सामर्थ्य असे कीं, ते काळाला नामोहरण करू शकते.



नामपाठें अक्रूर सर्व ब्रह्मरूप । भेदाभेद संकल्प मावळले॥१॥
वंदी रजमाथां घाली लोटांगण । द्वैताचें बंधन तुटोनि गेलें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठें मुक्त । जालासे सतत संतचरणीं ॥३॥

भावार्थ

नामपाठाच्या प्रभावानें अक्रूराचे सारे संशय, भेदाभेद, संकल्प मावळले. गोकुळातिल पावन माती त्याने कपाळी लावली, गोप गोपींची निष्काम, भोळी भाबडी भक्ती पाहून त्याने लोटांगण घातले. देव भक्तातिल द्वैत बंधन तुटून गेले. जनार्दनाचा एका नामपाठाने मुक्त होऊन संतचरणी शरणागत झाला.



नामपाठें बिभीषण सर्वास वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी ॥१॥
जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठे धाला कल्पवरी ॥२॥
जनार्दनाचा एका मिरवी बडिवार । नामपाठ सार युगायुगीं ॥३॥

भावार्थ

नामपाठाने रावणबंधु बिभीषण राजपदाला पोचला, वरिष्ठ झाला. श्रीरामाला शरण जाऊन त्याने चिरंजीव पद प्राप्त करून घेतले. राक्षसवंश देशोधडीला मिळाला. एका जनार्दनीं नामपाठाचा महिमा वर्णन करताना सांगतात, नामपाठ अनेक युगापासून श्रेष्ठ साधन मानले जाते.



नामपाठें भीष्में कामातें जिंकिलें । सार्थक पैं केलें विहिताचे ॥१॥
आदरें आवडी नामपाठ गावें । सर्वांपरीं होय सत्ता त्याची ॥२॥
जनार्दनाचा एका होउनी शरण । घाली लोटांगण संतचरणीं ॥३॥

भावार्थ

नामपाठ साधनेने कौरवांचे पितामह भिष्माच्यार्यांनी आपल्या कामविकाराला जिंकून जीवनाचे सार्थक केले. भावपूर्ण भक्तीने नामपाठाचे गायन केल्याने सर्वश्रेष्ठ पद प्राप्त होते. असे मत व्यक्त करून जनार्दन शिष्य एका संतचरणीं लोटांगण घालतात.



नामपाठें तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापी तया ॥१॥
नामपाठ करूनि कीर्ति केली जगीं । उपमा ते अंगी वाढविली ॥२॥
जनार्दनाचा एका वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला ॥३॥

भावार्थ

नामपाठ भक्तीने चोखा महार भक्तांमध्ये उच्च श्रेणीला पोचला. नामपाठ साधनेने जगांत सर्वत्र त्याची किर्ति पसरली. परमेश्वर कृपेने चोखा अद्वितीय बनला. एका जनार्दनीं नित्य नामपाठाचे अनुसरण करणार्या संतांचे वर्णन करतात.



नामपाठे गोरा कुंभार तरला । उध्दार तो झाला पूर्वजांचा ॥१॥
नामपाठ कीर्ति गाताती वैष्णव । धन्य तो अपूर्व नाममहिमा ॥२॥
जनार्दनाचा एका चरणरजरेण । नामपाठ संकीर्तन करा वेगीं ॥३॥

भावार्थ

नामपाठ साधनेने गोरा कुंभाराच्या पूर्वज्यांचा उध्दार झाला. गोरा कुंभार संसार बंधनातून मुक्त झाला. नाममहिमा अपूर्व असून वैष्णवजन सदैव नामपाठकिर्ति गातात. नामपाठ संकीर्तन अखंडपणे करावे असा संदेश जनार्दनाचा एका देतात.



नामपाठ प्रेमें सांवता तो गाये । हृदयकमळीं वाहे नारायण ॥१॥
नामपाठ निका नामपाठ निका । खुर्पू लागे देखा देव त्यासी ॥२॥
जनार्दनाचा एका ऐकोनियां बोल । सांगत नवल संतांपुढें ॥३॥

भावार्थ

प्रेमयुक्त भक्तीने सावता माळी नामपाठ गातो. नामपाठ साधना अत्यंत फलदायी असून देव भक्तासाठी शेतांत गवताची खुरपणी करतो. जनार्दनाचा एका संतांपुढे हे नवलाईचे बोल कथन करतात.

१०

नामपाठें नामा शिंपी तो तरला । तयाची देवाला आवड मोठी ॥१॥
जाउनी जेवणें उच्छिष्ट भक्षणें । नामपाठें देणें इच्छिलें तें ॥२॥
जनार्दनाचा एका सद्गदित होय । नामपाठ गाय आवडीनें ॥३॥

भावार्थ

नामा शिंपी हा देवाचा आवडता भक्त होता. देव नामदेवा घरीं जाऊन जेवण घेत असे. नामाचा उच्छिष्ट आवडीने खात असे. नामदेवाला इच्छेनुसार फल पुरवित असे. जनार्दनाचा एका हे वर्णन करताना सद्गदित होतात आणि आवडीने नामपाठांत दंग होतात.

११

नामपाठें जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची॥१॥
भक्तांचे सकळ कार्य तें करणें । नये ऐसे उणें करी काम ॥२॥
जनार्दनाचा एका आवड पाहुनी । नाचतो कीर्तनीं नाम गाय ॥३॥

भावार्थ

जनाबाईच्या नामपाठाने प्रसन्न झालेला श्रीहरी तिच्या बरोबर धान्य दळतो, कांडण करतो. शेणी वेंचतो. भक्तांचे सर्व प्रकारची कामे करतांना आनमान करीत नाही. जनार्दनाचा एका देवाचे भक्तावरील हे प्रेम पाहून आनंदाने कीर्तनरंगी नाचतो.

१२

नामपाठे ज्ञानियाची भिंत ओढी । भाविकां तांतडी देव धांवे ॥१॥
बोलविला रेडा केलेसें कवित्व । नामपाठें मुक्त केलें जन ॥२॥
जनार्दनाचा एका लागतो चरणीं । जावें ओवाळोनी जन्मोजन्मीं ॥३॥

भावार्थ

ज्ञानदेव चांगदेवांना भेटायला भिंतीवर बसून जाण्याचे ठरवतात तेव्हां नामपाठाच्या प्रभावाने देव जड भिंतीत चैतन्य निर्माण करतात. भक्ताचे सत्व राखण्यासाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवितात , नामपाठाचा महिमा वाढवतात. जनार्दनाचा एका संतचरणी नतमस्तक होऊन जन्मोजन्मीं जीव ओवाळून टाकण्याची ईच्छा व्यक्त करतात.

१३

नामपाठें मुक्त मुक्ताई पैं झाली । हृदयीं आटली नामपाठें ॥१॥
देहादेह सर्व निरसिले चारही । नामपाठ वरी मुक्त झाले ॥२॥
जनार्दनाचा एका बोले करूणावचनीं । नामपाठ झणीं विसरूं नका ॥३॥

भावार्थ

स्थुल, सुक्ष्म, कारण, महाकारण हे चारी देह निरसून मुक्ताई मुक्तीपदास पोचली. नामपाठाने परमात्म तत्वाशी एकरूप झाली. करूणभावाने हे सांगून जनार्दनाचा एका नामपाठाचा महिमा विसरूं नका अशी विनंती साधकांना करतात.

१४

नामपाठें निवृत्ती पावला विश्रांती । नामपाठें शांति कर्माकर्मी ॥१॥
म्हणोनि प्रेमभावें नामपाठ गावें । आलिंगन द्यावें संतचरण ॥२॥
जनार्दनाचा एका चिंता नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी जगा ॥३॥

भावार्थ

नामपाठ साधनेंत विहित कर्मे करीत असताना निवृत्ती नाथांना अपूर्व शांतीचा लाभ होत असे. या नामपाठानेच निवृत्ती विश्रांती पावला असे सांगून एका जनार्दनीं प्रेमभावें नामपाठ गायन करावे, संतसंगत करावी, नामपाठाचे सतत चिंतन करावे, नामपाठ हा मोक्षप्राप्तीचा सोपा मार्ग आहे असे जनार्दनाचा एका सांगतात.

१५

नामपाठ मच्छिंद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधी चौदेहांची ॥१॥
नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा । वाचे गातां बाधा नोहे कांहीं ॥२॥
जनार्दनाचा एका द्वैतविरहित । नामपाठ गात सर्वभावें ॥३॥

भावार्थ

मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना नामपाठाची दीक्षा दिली आणि चौदेहाच्या बंधनातून मुक्त केले. नामपाठ हा सोपा मोक्षमार्ग असून वाचेने नाम साधना करतांना कोणतिही बाधा येत नाही. जनार्दनाचा एका अद्वैत भावाने सदासर्वदा नामसाधनेंत दंग होतात.

१६

नामपाठें गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनीं सर्वकाळ ॥१॥
समाधी आसन सैरा ते बोल । नामपाठ मोल अभ्यासिलें ॥२॥
जनार्दनाचा एका नेणें तो उन्मनीं । सदा संतचरणीं मिठी घाली ॥३॥

भावार्थ

गोरक्षनाथांनी नामपाठाचा उपदेश गहिनीनाथांना केला. ध्यान मार्गाने अखंड साधना करून गहिनीनाथ समाधी अवस्थेपर्यंत पोचले, उन्मनीं अवस्थेचा अभ्यास केला. एका जनार्दनींनी उन्मनी अवस्थेचा अनुभव कधी घेतला नाही. ते सदोदित संतसंगतीत रममाण होत असत.

१७

नामपाठें गहिनि निवृत्ती वोळला । उघड तो केला परब्रह्म ॥१॥
नामपाठ ब्रह्म नामपाठ ब्रह्म । आणिक नेणें वर्म नामेविण ॥२॥
जनार्दनाचा एका सेवेसी नटला । नामपाठें केला जनार्दन ॥३॥

भावार्थ

गहिनीनाथांनी नामपाठाचा महिमा निवृत्तीनाथांना उपदेशिला, परब्रह्माचे स्वरूप समजावून सांगितले. नामपाठ हेच पूर्णब्रह्म असून ते नामसाधनेने जाणतां येते. हरिनामाशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. असे स्पष्ट करून जनार्दनाचा एका सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सेवेंत निमग्न राहून नामपाठ साधनेंत दंग होतो.

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP