हरिहर ऐक्य
संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.
१
एका आरोहणा नंदी । एका गरूड बाहे स्कंधी ॥१॥
एका नित्य वास स्मशानीं । एका क्षीरनिधी शयनीं ॥२॥
एका भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥
एका रूंडमाळा कंठीं शोभती । एका रूळे वैजयंती ॥४॥
एका जनार्दनीं सारखे । पाहतां आन न दिसे पारखे ॥५॥
भावार्थ
शिवशंकरांचे वाहन नंदी तर श्री विष्णु गरूडावर आरूढ होतात. शिव नित्य स्मशानांत वास करतात तर विष्णु क्षीरसागरांत शेष नागावर पहुडलेले असतात. शिव सर्व अंगाला भस्म लावतात तर विष्णु चंदनाच्या उटीचा सर्वांगाला लेप देतात. सर्पमाळा शिवाच्या गळ्यांत तर वैजयंती माळ श्रीहरीच्या गळ्यांत शोभून दिसते. एका जनार्दनीं म्हणतात, हरिहर वाहन, निवासस्थानें, वस्त्राभुषणे या बाबतीत भिन्न असले तरी स्वस्वरुपी दोघेही अभिन्न आहेत.
२
एकां जटा मस्तकीं शोभती । एका किरीट कुंडलें तळपती ॥१॥
एका अर्धांगी कमळा । एका विराजे हिमबाळा ॥२॥
एका गजचर्म आसन । एका हृदयीं श्रीवत्सलांछन ॥३॥
एका जटाजूट गंगा । एका शोभे लक्ष्मी पैं गा ॥४॥
एका जनार्दनीं दोघे । तयां पायीं नमन माझें ॥५॥
भावार्थ
शिवाने मस्तकावर जटा धारण केल्या आहेत तर विष्णुच्या मस्तकावर किरीट आणि कानांत कुंडले शोभून दिसत आहेत. कमळा ही विष्णुंची तर हिमालयाची कन्या पार्वती ही शिवाची अर्धांगिनी आहे. शिव गजचर्माचे (हत्तीच्या कातड्याचे)आसनावर विराजमान आहेत तर श्रीहरीनें वक्षावर भक्तवत्सलतेचे प्रतिक धारण केले आहे. सदाशिवाने मस्तकावरील जटांमध्ये गंगेचा प्रवाह बध्द केला आहे तर श्रीपतीने लक्ष्मीचा अंगिकार केला आहे. एका जनार्दनीं म्हणतात, या हरिहराच्या चरणांना ते वंदन करतात.
३
एका शोभे कौपीन । एका पीतांबर परिधान॥१॥
एका कंठीं वैजयंती । एका रूद्राक्ष शोभती ॥२॥
एकाउदास वृत्ति सदा । एक भक्तांपाशीं तिष्ठे सदा ॥३॥
एक एका ध्यान करिती । एक एकातें चिंतित ॥४॥
एका जनार्दनीं हरिहर । तया चरणी मज थार ॥५॥
भावार्थ
हरानें कौपीन (लंगोटी) तर हरीने कमरेला पीतांबर कसला आहे. श्रीहरीच्या गळ्यांत वैजयंती तर श्रीहराच्या गळ्यांत रुद्राक्षाच्या माळा रूळत आहेत. श्रीहरी सदा भक्तांच्या मेळाव्यांत रममाण असतात तर शिव सर्वदा उदासीन वृत्ती धारण करतात. असा विरोधाभास असुनही दोघे एकमेकांचे सदासर्वकाळ ध्यान करतात आणि परस्परांच्या चिंतनांत मग्न असतात. एका जनार्दनीं म्हणतात, या हरिहरांच्या चरणकमळांचा आश्रय आपणास मिळावा.
४
एक ध्याती एकमेकां । वेगळें अंतर नोहे देखा ॥१॥
ऐसी परस्परें आवडी । गूळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥
एकमेकांतें वर्णिती । एकएकांते वंदिती ॥३॥
एका जनार्दनीं साचार । सर्वभावें भजा हरिहर ॥४॥
भावार्थ
हरिहरांत वेगळा अंतराय नसून दोघेही एकमेकांचे ध्यान करतात. जशी गुळाचा गोडवा आणि गूळ परस्परांपासून वेगळे असू शकत नाहीत तसे हरिहर एकमेकांशी संलग्न आहेत. ते एकमेकांचे गुणवर्णन करून एक दुसर्याला वंदन करतात. एका जनार्दनीं सुचवतात, सर्वांनी हरिहराचे भजन करावे, या श्रेष्ठ धर्माचे आचरण करावे.
५
हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥
हरिहर एक तेथें नाहीं भेद । कांसयिसि वाद मूढ जनीं ॥२॥
गोडीसी साखर साखरेस गोडी । निवडितां अर्ध घडी दुजी नोहे ॥३॥
एका जनार्दनीं हरिहर म्हणतात । मोक्ष सायुज्यता पायां पडे ॥४॥
भावार्थ
शैव आणि वैष्णव यांच्या मध्यें जे भेद करतात, असे मत असलेल्या लोकांना निशिध्द मानावे. श्रीहरी आणि श्रीहर एकच स्वरूपी असतांना मूढपणे वाद घालणे निरर्थक आहे. साखरेची माधुरी आणि साखर वेगळी करता येत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, हरिहर या मंत्रजपाने सायुज्य मुक्ती (वैकुंठ, कैलास) लोक प्राप्त होतो.
६
होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥
त्याचे न पहावें वदन । मुर्खाहुनी मूर्ख पूर्ण ॥२॥
भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां ॥३॥
एका जनार्दनीं वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥
भावार्थ
शिवशंकर स्मशानात एकांती बसून रामरूपाचे सतत ध्यान करतात. भक्ती कशी असावी याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण शिवशंकर आहेत. असे असताना वैष्णवांनी सदाशिवाची निंदा करावी हे मूढपणाचे लक्षण मानले जाते. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीभावाचा सोहळा दाखवणारे महादेव वैष्णवांचे शिरोमणी आहेत.
७
शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहूतां जन्मांचे ॥१॥
जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे काळाचे भेव ॥२॥
तिहीं लोकीं श्रेष्ठ न कळे आगमां निगमां । तयाची गोडी ठाऊक श्रीरामा ॥३॥
एका जनार्दनीं नका दुजा भावो । विष्णु तोचि शिव ऐसा निर्वाहो ॥४॥
भावार्थ
शिव शिव हे नाम वाचेने जपले असतां अनेक जन्मांचे पाप नाहिसे होते. शिवशंकर वैष्णवांचा मुकुटमणी असून त्याचे नाम काळाचे भय दूर करते. तिन्हीं लोकीं श्रेष्ठ असलेल्या शिवशंकराचा महिमा वेदशास्त्रांना कळत नाही. श्रीराम शिवाचा महिमा यथार्थपणे जाणतात. एका जनार्दनीं म्हणतात, शिव आणि विष्णु असा दुजाभाव नसावा. शिव तोच विष्णु असा भक्तिभाव मनीं दृढ धरावा.
८
हरिहराच्या चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥
नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥
पळती यमदूतांचे थाट । पडती दूर जाऊनी कपाट ॥३॥
विनोदें हरिहर म्हणतां । मोक्षप्राप्ती तयां तत्वतां ॥४॥
एका जनार्दनीं हरिहर । भवसिंधु उतरी पार ॥५॥
भावार्थ
जो साधक हरिहराच्या चिंतनांत मग्न होऊन नामसाधना करतो तो सामान्य माणूस नसून प्रत्यक्ष नारायणाचे रूप आहे असे समजावे. हरिहराचा नामजप ऐकून यमदूत दूर पळून जाऊन गिरीकंदरी लपून बसतात. विनोदाने जरी नाम मुखीं आले तरी सहज मोक्षप्राप्ती होते. एका जनार्दनीं म्हणतात, हरिहर भक्तांना संसार सागरातून पार करतात.
९
अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें ॥१॥
नाम भिन्न रूप एक । देहीं देहात्मा तैसा देख ॥२॥
गोडी आणि गूळ । नोहे वेगळे सकळ ॥३॥
जीव शीव नामें भिन्न । एकपणें एकचि जाण ॥४॥
एका जनार्दनीं शरण । भेदरूपें दिसे भिन्न ॥५॥
भावार्थ
सोन्याचे अलंकार घडवले तरी त्यातिल मूलद्रव्य सोनेच असते. भिन्न भिन्न नामरूपाच्या या सृष्टींत देहात्मा परमात्म्याचे अंश असतात. गूळ आणि गोडवा यांत वेगळेपणा नसतो. जीव आणि शीव ही नामे भिन्न असली तरी जीवशीव एकरूपच आहेत हे जाणून घ्यावे. सद्गुरु जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात. नामरूपाचा भेद असल्याने जीवशिव भिन्न वाटतात.
१०
जगाचा जनक बाप हा कृपाळु । दीनवत्सल प्रतिपाळू पांडुरंग ॥१॥
पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनि । करील झाडणी महत्पापा ॥२॥
ज्या कारणे योगी साधन साधिती । ती हे उभी मूर्ति भीमातटीं ॥३॥
एका जनार्दनीं भक्त करूणाकर । ठेवुनी कटी कर उभा विटे ॥४॥
भावार्थ
दीनदुबळ्यांचा सांभाळ करणारा पांडुरंग विश्वाचा कृपाळू जन्मदाता आहे. मनातिल द्वैतभावना दूर करून डोळ्यांत प्राण आणून त्याचे दर्शन घ्यावे. या भगवंतासाठी योगी कठोर तप करतात तो करूणाकर भीमातटी कटीवर कर ठेवून विटेवर उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीभावाने डोळे भरून दर्शन घेतल्यास तो महापापांची होळी करतो.
११
अभेदावांचून न कळे। भक्तीचे महिमान ।
साधितां दृढ साधन । विठ्ठलरूप न कळे ॥१॥
येथें पाहिजे विश्वास । दृढता आणि आस ।
मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥
वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्रीं ।
उभी विठ्ठलमूर्ती । तयांपाशीं तिष्ठत ॥३॥
आशा मनिशा सांडा परतें । कामक्रोध मारा लातें ।
तेणेंचि सरतें । तुम्ही व्हाल त्रिलोकीं ॥४॥
दृढ धरा एक भाव । तेणें चरणीं असे वाव ।
एका जनार्दनीं भेव । नाहीं मग काळाचे ॥५॥
भावार्थ
साधकाच्या मनांत दृढ विश्वास आणि भक्ती नसेल तर विठ्ठलाचे खरे स्वरूप समजणार नाही. मनात शिव, विष्णु असा भेदभाव असेल तर भक्तीचा महिमा कळणार नाही. वर्णभेद, जातीभेद सर्व विसरून अहोरात्र नामस्मरण केल्यास विठ्ठलमूर्ती वाट पहात उभी राहते. भविष्यातील आशा, मनातिल ईच्छा, कामना, क्रोध यांना बाजुला सारून भक्तीमार्गाने वाटचाल सुरू केल्यास त्रैलोक्याचा धनी आपलासा होईल. त्याच्या चरणांशी आश्रय मिळेल. एका जनार्दनीं म्हणतात, अशा साधकाला कळीकाळाची भिती राहणार नाही.
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2025

TOP