चिंतनमहिमा
संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.
१
चिंतनें नासतसे चिंता । चिंतनें सर्व कार्य ये हातां ।
चिंतनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥
ऐसे चिंतनाचे महिमान । तारिले अधम खळ जन ।
चिंतनें समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥
चिंतनें तुटे आधिव्याधी । चिंतनें तुटतसे उपाधी ।
चिंतनें होय सर्व सिध्दी । एका जनार्दनाचे चरणीं ॥३॥
भावार्थ
या अभंगात संत एकनाथ मानवी मनाच्या चिंतन शक्तीचा महिमा वर्णन करीत आहेत. चिंतनाने सायुज्यता नावाच्या मुक्तीचा लाभ होतो. समाजातले पापी, दुष्ट लोकांचा उध्दार सद्विचाराच्या चिंतनाने होतो. चिंतनाने मनाच्या व शरीराच्या आधिव्याधी, उपाधी तुटून जातात. चिंतनाने मनाच्या सार्या चिंता मिटतात. चित्ताचे समाधान होऊन हाती घेतलेली कार्ये पूर्ण होतात. मुनीजन आणि योगी केवळ परमेश्वर चिंतनाने अनेक सिध्दी प्राप्त करून घेतात.
२
चिंतनें कंसासुर तरला । चिंतनें पुतनेचा उध्दार केला ।
चिंतनें आनंद जाहला अर्जुनादिकांसी ॥१॥
म्हणोनी करावें चिंतन । काया वाचा मन ।
संतांचे चरण नित्य चिंतावें ॥२॥
चिंतन आसनीं शयनीं । भोजनी आणि गमनागमनीं ।
सर्वकाळ निजध्यानीं । चिंतन रामकृष्णाचें ॥३॥
चिंतन हेची तप थोर । चिंतनें साधे सर्व संसार ।
एका जनार्दनीं निर्धार । नामस्मरण चिंतनीं ॥४॥
भावार्थ
३
हरे भवभय व्यथा चिंतनें । दूर पळती नाना विघ्नें ।
कली कल्मष बंधनें । न बाधती चिंतनें ॥१॥
करा करा म्हणोनि लाहो । चिंतनाचा निर्वाहो ।
काळाचा तो भिहो । दूर पळे चिंतनें ॥३॥
हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनी ।
शरण एका जनार्दनीं रामनाम चिंतावें ॥४॥
भावार्थ
चिंतनाने नाना प्रकारची संकटे दूर होतात, विघ्ने टळतात. कलियुगातील बंधने बाधक होत नाहीत. काळाचे भय नाहिसे होते, संसारातील अंतकरणाला जाळणार्या व्यथा चिंतनानें दूर होतात. परमेश्वराच्या गुणांचे आणि चरित्राचे सतत चिंतन करण्याचा नेम करावा. रात्रंदिवस रामनाम चिंतावे अशी एका जनार्दनीं विनंती करतात.
४
चिंतन तें सोपें जगीं । रामकृष्ण म्हणा सत्संगीं ।
उणे पडो नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें ॥१॥
चिंतन करितां द्रौपदी । पावलासें भलते संधी ।
ऋषीश्वरांची मांदी ।तृप्त चकेली क्षणमात्रें ॥२॥
चिंतनें रक्षिलें अर्जुना । लागो नेदी शक्तिबाणा ।
होऊनीं अंकणा । रथारूढ बैसला ॥३॥
चिंतनाने प्रल्हाद तारिला । जळीं स्थळीं सांभाळिला ।
एका जनार्दनीं भला । चिंतनाचा अंकित ॥४॥
भावार्थ
पांडव वनवासांत असतांना दुर्वास ऋषी पांडवांकडे भोजनासाठी गेले. त्या अवेळी द्रौपदीची थाळी रिकामी होती. द्रौपदी ऋषी शापाच्या भयाने संकटांत सापडली. हरिचिंतनाने प्रसन्न झालेल्या श्रीहरीने विनाविलंब क्षणार्धांत ऋषींना तृप्त केले. अर्जुन श्रीकृष्णाचा सखा असून सतत त्याचे चिंतन करीत असे. कौरव पांडवांच्या महायुध्दांत सारथी बनून कर्णाच्या शक्तिबाणां पासून अर्जुनाचे रक्षण केलें. प्रल्हाद विष्णुचा एकनिष्ठ भक्त होता सतत विष्णुचिंतनांत मग्न असे. हरप्रकारे सागरात, अरण्यांत प्रल्हादाचे रक्षण केले. चिंतन ही सोपी साधना असून चिंतन भक्तीने देव धावत येऊन भक्तांचे रक्षण करतो. असे एका जनार्दनीं सुचवतात.
५
चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळी हातीं काठी ।
चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥
ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा ।
काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥
एका जनार्दनीं चिंतन । तेणें जोडे नारायण ।
आणिक न लगे साधन । कलीमाजीं सर्वथा ॥३॥
भावार्थ
परमेश्वराचे सदोदित चिंतन करणार्या भक्तांसाठी देव खांद्यावर कांबळे आणि हातांत काठी घेऊन लागोलाग धावत जातो. त्यां भक्ताचे बंधन आनंदाने स्विकारतो. जातीपातीचा, उच्चनीचतेचा विचार करीत नाही. शबरीचा अधिकार किंवा फळांची गोडी यापेक्षा शबरी रामाचे रात्रंदिन जे चिंतन करीत होती त्यामुळे शबरीचा उध्दार झाला. एका जनार्दनीं म्हणतात, केवळ चिंतनाने नारायण भक्तांसी जोडला जातो. आणिक कोणत्याही साधनेची कलियुगांत गरज नाही.
६
चिंतनासी न लगे वेळ । कांहीं न लगे तया मोल ।
वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥
हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें चुके जन्मखेपा ।
आणिक तें पापा । कधीं नुरें कल्पांतीं ॥२॥
चौर्यांशीची न ये फेरी । एवढी चिंतनाची ही थोरी ।
सांडोनीं वेरझारी । का रे शिणतां बापुडी ॥३॥
एका जनार्दनीं चिंतन । वाचे सदा परिपूर्ण ।
तेणें घडे कोटीयज्ञ । नाम चिंतन जपतां ॥४॥
भावार्थ
चिंतनाला वेळ-काळाचे बंधन नाही, त्यासाठी काही मोल द्यावे लागत नाही. राम हरी गोविंद हा सोपा जपावा. या मंत्राने चौर्यांशी लक्ष योनींमध्यें जन्मांच्या फेर्या चुकतात. एवढा चिंतनाचा महिमा आहे. साधक कल्पांता पर्यंत पापाचा भागीदार होत नाही. चिंतन साधना इतकी सहज सोपी आणि थोर असतांना तो मार्ग सोडणे योग्य नाही. एका जनार्दनीं म्हणतात, चिंतनाने कोटी यज्ञाचे पुण्य पदरीं पडते.
७
चिंतनें पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी ।
चिंतन तें सार सर्वांसी । व्रतातपांसी चिंतन ॥१॥
चिंतनें यज्ञ दान धर्म । चिंतनें घडे नाना नेम ।
आणिक तें वर्म । चिंतनें घडे सर्वथा ॥२॥
चिंतनें वेदशास्त्र पुराण । नाना मंत्र तंत्र पठण ।
नाना तीर्थांचे भ्रमण । चितनें होय ठायींच ॥३॥
ऐसा चिंतन महिमा । नाहीं आणिक उपमा ।
एका जनार्दनीं प्रेमा । चिंतनें चिंतिता ॥४॥
भावार्थ
चिंतनाने यज्ञ, दानधर्म, नाना प्रकारचे व्रते, उद्यापने, नेम यांचे पुण्यफळ प्राप्त होते. वेदशास्त्र, पुराण श्रवणाचे तसेच नाना मंत्र-तंत्राचे पठण केल्याचे श्रेय चिंतनाने मिळते. नाना तीर्थयात्रा केल्याने जे साध्य होते ते सर्व कोणतिही यातायात न करतां एका ठिकाणी राहून चिंतन केल्याने साध्य होते. एका जनार्दनीं म्हणतात, चिंतन भक्तीचा महिमा अनुपमेय आहे.
८
चिंतनें उध्दरला पापी । महा दोषी केला नि:पापी ।
तया म्हणती ऋषि तपी । पुराणीं तें सर्व ॥१॥
नारदें सांडोनिया मंत्र । केला जगीं तो पवित्र ।
चिंतना एवढें पात्र । आन नाहीं सर्वथा ॥२॥
चिंतने शुकादिक मुक्त । राजा जाहला परीक्षित ।
ऐसें अपार आहेत । चिंतनें मुक्त जाहले ते ॥३॥
चिंतनाची येवढी थोरी । गणिका नारी परद्वारीं ।
वाचे उच्चारितां हरी । मोक्षधामीं बैसविली ॥४॥
चिंतनें हनुमंता समाधी । तुटोनि गेली आधीव्याधीं ।
एका जनार्दनीं बुध्दि । चिंतनीच जडलीसे ॥५॥
भावार्थ
नारदमुनींनी रामनामाचा मंत्र दिल्याने महापापी वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. चिंतनाने तो पवित्र होऊन रामायण कर्ता म्हणून चिरंजीव झाला. शुक मुनींनी परिक्षित राजाला चिंतन मंत्र देऊन मृत्यु भयापासून सोडवले आणि मोक्षपदाला नेले. गणिका हरिचिंतनाने मोक्षधामी पोचली. रामनाम चिंतनाने हनुमंताच्या आधिव्याधी सरून चिरंजीव पद प्राप्त झाले. एका जनार्दनीं म्हणतात, चिंतनभक्तीच्या योग्यतेचे कोणतेही अन्य साधन नाही.
९
चिंतनें बिभीषण मुक्त । चिंतनें जाहला जनक जीवमुक्त ।
चिंतनें कुळ सरित । सर्वभावें हरि होय ॥१॥
आवडी चिंतावें चरण । दुजे नको मानधन ।
नाम स्मरणावांचून । चिंतनचि नसो ॥२॥
ऐसा एकविध भावें । चिंतन असो मनीं जीवें ।
एका जनार्दनीं देव । तया पाठीं धांवतसे ॥३॥
भावार्थ
रावणबंधु बिभिषण विष्णू चिंतनाने मुक्त झाला. जनक राजा जीवनमुक्त झाला. अत्यंत भक्तिभावाने परमेश्वराच्या चरणांचे चिंतन, नामस्मरण करावे. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता एकाग्र मनाने परमात्म्याचे चिंतन केल्यास देव भक्ताच्या पाठीमागे धांवत येतो असे एका जनार्दनीं सांगतात.
१०
जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरीं ।
मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तातें ॥१॥
धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास ।
पहातसे वास । चिंतनाची सर्वथा ॥२॥
न धरीं माझें आणि तुझें । भार घाली पारे वोझें ।
एका जनार्दनीं दुजें । मग नाहीं तयातें ॥३॥
भावार्थ
पंढरीस जाईन असे मनाने योजिले आणि त्याचे सारखे चिंतन केले तर श्रीहरी भक्ताची ईच्छा पूर्ण करील यांत शंका नाही. देव कधीच भक्ताची उपेक्षा करीत नाही या वर विश्वास ठेवून आणखी काही सायास करण्याची गरज नाही. मी तू पणाचा भेदाभेद न करता श्रीहरी भक्ताचे ओझे पार करतो. असे एका जनार्दनीं सांगतात.
११
पंढरीस जावया । सदा हेत मानसीं जया ।
कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तातें ॥१॥
दृढ मनींच चिंतन । वाचे विठ्ठलचि जाण ।
होतु कां कोटी विघ्न । परी नेम टळे सर्वथा ॥२॥
एका जनार्दनीं भाव । नुपेक्षी तया देव ।
करूनि संसार वाव । निजपदीं ठाव देतुसे ॥३॥
भावार्थ
पंढरीस जाण्याची प्रबळ ईच्छा ज्या भक्ताच्या मनांत निर्माण होते तो कळीकाळाला वंदनीय वाटतो. मनांत हरीचे दृढ चिंतन आणि हरिनामाचा जप केल्यास कोटी विघ्ने टळतात परंतु नेम टळत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, भावभक्तीने चिंतन करणार्या भक्तांची देव कधी उपेक्षा करीत नाही. संसार चक्रातून सुटका करून चरणपदीं आश्रय देतो.
१२
चिंतन तें हरिचरण । हेंचि कलीमाजीं प्रमाण ।
सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥
मागे तरलें पुढें तरती । याची पुराणीं प्रचिती ।
वेद शास्त्र जया गाती । श्रुतीहि आनंदें ॥२॥
हेंचि सर्वांशी माहेर । भूवैकुंठ पंढरपूर ।
एका जनार्दनीं नर । धन्य जाणा तेथींचे ॥३॥
भावार्थ
कलियुगांत हरिचरणांचे चिंतन आणि विठ्ठलाचे नामस्मरण हे पुण्यफल देणारे आहे. असे भाविक भूतकाळी तरले आणि भविष्यातही तरतील यांत संशय नाही. पुराणांत याचे अनेक पुरावे सांगितले आहेत. पंढरपूर पृथ्वीवरील वैकुंठ असून सर्वांचे माहेर आहे. वेद, शास्त्रे, श्रुती आनंदाने पंढरीचे गुणगान करतात. असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात.
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2025

TOP