श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय तेविसावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

स्वस्ति श्रीनमोजी गणराया । तूंचि गणेश शारदा माया । प्रत्यगात्मा सद्गुरु सखया । कुलस्वामिया नमियेलें ॥१॥
पूर्वाध्यायीं श्रीगुंडाचरित्र । पूर्ण झालें परम पवित्र । आतां ऐका कथा स्वतंत्र । श्रवणासी पात्र श्रोतेहो ॥२॥
श्रीगुंडाचे चुलत बंधु । यशवंत नाईक ज्ञानसिंधु । त्यांसी दोन पुत्र होते साधु । ज्यांचा वेधु हरिनामीं ॥३॥
ज्येष्ठ नारायणबुवा ज्ञानसंपन्न । कनिष्ठ हरिबुवाही निपुण । गुंडानिर्याणानंतर । दोघेजण । राहिले जाण वंशस्थ ॥४॥
श्रीगुंडाचा मठमठाधिकार । नारायणबुवांनीं चालविला नंतर । पुढें सहा महिन्यांनीं सत्वर । गेले साचार परंधामा ॥५॥
हरिबुवासी वर्ष पंधरावें । स्वतंत्र फिरती स्वभावें । केव्हां केव्हां पंढरीसी जावें । मठांत रहावें तेथींच्या ॥६॥
तेथें जे लक्ष्मणबुवा बोलिले । ते मठाचे कारभारी जाहले । पंढरींत राहूनि सांभाळिलें । आले गेले सांप्रदायी ॥७॥
हरिबुवा अखंड आरंभीं जाण । एकदां कांहीं निमित्ताकारण । श्रीहरिबुवा मंडळी घेऊन । केलें गमन पुण्यासी ॥८॥
श्रीविठ्ठलकृपें आरंभीं जाण । एकदां कांहीं निमित्ताकारण । श्रीहरिबुवा मंडळी घेऊन । केलें गमन पुण्यासी ॥९॥
वाटे जातां रामकृष्णहरी । नामघोष होतसे गजरीं । ग्रामस्थ येती त्यासी सामोरी । नेऊनि मंदिरीं जागा देती ॥१०॥
होतसे अयाचित भोजन । नित्य चवदा अभंगांचें भजन । पूजा करिती ग्रामस्थ जन । गृहासी नेऊन सत्कारें ॥११॥
श्रीहरिमहाराज चतुर । अत्यंत उदार धैर्य गंभीर । आजानुबाहू तनु गौर । वय साचार पंचवीस ॥१२॥
हरिनाम मुखीं अखंडैक । पाहतांचि आनंद पावती लोक । उपदेश घेतले कित्येक । संगे भाविक राहती ॥१३॥
ऐसा ग्रामोग्रामीं आनंद । शिष्यांनीं केला बहुविध । संगें राहती लोक विविध । कांहीं बुध पंढरीचे ॥१४॥
ऐसा मार्ग क्रमोनि शेवट । पुण्यांत पातले तेव्हां नीट । उतरले विस्तीर्ण पाहोनि मठ । घ्यावया भेट जन येती ॥१५॥
त्यांची पाहोनि शांतस्थिति । जनासी आनंद वाटे चित्तीं । लहानथोर दर्शना येती । प्रेमें देती अयाचित ॥१६॥
सहस्त्रावधि ब्राह्मणभोजन । अधिकार्‍यांसि कळलें वर्तमान । कीं बुवा आहेत साधुपूर्ण । राहती निमग्न भजनांत ॥१७॥
हरिबुवा हे गुंडावंश । जाणोनि घेती उपदेश । ग्रामस्थ अधिकारी होती शिष्य । पूजिती त्यांस आदरें ॥१८॥
गुंडावंश हरिमहाराज । राज्याधिकार्‍या कळतां गूज । कलह निवाडा जाहला सहज । कळविलें निज महाराजा ॥१९॥
तेथोनि गेले अलंकापुरा । नमूनि भेटले ज्ञानेश्वरा । मग जाती भाग्यनगरा । परस्परां शिष्यांसह ॥२०॥
भाग्यनगरासी आले जव । चंदूलालासी कळलें तंव । पूजी सन्मानें करोनि गौरव । धरी भाव गुरुकृपें ॥२१॥
पूर्वीं चालत आल्या अनुक्रमें । ज्यागिरांची सनद यथानुक्रमें । लिहूनि हरिमहाराजानामें । अर्पिली प्रेमें चंदूनीं ॥२२॥
विणाचिपळ्या घेऊनि हरी । निमग्न होते भजनामाझारीं । पाहोनि लालासी आनंद भारी । मानिती निर्धारीं गुंडारुप ॥२३॥
अयाचित सामोग्री आणिलें । नाना वस्त्रालंकारीं पूजिलें । मंडळीसह प्रसादा घेतलें । मार्गस्थ केले ग्रामासी ॥२४॥
हरी देवपुरासी येऊन । गजरें नमिलें देवालागून । आनंद पावले थोर लहान । ग्रामस्थ जन सर्वही ॥२५॥
मठाचा जिर्णोध्दार केला । अपार अन्न द्विजांला । भोजन देती याचकांला । केवळ जन्मला धर्ममूर्ती ॥२६॥
कित्येकांचें केलें मौजीबंधन । कित्येकांचें लग्नशोभन । कित्येकांसी दिलें गृहदान । धाडिले ब्राह्मण यात्रेसी ॥२७॥
येकीकडून अयाचिती येती । येक येऊनि घेऊनि जाती । कोणी स्वतंत्र करोनि खाती । कोणी जेविती पंक्तीसी ॥२८॥
हरिस्थानीं बैसोनि सुखी । अखंड रामाकृष्णाहरी मुखीं । गावोनि ध्यानी सगुण रेखी । स्वानंदें सेखीं डोलत ॥२९॥
आतां हरिमहाराजाचें नित्य । सूर्योदयास्त पावेतों कृत्य । कळावया तुम्हां सांगतों सत्य । श्रोते अगत्य ऐका तें ॥३०॥
अरुणोदयीं नामस्मरण । नंतर शौचमुखमार्जन । तेथूनि स्नानसंध्यापूजन । पितृतर्पण यथाविधि ॥३१॥
एकांतीं बाराशें गायत्रीजप । ध्यानीं ध्याती सगुण रुप । मग वाचिती पुराण स्वल्प । मग धूपदीपनैवेद्य ॥३२॥
सर्व शिष्यमंडळीसहित । अन्न सेविती अयाचित । ग्रासोग्रासीं नामघोष होत । जाती समस्त स्वठायां ॥३३॥
मग एकांतामाजी बैसून । चिपळ्यावीणा करीं घेऊन । अखंड करिती नामस्मरण । मग जाण सायंसंध्या ॥३४॥
उभे राहूनि भजन केवळ । चौदा अभंगांचें होय सोज्वळ । वीणाचिपळ्या पायीं चाळ । अतिप्रेमळ शिष्यांसह ॥३५॥
मग वाचिती ज्ञानेश्वरी । नंतर फराळ सहपरिवारीं । असा प्रपंचपरमार्थ निर्धारीं । करी हरि अद्वयपणें ॥३६॥
ऐसें नित्य कृत्य चालिलें । वय सत्तावीस वर्षाचें जाहलें । चिखलीकरांनीं मुलीस दिलें । लग्न जाहलें समारंभें ॥३७॥
मनूबाई स्त्री साध्वी सुंदर । अखंड सेवेंत असे तत्पर । याचकाविषयीं परम उदार । दानशूर अन्नपूर्णा ॥३८॥
ऐसा लोटतां कांहीं काळ । पोटीं जाहला पुत्र केवळ । पूर्ण विरागी अतिप्रेमळ । राहे सुशीळ स्वानंदें ॥३९॥
उपजतांचि पूर्ण ज्ञानी । दृढलेप विठ्ठलचरणीं । एकांत आवडे अखंड ध्यानीं । प्रपंच स्वप्नीं नेणें कधीं ॥४०॥
जैसा हस्तमलक विदेही । तैसा जन्मतांचि गुंडा पाही । सुखदु:खाची वार्ता कांहीं । स्वप्नीं नाहीं जयाच्या ॥४१॥
बाळपणींच लग्न जाहलें । पुत्रकन्या उदरा आलें । परी त्यांत दोघे राहिले । कांहीं गेले ऋणानुबंधें ॥४२॥
नारायणबुवा हे पुत्र ज्येष्ठ । शांत उदार गंभीर उत्कृष्ट । कर्मधर्मीं रत ब्रह्मनिष्ठ । ज्ञानभक्ति वरिष्ठ ज्यांची ॥४३॥
त्याहूनि धाकटे जे असती । त्यांचें नाम महीपती । सदाचारसंपन्न ब्रह्मस्थिति । अद्वैत निश्चिती स्वानुभवीं ॥४४॥
चातुर्मास्य ज्यांचा पंढरीवास । अयाचित वृत्ति प्रपंची उदास । अध्यात्मज्ञानी भक्ति जयास । प्रेम विशेष विठ्ठलपदीं ॥४५॥
जरी आतां आला कलिकाल । तरी दोघांची बुध्दि सुशील । अन्नदानाविषयीं प्रेमळ । शूर केवळ जन्मले ॥४६॥
काय मी वर्णूं शकें पामर । त्यांची कीर्तिच गर्जे साचार । ज्यांची शिष्यशाखा अपार । जगीं निर्धार वर्णिती ॥४७॥
सगुण ध्यान ज्यांचें सबळ । तपसामर्थ्यही असे केवळ । परी नसेचि अहंतामळ । विरागी सोज्वळ शोभती ॥४८॥
सर्वांसी दिसती प्रापंचिक । परी अंतरीं अद्वय नि:शंक । समसाम्य ज्यातें ब्रह्म एक । भक्त भाविक अभेद ॥४९॥
असो हरिबुवांचें पुण्य श्रेष्ठ । ज्यांची संतति संपत्ति वरिष्ठ । प्रपंचीं तिळही न्यून अदृष्ट । नसे स्पष्ट जाणती सर्व ॥५०॥
वय जाहले पंच्यायशीं वर्ष । जगतीं ज्यांचा कीर्तिउत्कर्ष । सगुण ध्यानीं मानिती संतोष । नामघोष अखंड मुखीं ॥५१॥
श्रीगुंडा स्थापित जेथें मूर्ति । तें देवालय जीर्ण झालें अति । पुढील मंडपही जीर्ण निश्चिती । योजिलें चित्तीं बांधावयाचें ॥५२॥
तिन्हीही देवालयें बांधून । दगडी मंडप केला विस्तीर्ण । रामसीतामूर्ति भंगली म्हणून । नवी आणून स्थापिली ॥५३॥
चालत आला जो पूर्वापार । तो रामनवमी उत्सव थोर । तो करिताती अतिगजर । भजन अपार भोजनादि ॥५४॥
असो बुवा मनीं श्रीगुंडामूर्ति । स्थापावी ऐसें आलें चित्तीं । म्हणोनि त्याचा प्रयत्न करिती । ती कथा पुढती ऐकावी ॥५५॥
कोणी पाथरट अतिभाविक । श्रीगुंडाचा शिष्य होता एक । त्याने मनीं उध्दार जाहला देख । करावी सुरेख गुंडामूर्ति ॥५६॥
परी मूर्ति असावी गुंडाऐसी । ऐसें वाटूनी त्याचे मानसीं । सप्तदिन राहूनियां उपवासी । एकांतीं ध्यानासी बैसला ॥५७॥
श्रीगुंडा प्रगटले ध्यानीं । म्हणती प्रियशिष्या कायरे मनीं । येरु म्हणे वाटे पाहूनि नयनीं । मूर्ति करोनि स्थापावी ॥५८॥
श्रीगुरुहस्त रहातां शिरीं । सुरेख मूर्ति घडे निर्धारीं । गुंडा म्हणती करीं सत्वरी । हां भरी पाथ्रट तो ॥५९॥
मग तो बैसोनि एकांतीं । सिध्द केली श्रीगुरु गुंडामूर्ती । अप्रतिम जे घडिली निश्चिती । जन पहाती स्वानंदे ॥६०॥
हरिमहाराज दृष्टीनें पाहिले । मनीं फारचि आनंद पावले । सर्व साहित्य सिध्द केलें । मुहूर्त ठरले दुसरे दिनीं ॥६१॥
पाथरट मनीं विचार करी । मूर्ति ही नेतां भाग्यनगरीं । विशेष द्रव्य मिळेल कांहीं तरी । म्हणोनि सत्वरी नेतसे ॥६२॥
मूर्ति शिरीं नेतां न दिसे वाट । खालीं ठेवितां दिसे स्पष्ट । त्रासोनि पळाला ग्रामासी नीट । मूर्ति शेवट लपवोनी ॥६३॥
हरी उठोनि प्रात:काळीं । सत्वर गेले गुंडादेउळीं । तंव मूर्ति न दिसे पूर्वस्थळीं । नाहीं त्या वेळीं पाथ्रटही ॥६४॥
बोलाऊं धाडिले पाथरटाला । मूर्तिचाही शोध करविला । हरीनेम त्या दिनीं निराहार केला । चकित मनाला सर्व होती ॥६५॥
हरिस्वप्नीं गुंडा येऊन । सांगीतलें सर्व ही वर्तमान । द्रव्यासाठीं मज लपवोन । गेला पळून ग्रामासी ॥६६॥
कोण्या शिष्यासी देऊनिही मूर्ति । द्रव्य अपार घ्यावें त्याचे चित्तीं । परी न दिसे न उठे पुढती । गेला निश्चिती टाकोनी ॥६७॥
दक्षिणसरोवरीं उत्तरेकडे । मूर्ति लपवोनि गेला पुढें । आकंठजलीं पाहतां सांपडे । सांगीतलें एवढें गुंडानें ॥६८॥
तात्काळ जावोनि कांही बुध । जळीं धुंडोनि लाविला शोध । मूर्ति आणिली मठांत शुध्द । गजरें प्रसिध्द सर्वांनीं ॥६९॥
पुढें पाहूनि शुध्ददिन । यथाविधि केलें मूर्तिस्थापन । बहुत झालें अन्नदान । करिती ब्राह्मण मंत्रघोष ॥७०॥
पाथरट भावें शरण आला । बुवासी त्यानें साष्टांग नमिला । सांगोनि सर्व वृत्तांत वर्तला । मनींपावला पश्चात्ताप ॥७१॥
वस्त्रें आणवोनि सत्वर । येरुसी तेव्हां केलें अहेर । दुशाला देतां करी नमस्कार । मनीं साचार आनंदला ॥७२॥
द्रव्य आणिलें द्यावयासी । तो संकोचित होऊनि मानसीं । म्हणे गुरुआज्ञा नाहीं मजसी । हे घ्यावयासी द्रव्य तुमचें ॥७३॥
महाराजांसी करुनि नमन । पाथरट गेला गृहालागून । आतां पुढें ऐकावें कथन । श्रोते सावधान होवोनी ॥७४॥
बुवासि वृध्दापकाळ आला । देह देवळ झोल जाहला । नेत्र मंद आड बोला । परी नामाला खंड नाहीं ॥७५॥
कोणी गुंडाख्य देशाधिकारी । हरी असतां स्वानंदामाझारीं । येवोनि बैसले त्या अवसरीं । नमोनि निर्धारीं कार्यार्थी ॥७६॥
महाराज म्हणती कोणरे काय । येरु वदे मी गुंडेराय । वृत्तीलागीं जाहला काहीं अपाय । साठीं मी जाय भाग्यनगरा ॥७७॥
महाराजांची आज्ञा होतां । कार्यासि मी जाईन आतां । म्हणती जा साधा काय पाहतां । गुंडा समर्था आठवोनी ॥७८॥
तेव्हां नमोनियां तो समर्थ । जातांचि महत्कार्य साधिलें तेथ । ऐसी वाक्सिध्दि ज्याची यथार्थ । जाणती समस्त अर्थार्थीं ॥७९॥
ऐसे कित्येकांचें कार्य सिध्द । वाचें बोलतांचि जाहलें प्रसिध्द । ऐसा तपोनिधि जो अगाध । जाणती बुध प्रत्ययें ॥८०॥
परस्त्री परधन निंदास्तुती । मान अपमान स्वप्नींही नेणती । चातुर्मास अयाचित वृत्ती । अखंड गाती हरिनाम ॥८१॥
असो ऐसा लोटला काळ । कधीं दु:ख जरा नसो केवळ । परी पातला जेव्हां अंतकाळ । गात्रें विकळ होती तेव्हां ॥८२॥
जेव्हां जाणिला अंतसमय । मुखें नामघोष अधिक होय । पुत्रपौत्र पुसती आज हें काय । दिसतो अपाय कांहीं पुढें ॥८३॥
सर्वांगीं ग्लानि दिसे केवळ । गात्रें जाहलीं अति शिथिल । ते सांगती आतां देह राहील । ऐकतां सकल मिळाले ॥८४॥
लोक येती एकएका पाठी । मठांत जाहलीं अति शिथिल । ते सांगती आतां देह राहील । ऐकतां सकल मिळाले ॥८४॥
लोक येती एकएका पाठी । मठांत जाहली अत्यंत दाटी । निवारितांही पदीं घालिती मिठी । दु:ख पोटीं नावरे ॥८५॥
शके अठराशें नऊ सालीं । पौष वद्य तृतीया प्रात:काळीं । श्रीहरिज्योति निजधामा गेली । स्वरुपीं मिळाली स्वानंदें ॥८६॥
एकचि झाला हाहा:कार । कीर्तनीं होतसे टाळगजर । सनया वाजती अपरंपार । दाटी अपार जाहली ॥८७॥
यथाविधि कर्म करुन । मग सज्विलें दिव्य विमान । त्यासी रेशमी झालर लाऊन । पताका निशाण लाविले ॥८८॥
बैसवोनि नेतां हरिमूर्ति । कोणी मेवामिठाई उधळिती । कित्येक तेव्हां भजन करिती । मंत्र म्हणती कित्येक ॥८९॥
अजाति व्यवहार जन अभेद । मेवामिठाई घेती प्रसाद । गुलालबुका उधळिती अगाध । विठ्ठल शब्द घोष चाले ॥९०॥
श्रीहरिदेह होतां दहन । रक्षा नेती प्रसाद म्हणून । अगणित जाहलें अन्नदान । भजनभोजन आचांडाल ॥९१॥
ग्रामोग्रामींचे वारकरी आले । शिबिकायुक्त दिंडीसी काढिलें । उद्दालिकातीरीं काल्यासी केलें । लोक गेले आपुल्या ग्रामा ॥९२॥
असो कांहीं दिवसानंतर । हरिपुत्र गुंडासी स्त्री सुंदर । राजाबाई ही साध्वी चतुर । गेली साचार परलोका ॥९३॥
हरिपुत्र गुडामहाराज । म्हणती आमची स्त्री गेली आज । आम्हीही सत्वर जाऊं ऐसें गुज । बोलिले सहज वाचेनें ॥९४॥
पुढें पंचमासीं जाहले गत । शके अठराशें चोविसांत । फाल्गुन वद्यामाजी अकस्मात । प्रकृति बिघडत चालली ॥९५॥
आजन्म ज्याचे प्रकृतींत कांहीं । दु:ख जरा कांहींच नाहीं । एकाएकीं बिघडली त्यासमयीं । आला पाही अंतकाळ ॥९६॥
चौदा अभंगांचें केलें भजन । कांहीं गुंडाकृत पदें म्हणून । चतुर्दशीस जाहलें निर्याण । सावध जाण दिनोदयीं ॥९७॥
असो यथासांग सार्थक । केले असती पुत्र भाविक । ऐसें ज्यांचें सत्कुल देख । स्मरणें तारक भाविका ॥९८॥
आतां पुढें श्रोतेहो सावधान । श्रीगुरु गुंडाशिष्यकथन । ज्यांचेवरी कृपा पूर्ण । साधिला नारायण तयांनीं ॥९९॥
इति श्रीगुंडामाहात्म्य सुरेख । श्रीहरिमहाराजांचें कथानक । अत्यंत गोड सेवोत भाविक । अध्याय देख तेविसावा ॥१००॥
श्रीसद्गुरुगुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥

अध्याय २३ वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP