श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय अठरावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणाधिपतये नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

ॐ नमोजी गणनाथा । सगुण वक्रतुंडा समर्था । निर्गुण म्हणतां तुज एकदंता । अद्वयमता शोभसी ॥१॥
नमो हंसा शारदा माया । अखिल विलासिनी जी नये आया । देवो देवी शब्दचि वाया । जाय विलया नाममात्रें ॥२॥
पहातां तूंचि एक सद्गुरु । शिवाशिव जो जगदाधारु । प्रत्यक्ष प्रगट महीवरु । दे आधारु ग्रंथारंभीं ॥३॥
तूंचि कुलस्वामी सर्वेश । शेषाद्रिवासी श्रीव्यंकटेश । नारायण धीस्थ स्वप्रकाश । लेखक अनायास तुझा तूं ॥४॥
असो पूर्वाध्यायीं कथन । चातुर्मास पंढरींत क्रमून । पुढें राहिले पंचदीन । जाहलें विंदान तें ऐका ॥५॥
एके ग्रामीं दीन द्विजबाळक । चोरुन नेत कानफाडी एक । दूर नोवोनियां त्यास देख । विकला नि:शंक कोणे एका ॥६॥
तो भ्रष्टला शूद्रयातींत । मात्यापित्या आठवूनि रडत । नित्य जेवी शूद्रपंक्तींत । अभक्ष्य बहुत भक्षिलें ॥७॥
मातापित्याचा करी आठव । दृष्टीपुढें दिसे आपुलें गांव । परी ग्रामाचें विसरला नांव । काय उपाय करुं म्हणे ॥८॥
वीस वर्षांचे जाहलें वय । पहावें वाटती बापमाय । परी कोठें तो आठव न होय । कांहीं उपाय न सुचे ॥९॥
तों एके दिनीं निर्धार केला । चोरुनि अर्धरात्रीं निघाला । महारण्या ओलांडूनि गेला । फिरुं लागला तीर्थक्षेत्र ॥१०॥
बैराग्याचा धरुनि वेष । फिरे कापडयाच्या संगतीस । हिंडोनि थकला कित्येक वर्ष । आला ग्रामा अकस्मात ॥११॥
कापडी समुदाय संगें होता । ग्रामाचा ओळखिला पाणवथा । क्षेत्र वृक्ष आणि सरिता । विचारें पाहतां कळों आलें ॥१२॥
याच स्थानीं मी मातेपाठीं । लागलों होतों पेटूनि हट्टी । येच स्थानीं मातेकंठीं । घातली मिठी म्या दृढ ॥१३॥
माझ्या दोघी ज्येष्ठ बहिणी । नेत होत्या मज बुझावूनि । न ऐकतां राहिलों ये स्थानीं । नेलें येथून जोग्यानें ॥१४॥
मी एकूलता एक बाळ । मज शोधिले असेल पुष्कळ । परी दैवहीन मी केवळ । म्हणोनि सकळ नाश झाला ॥१५॥
आतां आईबाप कोण पुसावें । तरी त्यांचें नाम नाठवे । मातृभगिनी गंगा नांवें । विचारें जाणावें आठवे ॥१६॥
देखोनि एक बाई सुशीळ । तीतें खुणवार्ता पुसे सकळ । गंगानामें विप्रकन्याकूळ । सांग समूळ काय तें ॥१७॥
पंचवीस वर्षापासून । त्यांचें काय असे वर्तमान । बाई म्हणे हा पुसणार कोण । परी कथन करुं म्हणे ॥१८॥
ब्राह्मणाचें नांव विश्वनाथ । गया त्याची भार्या यथार्थ । गंगागोदा कन्या निश्चित । आणि एक सुत होता त्यांसी ॥१९॥
गंगागोदा दोघी कुमरी । सुखें नांदती आपुले घरीं । पुत्रमात्र गेला माय् चोरी । तेणें अंतरीं दु:खी दोघें ॥२०॥
गृहीं धनकण संपन्न । परी पुत्रशोकें जाहले दीन । कंठीं उरला असे प्राण । वृध्दपणही आलें वरी ॥२१॥
ऐसी ऐकतां वार्ता समस्त । येरु दु:खें करुनि स्फुंदत । भेटूं म्हणोनि वाटलें त्वरित । मार्ग पुसत गृहाचा ॥२२॥
तेव्हां ती विप्रस्त्री चतुर । म्हणे हाचि भासे त्याचा कुमर । तीस वर्षांचा दिसे साचार । नेला निर्धार दहावे वर्षीं ॥२३॥
बाई तैसीच गेली गयागृहीं । म्हणे तुझ्या पुत्रा ऐसाबाई । कोणी पाणवर्थी आहे पाहीं । भेट घेईं जावोनि त्वरें ॥२४॥
तुमचे विचारी खूण नामाला । ते मी सर्वही सांगतां त्याला । स्फुंदस्फुंदोनि रडूं लागला । प्रेमें व्यापिला अत्यंत ॥२५॥
तीस वर्षांचे असे वय । तुजसारिखाचि दिसे माय । जावोनि ओळखी तो होय काय । वेगीं संशय दूर करीं ॥२६॥
ऐसें ऐकोनि तिचें वचन । हर्षे चालिले दोघे उठोन । तत्काळ पाणवथां येऊन । पाहती निरखून तयासी ॥२७॥
परस्परांसी मोह पडला । अत्यंत स्नेहें कंठ दाटला । लोक विस्मयास्तव हा आपुला । म्हणोनि बोला न बोलती ॥२८॥
स्वज मिळाले भोंवते सर्व । म्हणती कैसें जाहलें हें अपूर्व । यांचा पुत्र हाचि हेंचि नांव । येत आठव आम्हांही ॥२९॥
मग ब्रह्मकर्माची रीती । सर्वही जन त्यासी पुसती । येरु म्हणे भ्रष्टलों शूद्रयातीं । विचित्र गती कर्माची या ॥ ३०॥
येथोनि गेल्या दिवसापासून । कथिलें सर्वही वर्तमान । तेव्हां पाचारोनियां विद्वान । निर्णय ब्राह्मण करिताती ॥३१॥
म्हणती यातींत कैसें घ्यावें । शास्त्रें काय प्रायश्चित्त द्यावें । द्वादशवर्षें जालीं जाणावें । काय करावें उपाय सांगा ॥३२॥
यथार्थ ज्याची यातिभ्रष्टता । तीस वर्षानंतर आतां । मौंजीबंधन नोव्हे सर्वथा । सर्वसंमता शास्त्रें आलें ॥३३॥
मातापिताही संगें निघाले । क्षेत्रोक्षेत्रीं हिंडू लागले । काशीप्रयागादि तीर्था फिरले । कष्टी जाहले बहुतची ॥३४॥
येवोनियां प्रतिष्ठानाप्रती । ब्रह्मसभेसी केली विनंती । आमचेनी नोहे तेही म्हणती । याती निश्चिती नये यासी ॥३५॥
फिरताफिरतां ऐसें क्षेत्र । पंढरीसि आले ते सर्वत्र । पांडुरंगासि भेटोनि पवित्र । बैसले क्षणमात्र राउळीं ॥३६॥
पाध्यादि ब्राह्मणसभा थोर । जमले असती तेथें अपार । प्रणिपात करोनि कथिला सार । वृत्तांत साचार वर्तला जो ॥३७॥
तेही म्हणती हा निर्णय । आमुचेनी सर्वथा न होय । तीस वर्षांचे जाहलें वय । काय उपाय असे यासी ॥३८॥
तेथूनियां ब्रह्मपुत्र उठिला । चंद्रभागातटासि आला । अत्यंत शोकार्णवें दाटला । म्हणे जाहला व्यर्थ जन्म ॥३९॥
धिगधिग हे क्षेत्रस्थ ब्राह्मण । दयाक्षमाविवेकहीन । शास्त्र पढोनि जाहले विद्वान । अर्थज्ञान नसे कांहीं ॥४०॥
आतां एक युक्ति असे शुध्द । या पुण्यक्षेत्रासी येती सिध्द । त्यांचें दृढ धरावें पद । कृपे संवाद मिटेल हा ॥४१॥
ही योजन करोनि दृढतर । गुंडादर्शनासी आला सत्वर । प्रदक्षिणा करोनि त्रिवार । केला नमस्कार सप्रेमें ॥४२॥
म्हणे स्वामी अपराध नसतां । बालपणीं जोगी मज ने तत्वतां । याती भ्रष्टली मज न कळतां । यातींत आतां न घेती विप्र ॥४३॥
आतां या श्रीगुरुकृपेवीण । सर्वथा मी न होय ब्राह्मण । अनन्यभावें तुम्हां शरण । करा पावन साधुराया ॥४४॥
ऐशी ऐकतां त्याची विनंती । प्रसन्न होवोनि तेव्हां म्हणती । तुजला सांगतों एक युक्ती । धरोनि चित्तीं जाईं आतां ॥४५॥
शेषाचलीं शेषशयन । प्रत्यक्ष नांदतो लक्ष्मीरमण । तेथें देतों मी पत्र लिहून । मौंजीलग्न होईल ॥४६॥
अमृत शब्द हा मुखें निघाला । येरु मनीं विश्वास पावला । ब्रह्मपुत्र मनीं आनंदला । जातों बोलिला आज्ञेनें ॥४७॥
श्रीविठ्ठलकरें लिहिलें पत्र । श्रीनिवासा तूं या कृत्या स्वतंत्र । आतां वेळ न करितां अणुमात्र । करावें पवित्र विप्रासी ॥४८॥
पत्र घेऊनि त्या वेळां । स्वानंदें पातला शेषाचळा । स्पर्श होतांचि पापा आगळा । पुण्यपुतळा जाहला ॥४९॥
शेषशयन क्षीराब्धिवासी । प्रगटला तेथें हृषीकेशी । व्यंकटेश नाम आलें त्यासी । भक्त अघनासी म्हणोनि ॥५०॥
शेषाचल पर्वतावरी । विप्र येऊनि पत्र दिधलें करीं । पत्र घेऊनियां पुजारी । वृत्तांत निर्धारीं ऐकिला ॥५१॥
पुजारी म्हणती सकळिक । केवळ मूर्ख ते साधुलोक । तीसवर्षांसी मौजी देख । कोण मूर्ख शास्त्री सांगे ॥५२॥
आम्हांसी अमान्य ऐशा गोष्टी । त्यासी धिक्कारिलें उठाउठी । जाऊनि बैसला पुष्करणीतटीं । विप्र हिंपुटी होऊनी ॥५३॥
रात्रीं स्वप्नीं जाऊनि श्रीहरि । निषेधिला आपला पुजारी । म्हणे या विप्राचें येथें सत्वरी । उद्यांचि करी मौंजीलग्न ॥५४॥
सांगें तूं देईं आपली कन्या । सौभाग्यवती त्रिलोकमान्या । भांडार्‍यासी दिली आज्ञा । धन देई प्रज्ञा संतोषवी ॥५५॥
प्रात:काळीं पुरारी उठला । स्त्रीसह मनीं विचार केला । मग विप्रासी शोधूं लागला । जो बैसला पुष्करणीतटीं ॥५६॥
त्यासी आणिलें सन्मानून । आरंभीं केलें मौंजीबंधन । भांडारियानें दिले धन । सोहळा पूर्ण साधिला ॥५७॥
पुजारी कन्या देऊनि विप्राप्रती । विवाह केला अतिप्रीती । पुढें त्या पोटीं कन्यापुत्रा होती । प्रतापी निश्चिती शास्त्रज्ञ ॥५८॥
पुढें गुंडासी येऊनि भेटला । सद्भावें अनुग्रह घेतला । मातापित्यासी आनंद जाहला । तेथेंचि राहिला गुंडापाशीं ॥५९॥
श्रेष्ठीं करितां अंगिकार । उपेक्षिल्या काय क्षुल्लक नर । सर्वांत श्रेष्ठ विश्वंभर । ज्याचा आधार सर्वांसी ॥६०॥
विश्वास धरितां नारायणीं । निर्भय होय तोच प्राणी । विजयकल्याण सर्वस्थानीं । वेदवाणी ऐसी वदे ॥६१॥
एकदां चांडाळ जन जमले । दुर्धर विष अन्नीं घातलें । श्रीगुंडासी अयाचित दिलें । त्यांनीं भक्षिलें नि:शंक ॥६२॥
विष जाळी हृदयकमळ । प्राणांता ऐसी होय जळजळ । सर्वांग विषानें काळें केवळ । अति व्याकुळ गुंडा होती ॥६३॥
जेंवि समुद्र जाळी काळकूट । तें प्राशितां शंकर नीलकंठ । देहाची होळी करी निकट । प्राण शेवट जाऊं पाहे ॥६४॥
शिवासी जाहलें अत्यंत क्लेश । परी रामनामें शमलें विष । तेंवि गुंडा आठवी महेश । भजनीं निर्दोष एकचित्तें ॥६५॥
गुंडा शिवभजन करितां । सर्वही हरली विषव्यथा । सकळही पापासी प्रायश्चित्ता । नामापरता मार्ग नसे ॥६६॥
एकदां भजनासी महाद्वारीं । गुंडा येतां सहपरिवारीं । सामोरें आले तेव्हां श्रीहरी । भजना माझारी नाचती ॥६७॥
जेव्हां गुंडाचें भजन संपलें । भक्तांसह गुंडा राउळीं नेले । महाद्वारींचा महिमा बोलिले । तें वर्णिलें नव जाय ॥६८॥
यशकीर्ति गौरव । द्वारींच तिष्ठती ते सर्व । अष्टमहासिध्दयादि अपूर्व । सर्वही ठेव महाद्वारीं ॥६९॥
महाद्वारींचा पूर्ण महीमा । मुख्य जाणतो माझा नामा । त्वांही जाणूनियां वर्मा । धरिला प्रेमा गुंडोराया ॥७०॥
कोट्यावधि मद्भक्त जन । द्वारीं तिष्ठती अनुदिन । नामयाचे चौदा जण । जडले जाण पायरीतळीं ॥७१॥
निजभक्त सखा चोखामेळ । तोही राहिला नाम्याजवळ । ज्ञानोबाच्या अभंगाचे चरणमूळ । गात घननीळ ऐक तें ॥७२॥

॥ अभंग ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
धन्य धन्य तो तुकाराम । देहासहित जाहला ब्रह्म । पूर्वीं तरला राजा धर्म । कलींत परब्रह्म तुका हा ॥७३॥
ऐसें बोलत तेव्हां गुंडाप्रती । श्रीहरि द्वारापर्यंत येती । द्वारीं भेटली तुकाराममूर्ति । प्रेमें आलिंगिती येरयेरां ॥७४॥
प्रत्यक्ष भेटतां तुकाराम । हारपले द्वैताद्वैत भ्रम । एकाकार होऊनि सप्रेम । सनातन ब्रह्म जाहलें ॥७५॥
नमोनियां तेव्हां घननीळ । ब्रह्मरस मातला तुंबळ । गुंडा गृहासी आले तत्काळ । गात केवळ नामासी ॥७६॥
असो इकडे पुणें नगरीं । कीर्ती पसरली परस्परी । गुंडासाधु असे एक पंढरीं । त्याची थोरी न वर्णवे ॥७७॥
मुख्य पेशवे बाजीराव । राजधानी धनवैभव । ज्याचे अतुल संपत्तीचा गौरव । कीं इंद्रराव दुजा शोभे ॥७८॥
परंपरा पुरुषनामांकित । ब्रह्मवृंदा बहु सन्मानित । पूजोनि धन देती अमित । अभ्यागत तुष्टविती ॥७९॥
याचकासी बहुत मान । वैदिक गर्जती जटाघन । सदा शास्त्रचर्चापुराण । देती धन अगणित ॥८०॥
धर्माधर्मन्यायनीती । दीनांची नाशिती विपत्ति । प्रजा साधन कीर्ति गाती । धर्म आचरिती शास्त्रमतें ॥८१॥
परिपूर्ण काम जाहल्यावीण । कदापि न होय मोक्षसाधन । म्हणोनि पुरुषजन्म घेऊन । पुरुषार्थसाधन करावें ॥८२॥
धर्मअर्थकाममोक्ष । प्राण्यांनीं आचरावें दक्ष । काम सारावा परोक्ष । येणें प्रत्यक्ष धर्म साधे ॥८३॥

श्लोक ॥
धर्मेण हरते व्याधि: । धर्मेण शत्रुनाशनं । धर्मेण हन्यते क्लेशो । यतो धर्मस्ततो जय: ॥१॥
म्हणोनि कर्मचि होय ब्रह्म । हेंचि भगद्वचन उत्तम । हें वर्म जाणोनि सूक्ष्म । वर्तावें धर्म यथान्याय ॥८४॥
असो ऐसा प्रतिवर्षीं । उत्सव होतसे पुण्यासी । गुंडाची वार्ता पेशव्यासी । कळली सभेसी असतां ॥८५॥
जिजाईसी एक पुत्र । अभक्त अधर्मीं अपवित्र । जन्मला नाशक कुळगोत्र । नीति अणुमात्र न देखे जो ॥८६॥
परी जिजाई पुण्यश्लोक । विप्रसाधूठायीं भाविक । गुंडाचा ऐकूनि लौकिक । गेली देख पंढरीसी ॥८७॥
सद्गुरु गुंडासी शरण आली । तेथें बहुत संपत्ति खर्चिली । अनेक आयाचितें दिधलीं । पूर्वीं कथिली कथा सर्व ॥८८॥
त्या जिजाईचा पुत्र जाण । साधूसी देतसे दूषण । म्हणे साधु ते मैंद पूर्ण । हरिती धन लोकांचें ॥८९॥
जनासि लावोनि भक्तिनाद । बुडविती जैसे केवळ मैंद । स्वतां ज्ञानहीन मतिमंद । ऐसा विनोद करी बहू ॥९०॥
माझी माता पंढरीसी गेली । गुंडोबानें मोहिनी टाकिली । संसारा केवळ नागवली । नादीं लागलीं मैंदाच्या ॥९१॥
संत कैचे ते महा जार । कपट नाटकी धनचोर । लोकांचा बुडवूनि संसार । घेती अपार सेवा वरी ॥९२॥
जळेना कां तें सकल । परी आमची माता मूर्ख केवळ । आम्हा भिकेसि लावूनि निवळ । आपण जाईल कोठें नेणो ॥९३॥
ऐसें करोनि बाजीराय । म्हणे काय करावा उपाय । स्वत: पाहिल्यावीण प्रत्यय । खरा न्याय निवडे केंवि ॥९४॥
ऐशा विचारें सेनेसहित । पेशवा पातला पंढरींत । कळस दामोदरें शोभिवंत । लखलखीत झळकती ॥९५॥
पाहत चालिला पंढरीनगर । गगनचुंबित दामोदर । सडका दुकान पेठ बाजार । देवमंदिर बहुसाल ॥९६।"।
सेनेसह बिर्‍हाडीं उतरला । नंतर राउळामाजीं आला । श्रीपांडुरंगरुक्मिणीसी भेटला । पाहूं लागला चमत्कार ॥९७॥
जागोजागी संतभजन । देउळीं दाटले अपार जन । साधुपरीक्षा पाहे पूर्ण । मनीं अभिमान धरुनी ॥९८॥
चित्तशुध्दिवीण केवळ । साधुपरीक्षा कोण करील । मूर्ख वृथा जरी बोलतील । सर्व तें फोल जाणावें ॥९९॥
भक्त कित्येक तेथें वैरागी । कित्येक नागवे कित्येक योगी । कित्येक ज्ञानी नाचती अभंगीं । टाळमृदंगीं नामघोष ॥१००॥
कित्येक वेडे आणि वागडे । कोणी महिमेसाठींच दडे । कोणी उगीच देउळीं पडे । कोणी रडे हरिनामें ॥१॥
ऐसी परीक्षा करीत सर्व । चालिला असतां बाजीराव । महाद्वारीं भजन अपूर्व । पाहिलें तंव गुंडाचें ॥२॥
वीणाचिपळ्या घुंगरु पायीं । शिष्य गजरें नाचती सर्वही । तेथें बैसली होती जिजाई । पहात नवाई भजनाची ॥३॥
भोंवती होती जी कां मंडळी । प्रत्यक्ष भासती गोपाळ गोकुळीं । यमुनातटीं खेळे वनमाळी । ऐशा मेळीं शोभे गुंडा ॥४॥
श्रीगुंडा तीच श्रीकृष्णमूर्ति । शिष्य तेचि गोपाळ शोभती । अद्वैत जाहली सर्वांची स्थिति । लोक पाहती तटस्थ ॥५॥
बाजीराव करोनि विनोद । म्हणे कैसा हा नाचतो मैंद । परीक्षा पाहतां काय आतां शुध्द । कैसा सिध्द आहे तें ॥६॥
तेव्हां द्रव्य आणविलें अपार । गुंडा फिरे जेथें चक्राकार । द्रव्य फेंकूनि म्हणे साचार । पहा चमत्कार आतांची ॥७॥
शिष्यगणावर कृपा करोनी । गुंडा पाहे जेव्हां भजनीं । बाजीराव कष्टी द्रव्य टाकोनी । परी नयनीं कोणी न पाहे ॥८॥
कोणी तेथील द्रव्य न घेती । म्हणोनि बाजीरावास वाटे खंती । गर्वरहित होवोनि चित्तीं । दोषी निश्चिती जाहलों म्हणे ॥९॥
कानीं पडतांचि गुंडाभजन । तटस्थ झाला अभिमानहीन । म्हणे हा जगद्गुरु पूर्ण । नोहे वर्णन याचें कोणा ॥११०॥
म्यां अन्याय केला फार । शब्द बोललों अति कठोर । परीक्षेसी आलों काय पामर । शरण सत्वर जावें आतां ॥११॥
अहाहा कर्म माझें हीन । प्रपंचीं विसरलों आत्मखूण । आतां न जाय हा गुरु सोडून । धरीन चरण एकभावें ॥१२॥
पुढील अध्यायीं कथा रसाळ । बाजीराव होऊनि निर्मळ । धरील श्रीगुंडाचें पदकमळ । श्रोतेहे प्रेमळ ऐका तें ॥१३॥
श्रीनिवासा अघशमना । मायानियंत्या जगजीवना । कृपा करोनि नारायणा । करिसी प्रेरणा सर्वस्वी ॥१४॥
इति श्रीगुंडामाहात्म्य अभिनव । तीस वर्षीं मौंजी केली अपूर्व । गुंडापरीक्षेसी । आला बाजीराव । झाला तंव पूर्ण अष्टादश ॥११५॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥

अध्याय १८ वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP