श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय चवथा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्री गणेशायनम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

स्वस्तिश्री ॐ नमो गणनायका । मंगलनामा भवभयांतका । नमूं शारदा मूळपीठनायिका । वाग्वरदायका ग्रंथारंभीं ॥१॥
नमूं श्री सदुगुरुसर्वेश । प्रत्यगात्मा जो अविनाश । नमूनि स्वामी श्रीनिवास । आरंभ ग्रंथास पैं केला ॥२॥
असो आतां पूर्वाध्यायीं कथन । गुंडा कथेंत वैराग्य घेऊन । रामेश्वरबंडाग्रामीं येऊन । ते बैसले निर्वाणतेलागीं ॥३॥
वैशाखमास अत्युष्ण काळ । सप्तदिन निराहार केवळ । आसनप्रस्तरीं मांडिलें अचळ । ध्याती घननीळ एकनिष्ठ ॥४॥
न घेतां अन्नतोय कांहीं । ऐक्यभावें देहभ्रांति नाहीं । नाम गातां राहिलें तेंही । सर्व दिसे देहीं काष्ठवत्‍ ॥५॥
तंव नारदस्वामी समर्थ । करीं वीणाचि चिपळ्या नाम गात । त्रिलोकसंचार करीर करीत । अकस्मात पातले तेथें ॥६॥
तेव्हां नारद मनीं विचारी । हा गुंडा घोर तप करी । यासि कृपा करावी निर्धारीं । म्हणोनि करीं उठवीत ॥७॥
हस्त फिरवितांचि सर्वांगी । तत्काळ गुंडा उठविला विरागी । साष्टांगनमन नारदालागीं । करोनि वेगीं प्रार्थित ॥८॥
गुंडासी पुसे कमलोद्भवपुत्र । कारे ऐसें वैराग्य स्वतंत्र । धरोनि ध्यान करिसी पवित्र । काय परत्र इच्छिसी तूं ॥९॥
गुंडा म्हणे नारदस्वामी । सर्वांतर्साक्षी आहा तुम्ही । कार्याकार्ययोजना नेणें मी । कृपा नेहमीं इच्छितों ॥१०॥
जपतपध्यानध्येय न कळे । कोठें कैसें करावें हेंही नवळे । कोणा काय मागावें कोण्या वेळे । नेणें सोहळे परमार्थीचे ॥११॥
एकमात्र इच्छा माझे मनीं । सगुणध्येय जो सदाध्यानीं । सद्गुरु पहावा वाटे नयनीं । नाम वदनीं निरंतर ॥१२॥
नारद म्हणे हा प्रत्यक्ष । गुंडा तप करी निरपेक्ष । यासि मंत्र द्यावा अपरोक्ष । परंपरादक्ष आपुला जो ॥१३॥
रामकृष्णहरी । मुकुंदा मुरारी । अच्युत नरहरी । मनें उच्चारी नारायण ॥१४॥
तत्वमसिमहावाक्य त्यास । आणि तत्वबोध केला सावकाश । प्रपंचचि परमार्थ अविनाश । जाणूनि निर्दोष राही वेद ॥१५॥
गुरुपदीं ठेवोनि भाव । सगुण ध्यावें सावयव । स्वसंवेद्य ज्ञानचि स्वयमेव । आत्मभाव धरावा ॥१६॥
आणीक एक आज्ञा असे माझी । भार्या साध्वी वाट पाहे तुझी । गृहीं जावोनी ठेवावी ती राजी । संतसमाजीं येणें पावसी ॥१६॥
जरी वैराग्यें स्त्रीसी देशील त्रास । तेणें योग विघ्न होय दोष । प्रपंचींच परमार्थ साधकास । होय अनायासें जाणावा ॥१८॥
वृध्द झाला तुझा मोक्षगुरु । याच प्रसंगीं तुज सेवाधिकारु । नसतां केंवि पैलपारु । पावसी विचारु करी मनीं ॥१९॥
गुंडा बध्दपाणी करी प्रार्थना । पुरे पुरे ही प्रपंचयातना । कर्मबली दुस्तर सरेना । पुन्हां नारायणां कां वोपिसी ॥२०॥
नको नको आतां प्रपंचवारा । कृपे देई तव चरणीं थारा । दृष्टी देखतां धनसुतदारा । मन दातारा भांबावे ॥२१॥
जळो जळो त्या प्रपंचगोष्टी । स्वार्थकामीं मी किती होऊं कष्टी । मायामोहें झाली दग्धदृष्टी । अभयपृष्ठीं नको मोकलूं ॥२२॥
तेव्हां बोले कमलासनपुत्र । आज मात्र ऐकिलें हें विचित्र । अरे विश्ववेष्टित ईशसूत्र । छेदापात्र तूं भेटलासी ॥२३॥
या मागीं बुडाले मोठमोठे । अद्यापि न लागले कित्येक वाटे । प्रपंच त्यागितां परमार्थ भेटे । बोलणें खोटें सत्यपैं ॥२४॥
अरे मुळीं जवळी दशेंद्रिय । सदा धुंडिती पंचविषय । ते त्यागितांचि अंत होय । मग काय मृत्युमुक्ति ॥२५॥
आत्मा अद्वय जगदाकार । त्रिकालीं शाश्वत एक साचार । जेवि सुवर्णचि होय अलंकार । तेंविनिरंतर अभेद हा ॥२६॥
आत्मा साधी चैतन्यघन । दृश्यभासस्वसंवेद्य ज्ञान । प्रपंचव्यापारही तोचि पूर्ण । परमार्थ जाण विज्ञान तें ॥२७॥
यालागीं करावा विचार मुख्य । तेणें होऊनि हरीसी सख्य । आत्मानात्म पावेल ऐक्य । दृश्य त्रैलोक्य अभेद भासे ॥२८॥
भक्तिज्ञानयोगें तुझी प्रज्ञा । शुंध्द झाली म्हणोनि सुज्ञा । सांगतों ते जरि मानिसी आज्ञा । तरी सिध्दसंज्ञा पावशील ॥२९॥
दृढभाव धरुनि सदुगुरु पायीं । तूं नि:शंक आतां गृहासि जाईं । सुखी करावी भार्या राजाई । या उपायीं सर्व साधे ॥३०॥
गुंडानें नारदाज्ञा वंदिली । तेव्हां ती मूर्ति अंतर्धान पावली । भाविक मंडळी तेथें पातली । अयाचिती आणिली अपूर्व ॥३१॥
आरंभिलें तेथें संतर्पण । पाक करोनि सारिलें भोजन । भोजनोत्तर गुंडा तेथून । स्वग्रामा जाण निघाले ॥३२॥
हळू हळू मार्ग क्रमिती । गुंडा देवपुरासि येती । पाहूनि चूडामणी आनंदती । राजाई सती आणि सासू ॥३३॥
जो कां पूर्वी वृत्तांत वर्तला । तो गुरु चूडामणीसी कथिला । ऐकूनि सद्गुरु आनंद पावला । तो वर्णिला नव जाय ॥३४॥
असो सर्वांसी जाहलें सुख । आनंदें दिवस जाती सुरेख । इतक्यांत राजाबाईसी देख । झाला नि:शंक ऋतुप्राप्त ॥३५॥
ब्रह्मवृंद मिळोनि त्या काला । फलशोभनाचा नेम केला । इष्टसोयरेसमुदाय जमला । सोहळा झाला यथासांग ॥३६॥
वस्त्रप्रावर्ण सोपचार । सर्व आप्त करिती अहेर । भोजनाचा थाट परिकर । घडला मोदकर त्या काळीं ॥३७॥
असो कांहीं दिवस जातां तंव । आला महाशिवरात्री उत्सव । साहित्य देती ग्रामस्थ अपूर्व । साहू सर्व मिळोनि ॥३८॥
ग्रामांतील सर्वही ब्राह्मण । पाक करोनि करिती भोजन । परी जल आणावया लागून । कोणीही जन न जाती ॥३९॥
त्या वर्षीं पर्जन्यवृष्टि अल्प । तेणें जल नसे कोठीं समीप । उद्दालिकासरितेसी मात्र स्वल्प । दूर अमूप डोह होता ॥४०॥
कोणी न मिळे जळ आणावया । वृत्तांत कळला श्रीगुरुराया । सर्व शिष्यांसि आज्ञापिलें त्या समया । परी तें वायां होऊं पाहे ॥४१॥
श्रीगुरुपदगुंडा चुरीत । होते त्यांनी ऐकिली ही मात । स्वयें घागर घेऊनि त्वरित । पाण्या जात सरितेच्या ॥४२॥
पूर्वदिनीं दोनप्रहरांपासून । पाणी अहोरात्र वाहून । गृहीं भरिलें असती आणून । लोभ सोडून देहाचा ॥४३॥
दोन दिवसांचा उपवासी । श्रमही घडले बहू देहासी । परी तत्पर गुरुसेवेसी । संतोष मानसीं मानूनी ॥४४॥
पाणी आणितां दुसरे दिनीं । जाहली दोन प्रहर रजनी । स्वामी बैसले ध्यान सारोनी । भडभड कानीं शब्द आला ॥४५॥
कोणरे म्हणूनि स्वामी पुसती । मी गुंडा आहें म्हणूनि सांगती । परी ग्लानीनें बोल न निघती । बोबडी निश्चिती वळत ॥४६॥
चूडामणि अत्यंत घाबरला । हें कोणीं सांगितलें ह्याला । तत्काळ तैसाचि बैसविला । आपुल्या स्त्रीला पाचारिलें ॥४७॥
म्हणे गुंडासि आणावया पाणी । त्वां धाडिले किंवा दुजें कोणी । हा काय अन्याय आली ग्लानी । केव्हांपासूनि आणितो हा ॥४८॥
गुंडा त्वां भक्षिलें कांहीं । श्रीगुरु पुसतां म्हणे नाहीं । अहा गति कैसी हा हिचा जांवई । आणिकांसी ही पुसेल काय ॥४९॥
धिक्कार असो या प्रपंचासी । जेविला किंवा हा उपवासी । प्रत्यक्ष सासू न पुसे ह्यासी । किंचित्‍ मानसीं खेद वाटे ॥५०॥
तत्काळ गुंडासी जेवूं घातलें । केव्हांपासूनि आणिसी पुसिलें । तेव्हां काल दोन प्रहरांबोले । आरंभिलें आणावया ॥५१॥
श्रीगुरु प्रसन्न जाहलें अंतरीं । वरदहस्त ठेविला गुंडाशिरीं । म्हणती कीर्ति आकल्पवरी । तुझी निर्धारीं होईल ॥५२॥
गुंडा सेवेसी रत अपार । सवड पाहूनि करी व्यापार । सेवा करितां तत्वविचार । नित्यानित्य सार गुरु सांगे ॥५३॥
ऐसां लोटतां बहुत काळ । गुरुसी आली वार्धक्यवेळ । ऐशीं वर्षें वयासि केवळ । परी तपोबळ अंगी दृढ ॥५४॥
नित्य ध्यान करितां साचार । सौम्यरुपें भेटती शंकर । एके दिनीं दिसती भयंकर । विराट शरीर विक्राळ ॥५५॥
पिंगट केश हातीं आयुध । आरक्त नेत्र दिसती सक्रोध । संगें दूत भयानक विविध । हरहर शब्दें गर्जती ॥५६॥
चूडामणि पाहूनि भ्यालें । भो ईशा रुप ऐसें कां धरिलें । म्हणती मीं कधीं नाहीं देखिलें । माझे झाले अपराध काय ॥५७॥
शंकर बोले महोत्सव । उदईक आलें पर्व । तुझ्या स्त्रीस देतों निजवैभव । सौभाग्य अपूर्व मत्पदीं ॥५८॥
ऐसें स्वमुखें बोलोनि स्पष्ट । गुप्त जाहले नीलकंठ । चूडामणि धन्य मानी शेवट । सुख अलोट मनीं वाहे ॥५९॥
ध्यानधारणा सारोनि तत्काळ । स्त्री बोलाविली तेव्हां जवळ । सरला ऋणानुबंध समूळ । मृत्युमूळ तुम्हां म्हणती ॥६०॥
आम्हीही तुम्हांमागें येऊं । दोघें शिवपद सुखें सेवूं । नंतर स्वरुपीं मिळूनि राहूं । निर्वैर घेऊं स्वानंद ॥६१॥
जवळी आला कळतां काळ । मंगलस्नान केली तात्काळ । स्वासिनी बोलाविल्या सकळ । देत सुशील सुपवाण ॥६२॥
गहूं तांदूळ आणि दक्षणा । स्वकरें वांटी सर्वब्राह्मणां । भेटली सर्व इष्टमित्रजनां । कळतां मना खेद करिती ॥६३॥
स्वासिनींसी हरिद्राकुंकुम । देवोनि आपण लावी उत्तम । उपवास केला सप्रेम । जाणोनि वर्म मृत्यूचें ॥६४॥
पूर्वीच ज्वर येत होता थोडा । रात्रीं अधिक जाला उघडा । परी म्हणे मिळो ऐसा जोडा । ध्यास एवढा लागला ॥६५॥
जेव्हां पतीचे पाय चुरी । तेव्हां राजाई गुंडासी विचारी । आज ऐसी कां आई घाबरी । सांगा सत्वरी स्वामी मज ॥६६॥
मीं विचारिलें आईसी सहज । आणि पिताही न सांगे मज । काय नवल घडलें आज । की काय काज दुर्घट तें ॥६७॥
मातापिता एकांती बैसून । गुह्य काय बोलती वर्तमान । कीं नकळे आलें महाविघ्न । ऐसें म्हणून रुदन करी ॥६८॥
तंव गुंडा म्हणे सांगतों ऐकें । होणार ब्रह्मादिकां न चुके । त्या चारवेदही व्यर्थ सखे । तें न ऐके कांही केल्या ॥६९॥
येरु म्हणे उघड सांगा वार्ता । गुंडा बोले सूर्योदय होतां । परलोका जाईल तुझी माता । इष्टसुता सोडोनी ॥७०॥
हें ऐकतां निचेष्टित जाहली । गुंडानीं तेव्हां सावध केली । मातापित्याचें गळां पडली । रडूं लागली अनावर ॥७१॥
मातापिता समजाविती । तुज काय गे न्य़ून घरी शांति । मात्र पतिआज्ञेंत राहीं सती । येणें कीर्ति कुलोध्दार ॥७२॥
जरी अन्यायेंवीण पती गांजी । किंवा तुज दान देवोनि त्यजी । तरीही भ्रतार ठेवावा राई । हेहि तुज माझी विनवणी ॥७३॥
इतुक्यांत जाहला सूर्योदय । जवळी आला मृत्युसमय । साध्वी आठवी पतीचे पाय । पूर्ण उपाय साध्य जेणें ॥७४॥
प्रथम येतांचि उचकी । मुखीं रामराम शब्द घोकी । ध्यानीं पतिमूर्ति विलोकी । गेली परलोकीं तेधवां ॥७५॥
पुधें श्रीगुरु एकवर्ष साचार । गुंडासि बोधती तत्वविचार । ती कथा आयका श्रोते सादर । श्रवणें उध्दारकारक जें ॥७६॥
श्रीगुरुपत्नी लक्ष्मीबाई । परंधामा गेली म्हणोनी आई । खेद करितसे कन्या राजाई । नसें कोठेंही समाधान ॥७७॥
एकदां श्रीगुरु केले शयन । गुंडा करिती पादमर्दन । राजाईही चुरी पित्यालागून । माते स्मरुन स्फुंदत ॥७८॥
चूडामणी म्हणे ऐक गे माय । होणार कोणासी टळेल काय । मग त्याचें दु:खही व्यर्थ जाय । नाहीं उपाय यासि कांहीं ॥७९॥
गुंडा म्हणे हें सर्वासीहि कळे । परी कळोनि कां होती आंधळे । चूडामणि म्हणे मोहमळें । अज्ञानजाळें उकलेना ॥८०॥
गुंडा म्हणे बरी ही संधी । विश्रांत एकांत असे अवधी । जाणोनि म्हणे ही अनादि व्याधी । ठरली प्रसिध्दि अनिवार ॥८१॥
ज्या अर्थी जें अनिवार ठरलें । मग तेथें कोणाचें काय चाले । सुरासुर जेथें हात टेंकिले । इतर राहिले सहजची ॥८२॥
श्रीगुरु म्हणती यासी एक । उपाय तो मुख्य विचार देख । या विचारें तरले कित्येक । नाहीं आणिक वज्र यातें ॥८३॥
गुंडा म्हणे वो सदुगुरुनाथा । आतां सवड असे कीं समर्था । कृपे वदोनियां परमार्था । लावावें पंथा आपुलिया ॥८४॥
प्रसन्न होऊनि श्रीगुरुराणा । म्हणती आयिक परमार्थ खुणा । आधीं वदूं देहविटंबना । मग जाणा तत्वबोध ॥८५॥
अरे हा औटहस्त अमंगळ । देह कीं स्वप्नींचें मृगजळ । अस्थिमांसत्वचानाडी केवळ । रोम समूह भरियेले ॥८६॥
रक्तरेतमज्जालाळमूत्र । किती तरी असे हा अपवित्र । वरीवरीच दिसे हा पवित्र । परी कुपात्र असे कीं ॥८७॥
पितृरेत आणि मातारक्त । मिळोनि उत्पत्ति याची अयुक्त । त्यातें मूर्ख जन मानोनि युक्त । होती सक्त त्याचिठाईं ॥८८॥
जेवीं नरकीं जन्मले किडे । त्यांतें तो नरकचि आवडे । तेवीं ज्याचि उत्पत्ती ज्यांत घडे । त्यासाठी रडे भोग इच्छें ॥८९॥
सर्व गात्रांत श्रेष्ठ वदन । तें केवळ श्लेष्मदुर्गंधी स्थान । गुद गुह्य कर्ण आणि नयन । झिरपती जाण वेळवेळां ॥९०॥
जें कृमिकिटकांचे माहेर । केवळ दुर्गंधीची खाणी निर्धार । प्रत्यक्ष नाशिवंत कीं साचार । प्रेम अपार मूढासि त्या ॥९१॥
जो काल देहस्थ प्राणासि गांठी । तो कालचि मोहप्रतिष्ठा मोठी । परस्पर दोघांसि होतां तुटी । त्यागिती काष्ठी मृत्तिकेंत ॥९२॥
जेवीं मृगजळ खोटें असोनि । तेवीं भूताकृतीही दिसोनी । मिथ्या मोह याचा मूळापासोनी । असोनि नसोनि सारिखाचि ॥९३॥
स्वप्नीं प्रत्यक्ष जेवीं वस्तू दिसे । तेवीं जागृतींत हे नेत्रा भासे । दिसोनी स्वप्नीं तें खोटे जैसें । दिसोनि असे तैसें हें मिथ्या ॥९४॥
असो ऐसा स्थूलदेह अमंगळ । दिसोनि प्रत्यक्ष खोटा केवळ । आतां आयका सूक्ष्म जो चंचळ । संकल्पमूळ जेथोनी ॥९५॥
मन चिंतिल्या ऐसें न होतां । तें अधिकाधिकचि पावे व्यथा । नेणें कोठें कैसी सुखवार्ता । हिंपुटी सर्वथा क्षणोक्षणीं ॥९६॥
स्त्रीस्वार्थधनकणसुखासाठीं । अविचारें लोकां बुडवी हठीं । सुखाचें स्थळ नेणोनि शेवटीं । होय कष्टी वृथाचि ॥९७॥
अहा कैसी कर्मगती विचित्र । नर कैसा असेना सत्पात्र । त्यातें मोह बुडवी अपवित्र । जें केवळ मूत्र नरकस्थान ॥९८॥
धन्यधन्य तो मदनराजां । किती कुश्चळस्थानीं ज्याची मौजा । ठकविलें देवऋष्यादिद्विजां । तेथे मनुजा पाड काय ॥९९॥
पशूतें योग्य विषयप्रसंग । कारण त्यांना अज्ञान अभंग । साठीं जाहला अनावर अनंग । म्हणोनि संग उघडा त्यांचा ॥१००॥
तैसा अज्ञानी नोहे हा नर । त्यासी कळे कृत्याकृत्य विचार । म्हणोनि न करी कोणासमोर । लपोनि चोर विषयभोगी ॥१॥
सर्व योनींत नरदेहजन्म । श्रेष्ठ असे ज्ञाता उत्तम । तोचि जरी करितो पशूसम । मग अधम कां नोहे ॥२॥
कळोनि जो प्रवर्ते अविचारा । मग काय म्हणांवे त्या खरा । निर्दोष तो मूढ पशू बरा । ज्ञात्या पामरा द्विगुणनरक ॥३॥
श्रेष्ठत्व पशूसी संग्रह नाहीं । ज्ञाता भ्रष्टला स्वार्थ संग्रहीं । मानवाहून तो उत्तम पाही । पशु भारवाही मानावा ॥४॥
पशु तरी तो मुळीं अयोग्य । परी नरासी विचार योग्य । ज्याची करणी ती केल्यास भाग्य । तत्वें जें भोग्य भोगावें ॥५॥
मी कोण कैंचा कोठून आलों । कोण्या कृत्यें नरजन्म पावलों । पुढे कोठे जाईन जर मी गेलों । काय विसरलों काय करुं ॥६॥
जरी देहलोभ मानूं खरा । मृत्यु होतां नेती त्वरा । देहासाठीं या प्रपंचजोजारा । झुरावें दारापुत्रालागीं ॥७॥
जरी प्रपंची कांहीं दु:ख होतां । देह त्यागिती पाहतां पाहतां । वाटे स्त्रीसुतादि ममता । संकट येतां त्यांतें त्यागिती ॥८॥
धनलोभ खरा मानावा जरी । संकटखालीं खर्चिती विचारीं । लोभ म्हणूं त्या प्राणावरी । तेही तरी त्यागी ॥९॥
जरी मनबुध्दीचें असे प्रेम । त्यागिताती त्यांचे धर्म । एवंच सर्वही प्रेम निष्काम । खरें ते वर्म आत्मा प्रिय ॥११०॥
आत्म्याचें रुप असे आनंद । बोलती सकळ पुराण वेद । लोभाचा नेणूनि पूर्ण बोध । धुंडिती मंद प्रपंचात ॥११॥
प्रपंची कोणी मानील सुख । तो जाणावा केवळ मूर्ख । जेविं अमृतेच्छें प्यावें विख । तेंविं दु:ख घे सुख इच्छें ॥१२॥
सुख पुसावें मातापित्यांप्रती । तेही स्त्रीधनप्रपंची गोंविती । पंडित सविधी कर्म म्हणती । जपतप निश्चिती यज्ञदान ॥१३॥
कोणी म्हणती प्रपंची त्रास । मानूनी रक्षा लावा अंगास । मनें वर्तूनी सदा उदास । अरण्यवास निराहारीं ॥१४॥
कोणी म्हणती पुराणस्तोत्र । व्रतें उद्यापनें तीर्थें पवित्र । सगुणनिर्गुणदेवमंत्र । यंत्रमंत्र अमुक बरें ॥१५॥
जाखया जोखाया यक्षिणी भूत । जारणमारण अथर्वणांत । सर्व कार्य साधे कोणी म्हणत । परी व्यर्थ हा सर्व शीण ॥१६॥
कोणी म्हणती सुखाचा उद्योग । मुख करावा तो हटयोग । मुद्रासाधनीं सर्व ते भोग । ज्योतिष्य चांग कोणी म्हणे ॥१७॥
शास्त्रवैदिकीं वैद्यक लीलावती । कोणी रमलचि बरें म्हणती । व्यापार चाकरी गाणें बोलती । परी हे संगति सुखाचि नव्हे ॥१८॥
प्रत्येक साधनी असे कांहीं दु:ख । तेथें तिळही नाहीं खरें सुख । साधन साधिल्याही नाहीं हरिख । समुद्रीं शंख प्राप्त जेंवि ॥१९॥
विषलाभ क्षीराब्धिमंथनीं । तो खरा लाभ काय पुण्यजनीं । तेंविं अनेक कष्ट करोनी । परिणाम साधनीं इष्ट नसें ॥१२०॥
सुख स्वार्थइच्छे साधन कांहीं । करोनी साधावें सामर्थ्य पाहीं । कोणा शापितां क्रोधें सर्वही । जाय लवलाहीं संचय ॥२१॥
कर्मविहित किंचित चुकतां । निर्फळ होऊनि पापचि माथां । जपतपयज्ञा विघ्नें तत्वतां । येती सर्वथा बुडवाया ॥२२॥
कांहीं धर्म करावा कीर्तीसाठीं । कर्णबळी ऐसी गति शेवटीं । भिक्षा मागतां अनर्थ कोटी । येती हठ्ठी मागोमाग ॥२३॥
जरी करावा अरण्यवास । किंवा निराहार अति आयास । व्रत उद्यापनादि सायास । होय त्रास सुख कैचें ॥२४॥
सुखसाधन शास्त्रपुराण । तरी जन्मवरी कष्ट घोकून । विद्येचा अंत न लागे पूर्ण । वैदिकीं किंवा वैद्यग्रंथी ॥२५॥
करावे जरी कां स्त्रोत्रपाठ । एक शब्द जातां होय सपाट । जन्मवरी फिरतां तीर्थमठ । नुसते कष्ट त्याचे माथां ॥२६॥
अनेक साधनादि प्रयोग । कीं मुद्रासाधन हठयोग । त्यांत लाभ शुध्द श्रमभोग । नाहीं उपयोग सुखाचा ॥२७॥
जारणमारणजंत्रयंत्र । भूतयक्षिणीभैरवमंत्र । चुकतांचि एक अक्षरमात्र । साधन अपवित्र घातक ॥२८॥
एवंच सुखासाठी तळमळ । परी तें दु:खदायक केवळ । कोण्याही साधनीं न्यून समूळ । व्यर्थ काळ घालविणें ॥२९॥
प्रपंच दु:खकारक ठरला । आग लागो क्षणिक सुखाला । जन्मवरी जरी प्रपंच केला । अंतीं एकला जातसे ॥१३०॥
साधन करितां वर्म जाणून । स्वानुसंधानीं न पडे न्यून । मागें लागे वैराग्यभक्तिज्ञान । दिसे चिद्घन अद्वय एक ॥३१॥
सारांश आत्मज्ञानावीण कांही । अन्य साधनीं सुखलेश नाहीं । म्हणोनी करावा विचार पाही । आधीं सर्वही ज्ञात्यानें ॥३२॥
शास्त्रदृष्टी नंतर गुरुबोध । मग आत्मनिश्चय होय शुध्द । अन्यसाधनें केल्या अगाध । न लागे शोध स्वसुखाचा ॥३३॥
गुंडा म्हणे जी श्रीगुरुराया । सर्वसाधनेंहीं पोकळ वाया । कळलें परी तरावया माया । कोण्या उपाया प्रवर्तावे ॥३४॥
आतां ऐका तुम्ही श्रोते । यथोक्त याचें उत्तर गुंडातें । पुढील अध्यायीं सांख्यमतें । देतील तें श्रीगुरु ॥३५॥
गुंडासी नारदोपदेश । गुरुसेवे लाधला बोधविशेष । कथूनी निर्याण गुरुपत्नीस । चतुर्थ्याध्यायास संपविलें ॥१३६॥

॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय ४ था समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 13, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP