मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीगुंडामाहात्म्य| अध्याय बारावा श्रीगुंडामाहात्म्य अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय बारावा प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : gunda mahatmyaगुंडा माहात्म्य अध्याय बारावा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशायनम: ॥ श्री गुरवे नम: ॥ॐ नमोजी निर्गुणगणेशा । मंगलधामा पूर्णपरेशा । ग्रंथारंभीं तुज सगुण ईशा । गातों अविनाशा निर्विघ्न ॥१॥वेदोक्त ज्याचें स्तवन करितां । तोचि असे शारदामाता । वाग्वरद सद्गुरु पिता । साह्य आतां व्हावें ग्रंथा ॥२॥श्रीशंकरस्वामी जगद्गुरु । तोचि तूं होसी गुंडावतारु । अनंतरुपें जड जीव तारु । महीवरु नारायणा ॥३॥तुझे गुण गातां उल्हास मना । होय परी तूं अगम्य स्तवना । जेथें शेषाची द्विखंड रसना । तेथें मज जाणा पाड काय ॥४॥म्हणूनि तूं जिव्हाग्रीं बैसावें । तुझें स्तवन तूंचि करावें । सत्यत्वें या जडानें काय गावें । तुझें त्वांचि वदावे हेंचि सत्य ॥५॥असो आतां पूर्वानुसंधान । एकादशाध्यायीं जाहलें वर्णन । तारिली गुंडानें महाजारीण । कीर्ति गहन गाती लोक ॥६॥राजाईसह गुंडासमर्थ । गुप्त जाहले अकस्मात तेथ । जनदृष्टि चुकवूनि यथार्थ । धरी पंथ अरण्याचा ॥७॥जात असतां भयानक । पुढें अरण्य लागलें एक । वृक्ष सघन पशु अनेक । व्याघ्रजंबूक किंकाळती ॥८॥गगनचुंबित वृक्ष मोठे । मार्ग नसूनि पसरले कांटे । सूर्याच्छादित आडवे फांटे । वाट न फुटे चालावया ॥९॥ऐशा कठिण पंथा क्रमिलें । ओसगांव तेथें लागलें । चहूंकडे तृण मातलें । फिरूं लागले महाव्याळ ॥१०॥श्रीराम जाता लंकेकडें । जेथें राहिले दिवस थोडे । शिवलिंग स्थापिलें एकीकडे । कल्लोळ पुढें निर्मिला ॥११॥राम स्थापित म्हणोनि अव्यंग । त्याचें नाम ठेविलें रामलिंग । शिवरात्रीं पूजितां यथासांग । सर्व भवसंग दूर होती ॥१२॥श्रीरामें तेथे केला वास । म्हणोनि रामपूर म्हणती त्यास । तप करितां सकल मानस । अनायासें पूर्ण होती ॥१३॥अतिरम्य शिवाचें स्थान । प्राण्या आरोग्य तीर्थ जीवन । अद्यापि अनुभविती सकल जन । शिवदर्शनमात्रें घडे ॥१४॥आत्म तपें होय शिवभेट । परी गमना अरण्य दुर्घट । अद्यापि भयानक विकट । प्राणी एकटा राहूं न शके ॥१५॥दुर्घट चालोनि ऐसा पंथ । गुंडा गेले अकस्मात तेथ । जाणोनि शिवमहिमा अद्भुत । कांतेसहित राहिले ॥१६॥सर्व साधनांत श्रेष्ठ साधन । परमार्थ साधावा हें प्रमाण । परमार्थ असे ज्ञानाधीन । सत्संगावीण ज्ञान नोहे ॥१७॥कोणासी नावडे चालू खोटी । म्हणोनि धरावी उत्तम राहटी । स्वधर्मकर्मे वागतां शेवटीं । भेटे जगजेठी तत्काळ ॥१८॥म्हणोनि गुंडा करिती नेम । ब्राह्मणकुळीं आपुला जन्म । यालागीं करावें ब्रह्मकर्म । जानोनि वर्म यथासांग ॥१९॥उठोनियां प्रात:काळीं । कांतेसह स्नान केलें कल्लोळीं । रामलिंग पूजिलें बिल्वदळीं । चंद्रमोळी अतिहर्षें ॥२०॥मन:कल्पित सकलोपचार । धूपदीपनैवेद्य रुचिर । पुष्पांजलि वाहोनि नंतर । स्तविला शंकर सप्रेमें ॥२१॥घेवोनि शालिग्रामतीर्थ । दोघेंही ध्यानीं बैसली तेथ । हारपला देहभाव यथार्थ । सद्गुरु समर्थ ध्यायिला ॥२२॥हृदयस्वानंद सिंहासनीं । एकाग्रचित्तें विवेकासनीं । चिन्मय सद्गुरु वरी स्थापोनि । अद्वयपणीं आठवीत ॥२३॥अभेदभक्ति अर्पिलें वस्त्र । सोहंभावाचें चंदन पवित्र । स्वानुसंधान अक्षता स्वतंत्र । त्रिगुणी बिल्वपत्र वाहिलें ॥२४॥हरिद्राचूर्ण मायामोहादिक । ममत्व कुंकुम सौभाग्यदायक । नानापरिमळ भेद अनेक । सुमनें देख वाहातसे ॥२५॥अज्ञानवृत्ति ओंवाळी धूप । लावूनि चिन्मयज्ञानदीप । एकारती केली प्रत्यग्रूप । नैवेद्य संकल्प सर्वस्वाचा ॥२६॥अष्टभाव आणि ज्ञानाज्ञान । त्रिगुणासहित ते मिळून । त्रयोदश गुणी विडा लावून । केला अर्पण सद्गुरुसी ॥२७॥पंचप्राण आणि दशेंद्रिय । मनबुध्दि सप्तदश होय । वाती भिजविल्या घृतीं नि:संशय । उजळी निर्भय चिदारती ॥२८॥वाहिली ब्रह्मास्मि पुष्पांजळी । निर्विकल्प ध्यान धरिलें त्या काळीं । अभेदसद्गुरु हृदयकमळीं । पूजिला समूळीं ऐशापरी ॥२९॥मुखीं राकमृष्ण हरे । गाती मुकुंदा मुरारे । अच्युता नरहरे । नारायण स्मरे सदा ॥३०॥येणें जरी पातला काळ । तरी देहस्मृति न राहे केवळ । ऐसें धरिलें धैर्य अचळ । क्षुधा तळमळ मग कैंची ॥३१॥एक यामिनी एक दिन । चळलें नाहीं दोघांचे आसन । भजनीं गोडी अमृताहून । देहभान विसरले ॥३२॥कुलस्वामी श्रीगुरुमूर्ति । अखंड धरिली तीच चित्तीं । दिसे भासे वस्तु पुढती । अद्वयस्थिती जाहली ॥३३॥ब्रह्ममय हें चराचर । ऐशी ज्याई असे मति स्थिर । तोचि जाणावा श्रीशंकर । नसे अंतर यांत कांहीं ॥३४॥असो नंतर तिसरे दिनीं । राजाई व्यापिली क्षुधें करुनी । गलित पत्रें आणिलीं वेचूनी । ठेवी भिजवूनि जळांत ॥३५॥त्याचा वाटूनि गोळा केला । नैवेद्यासी पुढें ठेविला । गुंडानें तो नयनीं पाहिला । म्हणे कां केला प्रयास हा ॥३६॥आमुची क्षुधेची वेळ । जरी राखील तो घननीळ । तरी अयाचित देऊनि निर्मळ । पंक्तीसी केवळ बैसेल ॥३७॥ऐसें स्त्रीसी बोलूनि पुढती । पुन्हां लाविली नेत्रपातीं । तें पाहूनि राजाई सती । बैसली प्रीति ध्यानस्थ ॥३८॥ऐसा संपतां तृतीय दिन । गुंडा भजनीं होते निमग्न । तंव रजनीमाजी विपरीत चिन्ह । केलें उत्पन्न अघोर ईशें ॥३९॥देवालयीं शिवलिंगापुढें । दोघेही बैसले ध्यानीं उघडे । महाभुजंग धांवत वांकडे । गुंडाकडे येत तेव्हां ॥४०॥शिवालयीं विशाळ प्रतिध्वनी । सर्प गर्जनेची नमाये तेक्षणीं । राजाई वदे घाबरी होवोनी । कैसी करणी दुर्घटही ॥४१॥भुजंग पाहूनि अत्यद्भुत । सती विचार करी मनांत । डंकील प्राणनाथा जरी येथ । तरी अनर्थ होय कीं ॥४२॥आतां काय करावें म्हणोनि । राजाई व्याकुळ होतसे मनीं । म्हणे धांवगा चक्रपाणी । या संकटांतूनी रक्षावें ॥४३॥जयजय कृष्णा रुक्मिणीवरा । दाशरथे रामा सीताप्रियकरा । माझी करुणा येऊं दे दातारा । सौभाग्य श्रीधरा मज देईं ॥४४॥हा काळरुपी महाव्याळ । जवळी येतो टाकित गरळ । माझा सौभाग्यसिंधु हा समूळ । ग्रासूं पातला ॥४५॥तूं शेषशायी जगजेठी । मजवरी करीं कृपादृष्टी । माझे अपराध घालूनि पोटीं । धांव संकटीं त्वरें आतां ॥४६॥न डंकितां मद्भ्रतारास । मम तनूचा करी ना कां ग्रास । पतिदेखत मरण स्त्रियांस । पुण्य़ विशेष शास्त्र वदे ॥४७॥यदर्थी तूं करोनि कृपा । मज डंकीरे भुजंगा बापा । राजाईनें प्रार्थिलें महासर्पा । भो शिवरुपा म्हणूनि ॥४८॥तंव गुंडा नेत्र उघडून । पहातां महासर्प ये धांवून । परी गुंडा न सोडी आसन । निर्भय पूर्ण बैसला ॥४९॥म्हणे तूं जगद्गुरु जगदुध्दर । हें रुप कां धरिलें भयंकर । आम्ही जीवदशें लोभी पामर । भ्यावें विचार करुनि हा ॥५०॥भेडविसी येणें गमे बहुधां । तुज लागली असेल क्षुधा । तरी माझा ग्रास करीं मुकुंदा । तृप्त एकदां होय आतां ॥५१॥हा अमंगळ देह नि:शंक । कारणीं लागतां याचें सार्थक । शरीर नाशिवंत हें नियामक । व्यर्थ कौतुक काय याचें ॥५२॥ही षड्रिपूंची केवळ मिरासी । कृतांतकाळाची असे कृषी । कीं हे प्रमादमोहाची फासी । उपाधी यासी अनेक ॥५३॥सर्वसृष्टीचा धाक शरीरीं । यासी आप्तगण गोतवैरी । परी निदानीं घालिती बाहेरी । कठोर अंतरीं होवोनि ॥५४॥तूं महासमर्थ शेषावतार । त्वां घेतला शिरीं धराभार । कष्टला अससी येणें साचार । वायु आहार सेवोनि ॥५५॥गुंडा म्हणे मज भक्षावें । तुम्हीं अविलंबें तृप्त व्हावें । ह्या देहाकारणीं लावावें । मनोभावें इच्छा हेचि ॥५६॥विषधरें ऐसा शब्द ऐकिला । क्षणैक स्थिर उभा राहिला । वाक्यनंदें डोलूं लागला । फिरोनि गेला तत्क्षणीं ॥५७॥यावरी गुंडा पाहे विचारोनी । अभिनव लीला ही चक्रपाणी । मायारुपें गेला दावूनी । अघटित करणी केली हो ॥५८॥अहा हीन हें प्राक्तन चरित्र । प्रत्यक्ष न भेटे वारिजनेत्र । बहुतेक भक्तांसी दाविलें वक्त्र । झालासी मित्र श्रीधरा ॥५९॥धन्यधन्य हे चोखामेळ्या । तुझ्या गृहीं वाहिल्या मोळ्या । रोहिदास सांवत्या माळ्या । तुझ्या मळ्या खुरपिलें कीं ॥६०॥धन्य जनी गोरा कुंभार । एकनाथस्वामी पैठणकर । भानुदासासि महाथोर । केला उध्दार कृपासिंधु ॥६१॥तुकाराम बळी यथार्थ । ज्ञानेश्वर हे महासमर्थ । जगमित्र नागा जीवन्मुक्त । दामाजीपंत दानशूर ॥६२॥ऐसे तुझे भक्त वर्णूं किती । त्यांसी भेटलासी जगत्पती । मी अनाथ दीन हे काकुळती । धांव एकांतीं या वेळीं ॥६३॥पूर्वीं मालूच्या सनदेची टीका । त्वांचि रचिली कीं जगन्नायका । सद्गुरु पूर्णबोधा ज्ञानार्का । पाजीं साधकां बोधामृत ॥६४॥प्रत्यक्ष भूवरी जें कां वैकुंठ । केवळ संतसज्जनाचें मूळपीठ । पुंडलिकासाठीं घेऊनि वीट । उभा नीट करकटीं ॥६५॥रुसोन आलासी रुक्मिणीवरी । डिंडिर वनीं वसविली पंढरी । पुंडलिकवरदा तुज श्रीहरी । प्रार्थूनि सुंदरी उभी केली ॥६६॥हरि उभा तेंचि जग उभें । मायेवीण जगकृत्य न लाभे । माया जड प्रभुवीण न शोभे । म्हणूनि लाभें विलास केला ॥६७॥बहुस्यां प्रजायेत । मी बहू होईन प्रभु हेत । हेचि माया जाहली निर्मित । देवदेवीं निश्चित या नांवें ॥६८॥देवदेवीं एक मूळठायीं । म्हणोनि भजनारंभ समयीं । जयजय विठोबारखुमाई । गुंडा गाई स्वानंदभरें ॥६९॥गुरुपीठिकेवरुनिहो नेम । भजनमाळिके गाती प्रथम । म्हणोनि गुंडाजाणोनि वर्म । गात नाम विठोबारुखमाई ॥७०॥नंतर मालोपंताचें पद । गुंडा गातसे अर्थीं अभेद । ज्यायोगें पावे अखंडानंद । तल्लिन शुध्द होऊनी ॥७१॥॥ भजन ॥ जयजय विठोबारुखमाई । जयजयविठोबा ॥॥ अभंग ॥येगा भीमातट दिगंबराये । कळवळोनी ॥प्रेमप्रीती श्रीविठ्ठला आलिंगन मज दे ॥ विठोबा रे आलिंगन० पंढरिराया० ॥१॥आठवसी मनीं नयनीं सांवळें रुप तुझें पाहीन ॥न विसंबे जीवीं अंतरीं तुजला धरोनियां राहीन । विठोबारे० ॥ पंढरिराया० ॥१॥आठवसी मनीं नयनीं सांवळें रुप तुझें पाहीन ॥न विसंबे जीवीं अंतरीं तुजला धरोनियां राहीन । विठोबारे० ॥ पंढरिराया० ॥२॥मीनशेंफरीपरी तळमळीत ॥ तुझी प्राप्ती कधीं लाहीन ॥मघमघीत मोदहृदयकमळ माझें । तेंही तुजला वाहीन ॥ विठोबारे० ॥ पंढरीराया० ॥३॥क्षणभरी परी मज विसर न पडे काय मी करुं यासी ॥अचेतनतनतन्मय हें मन । गुंतलें तुजपाशीं । विठोबारे० ॥ पंढरीराया० ॥४॥चकोरचंद्राकडे लक्षीतसे तेवि वाट मी पाहे दासी ॥हृदय उलों पाहे वियोग न साहे कठीण कां झालासी ॥ विठाबारे० ॥ पंढरीराया० ॥५॥प्राणाचा तूं प्राण आत्माराम । भेटे खंतुनी वाट पाहे ॥पांडुरंगा तुज वांचोनि न गमे । नयनीं नीर वाहे ॥ विठोबारे० ॥ पंढरीराया० ।६॥उदास न करी सखया श्रीहरी । ग्लांनि तूं पाहे पाहे ॥तुजवांचोनि सखा सोयरा आणिक । मालूसी कोण आहे । विठोबारे० ॥ पंढरीराया० । भीमातट दिगांबरा ये ॥७॥तृतीय रजनीमाजी अभंग । गुंडानें गायिला यथासांग । सद्गद कंठ रोमांचित अंग । वियोगें भंग प्राण होय ॥७२॥सगुणदर्शण इंद्रिय ओढी । जिव्हेसी जडली नामगोडी । अनिवार मनाची मोडी । घेतां आवडी पांडुरंगीं ॥७३॥सांडोनि देहगेहाची आस । एकांतीं बैसले सावकाश । प्राप्त झाला चतुर्थ दिवस । चढतां उल्हास भजनासी ॥७४॥औटपीठ हे पंढरी प्रत्यक्ष । पांडुरंग राज्य करितो दक्ष । गुंडा गातसे निरपेक्ष । हृदीं अपरोक्ष सर्वसाक्षी ॥७५॥भजन । जयजय पंढरीनाथ पंढरि ॥ जयजय पं० ॥जयजय पंढरिनाथ पंढरि । ऐसें भजन गर्जतां गजरीं । मध्यान्हें संधि येतां तमारी । पातला हरि व्याघ्ररुपें ॥७६॥तेथें दरीमाजी जवळी । भयंकर दिली आरोळी । धाकेंचि ते श्वापदें सकळीं । पळाले त्यावेळीं वनोवनीं ॥७७॥हरिणी होत्या ज्या गर्भिणी । त्यांचे गर्भ गळाले तत्क्षणीं । कित्येक गतप्राण भयेंकरुनि । कोणी चरफडोनी प्राण देती ॥७८॥असो पर्वतदरींतून व्याघ्र । विशाळ माथा क्रोधें हाले । रागानें पुच्छ उभें केलें । हाकेनें गर्जलें अंबर ॥८०॥तेव्हां गुंडा धरोनि धैर्य । हस्त जोडोनि विनवी निर्भय । दाशरथे रामा आलासी काय । दर्शन अभय द्यावे दासा ॥८१॥किंवा आलासी ज्या कार्यासाठीं । तें त्वरें सिद्ध करी जगजेठी । हें शरीर दोघांचें घालावें पोटीं । नैवेद्य शेवटीं अर्पितों हा ॥८१॥आमुचें भक्षोनि कलेवर । शांत व्हावेंजी सत्वर । चरणीं ठाव देईं निरंतर । मागणें सार हेंचि आम्हां ॥८३॥माझे सहस्त्रावधि अपराध । पोटीं घालावे तुवां प्रसिध्द । रात्रंदिन मजला वेध । कीर्ति अगाध रामा तुझी ॥८४॥वाटेल तुझ्या रुपा मीं भ्यावें । भयेंचि गृहासि पळोनि जावें । तंव कृपें सत्य जाणावें । काय मीं पळावें आश्चर्य हें ॥८५॥तंव होता व्याघ्र जो सन्मुख । अदृश्य जाहला तत्काळ देख । तंव गुंडासी अत्यंत दु:ख । जाहलें विख अमृतीं जेंवि ॥८६॥असो जेंवि रणीं निघाला शूर । तो चिंता न ठेवी पुढें होणार । तेंवि गुंडा धैर्यवंत वीर । प्रताप गंभीर ढळेना ॥८७॥केशवादि जें दशनाम । भवतारक विसांवा परम । म्हणोनि गुंडा गातसे सप्रेम । अभंगीं प्रथम तें ऐका ॥८८॥केशवमाधवविठ्ठलारे । भो मुकुंदा मुरारे । रामकृष्णगोविंद निर्धारे । नारायण दशनाम ॥८९॥प्रभो तूं सगुणविराटमूर्ति । जेकां दाविली अर्जुनाप्रति । ते मी पाहूं इच्छितों जगत्पति । दावी एकांतीं सत्वर आतां ॥९०॥अर्जुनासाठीं सगुण झालासी । मग माझा कां अव्हेर करिसी । पुंडलिकास्तव उभा राहसी । कष्ट पावसी भक्तांसाठीं ॥९१॥पूर्वी अभंग जे तुकाराम । सगुण भेटीस्तव गात सप्रेम । तेचि गुंडा येथें सानुक्रम । गातसे नि:सीम भक्तीनें ॥९२॥आर्या ॥ अपराधिनमपराधिनमराधिनमर्भकं रघूत्तंस । पालय पालय पालय जननिश्रीरामनाथये किंचित् ॥१॥भजन ॥केशव, माधव, विठ्ठल, मुकुंद, मुरारे, रामकृष्ण, गोविंद, नारायण, हरे ॥२॥अभंग ॥सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटावरी ठेवोनियां ॥करक० ॥१॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥कं० कौ० ॥२॥गळां तुळशीहार कासे पितांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ आवडे० ॥३॥तुका म्हणे माझें हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥ पाहीन० ॥४॥रामकृष्णा हरी मुकांदा मुरारी । अच्युता नरहरी नारायणा ॥ऐसा चतुर्थ दिवस लोटला । पुढे पंचम दिन उगवला । सर्वेंद्रियांचा गोळा वळला । प्राण झाला कासावीस ॥९३॥गो नाम इंद्रियें विशद । विंद म्हणजे रमविणार शुध्द । यासाठीं गोविंद राम गोविंद । गुंडा गात पद जय जयकारें ॥९४॥भजन ॥ जयजय गोविंद राम गोविंद । जयजय गोविंद राम गोविंद ॥गुंडा न सोडितां पूर्वासन । एकाग्र मने करितसे भजन । श्रीहरिपदीं तन मन धन । वदे अर्पोन अभंग हा ॥९५॥अभंग ॥सांडोनियां सर्व आशा संसाराची । पंढरी पाह्याची आशा फार ॥ पंढरी० ॥१॥ रामाकृष्णा ॥सांडूनियां सर्व धनमान देवा । म्यांही केला हेवा हरिभक्तांचा ॥ म्यांही के० ॥ रामाकृष्णा ॥घेतलेंसे सोंग आहे तुज लाज । माझें सर्व ओझें तुजवरी ॥ माझें सर्व० ॥३॥ रामाकृष्णा ॥तुझ्या नामें भक्त तरले अपार । तरेन साचार गुंडा म्हणे ॥ तरेन० ॥४॥ रामाकृष्णा ॥सांडोनियां संसार आशा । भेटूं इच्छी गुंडा जगदीशा । अभंगीं म्हणे धांव सर्वेशा । त्वरें अविनाशा भेट देई ॥९६॥सोडूनि प्रपंचाची लज्जा । आशा धरिली भेटीची तुझ्या । धांव धांव गा गरुडध्वजा । प्रार्थनेसी माझ्या ठाव देई ॥९७॥भक्ताचें सोंग धरिलें तुजकारण । त्याचा विठ्ठला तुज अभिमान । तारीं गा या भवभयांतून । विश्वास पूर्ण मज तुझा ॥९८॥जगज्योती तूं मूळपीठ । म्हणोनि नारायननाम श्रेष्ठ । यास्तव गुंडा गातसे उत्कृष्ट । नाम अविट नारायणहरी ॥९९॥भजन ॥जयजय नारायणहरी । जयजय नारायणहरी ॥जयजय नारायणहरी । भजन करीत असतां निर्धारीं । तस्कर शस्त्र घेवोनियां करीं । प्रहररात्रीं पातला एक ॥१००॥भयानक भिल्लाऐसा काळा । बाबर ओंठ केश मोकळा । दीर्घदंत पुष्ट आबळा । नेत्र वेळोवेळां वटारी ॥१॥हुडकूनि होतें जें कां वस्त्रपात्र । घेवोनि जातसे तो स्वतंत्र । आणिक करणी दावी विचित्र । झांकोनि नेत्र बैसला ॥२॥तस्कर भांडीं नेवोनि जातां । निर्भय गुंडा आणि कांता । आणिक चोर माघारा येतां । काय इच्छितां म्हणे गुंडा ॥३॥चोर वदे श्रीगुंडा गुरुराया । तुमचें वित्त आम्हां न लाभे पापियां । हें घ्यावें म्हणूनि लागे पायां । आज्ञा जावया द्यावी म्हणे ॥४॥तुमचें द्रव्य नेतां चोरुन । आंधळे जाहले दोन्ही नयन । दिसूं लागलें येतां फिरुन । दिधलें म्हणून पुन्हां तुम्हां ॥५॥ऐसें बोलनियां तस्कर । अंतर्धान पावला सत्वर । गुंडा म्हणे होता जो समोर । नाहीं तो चोर कोठें गेला ॥६॥हा चोर कैंचा होय भगवंत । पाहूं आला आमुचा अंत । धांवा करीत गुंडा तेथ । अभंग गात अट्टाहास्यें ॥७॥अभंग ॥अगा पंढरीच्या राया । दिनानाथा प्राणसखया । कृष्ण रामारामारामा । रामराया राघोबारे ॥१॥गुणातीता गुणवंता । नारायणा पंढरीनाथा ॥ कृष्णा० ॥२॥पतितपावना जीवलगा । भक्तवत्सल पांडुरंगा ॥ कृष्णा० ॥३॥माधवा पुरुषोत्तमा । सकलउत्तमा उत्तमा ॥ कृष्णा० ॥४॥भक्तसखा जगजेठी । गुंडापायीं घाली मिठी । कृष्णा० ॥५॥॥ भजन ॥जय जय विठ्ठल रखुमाई । जय जय० ॥भजन आरंभिले ते समईं । जयजय विठ्ठररुखमाई । धांव धांवगे विठाबाई । पाहसी काई अंत माझा ॥८॥स्त्रीनामें गुंडा गातां भजनीं । तव प्रगटली सुंदर कामिनी । उभी सिध्दि पुढें तेक्षणीं । केवळ पद्मिनी लावण्यरुपें ॥९॥भासे रंभा उर्वशीच काय । चंचल चपला दिसे सौंदर्य । गुंडासी द्यावया नानाऐश्वर्य । उभी निर्भय पुढें तेव्हां ॥११०॥जिनें जिंकिले तपस्वी थोर । मग गुंडा किती तिजसमोर । परी गुंडा प्रतापी अनिवार । पाहूनि धीर धरी मनीं ॥११॥सप्तदिसांचें उपोषण । त्यावरी तप करी निर्वाण । म्हणोनि सिध्दि जाहली प्रसन्न । अर्थ पूर्ण करावया ॥१२॥नाना दावीतसे हावभाव । नेत्र फिरवोनि पाहे अपूर्व । गुंडाचें स्तवन करी अभिनव । दावोनि सर्व शृंगारकला ॥१३॥परी गुंडाचें धैर्य अद्भुत । म्हणे जगज्जननी तूं निश्चित । तूं नावडसी मज यथार्थ । जावें परत स्वस्थानां ॥१४॥एका श्रीपांडुरंगावांचून । दुजें कांहीं नावडे तुझी आण । तूं म्हणसी जरी वैकुंठ देऊन । समजावीन अर्भकासी ॥१५॥काय माझें पाप ईश्वरा । म्हणोनि न भेटसी या पामरा । अभंगीं आळवी गुंडा श्रीवरा । भेट त्वरा देईं म्हणे ॥१६॥अभंग ॥काय तुझें वेचे मज भेट येतां । वचन बोलतां एकदोन ॥ वचन० ॥१॥काय तुझें रुप घेतों मी चोरुनी । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ त्या भेणें० ॥२॥काय तुझें भय कोण धरुं पाहे । भेटावेसें आहे जीव माझा ॥ भेटा० ॥३॥काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भिऊं नको भेट देईं देवा ॥ भिऊ० ॥४॥रिध्दि सिध्दि तुम्हां मुख्य भांडवल । आम्हासी तें फोल भक्तीपुढें ॥ आम्हा० ॥५॥तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परी आहे आवडी दर्शनाची ॥ परी आ० ॥६॥ रामाकृष्णा० यारिसिध्दिसिध्दि सकळी । देवा तुझ्या तूं सांभाळीं । आम्हीं फोल मानिलें वनमाळी । त्वरें या वेळीं भेट दे ॥१७॥असो ऐसे जाहले अष्ट दिन । मुख्य करी रामकृष्ण भजन । तों प्रत्यक्ष रुक्मिणीरमण । उभा येऊन भजनांत ॥१८॥भजनीं रामकृष्ण हरिराम । जयजय घोषें धांवा परम । करोनि गातसे गुंडा नाम । ऐका सप्रेम तें ऐका ॥१९॥भजन ॥जयजय रामकृष्ण हरि राम । जयजय राम राम जयराम ॥भजनीं हरिमूर्ति प्रगटली । सिद्धि तत्काळ गुप्त झाली । विठ्ठलमूर्ति गुंडानें पाहिली । तत्पदीं जडली वृत्ति तेव्हां ॥१२०॥कंठ सद्गदित होवून । रोमांच अंगी उठिले गहन । प्रेमें पाझरती दोन्ही नयन । मूर्ति सगुण देखतांचि ॥२१॥गुंडा जोदोनि उभय कर । प्रभूसि विनवी वारंवार । तूंचि सखासोयरा सहोदर । प्रेमें सादर अभंग म्हणे ॥२२॥अभंग ॥सोयरा सुखाचा विसावा भक्ताचा । विठोबा निजांचा मायबाप ॥ विठोबा० ॥१॥कृपाळु दिनांचा बडिवार नामाचा । तोडर ब्रिदाचा साजे तया ॥ तोडर० ॥२॥कायावाचामनें संग धरा त्याचा । अनंत जन्मींचा हरिला शीण ॥ अनंत० ॥३॥नामा म्हणे विठो अनाथ कोवसा । तारील भरवसा आहे मज ॥ तारील० ॥४॥रामाकृष्णाहरीमुकुंद मुरारी ॥अ०॥कटीं कर हरि उभा ठाकला । रामकृष्ण रामराम बोला । जयजय शब्दें गुंडा गर्जला । नाचूं लागला हरि तेव्हां ॥२३॥भजन ॥जयजयराम कृष्ण रामराम ॥ जयजय० ॥गुंडा अभंगीं संकेत करी । प्रेमें काकूलती स्तविला हरि । स्वानंदें डोले तेव्हां मुरारी । भक्त साह्यकारी प्रसन्न ते ॥२४॥अभंग ॥तुजवीण मज कोण बा सोयरा । आणिक दुसरा पांडुरंगें ॥ आणिक० ॥१॥लागलीसे आस पहातसे वास । रात्रीहोदिवस लेखी बोटीं ॥ रात्री० ॥२॥काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान । तुका म्ह० ॥३॥विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल । विठ्ठल विठ्ठल मायबापा ॥ विठ्ठल० ॥४॥भजन ॥जयजयविठ्ठल जयजयविठ्ठल । विठोबा विठ्ठल जयजय० ॥विदाठान् लातीति । या विग्रहें विठ्ठल म्हणती । ज्ञान शून्या ज्ञानदाता निश्चिती । म्हणोनि वदती विठ्ठल या ॥२५॥कलिकालीं अज्ञानासी नाशक । ऐसा ज्ञानदाता आवश्यक । गावा म्हणोनि गुंडा भाविक । जयजय एक विठ्ठल गाई ॥२६॥जयजय विठ्ठलभजनीं । गेलें देहभान विसरोनी । दिवस किंवा आहे रजनी । आठव मनीं न राहिला ॥२७॥तीन दिवसपर्यंत । हेंचि भजन तेथें होत । तैसाचि भजनीं जगन्नाथ । उभा रहात स्वानंदें ॥२८॥एवं कंठिले द्वादश दिन । स्वानंदें कोंदलें त्रिभुवन । कैंची तेथे भूकतहान । गुंडा लीन विठ्ठलरुपीं ॥२९॥जंव विठोबा गुंडाकडे पाहे । तंव तो निजरुप दिसताहे । यासी वरदान द्यावें योग्य पाहे । विलंब नोहे कामाचा ॥१३०॥म्हणूनि गुप्त होय जगजीवन । तों गुंडा पाहे सावध होऊन । गुप्त झाला रुक्मिणीरमण । म्हणून सगुण धांवा करी ॥३१॥धांव धांव गे विठाई सत्वरी । कांगे कोपलीस मजवरी । काय संकट माझें तुजवरी । म्हणूनि दुरी केलें मज ॥३२॥धांव म्हणूनि भाकी करुणा । म्हणे तुझा विरह मज सोसेना । मी अज्ञान तान्हें पाजी पान्हा । येऊं दे करुणा धांव त्वरें ॥३३॥अभंग ॥तूं माझी माऊली मी तुझें लेकरूं । नको दुरी धरुं विठाबाई ॥ नको० ॥१॥तूं माझी गाऊली मी तुझें वासरुं । नको पान्हा चोरुं विठाबाई ॥ नको० ॥२॥तूं माझी हरणी मी तुझें पाडस । नको तोडूं आस विठाबाई ॥ नको० ॥३॥तूं माझी पक्षीण मी तुझे अंडज । चारा घाली मज विठाबाई ॥ नको० ॥४॥नामा म्हणे आई धांव लवलाही । बुडतों चिंताडोहीं काढीं मज ॥ बुडतों० ॥५॥ रामकृष्ण० जें निरवयव निर्गुण । तें मायायोगें जाहलें सगुण । म्हणोनि तोचि देवदेवी जाण । अद्वयचिंतन करावें ॥३४॥योगी रमण्या स्थान जें उत्तम । म्हणूनि म्हणती त्यासी राम । चित्त आकर्षण करणार परम । म्हणूनि नाम कृष्ण गाती ॥३५॥अज्ञान्या ज्ञानदायी विठाबाई । म्हणोनि रामकृष्णविठाई । सीताराधारुखमाई । स्त्रीसह गाई गुंडा मुखें ॥३६॥भजन ॥जयजय रामकृष्ण विठाई । सीताराधारुखमाई ।भजनीं ऐसें आळविलें । तेव्हां देव प्रगट झालें । सगुणरुपें प्रत्यक्ष भेटलें । भक्तीसी भुलले गुंडाचे ॥३७॥भावें भजतां कलिमाझारीं । भक्तासी प्रसन्न होय श्रीहरी । म्हणोनि भगवन्नाम वैखरी । गुंडा निर्धारीं गातसे ॥३८॥गुंडा म्हणे कैसे करुं पूजन । सर्वस्वी मी दुर्बळ पूर्ण । जें जें पहावें दृश्यभास जाण । कीं तें तें दर्शन तुझेंचि ॥३९॥अभंग ॥कासीयानें पूजा करुं केशवराजा । हाचि संदेह माझा फेडीं देवा ॥ हाचि० ॥१॥उदकें न्हाणूं जरी स्वरुप हें तुझें । तेथें काय माझें मोल वेचें ॥ तेथें० ॥२॥गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय वाहूं ॥ तेथें० ॥३॥वाहूं जरी दक्षिणा धातु नारायण । अन्न तें परब्रह्म दुजें काई ॥ अन्न - ॥४॥गातां तो ओंकार टाळ नाद ईश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥ नाचा० ॥५॥तुका म्हणे देवा अवघें तुझें नाम । धूपदीप रामकृष्णहरी ॥ धूप० ॥६॥रामा कृष्णा हरी मुकुंद मुरारी ॥ अच्यु० ॥ऐसा गातां अभंग उत्तम । देहभान गळालें परम । वाचे उरलें केवळ नाम । हरे रामकृष्णा गोविंदा ॥१४०॥भजन ॥हरे रामकृष्णा । गोविंदा रामकृष्णा ॥ हरे० ॥गुंडा म्हणे श्रीहरी एकभावें । वाटे तुझें सगुण नाम घ्यावें । येणें सकल कार्य सफल स्वभावें । इतर जाणावें व्यर्थ सर्व ॥४१॥सांडूनि देहादि ममता । कलीमाजी तुझें नाम गाता । तोचि होय तुझा आवडता । मानलें चित्ता पांडूरंगा ॥४२॥म्हणोनि एकभावें करुन । सांगतों घेऊन तुझी आण । कधीं मी न सोडीं तुझे चरण । प्रतिज्ञा पूर्ण हेचि माझी ॥४३॥अभंग ॥देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥ रामराम ॥१॥वदनीं तुझें मंगल नाम । हृदयीं सदोदीत प्रेम । रामराम ॥२॥चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥ रामराम ॥३॥नामा म्हणे केशवराजा । केला निश्चय चालवी माझा । रामराम ॥४॥जयजय विठ्ठरुखमाई । तूंच मायबाप गे विठाबाई । देह जावो अथवा होवो कांहीं । ठाव देईं मोकलू नको ॥४४॥भजन ॥विठ्ठलरुखमाई ॥ विठोबा० ॥हाचि निश्चय माझा जाहला । चालविणें तुजकडे गा विठ्ठला । भजनासाठी संरक्षी मला । विकल गोपाळा होऊं नेदी ॥४५॥तुजला कोप येईल जरी । आयुष्य माझें क्षीण करीं । गात्र विकलमात्र नहो हरी । मागणें निर्धारीं हेंचि माझें ॥४६॥अभंग ॥विठ्ठलरुखमाई राम विठ्ठलरुखमाई कथेची सामग्री । देह अवसान वरी ॥१॥नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥२॥आयुष्य करीं उणे । परी मज आवडो कीर्तन ॥३॥तुका म्हणे हानी । यावेगळीं मनां नाणी ॥४॥ विठ्ठल० - ॥हेंचि मागतों तुला । विठोबा चरणीं ठाव दे मला ॥देव कृपें द्रवला पूर्ण । गुंडासी दिधलें दृढालिंगन । भक्तकैवारी मनमोहन । जाहलों प्रसन्न म्हणे मागें ॥४८॥गुंडा म्हणे गा जतत्पति । हेंचि मागें पुढतपुढतीं । चरणीं ठाव देईं मजप्रती । हाचि निश्चिती हेत असे ॥४९॥अखंड तुझे भजनावीण । प्राणांतीं न निघो अन्यभाषण । वाटेल करीं आयुष्य क्षीण । परी भजन घडो सदा ॥१५०॥गुंडा मागतां वर निष्काम । देव आनंद पावला परम । गुंडा भजनीं गातसे सप्रेम । हरीसी नि:सीम भक्तीनें ॥५१॥अभंग ॥हेचि मागतों मी देवा । बळें घ्यावी माझी सेवा ॥१॥बहू अनिवार मन । चरणीं ठेवावें जडून ॥२॥तुजवीण अन्य वाणी । नको वदवूं चक्रपाणी ॥३॥रामकृष्णपायीं जागा । एवढें कृपादान देगा ॥४॥हरिरे विठ्ठलरुखमाई । बाप विठ्ठल ० ॥हेंचि मागणें तुजला देवा । क्षणभंगुर देह जाणावा । नाना विकृतींचा असे ठेवा । सदा रहावा पदीं लीन ॥५२॥ऐसी श्रीगुरुनें दाविली सोय । म्हणोनि धरिले तुझे पाय । कृपाळू श्रीगुरु बापमाय । उत्तीर्ण काय होऊं त्यासी ॥५३॥साक्षात् गुरु तेंचि परब्रह्म । भेदाभेद रहित पूर्ण काम । म्हणोनि गुंडा तेव्हां सप्रेम । भजन उत्तम करीतसे ॥५४॥भजन ॥जयजय गुरुमहाराज गुरु । जयजय परब्रह्म सद्गुरु ॥ऐशी गुंडा गात गुरुमालिका । तेणें प्रसन्न विठ्ठलसखा । हृदयीं आलिंगोनि भक्त टिळका । वरदान ऐका दीधलें ॥५५॥भक्तशिरोमणि गुंडाराया । अंत नाहीं तुझ्या दृढनिश्चया । म्हणोनि मी प्रगटलों सखया । करावया समाधान ॥५६॥धन्यधन्यगा तुझी भक्ति । पुन्हां अपेक्षित माग मजप्रति । गुंडा हरिपदीं नमोनि प्रीति । मागे पुढती पुन्हां ऐका ॥५७॥अभंग ॥हेंचि मागतों तुजला । कृपादान गा विठ्ठला ॥१॥नाम तुझें असो वदनीं । नको विसरुं दिनरजनीं ॥२॥सर्वभावें गाइन नाम । म्हणे गुंडा हेंचि ध्यान ॥३॥हरिरे विठ्ठलरुखमाई । माय विठ्ठल० ॥गुंडाची ऐकोनी अभंगवाणी । तथास्तु म्हणे चक्रपाणी । गुंडा चिन्मयस्वानंदें गर्जुनी । नाचे भजनीं निर्लज्ज ॥५८॥भजन ॥राहीरुखमाई चंद्रभागा । पुंडलिका पांडुरंगा ॥गोपाळें धरिली भक्तिरति । म्हणोनि उजळिती भक्त आरती । अविट ज्ञानें मुक्त सुरती । जनारती ओवाळिलें ॥५९॥म्हणोनि गुंडा भक्त त्या वेळीं । विठ्ठलासि आरती ओंवाळी । स्वानंद घोषं पिटूनि टाळी । नाचे वनमाळी सप्रेमें ॥१६०॥आरती पांडुरंगाची ॥१॥युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रुखमाई दिसे दिव्यशोभा ।पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेंगा । चरणीं वाहे भीमा उध्दरी जगा ॥जयदेव जयदेव जयपांडुरंगा । रुखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ॥जय० ॥१॥तुळशीमाळा गळां कर ठेवोनी कटीं । कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ॥देवसुरवर नित्य येती भेटी । गरुडहनुमंत पुढें उभे राहती ॥जय० ॥२॥आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती ।दर्शन हेळामात्रें त्या होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥जय० ॥३॥आरती पांडुरंगाची ॥२॥निर्विकार ब्रह्म व्यक्तीसी आलें । येउनी वाळवंटीं उभें राहिलें ।भक्तपुंडलिक धरुनि उभें केलें । मुक्त म्हणती आमुच्या मनासी आलें ॥जयदेव जयदेव जयजय विठ्ठला । तुझ्या दर्शनमात्रें बंध तुटला ॥१॥तुझ्या चरणां शरण आले जितुके । अवघे वैकुंठीचे बसले भूमिके ।तुझे नाम घेता तुजसी तुके । पापी सर्वही मुक्त केले तितुके ॥जय० ॥२॥शिवाकार मुगुट कस्तुरी भाळीं । कटावरी कर शोभे वनमाळी ।ब्रह्मसुखाची घेउनि नव्हाळी । गुंडा प्राणज्योती आरति ओंवाळी ॥जय० ॥३॥घालीन लोटांगण वंदिन चरण । डोळ्यांनीं पाहेन रुप तुझें ।प्रेमें आलिंगीन अनन्य पूजिन । भावें ओंवाळीन म्हणे नामा ॥१॥त्वमेव माताच पितात्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देव देव ॥२॥कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्दयात्मना वानुसृत: स्वभावात् ।करोमि यद्यत्सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत्तत् ॥३॥विठ्ठलरुखमाई विठोबा० । पुंडलीकवरदे हरिविठ्ठल । सद्गुरु चूडामणि महाराजकी जय ॥गुंडा श्रीहरीसी प्रार्थना करी । माझा भार आहे तुजवरी । म्हणूनि तूं उबगूं नको हरि । राहो शिरीं अभयकर ॥६१॥अभंग १४॥माझा भार तुजवरी । म्हणूनि उबगूं नको हरी ॥तूंचि माझा बापमाय । चित्तीं ध्यातों तुझे पाय ॥तुजवीण नाहीं गती । म्हणूनि येतों काकूलती । तुजवीण मज आसरा । नाहीं नाहीं बा दुसरा ॥रामकृष्णा तुजसारिकह । नाहीं त्रिभुवनीं सखा ॥१॥ऐसें गुंडा करितां भजन । लोटला तेव्हां चतुर्दश दिन । स्वमुखें पांडुरंग आपण । सांगेल खूण आतां पुढें ॥६२॥तें त्रयोदशाध्यायीं कथामृत । सेवा सज्जन श्रोते समस्त । एकाग्र देवोनि कथेसी चित्त । रहावें शांत निजानंदीं ॥६३॥सच्चिदानंदा मंगलधामा । अनंतवेषा पूर्णकामा । नारायणामानसविश्रामा । लागो पदप्रेमा भक्तासी ॥६४॥इति श्रीगुंडामाहात्म्यकथन । व्याघ्रादिरुपें भेट सगुण । चवदा अभंगांचें भजन । अध्याय पूर्ण द्वादश हा ॥१६५॥॥श्रीसद्गुरुगुंदार्पनमस्तु । श्रीविठ्ठलार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥अध्याय १२ वा समाप्त. N/A References : N/A Last Updated : September 14, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP