श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय अकरावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीवरदमूर्तये नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

श्रीमन्महागणेशाय नम: । नमिला विघ्नेश प्रथमत: । तोचि देवो देवी शारदा स्वत: । गुरु सर्वत: व्यापक ॥१॥
पूर्वाध्यायी वर्णिले कथानक । गुंडाची कथिली वर्तणूक । आतां पुढें ऐका श्रोते भाविक । अरिष्ट एक आलें तें ॥२॥
चौर्‍यांशीलक्ष योनींमाझारीं । मनुष्यदेह दुर्लभ निर्धारीं । श्रुतीनें योजिले त्याहीवरी । वर्ण चारी यथानुक्रम ॥३॥
ब्राह्मण क्षत्रियवैश्यशूद्रादि । यांत श्रेष्ठ ब्राह्मण ते अनादि । ब्राह्मण हे असती चार वेदी । पृथक भेदी शाखागोत्र ॥४॥
क्षत्रियवैश्य गुप्त दोन्ही वर्ण । शूद्रांत भेद भिन्नभिन्न । यांचे कर्मधर्म साधारण । गांधर्व लग्न तांत्रिकें ॥५॥
विप्राचे कर्मधर्म अवघड । श्रुत्युक्त ऋषींनी केले उघड । अविधि होतां कर्मलोप द्वाड । नाहीं सवड विधींत ॥६॥
अचुकविधी कधीं कर्म नोहे । यासाठी प्रतिकार्यीं चिंता राहे । कारण विधीनें स्वर्ग लाहे । अविधीनें आहे नरकप्राप्ती ॥७॥
स्वर्गनरक हा शास्त्रनिर्णय । कोणासी कैसा कोठील काय । हें न कळूनि वाटे अतिभय । विवेकें निर्भय सहजचेइ ॥८॥
ज्योतिषशास्त्री गणित करुन । घटित पहाती सुज्ञ ब्राह्मण । यथाविधि होय पाणिग्रहण । वैधव्यपूर्ण दैवें न चुके ॥९॥
अपूर्ण होतां वासना दुर्धर । विषयवांच्छा होय निरंतर । म्हणोनि परद्वारीं नारीनर । स्वाधीन साचार अनंगा ॥१०॥
कित्येक स्त्रिया परद्वारत । करिती दुर्धर गर्भपात । ऐसे सूक्ष्म विचार अद्भुत । वर्णितां ग्रंथ वाढेल ॥१२॥
असो आतां पूर्वानुसंधान । गुंडा नित्य करितां भजन । स्वानंदीं मन राहोनि निमग्न । नामीं संलग्न जिव्हा जाली ॥१३॥
ग्रामस्थ जनांची होतसे दाटी । भजनीं नाचतां आनंद पोटीं । गुंडाची होऊनि अभेद दृष्टी । श्रीजगजेठी आठवितां ॥१४॥
ग्रामीं एक विधवा बाला । तीसी विषम काळ पातला । कर्मधर्मसंयोग बळावला । गर्भ राहिला जारकर्में ॥१५॥
गर्भासी जाहले पंचमास । वार्ता कळली सर्व जनांस । गुप्त बोलती एकमेकांस । कोणी त्रासे देती शब्दें ॥१६॥
म्हणती या रांडेसी काय करावें । नासिक छेदूनि बाहेर घालावें । खरावरी इजला बैसवावें । मिरवावें सर्वग्रामीं ॥१७॥
ग्रामस्थ मिळोनि सभेप्रति । जो तो मानी मीच प्रजापती । विधी कर्मधर्म सांगती । ही योग्य म्हणती शिक्षा तिशी ॥१८॥
आणिलें अपराधी गर्भिणी स्त्रीला । सभाजनांनीं इत्यर्थ केला । आतां नेवोनि कचेरीला । द्यावी हिला शिक्षा मोठी ॥१९॥
तीतें दाविला सरकारवाडा । निराधार स्त्रीसी घातला खोडा । केल्या कर्माचा करीं निवाडा । म्हणूनि उघडा ताप देती ॥२०॥
संगे घेऊनि राजदूत । अबला फिरे भिक्षा मागत । गुंडाचे मठासमीप येत । भजन होतां ऐकू आलें ॥२१॥
अन्न सेवितां तडागावरी । एकाग्र भजनश्रवण करी । तिसी वाटे जावें मठावरी । ते दुराचारी न सोडिती ॥२२॥
दूतांसी अबला करी प्रार्थना । दयाळा मज न्या गुंडादर्शना । मग जाऊं राजसदना । द्रव मना आला दूतांच्या ॥२३॥
दूतांनीं नेलें गुंडादर्शनासी । विधवा नमूनि विनवी गुंडासी । विटंबिती लोक ग्रामवासी । आपुली दासी रक्षावी ॥२४॥
नेत्र भरोनी आणिलें पाणी । म्हणे दयाळा बलात्कारेंकरुनि । जारकर्मे जाहलें गर्भिणी । दुर्घट करणी घडली ही ॥२५॥
मुख्य केलें जारानें हें कर्म । त्याचें सांगा म्हणति जातिनाम । मजसी लाज वाटे परम । काय वर्म करुं सांगा ॥२६॥
सकळ मिळोनि ग्रामाधिकारी । मज बळेंचि नेलें राजद्वारीं । दंड करिती नानापरी । म्हणती लौकरी जार सांगें ॥२७॥
तुम्ही आहां दयावंत एक । जगीं नसे तुम्हांविण आणिक । मातापिता तुम्ही तारक । रावरंक सम तुम्हां ॥२८॥
या भवभयाब्धींतूनि अबला । तारावी सत्वर दीनदयाळा । आतां प्राणांतसमय पातला । तारक मजला कोणी नसे ॥२९॥
तुम्हाऐशा थोराचें हे कर्म । म्हणूनि सांगावें वाटे नाम । तुमच्या भयें बंधन परम । तुटेल वर्म हें यथार्थ ॥३०॥
गुंडा म्हणे मी होईना कां दु:खी । याउपायें जरी होशी सुखी । तरी माझें नाम घ्यावें मुखीं । हें घे शेखीं वचन माझें ॥३१॥
तुजसाठीं जो राजद्वारीं ताप । होय तो मी भोगीन सुखरुप । कंठछेदाचा जरी असे संकल्प । तरी तो स्वल्प मानीन मी ॥३२॥
गुंडा म्हणतां माते जाई । ऐकतांचि तेव्हां ती लागे पाई । धन्य म्हणे गुंडा तूं बापआई । संकटसमयीं साह्य केलें ॥३३॥
मस्तक ठेवितां चरणावरी । गुंडा शांतवी अभय करीं । अनुतापें तापूनि सुंदरी । जात सत्वरीं निर्भयपणें ॥३४॥
सज्जनदुर्जनादि सकळी । राजद्वारीं जमली मंडळी । दूत कोरडा आणूनि जवळी । म्हणती या वेळीं जार सांग ॥३५॥
थांबा मी सांगतें म्हणे अंगना । नित्य जात होतें गुंडाभजना । मजला पाहूनि त्यांचे मना । दुष्टवासना उपजली ॥३६॥
भजन करितो दांभिक वरी । परी पाप भरलें अंतरीं । मेला दुष्ट दुर्जन दुराचारी । घात निर्धारीं केला माझा ॥३७॥
चांडाळा दुषिलें मी एक । तरी तुज न मिळे कधीं परलोक । अपकीर्तिं गातील सकळ निंदक । आशीर्वाद देख तुज माझा ॥३८॥
ती निर्लज्जा आक्रंदोनि रडे । निंदक हंसोनि आले पुढें । म्हणती तेव्हां सुख केंवि घडे । रडसी वेडे आतां कां ॥३९॥
आतां कां होसी व्यर्थ दु:खित । केल्याचें भोगीं प्रायश्चित्त । खदखदां हांसती समस्त । अधो पाहत दीन अबला ॥४०॥
जार नाम गुंडाचें ऐकून । हंसूं लागले कुटिल जन । खेद पावले तेथील सज्जन । निष्कारण आळही म्हणती ॥४१॥
आज गुंडा म्हणजे महासंत । त्यास दुषिती हे अरण्यपंडित । कोठेंही बोलूं हेंचि निश्चित । आमुचा अंतहोकां जरी ॥४२॥
पुढें सरसावोनि म्हणती खळ । काय हें बोलणें पक्षपात केवळ । गुंडा साधु भासे परी चांडाळ । याचा विटाळ नहो कधीं ॥४३॥
प्रार्थूनि म्हणती अधिकार्‍यांसी । गुंड्यासी आणावें आतां सभेसी । दूतीं जाऊनि आणिलें त्वरेंसी । प्रत्यक्ष निर्दोषी धरोनियां ॥४४॥
खळ चवताळले गुंडावरी । जारिणीस म्हणती यासी धरीं । दोघांसी बांधोनि दृढपदरीं । फिरवूं बाजारीं खरावरतीं ॥४५॥
हा गुंडा परम चांडाळ । नरनारी भ्रष्टविले सकळ । लावोनि टिळाटोपी माळ । बहू चोंढाळ केला यानें ॥४६॥
अधिकारी म्हणे ऐसा अनर्थ । केला कैसा त्वां सांग यथार्थ । दुष्कर्माचें प्रायश्चित्त येथ । घेईं व्यर्थ काय आतां ॥४७॥
तूं असोनि सुज्ञ परम । असें कां केलें अनुचित कर्म । पापपुण्य जाणसी धर्माधर्म । सांग वर्म काय याचें ॥४८॥
तंव गुंडासी झाला अतिहर्ष । म्हणे कर्ताकरविता सर्वेश । जडदेह काय करील दोष । भोगूनि निर्दोष आत्मा तो ॥४९॥
ज्याची असे अघटित घटना । तेथें किती ब्रह्मांडकल्पना । खाणी वाणी भोगादि रचना । हेळामात्रें जाणा घडामोडी ॥५०॥
येथें कवणाचा कोण कारक । कवणासी कोण मारक । कवणाचा कोण तारक । आज्ञाधारक सर्व त्याचे ॥५१॥
अनंत व्यापार अनंत लीला । नकळे त्याची ब्रह्मादिकाला । त्यानेंचि योग भोगादि केला । शेखीं राहिला वेगळाचि ॥५२॥
तुम्ही केवळ सुज्ञ असोन । देहासी लावितां व्यर्थ दूषण । ऐसें ऐकतं गुंडावचन । खळ दुर्जन क्षोभले ॥५३॥
म्हणती अरे त्रिभुवनीं एक । हा गुंडयाची असे ज्ञाता भाविक । प्रत्यक्ष करोनि ऐसें पातक । दावितो आणिक कौशल्य ॥५४॥
हा चांडाळ करुनि करणी । कैसी पहा करितो संपादणी । जिरवितो मोठे शब्द बोलुनि । चुकेना करणी करावया ॥५५॥
असो शास्त्रें बोलती उदंड । आतां शिक्षा सामभेददंड । व्यर्थ यासी कां करावा वितंड । लावावा दंड योग्य जो कां ॥५६॥
राजनितिग्रंथे निश्चित । चौदा अन्याय महापंडित । बोलिले ते घडतां राज्यांत । विघ्न होत राज्यपदा ॥५७॥
चोरपैशून्यमारणदंड । उच्चाटणकर्मभ्रष्ट उदंड । पाप अनिवार करिती षंढ । क्षुद्रप्रचंड मल्लयुध्द ॥५८॥
हिंसा आणि शत्रुदंड अधर्म । मृत्युदंड जारदंड परम । चौदावें आवरणादि कर्म । ऐसा नियम राजनीति ॥५९॥
त्यांत जारकर्म अतिदोष । तेणें गर्भधारण होतां स्त्रियेस । रक्षिलें पाहिजे राजानें त्यास । प्रसूतमासपर्यंत ॥६०॥
मग प्रसूत जाहल्यावरी । घटस्फोट करावा तिचा निर्धारी । यातीचा तडफा तोडूनि वरी । जारिणी नारी विडंबावी ॥६१॥
अशा संततीची जाति गोळक । किंवा शूद्रस्त्रीसंगें पातक । करितां प्रजा विदुर देख । भोगिती नरक कुपुत्र कर्में ॥६२॥
मदांध पुरुष जो पातकी । भलत्या स्त्रीस्थानीं वीर्य टाकी । पुत्र कुकर्मे जाय कुंभिपाकीं । शेवटी नरकीं दु:ख भोगी ॥६३॥
ऐशा प्रजादोषेकरुन । राजासी येतील महाविघ्न । यासाठीं जातिवर्णस्थापन । देऊनि धन करावें राजा ॥६४॥
लग्न करोनि यथाविधी । कामबंधन करावें आधी । विद्याध्ययनादि धर्मसंबंधीं । शास्त्रसिध्दि करवावी ॥६५॥
नुसतेच दोष लावून । राजानें न करावें प्रजापीडन । अन्यायासी यथायोग्य दंडन । करावें जाण राजानें ॥६६॥
ऐसें जें कां महापातक । प्रजाकर्में राज्यासी घातक । शिक्षापालनादि नियामक । करण्याएक राजा समर्थ ॥६७॥
असो माध्यान्ह समय आला । सभाजन गेले स्वगृहाला । अधिकारी जावें म्हणे गुंडाला । प्रमाण याला पाहूं उद्यां ॥६८॥
गुंडा उठोनी गृहासी येत । तंव एका गृहीं प्रयोजन होत । गृहधनी निमंत्रण देत । गुंडासी म्हणत या अवश्य ॥६९॥
ग्रामांतील विप्र बोलाविले । तत्काळ सर्वही जमले । गुंडा बोलावितां तेही आले । त्यांसी बैसविलें सन्मानें ॥७०॥
तव एका गुंडासी सोडून । पात्र मांडूनि वाढिलें अन्न । संकल्प सोडावया कारण । तो यजमान बोलाविला ॥७१॥
यजमान येऊनि ब्राह्मणांसी । म्हणे अन्न पोंचलें कीं सर्वांसी । पाहूं म्हणोनि आपण त्वरेसी । निघे पंक्तीसी पहात ॥७२॥
तंव गुंडा तेथे बैसला । पात्र वाढिलें नाहीं त्याला । यजमान म्हणे ब्राह्मणाला । थांबा आला गुंडा आता ॥७३॥
यांचें वाढूनि सत्वर पात्र । मग संकल्प सोडूं पवित्र । तंव ब्राह्मण बोलती सर्वत्र । हा अपवित्र नको पंक्ति ॥७४॥
जरी यासी बैसवाल येथ । तरी आम्ही जाऊ समस्त । हें वचन ऐकतांचि दु:खित । मनीं होत घरधनी ॥७५॥
यजमान करी बहु स्तवन । अतिनिग्रही सर्व ब्राह्मण । म्हणती या दुष्टासी भोजन । देतां दूषण आम्हां ये ॥७६॥
सर्व तिष्ठति पात्रांवरी । गुंडापाशीं यजमान सत्वरी । येऊनि पुसे यासि कांहीं तरी । युक्ति बरी सांगा आतां ॥७७॥
गुंडा म्हणेरे भक्तप्रिया । तूं आतां सोडीं या संशया । ब्राह्मणां आज्ञा दे जेवावया । विलंब वायां करुं नको ॥७८॥
मी श्रीजगदीशाचे मनीं । परान्न न घ्यावें आजपासोनी । म्हणोनि केली ही ऐसी करणी । संशय व्यसनीं पडूं नको ॥७९॥
विन्मुख न जावा आला अतिथी । हा असेल संशय तुझे चित्तीं । तरी तीर्थप्रसाद तुझे हातीं । देईं निश्चिती जातों मी ॥८०॥
घरधन्यानें बोल मान्य केला । तीर्थप्रसाद गुंडासी दिधला । गुंडा माघारी गृहासि आला । भजनीं जाहला निमग्न ॥८१॥
गजमाथां जेंवि सुमन । भार न होती कदापि जाण । तेंवि निंदेचें लोकभाषण । न रुचती जाण गुंडासी ॥८२॥
गुंडा येवोनियां स्वगृहीं । कांतेसह निरशन केलें पाही । निशिदिनीं लागला हरिपायीं । खंड नाहीं नामीं जिव्हा ॥८३॥
असो तो दिवस गेल्यावरी । निंदक पातले राजद्वारीं । म्हणती गुंडातें शिक्षा द्या बरी । मग देशांतरीं धाडावें ॥८४॥
हा अधर्मी अनाचारी जाणावा । सहसा आमुचे ग्रामीं नसावा । याच्या दोषें करुनि आम्हां सर्वां । घातक पहा होईल ॥८५॥
या दोघांतें खरारुढ करुन । विटंबावा जारजारीण । मृत्तिका अंगीं उधळून । ग्रामीं मिरवण काढावी ॥८६॥
हीच शिक्षा मानली सर्वांसी । आनंद जाहला दुष्टांसी । खेद होतसे सज्जनमानसीं । अहर्निशीं अत्यंत ॥८७॥
सभेंत आणिली स्त्री गरोदर । दुष्ट मिळोनि तेथें अपार । गुंडा येतांचि अविंध फार । विटंबिती पौरजन सर्व ॥८८॥
गुंडा घेऊनि चिपळ्यावीणा । कांतेसह आले सभास्थानां । तंव कोणी शेण कोणी चुना । माखिती वदना कज्जलादि ॥८९॥
कोणी दुष्ट मारिती खडे । एक पुढें वाजवी डफडें । त्या त्रिवर्गासी घालूनि पुढें । मिरविती साडे चहूं हटां ॥९०॥
आश्चर्य मानिती स्वर्गी देव । धन्य गुंडाचा एकाग्रभाव । विस्मित सिद्धचारणगंधर्व । पहाती अपूर्व विमानारुढ ॥९१॥
माध्यान्हीं ग्रामांत फिरविलें । तसेंच तेव्हां बाहेरी आणिलें । पौरजनीं बहु विटंबिलें । माघारे गेले नरनारी ॥९२॥
स्मशानभूमि ग्रामाबाहेर । पारिभद्र वृक्ष असे थोर । तेथें बैसले घटिका चार । परतले पौरग्रामांत ॥९३॥
दटावूनि सांगती राजदूत । पुन्हां तुम्हीं न यावें ग्रामांत । अधिकार्‍यांसी कळविला वृत्तांत । परी दु:खित मनीं झाले ॥९४॥
अतिउष्णीं फिरविलें माध्यान्हीं । तेणें बहु व्याकुळ गर्भिणी । तेव्हां राजाई चिंता करी मनीं । पुढें करणी केविं होय ॥९५॥
गुंडा स्त्रीसीं सांगे ही महामाया । जगदुत्पत्तीचा मूळ पाया । मज परमार्था लावूनि ये समया । विरागीं काया बळावली ॥९६॥
आतां इच्या कृपें प्रखर । परमार्थ घडे वाटतो साचार । नसतां मी आळसी पामर । कैंचा भवसागर तरतों ॥९७॥
तंव गुंडा नमोनि तिचे पायीं । वदे सांग वो काय इच्छा आई । वाटतां फिरुनि ग्रामांत जांई । अथवा येईं आम्हांसवें ॥९८॥
गर्भिणी म्हणे धन्य गुरुमूर्ति । मी वृथा आळ तुम्हावरतीं । घातला हा अन्याय जगतीं । माझा निश्चिती जाहला ॥९९॥
दुर्धर कर्माचें ओझें । वृथा घातलें स्वामीं माथां तुझे । दयाब्धि तूं गहन सर्वस्वी जे । अपराध माझे साहिले ॥१००॥
जो अन्याय विधिहरिहर । आकाश धरणी न घे भार । न केला सुरासुरीं अंगिकार । तो तूं दुस्तर स्वीकारिसी ॥१॥
येरु सद्गद जाहली चित्तीं । रोमांचित पायीं लागोनि पुढती । म्हणे भो तारक तूं गुरुमूर्ति । सांगसी त्या रीतीं वर्तेन ॥२॥
आतां योग्य जें वाटे तुजला । तारीं कां मारी श्रीगुरु मजला । गुंडानें कृपाकर शिरीं ठेविला । चला म्हणाला स्वमुखें ॥३॥
उत्तरपंथ लक्षूनि केवळ । उठोनि जाती त्रिवर्ग तत्काळ । पर्जन्यवृष्टि ग्रीष्मकाळ । पूर तुंबळ सरितेसी ॥४॥
दुष्ट दुर्जन मागें पळती । चमत्कार पाहूं हे कोठें जाती । सकळ जन मिळोनि भोवतीं । पाहूं म्हणती करितो काय ॥५॥
तिघेही गेले उद्दालिकातीरीं । गुंडा ध्यानस्त मुहूर्तभरी । उभा राहूनि आठवी हरी । सद्भाव अंतरीं धरोनि ॥६॥
गुंडासी नमूनि सती गर्भिणी । उदकीं रिघाली जयगुरु म्हणोनि । किंचित जल न लागतां चरणीं । गेली तरोनि पैलतीरा ॥७॥
महापूर तरोनि सती गेली । ते सर्वांनी दृष्टी पाहिली । जाऊनि दिव्य विमानीं बैसली । मुक्त झाली गर्भासह ॥८॥
विमानी बैसली जेव्हां गर्भिणी । तेव्हां पाहिली सज्जनें नयनीं । जळ न लागतां गेली तरोनी । एवढें दुर्जनीं विलोकिलें ॥९॥
असो भक्ताभिमानी भगवंत । कधीं न मोडी भक्तमनोरथ । आज्ञाधारक होऊनि राबत । तेव्हां न गणित पापपुण्य ॥११०॥
निंदोनियां सिध्दपुरुष परम । जो करी यज्ञदानादि कर्म । त्यातें नेदी पद उत्तम । पुरुषोत्तम कदापि ॥११॥
ज्यावरी होय सत्पुरुषप्रसाद । त्यातें हरि दे कैवल्यपद । हेंचि गुह्य मूळ असे विशद । शास्त्रवेदपुराणींही ॥१२॥
असो ऐसा प्रसंग पाहून । आश्चर्य करिती सकल जन । म्हणती ही परम जारीण । नदी तरोन गेली केंवि ॥१३॥
सज्जन मनीं अत्यंत कळवळा । गुंडाकीर्ति गाती वेळोवेळां । ज्याचे स्वाधीन घनसांवळा । त्याचा आगळा प्रताप लोकीं ॥१४॥
दुष्टांनीं त्यासी व्यर्थ दूषिलें । म्हणोनि काय लघुत्व आलें । आपुलें पदीं धोंडे घातले । ऐसें जाहलें त्यांचें त्यांसी ॥१५॥
दुष्ट सहवास कधीं श्रीहरि । आम्हां न घडो गा निर्धारीं । साधुसंतसेवा घडो करीं । ऐसें करीं दयाळा ॥१६॥
पुढें श्रोते व्हावें सावधान । होय चवदा अभंगांचें भजन । कर्ताकरविता होऊनि आपण । नारायणा पूर्णनिमित्त देसी ॥१७॥
इति श्रीगुंडामाहात्म्यविख्यात । उध्दरिली गर्भिणी आरोपित । नंतर गुंडागमन अरण्यांत । अध्याय समाप्त एकादश हा ॥११८॥

॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय ११ वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP