श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय तिसरा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुंडासमर्थ ॥

ॐ नमो सर्वाद्य गणनायका । शुध्दवज्रभवभयनाशका । म्हणोनी कार्यारंभी विघ्नांतका । प्रार्थितां बाळका साह्य व्हावें ॥१॥
प्रणवरुपिणी जी हंसवाहिनी । नमूं शारदा वाग्वरदायिनी । वृत्तिरुपा अखिलविलासिनी । चैतन्यरुपिणी देवदेवी ॥२॥
नमिला सद्गुरु सर्वसाक्ष । जो ज्ञानाब्धि विश्वात्मा प्रत्यक्ष । स्वसुखद ज्याचे कृपाकटाक्ष । लक्ष्यालक्ष्य अढळदाता ॥३॥
आतां नमूं सद्गुरु शंकर । तोचि प्रत्यक्ष गुंडावतार । अनंतरुपें केला उध्दार । कृपाकर असंख्यभक्त ॥४॥
आतां कुलस्वामी नमूं सर्वेश । भक्ताभिमानी श्रीव्यंकटेश । नारायणा साह्य समयास । व्हावें सुरस सज्जनज्ञाते ॥५॥
ऐशा शिष्टाचारें मंगल केलें । आतां पूर्वानुसंधान लागलें । पूर्वाध्यायीं श्रीगुरुगृहा आले । पुढें वर्तलें काय ऐका ॥६॥
सद्गुरु चूडामणिस्वामी । महातपस्वी रत योगकर्मीं । यथाविधी कुलाचार नेहमीं । स्वधर्म निष्कामीं व्रत आवरी ॥७॥
शांकरी सांप्रदाय शुध्द शैव । सदा ध्यात गात शिववैभव । त्र्यंबकेश्वर भेटोनि स्वयमेव । करी तांडव भजनांत ॥८॥
जयातें द्रव्यदारातृणप्राय । ऐसें वैराग्य अनुपमेय । केवळ दानशूर जो होय । वसे निर्भय ब्रह्मानंदीं ॥९॥
ज्याच्या वैराग्याची सीमा झाली । त्यांतील ऐका कथा वर्तली । दुष्काळ पडला एके सालीं । मंडळी जमली अत्यंत ॥१०॥
म्हणोनि स्वामी गेले भाग्यनगरा । कथासामुग्रीसहित त्वरा । तेथें कथेसी येती सहपरिवारा । अमीर उमराव मोठमोठे ॥११॥
नित्य चालिला कीर्तनाचा थाट । किर्ति गाती लोक अफाट । नित्य कथेसी न फुटे वाट । येती घनदाट लोक सर्व ॥१२॥
तेथील मजगृहप्रदेशीं । श्रीमान्‍ गृहीं एके दिवशीं । स्वामी कथा करिती अत्यादरेंसी । प्रसन्न मानसीं होवोनी ॥१३॥
आख्यान मच्छेंद्रनाथ विशद । थाट कीर्तनीं गायन छंद । हिंदुस्थानी भाषा पसंद । ऐकोनि आनंद श्रोत्यांसी ॥१४॥
निजाम अलीशहा वसंतकाळी । स्त्रीसह क्रीडत समीप महालीं । कथा सुरस भाषाकळली । गोडी लागली कथेची ॥१५॥
अत्यंत हर्ष पावलें मन । बोलाविला तो गुह्ययजमान । पुसे त्यासी कथा करी कोण । तो करी वर्णन स्वामीचें ॥१६॥
स्वामीतें पाहूं म्हणोनि एकला । निजामराजा पायीं निघाला । एके बाजूस कथेंत बैसला । आनंद पावला ऐकोनी ॥१७॥
सवेंचि बोलाविला पेषकार । म्हणे असावा महिना शंभर । बाराशें रुपयांची जागीर । सांग सत्वर स्वामीसाठीं ॥१८॥
द्वादशशत ग्रामसारा । सनद मुद्रित केली स्वाक्षरा । तबक भरोनी ठेविल्या मोहरा । आणिल्या सत्वरा सभेंत ॥१९॥
कथा संपतांचि पुढें तबकीं । मोहरांवरतीं सनद लेखी । ठेवी निजाम स्वहस्तकीं । स्वामी विलोकी त्यालागीं ॥२०।
म्हणती बापा काय विचार । तेव्हां विनवी पेषकार । आपणासी दिली जागीअ । निजाम सरकारें स्वानंदें ॥२१॥
बोलती आम्हां हे त्रिलोक । तुम्ही काय देतां जागीर एक । धिक्कार संचया रुक्मिणीनायक । देतसे देख अयाचित ॥२२॥
ऐसे ऐकोनि स्वामिबोल । म्हणति हा पूर्ण वैराग्यशील । द्रव्यदारा यासी फोल । साधु अमोल असे हा ॥२३॥
आतां उपाय काय करावा । काहीं द्रव्यांश आपला ठेवा । या साधूचे येथें रहाव । म्हणोनि तेव्हां विचार केला ॥२४॥
दादाबुवा जे कां वडीलपुत्र । त्यांचे नांवें सनद दिली पवित्र । धाडिलें गांवकर्‍या आज्ञापत्र । द्यावें सर्वत्र शेतसारा ॥२५॥
असो ऐसाचि अगाध कथाब्धि । असे स्वामीच्या विरक्तीसंबंधीं । तो वर्णितां होय ग्रंथवृध्दि । येथेंहि अवधि नसे आतां ॥२६॥
असो ऐसा स्वामी विरागी । अखंड मुद्रा ध्यानस्थ योगी । प्रपंच परमार्थ उभयभागीं । सावध अंगीं वर्तत ॥२७॥
स्त्रीलक्ष्मीबाईनामें सुमती । पोटीं दोघे पुत्र सज्ञ असती । वडील दादाबुवा निश्चिती । दुजा म्हणती शितिकंठ ॥२८॥
कन्या राजाबाई सुशील । जन्मली कुलोध्दारक केवळ । आकल्प कीर्ति जिची अढळ । गाती सकळ नरनारी ॥२९॥
जामात गुंडाशिष्य भाविक । ज्याचें भक्तिज्ञानवैराग्य देख । जगीं वर्णिती अद्यापि लोक । ज्याची अचूक गुरुभक्ति ॥३०॥
ज्यानें करोनी सद्गुरुसेवा । मिळविलें पूर्ण निजवैभवा । अतिकष्टें जो लाधला ठेवा । तो ऐकावा येथूनि पुढें ॥३१॥
होतांचि तीन प्रहर रजनी । गुंडा उष्ण करीतसे पाणी । उठोनी ठेवी उपकरणीं । योग्य पूजनीं गुरुजींसी ॥३२॥
सद्गुरु बहिर्दिशे जातेवेळीं । गुंडा पात्र देत करकमळीं । येतांच स्वहस्तें पाद प्रक्षाळी । जळ चुळी भरण्या देत ॥३३॥
होतां मुखामार्जनादि विधी । पंचपाणी ठेवी स्नानसिध्दी । मग आपण करी स्नानविधि । गुंडा सद्बुध्दि तात्काळ ॥३४॥
गुरु स्नानोत्तर म्हणती मंत्र । नेसावया देतसे धूतवस्त्र । पळीतांब्यापंचपात्र । ठेवी पवित्र स्वामींपुढे ॥३५॥
सदुगुरुसी मांडूनि पाट । गंध उगाळूनि ठेवी चोखट । पुढें मांडीतसे देवपीठ । सारोनि नीट सामोग्री ॥३६॥
आपण येवोनि बाहेरी दृष्ट । लावी गुंडा स्वहस्तें कवाड । आपुलें कर्म करुनि ऐलाड । सारी लिगाड व्यापारधंदा ॥३७॥
इकडे चूडामणी देवगृहीं । योगमुद्रा सारोनि पाही । दिनोदयानंतर सर्व काहीं । संध्याजपही जपतसे ॥३८॥
यथासांग स्वधर्मकर्म । सारोनि पूजी पुरुषोत्तम । त्र्यंबकेश्वर प्रगटोनि वर्म । बोधी निष्काम सगुणरुपें ॥३९॥
देवपूजा जाहलेवरी । नैवेद्यवैश्वदेव स्वयें करी । पाकसिध्द झाल्याउपरी । शिष्यांतें पाचारी भोजना ॥४०॥
गुंडा प्रसाद घे गुरुस्थळीं । शिष्यांसह मिळोनि दोनी वेळीं । होतसे भोजना बहू मंडळी । संचय जवळी नसोनियां ॥४१॥
उपजीविका अयाचितवृत्ति । त्यावीण दानप्रतिग्रहवृत्ति । कांहीं नसोनि धरिली निवृत्ति । ऐसी प्रवृत्ति श्रीगुरुची ॥४२॥
असो भोजन जाहल्यावरी । चूडामनी क्षणैक निद्रा करी । गुंडा तेव्हां पायचुरी । उठे तोंवरी सद्गुरुचे ॥४३॥
नंतर मुलांतें शास्त्र शिकविती । आणीक कांहीं पुस्तकवाचिती । मग रात्रौ कीर्तनभजन करिती । गुंडा राहती गुरुसवें ॥४४॥
प्रदोषपूजा पंचपदी । सारोनि संध्याफराळादि । नंतर करिती ध्यानविधी । सगुणसिध्दि एकांत ॥४५॥
सर्व शिष्यमंडळी निद्रिस्त । गुंडा गुरुध्यानीं राहे रत । जेव्हां ध्यान सारोनि गुरु येत । सिध्द होत सेवेसी ॥४६॥
सद्गुरुकरितां शयन । गुंडा करितसे पादमर्दन । स्वामी गुंडासि बोधिती ज्ञान । सगुणनिर्गुणतत्त्वबोध ॥४७॥
ऐसा नित्यही जातसें काळ । तोंपुढें जाहला अतिदुष्काळ । संचय नसोनि स्वामीजवळ । याच्क पुष्कळ येती घरा ॥४८॥
बरीच ये नित्य अयाचिती । तेही होऊं नये पूर्ति । म्हणोनि शिष्य विचार करिती । याचकतृप्ति होय केवी ॥४९॥
पूर्ववत्‍ भाग्यनगरा जातां । वृध्दाप्य आलें सद्गुरुनाथा । उत्सवकर्ज जाहलें माथा । खर्चही सर्वथा नावरे ॥५०॥
स्वामीपासीं येवोनि मंडळी । म्हणती संचय नाहीं जवळी । अतिथी आदर अशा दुष्काळीं । असे यावेळीं चिंताही ॥५१॥
स्वामी म्हणती तुम्हीं फिरावें । कांहीं संचय करोनि आणावें । आले अतिथि पंक्तीसी घ्यावे । नसतां पहावें होय तैसें ॥५२॥
इतक्यांत आली दिपवाळी । घरोघरी थात पक्वान्नपोळी । स्वामी परीक्षा पाहती त्या वेळीं । भाविक मंडळी कितीते ॥५३॥
त्या दिवसीं अयाचिती नाहीं । ना संचय स्वामिगृहीं । ग्रामांत आमंत्रण येतां पाही । गेले सर्वही भोजना ॥५४॥
कुटुंब कन्या आणि आपण । उपोषित बैसले समाधान । दोप्रहरासि व्यापार करुन । जामात निधान पातले ॥५५॥
तंव उपोषित बैसले त्रिवर्ग । अयाचित न दिसे पाकयोग । गुंडा मनीं जाहले दंग । म्हणती प्रसंग असा कां ॥५६॥
सर्वही कळाली गुरुकरणीं । मग जावोनी बैसले एकांतस्थानीं । तंव सासू लक्ष्मीबाई गुरुपत्नी । बोले येवोनि काय ऐका ॥५७॥
आज दिपावाळीचा सण परी । कांही नाहीं आमुचे पदरीं । दैववान् लोक जामातपोरी । आणोनि घरीं सुखी होती ॥५८॥
सुगंध तैलादि स्थानथाट । भोजनपक्वान्न बसाया पाट । आम्हां हतभाग्या मिळेना मीठ । मग चोखट अन्न कैंचें ॥५९॥
टाळवीणाचिपळ्यामृदंग । सदाभक्तिज्ञानबोधप्रसंग । वैराग्य ऐश्वर्य आम्हां अव्यंग । सर्वोपभोग भजनपूजा ॥६०॥
जामातआदर आम्हां न घडे । मिळेना कधीं मुलीसी लुगडें । हा अपराध काय देवाकडे । होणार घडे दैवानुसार ॥६१॥
ऐसा पाहोनि आमुचा ताप । कांही द्यावें हा कराल संकल्प । कन्याधन गोमांसरुप । जरी देतां अमुप नपुरे ॥६२॥
असो दिन तीनप्रहर जाहला । लोक येती गुरुदर्शनाला । श्रीगुरुध्यानामाजी बैसला । पाहतां जनाला भय वाटे ॥६३॥
आज ऐसें कां म्हणती लोक । सणाचे दिनीं नाहीं पाक । काय कारण म्हणोनि सकळीक । पुसती देख आईसी ॥६४॥
आई म्हणे अयाचिती नाहीं । ना संचय असें गृहीं कांही । ऐसें ऐकतां तेव्हां सर्वही । पळाले गृहीं आणावया ॥६५॥
भाविक जावोनियां तात्काळ । अयाचिती आणिली सकळ । स्वामिसदनींजमले पुष्कळ । रवातांदुळशर्करादि ॥६६॥
साहित्य जमतांचि अभिनव । तेव्हां पक्वान्नें केलीं अपूर्व । श्रीगुरु केले नैवेद्यवैश्वदेव । भोजना सर्व पुन्हां आले ॥६७॥
असो त्या दिवसीं रात्रीसमईं । सर्व शिष्य जमले एकेठायीं । तेथें पातले सदुगुजांवायी । त्यात बुध काही या म्हणती ॥६८॥
अहो स्वामीसी हें काय । उपोष घटला कीं निरुपाय । गांवांत सुज्ञ असोनि हा अन्याय । यातें उपाय कांहीं करुं ॥६९॥
जाऊन कोण्याही देशपंथा । एक मुख्य करावी तुम्ही कथा । राहिलें सर्व कृत्य आमुच्या माथां । वचन सर्वथा हेंचि असे ॥७०॥
मागें न सरावें तुम्ही मात्र । एकवार गुरुसेवा करुं सर्वत्र । बरें म्हणोनि गुंडा पवित्र । देती अत्रमान्यतेचे ॥७१॥
दुसरे दिवसीं प्रात:काळीं । सिध्द झाली सर्व शिष्यमंडळी । गुरुसी विनविती उतावळी । आज्ञा या वेळीं द्यावी आम्हां ॥७२॥
आम्ही सर्वही जातों देशावर । आम्हांसवें द्यावा गुंडा सत्वर । कांही धन मिळवूनि एकवार । आणूं निर्धार स्वामिकार्या ॥७३॥
स्वामीनीं मनी विचार केला । वृध्दाप्यजरा आली आपणांला । प्रतिवर्षां जाणें भाग्यनगराला । परि या काला कैसें घडे ॥७४॥
तेव्हां बोलावोनि गुंडासी । म्हणती तुझी आहे इच्छा कैसी । हें निघाले देश संचारासी । इच्छिति तुजसी सवें येण्या ॥७६॥
गुरुआज्ञा वंदूनी ते समयीं । तत्काळ गुंडा निघाला पायीं । शिष्यगणांतील ज्ञाते कांहीं । निघती लवलाहीं प्रवासा ॥७७॥
गुंडाचे शिरीं ठेऊनि हस्त । यशस्वी होईं गुरु म्हणत । निघाले कथासामुग्रीसहित । शिष्यसमवेत वंदूनी ॥७८॥
मार्गात मोठमोठाले ग्राम । तयां क्रमोनि गुंडा सप्रेम । कीर्तनीं द्रव्य जोडिलें परम । आयाचितधर्म रक्षोनी ॥७९॥
प्रत्येक गांवींचे लोक तांतडी । बोलावू येती निज आवडी । गुंडा जातसे यथा सवडी । ग्रामस्था मावडी गमनाची ॥८०॥
प्रत्येक गांवीं कथेचा रंग । ऐकोनि कित्येक झाले नि:संग । गांवोगांवी फिरती अव्यंग । गुंडासंग । धरोनिया ॥८१॥
कित्येकांचे सफल मनोरथ । कित्येकांचे राहिले हेत । कित्येकांचे श्रवण यथार्थ । सोडूनि अर्थ गुंडा जाती ॥८२॥
ऐसा गुंडासह शिष्यवृंद । मार्ग क्रमीत मंदमंद । गांठिलें दक्षिण हैद्राबाद । पाहूनि मोद शिष्यांसी ॥८३॥
दिव्यमहाल कारंजें सुरंग । गल्लोगल्लीं सडका बाग । रथ तुरंग धांवती सवेग । नसे मार्ग अतिदाटी ॥८४॥
गुंडा पायीं चालती वाट । मार्गानें होत भजनथाट । नमून गुंडाची घेती भेट । जन अफाट सवें चालती ॥८५॥
शिवालयीं बिर्‍हाड लाविलें । पाक करोनी भोजन सारिलें । जनसमुदाय दर्शना आले । पुढें ठेविले नाना पदार्थ ॥८६॥
तंव जाला सायंकाळ । संध्यादि कर्म सारिलें सकळ । शहरांतील सभाग्य प्रेमळ । आले पुष्कळ सभ्य लोक ॥८७॥
गुंडासी सर्वांही केलें नमन । म्हणती आज व्हावेंजी किर्तन । मान्य करोनि सर्वांचे वचन । श्रोते जन बहु जमले ॥८८॥
श्रवणां बैसले ज्ञातेबुध । कथासामुग्री केली सिध्द । गुंडा कथेसी उभे प्रसिध्द । शिष्य सावध मागें राहती ॥८९॥
कथेंत गुंडा रागिणीराग । गात दिंडयापद अभंग । तेणें चढला कथेसी रंग । श्रोते दंद होऊनि ठेले ॥९०॥
गुंडा परमार्थबोध करी । गोपीचंद आख्यान वरी । तेणें जना आल्हाद अंतरीं । श्रवणविचारीं एकविध ॥९१॥
थोरथोर येती कीर्तनासी । वर्णिती अतिहर्षे गुंडासी । कथा नाहीं कळतां ज्या दिवशीं । देऊनि द्रव्यांशी करविती ॥९२॥
जालंदरमच्छेंद्रनाथा । वर्णिलें कानीफ गोरक्षपंथा । बोलूनि मैनावती परमार्था । संपली कथा पूर्वदिवशीं ॥९३॥
दुसरे दिवशीं सायंकाळीं । पुन्हां जमली श्रोतेमंडळी । गोपीचंद जोगीकथा समुळीं । आरंभी त्यावेळीं श्रीगुंडा ॥९४॥
श्रोत्यांतील एक परम भक्त । हीच कथा पूर्वदिवशीं युक्त । ऐकोनि जाहला विरक्त । बोले सानुरक्त गर्जेनि ॥९५॥
धन्यधन्य कीर्तन या गुंडाचें । ऐकतांचि मुक्तिदायक साचें । एकेक शब्द निघतां वाचे । तेणें मनाचे भ्रम जाती ॥९६॥
बोधाविषयीं दुजा शुक । कीं बोले बृहस्पतीच नि:शंक । भक्तिज्ञानाचा हा पुतळा एक । अवतरला लोक उध्दारा ॥९७॥
परी एक मोठें यासी लांछन । द्रव्य घेऊनि करी कीर्तन । व्यर्थ गेलें भक्तिज्ञान । वैराग्यहीन स्वानुभवीं ॥९८॥
इंद्रावारुणी शोभेवरी । परी गोड नाहीं जेवीं अंतरीं । तेंवि भक्तिज्ञानदांभिकाचारी । वैराग्यभीतरीं नसोनी ॥९९॥
कीर्तनीं जो करी द्रव्यसंचय । देणार घेणार नरकासी जाय । परिणामींही अधोगती होय । ठरला न्याय शास्त्रमते ॥१००॥
भक्तिज्ञान असे जरि निर्मळ । वैराग्यावीण जाण पांगुळ । परस्परें तैसेंचि जाणा केवळ । बोलूनि प्रेमळ नमी गुंडासी ॥१॥
बोलिल्या ऐसें स्वयेंही चालावें । म्हणोनि बोलिल्या क्षमा करावें । स्ववस्त्र जाळोनि विरक्त व्हावें । गेला स्वभावें यात्रेसी ॥२॥
गुंडानें मनी विचार केला । हा प्रत्यक्ष सद्गुरु भेटला । बोलिल्या ऐसें चालावें म्हणाला । अंग कृपेला नाहीं त्याच्या ॥३॥
म्यांही द्रव्य सद्गुरुकार्यालागीं । जोडिलें जें कष्ट करोनी अंगीं । मी नाहीं त्या धनाचा विभागी । धाडावें वेगीं स्वामीकडे ॥४॥
आरक्त नेत्र विरागभरें । रोमांच अंगीं उल्हास नावरे । संतप्त जाहला विरक्तिविचारें । केव्हां ते खरें करुं वाटे ॥५॥
आख्यानीं तेव्हां गोपीचंदास । जोग दिला भागही अनायास । गुंडाचेंही वैराग्य भरें मानस । होतें उदास त्यावेळीं ॥६॥
कथा करोनी एकघडी । वस्त्र फाडोनी केली चौघडी । गोपीचंदा ऐसी भिक्षा तांतडी । गुंडाही जोडी सभेमाजी ॥७॥
निघाली कथा सद्गुरुदिक्षा । घेऊनि गोपीचंद मागे भिक्षा । तेंवि गुंडाही वदे असे अपेक्षा । न करितां उपेक्षा दान द्यावें ॥८॥
राजा भिक्षा मागे घरोघरीं । मीही तुम्हांसी पदर पसरीं । दयाळू होवोनि मजवरी । भिक्षा सत्वरीं द्या गुरुकाजा ॥९॥
राजा मागतसे स्त्रियांसी भीक । गुंडाही प्रार्थित स्त्रिया सकळीक । वस्त्र जाळोनि राजा लावी राख । मुखीं अलख बोलिला ॥११०॥
गुंडा म्हणे ऐसें राजानें जाळिलें । आपणही वस्त्र दीपीं धरिलें । अंगीं स्वहस्तें रक्षे चर्चिलें । मुखीं बोले अलख अलख ॥११॥
गोपीचंदें स्वराज्यधन । केलें असे गुरुसी अर्पण । तेवि गुंडा शिष्यासी म्हणे प्रार्थून । द्रव्य नेवोनि गुरुसी द्यावें ॥१२॥
जोग घेऊनि गोपीचंद गेला । तैसा कथेंतून गुंडा निघाला । श्रोते अत्यंत चकित मनाला । कैसा जाहला अनर्थ म्हणती ॥१३॥
दु:खित जाहल्या नरनारी । सर्वही गेले आपुल्या घरीं । हा केवधा समर्थ साधु तरी । वर्णना वैखरी असमर्थ ॥१४॥
शोधार्थ कांहीं मंडळी गेली । धुंडोनी निराश परत आली । गुंडाविरहें दु:ख पावली । विस्मित जाहली अत्यंत ॥१५॥
दुसरे दिवशीं प्रात:काळीं । निघाली चूडामणीमंडळी । स्वग्रामा येऊनि गुरुजवळी । कथिली समूळीं गुंडावार्ता ॥१६॥
ती वार्ता ऐकोनि राजाबाई । सखेद झाली अत्यंत हृदयीं । आणीकही सासू लक्ष्मीबाई । दु:खित जांवई आठवोनि ॥१७॥
इकडे गुंडा भाग्यनगराहून । दोन प्रहरांत त्रियोजन । क्रमोनि पावले एकांतस्थान । झाडी सघन भयंकर ॥१८॥
ग्रामाचें नांव रामेश्वरबंडा । येवोनि तेथें स्थिरावला गुंडा । अर्धकोस विस्तीर्ण धोंडा । अरण्य तोंडा ग्रामईशान्ये ॥१९॥
घोर अरण्य भयानक । ओरडती व्याघ्ररीसजंबुक । भयेंचि न जाती तिकडे लोक । बैसला एक तेथें गुंडा ॥१२०॥
तृणासन करोनि प्रस्तरीं । बैसूनियां घोर तप करी । अन्नोदक वर्जिलें निर्धारीं । उष्णकाळ परी अचलत्वें ॥२१॥
गुंडा केवळ विरागपुतळा । भस्म चर्चित तनू करीं माळा । नाम मुखें ध्यात घनसांवळा । काळ वेळां नाहीं जयाते ॥२२॥
आतां पुढें कथा सुरस । श्रोते श्रवण करा सावकाश । नारायणधीस्थ अविनाश । कथापीयूषपान करी ॥२३॥
इति श्रीगुंडामाहात्म्य विख्यात । गुंडा विरागें तप आचरीत । तृतीयाध्याय हा गोड निश्चित । नारायणार्पित होवो हा ॥२४॥

॥ श्रीसदुगुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय ३ रा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 13, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP