श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय विसावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

ॐ नमोजी मंगलधामा । भक्ततारका मनविश्रामा । सर्वगुणाद्या पूर्णकामा । आत्मारामा प्रियकरा ॥१॥
प्रणवरुपी तूं शारदामाता । अखिल कृति तुझी सत्ता । तूंचि सद्गुरु ज्ञानदाता । भक्ता रक्षिता कुलस्वामी ॥२॥
तूं व्यंकटेश तूंचि पांडुरंग । अनंत अवतार धरिसी अव्यंग । भक्तलीला वाढविसी अभंग । संसाररंग तुझेनी ॥३॥
सगुण निर्गुण नाममात्र । परी तूं एकचि स्वतंत्र । शब्देंचि पवित्रापवित्र । सर्वीं सर्वत्र तूंचि तूं ॥४॥
असो आतां पूर्वानुसंधान । श्रीगुंडा साधुराया भेटून । अंबाजोगाईचा मार्ग धरिला मौन । मागें शिष्यगण धांवत ॥५॥
तेथूनी मार्ग क्रमीत क्रमीत । आले अंबाजोगाईपर्यंत । तेथें जोगलादेवी दैवत । असे विख्यात भूमंडळीं ॥६॥
शक्ति महा जाज्वल्य केवळ । जिचा देह अत्यंत विशाळ । थोर विस्तीर्ण असे राउळ । विखार सबळ त्या स्थळीं ॥७॥
भाळ विशाळ शोभे कुंकुम । नानालंकारीं देदीप्य परम । गुंडासि पुढे येवोनि सुगम । नेतसे सप्रेम राउळीं ॥८॥
देव्याज्ञें राउळीं प्रीती । बिर्‍हाड ठेवोनि भजन करिती । देवी देवोनि अयाचिती । पाकनिष्पत्ति करविली ॥९॥
गुंडा देवीसी प्रेमें करुन । करें घातलें पंचामृतस्नान । षोडशोपचारें पूजून । केलें स्तवन एका भावें ॥१०॥
जगन्माता आपुले हातीं । तीर्थप्रसाद देत गुंडाप्रती । जेणें स्वानंद होय चित्तीं । मग करिती भोजन सर्व ॥११॥
स्वानंदें गुंडा भजन करित । देवी पोत कवड्या विभूषित । उदयोस्तु शब्दें भजनीं नाचत । पडली भ्रांत सर्वांसी ॥१२॥
परस्परें ऐशा आनंदीं । सत्वर आलि तेथें उपाधि । खलदुर्जन प्रपंचबुध्दी । कुतर्क आधि घेताती ॥१३॥
एकमेकां म्हणति हांसोनी । ढोंग उतरलें हें देवीस्थानीं । आरानिधीसह नि:संग नाचोनि । गेले भुलोनि देहभावा ॥१४॥
शेटी महाजन सावकार । वेदज्ञ पंडित शास्त्री थोर । सर्वहि करिती तिरस्कार । नाचतो सादर अनाचारी ॥१५॥
हा तरी केवळ साधु दिसतो । परी भूतिणी संगें नाचतो । ऐशातें कोण ब्राह्मण म्हणतो । भ्रष्टवितो देऊळ हा ॥१६॥
तेव्हां तें आलें भजन संपत । क्रोधें उठोनि जाती समस्त । जोगाईसी गुंडा आज्ञा मागत । वरद हस्त ठेवी शिरीं ॥१७॥
अदृश्य झाली अंबा जोगाई । मग शिष्यांसी गुंडा त्या समयीं । आज्ञापिती आतां या ठायीं । राहणें नाहीं त्वरें चला ॥१८॥
मग छलक दुष्ट दुर्जन । राउळीं धाडिले पौरजन । त्यांनीं विटंबना करुन । मृत्तिका शेण उधळिलें ॥१९॥
लोकांनीं छळ बहू केला । परी गुंडासी क्रोध नाहीं आला । छळाकारणें गिरिकंदराला । वास केला संतांनीं ॥२०॥
म्हणोनि गुंडा मंडळीसहित । राजमार्गीं चालले त्वरायुक्त । पाठी चालले समस्त । पळती हांसत पोरें मागें ॥२१॥
ग्रामस्थ सर्व राहिले मागें । गुंडा चालिला पवनवेगें । सप्त कोस जावोनि मार्गें । शीण भागें उभा राहे ॥२२॥
असो पुढें मार्ग क्रमित चालले । मार्तंडपुरा येऊनि पातले । चंपाषष्ठी उत्सवासी अंतरीं । गुंडाची थोरी पहावया ॥२४॥
कारभारी देशलेखक । संतति संपत्ति पूर्ण भाविक । वनोपवन उद्यानें अनेक । रम्य सुरेख असती ज्याचें ॥२५॥
असोनि श्रेष्ठ राज्यासनीं । भगवद्भक्ति अंत:करणीं । अनेक देवालयीं मूर्ति उद्यानीं । सुरम्य स्थापूनि ठेविल्या ॥२६॥
बहु ऐकिली गुंडाची कीर्ति । वैराग्यज्ञानभक्ति वर्णिती । तेणें पहावें वाटे चित्तीं । गुंडामूर्ति सगुण जी ॥२७॥
तत्काळ सिध्द केला आपला मंत्री । प्रार्थना लिहिली बहुतपात्रीं । एकदां पाय दावावे नेत्रीं । तरीच गात्रीं शांति वाटे ॥२८॥
दहासहस्त्र द्रव्यासहित । पत्रिका पावली प्रेमपुरांत । गुंडा ऐकोनि आज्ञापित । पूर्ववृत्तांत वर्तला जो ॥२९॥
एकदां मी गेलों भाग्यनगरासी । मेळविले अपार द्रव्यराशी । कीर्तनीं भुलविलें सर्वांसी । संगीतकेसी दाउनी ॥३०॥
अनेक कथा स्वरगायन । तेणें लोक गेले नि:संग होऊन । तेथें अपार मिळालें धन । त्रास जाण नेतां गांवा ॥३१॥
भक्ति ज्ञान आणि विरक्ति । बुवाचे मुखींच असे म्हणती । परी यांत एक असंगती । धन ओढिती प्रपंच इच्छें ॥३२॥
ऐसे ऐकूनि दूषण बोल । मज वैराग्य जाहलें सबल । वस्त्रपाश धनराशी सकळ । धाडिले केवळ गुरुसी ॥३३॥
सर्व संग्रहाचा केला त्याग । तेव्हां मी होऊनि नि:संग । सृष्टीवरी फिरतों लागवेग । पुन्हां मग तेथें न जावें ॥३४॥
ऐसा वृत्तांत सकळिक । शामरायासी सांगती सेवक । चमत्कारोनि तो भाविक । निघाला नि:शंक तेथूनी ॥३५॥
म्हणे जाणोनि मूर्खत्व केलें । अविधी काय मी पत्र धाडिलें । तनुमनेसि शरण गेलें । पाहिजे एकलें आपण ॥३६॥
म्हणे केला मी गुरुचा अपराध । प्रेमपुरा आला तेव्हां प्रसिध्द । श्रीगुंडा देखिला शांत शुध्द । आनंद अगाध जाहला ॥३७॥
श्रीगुरु गुंडा स्वयंप्रकाश । जाणोनि हें घेतला उपदेश । यथासांग पूजा केली निर्दोष । सावकाश एकचित्तें ॥३८॥
गुरु अग्रपूजा स्थलावर । वसविलें तेव्हां अग्रहार । सप्रेमें शिवलिंग स्थापिलें थोर । म्हणती साचार पुण्यक्षेत्र ॥३९॥
प्रतिवर्षीं सद्गुरु अग्रपूजा । तेथेंचि करी शामराजा । येतसे घेऊनि नाना समाजा । पूजित गिरिजापतीसी ॥४०॥
मुख्य शिवालयासी सोडून । दुजें बांधिलें श्रीगुरुलागीं स्थान । शिवरात्रीं उत्साह नित्य पूजन । श्रीगुरुभजन देवालयीं ॥४१॥
नानालंकारी पांच गुरुवार । सालंकृत पूजिला गुरुवर । दानधर्म गायन सुस्वर । केलें अपार अन्नदान ॥४२॥
मासानंतर पूजा शेवटीं । शामराजा करितसे मोठी । गुरुसी स्नान घाली द्रव्यकोटीं । ब्राह्मणा वांटी धनवस्त्र ॥४३॥
वस्त्रालंकारीं गौरविला । रत्नपुष्प सुगंधमाला । पीतांबरावरी दे दुशाला । भूषविला शिष्यगण ॥४४॥
पाकीं केलें षड्रसान्न । शिष्यांसह पंक्तीसी केलें भोजन । ग्रामस्थ मंडळी पांथस्थ ब्राह्मण । केलें संतर्पण आनंदें ॥४५॥
गांवोगांवींचें द्रव्यें आणिती । कित्येक तेथे उपदेश घेती । कित्येक धन घेऊनि जाती । गुंडासी पूजिती कित्येक ॥४६॥
कोणी येती भेटीसी लोक । वस्त्रहरण करिती कित्येक । धनासी जपती कित्येक याचक । नाहीं अटक कोणाकोणाचा ॥४७॥
अंगावरील देऊनि वस्त्र । गुंडा स्त्रीसह नेसले धोत्र । निघाले तेथूनियां स्वतंत्र । मार्ग पवित्र अवलंबिला ॥४८॥
ग्रामीं राहिलें एक मास । नित्य स्नाना जाती उद्दालिकेस । गुरुसमाधीची सावकाश । करिती निर्दोष पूजा नित्य ॥४९॥
एकदां मस्तान साहेबवले । देगलुरीं बैसले वृक्षाखालीं । गुंडासह स्नाना मंडळी चालिली । ती पाहिली त्यांनीं तेव्हां ॥५०॥
वली रहाती सदा नग्न । त्यांनीं गुंडा जातो हें पाहून । पशु अस्थीनें गुह्यस्थान । टाकिलें झांकून मागें पुढें ॥५१॥
गुंडासी पुसती शिष्य कोडें । मस्तान साहेब असूनि वेडे । गुह्य झांकिलें पशूच्या हाडें । पाहोनि तुह्माकडे कां स्वामी ॥५२॥
गुंडा म्हणे तत्कारण मीही । त्यांचें यथार्थ जाणत नाहीं । पुसा जाऊनि तुम्ही सर्वही । म्हणतां कांहीं शिष्य गेले ॥५३॥
म्हणती गुंडासी पाहूनि आपलें । तुम्हीं कांहो गुह्य झांकिलें । कित्येक जण आले गेले । नाहीं केलें ऐसें तुम्ही ॥५४॥
वली म्हणे अरे भाई लोको । यहांसे जरा तुम आको । पाय उचलोनि म्हणे देखो । पाहतां लाखों पशू सर्व ॥५५॥
व्याघ्र वृश्चिक खर गज अश्व । अनेक पशु दिसती सर्व । परी त्यांत एक गुंडा मानव । पाहिलें अपूर्व शिष्यांनीं ॥५६॥
लोकां भासला हा वली वेडा । परी तेव्हांपासूनि झाला निवाडा । म्हणती समर्थ असोनि एवढा । आम्हां मूढां कळलें नाहीं ॥५७॥
गुंडाही असे समर्थ । सर्वांसी कळलें हें यथार्थ । असो गुंडा गेले स्नानार्थ । शिष्यही तेथ पातले ॥५८॥
श्रीगुरु चूडामणीची समाधी । स्नानाहूनि येतां पूजिली आधीं । तीर्थ घेऊनि निघतां त्रिशुध्दि । प्रार्थिती सविधी ब्राह्मण ॥५९॥
ब्राह्मण म्हणती सद्गुरुराया । कूप खणिला असे या ठाया । आपण चलावें तो पहावया । म्हणूनि पायां लागती ॥६०॥
पंथिकां येथें सोय सकळ । परी नाहीं या स्थळीं जळ । पाषाण लागला मोठा सबळ । होतों व्याकुळ खणितांना ॥६१॥
येथें नाहींच कीं काय पाणी । किंवा गेली जागा चुकोनी । श्रम होती बहु खणोनी । एकदां नयनीं पहावें ॥६२॥
चूडामणि समाधिसमोर । हा वृत्तांत ऐकिला साचार । प्रदक्षिणा करोनियां सत्वर । केला नमस्कार समाधीसी ॥६३॥
कुपामाजीं पाषाण लागला । बहु श्रमाने तोही फोडिला । परी पाणी नयेचि कूपाला । निर्धार जाहला गुंडाचा ॥६४॥
परी म्हणती श्रम पुरे येथ । आठविला तेव्हां श्रीगुरुनाथ । जवळी होतें जें समाधितीर्थ । टाकी कूपांत गुंडा स्वकरें ॥६५॥
म्हणती आतां श्रम करुं नये । बळें करितां असें तें न राहे । दोन झरे कूपीं लागले स्वयें । सोज्वळ पाहे उदकाचे ॥६६॥
कृष्णाबाई कुंडलवाडीकर । स्वयें मठ बांधिला त्यासमोर । कूपही तिनें बांधिला साचार । पायर्‍या सुंदर त्यासी केल्या ॥६७॥
गुंडासि येत नित्य अयाचित । त्याच जळानें पाक होत । सहस्त्रावधि ब्राह्मण जेवीत । पिती निश्चित जळ तेंचि ॥६८॥
असो एकदां देवपुराहून । श्रीगुंडा पंढरीस जाऊन । चातुर्मास भजन संपवून । काला करुन परतले ॥६९॥
साधुरायाचें स्मरण जाहलें । ग्रामासी यावें पूर्वीं म्हणाले । म्हणूनि त्याच मार्गें निघाले । कोठें चालिले हें कोणी नेणें ॥७०॥
यापरी सत्वर पंथ क्रमोनी । गुंडा आले कंधारा लागुनी । जवळी उतरले एका उपवनीं । शिष्य घेऊनी सांगाती ॥७१॥
ग्रामांती प्रगट झाली मात । गुंडा सकळ शिष्यांसमवेत । येवोनि उतरले उपवनांत । निघाले समस्त बोलवाया ॥७२॥
टाळवीणा नानावाद्य गजर । घेऊनि साधुराय आले समोर । तंव गुंडा नाहींत देहावर । ब्रह्माकार जाहले ॥७३॥
हातीं घेऊनि टाळवीणा । नामघोष करी रसना । गिळिलें द्वैताद्वैतभाना । अद्वैत भजनामाजी तेव्हां ॥७४॥
तंव साधुराय तेच प्रंसंगीं । दृढ धरिती चरणालागीं । गुंडा सावध होऊनि वेगीं । साधूतें आलिंगी सप्रेमें ॥७५॥
सर्वांनींही केलें नमन । प्रार्थना केली श्रीगुंडालागून । आश्रमा येवोनि करा पावन । म्हणोनि चरण धरियेले ॥७६॥
तंव गुंडा उठतां तत्काळ । ग्रामपंथें चालिले सकळ । हरिनामघोष गर्जती प्रेमळ । मृदंगटाळ घेऊनी ॥७७॥
वाद्यनाद चालला सुस्वर । मध्यें भजनाचा ध्वनि सुंदर । नादें दुमदुमिलें अंबर । उत्साह थोर होतसे ॥७८॥
कित्येक चक्राकारें नाचती । नाच नाचूनि पाय टाकिती । कित्येक स्वानंदें उडया घेती । प्रेम चित्तीं अनावर ॥७९॥
परिवार स्वस्थळासी आणिला । उत्तम आश्रम दिला तयाला । श्रेष्ठासनीं गुंडा बैसविला । सांग पूजिला यथाविधि ॥८०॥
गंधाक्षतसुमनतुळसी । नाना परिमळ द्रव्यराशी । राजोपचारें पूजोनि वेगेंसी । गुंडा मानसीं तोषविले ॥८१॥
ही वार्ता कळली देशावरी । कीं गुंडा आले असती कंधारीं । लोक धांवती सहपरिवारीं । दर्शना निर्धारीं गुंडाच्या ॥८२॥
साधुसंत यती महंत । दर्शना येती कळतां मात । आनंद लोटला अत्यद्भुत । पंक्ति बहुत होताती ॥८३॥
हनुमंतरावही साधु थोर । ज्ञानविरागी समयचतुर । बोलावून आणवी तो श्रीधर । कंदकुर्तीकर महायोगी ॥८४॥
जो शास्त्रविद्येमाजी समर्थ । सगुण साक्षात्कारीं ज्याचें सामर्थ्य । रामलक्ष्मणसीता राबती जेथ । भगवद्भक्त श्रेष्ठ ऐसा ॥८५॥
रामनवमींत याचकजन । आणिक जेविताती ब्राह्मण । अधिकारपरत्वें दक्षिणा जाण । विप्रां देऊन तोषवित ॥८६॥
विद्यामदें मातले मदांध । परीक्षा दाविती पंडित प्रसिध्द । परी कधीं अपमानीना बुध । मानूनि शुध्द आदरीं ॥८७॥
श्रीधराची पूर्वकथा । यथोचित सांगतों ऐका आतां । बालत्वींच विद्येनें मान्यपंडितां । पढोनि तत्वतां गुरुकृपें ॥८८॥
शास्त्रविद्या जाहली बहुत । पाहत चालिला पुढील प्रांत । एके देउळीं उतरला पुण्यांत । ब्राह्मण समस्त भेटों आले ॥८९॥
सर्वही शास्त्रांत निपुण । सूर्या ऐसा तेजस्वी ब्राह्मण । परी श्रीधरासी इच्छा गहन । मिळावें धन अपरिमित ॥९०॥
राजवाड्यांत श्रावणमासीं । द्रव्य वांटिती ब्राह्मणांसी । अधिकार नाहीं यजमानासी । परीक्षावयासी ब्राह्मणांतें ॥९१॥
अपमानिती ब्राह्मण थोर । प्रतिष्ठा पावले अज्ञ नर । त्रास पावती पंडितचतुर । अज्ञ संभार मातला ॥९२॥
ज्ञाते दाविती बहु पांडित्य । परी त्याहूनि होय वैपरीत्य । म्हणती मागावें कोरान्न नित्य । आतां सत्य विद्वानांनीं ॥९३॥
ब्राह्मणांचा मिळोनि समूह । गदारोळी माजविती बहु । कोणी कोणाची विद्या न शके पाहूं । जमले राहु पंडिता ॥९४॥
तेव्हां श्रीधर म्हणे ये वेळे । ऐसे ज्ञानांध जमले सगळे । तेथें महाभागवत काय कळे । स्वार्थडोहळे वृथा आम्हां ॥९५॥
द्रव्यलोभें मी मतिमंद । होवोनि जाहलों केवळ अंध । स्वत: सिध्द टाकोनि स्वानंद । द्रव्यवेध वाहिला मनीं ॥९६॥
द्रव्यासाठीं जाहलो मी दीन । नपाहे कोठें मानापमान । ग्रामोग्रामीं फिरतों रात्रंदिन । घरोघरी धन द्या म्हणोनी ॥९७॥
मनीं धरोनि दृढ द्रव्याशा । तूं काय उपेक्षिसी ईशा । व्यर्थ गुंतलों मी प्रपंचपाशा । धरोनि दुराशा नाडलों ॥९८॥
ऐसा करितां विचार चित्तीं । श्रीधरासी जाहली उपरती । म्हणे सगुण श्रीराममूर्ति । घ्यावी प्रीति येथूनि ॥९९॥
बैसला शिवालयीं स्नान करुन । करी श्रीमद्भागवत पारायण । निश्चक्र केलें सप्तदिन । भार घालून रामावरी ॥१००॥
हा वृत्तांत सर्व लोकां कळला । कीं श्रीधरें सप्ताह आरंभिला । सप्तदिन उपाशीं बैसला । कळलें राजाला तेधवां ॥१॥
येताती महाजन साहूशेटी । कित्येक टोळी श्रीधर भेटी । राजा म्हणे इच्छेसाठीं । बैसला हट्टी होऊनि तुम्ही ॥२॥
श्रीधर म्हणे रामदातार । त्याहूनि कोण दुजा देणार । इच्छा पुरवील तो रघुवीर । ठेविला निर्धार त्यावरी ॥३॥
श्रीराम ज्यावरी करील कृपा । त्यासी सर्वस्व मिळेल बापा । सोडूनि परमार्थमार्ग सोपा । आशासंकल्पा किती झुरुं ॥४॥
विद्या दावितां द्रव्य देती राय । तें काय आमुचे जन्मा जाय । परमार्थ सांडूनि प्रपंची काय । झिजवावा काय कोठवरी ॥५॥
ऐसी ऐकूनि श्रीधरमात । सहस्त्र करिती लोक समस्त । कीर्ति प्रगट झाली जगांत । साधुसंत भेटों येती ॥६॥
असो जेव्हां धरिला विराग । पुढें पडला द्रव्याचा ढीग । लोक उचलोनि नेती सवेग । मिळाला भाग जो ज्यातें ॥७॥
असो सन्मान पुणें नगरीं । होतां निघाला श्रीधर सत्वरी । गांवोगांवीं थाट नानापरी । होत घरीं पातला ॥८॥
एकदां आली रामनवमी । अन्नदान करिती श्रीधरस्वामी । परी घृत नव्हतें किंचित धामीं । अथवा ग्रामीं कोठेंही ॥९॥
शिष्य म्हणती श्रीगुरुराय । आला मोठा संकटसमय । घरांत घृत नसे तिळप्राय । करावें काय यासी आतां ॥११०॥
अमृततुल्य असे पाक सिध्द । परी घृताविण अडलें शुध्द । विप्र भोजना बैसले अगाध । धुंडिलें बुध ग्रामीं सर्व ॥११॥
ऐसी वार्ता ऐकूनि श्रीधर । स्तब्ध बैसला आसनावर । आठविला श्रीजनकजावर । मुख्याधार जयाचा ॥१२॥
ध्यानीं प्रगटूनि राममूर्ति । कारे स्तब्ध श्रीधरा म्हणती । उसनें घृत घेउनि मागुती । देईं गंगेप्रती सत्वर ॥१३॥
तेव्हां रामाज्ञें श्रीधर उठला । शिष्यांसह गंगातटीं आला । घागरी भरोनि नेती जला । वाढिती लोकांला यथोचित ॥१४॥
अत्युत्तम रवाळ सुगंधि घृत । जन सेवोनि झाले तृप्त । चहूंकडे प्रगटली हे मात । उसनें घेत गंगेपासूनी ॥१५॥
अन्नप्रतापें उत्साह जाहलियावरी । परम उसनें घृत घागरी । आणोनि टाकिलें गंगेमाझारीं । आपुले करीं स्वामीनें ॥१७॥
ऐसा श्रीधर महायोगिराव । प्रार्थूनि कंधारा आणिला तंव । एकमेकांसी भेटती सर्व । अद्वय भाव धरोनी ॥१८॥
एक दत्त एक रघुनंदन । एक पंढरीनाथभक्त पूर्ण । ऐसे त्रैमूर्ति प्रेमें करुन । देती आलिंगन येरयेरां ॥१९॥
तिघेही एकांतीं बैसले । स्वानंद दाविती आपुलाले । ब्रह्मानंदीं निमग्न जाहले । मौन राहिले बोलतां ॥१२०॥
श्रीधर आणि साधुराय घेतां संशय । गुंडा करी त्याचा निर्णय । धरिती एकमेकांचे पाय । जे निर्भय कलिकाळीं ॥२१॥
एकांतीं स्नानसंध्या करिती । आपुलालें दैवत प्रगटविती । पंक्तींत भोजना बैसविती । शेष सेविती स्वानंदें ॥२२॥
गुंडा एक मास रहावा म्हणूनी । अयाचिती आणविली मेळवोनि । तेथें गुंडा त्रिरात्र राहोनि । निघाले वदनीं नाम घेत ॥२३॥
ग्रामाबाहेरी गुंडा गेलें । कळतांचि साधुराय पातले । श्रीधरही तेथें मागेंचि आले । बहु प्रार्थिलें उभयतांही ॥२४॥
साधु म्हणती हें पद पवित्र । राहवें वाटती चार रात्र । गुंडा म्हणती आतां अणुमात्र । नाहीं स्वतंत्र रहावया ॥२५॥
मग तेथेंचि उपवनीं समस्त । ग्रामस्थें आणिलें अयाचित । पाक करोनि भोजन होत । राहिले तेथ एके रात्रीं ॥२६॥
दुसरे दिनीं गुंडा निघाले । उभयतांही बोळवीत आले । पुढें श्रीधर एक मास राहिले । तेही निघाले तेथूनि ॥२७॥
जैसा गुंडासि केला गौरव । तैसाचि श्रीधरासी केला तंव । वस्त्रभूषणें देऊनि अपूर्व । बोळविती सर्वग्रामस्थ ॥२८॥
तेव्हां म्हणती लोक सकळ । चार दिन आनंदें गेले केवळ । एकटे राहिले साधुराय मूळ । तेणें तळमळ वाटे सकळां ॥२९॥
पुढें कथा ऐकोत भाविक । श्रीधरासी गुंडा भेटती देख । वीरप्पाचा जो गुरु देशिक । वरदायक नारायणा ॥१३०॥
इति श्रीगुंडामाहात्म्यकथन । अंब्यांत गुंडासी विटंबिती दुर्जन । श्रीधरकथा कंधारागमन । अध्याय पूर्ण हा विसावा ॥१३१॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥

अध्याय २० वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP