मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीगुंडामाहात्म्य| अध्याय आठवा श्रीगुंडामाहात्म्य अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय आठवा प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : gunda mahatmyaगुंडा माहात्म्य अध्याय आठवा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नम: ॥ ॥ श्री गुरवे नम: ॥ॐ नमो आदिचिन्मंगलमूर्ति । गणाधीश सगुण गणपति । विघ्नांतका प्रार्थितों तुजप्रति । द्यावी स्फूर्ति ग्रंतारंभीं ॥१॥तूं शारदा विश्वविलासिनी । हंसवाहिनी प्रणवरुपिणी । प्रार्थितों तुज वाग्वरदायिनी । भरी कथनीं अद्वयरस ॥२॥शिव सर्वात्मा सद्गुरु शंकर । धन्य गुंडा भक्त प्रियकर । अनंतरुपें तूंचि महीवर । करिसी उध्दार नारायणा ॥३॥आतां कुलस्वामी श्रीव्यंकटेश । नमूं प्रत्यगात्मा श्रीनिवास । पांडुरंग धीरुक्मिणीविलास । साह्य ग्रंथास व्हावें तुम्ही ॥४॥जेंविं बालकाचे बोल बोबडे । मातापित्यासि मधुर उघडे । तेंवि माझे अरुष बोल घडे । ज्ञात्यासि निवाडे प्राकृत ॥५॥असो पूर्वाध्यायीं सुबोध । मोक्षप्रद गुरुशिष्यसंवाद । चूडामणिनिर्याणावरी प्रसिध्द । ऐका शुध्द गुंडाभक्ति ॥६॥जेंवि पूर्वीं हेम मळकट । सोनार गाळोनि करी चोखट । तेंवि श्रीगुरुकृपें गुंडा श्रेष्ठ । झाला स्पष्ट बावनकशी ॥७॥भक्तिज्ञानवैराग्यें आगळा । विवेकमूसीं शोधिला हेमगोळा । फुंकोनि श्रीगुरुबोधाग्निज्वाळा । गुंडा पुतळा सिध्द केला ॥८॥तेव्हां गुंडा शोभला सिध्द कोटी । कोणी परीक्षितांही कसवटी । ज्याची कीर्ति वर्णितां उल्हास पोटीं । चरित्र यासाठीं ऐका पुढें ॥९॥श्रीगुरु समाधिस्थ झाल्यावरी । गुंडा राहोनि आपुल्या घरीं । उदरनिमित्त व्यापार करी । परी अंतरीं उदास ॥१०॥पूर्वींच गुंडाची विरागसीमा । त्यावरी गुरु गेले परंधामा । परी गुरुआज्ञे प्रपंचकर्मा । जाणोनि वर्मा वागत ॥११॥धन्य राजाई परम पवित्र । पतिसेवा न चुके अणुमात्र । पतिचरणींच साधी परत्र । गुणसुगात्र महासाध्वी ॥१२॥प्रसंगीं साह्य मंत्री जैसा । दासीपरी मृदु बोल अहिंसा । भोजनीं प्रेमा मातेऐसा । शोभे विलासा रतिदुजी ॥१३॥कर्मधर्मासी सदा अनुकूल । अत्यंत शांत स्वभाव केवळ । कुलोध्दारक शोभे सुशील । गुणें अमोल गुंडाकांता ॥१४॥गुंडाचें वैराग्य तीव्र अत्यंत । तें परीक्षावया देव येत । ती कथा ऐका श्रोते समस्त । सावचित्त पुढें आतां ॥१५॥एकदां गुंडा दुकानीं पाही । गृहीं एकटीं होती राजाई । तों ब्राह्मणवेषें देव त्या समयीं । पातला गृहीं वृध्दरुपें ॥१६॥राजाई ओळखूनि ब्राह्मण । त्यासि दिधलें नमोनि आसन । प्रार्थी आसनीं बैसा म्हणून । आदरमान करोनियां ॥१७॥म्हणे काय आज्ञाजी विप्रोत्तमा । सांगा ग्रामनाम काज जें तुम्हां । यजमान गेले व्यापारकर्मा । येतांचि धामा सांगेन तें ॥१८॥किंवा आपणचि दुकाना जावें । कोण कार्य ते कळवावें । अथवा काय ते मज सांगावें । पतीस भावें सांगेन तें ॥१८॥विप्र म्हणे माझें पंढरीग्राम । आणि विठ्ठलदेव नाम । भिक्षुक मी दरिद्री परम । गेला जन्म संचारांत ॥२०॥वेदविद्याही येतसे पवित्र । विद्वत्सु दरिद्रता वेदशास्त्र । बहु कष्टें पोशिलें पुत्रकलत्र । जन्म परतंत्र जाहला ॥२१॥नित्य कांहींतरी जोडितां जोडी । साजरी होय मध्यान्हघडी । बत्तिसी केल्याविण उघडी । नमिळे कवडीनिश्चयें ॥२२॥त्यांत घरीं मुलगा उपवर । म्हणोनि केला लग्ननिर्धार । परी लग्न नोहे तें विघ्न साचार । आलें भयंकर मज वाटे ॥२३॥आधींच वधूप्राप्ति दुर्घट । त्यावरी द्रव्याचें महासंकट । फिरतों देशांतरीं परी अदृष्ट । कृपा वरिष्ठ बाईची ॥२४॥धिक् धिक् या जन्मा काय करुं । निरुपाय उघडें लेकरुं । किंवा विष खाऊनि मी मरुं । दाटें गहिंवरु ब्राह्मणासी ॥२५॥दशा विप्राची ऐकूनि त्या वेळा । राजाईसी आला कळवळा । म्हणे विप्रोत्तमा दु:ख सांभाळा । गोष्ट दयाळा ऐका एक ॥२६॥दुकानाहूनि प्राणनाथ । येतांचि कळवीन ही मात । महत्कार्य जाणोनि यथार्थ । द्रव्य अमित देतील ॥२७॥देव असे अत्यंत नाटकी । राजाई बोलतां सचिंत ऐकी । अधो पाहे श्वासोच्छवास टाकी । अष्टाक्षर घोकी काय कसें ॥२८॥त्रैलोक्य ज्याच्या मोहाधीन । तो दीनपणें करी रुदन । विप्रनेत्रीं अश्रू पाहून । व्याकूळ जाण राजाई ॥२९॥साध्वी म्हणे यासी काय देऊं । कीं प्राणनाथा आतांचि बोलावूं । याचका कैसी दवडूनि लावूं । कीं अंत घेऊं आला हरी ॥३०॥जरी पतीकडे जाऊं या वेळे । तरी हा राहें कां जाय न कळे । स्वामी काय म्हणती हें न कळे । सत्वही मळे निरर्थक ॥३१॥विप्र निराश उठोनि चालिला । तंव त्या सतीनें निश्चय केला । कांहीं अलंकार द्यावा याला । म्हणोनि प्रार्थिला माघारी ॥३२॥गृहांत जावोनि सती समर्थ । धैर्ये आणिली मुक्तलग नथ । म्हणे हें घ्या साधा कार्यार्थ । जावोनि यथार्थ विप्रोत्तमा ॥३३॥विप्रासी जाहला अत्यानंद । राजाईसी वदे आशीर्वाद । आचंद्रार्क दोघें कीर्ति अभेद । पावाल पद निर्वाणीं ॥३४॥विप्र उठोनि गेला बाहेरी । राजाई मनांत चिंता करी । ही गोष्ट पतीसि कळेल जरी । म्हणती तरी काय नेणो ॥३५॥इकडे विप्र जाय लगबग । पुसे लोकांसी हटमार्ग । गुंडाचे दुकानीं आला सवेग । नमोनि मग बसवी गुंडा ॥३६॥गुंडा सविनय विप्रवर्या । पुसे आपण आलां कोणा कार्या । नाम ग्राम आज्ञा जी या समया । करोनि दया सांगावे ॥३७॥नाम विठ्ठल ग्राम पंढरी । भिक्षुक दीन देशसंचारी । उपवर मुलगा लग्न घरीं । आलों निर्धारीं धनासाठीं ॥३८॥फिरतफिरत आलों येथ । तों कोणी बाई साध्वी समर्थ । दीन दयेनें मज यथार्थ । दिधली नथ ती ही असे ॥३९॥विप्रें गुंडा हातीं नथ दिली । अमुक द्रव्य बोली ठरली । गुंडांनीं नथेची परीक्षा केली । बुध्दि भ्रमली रजोगुणें ॥४०॥म्हणती ही टीक आणि मोती । अमक्यापाशीं घेतलीं होतीं । मग ही केंवि विप्रा हातीं । आली निश्चिती कळेना ॥४१॥आपण आतांचि गृहासि जावें । पूर्वी आपल्या स्त्रीसी पुसावें । नंतर वाटे ऐसें करावें । मनोभावें निश्चय केला ॥४२॥विप्रासि म्हणे अहो स्वामी । क्षणैक दुकान सांभाळा तुम्ही । नेमिलें धन तें आणितों मी । जाऊनि धामीं आतांचि ॥४३॥ब्राह्मण म्हणे कायरे बाळ । तुझें दुकान तूं सांभाळ । बरा नाहीं आतांचा काळ । लोक बाष्कळ बहु झाले ॥४४॥आधीं नथ माझी मज देईं । मग वाटेल तिकडे तू जाईं । दुजा कोणी पाहूं ग्राही । कळली भलाई शहाण्या ॥४५॥बाबा असे मीं गरीब ब्राह्मण । माझें येथें आहे तरी कोण । मागें पळावें हातचें देऊन । हें शहाणपण मज नये ॥४६॥गुंडा म्हणे स्वामी न व्हा अधीर । हें दुकान तुमचें निर्धार । मी द्रव्य आणितों सत्वर । नाहीं उशीर आलों मी ॥४७॥विप्र म्हणेरे बाबा जावें । माघारा मात्र सत्वर यावें । मज वृध्दातें न दिसे बरवें । दृढ लावावें दुकान तुवां ॥४८॥गुंडा दुकान लावोनि जातां । रजोगुणें वाढली ममता । म्हणे स्त्रीनें न विचारितां । नथ विप्रहस्ता दिली केंवि ॥४९॥स्त्रियेसि बोलत दटावून । तुझी नथ कोठें पाहुं ती आण । हें नावडे स्वतंत्र लक्षण । कळलें ज्ञान तुझें पुरें ॥५०॥ऐसा दुर्गुण मज नावडे । चल आण नथ पाहूं इकडे । घाबरी साध्वी पाहे चहूंकडे । ऐकतां सांकडें दुर्घट तें ॥५१॥पतिपद चिंतूनि सती बोले । डब्यांत नासिकभूषण ठेविलें । डबा आणितां गुंडा पाहू लागलें । आश्चर्य वर्तलें तेव्हां पुढें ॥५२॥एकाकृति नथा दो ठायीं । पाहूनि आश्चर्य करी राजाई । सत्य ही करणी ह्या समयी । दावित विठाई दीनासाठीं ॥५५॥आठवितां मी पतीचे पाय । आली पाहूनि संकटसमय । धन्य तुवां उपकार केला माय । उतराई काय होऊं तुज ॥५६॥जन्मवरी न विसरें उपकारा । म्हणतां नेत्रीं अश्रुधारा । सद्गद रोमांच स्वेद शरीरा । स्तब्ध सुंदरा जाहली ॥५७॥तेव्हां गुंडा खालीं पाहतां । आश्चर्य झाले अवचिता । करीं होत्या ज्या दोन नथा । एकचि तत्वतां राहिली ॥५८॥गुंडा स्त्रीसि म्हणे नथा दोन्ही । पाहिल्या तुवां आतांच नयनीं । एक राहिली एक जावोनि । विचत्रकरणी वाटे ही ॥५९॥प्रभो तुझी अघटित लीला । कधीं नेणवे ब्रह्मादिकांला । तेव्हां काय कळे मज मूढाला । म्हणोनि बैसला स्तब्ध गुंडा ॥६०॥श्रीगुरुचूडामणिपद । स्मरोनि तेव्हां पावला आनंद । विप्रस्मृति होतांचि विशद । होवोनि सावध स्त्रीसी बोले ॥६१॥फार वाईट हें मी केले । दुकानीं विप्रा एकटें ठेविलें । स्वार्थासाठी येणें घडलें । कैसें भ्रमलें मन हें माझें ॥६२॥नेमिलें द्रव्य घेऊनि तत्काळ । दुकाना जाय गुंडा उतावीळ । नाहीं विप्र दुकानीं मूळ । म्हणोनि व्याकूळ जाहला ॥६३॥गुंडानें सर्व पाहिली पेठ । परी कोठेंही न पडे गांठ । आतां कैंची विप्राची होय भेट । म्हणोनि शेवट खेद करी ॥६४॥अहा हें कर्म कैसें गहन । विप्र कैंचा हा रुक्मिणीरमण । यासि प्रत्यक्ष देवोनि दान । पुन्हां हिरोन घेतलें मी ॥६५॥जरी सर्वस्व दिलें असतां । तरीही न होय त्याची समता । कैसी बुध्दि गुंतली स्वार्था । काय आतां करु मी ॥६६॥प्रभो मजविषयी कठोर । कां झालासि ऐसा साचार । जरी अपराधी मूढ मी पामर । तरी दीनोध्दार ब्रीद तुझें ॥६७॥म्यांचि तुझा केला अन्याय । मग तुजवरी बोल काय । प्रायश्चित्ताविण याचा निर्णय । केंवि होय हेंही खरें ॥६८॥दुकानांतील द्रव्य सर्वही । घेवोनि आला तत्काळ गृहीं । पूर्वीच विरागी गुंडा विदेही । त्यावरी पाही हें निमित्त ॥६९॥गृहासि यावया साचार । रात्र झाली एक प्रहर । भोजनादि सारोनि सत्वर । करी विचार स्त्रियेसि ॥७०॥गुंडा म्हणे आपणाकडे ऋण । ठेवोनि गेला वेषधर ब्राह्मण । ते फेडावया सिध्द मी पूर्ण । काय वर्तमान तुझें सांग ॥७१॥विप्र कैंचा तो पांडुरंग । ठकविलें मज तो गेला प्रसंग । ऋण फेडीन झिजवोनि अंग । जाहलें नि:संग काय बोलूं ॥७२॥जरी तुज प्रपंचाची चाड । तरी तूं सांभाळीं ही रोकड ।मज इच्छिसी तरी तें सोड ।अलिप्त द्वाड मानूनि ॥७३॥जरी सोडिसी प्रपंचदुराशा । तरी ऋणमुक्तत्वें पावशी ईशा । मनीं वाटेल प्रपंच आशा । मग संग मृषा सोड माझा ॥७४॥मज अवश्य जाणें देशावरी । संगें येतां कष्ट होतील भारी । न मिळे अन्नतोय वेळेवरी । म्हणोनि घरीं राहें सुखें ॥७५॥केव्हां मिळे अन्न खावयासी । केव्हां रहावें लागे उपवासी । केव्हां अरण्य केव्हां ग्रामवासी । दुर्दशा ऐसी घडेल ॥७६॥बोल काय जें वाटे हित । मी पाहिजे किंवा आवडे वित्त । त्या अन्वयें मज कळत । क्रियाविहित करावया ॥७७॥पतीच्या दृढ धरोनि पायीं । सद्गद कंठ बोले राजाई । उपेक्षूं नये जरी मी अन्यायी । पदरीं घेई स्वामिया ॥७८॥मीं तुमचा अपराध केला । न पुसतां द्रव्य दिलें विप्राला । आज्ञोल्लंघनदोष घडला । तें भोगणें मला आलें कीं ॥७९॥मातापिताहीन मी परदेशी । तुम्हांविण कोण आहे मजशीं । क्षमा असावी या समयासी । प्रार्थना तुम्हांसी प्राणनाथा ॥८०॥त्रिलोकसाम्राज्य असे जरी । जळो तें नलगे मज निर्धारीं । शपथ तुमची वाहतें खरी । राहीन मी बरी तुम्हांसवें ॥८१॥नको नको तें गृहधन । परदेशी मी तुम्हांविन । संगें सेवेंत तुमच्या राहीन । उच्छिष्ट सेवीन सुखें मी ॥८२॥या गृहधनासि दग्ध करावें । किंवा कोणासीही दान द्यावें । परी जाल तिकडे मज न्यावें । तुम्हांसवें येईन मी ॥८३॥ऐसें राजाई काकुलती बोले । ऐकोनि गुंडाचें मन द्रवलें । तेव्हां स्त्रीचे समाधान केले । पाहूं बोलिले उदयीक ॥८४॥दुसरे दिवशी सूर्योदयसंधि । मुखमार्जनादि सारोनि विधी । स्त्रीसि चला म्हणती बाहेर आधीं । निघाले सुसंधी दोघेही ॥८५॥धोतर आंगवस्त्र टोपी डोईं । वीणाचिपळ्या गुंडा सवें घेई । लुगडे चोळी घेत राजाई । यावीण कांहीं संग्रह नसे ॥८६॥एकेक वस्त्रें बाहेर येऊन । ग्रामांतील बोलाविले ब्राह्मण । म्हणती हें धन कृष्णार्पण । जावें घेऊन वाटे तें ॥८७॥त्यांतील वृध्द थोर थोर । म्हणती तुम्ही ज्ञाते चतुर । असोनि ऐसा कां हा विचार । अनर्थ साचार मांडिला ॥८८॥मानावा तुम्हांसी संततिखेद । तरी तुम्ही काय झालां वृध्द । संपत्ति तरी आहेचि अगाध । मग कां छंद ऐसा धरिला ॥८९॥कोणीं कांहीं बोलिलें असेल । तरी तुम्ही आहां शांतशील । मग निष्कारण कां गृहांतील । धन सकल लुटवितां ॥९०॥किंवा याचें कारण तें काय । कीं कोणीं कांहीं केला अन्याय । हें सांगतां करुं त्याचा उपाय । यथान्याय प्रमाण हें ॥९१॥मिळाले सर्वही ग्रामाधिकारी । थोर लहान नरनारी । प्रार्थना करिती बहुतांपरी । सर्वही व्यापारी मिळोनी ॥९२॥तेव्हां गुंडा सर्वांसी प्रार्थित । करितों आहें ज्यांत माझें हित । मग तुम्ही कां होतां दुश्चित । कृपा सदोदित असावी ॥९३॥कोणींच मज ताप दिला नाहीं । अथवा बोलिलें नसे कांही । हित हेंचि जाणोनि या समयीं । प्रवर्तलो तुम्हीही साह्य व्हा ॥९४॥तेव्हां गृहावरी तुळसीपत्रं । टाकोनि नेमिले विप्र सर्वत्र । लोभ न धरितां अणुमात्र । उभे पवित्र दोघेही ॥९५॥जव गुंडा विप्रांसी प्रार्थितां । गृहांत शिरले पाहतां पाहतां । घेवोनि जाती मालमत्ता । ज्यांचे हातां जें आलें तें ॥९६॥भांडीं पात्र धन धान्य सकळ । नवीं जुनी वस्त्रें जातें मुसळ । पाटताटलाटणेंपंचपाळ । कोणी उखळ शिरीं नेती ॥९७॥कोनाडे आडें हुडकूनि सांदी । पाहूनि एकेक टाकिती चिंधी । कोणी पलंग नेतसे आनंदी । कुटाळ फंदी हांसताती ॥९८॥कोणी एक विप्र अभागी दृष्टी । द्रव्य इच्छा धरोनि पोटीं । गृहांत संचरला उठाउठी । संदुक पेटी हुडकित ॥९९॥जो जो पदार्थ सोडोनि गेला । तो तो इतर विप्रांनीं नेला । कांहींचा द्रव्यांश नाहीं मिळाला । म्हणोनि त्याला वाटले कष्ट ॥१००॥कांहीं तरी पुन्हां न्यावें म्हणतां । कांहींच न दिसे श्रम वृथा । देवगृहीं भस्मपोतडी हाता । आली पहातां तेच नेत ॥१॥जैसें कर्म तैसें मिळे फळ । अदृष्ट मागें लागलेंचि सबळ । भस्मपोतडी नेतां केवळ । मनीं तळमळ करीतसे ॥२॥तंव आला दुजा द्विज एक । कांहींच नाहीं म्हणोनि नि:शंक । माघारी जातो पाहूनि भाविक । मारी हांक गुंडा त्यासी ॥३॥विचारितां सांगे वर्तमान । मी कुटुंबी दीनवृध्द ब्राह्मण । परी खरी असें दैवहीन । काय कथन सांगूं तुम्हां ॥४॥ऐकिले येथ होतो धर्म । परी ओढवलें माझें कर्म । सर्व संपलें मग काय काम । व्यर्थ श्रम म्हणोनि जातों ॥५॥गुंडा म्हणे क्षमोनि द्विजवरा । मिळेल कांहीं तरी शोध करा । अथवा हुडका चिंध्यापसारा । न्यावें घरा मिळे तें ॥६॥विप्र गृहांत सर्व शोध करी । हुडकिली चिंधी एकेक वरी । तों एक ग्रंथी लागली करीं । सुवर्ण अंतरीं निघाले ॥७॥त्या हेममुद्या घालोनि बोटीं । द्विज बहु हर्ष पावला पोटीं । पाहोनि गुंडासि आनंद कोटी । विप्र शेवटीं गेला गृहा ॥८॥तंव आली एक सुवासिनी बाई । म्हणे ऐसें कांगे माय राजाई । सर्वांसी दिलें मज कांहीं देई । लुगडें नाहीं नेसावया ॥९॥तुझ्या लुगड्यावरी माझें मन । लागलें फार दिवसांपासून । देतां नेसोनि गृहा जाईन । आशीर्वचन घेईं माझें ॥११०॥पतिमुख राजाई पाहत । गुंडा अंगवस्त्र नेसाया देत । नेसूनि सती लुगडें अर्पित । विप्रस्त्री नेत आनंदें ॥११॥तों माध्यान्हा आला चंडांश । गुंडा म्हणे चला वाराणसीस । निघाले उभयतां स्त्रीपुरुष । तैसेचि उपोषित तत्काळ ॥१३॥कांहीं कुटिल निंदा करिती । सज्जन दोघांची कीर्ति गाती । ग्रामाधिकारी साहू एकांती । बैसले असती विचारांत ॥१३॥म्हणती धन्य विरागी उभयतां । त्यागोनि संसारमोह ममता । निघोनि गेले काय पाहतां । ग्रामांतूनि आतां विचार करा ॥१४॥जवळ न ठेवितां एक कवडी । लुटवूनि टाकिली सर्वस्व जोडी । कांहीं पट्टी करोनि तांतडी । देऊं या घडी नेवोनि ॥१५॥उपवासी ग्रामांतूनि द्विज । सिध्द पुरुष गुंडामहाराज । स्त्रीसह गेले प्रत्यक्ष आज । धरा लाज कांहीं तरी ॥१६॥लहानथोरांची नांवें लिहिलीं । सर्वही पट्टी जमा केली । दोन हजार रक्कम भरली । घेवोनि गेली मंडळी सभ्य ॥१७॥गुंडासी म्हणती हें द्रव्य घ्यावें । आणि तुम्ही परत चलावें । नसतां संगें तरी न्यावें । आम्हीं भावें दिलें तुम्हां ॥१८॥गुंडा म्हणे या द्रव्यापाशीं । अनर्थ म्हणोनि त्यागिलें त्यासी । इच्छा असतां त्याच वेळेसी । आडवें मजशी कोण होतें ॥१९॥तेव्हांचि वित्त ठेवोनि कांहीं । लुटविलें असतें मग सर्वही । आतां त्रास न द्यावा तुम्हीही । इच्छा नाहीं कांहीं मज ॥१२०॥जैसा अग्राह्य गोमांस उंडा । तैसा धना भावीं गुंडा । मानापमानीं ठेवोनि धोंडा । वसे अखंडानंदरुप ॥२१॥मी आतां भक्तिपंथेकरुन । विज्ञान काशी दृष्टी पाहीन । चैतन्यविश्वेश होतां प्रसन्न । होय संपन्न वैराग्यभाव ॥२२॥इतर भाग्य नव्हेचि भाग्य । चिंताविषानें केंवि आरोग्य । जेथें असे भक्तिज्ञानवैराग्य । धन्य सभाग्य तोचि एक ॥२३॥जें धन केवळ पापविग्रह । मग कां त्याचा व्यर्थ दुराग्रह । मज नको नको हा दु:संग्रह । अनिष्ट ग्रह परमार्था ॥२४॥असें ऐकोनि गुंडावचन । परत गेले ग्रामासी जन । वाराणसीस हुंडी करुन । धाडिली जाण गुंडानांवें ॥२५॥असो ग्रामस्थांसी भेटून । गुंडा करितसे पुढें गमन । तंव दिन आला प्रहर तीन । क्षुधेनें प्राण पीडित ॥२६॥स्नान करोनि सरिताजळीं । शालिग्राम पूजिला तत्काळीं । तीर्थ घेऊनियां त्याच स्थळीं । नाम कोल्हाळीं निमग्न ॥२७॥तेथें जवळ होतें खेडें एक । जमूनि सकळ ग्रामस्थ लोक । प्रार्थिती चला करा स्वैपाक । देऊं सकळिक अयाचिती ॥२८॥प्रार्थनावचन मान्य केलें । गुंडा जाऊनि ग्रामीं उतरले । ग्रामस्थांनीं अयाचित दिलें । पाककर्म केलें राजाई ॥२९॥सारिला नैवेद्यवैश्वदेव । तितक्यांत वर्तलें अभिनव । स्त्रीपुरुष विप्रवेषें देव । प्रगटुनि लाघव दाविती ॥१३०॥षण्मासींचा उपवासी काय । किंवा पातला अंत:समय । व्याकुळ होतां हे विप्रवर्य । गुंडा सविनय पुसे त्यां ॥३१॥व्याकुळ व्हावया काय कारण । विप्रस्त्री सांगे नाहीं अन्न । म्हणे चलावें आतांचि आपण । करावें भोजन दोघांनीं ॥३२॥घेउनि संगें विप्रदंपती । गुंडा आनंदें भोजन करिती । हर्षयुक्त राजाई वाढिती । गुंडा म्हणती स्वस्थ व्हावें ॥३३॥भोजनोत्तर आशीर्वाद । विप्र देत गुंडासी प्रसाद । तांबूलादि घेऊनि सुखद । परममोद पावले ॥३४॥विप्र अंतर्ध्यान पावत । स्त्रीसह गुंडा तेथेंचि राहत । भजनानंदें रात्र क्रमित । अखंड नामांत खंड नसे ॥३५॥आतां पुढें कथा रसाळ । ऐका सज्जन श्रोते निर्मळ । काशीवास गुंडासी केवळ । मोक्षमूळ नववें खंड ॥३६॥श्रीगुरु अखंडानंद रुपा । भक्तिज्ञानवैराग्यचिद्रूपा । श्रीगुंडा भक्तोद्वारा करीं कृपा । मुक्तिमार्ग सोपा नारायणा ॥३७॥इति श्रीगुंडामाहात्म्य अभिनव । दातृत्व नवगृहादिवैभव । काशीगमन कथा अपूर्व । पूर्ण ठेव अष्टमाध्यायीं ॥१३८॥॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥अध्याय ८ वा समाप्त. N/A References : N/A Last Updated : September 14, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP