मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
परिचय

मज्जवहस्त्रोतस - परिचय

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


मज्जावहानां स्त्रोतसामस्थीनि मूलं सन्धयश्च ।
च. वि. ५/१२ पा. ५२६.

मज्जा हा आहारापासून कालानुक्रमानें अस्थिनंतर उत्पन्न होणारा सहावा धातू आहे. हा प्राधान्यानें अस्थिच्या मध्यें राहून अस्थिचें पूरण करतो. हा स्निग्ध इषत् श्वेत, पीत, करडा (कर्बुर) रंगाचा असतो. क्वचित रक्ताच्या साहचर्यानें मज्जेचा वर्ण लालसरही होतो. शिरामध्ये कपाळाच्या आंत असलेलें मस्तुंलुंग किंवा मस्तिष्क हे धातुदृष्टया मज्जारुपच आहेत, त्याचप्रमाणे संज्ञांचे वहन करणार्‍या व विशेषकरुन वातवह असणार्‍या ज्या धमन्या त्याही मज्जा धातूंनेच घटीत असतात. त्या सर्व मस्तिष्कापासून साक्षात् वा परंपरेनें निघतात.

मज्जा स्नेहं बलं शुक्रपुष्टिं पूरणमस्थ्नां च करोति ॥
सु. सू. १५-(१) ५. पा. ६७

मज्जा धातु हा शरीरामध्यें प्रकृत अस्थीचें पूरण करणे, स्नेहन करणे, शुक्राचे पोषण करणे आणि सर्व शरीर अवयवांना बल देणें ही कार्ये करतो. मज्जेच्या मलामुळें नेत्र, त्वचा व पुरीष यांच्यामध्यें स्निग्धपणा येतो (च. चि. १५/१९)

तर्पककफ

शिरस्थ: स्नेहसंतर्पणाधिकृत्वादिन्द्रियाणामात्मवीर्येणानु-
ग्रहं करोति ।
सु. सू. २१-१४

स्नेहो मस्तकस्था मज्जा संतर्पणं तत्राधिकृतत्वात् इंद्रियाणां
श्रोत्रत्वक्चक्षुर्जिव्हाव्राणानां अनुग्रहं करोति, स्वर्काय
सामर्थ्यं जनयति ।
टीका

शिरसंस्थोऽक्ष तर्पणात् तर्पक: ।
वा.सू. १२-१७ पान २९५

मस्तकांत राहून मस्तकांतील जी मज्जा म्हणजे मेंदू त्याचे संतर्पण तर्पक कफामुळें होते. या संतर्पणामुळेंच मस्तकांतील मज्जेच्या आश्रयानें असणीरी जी सर्व इंद्रियांची मूलस्थानें, त्यांचेही तर्पण उत्तमप्रकारे होऊन ती इंद्रिये आपापलें कार्य करण्यास समर्थ होतात.

मज्जसार

मृदड्गा बलवन्त: स्निग्धवर्णस्वरा: स्थूलदीर्घवृत्तसन्धयश्च
मज्जसारा: । ते दीर्घायुषो बलवन्त:
श्रुतवित्तविज्ञानापत्यसंमानभाजश्च भवन्ति ॥१०८॥
च. वि. ८/११० पा. ५८४.

अकृशमुत्तमबलं स्निग्धगम्भीरस्वरं सौभाग्योपपन्नं महानेत्रं च मज्जा ।
सु. सू. ३५/१६ पा. १५२

मज्जासार व्यक्ति शरीराने फार स्थूल व कृश नसलेल्या अशा असतात. त्यांचे शरीर मृदु असते. वर्ण व स्वर स्निग्ध असतो. सांधे लांब, गोल व मोठे असतात. बल उत्तम असते. अवयव मृदु असतात. (चरकाच्या ``मृदंग'' या लक्षणाच्या ऐवजी ``तन्वंग'' असा पाठ आहे त्याचा अर्थ शरीर सडपातळ असते असाच होतो) मज्जसार व्यक्ति दीर्घायुषी, बलवान्, ज्ञान, विज्ञान, धन, मान, अपत्य यांची विपुलता असलेली अशी असते. मज्जसार व्यक्तीचे डोळे आकारानें मोठे असतात.

स्त्रोतोदुष्टीची कारणें

उत्पेषादत्यभिष्यन्दादभिघातात प्रपीडनात् ।
मज्जवाहीनि दुष्यन्ति विरुद्धानांच च सेवनात् ॥२५॥
च. वि. ५/१७.

पिळवटणे वा चुरले जाणे, अतिशय अभिष्यंद होणे (स्त्राव वाढणें व संचित होणे), मार लागणे, दाबले जाणें व विरुद्ध अन्नाचे सेवन करणे या कारणांनीं मज्जवह स्त्रोतसाची दुष्टी होते.

मज्जक्षय लक्षणें

शीर्यन्त इव चास्थीनि दुर्बलानि लवूनि च ।
प्रततं वातरोगीणि क्षीणे मज्जनि देहिनाम् ॥६८॥
च. सू. १७/६८ पा. २१७.

मज्जक्षयेऽल्पशुक्रता पर्वभेदोऽस्थिनिस्तोदोऽस्थिशून्यता च ।
सु. सू. १५/९ पा. ६९.

अस्थ्नां मज्जनि सौषिर्यं भ्रमस्तिमिरदर्शनम् ॥१९॥
वा. सू. ११/१९ पा. १८५.

मज्जक्षयामुळें अस्थि, दुर्बल हलके पोकळ झाल्यासारखे वा झिजल्यासारखे होतात. अस्थीनां सच्छिद्रता येते ठिसूळपणा येंतो, हाडामध्ये टोंचल्याप्रमाणें वेदना होतात, पेरीं (सांधे) यांचे ठिकाणी फुटल्यासारख्या वेदना होतात. शुक्राचे प्रमाण उणावते चक्कर येणे, अंधारी येणे, ही लक्षणे होतात. मज्जा क्षीण झाल्यामुळे सतत निरनिराळ्या वातरोगाची पीदा होत रहाते.

मज्जवृद्धि

मज्जा सर्वांगनेत्रगौरवम् ।
सु. सू. १५-१४

मज्जावृद्धीमुळे सर्वांग व डोळे जड होतात.

मज्जदुष्टि

रुक् पर्वणां भ्रमो मूर्च्छा दर्शनं तमसस्तथा ।
अरुषां स्थूलमूलानां पर्वजानां च दर्शनम् ॥१७॥
मज्जप्रदोषात् ।
च. सू. २८/३१ पान ३७९.

पेरी दुखणे, चक्कर येणे, अंधारी येणे, मूर्च्छा येणे, विशेषत: संधींचे ठिकाणी (पेरी) वा इतरत्रहि-तळाशीं मोठें असलेले-व्रण उत्पन्न होणे अशी लक्षणे मज्जादुष्टीमुळे उत्पन्न होतात. शरीरावयवांचे योग्य त्या प्रमाणांत स्नेहन न झाल्यामुळे विशिष्ट स्वरुपांचे व्रण उत्पन्न होतात. स्नेहन न होण्यास मज्जादुष्टी हे कारण असते.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP