चैत्र वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“नीळ कवच घातलें श्रीरामें” !

शके १६०० च्या चैत्र व. १४ रोजीं समर्थ रामदासस्वामींची “लाडकी कन्या” आणि ज्ञानसंपन्न विदुषी वेणाबाई हिचें निधन झालें.
शके १५४९ च्या आसपास वेणाबाईचा जन्म कोल्हापूर येथें झाला. लहानपणींच लग्न होऊन वैधव्य आल्यामुळे तिची मूळची शांतवृत्ति अधिकच निवृत्तिपर बनली.  गीता, एकनाथा भागवत वगैरेचें वाचन ती करूं लागली. रामदासस्वामींची स्वारी घरीं भिक्षेस आली असतां त्यांच्यावर वेणाबाईची भक्ति जडली.‘देह माझें मन माझें । सर्व नेलें गुरुराजें ।’ अशी तिची स्थिति होऊन ‘तैसी मूर्ति दृष्टि पडो । तैशा पायीं वृत्ति जडो ।’ अशा भावनेनें ती फुलून गेली. मिरज येथें नित्य होणारीं रामदासांचीं कीर्तनें ऐकून वेणाबाईनें त्यांचा उपदेश व अनुग्रह घेतला. या तिच्या कृत्यामुळें तिला बरीच लोकनिंदा सहन करावी लागली. घरांतील माणसांनाहि तिचें हें करणें न आवडून त्यांनीं तिला ‘कराड प्रांतींचें विष महादारुण’ दिलें असें म्हणतात. सामर्थाच्या कृपेनें त्याची बाधा झाली नाहीं. मूळची गौरवर्ण वेणबाई विषबाधेमुळें काळीनिळी झालेली पाहून समर्थ बोलले -
“फिरावें लागतें अरण्यांत । सोसावें लागतें उष्णशीत ।
नाजूकपणाचें नव्हे हें कृत्य । नीळ कवच घातलें श्रीरामें ॥”
यानंतर वेणाबाई रामदासस्वामींच्याच सान्निध्यांत राहूं लागली. तिचा अधिकार पाहून शके १५७७ मध्यें मिरजला स्वामींनीं तिला एक मठ स्थापन करुन दिला. रामदासस्वामींच्या मठांत असतांना तिच्याकडे उपाहाराचें काम असे. समर्थाच्या चरणींच समाधि व्हावी अशी इच्छा बाईच्या मनांत तीव्र झाली. वेणाबाई कीर्तन उत्तम करीत असे. “चैत्र व. १४ रोजीं सीतास्वयंवरावर कथा चालूं होती. श्रोत्यांची दाटी होऊं लागली. कथा संपल्यावर वेणाबाईनें समर्थाच्या पायांवर डोकें ठेवून तेथेंच प्राण सोडला.” सज्जनगडावर हिची समाधि आहे. वेणाबाईनें लिहिलेलें ‘सीतास्वयंवर’ हें काव्य मार्दव व सहृदयता या दृष्टीनें मराठींत वैशिष्टपूर्ण असें आहे. याखेरीज ‘कौल’, ‘रामगुहसंवाद’, इ. प्रकरणेंहि सरस आहेत.
- १० एप्रिल १६७८

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP