चैत्र व. ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.

मत्स्येंद्रनाथांची समाधि !

शके ११३२ च्या सुमारास चैत्र व. ५ रोजीं आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनीं सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथें समाधि घेतली !
महाराष्ट्र संस्कृतीचा बनाव होतांना जे अनेक धर्मपंथ वा सांप्रदाय उदयास आले त्यांपैकीं नाथसांप्रदाय वैष्णव सांप्रदायांपैकींच एक आहे. वास्तविकपणें हा आदिनाथ सांप्रदाय वैष्णव सांप्रदायांपैकींच एक आहे. शंकरांनीं पार्वतीस क्षीरसमुद्रांत जें ब्रह्मज्ञान सांगितलें तें श्रीविष्णूंनीं मत्स्याचें रुप घेऊन ऐकलें, शंकरांना हें समजल्याबरोबर ‘अलक्ष’ असा त्यांनीं उच्चार केला, तेव्हां मत्स्योदरांतून बाहेर येणार्‍या कुमाररुपी विष्णूनें ‘आदेश’ असा प्रतिशब्द दिला. हाच कुमार मत्स्येंद्रनाथ. प्रसिध्द गोरखनाथ हा याच मत्स्येंद्रनाथाचा शिष्य होय. यानें योगविद्येवर “मत्स्येंद्रसंहिता” नावांचा ग्रंथ लिहून हठयोग व शाबरी मंत्रतंत्र विद्येचा सर्वत्र प्रसार केला. नेपाळमध्यें मत्स्येंद्रांचा उत्सव सात दिवस होत असतो. या नाथासांप्रादायी लोकांचा बाह्यवेष असा आहे.
“शैली शृंगी कंथा झोली विभूत लगाया तनमो
कोटि चंद्रका तेज झुलत है चली आपने गतमो ॥”
महाराष्ट्रांतील भागवतधर्माचे संघटक श्रीज्ञानदेव यांचे घरीं विठ्ठलाची भक्ति असली तरी त्यांची गुरुपरंपरा मात्र नाथ पंथामधीलच होती. अंजनी पर्वताच्या गुहेमध्यें तपश्चर्या करणार्‍या श्रीगैनीनाथांचा उपदेश श्रीनिवृत्तिनाथांना होता. याचा उल्लेख श्रीज्ञानदेवांनीं ज्ञानेश्वरीच्या उपसंहारांत करुन आपल्या या नाथसांप्रदायासंबंधीं लिहिलें आहे:-
“क्षीरसिंधू परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं ।
नेणों कै श्रीत्रिपुरारी । सांगितलें जें ।
तें क्षीरकल्लोळा आंत । मकरोदरीं गुप्त ।
होतां तयाचा हात । पैठें जालें ॥
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावया चौरंगीं ॥
भेटला कीं तो सर्वागीं । संपूर्ण जाला ॥
- १७ मार्च १२१०

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP