चैत्र शु. १५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


“हनुमंत आमुचें दैवत !”

चैत्र शु. १५ रोजीं भारतीय समाजानें बुध्दि आणि बल यांसाठीं आदर्श मानलेला श्रीहनुमान याचा जन्म झाला.
गौतमकन्या अंजनी व सुमेरीचा राजा केसरिन्‍ यांचा हा पुत्र. याच्या जन्मासंबंधीं निरनिराळया कथा प्रसिध्द आहेत. पुत्रकामेष्टि यज्ञांतून निघालेल्या प्रसादापैकीं कांहीं भाग घारीनें नेला आणि तो तप करीत बसलेल्या अंजनीच्या ओंजळींत पडला. त्यायोगें हनुमानाचा जन्म झाला. हनुमंत पराक्रमाचा मूर्तिमंत पुतळा होता. रामचंद्रांचा हा आदर्श भक्त असून सीतेचा शोध लावण्यांत त्यानें बरेंच शौर्य प्रगट केलें होतें. लंकादहन करणें, राम - रावण युध्दांत मेलेल्यांना सजीव करण्यासाठीं द्रोणागिरी उचलून आणणें इत्यादि त्याच्या अचाट अद्‍भुत कृत्यांवरुन त्याच्या शक्तीची आणि बुध्दीची साक्ष पटते. या हनुमंतासच मरुत्‍ पुत्र म्हणून मारुति, वज्रानें हनु तुटल्यामुळें हनुमंत, वज्रदेही म्हणून वज्रांग - बजरंग, बलानें भीषण म्हणून बलभीम इत्यादि नांवे आहेत.
याच हनुमानाच्या भक्ताचा प्रसाद प्रसिध्द रामभक्त समर्थ रामदसस्वामी यांनीं सर्व भारतांत गांवोगांव केला होता. “आमुचे कुळीं हनुमंत । हनुमंत आमुचें दैवत । तयावीण आमुचा परमार्थ । सिध्दीतें न पावे कीं” असें समर्थांनीं म्हटलें आहे.समर्थाचे अकरा मारुति प्रसिध्दच आहेत. प्रत्येक खेडयांत एक तरी मारुतीचें देवालय असतें आणि प्रत्येक तालमींत दर शनिवारीं मारुतीची पूजा होत असते. हा ‘वीरमारुति’ समर्थानींच प्रचारांत आणला. एकनिष्ठ सेवक व भक्त म्हणूनहि याची प्रसिध्दि आहे. ‘काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा’ अशा प्रकारें भक्तिमार्ग अनेकांनीं मारुतीला पुसला होता. खुद्द रामरायांनीं पुढील गुणांबद्दल मारुतीची प्रशंसा केली आहे.”
“शौर्य दाक्ष्यं बलं धैर्य प्राज्ञता नयसाधनम्‍ ।
विक्रमश्च प्रभावश्च हनूमति कृतालय: ॥”
हनुमंत सर्व ठिकाणीं मनाप्रमाणें त्वरित गमन करणारा, वार्‍याप्रमाणें प्रचंड वेगानें जाणारा आहे. त्याच्या स्वाधीन इंद्रियें आहेत. बुध्दिमान्‍ लोकांत तो श्रेष्ठ आहे. आणि हा वानरसमुदायांत मुख्य आहे.
--------------

चैत्र शु. १५
रायगडीं शिवचंद्राचा अस्त !

शके १६०२ मधील चैत्र शु. १५ रोजीं हिदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीछत्रपति शिवाजी महाराज यांचा रायगडावर अंत झाला.
राज्याभिषेकानंतर शिवरायांनीं रघुनाथपंत हणमंते यांच्या सूचनेवरुन कर्नाटकाच्या स्वारीचा बेत केला. प्रथम त्यांनीं गोवळकोडयाच्या सुलतानाकडून खंडणी वसूल केली. आणि मद्रासपर्यंतचा कर्नाटक प्रांत जिकला. बंधु एकोजी याचेवर तंजावरचें राज्य सोंपवून शिवराय रायगडावर परत आले. राजाराम लहान होता, संभाजी उच्छृंखल निघाला, सोयराबाईचा स्वभाव खटपटी होता, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो या दोघांत व्देष होता, या सर्व प्रकारांमुळें महाराज खिन्न झाले. पौष शु. ९ रोजीं त्यांनीं सज्जनगडावर जाऊन रामदासस्वामीची भेट घेतली. “समर्थानीं अनेक प्रकारच्या गोष्टी राजधानीसंबंधें सांगून अध्यात्मपर विषयहि सांगितला. तीन दिवस समाधि लागून राजश्री बसले होते. अनेक प्रकारच्या गोष्टी होऊन महाराज परधामास जाणार हें समर्थानीं सुचविलें. माघ शु. १४ स आज्ञा घॆऊन रायगडास आले. ” त्यानंतर थोडयाच दिवसांत “राजास ज्वराची व्यथा झाली, आयुष्याची मर्यादा झाली असे कळून चुकलें. मातबर लोक जवळ आणून बोलवले. ... सर्वाचे कंठ दाटून परमदु:ख झालें. भागीरथीचें उदक प्राशन केलें. आणि शके १६०२ रींद्र संवत्सर शनिवार चैत्र शु. १५ दोन प्रहरीं रायगडीं शिवचंद्राचा अस्त झाला.” शिवरायांची योग्यता ‘राजनीति’ कार रामचंद्र नीलकंठ अमात्य यांनी अशी वर्णन केली.
“दक्षिण प्रांतीं आदिलशाही, कुत्बशाही व निजामशाही हीं महान्‍ संस्थानें, याविरहित श्यामल, फिरंगी, इंग्रज, वलंदेज, रामनगरकर, पाळेगार, तसेच जागजागा पुंड, चंद्रराव, शिर्कें, सावंत, दळवी, वरघांटॆ, निंबाळकर, घाटगे, ... आदिकरुन सकल्हि पराक्रमी सज्ज असतांहि, बुध्दिवैभव पराक्रमें, कोणाची गणना न करतां, कोणावर चालून जाऊन, तुंबळ युध्द करुन रणांशीं आणिले. ज्या ज्या उपायें जो जो शत्रु आकळावा त्या त्या उपायें तो तो शत्रु पादाक्रान्त करुन सालेरी अहिवंतापासून चजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिलें.”
- ४ एप्रिल १६८०
------------------

चैत्र शु. १५
आर्या पोरकी झाली !

शके १७१६ च्या चैत्र शु. १५ रोजीं पेशवाईच्या अखेरचे मराठीचे महाकवि मोरोपंत पराडकर यांचें निधन झालें.
मराठेशाहींत कोंकणांतून देशावर जीं घराणीं आलीं त्यांत पंतांचें घराणेंहि पन्हाळयावर येऊन दाखल झालें. त्यानंतर आपल्या वडिलांबरोबर पंत बारामतीस गेले. बाबूजी नाईक यांच्या वाडयांत पुराण सांगतां मोरोपंत काव्यरचना करुं लागले; आणि थोडयाच अवधींत एक अलौकिक कवि म्हणून त्यांची ख्याति झाली. मोरोपंती भारत व रामायणें प्रसिध्द असून भागवती प्रकरणावरील त्यांची काव्यें सरस वठलीं आहेत.
“पानपतच्या लढाईपासून खर्ड्याच्या लढाईपर्यंतच्या काळांत पुण्यांतील व इतर प्रांतांतील महाराष्ट्रीय वीर व मुत्सद्दी राजकारणाच्या खणखणाटांत दंग झाले असतां मोरोपंत बारामतीस ब्रह्मकमंडलू ऊर्फ कर्‍हा नदीच्या तीरीं रामसन्निध एकांतात मराठी भाषेची सेवा करण्यांत गुंग झाले होते. या काळांत त्यांनीं सुमारें पाऊण लाख कविता केली; आणि मराठी भाषेचें वैभव अपार वाढवलें. मोरोपंतांची प्रकृति सात्त्विक आणि सौम्य असून ते आपल्या उपासनेंत उपास्याप्रीत्यर्थ कविता रचण्यांत गढून गेले असल्यामुळें त्यांचें इतर उलाढालीकडे लक्ष नव्हतें. त्यांचा स्वभाव तसा चळवळया असता तर त्यांच्या हातून वाड्गमयाची येवढया एकनिष्ठपणें सेवा झालीच नसती. ‘केकावली’ हें त्यांचें सर्वोत्कृष्ट आणि अखेरचें गोड स्तोत्र शके १७१६ च्या चैत्रांतील रामनवमी झाल्यावर एकादशीस पंतांना ताप आला. व्दादशीस पुष्कळ वाढला. पंतांनीं ‘प्रांतप्रार्थना’ म्हणून १७ आर्याचें शेवटचें अत्यंत हृदयद्रावक काव्य केलें. “रामाचा साद घालीत त्यानीं देह ठेवला. गीर्वाण - सागरांतून आपल्या अतर्क्य बुध्दिप्रभावानें या मयूरमेघानें काव्यामृत शोषून त्याचा काठिण्यक्षार नाहींसा करुन महाराष्ट्रभूमीवर पेयामृताचा वर्षाव सतत चाळीस वर्षे केला व कृतकृत्य झालेला नश्वर देह मंगलमय करुन टाकला.” मोरोपंतांच्यानंतर एवढा मोठा साधुकवि मराठी साहित्यास लाभला नाहीं.
- १५ एप्रिल १७९४

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP