चैत्र शु. ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


“लक्ष्मणासारखा बंधु नाहीं !”

चैत्र शु. ११ या दिवशीं श्रीरामाचा एकनिष्ठ अनुगामी बंधु लक्ष्मण याच जन्म झाला. दशरथास सुमित्रेपासून झालेला हा वडील मुलगा.
राम - लक्ष्मणांची प्रीति, बंधु - बंधुंमधील प्रेमाचें आदर्श स्वरुप म्हणून मानली गेली आहे. रामचंद्र वनवासाला निघाले तेव्हां ऐश्वर्याचा त्याग करुन रामाबरोबर वनवासास जाण्यास सिध्द होऊन लक्ष्मण बोलला - “मी धनुष्य सज्ज ठेवून व कुदळ - खोरींबरोबर घेऊन तुम्हांला मार्ग दाखवण्यासाठीं तुमच्यापुढें राहीन. वनांतील कंदमुळें, फळें व तपस्व्यांना होमाकरितां लागणारे पदार्थ तुम्हांला नित्य आणून देत जाईन.” रामाबद्दल त्याला जेवढा आदर होता तेवढीच निष्ठा सीतेबद्दलहि होती. या दोघांची सेवा करणें ही एकच गोष्ट त्याला माहीत होती. ऋष्यमूक पर्वतावर सीतेनें टाकलेले दागिने वानरांनीं जपून ठेविले होते, ते त्यांनीं ओळखण्यासाठीं लक्ष्मणापुढें टाकले, तेव्हां तो म्हणाला, “मला कर्णभूषणें, बाहुभूषणें ओळखतां येत नाहींत. पण दररोज वंदन करतांना पाहिल्यामुळें पायांतील अलंकार तेवढे मी ओळखूं शकेन.” श्रीरामचंद्रहि त्याची योग्यता जाणून होते. इंद्रजितास लक्ष्मणानेंच मारलें,  पण तत्पूर्वी लक्ष्मण शरबध्द झाला असतांना रामचंद्र म्हणाले, एक वेळ सीतेसारखी स्त्री मिळूं शकेल, पण लक्ष्मणासारखा बंधु मात्र मिळणें कठीण आहे. राम - रावण युध्दांत लक्ष्मणानें मोठा पराक्रम केला. अतिकाय, विरुपाक्ष, रावण, इत्यादींशीं त्याचें प्रत्यक्ष युध्द झालें होतें. अशोकवनांत असणार्‍या सीतेने याचें वर्णन केलें आहे: “लक्ष्मण वृध्दांची सेवा करणारा असून समर्थ परंतु मितभाषी आहे. तो स्वभावानें सौम्य व आचरणानें पवित्र आहे. वेळोवेळीं रामालाहि सल्ला देण्याचें काम त्यानें केलें आहे.” लक्ष्मणाच्या पत्नीचें नांव उर्मिला. ती सीरध्वज जनकाची मुलगी. सीतादेवी वनवासांत असली तरी आपल्या पतीबरोबर होती. उलट उर्मिला राजवाडयांत ‘एकाकी’ होती. या ‘उपेक्षित नायिके’ चा गौरव बापू मैथिलीशरण गुप्त आणि कविवर्य टागोर यांनीं केला आहे. उर्मिला चौदा वर्षे ‘नववधू’ च राहिली होती !

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP