चैत्र शु. ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


‘स्वराज्यसंकल्पक’ शहाजी !

शके १५१६ च्या चैत्र शु. ५ रोजीं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीशिवछत्रपति शिवाजीमहाराज यांचे वडील शहाजी राजे यांचा जन्म झाला.
शहाजी राजांचा जन्म ज्या भोसले घराण्यांत झाला तें घराणें चितोड येथील सूर्यवंशीं शिसोदे रजपुतांपैकीं होय. चौदाव्या शतकांत इस्लामी लाटेच्या प्रभावास कंटाळून शिसोद्याचे राजकुमार सजनसिंह व क्षेमसिंह राजपुतान्यांतून दक्षिणेंत आले व त्यांच्यापासूनच पुढें घोरपडे व भोसले हीं घराणीं निर्माण झालीं. भोसले घराण्याचा कर्ता पुरुष बाबाजी भोसले, याचे मुलगे विठोजी व मालोजी मोठे कर्ते निघाले. यांपैकीं मालोजीच्या बायकोचें नांव उमाव्वा असें असून ती फलटणच्या जगपाळ निंबाळकरांची बहीण होती. बरेच दिवस मूलबाळ होईना म्हणून तिनें अहमदनगरच्या शहाशरीफ नांवाच्या मुसलमान साधूस नवस केल्यावर तिला चैत्र शु. ५ रोजीं एक मुलगा झाला. त्याचें नांव पिराच्या नांवावरुन शहाजी असें ठेवण्यांत आलें. हा शहाजी मोठा कर्तबगार निघाला. तंजावर प्रांतांत मराठयांचें राज्य पसरविण्याचे सर्व श्रेय यांचे आहे. मोंगल बादशाहाला नर्मदेच्या दक्षिणेस येऊं न देण्यसाठीं त्यानें अतोनात प्रयत्न केले. त्यासाठीं दक्षिणेंतील मुसलमान सत्ताधीशांनाहि मदत केली. दोन लाख फौज घेऊन येणार्‍या शहाजहानला तोंड देणारा एकहि सरदार शहाजीशिवाय दक्षिणेंत नव्हता. स्वत:हिदु असल्यामुळें आदिलशाही व निजामशाही यांची चाकरी करणें गैर आहे याची जाणीव त्याला असली तरी प्राप्त परिस्थितींत अन्य मार्ग त्याचेजवळ नव्हता. त्याच्या मनांत दडून असणारें स्वप्न शिवरायांनीं साकार करुन दाखविलें. “शिवाजीला जन्म देऊन त्याचे ठिकाणीं स्वातंत्र्याचें वारें उत्पन्न करण्याचें श्रेय शहाजीला अवश्य मिळतें. या दृष्टीनें शिवाजीला जर ‘राज्य - संस्थापक’ म्हणायचें तर शहाजीला ‘राज्य - संकल्पक’ असें पद देण्यास हरकत नाहीं.” शहाजी पूर्वसंस्कृतीचे, परंपरेचे आणि संस्कृत विद्येचे मोठे अभिमानी होते. ते विद्या - कलांचे भोक्ते असून गायनादि ललितकलांची त्यांना फार आवड होती.
- १८ मार्च १८५४
--------------

चैत्र शु.५
वेदाभिमानी आर्यसमाज !

शके १७९७ च्या चैत्र शु. ५ रोजीं भारतांतील आक्रमक आणि निर्भय सुधारक, कुशल संघटक, महर्षि स्वामी दयानंद यांनीं आपल्या सुप्रसिध्द अशा आर्यसमाजाची स्थापना केली.
एकोणिसाव्या शतकांत हिंदुस्थानांत धर्मसुधारणेच्या अनेक चळवळी झाल्या. ख्रिस्ती मिशनर्‍यांचे आक्रमण जारी असल्यामुळें व हिंदुधर्मांत अनेक विसंगति निर्माण झाल्यामुळें धर्मसुधारणा आवश्यक बनली होती. या जागृतीच्या काळांतील आर्यसमाजाचें महत्त्व विशेष प्रकारचें आहे.वेदप्रामाण्य हें मुख्य गमक या समाजाचें आहे. समाजघटना त्रैतवादी असून जीव, परमेश्वर व प्रकृति हे अनादि व अनंत आहेत असा यांचा विश्वास आहे. या धर्मपंथानें केलेलें सामाजिक कार्य मोठें आहे. जवळजवळ दोन हजारपर्यंत यांच्या शाखा असून त्यांच्यामार्फत काँलेजें, हायस्कुलें, उपदेशकांचीं विद्यालयें, अनाथालयें, गुरुकुलें, विधवा - आश्रम, कन्याशाळा ... इत्यादि शैक्षणिक कामग्रिरी मोठीच झालेली आहे. हिंदुस्थानाबाहेर ब्रह्मदेश, सियाम, अनामा, हाँगकाँग, पूर्व व दक्षिण आफ्रिका, मारिशस, ब्रिटिश व डच गियाना इत्यादि ठिकाणीं या समाजाची स्थापना होऊन कार्य चालू झालें. वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठीं व यथार्थ ज्ञान लोकांना यावें म्हणून स्वामी दयानंद यांनीं ‘ सत्यार्थ प्रकाश’ नांवाचा ग्रंथ लिहिला. त्यांचीं अनेक भाषांतून भाषांतरें झालीं. दयानंदांचा प्रभाव आर्यसमाजावर अर्थातच मोठा आहे. ‘The Cultural Heritage of India' नांवाच्या ग्रंथमालेंतील दुसर्‍या खंडांत या सामाजाविषयीं व दयानंदांविषयीं पुढील मजकूर आहे. “The Arya Samaj is Dayanand writ large. It has in it saints, philosophers, organisers, scholers, thinkers, yeomen - all reflecting in their various prisms the light of that brlliant noonday sun of unquenchable, spiritual and moral refulgence. For he was a combination of all these characters in one.''
- १० एप्रिल १८७५

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP