चैत्र शु. ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


“... येथेंच कांहीहि होवो !”

शके १७८० च्या चैत्र शु. ७ रोजीं महापराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांच्या झांशीस सर ह्यू रोझ यानें वेढा दिला.
सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दांत राणी लक्ष्मीबाईचें स्थान फारच मोठें आहे. इंग्रज लोकांनीं दिल्ली उध्वस्त केली होती; लखनौस त्यांना विजय मिळाला होता, त्यामुळें त्यांचा उद्दामपणा सहजच वाढला.  त्याची दृष्टि झांशीवाल्या राणीकडे गेली. राज्याचा अपहार करणें, पैसा उकळणें, अत्याचार करणें येवढींच कार्ये इंगजी फौजेस होतीं लक्ष्मीबाईला जिवंत पकडून आणण्याचा हुकूम लाँर्ड कँनिंग यांनीं हँमिल्टन यास दिला. सर ह्यू रोझ मोठया फौजेनिशीं झांशीवर चालून येऊ लागला. बाणपूरच्या राजानें राणीला सूचना केली. “काल्पीस पेशव्यांच्या आश्रयास जा.” त्यावर त्या बाणेदार आणि शूर स्त्रीनें उत्तर केलें, “मी बायको माणूस, तशांत विधवा, पूर्व वयस्कर, मी सून कोणाची हाहि विचार मनांत आणला पाहिजे, या समयीं आपण येथून निघून त्या प्रुरुष मंडळींत शरणाप्रमाणें जाणें त्यापेक्षां येथेंच कांहीहि होवो !” चैत्राच्या सुरुवातीला सर ह्यू रोझच्या छावण्या झांशीच्या आसपास पडल्या. इंग्रज सेनापतीचें पत्र आलें कीं, दिवाणजी, लालूभाऊ बक्षी, मोरोपंत तांबे, वगैरे लोकांना घेऊन स्वत:बाईनें भेटावयास यावें. बाईनीं जबाब दिला, “माझें येणें होणार नाहीं.” त्यावर चैत्र शु. ७ रोजीं ह्यूनें झांशीस वेढा दिला. वेढयाचें काम दहाबारा दिवस चाललें. “त्यांत कमरेला पदर खोंवून व हातांत तलवार घेऊन ही शूर स्त्री प्रत्येक तटावर व बुरुजावर जाऊन लढाईचें काम चालवीत होती.” तात्या टोपे मदतीस आले, पण दुर्दैवानें त्यांना पराभूत व्हावें लागलें. अघ्यायशीं प्रहर राणी सारखी हातांत खड्ग घेऊन लढत होती. तिच्या मुखावरील तेज थोडेंहि कमी झालें नव्हतें. अकराव्या दिवशीं बाईस श्रमांमुळें झोंप लागली. पुन:जागीं होऊन पहाते तों काय; शत्रु तटावरुन चालत येत होता. भलाजीसिग परदेशी फितूर झाल्यामुळें झांशी इंग्रजांचे ताब्यांत जात होती. पण ही रणरागिणी डगमगली नाहीं; हातांत तलवार घेऊन ती सैन्याच्या मध्यभागीं घुसली.
- २१ मार्च १८५८

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP