चैत्र शु. ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


म्हणून बाँबचे आवाज निघतात !

शके १८५३ च्या चैत्र शु. ४ रोजीं सुप्रसिध्द क्रांतिकारक भगतसिंग आणि त्यांचे सहकारी राजगुरु व सुखदेव यांना सायंकाळीं साडेसात वाजतां लाहोरच्या तुरुंगांत फांशीं देण्यांत आलें.
सायमन कमिशनचे सभासद असेंव्लींत बसले असतां भयाची सूचना म्हणून भगतसिग व बटुकेशर दत्त या दोघांनीं असेंव्लीवर एक स्फोटक बाँब टाकला. त्याबद्दल सन १९२९ च्या चार एप्रिलला त्यांना पकडण्यांत आलें. पुढें लाला लजपतरायांच्या मृत्यूचा सूड म्हणून झालेल्या सँढर्सच्या खून - खटल्यांत भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना गोवण्यांत आलें. खटल्याचे वेळीं भगतसिंगांनीं अत्यंत तेजस्वी अशी जबानी दिली. “करूं तो जुलूम प्रजा सोसते म्हणून कांहीं कर्झनछाप अधिकारी राष्ट्राचीं छकलें करण्यासाठीं पुढें धांवतात. तशा मदांध अधिकार्‍यांच्या कानीं त्रस्त प्रजेच्या आर्त किंकाळया पोंचूंच शकत नाहींत. अशा बेगुमान अधिकार्‍यांचे कान खोलण्यासाठीं व डोळे उघडण्यासाठीं आम्हांला बाँबचे आवाज काढावे लागतात.”
७ आँक्टोबर १९३० ला तिघांना फांशीची शिक्षा सांगण्यांत आली. गांधी आयर्विन करार व राष्ट्राची एकमुखी मागणी यांचा कांहीं एक उपयोग न होता या तिघांना २३ मार्च रोजीं फांशीं देण्यांत येऊन त्यांचीं प्रेतें आप्तांना न कळवितां नष्ट करुन टाकण्यांत आलीं ! या तीनहि हुतात्म्यांचें शौर्य व त्याग यांचें अभिनंदन सार्‍या देशानें कराचीच्या राष्ट्रसभेंत केलें.
“या तरुणांचे आपण धन्यवाद गातों याचें कारण अत्यंत निर्भयता व स्वार्थत्याग यांची परमावधि त्यांच्या ठिकाणीं झाली होती हें होय. ज्या वेळीं आपल्याशीं समेटाची भाषा इंग्लड बोलूं लागेल त्या वेळीं त्यांचे - आमचे दरम्यान हुतात्मा भगतसिंग यांचें प्रेत असेल ही गोष्ट आपण यापुढें विसरतां कामा नये. हिंदुस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी किती भगतसिगांचे बळी पडतील हें कोणीं सांगावें ? परंतु आपण देशासाठीं मर्दपणें व निर्भयवृत्तीनें मरण्यास तयार राहिलें पाहिजे एवढाच धडा भगतसिंगांपासून आपण ध्यावयास पाहिजे.” असे उद्‍गार पंडित जवाहरलाल नेहरू यांनीं काढले होते.
- २३ मार्च १९३१

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP