अध्याय ६० वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


त्वत्पादपद्ममकरंदजुषां मुनीनां वर्त्मास्फुटं नृपशुभिर्ननु दुर्विभाव्यम् ।
यस्मादलौकिकमिवेहितमीश्वरस्य भूमंस्तवेहितमथो अनु ये भवंतम् ॥३६॥

त्वत्पदपद्मामोद भ्रमरा । होवोनि सेविती जे मुनिवर । त्यांचाचि मार्ग नेणती नर । जे पामर पशुरूपी ॥६९॥
नराकार पशूंच्या व्यक्ति । विवेकशून्य विषयीं रमती । आहारनिद्राभयस्त्रीरति । ते कैं जाणती मुनिपदवी ॥२७०॥
त्वत्पदपद्मभजकांचा आचार । नरपशूंतें अगोचर । मा तूं केवळ परमेश्वर । त्वत्पथ गोचर केंवि तयां ॥७१॥
पिहित मार्ग तव भजकांचा । अलौकिक यालागीं साचा । म्हणोनि अस्पष्ट मार्ग तुमचा । बोलिला वाचा तो सत्य ॥७२॥
अस्पष्टमार्गी यालागिं आम्हां । आश्रयिती ज्या सकाम वामा । त्या भोगिती दुःखधामा । ऐशिया नर्मा वदलां जे ॥७३॥
याचें उत्तर श्लोकान्तरीं । देइजेल श्रीमुरारि । निष्किंचनत्व तज्जनमित्रीं । आढ्यत्व दुरी परिहरित ॥७४॥

निंष्किंचनो ननु भवान्न यतोऽस्ति किंचिद्यस्मै बलिं बलिभुजोऽपि हरंत्यजाद्याः ।
न त्वा विदंत्यसुतपोंऽतकमाढ्यतांधाः  प्रेष्ठो भवान्बलिभुजामपि तेऽपि तुभ्यम् ॥३७॥

आम्ही निष्किंचन म्हणोने । यथार्थ वदली प्रभूची वाणी । आढ्य निष्किंचनालागोनी । न भजती स्वप्नीं भो सुभ्रू ॥२७५॥
तुम्हांवांचून किञ्चिन्नाहीं । हें अकिंचनत्व तुमचे ठायीं । पूज्यापूज्य जें जें कांहीं । भजती तेंही पद तुमचें ॥७६॥
बळिनामें बोलिजे पूजा । तुम्हां जे अर्पिती बरवे वोजा । परस्परेंचि गरुडध्वजा । प्रियतम ते तुम्हां त्यांसि तुम्ही ॥७७॥
विद्याधनबळें मदाढ्य मूढ । प्राणतर्पक विषयीं रूढ । ते कैं जाणती हृदयस्थ गूढ । अंतक प्रौढ मदर्ता ॥७८॥
आढ्यपनेंचि जे मदान्ध । विषयनिष्ठ बुद्धिमंद । काळात्मया तुझा त्यां बोध । न घदे प्रसिद्ध त्रिवाचा ॥७९॥
यालागीं निष्किञ्चनजनप्रिय । बोलिलां तैसेंचि सत्य होय । आध्य नेणती तुमची सोय । हाही प्रत्यय प्रत्यक्ष ॥२८०॥
आढ्य नभजती अकिंचना । ऐशिया अस्पष्टमार्गभजना । भजती सकाम ज्या अंगना । त्या दुःखभाजना निरंतर ॥८१॥
एवं उभयतां असम घटित । करणें केवळ हें अनुचित । या वाक्याचा इत्थंभूत । विवरी अर्थ वैदर्भी ॥८२॥
तो परिसिजे श्रोतीं चतुरीं । वाखाणिजेल शुकवैखरी । मराळप्राय क्षीरनीरीं । श्रवणचुंचुव्यापारें ॥८३॥

त्वं वै समस्तपुरुषार्थमयः फलात्मा यद्वांछया सुमतयो विसृजंति कृत्स्नम् ।
तेषां विभो समुचितो भवतः समाजः पुंसः स्त्रियाश्च रतयोः सुखदुःखिनोर्न ॥३८॥

( येथे ८४ नं. नाही. )
समस्त पुरुषार्थांचें फळ । सुकृतोत्थित जें सुख केवळ । तो तूं परमनंदबहळ । आत्मा निर्मळ सर्वगत ॥२८५॥
ऐशिया तुझिया वांछेकरून । सुमति जे जे मुनि सर्वज्ञ । सेव्यसेवकभावाभिज्ञं । सुखसंपन्न भजताती ॥८६॥
ते निष्काम कामरहित । उचित भोगिती तव एकान्त । स्त्रीपुम्भावें मिथुनीभूत । सकाम दुःखित सत्यचि हें ॥८७॥
इहामुष्मिकविषयगोडी । कामिनी कामुक कामनाप्रौढी । रमती ते मग दुःखकोडी । भोगितां घडिघडी रडताती ॥८८॥
हेंचि अनुचित सर्वांपरी । यथार्थ स्वामीची वैखरी । भिक्षुस्तवनें उगाचि थोरी । ते यावरी परिहरिते ॥८९॥

त्वं न्यस्तदंडमुनिभिर्गदितानुभाव आत्माऽऽत्मदश्च जगतामिति मे वृतोऽसि ।
हित्वा भवद्भ्रुव उदीरितकालवेगध्वस्ताशिषोऽब्जभवनाकपतीन्कुतोऽन्ये ॥३९॥

नेणोनि न विचारूनि सोय । भीमकी मातें वरिलेंसि काय । बुद्धिमंदत्वें दोषद्वय । आरोपिलें जें स्वामीनें ॥२९०॥
ऐका तयाचा परिहार । म्यां जो निर्दोष विचार । करूनि धरिला तुमचा कर । तोही प्रकार अवधारा ॥९१॥
आत्मा सर्वां प्रियतम पूर्ण । तो तूं जगदात्मा श्रीभगवान । वृथा नव्हेचि तुझें वचन । मुनि सर्वज्ञ वर्णिती जें ॥९२॥
तूतें जाणोनियां सर्वग । जिहीं केला दंडत्याग । तव वर्णनीं वेंठले चांग । समरसरंग लाहूनी ॥९३॥
त्यांचें वर्णन नव्हे वृथा । कीं ते उचितचि सर्वगता । सर्व भूतीं एकात्मता । परमात्मया जगदीशा ॥९४॥
ज्याचिया आनंदमात्रें करून । अन्य भूतां उपजीवन । तो म्यां वरिलासि अमृतघन । नाहीं नेणोनि भ्रमलें पैं ॥२९५॥
हा दोष लाविला मजकडे । परन्तु असो घडेल तिकडे । अधिक सहसा न वदें तोंडें । सप्रेम चाडे तथापि हें ॥९६॥
लोकपाळांचिया विभूति - । संपन्न राजे तुज वांछिती । त्यांतें त्यजिलें मंदमति । हा दोष निश्चिती मज न लावा ॥९७॥
तुम्हांपासोनि जे जे अवर । वरिष्ठविधि भवशक्रादि अमर । काळकळनेचा वाहती घोर । व्याकुळतर सुखदुःखें ॥९८॥
तुजपासोनि उदया आला । तो काळ सर्वां ग्रासिता झाला । विधिहरांच्या मनोरथाला । विध्वंस केला पैं ज्यानें ॥९९॥
विधिहरांचीं आशीर्बळें । प्रतापें भंगिलीं जया काळें । तेथ कायसीं नृपांचीं कुळें । तुच्छें विकळें भवग्रस्तें ॥३००॥
जो सिंहाची नरडी मुरडी । त्यापुढें केउती मशकप्रौढी । एवं नृपकुळें बराडी । सकाम वेडीं मम लोभें ॥१॥
ऐसें विवरूनियां चित्तीं । म्यां त्यागिलें नृपांप्रति । मज म्हणितलें मंदमति । तद्दोषनिवृत्ति हे केली ॥२॥
बुद्धिमंदत्व माझिये माथां । बोलिलां तें परिहारितां । यावरी कोणीकडे जडता । दिसोनि आली तें विवरा ॥३॥
आपुल्या दोषाची निवृत्ति । करूनि बोलती झाली पुढती । म्हणे स्वामी ऐका विनती । व्यंग्य नर्मोक्ति ज्या वदलां ॥४॥
आपुली सर्वज्ञता लोपून । सद्गुणप्रतापा आच्छादून । क्षुद्रपुरुषांचें गुणवर्णन । स्वमुखें निंदून आपणातें ॥३०५॥
इत्यादि वचनीं माझ्या ठायीं । प्रदीप्त कोप करूनि पाहीं । प्रेमकलहाची नवाई । ते चतुराई तुम्हां योग्य ॥६॥
अनन्य अवंचक स्वपदनिरता । विदित असतां सर्वगता । वंचूनि स्वगुण ऐसिये छळितां । आली जडता कोणीकडे ॥७॥

जाड्यं वचस्तव गदाग्रज यस्तु भूपान्विद्राव्य शार्ङ्गनिनदेन जहर्थ मां त्वम् ।
सिंहो यथा स्वबलिमीश पशून्स्वभागं तेभ्यो भयाद्यदुदधिं शरणं प्रपन्नः ॥४०॥

अजां अविकां पश्वादिकां । शूकरां वानरां ऋक्षां शशकां । गजव्राघ्रादिवृकजंबुकां । आमिषभागार्थ झोंबतां ॥८॥
त्यांमाजि प्रतापें मृगेन्द्र जैसा । तयां विध्वंसी गर्जनेसरिसा । धाकें पळती दाही दिशा । मग आपैसा बळि हरी ॥९॥
तैसेंचि तुवां कौण्डिन्यपुरीं । ज्याबद्धशार्ङ्गटणत्कारीं । जरासंधादि भूपें समरीं । पळती घाबरीं पशुसाम्यें ॥३१०॥
नृपें भंगिलीं जीं किंमात्रें । पळालीं प्राणावशिष्टगात्रें । झालीं अपयशाचीं पात्रें । हें म्यां स्वनेत्रें देखिलें ॥११॥
तयांमाजूनि आपुला भाग । मजला मानूनि रमांश चांग । जाणोनि आपुलें अर्धाङ्ग । हरण केलें प्रतापें ॥१२॥
तयां पामरां नृपांभेणें । समुद्रा शरण ठालों म्हणणें । जाड्य मान्द्य या भाषणें । म्हणावें कोणें परकीयें ॥१३॥
आणि अस्पष्टवर्त्मनां आम्हां । ज्या ज्या आश्रयिती पैं वामा । त्या त्या पात्र होती भ्रमा । मेघश्यामा हें वदलां ॥१४॥
हेंही मान्द्याचिमाजी पडे । बोलें न शकवे जरी भिडे । प्रमसंरंभाचिये चाडे । बोलणें आवडे तरी ऐका ॥३१५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP