अध्याय २० वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्रावृट्श्रियं च तां वीक्ष्य सर्वभूतमुदावहाम् । भगवान् पूजयांचक्रे आत्मशक्त्युपबृंहिताम् ॥३१॥

ऐसा कृष्ण भोजनकाळीं । गोपगोधना न्याहाळी । प्रावृट्श्रियेची नव्हाळी । तोषबहळीं अवलोकी ॥२३५॥
सप्त श्लोकीं निरूपण । केलें प्रावृट्श्रीवर्णन । भूतमात्रा सुखसंपन्न । पाहोनि कृष्ण तोषला ॥३६॥
षड्गुणैश्वर्याचा राशि । तो श्रीकृष्ण व्रजनिवासी । जाणोनि स्वशक्तिविशेषीं । प्रावृट्श्रियेसी गौरवी ॥३७॥
म्हणे धन्य हे प्रावृटशोभा । सर्वं जंतूंसी वल्लभा । द्यावाभूमीसहित नभा । कंदर्पशोभा पाववी ॥३८॥
जें सुख दंपतीमाझारीं । रमतां उधळे सप्रेमभरीं । तें सुख सर्वांचे अंतरीं । ओपी श्रीहरि प्रावृटीं ॥३९॥
प्रावृट्कथन संपल्यावरी । पुढें शरत्काळाची थोरी । अठरा श्लोकीं शुकवैखरी । कथी ते चतुरीं परिसिजे ॥२४०॥

एवं निवसतोस्तस्मिन् रामकेशवयोर्व्रजे । शरत्समभवद्व्यभ्रा स्वच्छांब्वपरुषानिला ॥३२॥

एवं पूर्वोक्त क्रीडापर । राम आणि मुरलीधर । व्रजीं वसतां निरंतर । शरद्वासर पातला ॥४१॥
विगतअभ्र झालें नभ । स्वच्छ शीतळ सर्व अंब । अमृतोपम काश्मीरप्रभ । जें दुर्लभ वसंतीं ॥४२॥
वर्षाकाळींचा प्रबळ वात । शरद्वासरीं झाला शांत । वाहे सुखरूप निवांत । भूतां विपरीत न स्पर्शे ॥४३॥

शरदा नीरजोत्पत्त्या नीराणि प्रकृतिं ययुः । भ्रष्टानामिव चेतांसि पुनर्योगनिषेवया ॥३३॥

जियेंकरूनि नीरजोत्पत्ति । तिये शरदेची संप्राप्ति । जाणोनि नीरें निजप्रकृति । स्वादें येती स्वच्छत्वें ॥४४॥
योगभ्रष्टाचें जैसें चित्त । कामक्षोभें होय उपहत । विषयाचरणीं मग उत्पथ । अव्यावस्थ अनर्गळ ॥२४५॥
पुन्हा मुरडूनि योगाभ्यासें । हृदयकमळाच्या विकाशें । निजप्रकृति भजतां जैसें । तुळे अकाशें सुशांत ॥४६॥

व्योम्नोऽब्दं भूतशाबल्यं भुवः पंकमपां मलम् । शरज्जहाराश्रमिणां कृष्णे भक्तिर्यथाऽशुभम् ॥३४॥

आकाशादि चारी भूतें । वर्षाकाळीं मलाभिभूतें । शरद् निर्मळ करी त्यांतें । जेवीं आश्रमातें हरिभक्ति ॥४७॥
योगसिद्धीचें अनुष्ठान । कपिलमुनीचें जैसें मन । नेणे संकल्पविकल्पस्फुरण । तैसें गगन निर्मेघ ॥४८॥
अभ्रपटुळें वायु पाणी । विद्युल्लतेची झळकणी । पंचभूतांची हे मिळणी । निर्मळपणीं तैं निवडे ॥४९॥
भूतशाबल्य म्हणिजे यासी । शरत्स्वागमनें ते निरसी । आणि पार्थिवा कर्दमा शोषी । करी आपासी सोज्वळ ॥२५०॥
ब्रह्मचारी गृहनिवासी । वनस्थ आणि चौथा संन्यासी । कृष्णभक्ति या चौघां जैशी । श्रमापासूनि सोडवी ॥५१॥
नानाश्रमें वेदाध्ययन । करूनि कीजे पाणिग्रहण । षट्कर्मांचें अनुष्ठान । व्रताचरण कर्कष ॥५२॥
विरक्ति तये ठायीं नुपजे । तैं मग वनस्थ होइजे । परम दुर्घट कर्म जें जें । तें आचरिजे तये ठायीं ॥५३॥
तेथही न लभतां आत्मरति । तैं चौथा आश्रम होइजे यति । देहीं वृद्धाप्यें न थरे शक्ति । होय विपत्ति आचरतां ॥५४॥
त्या चौघांसि विश्रांति - । दायक जैशी श्रीकृष्णभक्ति । सप्रेम करितां निजात्मरति । चौघे पावती अक्लेशें ॥२५५॥
तयापरी शरत्काळ । चौ भूतांचा निरसी मळ । अमळ करी ब्रह्मांडगोळ । भजनशीळ ज्यापरी ॥५६॥

सर्वस्वं जलदा हित्वा विरेजुः शुभ्रवर्चसः । यथा त्यक्तैषणाः शांता मुनियो मुक्तकिल्बिषाः ॥३५॥

जंववरी सजळ असती घन । तंववरी दिसती कृष्णवर्ण । सांडितां सर्वस्व जीवन । शुभ्र संपूर्ण शोभती ॥५७॥
पुत्रवित्तलोकेषणा । त्यागितां प्रवृत्तिवासना । मुक्तकिल्बिष योगी जाणा । उपमा घना शरदुत्था ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP