अध्याय २० वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


पीत्वाऽपः पादपाः पद्भिरासन्नानात्ममूर्तयः । प्राक् क्षामास्तपसा श्रांता यथा कामाऽनुसेवया ॥२१॥

वर्षाकाळीं स्वैर आप । चरणें प्राशिती पादप । तेणें होती अनेकरूप । करिती व्याप सभंवतां ॥१५५॥
मुळियांप्रति फुटती कोंभ । सरळ सरकोनि आक्रमिती नभ । पूर्विला ऐसेचि स्वयंभ । लांब लांब बहु होती ॥५६॥
पूर्वतापें पानें झडलीं । उष्णें आहळोनि खांकरलीं । वृष्टिभरें पुन्हा झालीं । फांपावलीं बहु वृक्षीं ॥५७॥
सकाम तापस जैसे क्षाम । क्षुधे तृषेचे साहतां श्रम । कृछ्रादि अनेक चाळितां नेम । अभीष्टकाम लाभती ॥५८॥
पूर्वीं एकाकी निस्पृह । वनौकस अपरिग्रह । तपें पूर्ण संकीर्ण देह । त्यांसि उत्साह फळलाभीं ॥५९॥
मग अनेक देहवंत । होऊनि होती कामासक्त । तपें क्लेशाचें सुकृत । स्वेच्छा तेथ भोगिती ॥१६०॥
तैसा अवृष्टीचा ताप । सांडोनि प्राशितां वृष्टिआप । होती एकाचे अमूप । वनीं पादप सुरवाडे ॥६१॥

सरस्स्वशांतरोधस्सु न्यूषुरंगापि सारसाः । गृहेष्वशांतकृत्येषु ग्राम्या इव दुराशयाः ॥२२॥

वर्षाकाळीं सरिता सरें । पूरें दाटती वृष्टिभरें । तेथें बुडोनि पूर्वींचीं तीरें । नवीं दुस्तरें उमटती ॥६२॥
कंटक कर्दम ओसाण । समल जळें बहळ फेण । तथापि चक्रवाकांचे गण । सुख न पावोन वसताती ॥६३॥
जैसे गृहाश्रमी गृहासक्त । नाहीं झाले तृष्णारहित । त्यांचीं गृहेंचि आशाकृत् । घालिती नित्य दुर्भरीं ॥६४॥
व्यवहारीं साधिजे वृत्ति भूमि । शत्रु जिंकावे संग्रामीं । देवता वश कीजे नेमीं । यथाकामीं फलदात्री ॥१६५॥
लहान वाडा कीजे थोर । तन्हार मोडून धवलार । दृढ पाषाणीं प्राकार । बांधोनि सधर होइजे ॥६६॥
पारद औषधिसाधन । धातुवादाचें कांचन । करावया दीर्घ यत्न । नित्य नूतन आरंभीं ॥६७॥
ऐशीं अनेक दीर्घ कृत्यें । सिधि न पावोनि अशांतें । तृष्णाभरें गृहस्थातें । कवळूनि दुःखांत पाडिती ॥६८॥
इत्यादि कर्में सिद्धीस जावीं । मग गृहकृत्यें शांत व्हावीं । हे तो मिथ्या उठाठेवी । ग्राम्यां गोवी दुर्लोभें ॥६९॥
दुष्टकर्माचे संस्कार । तेणें विषयकामीं भर । दुराशयवंत नर । दुःखी अपार गृहवासी ॥१७०॥
तैसीं सारसें सरितातटें । कंटककर्दमफेणपुंजितें । जरी सुखाचा लेश न वटे । तरी उपविष्टे संक्लेश ॥७१॥
अंग म्हणोनि संबोधून । शुकें रायासि इतुकें कथून । पुढें म्हणे सावधान । प्रावृड्वर्णन अवधारीं ॥७२॥

जलौघैर्निरभिद्यंत सेवतो वर्षतीश्वरे । पाखंडिनामसद्वादैर्वेदमार्गाः कलौ यथा ॥२३॥

जैसा प्रवर्तलिया कलिकाळ । बलिष्ठ पाखंडियांचा मेळ । असद्वादें महाकुटिळ । भंगिती समूळ सन्मार्ग ॥७३॥
वर्षाकाळींचे उत्तरमेघ । इंद्र वर्षतां क्षोभती ओघ । सेतु भंगितां पावती भंग । जनपदमार्ग तद्योगें ॥७४॥
निंदूनि वेदविहिताचार । बळें प्रशंसिती अभिचार । क्षुद्र दावोनि चमत्कार । सिद्धि अघोर साबरी ॥१७५॥
रोगहरणीं कां संतानीं । धनागमनीं नृपसन्मानीं । इत्यादि लोभें प्रलोभवोनी । दुष्टाचरणीं घालिती ॥७६॥
जारणमारण स्तंभन । वशीकरण मोहन उच्चाटन । क्षणिक सामर्थ्य दावून । आज्ञानजन भुलविती ॥७७॥
महातमी जे मांगभाव । पाखंडरूपी आघवी माव । भोंवाळ करूनि घरींचे देव । बोधूनि अभाव सांडविती ॥७८॥
रोधूनि वेदविहिताचार । बळेंचि प्रशंसिती अवसर । ऐसे अनेक पाखंडभार । श्रोती अनखर न मनावे ॥७९॥
सांडूनि वेदविहिताचरण । अविधि वेषाचें धारण । तितुक्या वेषें पाखंडगण । किती म्हणोन निवडावे ॥१८०॥
जटी मुंडी लुंचितकेश । राउळपगरे बीभत्सवेष । विष्णुशिवशक्तिगणेश - । भजनावेश पाखंडी ॥८१॥
हाडें कातडीं घालिती गळां । एक घालिती कवडेमाळा । एक कंठीं बांधती शिळा । म्हणती आगळा शिवमार्ग ॥८२॥
अष्टादशयातिजन । दीक्षा देऊनि करिती पवन । वेष दिधल्या न दिसे भिन्न । अवघें लिंगा न सोंवळें ॥८३॥
ऐसें जितुके वेषधारी । यातिकुळापासूनि दूरी । वर्णाश्रमाची बोहरी । दुराचार सहजेंची ॥८४॥
बाह्य महती वाढवून । शिष्यमांदी मेळवून । शिश्नोदरपरायण । ते पाखंड मान्य कळिकाळीं ॥१८५॥
श्रोतयांमाजीं कांहीं कांहीं । असतां ऐसे संप्रदायी । क्षोभें विषादा न योन तिहीं । विचार हृदयीं विवरावा ॥८६॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । ऐसे चारी वर्ण मात्र । प्रसवे आदिपुरुषाचें गात्र । संततिगोत्र मग याचे ॥८७॥
विलोमानुलोमसंचारें । विहिताविहित उत्पथाचारें । जरीम पावले जात्यंतरें । मुळींचे खरे चौघे कीं ॥८८॥
लक्षचौर्‍यांशीं भेद गणितें । झालीं भौतिकें अनंतें । तरी मुळींचीं पंचभूतें । निजअंशातें भजताती ॥८९॥
तैसें न भजोनि वेदविहिता । अनुसरोनि पाखंडमता । वरपडे होती जे दुष्पथा । क्षणिक स्वार्था भुलोनी ॥१९०॥
परी हे कळीचेनि क्षोभें । भांबावती क्षणिक लोभें । एर्‍हवीं अदृष्टावीण न लभे । दुष्पठवालभें धुंडितां ॥९१॥
एवं कळीकाळीं पाखंडगण । श्रुतिसेतूचें खंडन । करिती तैसे वर्षतां घन । सेतुभंजन जलओघें ॥९२॥

व्यमुंचन् वायुभिर्नुन्ना भूतेभ्योऽथामृतं घनाः । यथाऽऽशिषो विश्पतयः काले काले द्विजेरिताः ॥२४॥

सुवावो ढळोनी वळती मेघ । यथाकाळें सुवृष्टि चांग । भूतांकारणें अमृतभाग । ओपिती सांग प्रावृटीं ॥९३॥
जळ नव्हे तें अमृतपान । भूतांकारणें आप्यायन । येर दुर्वातें अकाळघन । भूतनाशन विषवृष्टि ॥९४॥
तैसे न होती सुवासयुक्त । भूतांकारणें ओपिती अमृत । जैसे सुब्राह्मणसुप्रणीत । आशीर्वाद नृपातें ॥१९५॥
अनध्यायपरित्याग । करूनि वेदपठन सांग । वेदविहिताचार मार्ग । जे अव्यंग आचरती ॥९६॥
तया द्विजां प्रेमार्चनें । यथाभीष्ट पदार्थदानें । संतोषोनि आशीर्वचनें । पूजकाकारणें देती ते ॥९७॥
यथाकाळीं कामप्रद । तयांचे होती आशीर्वाद । प्रजापाळकां भूपां विशद । तैसें अंबुद भूतांते ॥९८॥
प्रावृट्शोभा एथवरी । शुकें वर्णूनि सविस्तरीं । आतां ते वनीं कैसा हरि । क्रीडे ते परी निरूपी ॥९९॥

एवं वनं तद्वर्षिष्ठं पक्कखर्जूरजंबूमत् । गोगोपालैर्वृतो रंतुं सबलः प्राविशद्धरिः ॥२५॥

एथूनि सप्तश्लोकावधि । प्रावृट्काळींची क्रीडाविधि । वर्णिता होय शुक सुबुद्धि श्रोता गुणाब्धि परीक्षिति ॥२००॥
एवं पूर्वोक्त प्रावृट् परमा । तेणें ऋतुमती कानपरमा । देखोनि सगोप कृष्णरामा । अद्भुत प्रेमा क्रीडावया ॥१॥
वन विशिष्टसमृद्धिमंत । पक्क खर्जूरी मघमघित । सफळित जंबुवृक्ष जेथ । लता अनंत पुष्पिता ॥२॥
मोहरें लगडलिया धात्री । हेमप्रभा सफळकारी । तिंदुक धामणी फळभारीं । रानवोरी मोहरल्या ॥३॥
कपित्थ बिल्व कोमळफळीं । सेव सौवीर फांपावल्या कर्पूर कदळी । नारिकेली क्रमुकादि ॥४॥
द्राक्षा मरीच लवंगतिका । जाती यूथिका मालतिका । बकुळी पुन्नाग नागलतिका । नागचंपक फूलले ॥२०५॥
बलभद्रेंशीं नंदकुमार । भंवता गोपाळांचा भार । शोभाढ्य देखोनि कांतार । क्रीडापर प्रवेशला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP