मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| श्लोक १६ ते २० अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर मार्गा बभूपुः संदिग्धास्तृणैश्छन्ना ह्यसंस्कृताः । नाभ्यस्यमानाः श्रुतयो द्विजैः कालहता इव ॥१६॥प्रावृट्काळीं वृष्टिभरें । तृणें वाढती पैं अपारें । मार्गज्ञान तेणें न स्फुरे । पथकांतारें समसाम्यें ॥२७॥प्राचीनमार्गपरिज्ञान । लोपोनि दुष्पथ भासे रान । वार्षिकीं चालों न शकती जन । तेणें धोरण बुजालें ॥२८॥वृक्षपाषाणसीमादि लक्ष । संदिग्ध मार्गें चालती दक्ष । येर अबळें तोचि पक्ष। धरणीकक्ष तुडविती ॥२९॥जैसें दुष्काळें जठरासाठीं । द्विजीं धावतां अन्नापाठीं । न बैसोनि श्रुतीच्या पाठीं । व्यासंगराहटीं गुंतले ॥१३०॥तया द्विजांचा श्रुतिप्रणीत । सन्मार्ग होय जैसा उपहत । तृणाच्छन्न तो असंस्कृत । अभ्यासवर्जित अक्षुण्ण ॥३१॥दुष्काळयोगें मलिनाचार । तेणें लोपती श्रुतिसंस्कार । तये काळींचे ब्राह्मणकुमार । त्यां तो आचार दृढ होय ॥३२॥भक्ष्याभक्ष्य ग्राह्याग्राह्य । त्याच्यात्याज्यविचार राहे । पोट भरे ज्या उपायें । तो तैं होय निजमार्ग ॥३३॥तृणें मार्ग आच्छादिती । तेंवि निगमाचार लोपती । गति अभ्यास खुंटती । बुजोनि जाती अक्षुण्ण ॥३४॥लोकबंधुषु मेघेषु विद्युतश्चलसौहृदाः । स्थैर्यं न चक्रुः कामिन्यः पुरुषेषु गुणिष्विव ॥१७॥वर्षाकाळींचें कौतुक । पुन्हा अपूर्व वर्णी शुक । त्यामाजीं दृष्टातें विवेक । घेती साधक स्वहितार्थ ॥१३५॥लोकबंधु मेघ सजळ । सगुण सजळ शिखंडिप्रिय । विद्युल्लता पुंश्चलीप्राय । स्थिर नोहे स्वकांतीं ॥३६॥जैशा योषिता स्वैरिणी । पुरुष जोडल्या उत्तमगुणी । तेथ न भजोनि चंचलपणीं । यथेष्टाचरणीं दुर्वृत्ता ॥३७॥तैशा मेघीं चपळ चपळा । जेंवि कटाक्षे पुंश्चली अबळा । सुखप्रकाश दावूनि डोलां । देती सोहळा अंधतमीं ॥३८॥धनुर्वियति माहेंद्रं निर्गुणं च गुणिन्यभात् । व्यक्ते गुणव्यतिकरेऽगुणवान् पुरुषो यथा ॥१८॥इंद्रधनुष्य भासे गगनीं । रहित प्रत्यंचा जें अगुणी । गमे टणत्काराचे ध्वनीं । सज्जिलें गुणीं ज्याबद्ध ॥३९॥जैसें निर्विकार निर्गुण । ब्रह्म सन्मात्र संपूर्ण । गौणप्रपंच पांघरूनि । भासे सगुण सर्वात्मा ॥१४०॥तैसें निर्गुण शक्रचाप । टणत्कारोनि वर्षे आप । तेणें भासे सप्रताप । सज्जरूप सगुणवंत ॥४१॥न रराजोडुपश्र्छन्नः स्वज्योत्स्नाराजितैर्घनैः । अहंमत्या भासितया स्वबासा पुरुषो यथा ॥१९॥प्रावृट्काळीं न शोभे शशी । नभीं फांकोनिही स्वप्रभेसी । मेघ दाटती प्रबलतेसी । इंद्रप्रभेसी छादक ॥४२॥शुद्धसत्त्वाचीं चंद्रकिरणें । झांकोळती सजल घनें । उदयास्तही कोण्ही नेणें । तमें चांदिणें लोपलिया ॥४३॥अनंतैश्वर्य परमात्मा । माजी झांकतां अविद्याभ्रमा । देहबुद्धीची होय अमा । निजात्मपरमा लोपोनी ॥४४॥जीव जैसा निजात्मविसरें । इहामुष्मिक मानी खरें । अष्टमदांच्या आविष्कारें । ज्ञान न स्फुरे वास्तव ॥१४५॥देहबुद्धीच्या अभिमानें । ज्ञाता कर्ता भोक्ता म्हणे । असंग अमृत असतां नेणे । तैसा घनें शशी लोपे ॥४६॥मेघागमोत्सवा हृष्टाः प्रत्यनंदन् शिखंडिनः । गृहेषु तप्ता निर्विण्णा यथाऽच्युतजनागमे ॥२०॥प्रावृट्काळीं मेघ सजळ । देखोनि तोषती कलापिमेळ । सन्मुख धांवती प्रेमविह्वळ । करिती कल्लोळ स्वानंदें ॥४७॥जैसे संसारी विषयासक्त । त्रितापदुःखें होती विरक्त । त्यांसि भेटतां अच्युतासक्त । आनंदभरित ज्यापरी ॥४८॥विजातीय कवळूनि मोहो । आत्मबुद्धि पार्थिवदेहो । विषयसुखांचा करितां लाहो । त्रितापदाहो झळंबला ॥४९॥वणवां पडलिया पाडसा । दाही दिशा भवें वळसा । तैसे शिरकळे कर्मफांसा । विश्रांतिलेशा नेणती ॥१५०॥त्यांसि अच्युतजनागमन । अवर्षणीं जैसा घन । कीं मरतया अमृतपान । दैवें आणून योजिलें ॥५१॥अच्युतजनांचे संगति - । मात्रें तापत्रय भंगती । भजनप्रेमा बाणे चित्तीं । बोधे विश्रांति स्वसुखाची ॥५२॥गीत नृत्य हरिकीर्तनें । आनंदाश्रु ढळती जीवनें । प्रेम संवाद स्फुंदनें । मज्जनोन्मज्जनें स्वानंदीं ॥५३॥तैसे सजल मेघासमोर । हर्षोत्साहें धांवती मयूर । करिती नृत्य गीत केकार । आनंदाश्रु विसर्जिती ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP