अध्याय १२ वा - श्लोक १३ ते १४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अथाघनामाऽभ्यपतन्महासुरस्तेषां सुखक्रीडनवीक्षणाक्षमः ।
नित्यं यदन्तर्निजजीवितेप्सुभिः पीतामृतैरप्यमरैः प्रतीक्ष्यते ॥१३॥

वयस्य क्रीडतां श्रीकृष्णेशीं । देखतां संतोष सुरनरांसी । तेणें जळे निजमानसीं । देखावयासी अक्षम ॥४६॥
पतंग देखों न शके दीप । कीं ते शूर्पनखी जानकीरूप । कीं शिवक्रीडेतें कंदर्प । देखोनि कोप प्रज्वळी ॥४७॥
सन्मार्ग देखों न शके दुर्जन । कीं श्रीमंतातें दस्युगण । पतिव्रतेचें शुद्धाचरण । जेवीं स्त्रैण न साहे ॥४८॥
तेवी कृष्णेंशीं कृष्णसखे । क्रीडतां अघात्मा देखों न शके । प्रयत्नीं पडला महा तवकें । सहोदरदुःखें दाटोनि ॥४९॥
जया अघाच्या भयासाठिं । अमर सदा धाकटी पोटीं । कैसेनि मरे हा दुष्ट कपटी । कोणी जगजेठी न वधी या ॥२५०॥
ज्यापासूनि मरणधाक । अमर वाहती साशंक । अक्षयाचा विवेक । कोणा निष्टंक स्फुरेना ॥५१॥
कोणापासूनि हा दुर्जन । कैसेनि कोणा यत्नें करून । कोणे कालीं पावे मरण । हें सुरगण लक्षिती ॥५२॥
निज जीवितरक्षणीं सादर । अमरही पाहती ज्याचें छिद्र । तो कृष्णक्रीडा देखोनि असुर । महाक्रूर क्षोभला ॥५३॥
ते कृष्णक्रीडा म्हणाल कैसी । देव देखोनि निज मानसीं । नित्य करिती आकांक्षेसी । तें परियेसीं नृपवर्या ॥५४॥
अमृत पिऊनि अमर झालों । परंतु हरिप्रेमा मुकलों । स्वर्गभोगें बंदीं पडलों । अंतरलों या हरिसुखा ॥२५५॥
अमृतपानें जीवित सफळ । मूर्ख मानिती पैं केवळ । कृष्णलीलास्मरणशील । चित्सुखकल्लोळ भोगिती ॥५६॥
भगवल्लीलामृताचें पान । करूनि झाले जे सुमन । ब्रह्मादि देव त्यां करिती नमन । पुनरावर्तन वर्जित ॥५७॥
म्हणोनि जीविताशा धरूनि । अमर झाले अमृतपानी । ते इच्छिती मरणालागूनि । लीला वदनीं गावया ॥५८॥
अमर म्हणती मरोनि जावें । मान्वलोकीं जन्म घ्यावें । श्रीकृष्णाचें कीर्तन गावें । नित्य प्यावें लीलामृत ॥५९॥
अंगीं असतां अमरपण । कां पां न करिती कृष्णकीर्तन । कासया इच्छिती अमर मरण । हें विचक्षण परिसोत ॥२६०॥
मत्स्य चालों न शके भूमी । मनुष्य वलघों न शके व्योमीं । पक्ष्या ऐसा न उडे कृमी । अविकें द्रुमीं न चढती ॥६१॥
तेंवी अनेक यज्ञाचरणें । देवपणाचें लेइलें लेणें । ते योनीच्या विषयाविणें । अन्य सेवन घडेना ॥६२॥
जैशी मानवां मिथुनीं रति । तैशी न घडे पक्ष्यांप्रति । नेत्रद्वारा केकी रमती । जळीं क्रीडती गजमिथुनें ॥६३॥
तैसें देवासी सुधापान । सुख सुरगणमिथुनें । चैत्ररथनंदन क्रीडनें । स्रक्चंदनसुख वाढे ॥६४॥
कैवल्यदायक कळल्यावरी । कां पां कीर्तन न किजे सुरीं । लाभ जाणोनि अव्हेरी । ऐसी परी न देखों ॥२६५॥
तरी देखोनि पक्ष्यांची नभोगाति । मनुष्या दुर्लभ कळल्या चित्तीं । अभ्यासितां न चढे हातीं । तेवीं देवांप्रति वैराग्य ॥६६॥
सुकृताधिक्यें स्वर्गसुख । दुष्कृताधिक्यें दुःखनरक । निष्कामकर्में वैराग्य देख । अप्राप्य अचुक परस्परें ॥६७॥
हस्तापासूनि सुटतां शरे । ओढीपर्यंत गगनां भरे । मध्यें कोणाच्या प्रार्थनादरें । मागुता फिरे हें न घडे ॥६८॥
कीं चंद्रज्योति नळे बाण । द्रव्यें भरलीं भिन्नभिन्न । अल्प चेतल्या थांबवीन । म्हणोनि यत्न न चाले ॥६९॥
चंद्रज्योतीचा नव्हे बाण । नळा बाणाचा नोहे जाण । तेंवी अनिष्टमिष्टमिश्राचरण । फळ संपूर्ण भोग दे ॥२७०॥
इष्टफळार्थ जन्मले स्वर्गीं । वैराग्य दुर्लभ तयालागीं । विरक्तीवीण हे वावुगी । म्हणती अवघी सुरतनु ॥७१॥
यालागीं अमर इच्छिती मरण । म्हणती मृत्युलोकीं जन्मून । विषयीं विरक्त होऊन । कृष्णभजनसुख भोगूं ॥७२॥
ऐशी कृष्णक्रीडा देखोनि दिठी । देव उत्कंठा धरिती पोटीं । हें देखोनि जळे कपटी । दैत्य हटी अघनामा ॥७३॥

दृष्ट्वाऽर्भकान्कृष्णमुखानधासुरः कंसानुशिष्टः स बकीबकानुजः ।
अयं तु मे सोदरनाशकृत्तयोर्द्वर्योरथैनं सबलं हनिष्ये ॥१४॥

कृष्णादि अर्भकांतें देखोनि । अघासुरें मनीं विवरोनि । ते ग्रासावया सर्प होऊनि । पथीं शयन तो करी ॥७४॥
ऐसा अन्वय तृतीया श्लोकीं । संबंध ये वैशेषिकीं । आतां आरब्धपदीं पृथकीं । व्याख्या विवेकीं परिसावी ॥२७५॥
आधींच मोह अघासुर । अनेक अघांचा गिरिवर । अहंकंसें बोधूनि वैर । करूनि क्रूर प्रेरिला ॥७६॥
पूतना बहिणी बंधु बक । कृष्ण दोघांचा घातक । त्यांसी वधूनि वैर कलंक । फेडी निष्टंक आपुला ॥७७॥
ऐसें कंसें देऊनि पुट । कृष्णहननार्थ पापिष्ट । प्रेरिला तेणें धरिली वाट । महाकपटें करूनि ॥७८॥
दैवानुसार सर्वां मरण । निमित्त वैरासी कारण । मोहा चेतवी अभिमान । तैं अन्योन्य तो करी ॥७९॥
होणार तैसें होऊनि गेलें आयुष्यक्षयीं प्राणी मेले । निमित्तमात्र एका केलें । तें निरसिलें विवेकें ॥२८०॥
निमित्तधारी न मारितां । तरी काय प्राणी मरत होता । निमित्त देऊनि एकमाथां । काळ ग्रासिता सर्वांतें ॥८१॥
ऐशा विवेकें मोह निरसे । अहंकारें तो आवेशे । अविवेकबळें रागद्वेषें । महारोषें फुंपाटे ॥८२॥
बक बकीचा सहोदर । अहंकंसाचा ऐकोनि मंत्र । कुपथ्यें खवळे जीर्णज्वर । तेंवी असुर क्षोभला ॥८३॥
कृष्णप्रमुख गोपकुमार । क्रीडतां देखोनि अघासुर । अग्रजवधाचें स्मरोनि वैर । करी विचार तो ऐका ॥८४॥
पूतना बक मारिले गाढे । तो हा मारीन त्याचेनि सुडें । सहित वत्सेंशीं मग निवाडे पहुडेन ॥२८५॥
माह्या अग्रजाचा अंतक । आजि हा मारीन सहित कटक । हेचि अग्रजा तिळोदक । येर व्रजौकस शव तुल्य ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP