अध्याय दहावा

श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे निशुंभ मारिला पाहून ॥ बंधू प्रिय तो प्राणाहून ॥ सेनाही मेली संपूर्ण ॥ क्रोधें वचन बोले शुंभ ॥१॥
दुष्टे मीचि बळी म्हणूनि थोर ॥ दुर्गे गर्व करूं नको फार ॥ अन्य बळाश्रयाचेनि आधारें ॥ संग्रामशूर स्त्रिये तूं ॥२॥
देवी म्हणे जगी मीचि एक ॥ मजवांचूनि कोण आणिक ॥ दुष्टा रे तूं आतांचि देख ॥ विभूती सकळिक मजमाजी प्रवेशती ॥३॥
मग त्या देवीसमस्त ॥ ब्रह्माणी प्रमुख लया जात ॥ प्रवेशल्या देवीच्या तनूत ॥ तेव्हां येकली ते असे अंबा ॥४॥
मीचि बहू विभूतीरूपें ॥ होतें येथें आपोआप ॥ आवरूनि सर्वही स्वरूप ॥ उभी युद्धीं तूं धीर धरी ॥५॥
युद्धा तेव्हां आरंभ झाला ॥ देवी आणि शुंभा दोघाला ॥ पहात असतां सर्व भूतमेळा ॥ असुरा ते वेळां दारुण ॥६॥
शरवर्षाव तीक्ष्ण शस्त्रें ॥ आणिकही महाअस्त्रें ॥ युद्ध होतसे दोघां थोर ॥ अत्यंत घोर रणामाजी ॥७॥
दिव्य अस्त्रें शताचे शत ॥ अंबेनें टाकिलें बहुत ॥ दैत्येंद्रें तोडिलें समस्त ॥ तोही टाकित उदंड अस्त्रें ॥८॥
अस्त्रें टाकितां देवीवरी ॥ तेव्हां काय केली परमेश्वरी ॥ लीले करूनि खांडे त्याचीं ॥ हुंकार उच्चारेचि ते वेळां ॥९॥
देवीसी शतशरे करून ॥ असुरें टाकिलें झांकून ॥ देवीसी कोप आला दारुण ॥ शरासह धनुष्य जाण तोडिलें त्याचें ॥१०॥
छिन्नधनू तो असुर ॥ त्यानें शक्ति घेतली शीघ्र ॥ देवीनें तोडिलें चक्रें ॥ हातींचे शत्र ते काळीं ॥११॥
तेव्हां खङ्ग हातीं घेऊन ॥ शतचंद्रसूर्यतेजासमान ॥ देवीवरी येतां धांवून ॥ दैत्य जाण ते काळीं ॥१२॥
तो शीघ्र येतां आवेशीं ॥ चंडिकेनें टाकिलेम तोडून खङ्गासी ॥ टाकूनिया तिखट वाणासी ॥ केली ढाल तशी हतप्रभा ॥१३॥
अश्वही मारूनि टाकिले ॥ रथासह सारथ्यास पाडिलें ॥ हताश दैत्य तें काळें ॥ छीन्नधनू केलें विरथ त्यासी ॥१४॥
घोर मुद्गलही घेऊन ॥ अंबेसी मारावया येतां जाण ॥ त्याचें मृद्गलही टाकिलें छेदूनि ॥ तीक्ष्ण बाणें करूनी ॥१५॥
तैसाची तो अंबेवरी ॥ असुर मुष्टी आवळूनि वेगें थोर ॥ मारितां झाला दैत्येंद्र ॥ उरावर ते काळीं ॥१६॥
करप्रहार त्या देवीनें ॥ उरावरी केला दारुण ॥ देवीच्या करताडनें करून ॥ पृथ्वीवरी उलथून पडला तो ॥१७॥
तेव्हां दैत्य सावध होऊन ॥ काय्क अरी पुन्हां उठून ॥ बळें धरूनि उंच केलें उड्डाण ॥ देवीसी त्यानें नेलें गगनीं ॥१८॥
तत्रापि ते निराधार ॥ चंडिका त्यासी युद्ध करी थोर ॥ आकाशीं झुंजे असुर ॥ चंडिकेसी परस्परें अत्यंत ॥१९॥
प्रथम युद्धींच ते सिद्ध ॥ मुनी विस्मय अगाध ॥ तेव्हां बहुत काळ झालें युद्ध ॥ असुर झुंजे अंबेसी ॥२०॥
त्यासी धरूनि भोवंडून ॥ धरणीवरी आपटिला जाण ॥ तो भूमीवर पडूनिही आपण ॥ मुष्टी आवळून वेगेसी ॥२१॥
धाविन्नला दुराचारी ॥ चंडिके मारावया इच्छा धरी ॥ तो येतां ते परमेश्वरी ॥ दैत्यजना करी पोषण जो ॥२२॥
त्यासी पृथ्वीवरी पाहून ॥ शूलें वक्षस्थळ केलें विदारण ॥ तो भूमी पडला गतप्राण ॥ साब्धिद्वीपपर्वत कांपती ते वेळां ॥ तेव्हां प्रसन्नता आली सकळाला ॥ मारितां असुराला तत्काळ ॥२४॥
जग अत्यंत सुखी झालें ॥ आकाश झालें निर्मळ ॥ मेघाचे उत्कापात राहिले ॥ सकळ ते झाले पूर्ववत ॥२५॥
अमार्ग टाकिला नद्यांनीं ॥ त्या मारिल्या वरी झालें निर्मळ पाणी ॥ तेव्हां देवगणा सर्वां लागुनी ॥ हर्ष मनीं न समाये ॥२६॥
असुर मारिल्यावरी जाण ॥ गाती गंधर्व मंजुळ गाणें ॥ वाद्यें वाजविती कितिएकजण ॥ अप्सरागण नाचती ॥२७॥
वाहे शीतळ सुगंध मंद वात ॥ सुप्रभ सूर्य उदेला गगनांत ॥ अग्निज्वाळा प्रज्वळीत शांत ॥ मंजुळ ध्वनी गर्जत दिशा त्या ॥२८॥
सुमेधा ऋषी तपोधन ॥ सुरथ राजासी करी कथन ॥ तेचि कथा मार्कंडेय आपण ॥ भागोरी ऋषीसी म्हणे ऐक ॥२९॥
श्रोत्या विनवी नित्यानंद ॥ तेचि कथा म्यां केली विषद ॥ माझी प्राकृत वाणी अबद्धसुबद्ध ॥ क्षमाअपराध करावा तुम्ही ॥३०॥
इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराण संमत ॥ झाला दशमाध्याय समाप्त ॥ जगदंबा कृपावंत प्रीति पावो ॥३१॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ दशमाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय दशमाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP